वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w94 ३/१५ पृ. १५-२०
  • यहोवावर त्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी भाव ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवावर त्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी भाव ठेवा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • काय बिनसले?
  • देवाचा उद्देश बदललेला नाही
  • त्यांनी यहोवावर भाव ठेवला
  • ख्रिस्ती साक्षीदार देवावर भाव ठेवतात
  • विश्‍वासू जणांना दिलेली अभिवचने यहोवा पूर्ण करतो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • विश्‍वासाची परीक्षा
    बायबलमधून शिकू या!
  • यहोवानं त्याला “माझा मित्र” म्हटलं
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१६
  • “तुमची अंतःकरणे दृढ करा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९९
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
w94 ३/१५ पृ. १५-२०

यहोवावर त्याचा उद्देश पूर्ण होण्यासाठी भाव ठेवा

“नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील तिच्यात ते सर्वदा वास करितील.” —स्तोत्रसंहिता ३७:२९.

१. मानवासाठी आणि ह्‍या पृथ्वीसाठी यहोवाचा काय उद्देश आहे?

यहोवाने आमच्या पहिल्या पालकांना, आदाम आणि हव्वेला, परिपूर्ण असे निर्माण केले. त्याने त्यांना पृथ्वीवर चिरकाल जगण्यासाठी निर्माण केले—केवळ त्यांनी त्याच्या नियमांचे पालन करावे ही अट होती. (उत्पत्ती १:२६, २७; २:१७) पुढे, देवाने त्यांना नंदनवनमय परिसरात ठेवले. (उत्पत्ती २:८, ९) यहोवा त्यांना म्हणाला: “फलद्रुप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा.” (उत्पत्ती १:२८) अशाप्रकारे, त्यांची संतती हळूवारपणे संपूर्ण जगभरात पसरून हा ग्रह परिपूर्ण, आनंदी मानवजातीने भरलेले नंदनवन झाले असते. मानवी कुटुंबाची ती किती उत्तम सुरवात होती! “आपण केलेले सर्व फार चांगले आहे असे देवाने पाहिले.”—उत्पत्ती १:३१.

२. मानवाच्या कारभाराची अवस्था कोणते प्रश्‍न समोर उभे करते?

२ तरीही, हजारो वर्षांपासून अस्तित्वात असलेली मानवजातीची परिस्थिती देवाच्या मूळ उद्देशाच्या साम्यतेत मुळीच नाही. मानवजात परिपूर्णतेपासून फार दूरवर गेली आणि निश्‍चितच सुखी नाही. जागतिक अवस्था पीडात्मक झाली आहे, आणि भाकीत केल्यानुसार ती आमच्या काळात नाट्यमयरीत्या अतिशय बिकट झाली आहे. (२ तीमथ्य ३:१-५, १३) तर मग, मानवांसाठी देवाचा असलेला उद्देश नजिकच्या भवितव्यात पूर्ण होईल याची आम्हाला खात्री कशी मिळते? आणखी लांब काळासाठी पीडादायक परिस्थितीत थांबून राहावे लागेल का?

काय बिनसले?

३. मानवजातीच्या बंडाळीचा यहोवाने तात्काळ अंत का केला नाही?

३ यहोवाने पृथ्वीवर ह्‍या दुष्ट परिस्थितीला अनुमती का दिली, याचे कारण देवाच्या प्रेरित वचनाचे अचूक ज्ञान असणाऱ्‍यांना ठाऊक आहे. याविषयी तो काय करणार आहे याबद्दलही त्यांना माहीत आहे. पवित्र शास्त्राच्या अहवालातून, ते हे शिकले की आमच्या पहिल्या पालकांनी, देवाने मानवांना दिलेल्या स्वइच्छेच्या आश्‍चर्यकारक देणगीचा दुरूपयोग केला. (पडताळा १ पेत्र २:१६.) त्यांनी देवापासून स्वातंत्र्याचा चुकीचा मार्ग निवडला. (उत्पत्ती २ आणि ३ अध्याय) त्यांच्या बंडाळीने अतिमहत्त्वाचे प्रश्‍न सामोरे आणले, जसे की: विश्‍वाच्या सार्वभौम राजाला मानवांवर राज्य करण्याचा हक्क आहे का? त्याचे शासन त्यांच्या भल्याकरता आहे का? देवाच्या देखरेखीविना मानवी शासन यशस्वी होऊ शकते का? या प्रश्‍नांची उत्तरे जाणून घेण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणजे, मानवी शासनाला काही शतकांसाठी राज्य करू देणे. केवळ परिणामच निसंशये दाखवून देणार होते की निर्माणकर्त्यापासून दूर होऊन मानव यशस्वी झाले असते का.

४, ५. (अ) देवाच्या शासनाचा मानवांनी केलेल्या धिक्काराचा परिणाम काय झाला आहे? (ब) जो काळ निघून गेला त्याने निःसंशये काय प्रदर्शित केले?

४ आदाम आणि हव्वेने देवाला सोडून दिल्यावर, त्याने त्यांना परिपूर्णतेतच ठेवले नाही. त्याच्या आधाराविना, ते अधोगतीस पोंहचले. याचा परिणाम, अपरिपूर्णता, म्हातारपण, आणि शेवटी मृत्यू हा होता. अनुवंशिकतेच्या नियमानुसार, आमच्या पहिल्या पालकांनी ती नाशकारी विशेष गुणलक्षणे त्यांच्या संततीला दिली ज्यामध्ये आमचाही समावेश आहे. (रोमकरास ५:१२) शिवाय हजारो वर्षांच्या मानवी शासनाचा परिणाम याबद्दल काय? ती एक दुःखद परिस्थिती झाली आहे, ज्याच्याबद्दल उपदेशक ८:९ अगदी अचूकतेने म्हणते: “एक मनुष्य दुसऱ्‍यावर सत्ता चालवून त्याचे नुकसान करितो.”

५ काळाच्या ओघाने निसंशये हे दाखवून दिले आहे की, त्यांच्या निर्माणकर्त्याला सोडून मानवामध्ये त्याच्या स्वतःच्या पावलांना यशस्वीपणे मार्गदर्शन करण्याचे सामर्थ्य नाही. प्रेरित पवित्र शास्त्र लेखक यिर्मयाने घोषित केले: “हे परमेश्‍वरा [यहोवा, न्यूव] मला ठाऊक आहे की, मनुष्याचा मार्ग त्याच्या हाती नाही, पावले नीट टाकणे हे चालणाऱ्‍या मनुष्याच्या हाती नाही.”—यिर्मया १०:२३; अनुवाद ३२:४, ५; उपदेशक ७:२९.

देवाचा उद्देश बदललेला नाही

६, ७. (अ) इतिहासाच्या हजारो वर्षांमुळे यहोवाचा उद्देश बदललेला आहे का? (ब) यहोवाच्या उद्देशात कशाचा समावेश आहे?

६ दुष्टाई आणि दुःखाने भरलेली मानवी इतिहासाची हजारो वर्षे निघून गेल्यामुळे देवाच्या उद्देशात काही बदल घडला आहे का? त्याचे वचन म्हणते: “आकाशाचा उत्पन्‍नकर्ता तोच देव [यहोवा, न्यूव] पृथ्वीचा घडणारा व कर्ता तोच; त्याने तिची स्थापना केली; त्याने ती निर्जन राहावी म्हणून उत्पन्‍न केली नाही तर, तिजवर लोकवस्ती व्हावी म्हणून घडिली.” (यशया ४५:१८) मानवांनी ह्‍या पृथ्वीवर वस्ती करावी म्हणूनच देवाने ती बनवली, आणि अजूनही त्याचा तोच उद्देश आहे.

७ यहोवाने पृथ्वीला केवळ ती एक वस्तीस्थान व्हावे एवढेच उद्देशिले नाही तर परिपूर्ण, आनंदी लोकांनी सुख उपभोगावे असे नंदनवन त्याने उद्देशिले. याच कारणास्तव, पवित्र शास्त्राने भाकीत केले की एक “नवी पृथ्वी,” म्हणजे एक नवा मानवी समाज असेल ज्यामध्ये ‘नीतीमत्त्व वास करिल.’ (२ पेत्र ३:१३) तसेच प्रकटीकरण २१:४ मध्ये देवाचे वचन आम्हाला सांगते की त्याच्या नव्या जगात, “तो [मानवजातीच्या] डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील, ह्‍यापुढे मरण नाही, शोक रडणे व कष्ट” ही नसणार. याच कारणांसाठी येशू ते येणारे नवे जग “सुखलोक” असल्याबद्दल बोलू शकला.—लूक २३:४३.

८. यहोवा त्याचा उद्देश पूर्ण करील याची खात्री आम्ही का बाळगू शकतो?

८ यहोवा या विश्‍वाचा सर्व-शक्‍तिमान, व सर्व-बुद्धिमान असल्यामुळे, कोणीही त्याचे उद्देश निष्फळ करू शकत नाही. “सेनाधीश परमेश्‍वर [यहोवा, न्यूव] शपथ वाहून म्हणाला, ‘मी कल्पिले तसे होईच, मी योजिले तसे घडेलच.’” (यशया १४:२४) यास्तव, देव जेव्हा म्हणतो की, तो ह्‍या पृथ्वीला परिपूर्ण लोकांनी वास केलेले एक नंदनवन बनवणार आहे, तेच घडेल. येशू म्हणाला: “जे सौम्य ते धन्य, कारण ते पृथ्वीचे वतन भोगतील.” (मत्तय ५:५; पडताळा स्तोत्रसंहिता ३७:२९.) ते अभिवचन पूर्ण होईल ही खात्री आम्ही बाळगू शकतो व त्याच्या अनुषंगाने कार्य करू शकतो. वस्तुतः त्यासाठी आम्ही आमच्या जीवनाची जोखिम पत्करू शकतो.

त्यांनी यहोवावर भाव ठेवला

९. अब्राहामाने असे कोणते कार्य केले ज्यामुळे यहोवावर त्याचा भाव आहे हे दिसून आले?

९ संपूर्ण इतिहासात, अनेक देवभीरू लोकांनी पृथ्वीसाठी असलेल्या देवाच्या उद्देशासाठी आपले जीव धोक्यात घातले, कारण त्यांना याची खात्री होती की देव नक्कीच त्याचा उद्देश पूर्ण करील. त्यांचे ज्ञान सीमित असले तरी, त्यांनी देवावर विश्‍वास ठेवला व त्याची इच्छा करण्यावर त्यांचे जीवन केंद्रित केले. उदाहरणार्थ, येशू ह्‍या पृथ्वीवर येण्याच्या सुमारे २,००० वर्षांआधी, तसेच पवित्र शास्त्राचे लिखाण होण्याच्याही आधी अब्राहाम नावाचा व्यक्‍ती होता. त्याने, यहोवा आपली अभिवचने पूर्ण करील म्हणून त्याच्यावर भाव ठेवला. कदाचित, अब्राहामने त्याचा विश्‍वासू पूर्वज शेम, ज्याला नोहाने शिकवले असेल, त्याच्याकडून निर्माणकर्त्याविषयी शिक्षण प्राप्त झाले असेल. यास्तव, देवाने अब्राहामाला खालड्यांचे (खास्दी) समृद्ध ऊर सोडून, कनानच्या अनोळखी व धोकादायक राष्ट्रात जाऊन राहण्यास सांगितले तेव्हा, तो यहोवावर भाव ठेवू शकतो हे त्या वृद्ध गृहस्थाला माहीत होते आणि म्हणूनच तो तेथे गेला. (इब्रीकर ११:८) काही काळातच, यहोवाने त्याला सांगितले: “मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन.”—उत्पत्ती १२:२.

१०, ११. अब्राहाम त्याचा एकुलता एक पुत्र इसहाक याचे बलिदान का देऊ इच्छित होता?

१० अब्राहामाला इसहाक झाल्यानंतर काय झाले? यहोवाने अब्राहामाला हे दर्शवून दिले की इसहाकाच्या द्वारे म्हणजे, त्याच्या संततीचे एक मोठे राष्ट्र होइल. (उत्पत्ती २१:१२) यास्तव, यहोवाने अब्राहामाला त्याच्या विश्‍वासाची परीक्षा घेण्यासाठी, त्याचा पुत्र इसहाक याला अर्पण करण्यास सांगितले तेव्हा तो कदाचित एक विरोधाभास वाटला असेल. (उत्पत्ती २२:२) तरीही, यहोवावर पूर्ण भाव ठेवून, ते पूर्ण करण्यासाठी अब्राहामाने पाऊले उचलली, इसहाकाचा वध करण्यासाठी त्याने सुरा देखील उचलला. त्या शेवटच्या घटकेस, अब्राहामाला थांबवण्यासाठी देवाने एका देवदूताला पाठवले.—उत्पत्ती २२:९-१४.

११ अब्राहाम इतका आज्ञाधारक का होता? इब्रीकरास ११:१७-१९ प्रकट करते: “अब्राहामाने आपली परीक्षा होत असता विश्‍वासाने इसहाकाचे अर्पण केले, ज्याने वचने स्वीकारली होती तो आपल्या एकुलत्या एकाचे अर्पण करीत होता. त्याला असे सांगितले होते की, इसहाकाच्या वंशाला तुझे संतान म्हणतील. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे, हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला.” याप्रमाणे रोमकरास ४:२०, २१ म्हणते: “देवाच्या अभिवचनाकडे पाहून तो अविश्‍वासामुळे डळमळला नाही, . . . देव आपण दिलेले अभिवचन पूर्ण करावयासही समर्थ आहे अशी त्याची पक्की खात्री होती.”

१२. अब्राहामाला त्याच्या विश्‍वासाचे प्रतिफळ कसे मिळाले?

१२ अब्राहामाला त्याच्या विश्‍वासाचे प्रतिफळ त्याने इसहाकाला राखून ठेवल्यामुळे आणि त्याच्याद्वारे “मोठे राष्ट्र” निपजले एवढ्यामुळेच मिळाले नाही तर, आणखी एका मार्गाने त्याला प्रतिफळ मिळाले. देवाने अब्राहामास सांगितले: “तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व रा तुझ्या संततीच्याद्वारे आशीर्वादित होतील.” (उत्पत्ती २२:१८) ते कसे? देवाच्या स्वर्गीय राज्याचा राजा अब्राहामाच्या वंशातून येईल. ते राज्य, सैतानाच्या या दुष्ट जगाच्या अस्तित्वाचा पूर्णपणे नायनाट करील. (दानीएल २:४४; रोमकरास १६:२०; प्रकटीकरण १९:११-२१) त्यानंतर, राज्य शासनामध्ये एका स्वच्छ पृथ्वीवर, सार्वत्रिक नंदनवन होईल, आणि देवाची इच्छा करणारे “सर्व राष्ट्रांतील” लोक परिपूर्ण स्वास्थाचा आनंद लुटतील व चिरकाल जिवंत राहतील. (१ योहान २:१५-१७) अब्राहामाला राज्याविषयीचे मर्यादित ज्ञान होते तरी, त्याने देवावर भाव ठेवला व राज्याच्या स्थापनेची वाट पाहिली.—इब्रीकरास ११:१०.

१३, १४. ईयोबाने देवावर भाव का ठेवला?

१३ शेकडो वर्षांनंतर, ईयोब नावाचा एक व्यक्‍ती, आता अरब म्हणून ओळखल्या जाणाऱ्‍या देशात सा.यु.पूर्व १७ व्या व १६ व्या शतकाच्या मध्यात राहात होता. तो देखील पवित्र शास्त्राच्या लिखाणाची सुरवात होण्याआधी राहत होता. ईयोब “सात्विक व सरळ होता, तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही.” (ईयोब १:१) सैतानाने ईयोबावर किळसवाणा, यातनादायक आजार लादला तेव्हा, त्या विश्‍वासू पुरूषाने त्याच्या अत्यंत कठीण कसोटीत, “आपल्या वाचेने काही पाप केले नाही.” (ईयोब २:१०, मराठी रेफरन्स बायबल) ईयोबाने देवावर भाव ठेवला. त्याला इतके दुःख सहन का करावे लागत आहे याची सविस्तर माहिती नसली तरी, त्याने त्याचे जीवन देव आणि त्याच्या उद्देशांच्या स्वाधीन केले.

१४ ईयोबाला हे ठाऊक होते की जरी तो मेला, तरी देव एक ना एक दिवस पुनरूत्थानाद्वारे त्याला पुन्हा जिवंत करील. यहोवा देवासोबत बोलताना त्याने ही आशा दर्शविली: “तू मला शिओलात [कबर] लपविशील माझी मुदत नियमित करून मग माझी आठवण करिशील तर किती बरे होईल! मनुष्य मृत झाल्यावर पुन: जिवंत होईल काय? . . . तू मला हाक मारिशील व मी तुला उत्तर देईन.” (ईयोब १४:१३-१५, न्यूव) तीव्र दुःखात असतानाही, ईयोबाने यहोवाच्या सार्वभौमत्वात असे म्हणून विश्‍वास प्रदर्शित केला: “माझा प्राण जाईतोवर मी आपले सत्वसमर्थन सोडणार नाही.”—ईयोब २७:५.

१५. दाविदाने यहोवाच्या उद्देशांवर त्याची खात्री कशी व्यक्‍त केली?

१५ ईयोबाच्या सहा शतकानंतर आणि येशू पृथ्वीवर येण्याच्या सुमारे एक हजार वर्षांआधी, दाविदाने नव्या जगावरील त्याचा विश्‍वास व्यक्‍त केला. त्याने स्तोत्रसंहितेत म्हटले: “परमेश्‍वराची [यहोवा, न्यूव] प्रतीक्षा करणारे पृथ्वीचे वतन पावतील. थोडक्याच अवधीत दुर्जन नाहीसा होईल . . . पण लीन जन पृथ्वीचे वतन पावतील, ते उदंड शांतीसुखाचा उपभोग घेतील. नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.” त्याच्या न डळमळणाऱ्‍या विश्‍वासामुळे दाविदाने आर्जविले: “परमेश्‍वरावर [यहोवा, न्यूव] भाव ठेव . . . परमेश्‍वराच्या [यहोवा, न्यूव] ठायी आनंद कर म्हणजे तो तुझे मनोरथ पूर्ण करील.”—स्तोत्रसंहिता ३७:३, ४ [न्यूव], ९-११, २९.

१६. ‘मोठ्या साक्षीरूपी मेघा’ला कोणती आशा होती?

१६ शतकांपासून, विश्‍वासू पुरूष आणि स्त्रिया पृथ्वीवरील चिरकालिक जीवनाची हीच आशा धरून होते. वस्तुतः, ते ‘मोठ्या साक्षीरूपी मेघाने’ मिळून बनलेले आहेत, ज्यांनी वास्तविकपणे यहोवाच्या अभिवचनांसाठी त्यांचे जीवन पणाला लावले. यहोवाच्या अनेक प्राचीन साक्षीदारांना “चांगले पुनरूत्थान मिळावे,” या त्यांच्या विश्‍वासासाठी छळ करण्यात आला व त्यांना ठार मारण्यात आले. ते चांगले पुनरूत्थान कसे? नव्या जगात देव त्यांना चांगले पुनरूत्थान व अनंतकाळच्या जीवनाची आशा देऊन प्रतिफळ देईल.—योहान ५:२८, २९; इब्रीयांस ११:३५; १२:१.

ख्रिस्ती साक्षीदार देवावर भाव ठेवतात

१७. पहिल्या शतकाच्या ख्रिश्‍चनांनी यहोवावर किती दृढपणे भाव ठेवला?

१७ सामान्य युगाच्या पहिल्या शतकात, यहोवाने नव्या स्थापिलेल्या मंडळीला राज्य आणि पृथ्वीवरील त्याच्या शासनाविषयीची सविस्तर माहिती प्रकट केली. उदाहरणार्थ, स्वर्गाच्या राज्यात येशू ख्रिस्तासोबत राज्य करणाऱ्‍यांची संख्या १,४४,००० असेल हे लिहिण्यासाठी, त्याच्या आत्म्याने प्रेषित योहानाला प्रेरित केले. हे ‘माणसांतून विकत घेतलेले’ लोक, देवाचे विश्‍वासू सेवक असतील. (प्रकटीकरण ७:४; १४:१-४) ते ख्रिस्तासोबत स्वर्गातून “राजे” म्हणून पृथ्वीवर राज्य करतील. (प्रकटीकरण २०:४-६) पहिल्या शतकातील ख्रिश्‍चनांनी, स्वर्गीय राज्य आणि त्याच्या पार्थिव प्रजेसाठी असलेला यहोवाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याच्यावर इतका भाव ठेवला की, ते त्यांच्या विश्‍वासासाठी त्यांचे प्राण देखील देण्यास तयार होते. बहुतेकांनी तेच केले.

१८. आज यहोवाचे साक्षीदार पूर्वीच्या त्यांच्या समविश्‍वासूंचे अनुकरण कसे करतात?

१८ आज, जवळ जवळ ५० लाख यहोवाच्या साक्षीदारांचा शतकांपूर्वी त्यांच्या आधी जिवंत असलेल्या लोकांसारखाच, देवावर भाव आहे. सध्याच्या दिवसातील या साक्षीदारांनी देखील देवाच्या अभिवचनांसाठी त्यांचे जीवन पणाला लावले. त्यांनी त्यांचे जीवन त्याला समर्पित केले आहे, व त्यांच्या विश्‍वासाला बळकट करण्यासाठी त्यांच्या जवळ संपूर्ण पवित्र शास्त्र आहे. (२ तीमथ्य ३:१४-१७) यहोवाचे हे आधुनिक दिवसातील साक्षीदार येशूच्या पहिल्या शतकातील शिष्यांचे अनुकरण करतात, ज्यांनी घोषित केले की ते “मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा” मानतील. (प्रे. कृत्ये ५:२९) या शतकात अनेक ख्रिस्ती साक्षीदारांचा क्रुरपणे छळ केला आहे. काहींना तर त्यांच्या विश्‍वासासाठी ठारही मारण्यात आले. इतर जण आजारपण, अपघात, किंवा म्हातारपणामुळे दगावले. तथापि, पूर्वीच्या काळातील विश्‍वासू साक्षीदारांप्रमाणे, त्यांनी देवावर भाव ठेवला, कारण त्यांना ठाऊक आहे की तो त्यांना पुनरूत्थानाद्वारे त्याच्या नव्या जगात पुन्हा जीवन प्राप्त करून देईल.—योहान ५:२८, २९; प्रे. कृत्ये २४:१५; प्रकटीकरण २०:१२, १३.

१९, २०. आमच्या दिवसातील पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीविषयी आम्ही काय जाणले आहे?

१९ सर्व राष्ट्रांतून एकाच विश्‍वव्यापी बंधुप्रीतीत आणण्याविषयी पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीत भाकीत केले होते, याची यहोवाचे साक्षीदार गुणग्राहकता बाळगतात. (यशया २:२, ४; प्रकटीकरण ७:४, ९-१७) तसेच, यहोवा यांचा उपयोग जागतिक प्रचार कार्यासाठी करत आहे जेणेकडून ते आणखी इतर नम्र अंतःकरणाच्या लोकांना, बचावासाठी व त्याची मर्जी संपादण्यासाठी गोळा करू शकतील. (नीतीसूत्रे १८:१०; मत्तय २४:१४; रोमकरास १०:१३) हे सर्व जण यहोवावर पूर्ण भाव ठेवून आहेत कारण, त्यांना माहीत आहे की तो फार लवकर त्याचे आश्‍चर्यकारक नवे जग आणणार आहे.—पडताळा १ करिंथकर १५:५८; इब्रीयांस ६:१०.

२० पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्या दर्शवितात की, १९१४ या महत्त्वाच्या वर्षांपासून आता, सैतानाचे जग जवळ जवळ ८० वर्षे, त्याच्या शेवटल्या दिवसात आहे. हे जग त्याच्या अंता नजिक येत आहे. (रोमकरास १६:२०; २ करिंथकर ४:४; २ तीमथ्य ३:१-५) यास्तव, यहोवाचे साक्षीदार धैर्यशील व दृढनिश्‍चयी होतात कारण, त्यांनी हे ओळखले आहे की लवकरच देवाचे राज्य पृथ्वीच्या सर्व कारभारावर पूर्णपणे ताबा घेईल. सध्याच्या या दुष्ट जगाचा अंत करून व त्याचे धार्मिक नवे जग आणून, देव पृथ्वीवर शतकानुशतकापासून अस्तित्वात असलेल्या वाईट परिस्थितीला पूर्णपणे पुसून टाकील.—नीतीसूत्रे २:२१, २२.

२१. सध्याचा त्रास असतानाही आम्ही आनंदी का राहू शकतो?

२१ मग, चिरकालासाठी, देव आमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करून आमची अत्यंत काळजी घेईल जेणेकडून गत काळात आम्ही सहन केलेल्या दुःखाच्या जखमांना ते भरून काढील. नव्या जगात आमच्यासाठी इतक्या चांगल्या गोष्टी असतील की, पूर्वी आम्ही सहन केलेला त्रास आमच्या स्मरणशक्‍तीतून निघून जाईल. तेव्हा यहोवा त्याची “मूठ उघडून प्राणीमात्राची इच्छा” पूरी करील हे जाणणे किती सांत्वनपर आहे!—स्तोत्रसंहिता १४५:१६; यशया ६५:१७, १८.

२२. आम्ही आमचा भाव यहोवावर का ठेवला पाहिजे?

२२ नव्या जगात, विश्‍वासू मानवजात रोमकर ८:२१ मधील भविष्यवाणीची पूर्तता पाहतील: “सृष्टीही स्वतः नश्‍वरतेच्या दास्यांतून मुक्‍त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्‍त मुक्‍तता मिळावी ह्‍या आशेने वाट पाहते.” येशूने त्याच्या शिष्यांना शिकवलेली ही प्रार्थना पूर्ण झालेली ते पाहतील: “तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.” (मत्तय ६:१०) यास्तव, तुम्ही तुमचा पूर्ण भाव यहोवावर ठेवा, कारण त्याचे खात्रीचे अभिवचन आहे की: “नीतीमान पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्रसंहिता ३७:२९.

तुम्ही कसे उत्तर द्याल?

▫ यहोवाचा मानवासाठी आणि ह्‍या पृथ्वीसाठी काय उद्देश आहे?

▫ देवाने पृथ्वीवर वाईट परिस्थितीला परवानगी का दिली आहे?

▫ प्राचीन विश्‍वासू लोकांनी यहोवावर त्यांचा भाव आहे हे कसे दाखवले?

▫ आज देवाचे सेवक यहोवावर भाव का ठेवतात?

[१६ पानांवरील चित्रं]

देवाने मानवांना नंदनवनमय पृथ्वीवर आनंदाने अनंतकाळपर्यंत राहण्यासाठी निर्माण केले

[१८ पानांवरील चित्रं]

मृतांचे पुनरूत्थान करण्याच्या यहोवाच्या सामर्थ्यावर अब्राहामाने भाव ठेवला

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा