वृद्धावस्थेत देखील तिने यहोवाची सेवा केली
अनेक वृद्ध लोकांना वाटते की, त्यांच्या उरलेल्या आयुष्यात आनंद मिळण्याची फार कमी आशा आहे. एका सुप्रसिद्ध वृद्ध नटीने असेही म्हटले: “मी माझ्या सर्व जीवनाची खिचडी करून टाकली आहे. परंतु आता ते बदलण्यास फारच उशीर झाला आहे. . . . मी जेव्हा एकटीच चालत असते, तेव्हा मी माझ्या मागील जीवनाचा विचार करते, आणि खरं सांगायचं तर मी माझे जीवन ज्याप्रकारे व्यतीत केले आहे त्याबद्दल मला मुळीच आनंद नाही. . . . मी बेचैन आहे आणि कोठेही स्थायिक होऊ शकत नाही.”
सुमारे २,००० वर्षांपूर्वी, एका वृद्ध स्त्रीला अशा प्रकारची कोणतीच समस्या नव्हती. ती ८४ वर्षांची विधवा होती, परंतु ती सक्रिय, आनंदी आणि आश्चर्यकारकपणे देवाची स्वीकृती प्राप्त झालेली होती. तिचे नाव हन्ना होते, आणि आनंद करण्यासाठी तिच्याजवळ विशेष कारण होते. ते काय होते बरे?
‘मंदिर सोडून कधीच जात नसे’
शुभवर्तमानाचा लेखक लूक, हन्नासोबत आमची ओळख करून देतो. तो म्हणतो, इस्त्राएलात “हन्ना नावाची एक संदेष्ट्री होती, ती आशेराच्या वंशातील फनूएलाची मुलगी होती.” संदेष्ट्री या नात्याने, तिला खास अर्थाने, देवाच्या पवित्र आत्म्याचे किंवा कार्यकारी शक्तीचे वरदान प्राप्त झाले होते. हन्नाला एके संस्मरणीय प्रसंगी भविष्यवाणी करण्याची महान संधी होती.
लूक पुढे म्हणतो: “ती फार वयोवृद्ध झाली होती व कौमार्यकाल संपल्यापासून ती नवऱ्याजवळ सात वर्ष राहिली होती. आता ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा आहे.” (लूक २:३६, ३७) बहुधा, हन्ना तरूण असताना विधवा झाली असावी. कोणत्याही वयोमानातील ख्रिस्ती स्त्रियांना हे माहीत आहे की, मरणामध्ये आपल्या प्रिय नवऱ्याला गमावणे किती हृदयद्रावक असते. परंतु, आमच्या दिवसातील पुष्कळ ईश्वरी स्त्रियांप्रमाणेच, हन्नाने देखील या दुःखदायक अनुभवामुळे देवाची सेवा करण्याचे सोडले नाही.
लूक आम्हाला सांगतो की, यरूशलेमेमध्ये हन्ना ‘मंदिर सोडून कधी जात नसे.’ (लूक २:३७) देवाच्या घरात सेवा केल्यामुळे येणाऱ्या आशीर्वादांची तिने उत्सुकतेने कृतज्ञता व्यक्त केली. तिच्या कृत्यांनी प्रकट केले की तिला, इस्त्राएलाचा स्तोत्रकर्ता राजा दाविदाप्रमाणेच यहोवाला केवळ एकच गोष्ट विचारायची होती. ती गोष्ट कोणती होती? दाविदाने गायिले: “परमेश्वराजवळ [यहोवा, NW] मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या [यहोवा, NW] घरात माझी वस्ती व्हावी. म्हणजे मी परमेश्वराचे [यहोवा, NW] मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.” (स्तोत्रसंहिता २७:४) याबाबतीत सुद्धा, हन्ना आजच्या ख्रिस्ती स्त्रियांप्रमाणेच आहे ज्या यहोवाच्या उपासनेच्या ठिकाणी नियमित उपस्थित राहण्यात आनंद मिळवतात.
हन्ना यहोवाची सेवा रात्रंदिवस करत होती. असे तिने शोक आणि मनापासून ओढ असल्याचे सूचित करून “उपास व प्रार्थना” याच्याद्वारे केले. (लूक २:३७) अनेक शतकांपासून विदेशी सामर्थ्याखाली यहुदी अधीनतेची शिवाय, मंदिर आणि त्याच्या याजकत्वापर्यंत पोंहचलेल्या ऱ्हास होत चाललेल्या धार्मिक परिस्थितीमुळे, हन्ना सतत उपास आणि यहोवा देवाला मागणी करत असे. परंतु तिच्याकडे खासकरून सा. यु. पूर्व २ या वर्षात खरोखर एका महत्त्वाच्या दिवशी जे घडले त्यामुळे आनंदाचे आणखी एक कारण होते.
एक अनपेक्षित आशीर्वाद
या अतिशय महत्त्वाच्या दिवशी, येशू बाळाला त्याची आई मरीया आणि त्याचा दत्तक पिता योसेफ यांनी यरूशलेमेच्या मंदिरात आणले होते. वयस्कर शिमोनाने ते बाळ पाहिले आणि त्याच प्रसंगी भविष्यसूचक शब्द उद्गारले. (लूक २:२५-३५) नेहमीप्रमाणे हन्ना देखील मंदिरातच होती. लूक अहवाल देतो, “त्याच वेळी ती जवळ आली.” (लूक २:३८, NW) हन्नाचे वृद्ध डोळे भविष्यातील मशीहाला पाहून किती उल्हसित झाले असतील!
चाळीस दिवसांआधी, देवाच्या देवदूतांनी बेथलेहेम नजिकच्या मेंढपाळांना अशा शब्दांनी चकित केले होते की: “पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे, त्याची सुवार्ता मी तुम्हांस सांगतो . . . तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे.” स्वर्गीय सैन्याच्या मोठ्या संख्येने यहोवाची स्तुती केली आणि म्हटले: “ऊर्ध्वलोकी देवाला गौरव, आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे त्या मनुष्यांत शांती.” (लूक २:८-१४) त्याचप्रमाणे, हन्ना आता, जो मशीहा होणार होता त्याच्याविषयी साक्ष देण्यास प्रवृत्त झाली!
येशू बाळाला पाहिल्यावर हन्नाने सुद्धा, “देवाचे आभार मानिले आणि जे यरूशलेमेच्या मुक्ततेची वाट पाहत होते त्या सर्वांस ती त्याच्याविषयी सांगू लागली.” (लूक २:३८) वयोवृद्ध शिमोनासारखे, ज्याची ती आतुरतेने वाट पाहत होती, प्रार्थना करत होती, व वचनयुक्त तारणकर्त्यासाठी थांबून राहिली होती त्या येशू बाळाला मंदिरात पाहण्याचा विशेषहक्क तिला मिळाला. येशूच तो व्यक्ती आहे ही सुवार्ता स्वतःजवळ ठेवण्यास तिला राहावेना.
येशू मोठा होईपर्यंत जिवंत राहण्याची हन्नाने अपेक्षा केली नाही, तर त्याऐवजी तिने काय केले? या येणाऱ्या मशीहाद्वारे परिणामित होणाऱ्या सुटकेविषयी तिने इतरांना आनंदाने सांगितले.
हन्नाचे उत्तम उदाहरण
जगातील किती धार्मिक लोकांनी अशा प्रकारची साक्ष दिली असती, किंवा वयाच्या ८४ वर्षांपर्यंत रात्रंदिवस मंदिरामध्ये उपासना केली असती? बहुधा त्यांनी याआधीच सेवा निवृत्ती मागितली असती. हन्ना आणि शिमोन फारच वेगळे होते. त्यांनी यहोवाच्या सर्व वृद्ध सेवकांसाठी चांगले उदाहरण मांडले. खरेच, त्यांना यहोवाच्या उपासनेचे घर अतिशय प्रिय वाटत होते व त्यांच्या संपूर्ण हृदयाने त्यांनी त्याची स्तुती केली.
हन्ना आमच्यासाठी ईश्वरी विधवेचे एक उत्तम उदाहरण आहे. खरे पाहता, या नम्र वृद्ध स्त्रीची लूकने केलेल्या वर्णनाची तुलना, १ तीमथ्य ५:३-१६ मध्ये वर्णन केलेल्या पात्र विधवेच्या योग्यतेशी अचूकपणे मिळते. तेथे प्रेषित पौल म्हणतो की, अशा प्रकारची विधवा “रात्रंदिवस विनवण्या व प्रार्थना करीत राहते,” “एकाच पतीची स्त्री” असते व ‘सर्व प्रकारचे चांगले कृत्य अनुसरते.’ हन्ना अगदी याचप्रकारची स्त्री होती.
आज, आम्ही संपूर्ण पृथ्वीवरच्या यहोवाच्या साक्षीदारांच्या हजारो मंडळ्यांमध्ये विश्वासू वृद्ध स्त्रियांना देवाची सेवा रात्रंदिवस करताना पाहतो. आमच्यामध्ये या आधुनिक दिवसात अशाप्रकारच्या “हन्ना” आहेत, याबद्दल आम्ही किती गुणग्राहकता बाळगतो!
या उतारवयात देखील, पुरूष आणि स्त्रिया देवाला समर्पण करू शकतात व हे पाण्याने बाप्तिस्मा घेऊन दर्शवू शकतात. वृद्धजन, यहोवाची सेवा करण्यासाठी तसेच, जे मशीही राज्य स्वर्गात स्थापले गेले आहे व जे फार लवकर आज्ञाधारक मानवजातीसाठी समृद्ध आशीर्वाद आणणार आहे त्याबद्दलची साक्ष देण्यासंबंधाने इतके टाकाऊ कधीच होत नाही. देवाची पवित्र सेवा करत असलेले वृद्ध लोक, अनेक शतकांपूर्वी हन्नाला जसा खास आशीर्वाद दिला होता त्याप्रमाणे यहोवाने त्यांच्यावर जे आशीर्वाद दिले, त्याविषयीची साक्ष देऊ शकतात. वृद्धावस्थेत सुद्धा तिने यहोवाची सेवा केली आणि त्याच्या पवित्र नामाची स्तुती केली, त्याचप्रमाणे हे वृद्ध देखील करू शकतात.