वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w92 ७/१ पृ. २६-३१
  • यहोवाची तरतुद, “वाहिलेले लोक”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची तरतुद, “वाहिलेले लोक”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • इस्राएलांचे बाबेलमधून परतणे
  • इस्राएली नसलेले देखील परततात
  • आधुनिक समांतरता
  • खास सेवेसाठी वाहिलेले
  • आज स्वतःला वाहून घेणे
  • घोषणा नियमन मंडळाच्या कमिटीकरिता सहाय्यक
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • एज्रा पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००६
  • ‘देवाचे इस्राएल’ आणि “मोठा लोकसमुदाय”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • एका पुनर्स्थापित ‘देशात’ एकत्र वास्तव्य करणारे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
w92 ७/१ पृ. २६-३१

यहोवाची तरतुद, “वाहिलेले लोक”

“परके उभे राहून तुमचे कळप चारितील.”—यशया ६१:५.

१. “दाता” हा शब्द आमच्या लक्षात यहोवाला का आणतो?

देव केवढा उदार दाता आहे! प्रेषित पौलाने म्हटले की, “जीवन, प्राण व सर्वकाही [यहोवा] सर्वांस देतो.” (प्रे. कृत्ये १७:२५) आपल्याला देवाकडून ज्या ‘उत्तम देणग्या व पूर्ण दान’ मिळते त्याजबद्दल मनन करून प्रत्येकाला लाभ मिळवता येईल.—याकोब १:५, १७; स्तोत्रसंहिता २९:११; मत्तय ७:७; १०:१९; १३:१२; २१:४३.

२, ३. (अ) देवाने दिलेल्या देगणीबद्दल आमचा कोणता प्रतिसाद असण्यास हवा? (ब) लेवी कोणत्या अर्थी “वाहिलेले” लोक होते?

२ या सर्वांबद्दल यहोवाची आपल्याला परतफेड कशी करता येईल याबद्दल स्तोत्रकर्त्याला अगदी उचित कारणास्तव आश्‍चर्य वाटले होते. (स्तोत्रसंहिता ११६:१२) मानवाकडे जे आहे किंवा तो जे देऊ शकतो त्याची आमच्या निर्मात्याला काहीच गरज नाही. (स्तोत्रसंहिता ५०:११, १२) तरीपण, जेव्हा लोक स्वतःला खऱ्‍या उपासनेच्या अनुषंगाने रसिकतेने देत असतात तेव्हा ते त्याला संतुष्ट करते असे यहोवा सुचवतो. (पडताळा इब्रीयांस १०:५-७.) यास्तव, सर्व मानवांनी आपल्या निर्माणकर्त्याला स्वतःचे समर्पण केले पाहिजे व याच्या मोबदल्यात तो त्यांना अधिक हक्क देईल. हेच प्राचीन लेव्यांच्या बाबतीत होते. वस्तुतः सर्व इस्राएल देवास समर्पित होते तरी त्याने अहरोनाच्या घराण्यातील लेवी कुटुंबाला निवासमंडप व मंदिर यामध्ये यज्ञार्पणे वाहणारे याजक या कामासाठी निवडले. पण बाकीच्या लेव्यांबद्दल काय?

३ यहोवाने मोशाला सांगितले: “लेवी वंशातील लोकांस समीप आणा . . . [त्यांनी] दर्शनमंडपातील सर्व सामानाचे . . . रक्षण करावे. तू लेवी वंशातील लोकांस अहरोन व त्याचे पुत्र यांच्या हवाली कर. इस्राएल लोकांच्या तर्फे ते अहरोनास पूर्णपणे समर्पण केले [इब्री, नेथू․नीमʹ] [“देण्यात आलेले,” न्यू.व.] आहेत.” (गणना ३:६, ८, ९, ४१) दर्शनमंडपातील कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी लेवी लोक अहरोनाला “दिलेले” किंवा “वाहिलेले” होते, यासाठीच देव म्हणू शकलाः “इस्राएल लोकातून ते मला सर्वस्वी वाहिलेले आहेत.” (गणना ८:१६, १९; १८:६) काही लेव्यांनी साधारण कामे केली तर इतरांना देवाच्या नियमांचे शिक्षण देण्याच्या मोठ्या नेमणूका मिळाल्या. (गणना १:५०, ५१; १ इतिहास ६:४८; २३:३, ४, २४-३२; २ इतिहास ३५:३-५) आता आपण आपले लक्ष आणखी काही “वाहिलेल्या” लोकांकडे व त्याची कोणती आधुनिक समांतरता दिसते ते पाहण्यासाठी वळवू या.

इस्राएलांचे बाबेलमधून परतणे

४, ५. (अ) बाबेलच्या गुलामगिरीतून कोणते इस्राएल परतले? (ब) इस्राएलांच्या बंदिवासातून आधुनिक काळची कोणती समांतरता जुळते?

४ खऱ्‍या भक्‍तिची पुनर्स्थापना करण्यासाठी इस्राएलांचा एक अवशेष जरुब्बाबेल या प्रांताधिकाऱ्‍याच्या नेतृत्वाखाली बाबेलातून कसा परतला त्याबद्दल एज्रा व नेहम्या कळवतात. दोघेही सांगतात की एकंदर ४२,३६० लोक परतले. यापैकीचे हजारो जण “इस्राएलातले” होते. यानंतर याजकांचा अहवाल देण्यात आला आहे. मग, ३५० लेव्यांची यादी आहे, ज्यात लेवी गाणारे व द्वारपाळ यांचा समावेश आहे. याखेरीज, एज्रा व नेहम्या आणखी अशा हजारोंबद्दल कळवतात जे बहुधा इस्राएली आणि याजकही असावेत, पण यांना आपली वंशावळ सिद्ध करता आली नाही.—एज्रा १:१, २; २:२-४२, ५९-६४; नेहम्या ७:७-४५, ६१-६६.

५ बंदिवासात असणाऱ्‍या व नंतर यरुशलेम व यहूदा येथे परतलेल्या त्या इस्राएलाच्या अवशिष्ट लोकांनी देवास उल्लेखनीय निष्ठा दाखवली आणि त्याच्या खऱ्‍या भक्‍तिचे मनापासून आचरण केले. याला आधुनिक काळात १९१९ मध्ये मोठ्या बाबेलच्या दास्यातून मोकळे झालेल्या आध्यात्मिक इस्राएलांच्या शेषांची पूर्णता यथायोग्यपणे जुळते हे आपण पाहिले आहेच.

६. देवाने आमच्या काळात आध्यात्मिक इस्राएलांचा कसा वापर केला आहे?

६ १९१९ मध्ये मुक्‍तता झाल्यावर ख्रिस्ताच्या अभिषिक्‍त बांधवांच्या शेषांनी खऱ्‍या उपासनेत मोठ्या आवेशाने पुढाकार घेतला. यहोवाने त्यांच्या प्रयत्नांवर आशीर्वाद पाठवून १,४४,००० जणांनी मिळून बनलेल्या “देवाचा इस्राएल” याच्या शेवटल्या लोकांना गोळा केले. (गलतीकर ६:१६; प्रकटीकरण ७:३, ४) एक गट या नात्याने या अभिषिक्‍त शेषांचा “विश्‍वासू व बुद्धिमान दास” वर्ग तयार होतो व तो जीवनदायी आध्यात्मिक अन्‍न मुबलकपणे देत असून स्वतः त्याचे जगभर वितरण करण्यात खूप परिश्रम घेत आहे.—मत्तय २४:४५-४७.

७. खऱ्‍या भक्‍तिमध्ये अभिषिक्‍त जनांसोबत आता कोण सहवास राखून आहेत?

७ आधीच्या लेखाने दाखवले तसे यहोवाच्या लोकात लाखो “दुसरी मेंढरे” समाविष्ट आहेत. यांना लवकरच येत असलेल्या मोठ्या संकटातून पार होण्याची देव-प्रणीत आशा आहे. तसेच यहोवाची या पृथ्वीवर सर्वकाळ सेवा करण्याची ते इच्छा बाळगून आहेत. येथे त्यांना कसल्याही तहानेचा वा उपासमारीचा अनुभव येणार नाही, तसेच दुःखाचे अश्रु कधीही ओघळणार नाहीत. (योहान १०:१६; प्रकटीकरण ७:९-१७; २१:३-५) तर मग, अशा लोकांबद्दल, बाबेलातून परतलेल्या लोकांच्या अहवालात काही समांतरता मिळते का? होय!

इस्राएली नसलेले देखील परततात

८. बाबेलातून इस्राएलांबरोबर कोण परतले?

८ यहोवावर प्रीती करणाऱ्‍यांनी बाबेलातून निघून आपल्या वचनयुक्‍त देशी परत जावे अशी घोषणा करण्यात आली तेव्हा हजारो इस्राएलेत्तर लोकांनीही प्रतिसाद दिला. एज्रा व नेहम्या यांनी जी यादी दिली आहे त्यात आपल्याला “नथीनीम” (म्हणजे, “वाहिलेले लोक”) आणि ‘शलमोनाच्या चाकरांचे वंशज” याबद्दल वाचायला मिळते. यांची एकंदर संख्या ३९२ इतकी होती. अहवाल आणखी ‘दास व दासी’ तसेच लेवी नसलेले ‘गाणारे व गाणारणी’ अशा ७,५०० जणांची माहिती देतो. (एज्रा २:४३-५८, ६५; नेहम्या ७:४६-६०, ६७) मग, कशामुळे इतक्या इस्राएलेत्तरांना परतण्याची चालना मिळाली?

९. बंदिवासातून परतलेल्यांच्या बाबतीत देवाचा आत्मा कसा समाविष्ट होता?

९ एज्रा १:५ “यरुशलेमातील परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] मंदिर बांधण्यासाठी वरती जावयास देवाने ज्यांच्या मनास स्फूर्ति दिली” त्यांचेबद्दल सांगते. होय, यहोवाने परतणाऱ्‍या सर्वांना स्फूर्ति दिली. त्याने त्यांच्या आत्म्याला, म्हणजे मानसिक शक्‍तिला प्रेरणा दिली. देव, हे स्वर्गात राहून आपला पवित्र आत्मा, त्याची क्रियाशील शक्‍ति वापरुन करू शकतो. अशाप्रकारे, “यरुशलेमातील परमेश्‍वराचे [यहोवा, न्यू.व.] मंदिर बांधण्यासाठी वरती जावयास” जे निघाले, अशांना “[देवाच्या] आत्म्याने” मदत केली.—जखर्या ४:१, ६; हाग्गय १:१४.

आधुनिक समांतरता

१०, ११. बाबेलातून परतलेल्या इस्राएलेत्तरांच्या बाबतीत कोणती समांतरता काढता येते?

१० अशा या परतलेल्या इस्राएलेत्तरांद्वारे कोण प्रतिछायित होतात? बहुतेक ख्रिस्ती हेच म्हणतील: ‘नथीनीम हे आज “दुसरी मेंढरे” यांची प्रतिमा आहेत.’ ते खरे, पण केवळ नथीनीम नाही तर परतलेले सर्व इस्राएलेत्तर लोक आध्यात्मिक इस्राएल नसलेल्या ख्रिश्‍चनांचे प्रतिक आहेत.

११ यु मे सर्व्हाइव्ह आर्मगेडन इनटू गॉडस्‌ न्यू वर्ल्डa हे पुस्तक असे परिक्षण देतेः “प्रांताधिकारी यरुब्बाबेल याजसोबत बाबेलातून केवळ ४२,३६० इस्राएली लोक बाहेर पडले नाही. . . . आणखी हजारो इस्राएलेत्तर होते . . . नथीनीमशिवाय इतर इस्राएलेत्तर, दास, व्यावसायिक गाणारे व गाणारणी आणि शलमोन राजाच्या चाकरांचे वंशज देखील होते.” ते पुस्तक पुढे म्हणतेः “नथीनीम, दास, गाणारे व शलमोनाच्या चाकरांचे वंशज हे सर्व इस्राएलेत्तर लोक इस्राएली अवशिष्टांसमवेत दास्यत्वाचा प्रदेश सोडून परत आले. . . . तर मग, आध्यात्मिक इस्राएल नसलेल्या वेगवेगळ्या राष्ट्रातील लोक आज आध्यात्मिक इस्राएलांच्या शेषांसमवेत आपला सहवास राखतील आणि त्यांच्याबरोबर मिळून यहोवा देवाची भक्‍ति वाढीस लावतील अशी अपेक्षा धरणे बरोबर आहे का? होय.” असे लोक ‘आधुनिक काळातील प्रतिनमुनेदार नथीनीम, गाणारे, शलमोनाच्या चाकरांचे वंशज’ आहेत.

१२. देव आध्यात्मिक इस्राएलांच्या बाबतीत आपल्या आत्म्याचा कसा खास उपयोग करतो, पण तोच आत्मा त्याच्या सर्व उपासकांना मिळू शकतो याची आम्ही का खात्री राखू शकतो?

१२ प्राचीन काळच्या नमुन्याप्रमाणेच आज देखील देव या पृथ्वीवर सर्वकाळ जगण्याची अपेक्षा धरणाऱ्‍यांना आपला आत्मा देतो. हे खरे की, हे नव्याने जन्मलेले नाहीत. १,४४,००० मधील प्रत्येकाला केवळ एकदाच देवाचे आध्यात्मिक पुत्र या नात्याने नव्याने जन्मण्याचा व पवित्र आत्म्याने अभिषेक होण्याचा अनुभव येतो. (योहान ३:३, ५; रोमकर ८:१६; इफिसकर १:१३, १४) अर्थात, तो अभिषेक म्हणजे लहान कळपाखातर देवाच्या आत्म्याचे अद्वितीय प्रदर्शन होय. पण देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देखील पवित्र आत्म्याची गरज आहे. यामुळेच येशूने म्हटलेः ‘स्वर्गीय पिता, त्याच्याकडे मागणाऱ्‍यांना पवित्र आत्मा देतो.’ (लूक ११:१३) त्याची मागणी करणारा स्वर्गीय आशा असणारा असो की, दुसरी मेंढरे यापैकीचा असो, यहोवा आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचा आत्मा सर्वांना मुबलकपणे देतो.

१३. देवाचा आत्मा त्याच्या सर्व सेवकांवर कसा कार्य करतो?

१३ देवाच्या आत्म्यानेच इस्राएली लोकांना तसेच इस्राएली नसलेल्या लोकांना देखील यरुशलेमास परतण्याचे उत्तेजन दिले. त्याचप्रमाणे आज तो देवाच्या सर्व निष्ठावंत लोकांना बळकटी देतो व मदत करतो. एखाद्या ख्रिश्‍चनाला स्वर्गातील जीवनाची किंवा पृथ्वीवरील जीवनाची देव-प्रणीत आशा असो, त्याने सुवार्तेचा प्रचार केलाच पाहिजे; आणि यात विश्‍वासू राहावे म्हणून देवाचा आत्मा त्याला मदत देतो. आम्हापैकी प्रत्येकाने, आमची आशा कोणतीही असली तरी, आम्हास ज्याची सर्वतोपरि गरज आहे त्या देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती वाढवली पाहिजे.—गलतीकर ५:२२-२६.

खास सेवेसाठी वाहिलेले

१४, १५. (अ) इस्राएलेत्तरांमध्ये परतलेल्या लोकांमध्ये कोणत्या दोन गटांना खासपणे वेगळे दाखविले आहे? (ब) नथीनीम कोण होते व ते काय करीत?

१४ आत्म्याने ज्या हजारो इस्राएलेत्तर लोकांना परतण्याची चालना दिली त्यामध्ये दोन गटाबद्दल देवाचे वचन आपले लक्ष विशेषार्थाने आकर्षित करते. नथीनीम व शलमोनाच्या चाकरांचे वशंज हे ते होत. हे कोण होते? यांनी काय केले? याचा आज काय अर्थ होऊ शकतो?

१५ नथीनीम हा इस्राएलेत्तर उगम असणारा गट होता व यांना लेव्यांसोबत सेवा करण्याचा हक्क मिळाला होता. गिबोनातून आलेले कनानी लोक “मंडळीसाठी आणि परमेश्‍वर [यहोवा, न्यू.व.] निवडणार होता त्या स्थानाच्या वेदीसाठी त्यांस लाकूडतोड्ये व पाणक्ये नेमून ठेविले,” ते आठवा. (यहोशवा ९:२७) यांचे काही वंशज, बाबेलातून परतलेल्या नथीनीमांमध्ये असतील; तसेच यात दाविदाच्या कारकिर्दीत आणि इतर वेळी ज्या नथीनीमांचा भरणा झाला तेही असतील. (एज्रा ८:२०) या नथीनीमांनी काय केले? लेव्यांना याजकांना मदत करण्याची नेमणूक होती, तर या नथीनीमांना लेव्यांची मदत करण्याची नेमणूक होती. हा हक्क सुंता करुन घेतलेल्या विदेशी लोकांनाही होता.

१६. काही काळातच नथीनीमांची भूमिका कशी बदलली?

१६ बाबेलातून परतलेल्या लोकात लेवीही होते, पण ते याजक, नथीनीम आणि “शलमोनाच्या चाकराचे वंशज” यांच्यापेक्षा खूपच कमी होते. (एज्रा ८:१५-२०) जेम्स हेस्टींग्ज यांनी लिहिलेला डिक्शनरी ऑफ द बायबल हा शब्दकोष म्हणतोः “काही काळानंतर आपल्याला [नेथिमीन] पवित्र शासकीय वर्गात इतके पूर्णतयः स्थानापन्‍न झालेले दिसतात की, त्यांना काही हक्क नेमून देण्यात आले.” वेटस टेस्टमेन्टम हे विद्वानांचे पाक्षिक म्हणतेः “एक बदल घडला. बंदिवासातून परतल्यावर त्या [विदेशी] लोकांना पुढे मंदिराचे दास म्हणून वागवण्यात आले नाही तर ते सेवक झाले. जे इतर मंदिरात काम करीत होते त्यासारखाच दर्जा यांनाही मिळाला.—पहा, “बदललेला दर्जा” ही चौकट.

१७. नथीनीमांना अधिक करण्याची का नियुक्‍ति मिळाली, आणि याबद्दल पवित्र शास्त्रातील कोणता पुरावा आहे?

१७ अर्थात, नथीनीम हे याजक व लेव्यांच्या दर्जाचे झाले नाहीत. यानंतरचा इस्राएलांचा गट होता, ज्याची स्वतः यहोवा देवाने निवड केली होती म्हणून त्यात इस्राएलेत्तरांना बदली म्हणून घेतले जाणार नव्हते. तरी पवित्र शास्त्रीय संकेत असा दिसतो की, वस्तुतः लेव्यांची संख्या कमी झाल्यामुळे नथीनीमांना देवाच्या सेवेचा अधिक कार्यभाग देण्यात आला. त्यांना मंदिराजवळच राहण्याची घरे पुरविण्यात आली. नेहम्याच्या काळी त्यांनी याजकांसोबत मिळून मंदिराजवळच्या वेशीची डागडूजी केली. (नेहम्या ३:२२-२६) पारसाच्या राजाने हे फर्मानही काढले की, लेव्यांना जसे मंदिराच्या कामामुळे करभारापासून मुक्‍त करण्यात आले होते तसे नथीनीमांनाही करभार देण्यापासून मुक्‍त करावे. (एज्रा ७:२४) याद्वारे हे स्पष्ट दिसते की, हे “वाहिलेले लोक” (लेवी व नथीनीम) आध्यात्मिक गोष्टीत किती संबंधीत झाले होते आणि नथीनीमांचा कार्यभाग, त्यांना जरी लेवी या अर्थाने जमेस धरण्यात आले नाही तरी गरजेप्रमाणे कसा बदलला गेला. एज्राने नंतर जेव्हा परत जाण्यासाठी बंदिवानांना एकत्र केले तेव्हा आरंभाला त्यांच्यात कोणी लेवी नव्हता. यामुळे काही मिळावेत यासाठी त्याने अधिक प्रयत्न केले. याचा परिणाम हा झाला की, “आमच्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सेवा चाकरी करणारे” म्हणून ३८ लेवी व २२० नथीनीम निघाले.—एज्रा ८:१५-२०.

१८. शलमोनाच्या चाकराच्या वंशजांनी कोणता कार्यभाग पूर्ण केला असावा?

१८ इस्राएलेत्तरातील दुसरा वेगळा काढण्यात आलेला गट शलमोनाच्या चाकरांचे वंशज हा होता. पवित्र शास्त्र यांजबद्दल थोडी माहिती देते. काही “सोफेरेथाचे वंशज” होते. एज्रा याला एक निश्‍चित उपपद जोडतो व त्याला हसोफरत म्हणतो, ज्याचा अर्थ बहुधा “शास्त्री” असा होतो. (एज्रा २:५५; नेहम्या ७:५७) अशाप्रकारे ते शास्त्री किंवा नक्कल करणाऱ्‍या वर्गातील व शक्यतो मंदिर/कार्यालयीन शास्त्री झाले असावेत. हे परदेशी होते तरी शलमोनाच्या चाकराच्या वंशजांनी बाबेल सोडून आणि यहोवाच्या पुनर्स्थापित भक्‍तित सहभागी होण्यासाठी परतून यहोवाला आपली निष्ठा दाखवली.

आज स्वतःला वाहून घेणे

१९. आज अभिषिक्‍त जन व दुसरी मेंढरे यांजमध्ये कोणते नातेसंबंध आहेत?

१९ आमच्या काळात देवाने अभिषिक्‍त शेषांचा शुद्ध भक्‍तीला पुढे नेण्यासाठी व सुवार्ता घोषित करण्यासाठी उपयोग केलेला आहे. (मार्क १३:१०) या खऱ्‍या उपासनेत शेकडो, हजारो व नंतर लाखो सहभागी होत आहेत हे बघून यांना केवढा आनंद झाला असावा! तसेच शेष व दुसरी मेंढरे यांजमध्ये केवढे आनंदी सहकार्य होत राहिले!—योहान १०:१६.

२०. नथीनीम तसेच शलमोनाच्या चाकराचे वंशज यांच्या समांतरतेबद्दल कोणती नवी समज ग्राह्‍य वाटते? (नीतीसूत्रे ४:१८)

२० प्राचीन बाबेलच्या बंदिवासातून जे सर्व इस्राएलेत्तर लोक बाहेर पडले ते दुसरी मेंढरे याजशी समांतरीत आहेत, जे आता आध्यात्मिक इस्राएलाच्या शेषांसोबत सेवा करीत आहेत. पण मग, पवित्र शास्त्र नथीनीम व शलमोनाच्या चाकराचे वंशज यांना जे वेगळे दाखवते त्या गोष्टीबद्दल काय? नथीनीम तसेच शलमोनाच्या चाकराचे वंशज यांना परतलेल्या इतर इस्राएलेत्तरांपेक्षा अधिक हक्क मिळाले. हे, देवाने आज दुसरी मेंढरे यामधील काही प्रौढ व इच्छुक लोकांना हक्क व अधिक कर्तव्ये दिली त्याची हुबेहुब प्रतिबिंब देते.

२१. पृथ्वीवरील आशा राखणाऱ्‍या काही बांधवांना वाढीव कर्तव्ये व हक्क कसे मिळाले?

२१ नथीनीमांची वाढीव हक्क थेटपणे आध्यात्मिक कार्याशी संलग्न होते. शलमोनाच्या चाकराच्या वंशजांना बहुतेक कार्यालयीन जबाबदाऱ्‍या मिळाल्या. त्याचप्रमाणे आज, यहोवाने आपल्या लोकांची काळजी घेण्यासाठी “मनुष्यात दाने” दिली आहेत. (इफिसकर ४:८, ११, १२) या तरतुदीमध्ये शेकडो प्रौढ, अनुभवी बांधवांचा समावेश आहे, जे ‘कळपाची देखरेख’ करण्यात सहभागी होतात, विभागीय व प्रांतिय देखरेखे म्हणून सेवा करतात आणि वॉचटावर संस्थेच्या ९८ शाखा दप्तरातील शाखा समितीवर आहेत. (यशया ६१:५) संस्थेच्या जागतिक कार्यालयात “विश्‍वासू कारभारी” आणि त्याच्या नियमन मंडळाच्या मार्गदर्शनाखाली लायक पुरुषांना आध्यात्मिक अन्‍नाचा पुरवठा करण्याच्या तयारीत मदत देण्याची तालीम दिली जात आहे. (लूक १२:४२) लांब मुदतीच्या इतर स्वयंसेवकांना बेथेलगृहे तसेच कारखाने चालविण्याबद्दल तसेच नव्या शाखा दप्तर सोयी उभारणे व ख्रिस्ती उपासनेसाठी सभागृहे बांधणे या जागतिक कार्यक्रमावर देखरेख ठेवण्याच्या कामासंबंधी तयार केले जात आहे. यांनी बादशाही याजकगणाचा भाग असणाऱ्‍या अभिषिक्‍त शेषांना अगदी निकटपणे सेवा पुरविण्यात उत्तम मदतनीस असल्याचे दाखविले आहे.—पडताळा १ करिंथकर ४:१७; १४:४०; १ पेत्र २:९.

२२. दुसरी मेंढरे वर्गापैकी काही लोकांना आत्ताच गहन जबाबदारी द्यावी हे का योग्य आहे, आणि याबद्दल आपण कशी प्रतिक्रिया राखावी?

२२ प्राचीन काळी याजक व लेवी यहूद्यांमध्ये राहून सेवा करीत होते. (योहान १:१९) तथापि, आज पृथ्वीवर असणारे आध्यात्मिक इस्राएलांचे शेष दिवसेंदिवस कमी झाले पाहिजेत. (पडताळा योहान ३:३०.) शेवटी, मोठ्या बाबेलचा नाश घडल्यावर ‘शिक्का मारिलेले’ सर्व १,४४,००० जण कोकऱ्‍याच्या लग्नासाठी स्वर्गात असतील. (प्रकटीकरण ७:१-३; १९:१-८) पण दुसरी मेंढरे यांची वाढ होतच राहणार. आता यापैकी काहीजण नथीनीम व शलमोनाच्या चाकराचे वंशज यांच्या समानतेत, अभिषिक्‍त शेषांच्या देखरेखीखाली गहन जबाबदाऱ्‍या हाताळत आहेत म्हणून ते अहंकारी किंवा स्वसंतुष्ट असे नाहीत. (रोमकर १२:१३) यामुळे आम्हास हा आत्मविश्‍वास मिळतो की, देवाचे लोक “मोठ्या संकटातून” आल्यावर तेथे अनुभवी लोक—राजपुत्र—दुसरी मेंढरे यांचे नेतृत्व करण्यासाठी तयार असतील.—प्रकटीकरण ७:१४; यशया ३२:१; पडताळा प्रे. कृत्ये ६:२-७.

२३. देवाच्या सेवेसंबंधाने आम्ही सर्वांनी स्वतःला वाहू देण्याचा आत्मा का राखला पाहिजे?

२३ बाबेलातून परतलेले सर्व लोक काम करण्यास आणि आपल्या मनात व अंतःकरणात यहोवाची भक्‍ति ही प्रधान स्थानी आहे हे सिद्ध करण्यास उत्सुक होते. हेच आजही आहे. अभिषिक्‍त शेषांसोबत ‘परके उभे राहून कळप चारीत आहेत.’ (यशया ६१:५) यास्तव, देवाने आम्हासाठी कोणतीही आशा दिलेली असो, आणि आर्मगिदोनात यहोवाचे गौरव होण्याच्या दिवसाआधी आत्म्याने नियुक्‍त असणाऱ्‍या वडिलांना कोणताही हक्क मिळालेला असो, आपण सर्वजण निस्वार्थ, व स्वतःला देऊ करण्याचा आत्मा प्रदर्शित करू या. यहोवाने आम्हाला दिलेल्या भव्य लाभांसाठी त्याची कधीही परतफेड करता येणार नसली तरी आपण त्याच्या संस्थेत राहून जे काही करीत आहोत ते पूर्ण अंतःकरणाने करीत राहू या. (स्तोत्रसंहिता ११६:१२-१४; कलस्सैकर ३:२३) अशाप्रकारे, ‘पृथ्वीवर राज्य करण्याची’ नेमणूक लाभलेल्या अभिषिक्‍त जनांसोबत दुसरी मेंढरे निकटपणे सेवा करीत असताना आपण सर्व खऱ्‍या भक्‍तिसाठी स्वतःला वाहिलेले असे देऊ या.—प्रकटीकरण ५:९, १०.

[तळटीपा]

a पृष्ठे १४२-८; वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीद्वारे प्रकाशित.

लक्षात ठेवण्याजोगे मुद्दे

▫ प्राचीन इस्राएलात लेवी कोणत्या अर्थाने “वाहिलेले” होते?

▫ बंदिवासातून कोणते इस्राएलेत्तर लोक परतले, व ते कोणाचे प्रतिरुप ठरले?

▫ नथीनीमच्या बाबतीत कोणता बदल घडल्याचे दिसते?

▫ नथीनीम तसेच शलमोनाच्या चाकराचे वंशज यांजबद्दल कोणती समांतरता आता ग्राह्‍य वाटते?

▫ अभिषिक्‍त आणि दुसरी मेंढरे याच्यामधील सहकार्यामुळे कोणता आत्मविश्‍वास वाढीस लागला आहे?

[२८ पानांवरील चौकट]

बदललेला दर्जा

बंदिवासातून परतलेल्या काही इस्राएलेत्तरांनी जे बदल अनुभवले त्याबद्दल पुष्कळ पवित्र शास्त्रीय शब्दकोष व सांदर्भिक ग्रंथ यांनी विवेचन मांडले आहे. उदाहरणार्थ, “त्यांची बदललेली स्थिती” या शिर्षकाखाली एन्सायक्लोपिडिआ बिब्लिका म्हणतोः “त्यांचा सामाजिक दर्जा हा त्याच वेळी उंचावल्याचे सूचित झाले. [नथीनीम] हे पूर्वीप्रमाणे दास राहिले नाही.” (च्यॅन व ब्लॅक याकरवी संपादित, खंड ३, पृ. ३३९९) द सायक्लोपिडिआ ऑफ बिब्लिकल लिटरेचरमध्ये जॉन किटो लिहितातः “[नथीनीम] पॅलेस्टाईनमध्ये परत त्या हलक्या कामाला जुंपले जातील ही अपेक्षा नव्हती. . . . या लोकांनी दाखवलेली स्वयंपूर्ण निष्ठा त्यांचा दर्जा सुधरविण्याला कामी आली.” (खंड २, पृ. ४१७) द इन्टरनॅशनल स्टँडर्ड बायबल एन्सायक्लोपिडिआ दर्शवतेः “शलमोनाच्या काळात मिळालेला सहवास व त्यांची पार्श्‍वभूमि यांच्या अनुषंगाने बघता शलमोनाच्या सेवकांना दुसऱ्‍या मंदिरात अपूर्व जबाबदाऱ्‍या मिळाल्या असे गृहीत धरता येईल.”—जी. डब्ल्यू. ब्रामेले, खंड ४, पृ. ५७०.

[२९ पानांवरील चित्रं]

इस्राएली लोक यरुशलेमाची बांधणी करण्यासाठी परतले तेव्हा हजारो इस्राएलेत्तर त्यांच्यासोबत गेले

[३१ पानांवरील चित्रं]

कोरियातील शाखा दप्तर. प्राचीन नथीनीमांप्रमाणे आज खऱ्‍या उपासनेच्या बाबतीत दुसरी मेंढरे वर्गातील पुरुषांवर गहन जबाबदारी आहे

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा