एकाग्र अंतःकरणाने चालत राहणे
“हे परमेश्वरा, [यहोवा, न्यू.व.] तुझा मार्ग मला दाखीव. तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे चित्त एकाग्र कर.”—स्तोत्रसंहिता ८६:११.
१. यहोवा आपल्या निष्ठावंत जनांना कसे प्रतिफळ देतो?
“हे प्रभू [यहोवा, न्यू.व.] तूच केवळ देव आहेस.” (स्तोत्रसंहिता ८६:८, १०) दावीदाने आपल्या अंतःकरणाच्या खोलीपासून देवाची स्तुति गायिली. दावीद इस्राएलाचा राजा होण्याआधी देखील यहोवाने त्याला शौल व पलिष्ट्यांपासून वाचवले होते. या कारणामुळेच तो असे गीत म्हणू शकलाः “परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझाच होय. निष्ठावंत जनांशी तू निष्ठेने वागतोस.” (२ शमुवेल २२:२, २६) देवाने आपल्या या निष्ठावंत सेवकाला कित्येक परिक्षाप्रसंगातून सोडविले. दावीद आपल्या निष्ठावंत देवावर स्वतःचा आत्मविश्वास व भरवसा ठेऊ शकत होता; पण त्याला अधिक मार्गदर्शनाची जरुरी होती. यामुळेच दावीदाने देवाकडे अशी याचना केलीः “हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.], तुझा मार्ग मला दाखीव.”—स्तोत्रसंहिता ८६:११.
२. आज आपल्याला यहोवाकडून शिक्षण मिळण्यासाठी त्याने आम्हासाठी कोणती तरतूद करून ठेवली आहे?
२ दावीदाला जगीक कल्पना किंवा तत्त्वज्ञानाबद्दल काही कर्तव्य नव्हते. त्याला तर, देवाच्या संदेष्ट्याने नंतर म्हटल्याप्रमाणे “परमेश्वरापासून [यहोवा, न्यू.व.] शिक्षण” घेण्याची इच्छा होती. (यशया ५४:१३) दावीद, त्याच्या काळी उपलब्ध असलेल्या केवळ नऊ पुस्तकांवरच आपले अध्ययन केंद्रित करू शकत होता. तरीही यहोवाकडून त्याला मिळालेल्या सूचना मोलवान वाटत होत्या! आज आपल्याला शिक्षणाच्या बाबतीत पवित्र शास्त्राच्या ६६ पुस्तकातील आध्यात्मिक वचनांवर याचप्रमाणे “विश्वासू व बुद्धिमान दास” याद्वारे पुरविण्यात आलेल्या राज्य साहित्यावर मेजवानी मिळू शकते. (मत्तय २४:४५) यास्तव, दाविदाप्रमाणे आपण देखील देवाचा धावा करू या की, त्याचा आत्मा “आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध [केलेल्या] देवाच्या रहस्यांचा” शोध घेण्यासाठी मदत देवो.—१ करिंथकर २:९, १०.
३. पवित्र शास्त्रातील शिक्षण आम्हाला कोणत्या अर्थी लाभदायक ठरू शकते?
३ आमच्या जीवनात उद्भवणाऱ्या हर समस्या व प्रत्येक प्रश्नासंबंधाने पवित्र शास्त्रात उत्तर आहे. “जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपणांस शिक्षण मिळण्याकरिता लिहिले; यासाठी की शास्त्रापासून मिळणाऱ्या सहनशीलतेच्या व समाधानाच्या योगे आपल्याला आशा प्राप्त व्हावी.” (रोकमर १५:४) यहोवाकडील सूचना प्राप्त करून घेतल्यामुळे आपल्याला त्रासात टिकून राहण्याची बळकटी मिळेल, आपल्या नैराश्याच्या काळात समाधान मिळू शकेल व आणि आमच्या हृदयात राज्याची आशा तेजोमयरित्या प्रज्वलित राहू शकेल. आपल्याला देवाच्या वचनाचे वाचन करण्यात आणि त्यावर “अहोरात्र” मनन करण्यात आनंद आढळून येवो; कारण हे पवित्र शास्त्राधारित सूज्ञान “जे त्याला धरून राहतात त्यांस ते जीवनवृक्षरुप आहे; जो कोणी ते राखून ठेवितो तो धन्य” होय.—स्तोत्रसंहिता १:१-३; नीतीसूत्रे ३:१३-१८; तसेच योहान १७:३ देखील पहा.
४. आम्ही करावयाच्या कृतिसंबंधाने येशूने आम्हासमोर कोणते उदाहरण घालून दिले आहे?
४ देवाचा पुत्र येशू यालाही “दावीदाचा पुत्र” म्हणत व तोही मार्गदर्शनासाठी यहोवाकडे पाहात असे. (मत्तय ९:२७)a त्याने म्हटलेः “पुत्र जे काही पित्याला करिताना पाहतो त्यावाचून त्याला स्वतः होऊन काही करिता येत नाही; कारण जे काही तो करितो ते पुत्रही तसेच करितो.” “मी आपण होऊन काही करीत नाही, तर पित्याने मला शिकवल्याप्रमाणे मी या गोष्टी बोलतो.” (योहान ५:१९; ८:२८) येशूने, आम्ही “त्याचा पावलांस अनुसरावे” म्हणून कित्ता घालून दिला आहे. (१ पेत्र २:२१) जरा विचार करा! येशूने अभ्यास केला तसाच आपणही केला तर कोणत्याही परिस्थितीत आपण यहोवाने आपल्याला सांगितले आहे तशीच कृती आचरु. यहोवाचा मार्ग हा नेहमीच योग्य असतो.
५. “सत्य” काय आहे?
५ दावीद पुढे जाहीर करतोः “मी तुझ्या सत्यमार्गाने चालेन.” (स्तोत्रसंहिता ८६:११) यानंतर हजारो वर्षानंतर, पिलाताने दावीदपुत्र येशू याला विचारलेः “सत्य काय आहे?” तथापि येशूने पिलाताला नुकतेच त्या प्रश्नाचे असे उत्तर दिले की, “माझे राज्य या जगाचे नव्हे.” व पुढे म्हटले कीः “मी राजा आहे, असे तू म्हणतोस. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी.” (योहान १८:३३-३८) अशाप्रकारे हे सत्य मशीही राज्याशी केंद्रीभूत आहे हे येशूने तेथे जाहीर केले. खरे म्हणजे सबंध पवित्र शास्त्राचा मुख्य विषय देखील, यहोवाच्या नामाचे पवित्रीकरण याच राज्याद्वारे केले जाणार असा आहे.—यहेज्केल ३८:२३; मत्तय ६:९, १०; प्रकटीकरण ११:१५.
६. सत्याच्या मार्गाने चालत असता, आपण कशाबद्दल दक्ष राहिले पाहिजे?
६ सत्यामध्ये चालणे याचा काय अर्थ होते? त्याचा अर्थ आमच्या जीवनात राज्याच्या आशेला आपली प्रमुख काळजी करणे असा आहे. आपण राज्य-सत्यानुरुप जगलेच पाहिजे. आपण राज्य आस्थेला प्रधान स्थानी ठेवण्यामध्ये चलबिचल असू नये, तर येशूने घालून दिलेल्या उदाहरणानुरुप आपल्याला संधि मिळेल तशी आपण राज्याच्या सत्याबद्दल साक्ष देण्यात आवेशाने भाग घेतला पाहिजे. (मत्तय ६:३३; योहान १८:३७) आपण सत्यात, अर्धवेळ नोकरी प्रमाणे थोडी फार नाममात्र सेवा सादर करून अतिरेकी मनोरंजनामध्ये गढून जाऊन, किंवा वेळ खाणारा व्यवसाय पत्करून आणि “धनाची . . . सेवा” करून स्वतःला संतोषवीत राहता येणे शक्य नाही. (मत्यत ६:२४) तसा प्रयत्न केल्यास आपण त्या बहुविध मार्गापैकी एकात बहकून जाऊ आणि मग ‘जीवनाकडे जाणाऱ्या संकोचित मार्गा’कडे परत वळता येणे कदाचित कधीही शक्य होणार नाही. तर या मार्गापासून आपण मार्गभ्रष्ट होऊ नये! (मत्तय ७:१३, १४) आमचा महान शिक्षक, यहोवा, आपले वचन व संस्था याद्वारे त्या मार्गाला प्रज्वलित ठेवतो आणि म्हणतोः “‘हाच मार्ग आहे, याने चला.’ तुम्हाला उजवीकडे जावयाचे असो किंवा डावीकडे जावयाचे असो.”—यशया ३०:२१.
योग्य भय
७. आम्हाला आमची अंतःकरणे कशी “एकाग्र” करता येतील?
७ दावीदाची प्रार्थना ११व्या वचनात पुढे म्हणतेः “तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे चित्त [“अंतःकरण,” न्यू.व.] एकाग्र कर.” दावीदाप्रमाणे आम्हीही आपली अंतःकरणे देवाच्या इच्छेप्रमाणे करीत राहण्यामध्ये फुटीर नसणारी आणि पूर्ण राखली पाहिजे. हे मोशेने दिलेल्या सूचनेच्या एकमतात आहेः “तर आता, हे इस्राएला, तुझा देव [यहोवा, न्यू.व.] तुझ्यापाशी जे मागतो ते एवढेच की, तू आपला देव [यहोवा, न्यू.व.] याचे भय बाळगून त्याच्या सर्व मार्गांनी चालावे, त्याजवर प्रेम ठेवावे व त्याची सेवा अगदी जिवेभावे करावी, परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] आज्ञा व विधि आज मी तुला तुझ्या बऱ्याकरिता सांगत आहे, ते पाळावे.” (अनुवाद १०:१२, १३) आम्ही यहोवाची सेवा करताना त्यामध्ये आपले अंतःकरण व सर्व जीव ओतून करावी हे आपल्या बऱ्यासाठी आहे. याद्वारे आपण यहोवाच्या नामांकित नामाबद्दल योग्य भय दाखवतो. यहोवाच्या नामाचा खरा अर्थ, “तो घडवून आणतो,” असा आहे व हे त्याचे भव्य उद्देश पूर्णत्वास आणण्याच्या संदर्भाने खास लागू होणारे आहे. याशिवाय हे नाव त्याचे सबंध विश्वामध्ये असणाऱ्या सर्वोच्च अधिकाराचेही प्रतिनिधित्व करते. देवाची भव्यता लक्षात आणून त्याची सेवा सद्भयाने करणे हे आम्हाला मर्त्य मानवाच्या भीतीमुळे बाजूला हटू देणार नाही. आमची अंतःकरणे फुटीर होणार नाहीत. उलट, जे काही सार्वभौम प्रभू आणि सर्वोच्च शास्ता यहोवास असंतुष्ट करते ते काहीही करण्याचे आम्ही भय मानू. कारण त्याच्याच हातात आमचे जीवन आहे.—यशया १२:२; ३३:२२.
८, ९. (अ) ‘या जगाचे नसणे’ याचा काय अर्थ होतो? (ब) आपण “खेळ” असे झाल्यामुळे कोणती पावले उचलण्यास हवीत?
८ आमची निंदा व छळ होत असला तरी या दुष्ट जगाचे भाग न होण्यामध्ये आपण येशूच्या निर्भिड उदाहरणाचे अनुकरण करू. (योहान १५:१७-२१) याचा अर्थ, येशूच्या शिष्यांनी संन्यासी व्हावे किंवा एखाद्या मठात स्वतःला दडवून ठेवावे असा नाही. येशूने आपल्या पित्याला केलेल्या प्रार्थनेमध्ये असे म्हटले होतेः “तू त्यांस जगातून काढून घ्यावे अशी मी विनंति करीत नाही, तर तू त्यांस वाईटापासून राखावे अशी विनंति करतो. जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू सत्यात त्यांस पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठविले तसे मीही त्यांस जगात पाठविले.” (योहान १७:१५-१८) आम्हाला सुद्धा येशूप्रमाणेच राज्य सत्याची घोषणा करण्यासाठी पुढे पाठविण्यात आले आहे. येशूने स्वतःला लोकांना आपणाकडे येऊ देण्यासाठी मोकळे राखले. त्याच्या शिक्षणामुळे लोकांना तजेला मिळाला. (पडताळा मत्तय ७:२८, २९; ११:२८, २९; योहान ७:४६.) हेच आमच्याही बाबतीत होण्यास हवे.
९ आमचे मित्रत्वाने पुढे होऊन बोलणे, चांगली केशभूषा व स्वरुप, दयावंत व शुद्ध संभाषण यांनी सरळ अंतःकरणाच्या लोकांना आमचा तसेच आमच्या संदेशाचा स्वीकार करण्याजोगे करण्यास हवे. आम्ही गबाळेपणा, असभ्य पेहराव, जागतिक फंद्यात गुरफटविणारी संगति, आणि आम्ही सभोवताली पाहत असणारे स्वैराचारी व तत्त्वहीन जीवन यापासून दूर राहिले पाहिजे. आपण “जगाला म्हणजे देवदूतांला व मनुष्यांला खेळ असे झालो आहे,” त्यामुळे दर दिवशी २४ तास सेवा करण्यास आणि उदाहरणशील ख्रिस्ती या नात्याने राहण्यात कर्तव्यबद्ध आहोत. (१ करिंथकर ४:९; इफिसकर ५:१-४; फिलिप्पैकर ४:८, ९; कलस्सैकर ४:५, ६) याकरता आम्ही आपली अंतःकरणे एकाग्र ठेवली पाहिजेत.
१०. जे पवित्र सेवेत आपली अंतःकरणे एकाग्र ठेवतात अशांचे यहोवा कसे स्मरण ठेवतो?
१० आपण यहोवाचे भय मानून आपली अंतःकरणे एकाग्र केलेली असल्यामुळे, त्याच्या भव्य उद्देशांबद्दल मनन करीत असल्यामुळे आणि आमचे जीवन पवित्र सेवेने भरुन टाकल्यामुळे यहोवा आमचे निश्चितपणे स्मरण ठेवील. “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रकट करितो.” (२ इतिहास १६:९) आमच्या काळास भविष्यवादितरित्या उल्लेखून मलाखी ३:१६ असे वाचण्यात येतेः “तेव्हा परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय बाळगणारे एकमेकांस बोलले; ते परमेश्वराने [यहोवा, न्यू.व.] कान देऊन ऐकले व परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय धरणारे व त्याच्या नामाचे चिंतन करणारे यांची एक स्मरणवही त्याजसमोर लिहिण्यात आली.” आपली देखील अंतःकरणे यहोवाच्या अशा हितकर भयात एकाग्र होवोत!
यहोवाची दया
११. यहोवाची दया त्याच्या निष्ठावंत लोकांबद्दल कशी दाखवली जाईल?
११ दावीदाची प्रार्थना किती कळकळीची वाटते! कारण तो पुढे म्हणतोः “हे माझ्या देवा [यहोवा, न्यू.व.], मी आपल्या जिवेभावे तुझे गुणगान गाईन; तुझ्या नामाचा महिमा सदोदित वर्णीन. कारण मजवर तुझी दया फार आहे; अधोलोकाच्या तळापासून तू माझा जीव उद्धरिला आहेस.” (स्तोत्रसंहिता ८६:१२, १३) या स्तोत्रात दावीद दुसऱ्यांदा यहोवाची त्याच्या दयेस्तव— त्याच्या निष्ठावंत प्रेमाखातर, स्तुती गातो. त्याची ही दया इतकी थोर आहे की, अशक्य वाटणाऱ्या स्थितीतून देखील बचाव साध्य करून दाखवू शकते. शौल दावीदाचा अरण्यात पिच्छा पुरवीत असता दावीदाला एखाद्या कोपऱ्यात जाऊन दडून मरावेसे वाटले असावे. हे जणू शिओलाच्या पातळीपर्यंत—कबरेच्या खोलीपर्यंत जाण्यासारखे होते. पण यहोवाने त्याची सुटका केली! अशाचप्रकारे यहोवाने त्याच्या आधुनिक सेवकांचीही अद्भूत मार्गाने सुटका केली आहे, आणि मरणापर्यंत विश्वासू राहणाऱ्या सर्व सचोटी रक्षकांचे त्याने पोषण केले आहे. सर्व निष्ठावंत लोकांना जरुरीचे आहे तर पुनरुत्थानाद्वारे तो प्रतिफळ मिळवून देणार.—पडताळा ईयोब १:६-१२; २:१-६, ९, १०; २७:५; ४२:१०; नीतीसूत्रे २७:११; मत्तय २४:९, १३; प्रकटीकरण २:१०.b
१२. पाळक कसे उद्दाम व जुलमी बनले आहेत व यांना कोणते प्रतिफळ मिळणार?
१२ छळकर्त्यांबद्दल दावीद मोठ्याने म्हणालाः “हे देवा, उन्मत्त लोक मजवर उठले आहेत; बलात्कारी लोकांचा समुदाय माझा जीव घ्यावयास पाहात आहे. ते तुला जुमानीत नाहीत.” (स्तोत्रसंहिता ८६:१४) आज या छळकर्त्यांमध्ये ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकवर्गाचा समावेश आहे. हे लोक देवाची भक्ती करीत असल्याचे दाव्याने सांगतात, पण त्यांनी त्याच्या नावाची बदली “प्रभू” या शब्दात केली असून तो गूढ असा त्रैक्याचा भाग आहे असे म्हणतात; खरे पाहता त्रैक्याबद्दल पवित्र शास्त्रात कोठेच उल्लेख नाही. केवढा हा उद्दामपणा! यात आणखी भर म्हणजे यहोवाच्या साक्षीदारांना हद्दपार करावे व तुरुंगात टाकावे म्हणून ते राजकीय सत्तांना गळ घालतात; आणि ही गोष्ट वस्तुतः आज पृथ्वीवर काही देशात चालू आहे. या झगे घालणाऱ्या देवाच्या नावाच्या निंदकांना, मोठ्या बाबेलच्या सर्व भागधारकांसोबत त्यांचे प्रतिफळ मिळेल.—प्रकटीकरण १७:१, २, १५-१८; १९:१-३.
१३. आपला चांगुलपणा दाखवण्यात यहोवा त्याचे कोणते गुण प्रदर्शित करतो?
१३ तथापि, दावीदाची प्रार्थना पुढे आनंदी सुरात म्हणतेः “तरी हे परमेश्वरा [यहोवा, न्यू.व.] तू सदय व कृपाळू देव आहेस. मंदक्रोध, दयामय व सत्यसंपन्न आहेस.” (स्तोत्रसंहिता ८६:१५) आमच्या देवाचे हे गुण खरेच श्रेष्ठ आहेत. हे शब्द आम्हाला सिनाय डोंगराकडे जेव्हा मोशाने यहोवाचे वैभव बघण्याची इच्छा धरली त्या प्रसंगाकडे नेतात. यहोवाने उत्तर दिलेः “मी माझे सर्व सौंदर्य तुझ्यापुढे चालवीन. तुझ्या सन्मुख परमेश्वराच्या [यहोवा, न्यू.व.] नामाची मी घोषणा करीन.” पण त्याने मोशेला हा इशारा दिलाः “तू माझे मुख पाहू शकणार नाहीस. कारण माझे मुख पाहून कोणी मनुष्य जीवंत राहावयाचा नाही.” यानंतर यहोवा मेघाच्या रुपाने खाली उतरला व त्याने घोषणा केलीः “परमेश्वर, परमेश्वर [यहोवा, न्यू.व.] दयाळू व कनवाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर.” (निर्गम ३३:१८-२०; ३४:५, ६) हेच शब्द दावीदाने आपल्या प्रार्थनेत अवतरीत केले. यहोवाचे हे गुण आम्हाला कोणा शारीरिक स्वरुपापेक्षा अधिक अर्थपूर्ण वाटतात! आमचा स्वतःचा अनुभव बघता, या सुदंर गुणांद्वारे यहोवाचा जो चांगुलपणा दाखवण्यात आला आहे त्याची आम्हाला कदर वाटत नाही का?
“प्रसन्न झाल्याचे चिन्ह”
१४, १५. यहोवा आपल्या सेवकांच्या बाबतीत “प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह” कसे दाखवतो?
१४ दावीद यहोवाच्या आशीर्वादांचा पुनरुच्चार करून म्हणतोः “तू मजकडे वळून मजवर कृपा कर. आपल्या दासाला आपले सामर्थ्य दे. आपल्या दासीच्या पुत्राचे तारण कर. हे देवा [यहोवा, न्यू.व.], तू मजवर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखीव, यासाठी की, तू माझे साहाय्य व समाधान केले आहे. हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावे.” (स्तोत्रसंहिता ८६:१६, १७) दावीदाने ओळखले की, ‘यहोवाच्या दासीचा पुत्र’ या नात्याने तोही यहोवाच्या मालकीचा आहे. हे, ज्यांनी आपले जीवन यहोवाला समर्पित केले आहे व जे आम्ही त्याची सेवा त्याचे दास म्हणून करित आहोत त्या आम्हासर्वांच्या बाबतीत खरे आहे. आम्हाला यहोवाच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या तारणाची शक्ति लाभण्याची गरज आहे. यामुळेच आम्ही आमच्या देवाला “प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह” दाखवावे अशी विनंति करतो. यहोवाच्या चांगुलपणामध्ये आम्ही आता चर्चिलेल्या सर्व गुणांचा समावेश आहे. मग, या आधारावर आपल्याला यहोवाकडून कोणते चिन्ह किंवा खूण मिळण्याची अपेक्षा धरता येईल?
१५ यहोवा हा “प्रत्येक उत्तम देणगी व प्रत्येक पूर्ण दान यांचा दाता” असून तो उदार देखील आहे; हे येशूने, “जे मागतात त्यांस तो किती विशेषेकरुन पवित्र आत्मा देईल” असे म्हणून स्पष्ट केले. (याकोब १:१७; लूक ११:१३) पवित्र आत्मा—यहोवाकडील केवढी ही अमूल्य देणगी! यहोवा या पवित्र आत्म्याद्वारे छळाच्या काळामध्ये देखील आनंदी हृदय देतो. यामुळेच, येशूचे प्रेषित त्यांच्या जीवनाबद्दल चौकशी चालू असताना आनंदाने म्हणू शकले की, देव, त्याला अधिपति मानून त्याच्या आज्ञा पाळणाऱ्यांना पवित्र आत्मा देतो. (प्रे. कृत्ये ५:२७-३२) पवित्र आत्म्याचा आनंद हा त्यांजमध्ये “प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह” म्हणून सतत दिसत होता—रोमकर १४:१७, १८.
१६, १७. (अ) यहोवाने पौल व बर्णबा यांना आपल्या चांगुलपणाचे कोणते चिन्ह दिले? (ब) छळग्रस्त थेस्सलीनकातील लोकांना कोणते चिन्ह देण्यात आले?
१६ पौल व बर्णबा यांनी आशिया मायनर येथे आपली सुवार्तिक यात्रा केली तेव्हा त्यांना खूप त्रास व छळ सहन करावा लागला. त्यांनी पिसिदियातील अंत्युखिया येथे प्रचार केला तेव्हा यहूद्यांनी त्यांच्या संदेशाचा धिक्कार केला. यामुळे ते परराष्ट्रीयांकडे वळाले. याचा काय परिणाम झाला? “हे ऐकून विदेशी लोक हर्षयुक्त झाले, आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला, तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते, तितक्यांनी विश्वास धारिला.” पण यहूद्यांनी तेथे दंगा केला व यामुळे त्या सुवार्तिकांना शहराबाहेर घालवून देण्यात आले. यामुळे हे व नवे विश्वासधारी निराश झाले का? मुळीच नाही! उलट, “शिष्यमंडळ आनंदाने व पवित्र आत्म्याने पूर्ण झाले.” (प्रे. कृत्ये १३:४८, ५२) यहोवाने त्यांना आपल्या चांगुलपणाचे चिन्ह दिले.
१७ नंतर, थेस्सलीनका येथील नव्या मंडळीवर छळ आला. त्यामुळे प्रेषित पौलाने त्यांना सांत्वनाचे आणि छळामध्ये त्यांनी दाखवलेली सहनशीलता याबद्दल प्रशंसेचे पत्र पाठवले. त्यांनी “फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळालेल्या आनंदाने वचन” स्वीकारले होते. (१ थेस्सलीनकाकर १:६) दयाळू, कनवाळू, मंदक्रोध आणि दया व सत्यता यांनी परिपूर्ण असणाऱ्या देवाकडून चिन्ह म्हणून “पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेला आनंद” सतत धैर्य व दृढता देत राहिला.
१८. पूर्व युरोपातील आमच्या बांधवांनी यहोवाच्या चांगुलतेबद्दल कशी कदर व्यक्त केली?
१८ अलिकडील काळात यहोवाने आपला चांगुलपणा पूर्व युरोपतील आमच्या विश्वासू बांधवांच्या बाबतीत व्यक्त केला व त्याने त्यांच्या पूर्वीच्या छळकर्त्यांना, त्यांचा द्वेष करणाऱ्यांना लाजविले. या बांधवांनी कित्येक दशके विरोध सहन केला तरी आता त्यांना आर्थिक दबाव सहन करावा लागत आहे. तथापि, त्यांना “पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेला आनंद” त्यांचे सांत्वन करतो. नव्यानेच मिळालेल्या आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग साक्षीचा विस्तार वाढवीत राहण्यापेक्षा आणखी दुसरा कोणता आनंद त्यांना मिळू शकेल? पुष्कळ लोक त्यांचे ऐकत आहेत हे अधिवेशन तसेच बाप्तिस्म्यांचे अहवाल दाखवून देत आहेत.—पडताळा प्रे. कृत्ये ९:३१.
१९. स्तोत्रसंहिता ८६:११चे शब्द आपण आपलेसे कसे करू शकतो?
१९ जे काही येथे तसेच मागील लेखात चर्चिण्यात आले आहे ते दावीदाने यहोवाला केलेल्या कळकळीच्या प्रार्थनेचे प्रतिध्वनि उमटविणारे आहे. तो म्हणालाः “हे यहोवा तुझा मार्ग मला दाखीव. तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे अंत:करण एकाग्र कर.” (स्तोत्रसंहिता ८६:११) १९९३ च्या वार्षिक वचनाचे हे शब्द आपण सर्वस्वी आपलेसे करून राज्य आस्था तसेच सार्वभौम प्रभु यहोवा आमचा देव याच्या अक्षय चांगुलतेबद्दल कदर व्यक्त करीत अंतःकरणपूर्वक पाठबळ दाखवीत राहू या.
[तळटीपा]
a भाकित “संतान” या नात्याने येशू हा दावीदाच्या राज्याचा वारस होता व या कारणामुळे तो खऱ्या व आध्यात्मिक अर्थाने “दावीदाचा पुत्र” होता.—उत्पत्ती ३:१५; स्तोत्रसंहिता ८९:२९, ३४-३७.
b आधुनिक काळच्या उदाहरणांसाठी पहा यहोवाच्या साक्षीदारांचे वार्षिक अहवाल पुस्तक, १९७४ चा खंड, पृष्ठे ११३-२१२; १९८५, पृष्ठे १९४-७; १९८६, पृष्ठे २३७-८; १९८८, पृष्ठे १८२-५; १९९०, पृष्ठे १७१-२; १९९२, पृष्ठे १७४-८१.
तुम्ही कसे उत्तर द्याल?
▫ “हे यहोवा, तुझा मार्ग मला दाखीव” ही प्रार्थना करण्याद्वारे आपण काय सूचित करीत असतो?
▫ यहोवाच्या नामाचे भय धरण्यासाठी आमची अंतःकरणे एकाग्र करण्याचा काय अर्थ होतो?
▫ यहोवा आपल्या सर्व निष्ठावंत लोकांच्या बाबतीत आपली दया कशी दाखवणार?
▫ यहोवा आम्हाला “प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह” कसे देतो?
[२८ पानांवरील चौकट]
१९९३चे वार्षिक वचन: “हे यहोवा, तुझा मार्ग मला दाखीव. तुझ्या नामाचे भय धरण्यास माझे अंतःकरण एकाग्र कर.” —स्तोत्रसंहिता ८६:११, न्यू.व.
[२७ पानांवरील चित्रं]
सत्यामध्ये सरळ चालत राहणाऱ्यांसाठी यहोवा खडक व दुर्ग आहे
[३० पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांच्या “ज्योति वाहक” आंतरराष्ट्रीय अधिवेशनात जूनमध्ये रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथे ४६,२१४ जण उपस्थित होते व ३,२५६ लोकांनी बाप्तिस्मा घेतला. हे सर्व यहोवाचा चांगुलपणा आणि “पवित्र आत्म्याच्या द्वारा मिळालेला आंनद” केवढ्या अद्भूत रितीने अनुभवीत आहेत!