वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 ६/१ पृ. १६-२०
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांची भूमिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांची भूमिका
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरे ख्रिश्‍चन “अधिकाराला आड” येत नाही
  • आज्ञापालन करणे
  • अधिकाऱ्‍यांची भीती
  • “तो देवाचा सेवक आहे”
  • विश्‍वासाची गरज
  • जेव्हा सरकार मदत देत नाही
  • अधिकाराविषयी ख्रिस्ती दृष्टिकोन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • वरिष्ठ अधिकाऱ्‍यांबद्दल ख्रिश्‍चनांचा दृष्टीकोण
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • तुम्ही कोणाच्या अधिकाराला ओळखले पाहिजे?
    सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
  • अधिकाऱ्‍यांचा हक्क स्वीकारणे—का महत्त्वाचे आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 ६/१ पृ. १६-२०

वरिष्ठ अधिकाऱ्‍यांची भूमिका

“तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. तरी जे वाईट ते तू केल्यास त्याची भीती बाळग.”—रोमकर १३:४.

१, २. ख्रिस्ती धर्मराज्यातील अनेक जण क्रांतीकारी हालचालीत कसे सहभागी झाले?

साधारणपणे तीन वर्षांआधी लंडन येथे भरलेल्या बिशपांच्या एका मेळाव्यात मांडलेल्या प्रस्तावामुळे न्यू यॉर्क पोस्टच्या संपादकीय लेखात बरेच लिहिण्यात आले. हा मेळावा लॅम्बेथ येथील होता व याला अँग्लीकन पंथाचे ५०० पेक्षा अधिक बिशप उपस्थित होते. मेळाव्यात प्रस्तुत करण्यात आलेला ठराव “हरप्रकारचे प्रयत्न करून हताश बनलेल्या व शेवटी न्याय्य मागणीसाठी शस्त्राच्या लढतीचे साधन निवडणाऱ्‍या” लोकांविषयी समज दाखविण्याच्या अनुषंगाने मांडला गेला होता.

२ पोस्टने म्हटले की, हा दहशतवादास उचलून धरण्याचा प्रकार होता. तथापि, हे बिशप समाजातील वाढत्या प्रवृत्तीचे अनुकरण करीत होते. उदाहरणार्थ, आफ्रिकेची मुक्‍तता घडविण्यासाठी सर्वात जलद, खात्रीशीर व सुरक्षित मार्ग म्हणून घानातील कॅथोलिक पुरोहितांनी गनिमी काव्याच्या लढाईची जी शिफारस केली होती; तसेच आफ्रिकेतील मेथॉडिस्ट बिशपांनी “मुक्‍ततेचा लढा शेवटपर्यंत निकराने लढण्याचा” जो निश्‍चय केला; याचप्रमाणे आशिया व दक्षिण अमेरिका येथील प्रस्थापित सरकारांविरुद्ध बंडखोरांच्या सोबत ज्या ख्रिस्ती धर्मराज्याच्या मिशनऱ्‍यांनी सोबत केली होती त्यांच्यापेक्षा ही मनोवृत्ती वेगळी नव्हती.

खरे ख्रिश्‍चन “अधिकाराला आड” येत नाही

३, ४. (अ) क्रांतीकारी हालचाली करणारे तथाकथित ख्रिश्‍चन कोणत्या तत्वांचे उल्लंघन करीत आहेत? (ब) एका माणसाने यहोवाच्या साक्षीदारांविषयी काय शोधून काढले?

३ पहिल्या शतकात, येशूने आपल्या अनुयायांविषयी असे म्हटले होतेः “जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत.” (योहान १७:१४) स्वतःला ख्रिश्‍चन म्हणविणारा जो कोणी क्रांतीकारी चळवळींना चालना देतो तो जगाचा अधिकतेने भाग बनत असतो. तो येशूचा अनुयायी राहात नाही; तसेच तो “वरिष्ठ अधिकाऱ्‍यांस मान्य” राहात नाही. (रोमकर १३:१) तेव्हा अशा व्यक्‍तीने प्रेषित पौलाची ही सूचना नीटपणे लक्षात घेतली पाहिजे की, “जो अधिकाराला आड येतो तो देवाच्या व्यवस्थेस आड येतो; आणि आड येणाऱ्‍यांस दंड प्राप्त होईल.”—रोमकर १३:२.

