यहोवा विश्वास ठेवणाऱ्यांचे तारण “मूर्खपणाच्या” योगे करतो
“जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असता त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला योग्य वाटले.”—१ करिंथकर १:२१.
१. यहोवा कोणत्या अर्थाने “मूर्खपणाचा” वापर करणार, आणि जगाला आपल्या ज्ञानामुळे देवाला ओळखता आले नाही हे आपल्याला कसे समजते?
काय? यहोवा मूर्खपणाचा वापर करणार? नाही. पण जगाच्या दृष्टिने जे मूर्ख असल्याचे भासते त्याचा तो वापर करू शकतो व करतो. हे तो त्याला ओळखणाऱ्या व त्याच्यावर प्रीती करणाऱ्या लोकांच्या तारणासाठी करतो. जगाच्या ज्ञानामुळे जगाला देवाची ओळख होऊ शकत नाही. हेच येशू ख्रिस्ताने पित्याला केलेल्या प्रार्थनेत याप्रकारे म्हटले होतेः “हे न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखिले नाही.”—योहान १७:२५.
२. यहोवाचे मार्ग व जगाचे मार्ग हे समांतरपणे जात असल्याचे कशामुळे दिसू शकेल, पण वस्तुस्थिती काय आहे?
२ येशूच्या शब्दांवरुन कळते की, यहोवाचे मार्ग जगाच्या मार्गापासून भिन्न आहेत. कदाचित वरवर असे भासू शकेल की, देवाचे उद्देश व जगाचे उद्देश हे एकमेकांना समांतरपणे जात आहेत. कदाचित असेही दिसू शकेल की, या जगाच्या ध्येयांना देवाचे आशीर्वाद आहेत. उदाहरणार्थ, पृथ्वीवर मानवजातीला शांती, आनंद, आणि समृद्धता देणारे जीवन देव एका नीतीमान सरकारामार्फत देईल असे पवित्र शास्त्र म्हणते. (यशया ९:६, ७; मत्तय ६:१०) याचप्रमाणे जगही लोकांना शांती, समृद्धता आणि उत्तम सरकार तथाकथित एका नव्या जगाद्वारे देण्याबद्दल कर्ण्यासारखा निनाद करते. पण देवाचे तसेच जगाचे उद्देश एकसारखे नाहीत. यहोवाचा उद्देश हा आहे की, त्याचे सर्वोच्च सार्वभौम या नात्याने समर्थन व्हावे. हे तो, सर्व ऐहिक सरकारांचा नाश आपल्या स्वर्गीय सरकारामार्फत करून घडवून आणील तेव्हा करील. (दानीएल २:४४; प्रकटीकरण ४:११; १२:१०) अशाप्रकारे देवाला या जगासोबत भागीदारी करता येईल असे काही नाही. (योहान १८:३६; १ योहान २:१५-१७) याच कारणामुळे पवित्र शास्त्र दोन प्रकारातील ज्ञानाबद्दल बोलते—“देवाचे ज्ञान” व “जगाचे ज्ञान.”—१ करिंथकर १:२०, २१.
जगाच्या ज्ञानामधील मूलभूत दोष
३. जगाचे ज्ञान जरी मोहक असले तरी मानवाने वचन दिलेल्या नव्या जगाची व्यवस्था ही का समाधानकारक असू शकणार नाही?
३ देवाच्या ज्ञानाद्वारे मार्गदर्शित नसणाऱ्यांना या जगाचे ज्ञान मनोवेधक वाटते. जगाचे उच्च तत्त्वज्ञान मनाला आकर्षून घेते. मानवजातीतील सूज्ञ लोकांच्या मनातून सामोरी आलेली विद्वत्ता आज हजारो उच्च प्रशिक्षण संस्थांद्वारे शिकवण्यात येते. मानवी अनुभवांचा शतकांचा साठा असलेल्या ज्ञानकोशांनी ग्रंथालये पूर्णपणे भरलेली आहेत. एवढे असले तरी जागतिक शासनकर्त्यांनी उद्देशिलेली नव्या जगाची व्यवस्था अपूर्ण, पापांनी डागलेल्या व मर्त्य मानवाचे शासन अशी ठरु शकते. या कारणामुळे ती व्यवस्था देखील अपूर्ण, मागे झालेल्या चुकांची पुनरावृत्ती करणारी आणि मानवजातीची सर्व गरजांची कधीच तृप्तता करू न शकणारी अशी असेल—रोम. ३:१०-१२; ५:१२.
४. उद्देशिलेली नव्या जगाची व्यवस्था ही कशाच्या अधीन आहे, आणि कोणत्या परिणामासह?
४ मानवाने उद्देशिलेली नव्या जगाची व्यवस्था ही केवळ मानवी मनोदौर्बल्य याच्याच नव्हे तर दियाबल सैतान व त्याचे दुरात्मे या दुष्ट आत्मिक शक्तींच्याही अधीन आहे. सैतानाने लोकांची मने अशाप्रकाराने अंधळी करून ठेवली आहेत की ज्यामुळे त्यांचा “ख्रिस्ताच्या तेजाच्या सुवार्ते”वर विश्वासच बसत नाही. (२ करिंथकर ४:३, ४; इफिसकर ६:१२) या कारणामुळे जगाला एकामागून दुसऱ्या विपत्तीचा सामना करावा लागत आहे. देवाच्या मदतीविना तसेच ईश्वरी इच्छेला कसलाही मान न देता स्वतःच सत्ता चालविण्याच्या प्रयत्नात या जगाला त्रास व इजा सहन करावी लागत आहे. (यिर्मया १०:२३; याकोब ३:१५, १६) यामुळेच प्रेषित पौल म्हणाला की, “जगाला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही.”—१ करिंथकर १:२१.
५. या जगाच्या ज्ञानाचा मूलभूत दोष कोणता आहे?
५ तर मग, या जगाच्या ज्ञानातील व सोबत त्याच्या नव्या जगाच्या व्यवस्थेमागच्या योजनेतील मूलभूत दोष कोणता आहे? ज्याला कितीही प्रयत्न केला तरी दुर्लक्षिता येत नाही तरी त्याच्याकडेच म्हणजे यहोवा देवाच्या सर्वोच्च सार्वभौमतेकडे जगाचे दुर्लक्ष झालेले आहे ही ती मूलभूत गोष्ट आहे. ते ईश्वरी सार्वभौमत्व जग मगरुरीने नाकारते. आपल्या सर्व योजनांमधून ते यहोवाला हेतुपुरस्सर बाजूला ठेवते व स्वतःच्या क्षमता व आयोजना यावर ते अधिक भिस्त ठेवते. (पडताळा दानीएल ४:३१-३४; योहान १८:३७.) तथापि, पवित्र शास्त्र स्पष्ट करते की, “परमेश्वराचे [यहोवा, न्यू.व.] भय ज्ञानाचा आरंभ होय.” (नीतीसूत्रे ९:१०; स्तोत्रसंहिता १११:१०) तथापि, ज्ञानाची ही मूलभूत गरज देखील या जगाने शिकून घेतलेली नाही. यास्तव, ईश्वरी पाठबळाविना त्याला कसे यशस्वी होता येईल?—स्तोत्रसंहिता १२७:१.
राज्याचा प्रचार —मूर्ख की व्यावहारिक?
६, ७. (अ) देवाच्या ज्ञानाने मार्गदर्शित होणारे कशाचा प्रचार करतात, पण जग अशांकडे कोणत्या दृष्टीने बघते? (ब) ख्रिस्ती धर्मजगताचे पाळक कोणाच्या ज्ञानानुरुप प्रचार करतात, आणि कोणत्या परिणामासह?
६ उलटपक्षी, देवाची ओळख बाळगणारे, देवाच्या ज्ञानाचे प्रदर्शन करतात व त्याद्वारे ते स्वतःला मार्गदर्शित होऊ देतात. येशूने भाकित केल्याप्रमाणे ते “राज्याची ही सुवार्ता . . . सर्व जगात” गाजवीत आहेत. (मत्तय २४:१४; २८:१९, २०) आपली ही पृथ्वी झगडे, प्रदूषण, गरिबी आणि मानवी त्रासांनी भरलेली असताना हा प्रचार सध्या व्यावहारिक मोलाचा आहे का? जगाच्या ज्ञानवंत लोकांना देवाच्या राज्याचा प्रचार अत्यंत मूर्खतेचा, व्यावहारिक नसणारा वाटतो. त्यांना देवाच्या राज्याचे प्रचारक त्यांच्या राज्याच्या जहाजाला चिकटून राहणारे व त्याला पुढे जाऊन चांगले असे राजकीय सरकार निर्माण करण्यात अडथळा निर्माण करणारे प्राणी असे वाटतात. याबाबतीत त्यांना ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांचेही पाठबळ आहे, कारण हेही जगाच्या ज्ञानानेच आपला प्रचार करतात आणि लोकांना वस्तुतः ख्रिस्ताच्या प्रमुख शिक्षणानुसार देवाच्या नव्या जगाबद्दल व त्याच्या राज्य-सरकारबद्दल, जे जाणण्याची गरज आहे ते सांगत नाहीत.—मत्तय ४:१७; मार्क १:१४, १५.
७ ख्रिस्ती धर्मजगताच्या पाळकांच्या या अपयशाकडे इतिहासकार एच. जी. वेल्स यांनी लक्ष वेधविले आहे. त्यांनी लिहिलेः “येशूने ज्याला स्वर्गाचे राज्य संबोधले त्याच्या शिक्षणाला अप्रतिम असे प्राधान्य दिले; याच्या तुलनेत बहुतेक ख्रिस्ती चर्चेस आपले शिक्षण व पद्धतीत अभूतपूर्वतेने उणे दिसतात.” तथापि, या पिढीतील लोकांना जीवनाची प्राप्ती करून घ्यावयाची आहे तर प्रथम त्यांनी देवाच्या प्रस्थापित राज्याची सुवार्ता ऐकली पाहिजे आणि यासाठीच कोणीतरी ही सुवार्ता सांगितलीच पाहिजे.—रोमकर १०:१४, १५.
८. देवाच्या सुवार्तेचा प्रचार ही आज करण्याजोगी अत्यंत व्यावहारिक गोष्ट का आहे, पण कोणते मार्गाक्रमण चिरकालिक लाभ देऊ शकणार नाही?
८ अशाप्रकारे, देवाच्या सुवार्तेचा प्रचार करणे ही आज अत्यंत व्यावहारिक गोष्ट आहे. याचे कारण हे की, हा राज्य संदेश अशी खरी आशा देतो, जी मानवी अंतःकरणाला या शेवटल्या काळातील ‘कठीण दिवसात’ आनंदाने भरून टाकते. (२ तीमथ्य ३:१-५; रोमकर १२:१२; तीत २:१३) या जगातील सध्याचे जीवन हे अनिश्चित तसेच अल्प आहे, पण देवाच्या नव्या जगातील पृथ्वीवरील चिरकालिक जीवन हे आनंद, मुबलकता आणि शांती यांनी ओतप्रत भरलेले असेल. (स्तोत्रसंहिता ३७:३, ४, ११) येशू ख्रिस्ताने हे म्हटले होतेः “मनुष्य सर्व जग मिळवील आणि आपला जीव गमावील तर त्याला काय लाभ होईल? अथवा मनुष्य आपल्या जिवाचा मोबदला काय देईल?” एखादा मनुष्य देवाकडील नव्या जगातील जीवन मिळण्याच्या हक्काला गमावीत आहे तर लयास चाललेले हे जग त्याला केवढ्या लाभाचे ठरेल? अशा व्यक्तीचा सध्याच्या भौतिक गोष्टीतील आनंद निरुपयोगी, व्यर्थ, आणि क्षणभंगूर ठरणारा आहे.—मत्तय १६:२६; उपदेशक १:१४; मार्क १०:२९, ३०.
९. (अ) येशूचा अनुयायी होण्याचे निमंत्रण मिळालेल्या माणसाने ती गोष्ट लांबणीवर टाकण्याचे विनवले तेव्हा येशूने त्याला काय करण्याचा सल्ला दिला? (ब) येशूच्या उत्तराचा आम्हावर कसा परिणाम होण्यास हवा?
९ येशूने एका माणसाला आपला अनुयायी होण्याचे आमंत्रण दिले, पण तो येशूला म्हणालाः “प्रभुजी, पहिल्याने मला माझ्या बापाला पुरावयास जाऊ द्या.” येशूने त्याला काय करण्याचे सांगितले? हा माणूस त्याचे आईबाप मरण्यापर्यंत अत्यंत महत्त्वाच्या कामाला हात घालू शकणार नाही हे जाणून येशूने त्याला उत्तर दिलेः “मेलेल्यांना आपल्या मेलेल्यांस पुरू दे; तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर.” (लूक ९:५९, ६०) ख्रिस्ताची आज्ञा मानून जे ज्ञान प्रदर्शित करतात अशांना राज्य संदेशाचा प्रचार करण्याची आज्ञा पूर्ण करण्याचे बाजूला सारता येणार नाही. ईश्वरी ज्ञान त्यांना ही जाणीव करून देते की, हे जग व त्याचे अधिपती नाशास पात्र आहेत. (१ करिंथकर २:६; १ योहान २:१७) देवाच्या सार्वभौमत्वाच्या पुरस्कर्त्यांना मानवजातीची खरी आशा ही ईश्वरी हस्तक्षेप व अधिपत्य यामध्ये आहे हे माहीत आहे. (जखर्या ९:१०) अशाप्रकारे, जगाचे ज्ञान असणारे देवाच्या राज्यावर विश्वास ठेवत नसले आणि त्यांना स्वर्गीय सरकारची इच्छा नसली तरी ईश्वरी ज्ञानाने चालणारे लोक आपल्या सहमानवांना, यहोवाच्या वाग्दत्त अशा नव्या जगातील सार्वकालिक जीवनासाठी तयारी करण्यात मदत देता येईल ते करून खरा लाभ देत आहेत.—योहान ३:१६; २ पेत्र ३:१३.
“ज्यांचा नाश होत आहे त्यांस मूर्खपण”
१०. (अ) तार्ससच्या शौलाचे धर्मांतर झाले तेव्हा त्याने कोणते काम हाती घेतले, आणि त्या कामाबद्दल त्याचा कसा दृष्टिकोण होता? (ब) प्राचीन हेल्लेणी कशासाठी प्रसिद्ध होते, पण देवाने त्यांच्या ज्ञानाकडे कोणती दृष्टी राखली?
१० येशू ख्रिस्ताचा प्रेषित पौल बनलेल्या तार्ससच्या शौलाने हे जीवन वाचविण्याचे काम हाती घेतले. मग, जेव्हा येशू ख्रिस्ताने शौलाचे धर्मांतर केले तेव्हा त्याने त्याची मूर्खपणाच्या कामासाठी नेमणूक केली असा विचार करणे व्यवहार्य आहे का? पौलाला तसे वाटले नाही. (फिलिप्पैकर २:१६) त्याकाळी हेल्लेणी लोकांना जगातील अत्यंत विद्वान लोक समजले जाई. त्यांना आपल्या मोठमोठ्या तत्त्ववेत्यांचा व ज्ञानी पुरुषांचा अभिमान होता. पौल ग्रीक भाषा बोलत होता तरी त्याने हेल्लेणी तत्त्वज्ञान व शिक्षणाला अनुसरले नाही. ते का? कारण असे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खतेचे आहे.a पौलाने ईश्वरी ज्ञानाचा शोध घेतला व यामुळे त्याला घरोघरी जाऊन सुवार्तेचा प्रचार करण्याची चालना मिळाली. सर्वकाळचा सर्वथोर प्रचारक येशू ख्रिस्त याने ते उदाहरण घालून दिले होते व त्यानेच पौलाला ते काम करण्याची सूचना केली होती.—लूक ४:४३; प्रे. कृत्ये २०:२०, २१; २६:१५-२०; १ करिंथकर ९:१६.
११. पौलाने त्याच्या प्रचाराच्या नेमणूकीबद्दल आणि जगाच्या ज्ञानाबद्दल सांराशरित्या काय सांगितले?
११ प्रचार करण्यासंबंधाने पौलाला जी आज्ञा मिळाली होती त्याबद्दल तो असे म्हणतोः “ख्रिस्ताने मला सुवार्ता सांगावयास पाठविले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून वाक्चातुर्याने ती सांगण्यास पाठविले नाही. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांस वधस्तंभाविषयीचे शिक्षण मूर्खपण आहे; तरी ज्यांस तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस ते देवाचे सामर्थ्य आहे. ‘मी ज्ञान्यांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंतांची बुद्धि व्यर्थ करीन’ असा शास्त्रलेख आहे. या युगाचे ‘ज्ञानी, शास्त्री, वाद करणारे’ कोठे आहेत? देवाने जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरविले की नाही? कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असता त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला योग्य वाटले.”—१ करिंथकर १:१७-२१.
१२. “गाजविलेल्या सुवार्तेचे मूर्खपण” याद्वारे यहोवा काय साध्य करतो, आणि “वरुन येणारे ज्ञान” मिळविण्याची इच्छा दाखवणारे याबद्दल कसली प्रतिक्रिया दाखवतील?
१२ हे अविश्वसनीय वाटत असले तरी खरे आहे की, ज्याला जग मूर्ख समजतात अशांचीच यहोवाने आपले प्रचारक म्हणून निवड केली आहे. या प्रचारकर्त्यांच्या मूर्ख वाटणाऱ्या सेवकपणाद्वारेच देव विश्वास धरणाऱ्यांचे तारण करतो. यहोवाने एकंदर अशी व्यवस्था केली आहे की, ज्यामुळे या “मूर्खतेचा” प्रचार करणारे स्वतःची बढाई करू शकणार नाहीत आणि यांच्याद्वारे ज्यांनी ती सुवार्ता ऐकली असेल त्यांच्याकडून देखील यांचे गौरव होत नाही. हे यासाठी की, “देवासमोर कोणीही मनुष्यजातीच्या प्राण्याने आढ्यता मिरवू नये.” (१ करिंथकर १:२८-३१; ३:६, ७) हे खरे की, प्रचारकाची भूमिका महत्त्वाची आहे, पण ज्या संदेशाचा प्रचार करण्याची त्याला नेमणूक आहे तो, व्यक्तीच्या तारणाची जर त्याने त्यावर आपला विश्वास प्रदर्शित केला तर कार्यसिद्धी करतो. “वरुन येणारे ज्ञान” मिळविण्याची इच्छा धरणारे, प्रचारक दिसायला मूर्ख व हलका वाटतो, त्याचा छळ होतो किंवा तो घरोघरी जात आहे म्हणून त्याच्या संदेशाला तुच्छ मानणार नाहीत. उलटपक्षी, नम्रजन या राज्य घोषकाला, तो यहोवाने आज्ञा देऊन पाठवलेला व देवाच्या नामाने येणारा असा त्याचा आदर करतील. हा प्रचारक आपल्या मुखावाटे किंवा छापील पृष्ठाद्वारे जो संदेश आणीत आहेत त्याला ते मोठे महत्त्व देतील.—याकोब ३:१७; १ थेस्सलनीकाकर २:१३.
१३. (अ) वधस्तंभावर खिळलेल्या ख्रिस्ताचा प्रचार यहूदी व हेल्लेणी यांनी कसा मानला? (ब) येशूचे अनुयायी होण्यासाठी कोणत्या थरातील लोकांना अधिक पाचारण देण्यात आले नाही व का?
१३ देवाच्या मार्गाविषयीची आपली चर्चा पुढे चालवून पौल म्हणतोः “यहूदी चिन्हे मागत असता व हेल्लेणी ज्ञानाचा शोध करीत असता, आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो; हा यहूद्यांस अडखळण व हेल्लेण्यांस मूर्खपण आहे; परंतु पाचारण झालेल्या यहूदी व हेल्लेणी अशा दोघांसही तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असा ख्रिस्त आहे. कारण देवाची जी मूर्खपणाची कृति ती मनुष्यांपेक्षा ज्ञानाची आहे; आणि देवाची जी अशक्तपणाची कृति ती मनुष्यांपेक्षा शक्तिची आहे. बंधुजनहो, तुम्हास झालेले पाचारण पाहा, तुम्हांमध्ये संसारदृष्ट्या ज्ञानी, समर्थ, कुलीन असे फार नाहीत, तरी ज्ञान्यांस लाजवावे म्हणून देवाने जगातील जे मूर्खपणाचे ते निवडिले आणि बलवानांस लाजवावे म्हणून देवाने जे दुर्बल ते निवडिले.”—१ करिंथकर १:२२-२७; पडताळा यशया ५५:८, ९.
१४. (अ) यहोवाच्या साक्षीदारांना त्यांच्या ओळखपत्राबद्दल विचारल्यास ते कशाकडे निर्देश करतात? (ब) पौलाने हेल्लेणी लोकांना जगाच्या ज्ञानाचे प्रदर्शन करून संतुष्ट करण्याचे का नाकारले?
१४ येशू पृथ्वीवर होता त्यावेळी यहूद्यांनी त्याला आकाशातून चिन्ह मागितले. (मत्तय १२:३८, ३९; १६:१) परंतु येशूने कोणतेही चिन्ह देण्याचे नाकारले. याचप्रमाणे आज यहोवाचे साक्षीदार चिन्हरुपे कसलीही ओळखपत्रे दाखवत नाहीत. उलट, त्यांना सुवार्ता प्रचार करण्याची आज्ञा ही यशया ६१:१, २; मार्क १३:१०; व प्रकटीकरण २२:१७ यासारख्या शास्त्रवचनांद्वारे मिळाली असल्याचे दर्शवतात. प्राचीन काळातील हेल्लेणी लोकांनी ज्ञानाचा, या जगाचा उच्च शिक्षणाचा शोध घेतला. पौलाने जरी या जगाच्या ज्ञानाचे शिक्षण घेतले होते तरी त्याचे प्रदर्शन करून हेल्लेणी लोकांना संतुष्ट करण्याचे नाकारले. (प्रे. कृत्ये २२:३) त्याने अव्वल दर्जाच्या हेल्लेणी भाषेपेक्षा सर्वसाधारण लोकांच्या हेल्लेणी भाषेमध्ये संभाषण व लिखाण केले. पौलाने करिंथकरांना म्हटलेः “बंधुजनहो, मी तुम्हाकडे आलो तो वक्तृत्वाच्या व ज्ञानाच्या श्रेष्ठतेने देवाचे गूज तुम्हांस सांगत आलो असे नाही. माझे भाषण व माझी घोषणा ही ज्ञानयुक्त अशा मन वळविणाऱ्या शब्दांची नव्हती तर आत्मा व सामर्थ्य यांच्या प्रतिपादनाची होती, यासाठी की, तुमचा विश्वास मानवी ज्ञानाने नव्हे तर देवाच्या सामर्थ्याने असावा.”—१ करिंथकर २:१-५.
१५. सुवार्तेची थट्टा करणाऱ्यांना पेत्र कोणते स्मरण देतो, आणि सध्याची परिस्थिती ही नोहाच्या काळासारखी कशी आहे?
१५ या शेवटल्या काळी, देवाच्या येत असलेल्या नव्या जगाच्या सुवार्तेची तसेच या जगाच्या येणाऱ्या नाशाची अवहेलना करणाऱ्यांना प्रेषित पेत्राच्या या शब्दाचे स्मरण देण्यात येत आहे की, नोहाच्या काळी “तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला.” (२ पेत्र ३:३-७) त्या प्रलयाला तोंड देत असताना नोहाने काय केले? पुष्कळ लोकांना तो तारवाची बांधणी करणारा माणूस वाटतो, पण पेत्र म्हणतो की, देवाने त्या प्राचीन जगावर नाश आणला तेव्हा त्याने “धार्मिकतेचा उपदेशक नोहा याचे सात जणांसह रक्षण केले.” (२ पेत्र २:५) नोहा ज्याचा प्रचार करीत होता त्याची जलप्रलयाआधीच्या लोकांनी आपल्या जगीक ज्ञानाद्वारे निश्चये थट्टा केली असावी; त्याला मूर्ख, अवास्तववादी, व्यवहाराला सोडून असणारा असे म्हटले असावे. आज खऱ्या ख्रिश्चनांना अशाच प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागत आहे, आणि येशूने देखील आमच्या पिढीची तुलना नोहाच्या काळाशी केली होती. तथापि, थट्टा करणारे असले तरी देवाच्या राज्याच्या सुवार्तेचा प्रचार हा संभाषणापेक्षा अधिक आहे. नोहाने केलेल्या प्रचाराप्रमाणे यातही प्रचार करणाऱ्याला व जे त्याचे ऐकतात अशांना याद्वारे तारण मिळणार आहे!—मत्तय २४:३७-३९; १ तीमथ्य ४:१६.
‘ज्ञानवान बनण्यासाठी मूर्ख बनणे’
१६. हर्मगिदोनात या जगाच्या ज्ञानाचे काय होईल, आणि कोण देवाच्या नव्या जगात बचावून गेलेला असेल?
१६ यहोवा देव लवकरच हर्मगिदोनामध्ये “ज्ञान्यांचे ज्ञान” नष्ट करील. ज्यांनी आपली नवी जागतिक व्यवस्था मानवजातीची परिस्थिती कशी चांगली करील याबद्दल भाकीत केली होती त्या “बुद्धिमंतांची बुद्धि” लोटून देईल. “सर्वसत्ताधारी देवाची त्या मोठ्या दिवसाची लढाई” या जगाचे सर्व वाक्छल, तत्त्वज्ञान, आणि ज्ञान यांना जाळून भस्म करील. (१ करिंथकर १:१९; प्रकटीकरण १६:१४-१६) ज्यांचा त्या युद्धातून बचाव होईल आणि ज्यांना देवाच्या नव्या जगात जीवनाची प्राप्ती होईल ते असे लोक असतील ज्यांनी, या जगाने ज्याला मूर्खपण मानले आहे त्या यहोवाच्या वैभवी राज्याची सुवार्ता स्वीकारलेली असेल व त्यानुरुप आज्ञापालन केले असेल.
१७. यहोवाचे साक्षीदार कसे ‘मूर्ख’ झाले, आणि सुवार्तेचा प्रचार करणाऱ्या देवाच्या लोकांचा कोणता निर्धार आहे?
१७ हे जग ज्याला मूर्खपण म्हणते त्याचा प्रचार यहोवाच्या आत्म्याच्या मदतीने करण्याची यहोवाच्या साक्षीदारांना लाज वाटत नाही. जगीक दृष्ट्या ज्ञानी होण्याऐवजी ते ‘मूर्ख’ होण्याचे पसंद करतात. ते कसे? ज्याद्वारे ते ज्ञानी होऊ शकतील त्या राज्याच्या प्रचाराचे कार्य करून. पौलाने असे लिहिलेः “तुम्हापैकी जो कोणी सांप्रतच्या युगदृष्ट्या आपण ज्ञानी आहो असे समजतो त्याने ज्ञानी होण्याकरिता मूर्ख व्हावे.” (१ करिंथकर ३:१८-२०) यहोवाच्या सुवार्तेच्या प्रचारकांना त्यांच्या संदेशामध्ये जीवन वाचविण्याचे केवढे मोल आहे त्याची कल्पना आहे व यामुळेच ते, हे जग व त्याचे ज्ञान हर्मगिदोनाच्या युद्धात संपुष्टात येईपर्यंत या प्रचारात कसलाही खंड पडू देणार नाहीत. लवकरच यहोवा देव आपल्या विश्वव्यापी सार्वभौमत्वाचे समर्थन करील आणि ज्यांनी “गाजविलेल्या वार्तेच्या मूर्खपणा”वर आपला विश्वास प्रदर्शित केला व हालचाल केली त्या सर्वांना सार्वकालिक जीवन देईल.
[तळटीपा]
a तत्त्वज्ञानावरील वादविवाद आणि पुरातन ग्रीसच्या सूज्ञ माणसांची संशोधने असली तरी त्यांची लिखाणे दाखवतात की, त्यांना आशेचा खरा आधार मिळू शकला नाही. प्राध्यापक जे. आर. एस. स्टेरट् आणि सॅम्युएल अनगस दर्शवतातः “जीवनातील दुःखे, प्रीतीचा दुरावा, आशेची निरर्थकता आणि मृत्युचा कठोरपणा यावर इतका अधिक करुणाजनक शोक इतर कोणत्याही साहित्यात आढळत नाही.”—फंक ॲण्ड वँगला यांची न्यू “स्टँडर्ड” बायबल डिक्शनरी, १९३६, पृ. ३१३.
तुमची उत्तरे काय आहेत?
▫ कोणते दोन प्रकारचे ज्ञान आहेत?
▫ या जगाच्या ज्ञानातील मूलभूत दोष कोणता आहे?
▫ सुवार्तेचा प्रचार करणे ही अत्यंत व्यावहारिक अशी गोष्ट का आहे?
▫ लवकरच जगाच्या सर्व ज्ञानाचे काय होणार?
▫ जग ज्याला मूर्खपणा असे म्हणते त्याचा प्रचार करण्याची यहोवाच्या साक्षीदारांना का लाज वाटत नाही?
हेल्लेणी लोकांनी जगाच्या ज्ञानाकडे आपली दृष्टि लावली आणि पौलाच्या प्रचाराला नेहमीच मूर्खता असे समजले