सर्व खऱ्या ख्रिश्चनांनी सुवार्तिक असले पाहिजे
“सुवार्तिकाचे [मिशनरी] काम कर.”—२ तीमथ्य ४:५, तळटीप, [न्यू.व.]
१. पहिल्या शतकात सुवार्तिकांनी कोणत्या सुवार्तेचा प्रचार केला?
सुवार्तिक असणे याचा आज काय अर्थ होतो? तुम्ही सुवार्तिक आहात का? “सुवार्तिक” या शब्दाची उत्पत्ती यु.आग.एलिस्ट्स यापासून असून त्याचा अर्थ, “सुवार्तेचा प्रचारक” असा होतो. ख्रिस्ती मंडळीची इ. स. ३३ मध्ये स्थापना झाल्यापासून ख्रिस्ती सुवार्तेमध्ये देवाचे तारणाचे माध्यम ठळकपणे दाखवण्यात आले व शिवाय त्यात येशू ख्रिस्त नंतर येऊन मानवजातीवर राज्याचा अंमल सुरु करणार याचीही घोषणा समाविष्ट होती.—मत्तय २५:३१, ३२; २ तीमथ्य ४:१; इब्रीयांस १०:१२, १३.
२. (अ) आमच्या काळात सुवार्तेमध्ये असणाऱ्या विषयाला अधिक पुष्टी कशी मिळाली? (ब) सर्व खऱ्या ख्रिश्चनांवर आज कसले बंधन आहे?
२ येशूने आपल्या परतण्याबद्दल तसेच त्याच्या अदृश्य उपस्थितीबद्दल दिलेल्या चिन्हांची पूर्णता १९१४ पासून पुढे होण्याचा पुरावा दिसून येऊ लागला. (मत्तय २४:३-१३, ३३) पुन्हा या सुवार्तेमध्ये “देवाचे राज्य जवळ आले आहे” ही घोषणा समाविष्ट झाली. (लूक २१:७, ३१; मार्क १:१४, १५) येशूने, “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजवितील, तेव्हा शेवट होईल,” हा मत्तय २४:१४ मध्ये दिलेला भविष्यवाद पूर्ण होण्याची वेळ खरीच आली होती. या कारणास्तव, आजच्या सुवार्तिक कार्यात देवाच्या राज्याची प्रस्थापना व ते राज्य लवकरच सर्व आज्ञाधारक मानवजातीवर जे आशीर्वाद आणणार आहे त्याची आवेशाने घोषणा करण्याचे समाविष्ट आहे. सर्व ख्रिश्चनांना हे काम करण्याची व “शिष्य बनवा,” ही आज्ञा पूर्ण करण्याचे बंधन आहे.—मत्तय २८:१९, २०; प्रकटीकरण २२:१७.
३. (अ) “सुवार्तिक” या शब्दाचा आणखी कोणता अर्थ आहे? (पहा इन्साइट ऑन द स्क्रिपचर्स, खंड १, पृ. ७७०, रकाना २, परि. २.) (ब) यामुळे कोणता प्रश्न उद्भवतो?
३ सुवार्तेचा सर्वसाधारण प्रचार करण्यासोबत पवित्र शास्त्र “सुवार्तिक” ही संज्ञा खास अर्थाने, अशा लोकांसाठी लागू करते, जे सुवार्तेचा प्रचार पूर्वी झाला नाही अशा ठिकाणी करण्याकरता आपले राहते क्षेत्र सोडून स्थलांतरित होतात. पहिल्या शतकात फिलिप्प, पौल, बर्णबा, सीला आणि तीमथ्य यांसारखे पुष्कळ मिशनरी सुवार्तिक होते. (प्रे. कृत्ये २१:८; इफिसकर ४:११) पण १९१४ पासूनच्या आमच्या खास काळाबद्दल काय? यहोवाच्या लोकांनी आपणाला स्थानिक तसेच मिशनरी सुवार्तिकांच्या कार्यास उपलब्ध करून दिले आहे का?
१९१९ पासून प्रगति
४, ५. सुवार्तिक कार्याबद्दल १९१४ नंतर कोणत्या संभाव्य गोष्टी घडल्या?
४ पहिले जागतिक महायुद्ध १९१८ मध्ये संपुष्टात आले तेव्हा देवाच्या सेवकांना धर्मत्यागी व ख्रिस्ती धर्मजगाच्या पाळकवर्गाकडून आणि त्यांच्या राजकीय मित्रांकडून वाढता विरोध अनुभवावा लागला. खरे म्हणजे, अमेरिकेत वॉचटावर संस्थेच्या चालकांना खोट्या दोषारोपामुळे २० वर्षे तुरुंगाची शिक्षा सांगण्यात आली तेव्हा जून १९१८ पर्यंत खऱ्या ख्रिस्ती सुवार्तिकांचे काम जवळजवळ ठप्पच झाले होते. तर मग, देवाच्या शत्रूंना सुवार्तेचा प्रचार बंद करण्यात यश मिळाले का?
५ परंतु, मार्च १९१९ मध्ये संस्थेच्या अधिकाऱ्यांना अगदी अनपेक्षितपणे सोडण्यात आले व त्यांना ज्यामुळे तुरुंगवास घडला त्या सर्व खोट्या दोषारोपातून मुक्त करण्यात आले. आता नव्यानेच मिळालेल्या स्वातंत्र्यामुळे अभिषिक्त ख्रिश्चनांना जाणवले की, त्यांना देवाच्या राज्यात सहवारीस या अर्थी स्वर्गीय वतन मिळण्याआधी बरेच काम करायचे आहे.—रोमकर ८:१७; २ तीमथ्य २:१२; ४:१८.
६. १९१९ ते १९३९च्या दरम्यान सुवार्तिक कार्याची कशी प्रगति झाली?
६ मागे १९१९ मध्ये सुवार्तेचा प्रचार करणाऱ्या ४,००० पेक्षा थोड्या कमी लोकांनी अहवाल दिला होता. पुढील दोन दशकात पुष्कळांनी आपणाला मिशनरी सुवार्तिक असे सादर केले व यांना आफ्रिका, आशिया आणि युरोपात पाठवण्यात आले. मग १९३९ मध्ये म्हणजे राज्य प्रचाराचे काम सुरु होऊन २० वर्षांनी यहोवाच्या साक्षीदारांची संख्या ७३,००० बनली. छळ असताना देखील ही जी अप्रतिम वाढ अनुभवण्यास मिळाली ती, ख्रिस्ती मंडळीच्या आरंभाच्या दिवसासारखीच होती.—प्रे. कृत्ये ६:७; ८:४, १४-१७; ११:१९-२१.
७. ख्रिस्ती सुवार्तिक कार्याच्या बाबतीत इ. स. ४७ व १९३९ मध्ये कोणती समांतरित परिस्थिती उद्भवली?
७ तथापि, त्या काळी यहोवाचे बहुतेक साक्षीदार इंग्रजी बोलणाऱ्या प्रॉटेस्टंट राष्ट्रांत आपले कार्य करीत होते. खरे म्हणजे त्या ७३,००० राज्य घोषकांपैकीचे ७५ टक्के जण ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, न्यूझिलंड व अमेरिका येथील होते. मग, इ. स. ४७ च्या प्रकरणाप्रमाणेच, पृथ्वीवर कमी काम झालेल्या देशाकडे अधिक लक्ष देण्यासाठी सुवार्तिकांना उत्तेजन मिळावे म्हणून काही तरी करण्याची गरज पडली.
८. १९९२ पर्यंत गिलियड शाळेने काय साध्य केले?
८ युद्धकाळातील निर्बंध व छळ यहोवाच्या प्रबळ पवित्र आत्म्याला त्याच्या सेवकांनी मोठ्या वाढीसाठी तयारी करावी म्हणून चालना देण्यात अडथळा आणू शकला नाही. दुसरे महायुद्ध १९४३ मध्ये अत्यंत कळसाला गेले असताना देवाच्या संस्थेने वॉचटावर बायबल स्कूल ऑफ गिलियडची स्थापना केली. सुवार्तेचा अधिक व्याप्त रुपात प्रसार घडावा हा त्यामागील उद्देश होता. मार्च १९९२ पर्यंत या शाळेने ६,५१७ मिशनऱ्यांना वेगवेगळ्या १७१ देशात पाठवले. यासोबतच पुरुषांना वॉचटावर संस्थेच्या परदेशातील शाखांची काळजी घेण्यासाठी तालीम दिली गेली. १९९२ पर्यंत गिलियडमध्ये ९७ शाखा समित्यांच्या ७५ संयोजकांना तालीम दिली गेली.
९. सुवार्तिक तसेच शिष्य बनविण्याच्या कामात कोणत्या शैक्षणिक कार्यक्रमाने मोठी भूमिका केली आहे?
९ यहोवाच्या लोकांना सुवार्तिक कामाचा विस्तार करावा व यात सुधारणा करावी या उद्देशाने गिलियड शाळेखेरीज इतर तालीम देणाऱ्या कार्यक्रमांनी भर घातली. उदाहरणार्थ, जगभर यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळ्यात ईश्वरशासित उपाध्यपणाची शाळा चालविण्यात येते. ह्या व्यवस्थेने तसेच साप्ताहिक सेवा सभा यानेही लाखो राज्य-प्रचारकांना जाहीर सेवकपणात प्रभावी बनण्याची तालीम दिली. याशिवाय राज्य सेवकपणाची शाळा ही देखील वडील तसेच उपाध्य सेवकांना महत्त्वपूर्ण तालीम देते, ज्याद्वारे हे वाढत्या मंडळ्यांची चांगली काळजी घेऊ शकतात. पायनियर सेवा शाळेने पुष्कळ पूर्ण वेळेच्या सुवार्तिकांना त्यांच्या प्रचाराच्या कामी अधिक प्रभावी बनण्याची मदत केली आहे. अगदी अलिकडेच काही देशात चालविण्यात आलेल्या सेवकपणाची तालीम देणाऱ्या शाळेने अविवाहीत वडील व उपाध्य सेवकांना आधुनिक काळचे तीमथ्यी बनण्याची मदत केली आहे.
१०. देवाच्या संस्थेद्वारे देण्यात आलेल्या सुंदर प्रशिक्षणाचा कोणता परिणाम झाला? (तक्त्यातील माहितीचा समावेश करा.)
१० एवढ्या सर्व शैक्षणिक कार्यक्रमाचा काय परिणाम दिसला? १९९१ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांनी २१२ राष्ट्रांमध्ये एकंदर ४० लाखांपेक्षाही अधिक राज्य घोषकांचे नवे शिखर संपादित केले आहे. तथापि, ही परिस्थिती १९३९ सालासारखी नाही, कारण राज्य घोषकांपैकीचे ७० टक्के लोक कॅथोलिक, कर्मठपंथीय, ख्रिस्तेत्तर किंवा इतर देशातील आहेत, जेथे इंग्रजी ही प्रमुख भाषा नाही.—“१९३९ पासून झालेली वाढ” हा तक्ता पहा.
यशस्वी का
११. सेवक या नात्याने प्रेषित पौलाने आपले श्रेय कोणाला दिले?
११ या वाढीचे श्रेय यहोवाचे साक्षीदार स्वतःवर घेत नाहीत. उलट, ते या कार्याकडे, प्रेषित पौलाने राखलेला दृष्टिकोण ग्रहण करतात. पौलाने करिंथकरांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होतेः “अपुल्लोस कोण आहे, आणि पौल कोण आहे? ज्यांच्याद्वारे तुम्ही विश्वास ठेविला, असे ते सेवक आहेत; ज्याला त्याला प्रभूने दिल्याप्रमाणे केवळ ते आहेत. मी लाविले, अपुल्लोसाने पाणी घातले, पण देवाने वाढविले. यास्तव, लावणारा काही नाही, आणि पाणी घालणाराही काही नाही; तर वाढविणारा देव हाच कायतो आहे. कारण आम्ही देवाचे सहकारी आहो; तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहा.”—१ करिंथकर ३:५-७, ९.
१२. (अ) यशस्वी ख्रिस्ती सेवकपणात देवाचे वचन कोणती भूमिका पार पाडते? (ब) ख्रिस्ती मंडळीचा मस्तक म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली आहे आणि त्याच्या मस्तकपदाला आमची अधीनता प्रदर्शित करण्याचा एक महत्वपूर्ण मार्ग कोणता आहे?
१२ यहोवाच्या साक्षीदारांनी अनुभवलेली अभूतपूर्व वाढ ही देवाच्या आशीर्वादानेच मिळाली आहे यात कसलाही संशय नाही. ते देवाचे कार्य आहे. या गोष्टीची जाणीव राखूनच ते देवाच्या वचनाचा नियमित रुपाचा अभ्यास करून त्याचा अवलंब स्वतःच्या बाबतीत लागू करतात. सुवार्तिक कार्यात ते शिक्षण देत असलेल्या सर्व गोष्टी पवित्र शास्त्राच्या आधारावरच करतात. (१ करिंथकर ४:६; २ तीमथ्य ३:१६) त्यांच्या सुवार्तिक कार्याच्या यशस्वीतेची आणखी एक किल्ली म्हणजे देवाने ज्याला ख्रिस्ती मंडळीचा मस्तक असे नेमले आहे, त्या प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ते दाखवीत असलेली पूर्ण मान्यता. (इफिसकर ५:२३) पहिल्या शतकात येशूने ज्यांची नियुक्ती केली होती अशांसोबत सहकार्य दाखवून तेव्हाच्या ख्रिश्चनांनी ही मान्यता दाखवली होती. हे प्रेषित आणि यरुशलेम मंडळीचे इतर वडीलजन यांनी मिळून पहिल्या शतकातील नियमन मंडळ तयार झाले होते. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वर्गातून प्रौढ ख्रिश्चनांच्या या गटाला वादविवादाचा निर्णय करण्यात आणि सुवार्तिक कामाला मार्गदर्शन देण्यासाठी वापरले. या ईश्वरी व्यवस्थेला पौलाने जे आवेशी सहकार्य दिले त्यामुळे त्याने भेट दिलेल्या मंडळ्यात वाढ दिसून आली. (प्रे. कृत्ये १६:४, ५; गलतीकर २:९) याचप्रमाणे, आजही, देवाच्या वचनाला दृढपणे धरून राहिल्यामुळे आणि नियमन मंडळाद्वारे मिळणाऱ्या मार्गदर्शनाला उत्स्फुर्त स्वरुपाचा प्रतिसाद दाखवल्यामुळे ख्रिस्ती सुवार्तिकांना त्यांच्या सेवकपणात यश मिळाल्याची खात्री मिळते.—तीत १:९; इब्रीयांस १३:१७.
इतरांना श्रेष्ठ मानणे
१३, १४. (अ) फिलिप्पैकर २:१-४ मध्ये लिखित असणारी कोणती सूचना प्रेषित पौलाने दिली? (ब) सुवार्तिक कार्यात सहभागी होत असताना आपण ही सूचना का लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे?
१३ प्रेषित पौलाने सत्य शोधकांच्या बाबतीत खरी प्रीती दाखवली व त्याने कोणतीही वरिष्ठ वा जातीय प्रवृत्ती दाखवली नाही. या कारणामुळेच त्याला आपल्या सह विश्वासू बांधवांना, तुम्ही ‘इतरांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ माना’ असा सल्ला देता आला.—फिलिप्पैकर २:१-४.
१४ याचप्रमाणे आजही, ख्रिस्ती सुवार्तिकांना जेव्हा वेगवेगळ्या वंशाच्या वा पार्श्वभूमिच्या लोकांसोबत दळणवळण ठेवावे लागते तेव्हा ते स्वतःबद्दलच्या श्रेष्ठत्वाची भावना प्रदर्शित करीत नाही. आफ्रिकेत मिशनरी कार्याची नेमणूक मिळालेला अमेरिकेतील एक यहोवाचा साक्षीदार म्हणतोः “आपण श्रेष्ठ नाहीत, एवढेच मला माहीत आहे. आपल्यापाशी कदाचित पैसा असेल व आपणाला औपचारिक शिक्षणही मिळाले असेल पण यांच्यापाशी [स्थानिक लोक] असेही काही गुण दिसतात, जे आमच्यापेक्षा वरचढ आहेत.”
१५. परदेशात काम करण्याची नेमणूक मिळालेल्यांना संभाव्य शिष्यांबद्दल खरा आदर कसा प्रदर्शित करता येईल?
१५ आपण ज्यांच्यासोबत सुवार्तेची सहभागिता करीत असतो अशांबद्दल खरा आदर दाखवल्यामुळे पवित्र शास्त्राच्या संदेशाचा स्वीकार करण्यात त्यांना सुलभता देत असतो. मिशनरी कार्यकर्त्याने लोकांना मदत द्यावी या उद्देशाने त्याला जेथे ठेवण्यात आले आहे तेथील नेमणूकीबद्दल समाधानी आहोत असे दाखवल्यामुळे देखील लाभ मिळतो. आफ्रिकेत गेली ३८ वर्षे घालविलेला एक यशस्वी मिशनरी म्हणतोः “हे माझे घर आहे व मंडळीत असणारे सर्व माझे भाऊ व बहीण आहेत असे मला अंतःकरणात खोलवर वाटत असते. मी कॅनडाला सुटीवर गेलो तेव्हा मला खरे घरासारखे वाटत नव्हते. कॅनडातील वास्तव्याच्या शेवटल्या आठवड्यात मला असे वाटायला लागले की, मी केव्हा माझ्या नेमणूक मिळालेल्या स्थळी परतेन. मला नेहमी असेच वाटते. मी पवित्र शास्त्र अभ्यास घेत असलेल्या लोकांना तसेच माझ्या बंधूभगिनींना मला परत येण्यात किती आनंद झाला आहे असे कळवतो तेव्हा त्यांना हे खरेपणाने कळून येते की, मी त्यांच्यासोबत राहावे अशी माझी इच्छा आहे.”—१ थेस्सलनीकाकर २:८.
१६, १७. (अ) आपल्या सेवकपणात अधिक प्रभावी बनण्यासाठी कित्येक मिशनऱ्यांनी तसेच स्थानिक सुवार्तिकांनी कोणत्या आव्हानाचा स्वीकार केला? (ब) स्थानिक भाषेत बोलल्यामुळे एका मिशनरी भगिनीला कोणता अनुभव आला?
१६ आपल्या स्थानिक क्षेत्रात मोठा प्रदेश विदेशी भाषेने वेढलेला आहे असे या सुवार्तिकांना आढळते तेव्हा ते स्थानिक भाषा शिकून घेण्याचा प्रयत्न दाखवून आपणापेक्षा इतर श्रेष्ठ आहेत असा विचार राखतात. “दक्षिण आफ्रिकेत मला,” एक मिशनरी सांगतो, “आफ्रिकन पार्श्वभूमीच्या लोकात व युरोपियन पार्श्वभूमीच्या लोकात बेभरवशाची भावना खेळत असल्याचे दिसते. पण आम्ही जेव्हा स्थानिक भाषेत बोलतो तेव्हा ही भावना लगेच लय पावते.” आम्ही ज्यांना सुवार्ता सांगत आहोत त्यांच्या भाषेत बोलण्यामुळे त्यांच्या अंतःकरणी पोहंचण्याची मोठी मदत मिळते. यासाठी कठीण परिश्रम व चिकाटीची गरज आहे. आशियाई देशात काम करणारा एक मिशनरी म्हणतोः “बोलताना चुका होतात तेव्हा बाकीचे हसत राहतात अशा वेळी मोठी परिक्षा वाटते. अशावेळी वाटते की स्थानिक भाषेत बोलणे सोडून द्यावे.” तथापि, देव आणि शेजाऱ्यावरील प्रेमामुळे या मिशनऱ्याला चिकाटी दाखवण्याची मदत मिळाली.—मार्क १२:३०, ३१.
१७ कोणी एखादा परदेशी माणूस स्थानिक भाषेत बोलण्याचा प्रयत्न करून सुवार्ता सांगतो तेव्हा लोकांच्या भावनांवर विधायक स्वरुपाचा परिणाम घडतो ते समजण्याजोगे आहे. कधी कधी तर यामुळे अनपेक्षित आशीर्वाद मिळतात. लेसोथो या एका आफ्रिकन देशात एक मिशनरी भगिनी, भिंतीवर सोडण्याच्या पडद्यांची विक्री करणाऱ्या दुकानात एका स्त्रीसोबत सेसोथो भाषेत बोलत होती. यावेळी दुसऱ्या एका आफ्रिकी देशातील सरकारी अधिकारी त्या दुकानात काही पाहणी करीत होता, त्याने ते संभाषण ऐकले. त्याने येऊन तिची उबदार प्रशंसा केली, तेव्हा ती सरकारी अधिकारी बोलत असलेल्या भाषेत बोलू लागली. “अरे, तुम्ही तर स्वाहिली इतक्या सुस्पष्ट रितीने बोलता, तर मग आमच्या देशात येऊन आमच्या लोकात हे कार्य का करीत नाही?” असे त्यांनी विचारले. तेव्हा मिशनरी भगिनीने चाणाक्षपणे म्हटलेः “ते खूपच चांगले असेल, पण आम्ही यहोवाचे साक्षीदार आहोत आणि सध्या तरी तुमच्या देशात आमच्या कार्याला बंदी आहे.” त्यांनी उत्तर दिलेः “कृपया, आम्ही सर्वच तुमच्या कामाला विरोध करीत आहोत असा अर्थ करून घेऊ नका. आम्हापैकी बरेच असे आहेत जे या कार्याला अनुमती देऊन आहेत. कदाचित एक दिवस असा येईल, जेव्हा तुम्ही आमच्या लोकात मोकळेपणाने कार्य करू शकाल.” काही काळानंतर या मिशनरी बहिणीला, त्या देशात यहोवाच्या साक्षीदारांना भक्तीस्वातंत्र्य बहाल करण्यात आले आहे हे ऐकून मोठा आनंद झाला.
हक्कांचा त्याग करण्याची स्वेच्छा
१८, १९. (अ) पौलाने त्याचा धनी येशू ख्रिस्ताचे कोणत्या महत्त्वपूर्ण प्रकारात अनुकरण केले? (ब) आपण ज्यांच्याशी सुवार्तेची सहभागिता करतो अशांना अडखळण बनण्याचे कसलेही कारण टाळले पाहिजे याचे महत्त्व दाखवणारा एखादा अनुभव (परिच्छेदात सांगितलेला किंवा तुमचा स्वतःचा) सांगा.
१८ प्रेषित पौलाने असे लिहिले की, “जसा मी ख्रिस्ताचा अनुकारी आहे, तसे तुम्ही माझे अनुकारी व्हा.” पण हे लिहिताना तो इतरांना अडखळवण्याचे कारण बनू नये याबद्दलची चर्चा करत होता. या कारणास्तव त्याने म्हटले की, “यास्तव, तुम्ही खाता, पिता किंवा जे काही करिता ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. यहूद्यांस, हेल्लेण्यांस व देवाच्या मंडळीसही अडखळविणारे होऊ नका; तर जसे मी सर्व गोष्टीत सर्वांस संतोषवितो आणि त्यांचे तारण व्हावे एतदर्थ स्वहित न पाहता बहुतांचे हित पाहतो, तसे तुम्ही करा.”—१ करिंथकर १०:३१, ३३; ११:१.
१९ ज्यांना प्रचार करतो त्या लोकांच्या लाभास्तव त्याग पत्करण्याची इच्छा पौलाप्रमाणे दाखवणाऱ्या सुवार्तिकांना आशीर्वाद मिळतात. उदाहरणार्थ, एके दिवशी एक मिशनरी जोडपे आपल्या विवाहाच्या दिवसाचा प्रतिवार्षिक आनंद व्यक्त करण्यासाठी एका हॉटेलमध्ये रात्री जेवणाला गेले. आधी त्यांचा विचार ठरला की, जेवणासोबत थोडासा द्राक्षारस घ्यावा, कारण पवित्र शास्त्र मद्याची पेये संयमाने घेण्याला बंदी घालत नाही. (स्तोत्रसंहिता १०४:१५) पण या जोडप्याने असाही विचार केला की, यामुळे कदाचित स्थानिक लोकांना अडखळण होईल, तेव्हा मद्य घेऊ नये. “काही काळानंतर,” पती आठवण करून सांगतो, “आम्ही या हॉटेलमध्ये प्रमुख असणाऱ्या माणसाला भेटलो व त्याच्यासोबत पवित्र शास्त्राच्या अभ्यासाला सुरवात केली. पुष्कळ काळानंतर तो आम्हाला म्हणालाः ‘तुम्ही मागे रात्रीच्या जेवणाला आमच्या हॉटेलमध्ये आला होता ते तुम्हाला आठवते का? आम्ही यावेळी सर्वजण स्वयपांक घराच्या दाराआड लपून तुम्हाला बघत होतो. आम्हाला काही चर्च मिशनऱ्यांनी सांगितले होते की, मद्यपान करणे चुकीचे आहे. तरीही ते हॉटेलमध्ये येतात व खुशाल मद्य पीत बसतात. या कारणामुळे आम्ही ठरवले की, तुम्ही जर मद्याची ऑर्डर आम्हाला केली तर, आमच्याकडे प्रचाराला आल्यावर आम्ही अजिबात ऐकणार नाही.’” आज तो प्रमुख आणि त्याच्यासह त्या हॉटेलमध्ये काम करणारे किती तरी जण बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार आहेत.
अद्याप पुष्कळ करायचे आहे
२०. आपण उत्साही सुवार्तिक असे टिकून राहण्याची का गरज आहे, आणि कोणता आनंदी हक्क आज पुष्कळ जण अनुभवीत आहेत?
२० या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत जलदगतीने येत असता अद्याप पुष्कळांना सुवार्ता ऐकण्याची उत्कंठा आहे. त्यामुळे प्रत्येक ख्रिश्चनाने विश्वासू सुवार्तिक म्हणून टिकून राहण्याची पूर्वी नव्हती इतकी आता गरज आहे. (मत्तय २४:१३) या कामातील तुमचा सहभाग फिलिप्प, पौल, बर्णबा, सीला आणि तीमथ्य याप्रमाणेच एका खास अर्थाने सुवार्तिक बनून अधिक वाढवू शकता का? हीच गोष्ट पुष्कळ जण स्वतःला पायनियर मालिकेत आणून आणि जेथे मोठी गरज आहे अशा ठिकाणी कार्य करण्याची तयारी दाखवून पूर्ण करीत आहेत.
२१. यहोवाच्या लोकांसाठी “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” कोणत्या अर्थी उघडण्यात आले आहे?
२१ पूर्वी जेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला बंदी होती अशा आफ्रिका, आशिया आणि पूर्व युरोपात पुष्कळ देशात आता सुवार्तिक कार्यासाठी मोकळीक मिळाली आहे. प्रेषित पौलाप्रमाणेच यहोवाच्या लोकांसाठी “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” उघडण्यात आले आहे. (१ करिंथकर १६:९, न्यू.व.) उदाहरणार्थ, मोझांबिक या आफ्रिकन देशात अलिकडेच जे मिशनरी सुवार्तिक आले आहेत अशांना पवित्र शास्त्र अभ्यास घेण्याची इच्छा धरणाऱ्या लोकांना हाताळता येत नाही इतके लोक त्याची मागणी करीत आहेत. या देशात फेब्रुवारी ११, १९९१ मध्ये यहोवाच्या साक्षीदारांच्या कामाला कायदेशीर मान्यता मिळाली हे जाणून आम्हाला किती आनंद होत आहे बरे!
२२. आमच्या स्थानिक क्षेत्राचा उरक चांगल्या प्रमाणात झालेला असो वा नसो, आम्ही काय करीत राहण्याचा निर्धार राखला पाहिजे?
२२ ज्या देशात आम्हाला भक्तीचे स्वातंत्र्य नेहमीच आहे अशाही ठिकाणी आम्हाला सतत वाढीचा अनुभव येत आहे. होय, आपण कोठेही असो, आपल्याला “प्रभूच्या कामात पुष्कळसे करण्याजोगे आहे.” (१ करिंथकर १५:५८, न्यू.व.) अशी ही गोष्ट असल्यामुळे आपण ‘सुवार्तिकाचे काम करुन आपल्याला सोपवलेली सेवा पूर्ण करून’ राहिलेल्या वेळेचा सूज्ञ वापर करू या.—२ तीमथ्य ४:५; इफिसकर ५:१५, १६.
तुम्हाला विवेचीत करता येईल का?
▫ सुवार्तिक म्हणजे काय?
▫ १९१४ नंतर सुवार्तेतील विषय कसा समृद्ध बनला?
▫ १९१९ पासून सुवार्तिकांचे कार्य कसे प्रगत झाले?
▫ सुवार्तिक कामाच्या यशस्वीतेला कोणत्या गोष्टींनी हातभार लावला?
[१२ पानांवरील चौकट]
१९३९ पासून झालेली वाढ
उदाहरणादाखल, जेथे गिलियडमधून प्रशिक्षण मिळालेले मिशनरी पाठवण्यात आले त्या तीन खंडांचा विचार करा. १९३९ मध्ये पश्चिम आफ्रिकेत केवळ ६३६ राज्य-घोषक होते. १९९१ पर्यंत पश्चिम आफ्रिकेच्या १२ देशातून ही संख्या २,००,०००च्या वर गेली. दक्षिण अमेरिकेतील देशाच्या भव्य वाढीत सुद्धा मिशनऱ्यांनी मोठा हातभार लावला. यापैकीचा एक ब्राझिल देश आहे, येथे १९३९ मध्ये केवळ ११४ राज्य-घोषक होते ते एप्रिल १९९२ मध्ये ३,३५,०३९ इतके झाले आहेत. अशाच प्रकारची वाढ आशियाई देशात मिशनऱ्यांचे आगमन झाल्यावर घडली. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात जपानमधील थोड्या यहोवाच्या साक्षीदारांना भयंकर छळाचा सामना करावा लागला आणि त्यांचे काम स्तब्ध झाले. मग, १९४९ मध्ये तेथे कामाचे पुन्हा संघटन करण्यासाठी १३ मिशनरी कार्यकर्ते आले. त्या सेवा वर्षात दहापेक्षा कमीच प्रचारकांनी सबंध जपानसाठी अहवाल दिला. पण एप्रिल १९९२ मध्ये हीच एकूण संख्या १,६७,३७० पर्यंत गेली.
[१४ पानांवरील चौकट]
ख्रिस्ती धर्मजगत व भाषेची समस्या
ख्रिस्ती धर्मजगाच्या काही मिशनऱ्यांनी विदेशी भाषा शिकून घेण्याचा पराकाष्ठेचा प्रयत्न केला, पण पुष्कळ मिशनऱ्यांनी स्थानिक लोकांनी त्यांची भाषा शिकून घ्यावी अशी अपेक्षा धरली. जिओफ्रे मूरहाऊस हे त्यांच्या द मिशनरीस् या पुस्तकात याचे असे विवेचन देतातः
“स्थानिक भाषा संपादित करण्याचे ध्येय हे शास्त्रवचनांचे भाषांतर करावे या हेतूपुरतेच मर्यादित आहे अशी भावना ग्रहण करण्यात आली होती ही यामागील समस्या आहे. यामुळेच विशिष्ट जन किंवा त्यांना कामाला लावणाऱ्या संस्था यांनी, मिशनरी एखाद्या रहिवाशासोबत त्या रहिवाश्याच्या भाषेत अस्खलितपणे बोलू शकतो का व याद्वारे त्या दोघात खोल समज उभारली जात आहे का याबद्दल खात्री करण्यासाठी खूपच कमी परिश्रम केले गेले. प्रत्येक मिशनरी स्थानिक शब्दावली अल्पशी शिकून घेऊ लागला. . . . याखेरीज, दळणवळणाला भयानक स्वरुप मिळाले आणि तथाकथित असंस्कृत इंग्रजी भाषेचा तोल बिघडवला गेला आणि आफ्रिकी माणसाने इंग्रजी पाहुण्यांच्या भाषेला अधीन व्हावयास हवे अशी अपेक्षा धरण्यात आली. यामुळे, वंशिक श्रेष्ठतेच्या आणखी एका प्रदर्शनाला वाट मिळाली.”
१९२२ मध्ये इंग्लंडमधील स्कूल ऑफ ओरिएन्ट ॲण्ड आफ्रिकन स्टडीज याने भाषेच्या समस्येबद्दल एक अहवाल प्रसिद्ध केला. “आम्ही या मताचे आहोत की,” अहवाल म्हणतो, “मिशनऱ्यांनी प्रादेशिक भाषांबद्दल जी सर्वसाधारण पातळी ग्रहण करावयाची अपेक्षा होती ती अत्यंत दुःखद व अगदीच खालच्या स्तरावर आहे.”
वॉचटावर संस्थेच्या मिशनऱ्यांनी भाषा शिकून घेतलीच पाहिजे असे मानले आहे व यामुळेच त्यांना मिशनरी कार्यात जी यशस्वीता मिळत आहे ती समजू शकते.