४ उलटपक्षी, यहोवाचे साक्षीदार ख्रिस्ती धर्मराज्यातील लोकांसारखे शस्त्रसिद्ध हिंसाचारात सहभागी होत नाहीत. युरोपातील एका माणसाला ते दिसून आले. तो म्हणतोः “धर्म व राजकारण यांनी जे निर्मिले ते पाहून मी प्रस्थापित अशा समाजव्यवस्थेला उलटविण्याचा विडा उचलला. मी दहशतवाद्यांच्या गटात सामील झालो आणि सर्व प्रकारच्या शस्त्रांस्त्रांचा वापर कसा करावा याची तालीम घेतली. शस्त्रे हाती घेऊन मी बऱ्‍याच चोऱ्‍या केल्या. माझे जीवन सतत धोक्यात होते. वेळ गेला तसे आम्हाला कळले की, आम्ही आमची लढत निष्फळ देत होतो. मी फारच हताश झालो, माझ्या जीवनात आता काही अर्थ राहिला नाही ही भावना मला सारखी सतावीत होती. मग, एका साक्षीदाराने आमचे दार ठोठावले. तिने मला देवाच्या राज्याविषयी सांगितले. मी तिला म्हटले की, हा माझ्या वेळेचा अपव्यय आहे, तिने माझ्या बायकोसोबत बोलावे. तिने ते केले, आणि आमच्या घरी पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करण्यात आला. सरतेशेवटी, मीही अभ्यासाला बसण्यास राजी झालो. मानवजातीला वाईटाकडे प्रवृत्त करणाऱ्‍या शक्‍तींची जेव्हा मला समज घडली तेव्हा मला किती मोकळे वाटायला लागले ते शब्दात सांगता येणार नाही. देवराज्याच्या अद्‌भुत अभिवचनाने मला एक आशा दिली आणि जीवनात उद्देश दिला.”

५. ख्रिस्तीजन वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन शांतपणे का राहतात, व हे कोठपर्यंत असेल?

५ ख्रिस्तीजन देवाचे व ख्रिस्ताचे वकील वा प्रतिनिधी आहेत. (यशया ६१:१, २; २ करिंथकर ५:२०; इफिसकर ६:१९, २०) यामुळेच ते जगाच्या झगड्यात तटस्थ राहतात. काही राजकीय व्यवस्था दुसऱ्‍यांपेक्षा अधिक आर्थिकदृष्ट्या यशस्वी दिसत असल्या, तसेच काही इतरांपेक्षा अधिक स्वातंत्र्य देणाऱ्‍या असल्या तरी ख्रिश्‍चन कोणा व्यवस्थेची दुसऱ्‍यापेक्षा श्रेष्ठ अशी वर्गवारी करीत नाहीत, किंवा तसे उत्तेजन देत नाहीत. सर्व व्यवस्था अपूर्ण आहेत हे त्यांना ठाऊक आहे. देवाचे राज्य यांना आपल्या ताब्यात घेईपर्यंत त्या ‘देवाची व्यवस्था’ अशा आहेत. (दानीएल २:४४) या कारणास्तव, ख्रिस्तीजन देवाच्या राज्याची सुवार्ता घोषित करून इतरांच्या चिरकालिक कल्याणास हातभार लावण्याच्या प्रयत्नात असता ते वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या अधीन शांतपणे राहतात.—मत्तय २४:१४; १ पेत्र ३:११, १२.

आज्ञापालन करणे

६. “सबंध जग त्या दुष्टाच्या अधीन” असले तरीही पुष्कळ मानवी कायदे हे का चांगले आहेत?

६ राष्ट्रीय सरकारे आपापली कायदेव्यवस्था आखून आहेत, आणि हे सर्व नियम बहुतेक चांगले आहेत. मग, “सबंध जग त्या दुष्टाच्या अधीन आहे” हे पाहता याचे आम्हाला आश्‍चर्य वाटावे का? (१ योहान ५:१९) नाही, कारण यहोवा देवाने आमच्या मूळ पालकाला, आदामाला, विवेक दिला होता व ही बरे तसेच वाईट जाणण्याची अंतःस्थ जाणीव मानवी कायद्यात विविध मार्गाने दिसून येते. (रोमकर २:१३-१६) प्राचीन बाबेलोनी कायदेपंडीत हम्मुराबी याने आपल्या कायद्याविषयक प्रस्तावात असे म्हटलेः “त्यावेळी [त्यांनी] मला म्हटले की, मी लोकांचे कल्याण करावे; मी हम्मुराबी जो, भक्‍तीमान, देवास भिऊन वागणारा राजपुत्र आहे, त्या मी देशात न्याय आणावा, दुष्टांचा तसेच वाईटांचा संहार करावा, ते अशासाठी की, बलिष्ठ लोक दुबळ्यांचा जाच करणार नाहीत.”

७. कोणी कायदा मोडल्यास त्याला शिक्षा करण्याचा अधिकार कोणाचा आहे, व का?

७ आमच्या सरकारच्या कायद्यांचाही हेतू असाच आहे असे बहुतेक म्हणतील. तो हेतू म्हणजे नागरिकांचे कल्याण व समाजात सुव्यवस्था राखणे. यासाठीच ते खूनी माणसाला व चोराला शिक्षा करतात व वेगमर्यादा तसेच वाहने उभी करण्याविषयीचे नियम देतात. जे हेतुपुरस्सर या नियमांचे उल्लंघन करतात ते अधिकारास आड येतात आणि अशांना “दंड प्राप्त होईल.” दंड, कोणाकडून? देवाकडूनच असे नाही. येथे ज्या ग्रीक शब्दाचा अनुवाद देण्यात आला आहे तो यहोवाकडील न्यायदंडापेक्षा मुलकी व्यवस्थेच्या दंडास सूचित करतो. (पडताळा १ करिंथकर ६:७.) जो बेकायदेशीरपणे वागतो त्याला शिक्षा करण्याचा अधिकार वरिष्ठ अधिकाऱ्‍याला आहे.

८. कोणा सदस्याने गंभीर गुन्हा केला आहे तर त्याच्यासंबंधाने मंडळी कशी प्रतिक्रिया दर्शवील?

८ मानवी अधिकाऱ्‍यांना विरोध न दर्शविण्यात यहोवाच्या साक्षीदारांची चांगली ख्याति आहे. मंडळीतील कोणा विशिष्टाने कायद्याचा भंग केला तर त्याला शिक्षा चुकविण्यासाठी मंडळी मदत करणार नाही. कोणी चोरी करतो, खून करतो, बेअब्रू करतो, कर चुकवितो, बलात्कार करतो, ठकवतो, बेकायदेशीर मादक द्रव्यांचा वापर करतो किंवा इतर कोणाही मार्गी कायदेशीर अधिकारास विरोध करतो त्याला मंडळीकडून कडक शासन मिळेल—आणि जेव्हा प्रापंचिक अधिकाऱ्‍यांकडून त्याला शिक्षा मिळते तेव्हा त्याने आपणावर छळ आला आहे असे समजू नये.—१ करिंथकर ५:१२, १३; १ पेत्र २:१३-१७, २०.

अधिकाऱ्‍यांची भीती

९. अधर्मी घटकांकडून दहशत वाटत असल्यास ख्रिश्‍चनांना कोणता आधार आहे?

९ वरिष्ठ अधिकाऱ्‍यांविषयीची आपली चर्चा पुढे नेऊन पौल म्हणतोः “चांगल्या कामास अधिकाऱ्‍यांची भीती आहे असे नाही तर वाईट कामास आहे. तर अधिकाराची भीती नसावी अशी तुझी इच्छा आहे काय? योग्य ते कर म्हणजे त्याच्या योगे तुझी वाहवा होईल.” (रोमकर १३:३) अधिकाऱ्‍यांची भीती कोणा निष्ठावंत ख्रिश्‍चनास वाटू नये, तर जे ‘वाईट कामे’ करतात, गुन्हे करतात अशा गुन्हेगारांना वाटावयास हवी. अशा अधर्मी घटकांकडून जेव्हा दहशत असते तेव्हा यहोवाचे साक्षीदार उचितपणे पोलिस अधिकारी किंवा लष्कर यांजकडून संरक्षणाच्या मदतीची अपेक्षा करू शकतात.—प्रे. कृत्ये २३:१२-२२.

१०. अधिकाराकडून यहोवाच्या साक्षीदारांनी कशी ‘वाहवा मिळविली’ आहे?

१० वरिष्ठ अधिकाऱ्‍यांचा कायदा आचरणाऱ्‍या ख्रिस्तीजनांना पौल म्हणतोः “त्याच्या योगे तुझी वाहवा होईल.” याचे उदाहरण म्हणून ब्राझिलमध्ये प्रांतिय अधिवेशन संपल्यावर यहोवाच्या साक्षीदारांना जी पत्रे आली ती बघा. महापालिकेच्या खेळ विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्‍यांकडूनः “तुम्ही दाखविलेल्या शांतीप्रिय वागणुकीसाठी तुमची स्तुती केली पाहिजे. आजच्या संत्रस्त जगात देवावर विश्‍वास ठेवणारे व त्याची भक्‍ती करणारे काहीजण आहेत हे मोठे सांत्वनदायक वाटते.” महापालिका स्टेडियमच्या संचालकाकडूनः “इतक्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते तरी या प्रसंगास डागाळणारी एकही घटना घडली नाही. अशा निष्पाप संस्थेचे आम्ही आभारी आहोत.” नगराध्यक्षांकडूनः “या पत्राद्वारे आम्ही, तुमचे, सुव्यवस्था तसेच अद्‌भुत व उत्स्फुर्त शिस्त याबद्दल अभिनंदन करीत आहोत. तसेच पुढील सर्व हालचालीत आपणास सुयश चिंतितो.”

११. सुवार्तेच्या प्रचाराचे काम हे वाईट आहे हे का म्हणता येत नाही?

११ “चांगल्या कामास” हा शब्दप्रयोग वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या कायद्यांच्या पालनार्थ केल्या जाणाऱ्‍या कृत्यांना अनुलक्षून आहे. याचप्रमाणे, कोणा मानवाने नव्हे, तर देवाने आज्ञापिलेले आमचे प्रचाराचे काम हे वाईट काम नाही—जे राजकीय अधिकाऱ्‍यांनी समजून घेण्यास हवे. जे लोक ऐकून घेतात अशांचा नैतिक स्तर याद्वारे सुधारला जात असल्यामुळे ही सामाजिक सेवा आहे. या कारणामुळे, प्रचार करण्याच्या आमच्या हक्काचे वरिष्ठ अधिकारी संरक्षण करतील अशी आम्ही आशा बाळगतो. सुवार्तेचे कायदेशीरपणे समर्थन करता यावे म्हणून पौलाने अधिकाऱ्‍यांना अपील केले होते. (प्रे. कृत्ये १६:३५-४०; २५:८-१२; फिलिप्पैकर १:७) अलिकडेच यहोवाच्या साक्षीदारांनी आपल्या कार्यासंबंधाने अशाप्रकारची कायदेशीर मान्यता पूर्व जर्मनी, हंगेरी, पोलंड, रोमानिया, बेनीन आणि म्यानमार (बर्मा) येथे मिळविली आहे.

“तो देवाचा सेवक आहे”

१२-१४. (अ) पवित्र शास्त्र काळी, आणि (ब) आधुनिक काळात वरिष्ठ अधिकाऱ्‍यांनी देवाचे सेवक या नात्याने कसे काम करून दाखविले?

१२ प्रापंचिक अधिकाराविषयी अधिक माहिती देताना पौल पुढे सांगतोः “तुझ्या हितासाठी तो देवाचा सेवक आहे. तरी जे वाईट ते तू केल्यास त्याची भीती बाळग; कारण तो तरवार व्यर्थ धारण करणारा नव्हे; तर क्रोध दाखविण्याकरता वाईट करणारांचा सूड घेणारा असा तो देवाचा सेवक आहे.”—रोमकर १३:४.

१३ राष्ट्रीय अधिकारी कधी कधी देवाचे सेवक या अर्थी विशिष्ट मार्गाने दिसले. यहुद्यांना बाबेलमधून निघून जाण्याविषयी आणि देवाचे मंदिर पुन्हा बांधण्याचे फर्मान कोरेशने काढले तेव्हा तो या प्रकारात बसला. (एज्रा १:१-४; यशया ४४:२८) अर्तहशश्‍त याने त्या मंदिराची पुनर्बांधणी करण्यासाठी एज्राला अनुदान देऊन पाठविले व नंतर नेहम्याला यरुशलेमाचा तट पुन्हा उभारण्यासाठी पाठविले तेव्हा तो देवाचा सेवक होता. (एज्रा ७:११-२६; ८:२५-३०; नेहम्या २:१-८) रोमी वरिष्ठ अधिकाऱ्‍यांनी पौलाची यरुशलेमाच्या जमावापासून सुटका करविली, त्याचे तारू फुटल्यावर त्याला रक्षण दिले आणि रोममध्ये त्याला स्वतःचे असे घर राहण्यास दिले तेव्हा त्यांनी देवाचे सेवक या अर्थी सेवा केली.—प्रे. कृत्ये २१:३१, ३२; २८:७-१०, ३०, ३१.

१४ याचप्रमाणे आजच्या काळात देखील प्रापंचिक अधिकाऱ्‍यांनी देवाचे सेवक अशी सेवा केली. उदाहरणार्थ, १९५९ मध्ये कॅनडाच्या सर्वोच्च न्यायालयाने हा निवाडा दिला की, क्युबेकमध्ये राहणाऱ्‍या एका यहोवाच्या साक्षीदारावर, द्रोही व बदनामी करणारी विधाने प्रकाशित करण्यात आल्याचा आरोप हा खोटा आहे, तो निर्दोष आहे—याप्रकारे क्युबेकचे त्यावेळचे मुख्य प्रधान मौरीस ड्युप्लेसीस यांच्या मताविरुद्ध निवाडा मिळाला.

१५. अधिकारी लोक सर्वसाधारणपणे कशाप्रकारे देवाचे सेवक या नात्याने हालचाल करतात व यामुळे त्यांना कोणता हक्क मिळतो?

१५ आणखी एका मार्गाने राष्ट्रीय सरकारे देवाचे सेवक या नात्याने सेवा करीत आहेत व ती म्हणजे, देवाचे राज्य सर्व व्यवस्था आपल्या हाती पूर्णपणे घेईपर्यंत ते लोकात सुव्यवस्थेचे रक्षण करीत आहेत. पौल म्हणतो की, यासाठीच अधिकारी “तरवार धारण करतो,” याचा अर्थ हा की, शिक्षा करण्याचा त्याला अधिकार आहे. यात सहसा तुरुंगवास किंवा दंड करण्याचे समाविष्ट आहे. काही देशात मृत्युदंडही दिला जातो.a पण, उलटपक्षी काही देशांनी मृत्युदंडाची शिक्षा नको अशी आपली निवड केली आहे, अर्थात हा त्यांच्या स्वतःच्या हक्क आहे.

१६. (अ) अधिकारी देवाचे सेवक असल्यामुळे देवाच्या काही सेवकांनी काय करण्याचे योग्य समजले? (ब) खिस्ती कोणत्या प्रकारातील व्यवसाय स्वीकारणार नाहीत, व का?

१६ वरिष्ठ अधिकारी हे देवाचे सेवक असल्यामुळेच आपल्याला हे कळू शकते की, दानीएल, तीन इब्री, नेहम्या व मर्दखय हे लोक बाबेल व पर्शियन साम्राज्यात जबाबदार पद का स्वीकारू शकले. त्या पदावर राहिल्यामुळे त्यांना देवाच्या लोकांच्या भल्यासाठी राज्याच्या अधिकाराला अपील करता आले. (नेहम्या १:११; एस्तेर १०:३; दानीएल २:४८, ४९; ६:१, २) आजही काही ख्रिश्‍चन सरकारी नोकरीत आहेत. पण ते जगाचे भाग नसल्यामुळे राजकीय पक्ष धरणे, राजकीय पद ग्रहण करणे किंवा राजकीय संघटनांमध्ये तत्त्वप्रणाली बनविणारे पदाधिकारी बनणे या गोष्टींत सहभाग घेत नाहीत.

विश्‍वासाची गरज

१७. कोणत्या परिस्थितीमुळे काही ख्रिस्तेत्तर लोकांना अधिकाराचा प्रतिकार करण्याची इच्छा होते?

१७ पण तेच, सरकारी अधिकारात भ्रष्टाचार आहे तसेच ते खूपच जाचक आहेत असे दिसले तर काय? अशा वेळी ख्रिश्‍चनांनी, त्या सरकारला काढून त्यांना बरे वाटणाऱ्‍या अधिकारास आणण्याचा प्रयत्न करावा का? तसे पाहिल्यास सरकारमधील अन्याय तसेच भ्रष्टाचार काही नवा नाही. पहिल्या शतकात रोमी साम्राज्यात अन्यायी रितीने गुलामगिरी राबविली जात होती. त्यामध्ये भ्रष्ट अधिकारीही होते. पवित्र शास्त्र लोकांस फसविणारे जकातदार, अन्यायी न्यायाधीश आणि लांच मिळेल अशी अपेक्षा धरणाऱ्‍या एका प्रांताधिकाऱ्‍याचीही माहिती देते.—लूक ३:१२, १३; १८:२-५; प्रे. कृत्ये २४:२६, २७.

१८, १९. (अ) सरकारी अधिकारी जाचक किंवा भ्रष्ट आहेत असे दिसून आल्यास ख्रिश्‍चन कशी प्रतिक्रिया दाखवितात? (ब) ख्रिश्‍चनांनी साधारण लोकांचे जीवन कसे सुधरविले हे एका इतिहासकाराने तसेच खाली दिलेल्या चौकटीत कसे दाखविले आहे?

१८ त्या काळी ख्रिस्ती जनांना त्या अन्यायाचा अंत करून सर्व काही सुव्यवस्थित करता आले असते, पण ते त्यांनी केले नाही. उदाहरणार्थ, पौलाने गुलामगिरीचा अंत व्हावा असा प्रचार कोठे सुरु केला नाही, तसेच त्याने दासांच्या मालकांना गुलामांना मुक्‍त करावे असे म्हटले नाही. उलटपक्षी, त्याने दास व त्यांच्या धन्यांना एकमेकांशी व्यवहार ठेवताना दयाळूपणाने वागावे हा बोध केला. (१ करिंथकर ७:२०-२४; इफिसकर ६:१-९; फिलेमोन १०-१६; तसेच १ पेत्र २:१८ देखील पहा.) याचप्रमाणे ख्रिस्तीजनांनी क्रांतीकारक हालचालीत भाग घेतला नाही. ते “शांतीच्या सुवार्ते”ची घोषणा इतरांत करण्यामध्ये खूपच मग्न होते. (प्रे. कृत्ये १०:३६) इ. स. ६६ मध्ये रोमी सैन्याने यरूशलेमाला वेढा घातला, पण नंतर तो उठवला. या काळात त्या शहरात बंडखोर समर्थकांसोबत राहण्यापेक्षा इब्री ख्रिश्‍चन, येशूने दिलेल्या आज्ञेच्या पालनार्थ ‘डोंगराकडे पळाले.’—लूक २१:२०, २१.

१९ आरंभीचे ख्रिस्तीजन त्यांना लाभलेल्या परिस्थितीत, होते तसे राहिले व त्यांनी लोकांना पवित्र शास्त्रीय तत्त्वांचे अवलंबन करून आपल्या जीवनात सुधारणा घडवून आणण्याची मदत दिली. द ओल्ड रोम वर्ल्ड या पुस्तकात इतिहासकार जॉन लॉर्ड लिहितातः “ख्रिश्‍चन आहोत असा दावा करणाऱ्‍या लोकांना बाह्‍यरुपाने प्रसिद्ध दिसणाऱ्‍या संघटना किंवा सरकार वा नियम यांना बदलविण्यास लावण्यापेक्षा त्याने लोकांनाच चांगले बनविले हा ख्रिश्‍चन धर्माचा खरा विजय होय.” मग, आज ख्रिश्‍चन लोकांनी काही वेगळे आचरण आचरावे का?

जेव्हा सरकार मदत देत नाही

२०, २१. (अ) एका प्रापंचिक अधिकाराने स्वतःला योग्य कामासाठी देवाचे सेवक नसल्याचे कसे दाखविले? (ब) राष्ट्राच्या गोंधळाने छळ आल्यास यहोवाच्या साक्षीदारांची कशी प्रतिक्रिया असावी?

२० मध्य आफ्रिकेतील एका देशात सप्टेंबर १९७२ ला यहोवाच्या साक्षीदारांचा छळ झाला. हजारोंना आपल्या मालकी वस्तु गमवाव्या लागल्या व त्यांना मारहाण, इजा तसेच हत्या यांचा अनुभव आला. अशावेळी वरिष्ट अधिकाऱ्‍यांनी साक्षीदारांना संरक्षण देण्यात आपले कर्तव्य केले का? नाही! उलटपक्षी, त्यांनी हिंसाचारास उत्तेजन दिले त्यामुळे या निरुपद्रवी ख्रिश्‍चनांना आपल्या सुरक्षिततेसाठी शेजारच्या देशात पळ काढावा लागला.

२१ मग, अशा या छळकर्त्यांविरूद्ध यहोवाच्या साक्षीदारांनी क्रोधाने उचल घ्यावयास नको का? नाही. ख्रिश्‍चनांनी हा छळ शांतपणे सहन केला पाहिजे व येशूचे उदाहरण नम्रपणे अनुसरले पाहिजे. “त्याची निंदा होत असता त्याने उलट निंदा केली नाही; दुःख भोगीत असता त्याने धमकावले नाही; तर यथार्थ न्याय करणाऱ्‍याकडे स्वतःला सोपवून दिले.” (१ पेत्र २:२३) त्यांना ठाऊक आहे की, येशूची गेथशेमाने बागेत अटक झाली असता, त्याच्या एका शिष्याने तरवारीचा उपयोग करून आपले समर्थन दाखविले तेव्हा येशूने त्याला दटावले होते; तसेच तो नंतर पंतय पिलाताला असेही म्हणाला होताः “माझे राज्य या जगाचे नव्हे; माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती, परंतु आता माझे राज्य येथले नाही.”—योहान १८:३६; मत्तय २६:५२; लूक २२:५०, ५१.

२२. आफ्रिकेतील काही साक्षीदारांनी अत्यंत कठीण छळात कोणते सुंदर उदाहरण राखले?

२२ येशूचे उदाहरण लक्षात ठेवूनच आफ्रिकेतील त्या साक्षीदारांना पौलाच्या या सूचनेचा अवलंब करण्याचे उत्तेजन मिळालेः “वाइटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व मनुष्यांच्या दृष्टीने जे सात्त्विक ते करण्याकडे लक्ष ठेवा. शक्य तर सर्व माणसांबरोबर तुम्हाकडून होईल तितके शांतीने राहा. प्रियजनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, ‘सूड घेणे मजकडे आहे; मी फेड करीन, असे यहोवा म्हणतो.’” (रोमकर १२:१७-१९; पडताळा इब्रीयांस १०:३२-३४.) आज आम्हा सर्वांसाठी आमचे आफ्रिकन बंधू केवढे उत्साहवर्धक उदाहरण असे आहेत! अधिकारी जरी सन्माननीयतेने वागण्याचे नाकारतील तरी खरे ख्रिश्‍चन पवित्र शास्त्रीय तत्त्वांना कधीही त्यागणार नाहीत.

२३. अजूनही कोणत्या प्रश्‍नांची चर्चा राहिली आहे?

२३ पण तेच, वरिष्ठ अधिकारी ख्रिश्‍चनांपासून कसली अपेक्षा धरतात? ते हक्काने मागणी करू शकतात अशा गोष्टींना काही मर्यादा आहेत का? या प्रश्‍नांविषयीची चर्चा आमच्या पुढील लेखात होईल.

[तळटीपा]

a प्राचीन इस्राएलात ईश्‍वरी प्रेरणेने देण्यात आलेल्या नियमशास्त्रात गंभीर पातकांसाठी मृत्युदंडाची शिक्षा होती.—निर्गम ३१:१४; लेवीय १८:२९; २०:२-६; गणना ३५:३०.

तुम्हाला विवेचीत करता येईल का?

◻ वरिष्ठ अधिकाऱ्‍यांच्या ‘अधिकाराला आड’ काही जण कसे येतात?

◻ सरकारी अधिकाऱ्‍यांच्या अनुषंगाने “देवाची व्यवस्था” काय आहे?

◻ “अधिकाऱ्‍याची भीती” ही कशाप्रकारे असू शकते?

◻ मानवी सरकारे “देवाचे सेवक” अशी कशी सेवा करतात?

[१९ पानावरील चौकट]

पोलिस प्रमुखांकडून आलेले पत्र

“मिनास गेरेस राज्याची लोकसेवा” ही मुद्रा असलेले पत्र वॉचटावर संस्थेच्या ब्राझिल शाखेला आले. ते काँक्वीस्टा या गावातील पोलिस प्रमुखांकडील होते. काही चुकीचे घडले होते का? ते पत्रालाच सांगू द्या. ते म्हणतेः

“प्रिय महाशय:

“या पत्राद्वारे तुम्हाला माझी ओळख प्रस्तुत करायला मला आनंद वाटत आहे. मी, मिनास गेरेस राज्याच्या काँक्वीस्टा या गावातील पोलिस प्रमुख आहे. मला येथे येऊन तीन वर्षे झाली. मी माझे काम नेहमी जाणीवपूर्वकतेने करतो. पण मला तुरुंगात शांती राखणे मोठ्या समस्येचे बनले होते. यातील कैद्यांना जरी काही कामाची तालीम देण्यात येत असे तरी ते चळवळ करीत.

“काही महिन्यापूर्वी सेन्हर ओ−−−− आमच्या गावात आले व त्यांनी आपली ओळख यहोवाचे साक्षीदार अशी दिली. त्यांनी काही कैद्यांना पवित्र शास्त्राचा प्रचार केला, त्यांना लिहायला-वाचायला शिकवले, आणि सर्वसाधारण आरोग्यविषयक सूचना दिल्या तसेच सामाजिक कला शिकवल्या. ते त्यांना पवित्र शास्त्रातूनही माहिती देत. या प्रचारकाने दिलेले शिक्षण पाहता त्यांच्याठायी समर्पण, प्रेम व स्वार्थत्याग दिसला. आमच्या कैद्यांमध्ये काही काळातच फरक दिसून आला व यामुळे बघणाऱ्‍या सर्वांनाच मोठे आश्‍चर्य व आत्मीयता वाटायला लागली.

“आमच्या तुरुंगात जे काही घडले गेले त्याविषयी मी वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीला त्यांच्या लायक प्रचारकाद्वारे समाजात जे चांगले काम केले गेले त्याविषयीचा आदर व्यक्‍त करीत आहोत.”

सरकारी अधिकाऱ्‍यांविषयी सांगताना प्रेषित पौलाने म्हटलेः “चांगले ते कर, म्हणजे त्याच्याकडून तुझी प्रशंसा होईल.” (रोमकर १३:३) हे वरील प्रकरणात खरेपणाने सत्य असल्याचे दिसले. अधिकारी वर्गाला जे कित्येक वर्षे करणे जमले नाही तेच सुवार्तेने काही महिन्यात केले, ही देवाचे वचन परिवर्तन घडवून आणू शकते याविषयीची केवढी प्रबळ साक्ष आहे!—स्तोत्रसंहिता १९:७-९.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा