जागतिक आनंद
“पाहा! माझे सवेक हर्षित चित्ताने जयजयकार करतील. पण तुम्ही खिन्न चित्ताने ओरडाल, भग्न हृदयी होऊन आकांत कराल.” (यशया ६५:१४) असे यहोवा देव आपल्या यशया संदेष्ट्यामार्फत बोलला होता. याची पूर्णता यहोवाच्या साक्षीदारांमध्ये केवढ्या भव्यपणे होत आहे! हा हृदयास हर्षविणारा आनंद त्यांना कोठून प्राप्त होतो? यहोवा देवाची एकदिलाने भक्ती करण्याद्वारे तो मिळतो. तो “आनंदी देव” आहे आणि जे त्याची भक्ती करतात त्यांचे हृदय “यहोवाठायी आनंदेल.” (१ तीमथ्य १:११; जखर्या १०:७) ही आनंदविणारी भक्ती त्या सर्वांना एका राष्ट्रात संघटित करते, जे सर्व मिळून एकमेकांच्या संगतीत राज्याची सुवार्ता गाजवितात व आपल्या देवाच्या गौरवाचा ध्वनि जगभरात उच्चस्वरात घोषित करतात.—प्रकटीकरण ७:९, १०.
“असा आनंद जो कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही”
देवाचे नाम व त्याचे राज्य यांना प्रसिद्धी देणे हे यहोवाच्या साक्षीदारांना सतत आनंदविणारे माध्यम आहे. (मार्क १३:१०) ते स्तोत्रकर्त्याच्या या शब्दांना प्रतिसाद देतातः “त्याच्या पवित्र नामाचा अभिमान बाळग. ज्यांना यहोवाचा ध्यास लागला आहे त्यांचे हृदय हर्षित होवो.”—स्तोत्रसंहिता १०५:३.
हे साध्य करण्यात त्यांना वेळोवेळी अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. स्पेनमध्ये इसीद्रो याने स्वतःस यहोवाला समर्पित केले. त्याला यहोवाविषयी इतरांना सांगण्याची इच्छा होती. पण तो एक मालमोटार चालक होता व त्याला रात्रभर दूरदूरच्या पल्ल्यांची फेरी करून दिवसा आराम करावा लागे. त्यामुळे फारच थोडा वेळ मिळे. इसीद्रोला आपल्या सोबतीच्या मालमोटार चालकांना साक्ष देण्याची इच्छा वाटली. पण हे त्याला कसे जमणार होते?
त्याने आपल्या मोटारीत एक सी.बी. (सिटिझन्स बँड) रेडिओ ट्रान्सफॉरमर, इतर चालकांसोबत बोलणी करण्यासाठी बसवून घेतला. त्याला लवकरच आढळले की, १३ नंबरच्या चॅनलचा खूप कमी वेळा वापर होत आहे; म्हणून त्याने त्याचा फायदा उचलण्याचे ठरविले. अर्थात, त्याने सुरवातीला इतर मालमोटार चालकांना सुचविले होते की, त्यांनी पवित्र शास्त्राविषयी सी.बी.वर बोलावे. पण तेव्हा प्रतिसाद अगदीच नकारात्मक होता. नंतर थोड्यांनी ऐकून घेतले. ही बातमी सर्वत्र जात राहिली आणि अधिकाधिक स्पॅनिश मालमोटार चालक चॅनल १३वर ऐकू लागले. अलिकडेच इसीद्रोला कळाले की, यापैकी निदान एकजण पवित्र शास्त्राभ्यासाप्रत आपली पावले घेत आहे.
इटलीमध्ये एका गृहस्थाने बसमधील संभाषणाद्वारे यहोवाच्या साक्षीदारांविषयीची माहिती ऐकली. त्याच्या बायकोची, तिच्या एका मैत्रिणीमार्फत त्यांची भेट झाली. दोघांनीही पवित्र शास्त्राचा अभ्यास केला व जे शिकले त्याची इतरांसोबत सहभागी करण्यास उत्सुक बनले. त्यांच्याठायी इतकी उत्सुकता होती की, त्या गृहस्थाने नोकरीवरील बढती नाकारली, त्याच्या बायकोने चांगल्या पगाराची नोकरी सोडली, ते यासाठी की, इतरांना राज्याची सुवार्ता सांगण्यात अधिकाधिक वेळ देता यावा. त्यामुळे काही लाभ मिळाला का? होय. त्या गृहस्थाने म्हटलेः “आम्हाला सत्य कळाल्यापासून, मला व माझ्या बायकोला २० लोकांचे, देवाचे उद्देश अचूकपणे समजावून देण्यात साहाय्य करता आले. त्यामुळे आम्हाला मोठा आनंद मिळत आहे. यहोवाच्या सेवेत दिवसभराचा वेळ खर्च करून संध्याकाळी घरी परततो तेव्हा थकवा आलेला असतो हे खरे, पण मी त्यात खूष आहे व मी, मजपासून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही असा आनंद दिल्याबद्दल यहोवाचे आभार मानतो.”
“पृथ्वीच्या शेवटापर्यंत”
देवाच्या आनंदी राष्ट्रात असणारे सर्व, जगात कोठेही एवढेच काय पण “पृथ्वीच्या शेवटापर्यंत” देखील त्याच उत्साहाने काम करतात. (प्रे. कृत्ये १:८) उत्तर ग्रीनलँडपेक्षा अधिक दूर असणारी स्थळे कमी असतील, पण येथेही, आर्टिक परिसराच्या २०० मैलांच्या अंतरावर इलूलीसातची एक छोटी मंडळी आहे, ज्यात १९ सदस्य आहेत. हेही त्या इटालियन जोडप्याप्रमाणेच राज्याची सुवार्ता तेथे गाजवीत आहेत व गेल्या वर्षी ग्रीनलँडमधील सात लोकांनी यहोवास समर्पण केल्याच्या जाहीर घोषणेत बाप्तिस्मा करवून घेतला हे पाहून तर ते आनंदाने बेहोष झाले.
ग्रीनलँडपासून हजारो मैल दूरवरील हिंदी महासागरातील मॉरिशस नावाच्या उष्णकटिबंधाच्या बेटावरील अंजनी या मुलीला देखील तोच आनंद अनुभवास आला. अंजनीला सुरवात थोडीशी कठीण होती. मॉरिशसमध्ये एका भारतीय हिंदू युवतीने ख्रिस्ती सभांना उपस्थित राहणे व देवाबद्दलच्या प्रचार कार्यात सहभागी होणे, बरेच वावगे वाटे. पण अंजनी त्यामध्ये टिकून राहिली. तिने तिच्या ख्रिस्ती जीवनास सुरवात केल्यावर नऊ वर्षांनी आज तिचे काही नातेवाईक शास्त्राभ्यास करू लागले आहेत.
अंजनीच्या सोबतीतच एमीलियोचाही उल्लेख करावासा वाटतो, जो जगाच्या दुसऱ्या भागात, हाँडुरासमध्ये राहतो. एमीलियोने ऐकले की, त्याचे कामगार सोबती कामावर बायबलची चर्चा करीत असतात, म्हणून त्याने विनंती केली की यात त्यालाही समाविष्ट करून घ्यावे. त्याला वाचता येत नव्हते तरी जेव्हा जेव्हा पवित्र शास्त्रातून वचने वाचली जात, ती तो मोठ्या उत्सुकतेने ऐके. जसेजसे ख्रिस्ती सत्य त्याच्या हृदयास भिडले, तसतसे एमीलियोने त्याचे अनैतिक आचरण सोडून दिले, अति मद्यपान बंद केले. यहोवाच्या साक्षीदारांनी त्याला लिहिण्यास व वाचावयास शिकविले; आणि आता तो देवाकडील आनंदी राष्ट्रातील एक सेवक आहे.
हाँडुरासच्या वायव्येकडे हजारो मैल दूरवर असलेल्या अलास्कामध्ये एका एस्किमो मातेला हीच ख्रिस्ती सत्ये शिकावयाची संधी मिळाली. ही स्त्री दूरवरच्या एकाकी खेड्यात वस्तीस होती; त्यामुळे यहोवाच्या साक्षीदारांसोबत संपर्क साधण्याचा एकमेव मार्ग, पत्रव्यवहार हाच होता. या माध्यामाने तिने अभ्यास आरंभिला. ती आपले प्रश्न पत्राद्वारे विचारीत असे. आता ती जे काही शिकली तेच इतरांना व शेजाऱ्यांना मोठ्या इर्ष्येने सांगत आहे. अशा प्रकारची उदाहरणे असंख्य सांगता येतील. आता सबंध जगभरातून लीन जन “हर्षाने यहोवाची सेवा करण्यास” पुढे येत आहेत.—स्तोत्रसंहिता १००:२.
“तुमची एकमेकांवर प्रीती” असू द्या
एक गोष्ट, जी आज सर्वांचे लक्ष आकर्षित करीत आहे, ती, देवाच्या आनंदी राष्ट्रातील प्रीती ही आहे. येशूने म्हटले होतेः “तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.” (योहान १३:३५) खऱ्या ख्रिश्चनांच्या दैनंदिन जीवनात ख्रिस्ती प्रीती प्रत्ययास येते व विपत्ती काळात ती हमखास दिसून येते.
जेथे यहोवाच्या साक्षीदारांच्या सेवेवर अयोग्यपणे बंदी आहे, अशा एका आफ्रिकी देशात तीव्र दुष्कळा पडला. दहा हजार लोक बळी पडले व गुरे तर तडकाफडकी मेली. पण मग, साक्षीदार कसे बचावले? ते कंदमुळे खात व अवकाडो वनस्पति ही उकळून खात! पण त्यांची ही दैन्यावस्था एकाएकी नाट्यमय प्रकारे पालटली, जेव्हा की, देवाकडील साहाय्याने, इतर देशातील साक्षीदारांनी २५ टन खाद्यवस्तु व इतर उपयुक्त सामान पाठविण्याची परवानगी अनपेक्षितपणे मिळविली. हे खरे की, बंदी असताही, हे सामान सुरक्षितपणे पोहंचविण्यात यावे म्हणून खास लष्करी संरक्षणही पुरविले गेले!
खरोखरी, त्या आफ्रिकी साक्षीदारांना त्यांच्या बंधूंचे हे प्रेमप्रदर्शन पाहून व यशयाच्या त्या शब्दांची होणारी पूर्तता अनुभवून केवढा आनंद वाटला की, “पाहा, उद्धार करवत नाही इतका यहोवाचा हात तोकडा झाला नाही. ऐकू येत नाही इतका त्याचा कान मंद झाला नाही.”—यशया ५९:१.
शांतीप्रिय लोक
नम्र अंतःकरणी लोक देखील देवाच्या आनंदी राष्ट्राकडे आकर्षिले जात आहेत, कारण त्याच्या प्रजेने या जगाच्या सर्व लढाऊ मार्गांचा धिक्कार केलेला आहे आणि “तरवारी मोडून त्यांचे फाळ” केले आहेत. (यशया २:४) एल साल्व्हेडोर मध्ये एका माजी लष्करी गृहस्थाच्या घरी त्याची पुष्कळशी लष्करी सेवेची भूषणे होती. पण जेव्हापासून त्याने यहोवाच्या साक्षीदारांबरोबर शास्त्राभ्यास करण्यास सुरवात केली, तेव्हापासून ओघाओघाने त्याने युद्धसंबंधित असलेल्या सर्व वस्तु घरातून काढून टाकल्या; व मोठ्या इर्षेने प्रचार कार्यात सामील झाला.
जेव्हा सरकार-विरोधकांनी त्याच्या खेड्याचा ताबा घेतला तेव्हा, कोणीतरी तो माजी लष्करी माणूस असल्याचे सांगितले, म्हणून त्याला पकडून नेले. त्याने जबानी दिली की, तो आता लष्करी मनुष्य नाही, तर यहोवाचा साक्षीदार आहे. विरोधकांनी म्हटले की, याजजवळ घरी शस्त्रे जरूर असतील, पण झडती घेता काहीच सापडले नाही. मग, विरोधक प्रमुखाने त्याच्या शेजाऱ्यांपाशी विचारपूस केली. तेव्हा जे जे विशिष्ट उत्तर त्याला मिळाले ते हे की, “हा दररोज हमरस्त्यावर खालीवर हिंडून बायबलचा प्रचार करीत असतो.” त्या गृहस्थाची सुटका झाली. यात काय संशय की, त्याच्याठायीच्या क्रियाशील इर्ष्येने त्याचे प्राण वाचविले.
आफ्रिकन देशातील दोघा लष्करी जवानांचा अहवाल आहे की, त्यांनी यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करण्यास सुरवात केली होती. एक होता सरकारी लष्करात, तर दुसरा बंडखोरांच्या बाजूचा होता. कालांतराने, दोघांनीही आपल्या “तरवारींचे फाळ” करण्याचे ठरविले; तसेच लष्कराला राजीनामा दिला. प्रथमच जेव्हा ते ख्रिस्ती सभांना उपस्थित राहिले तेव्हा, सरकार विरोधक माजी जवानाने दुसऱ्याला विचारलेः “तुला येथे काय पाहिजे?” मग, त्यानेही तेच, प्रत्युत्तरात विचारलेः “आणि तुला, येथे काय हवे आहे?” “मग,” अहवाल म्हणतो, “समज झाल्यावर ते एकमेकांना आलिंगन देत असता, डोळ्यातून आनंदाश्रू गळत होते की, यापुढे ते एकमेकांसोबत शांतीत राहू शकतील.” या दोघा माजी लष्करी जवानांनी निःसंशये हीच प्रार्थना देवाकडे केली असेलः “हे देवा, माझ्या उद्धारक देवा, तू मला रक्तपाताच्या दोषापासून मुक्त कर; म्हणजे माझी जिव्हा तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करील.”—स्तोत्रसंहिता ५१:१४.
“तू माझी दैन्यावस्था पाहिली आहे”
“मी तुझ्या प्रसादाने उल्लास व हर्ष पावेन. कारण तू माझी दैन्यावस्था पाहिली आहेस. माझ्या जिवावरची संकटे तुला अवगत आहेत.” (स्तोत्रसंहिता ३१:७) ही स्तोत्रकर्त्याने प्रार्थना केली होती व आज अनेक असे आहेत, ज्यांच्या दैन्यावस्थेत देववचनाने मार्गदर्शन केल्यामुळे ते हर्षित आहेत. फ्रान्समध्ये जिला स्कीझोफिनिया हा मानसिक रोग जडला होता अशा एका स्त्रीबरोबर यहोवाच्या साक्षीदाराने अभ्यास सुरु केला होता. ती स्त्री मानसिक रोगतज्ञाचा इलाज घेत होती. पण त्यामुळे तितकासा आराम पडला नव्हता. मग तिने अभ्यास सुरु केल्याच्या आठवडाभरानंतर त्या मनोविकार तज्ञाने विचारणा केलीः “ही स्त्री, जे काही बायबलमधून तुला समजावून सांगते ते तुला सर्व समजते का?” मग, पुढील आठवडी साक्षीदार तिच्यासह त्याच्या दप्तरी गेली, ते अशासाठी की त्याच्यासमोर तिला तिचा अभ्यास घेता यावा.
अभ्यासानंतर त्या मनोविकार तज्ञाने साक्षीदार सेविकेला म्हटलेः “आज इतकी वर्षे मी नेहमी माझ्या रुग्णांच्या धर्माची विचारपूस करीत असे, पण मला हे दिसून आले की, त्यांच्यापैकी कोणाही धर्माने त्यांना खरा आधार पुरविलेला नाही. तरी तुमच्याबाबतीत पाहता, काही गोष्टी अगदीच वेगळ्या आहेत. श्रीमती पी— आठवड्यातून दोनदा मजकडे येतात व फी भरून तपासणी करवीत असतात. तरी तुमच्या बायबल शिकवणूकीने आणि चांगल्या उपदेशाने—तेही मोफत, आपण फार चांगले काम करीत आहात. ती चांगली प्रगति करीत आहे. असेच करीत राहा. आणि जर कधी तशी गरज पडलीच तर माझे आपणाला संपूर्ण सहकार्य असेल.”
पवित्र शास्त्र म्हणतेः “ज्या लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य! हे यहोवा ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते तुझ्या नामामुळे नेहमी उल्लास करतात.” (स्तोत्रसंहिता ८९:१५, १६) यहोवाचा प्रत्येक साक्षीदार जाणतो की, हे स्तोत्र सत्य आहे. त्यांच्या मुखाने यहोवाच्या गौरवार्थ आनंदाचा एक जागतिक ध्वनी निघत आहे. सर्व राष्ट्रातून लोकांच्या झुंडीच्या झुंडी देवाची स्तुति करण्यासाठी बाहेर पडत आहेत. मग, यांच्या सोबतीत राहून तुम्हीही स्वतः या आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव का बरे घेऊ नये?
[७ पानांवरील चित्रं]
यहोवाचे साक्षीदार सर्व राष्ट्रांत सापडतील व ते शेकडो वेगवेगळ्या भाषा बोलतात. पण ते सर्व एकच सत्याची भाषा बोलतात आणि एकाच ‘आनंदी राष्ट्रा’चे प्रजाजन आहेत