वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w91 १/१ पृ. ११-१६
  • यहोवाचे भय धरुन चालत राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे भय धरुन चालत राहा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • शेवटपर्यंत विश्‍वासू
  • छळ सुवार्तेचा प्रसार करतो
  • छळ करणाऱ्‍याचे परिवर्तन होते
  • विदेशी विश्‍वास ठेवतात!
  • विदेशी मंडळीची स्थापना होते
  • छळ निष्फळ ठरतो
  • स्तेफन​—“देवाची कृपा आणि सामर्थ्य यांनी परिपूर्ण”
    देवाच्या राज्याबद्दल “अगदी पूर्णपणे साक्ष” द्या
  • तो “विश्‍वासाने आणि पवित्र शक्‍तीने परिपूर्ण” होता
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • स्तेफनाला दगडमार होतो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • वाचकांचे प्रश्‍न
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
w91 १/१ पृ. ११-१६

यहोवाचे भय धरुन चालत राहा

“[मंडळी] यहोवाच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता वाढत गेली.”—प्रे. कृत्ये ९:३१.

१, २. (अ) ख्रिस्ती मंडळ्यांनी शांतीसमयात प्रवेश केला तेव्हा काय घडले? (ब) यहोवा छळास अनुमती देत असला तरी काय करतो?

एका शिष्यावर खडतर परिक्षा ओढावली. तो देवाला आपली सचोटी टिकवून ठेवील का? होय, खरेपणाने! तो देवाचे भय बाळगून चालत होता, आपल्या निर्माणकर्त्याविषयी त्याला आदरयुक्‍त भय होते व यहोवाचा विश्‍वासू साक्षी म्हणून मरण्याचीही त्याची तयारी होती.

२ तो देवभिरु व सचोटीरक्षक स्तेफन होता. तो “विश्‍वासाने व पवित्र आत्म्याने पूर्ण असा पुरुष” होता. (प्रे. कृत्ये ६:५) त्याच्या वधामुळे छळाची लाट उसळली, पण त्यानंतर यहुदिया, गालीली आणि शमरोनातील मंडळ्या स्थिर झाल्या व त्यांची आध्यात्मिकदृष्ट्या उभारणी करण्यात आली. याशिवाय, त्या “यहोवाच्या भयात व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत असता” वाढत गेल्या. (प्रे. कृत्ये ९:३१) प्रेषितांची कृत्ये याच्या ६ ते १२ व्या अध्यायात दाखविल्याप्रमाणे यहोवाचे साक्षीदार या नात्याने आपल्याला देखील हा आत्मविश्‍वास बाळगता येईल की, आम्ही शांतीच्या काळात असलो किंवा छळाला तोंड देऊन असलो तरी देव आम्हास आशीर्वादित करील. यासाठीच, छळ होत असताना आपण देवाचे आदरयुक्‍त भय बाळगून राहू या; आणि छळ नसेल तेव्हाच्या शांतीमय काळाचा वापर आपली आध्यात्मिक वृद्धी तसेच देवाची सेवा अधिक क्रियाशीलपणे करण्यासाठी करू या. (अनुवाद ३२:११, १२; ३३:२७) (या तसेच यापुढील अग्रलेखांचा आपला व्यक्‍तीगत अभ्यास करताना आम्ही आपल्याला हे सुचवितो की, प्रे. कृत्ये या पुस्तकातील जी वचने ठळक अक्षरात दाखविण्यात आली आहेत ती तुम्ही काढून वाचावीत.)

शेवटपर्यंत विश्‍वासू

३. यरुशलेमात कोणती समस्या सोडवण्यात आली व कशी?

३ शांतीकाळात जरी काही समस्या सामोऱ्‍या आल्या तरी उत्तम संघटन त्यांना सोडवू शकतात. (६:१-७) यरुशलेमातील ग्रीक भाषिक यहुद्यांनी अशी तक्रार केली की, त्यांच्या विधवांकडे दुर्लक्ष होत आहे, त्यांना दिवसाचा आहार मिळत नाही, पण तेच इब्री बोलणाऱ्‍या यहुदी विश्‍वासधारकांना मात्र ते दिले जाते. प्रेषितांनी सात पुरुषांची नियुक्‍ती “ह्‍या कामावर” करुन ही समस्या मिटविली. यापैकी एक स्तेफन होता.

४. खोट्या दोषारोपाविषयी स्तेफनाने कशी प्रतिक्रिया दाखवली?

४ तथापि, या देवभिरु स्तेफनाला लवकरच परिक्षेचा सामना द्यावा लागला. (६:८-१५) काही लोकांनी स्तेफनाबरोबर वितंडवाद मांडला. यापैकीचे काही “लिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील” होते. हे कदाचित, रोमी लोकांनी पादाक्रांत केलेले व नंतर बंधमुक्‍त झालेले यहुदी असावेत, किंवा एकेकाळी दास असणारे, यहुदी धर्मात परिवर्तित झालेले लोक असावेत. स्तेफन ज्या ज्ञानाने व आत्म्याने बोलत होता त्यांना या लोकांना तोंड देता येईना; म्हणून त्यांनी स्तेफनाला सन्हेद्रीनपुढे आणले. लोकांनी बनावट साक्षीदार उभे करून त्यांना असे म्हणावयास लावलेः ‘आम्ही त्याला असे बोलताना ऐकले की, नासोरी येशू हे मंदिर मोडून टाकील आणि मोशेने आपल्याला लावून दिलेले परिपाठ बदलून टाकील.’ न्यायसभेत बसलेल्या लोकांना दिसले की स्तेफनाने काही चूक केली नव्हती, उलट त्याचे मुख देवदूताच्या म्हणजे देवाकडील संदेशवाहकासारखे दिसत होते, व त्याला देवाचा पाठिंबा असल्याचे भासत होते. पण तेच विरोधकांचे स्वरुप केवढे वेगळे होते! त्यांनी सैतानाला वश केल्यामुळे त्यांचे चेहरे दुष्टतेने भारावून गेले होते!

५. स्तेफनाने साक्ष देताना कोणकोणते मुद्दे सांगितले?

५ प्रमुख याजक कयफा याने विचारणा केली तेव्हा स्तेफनाने निर्भिड साक्ष दिली. (७:१-५३) त्याने इस्राएलाच्या इतिहासाच्या केलेल्या उजळणीने दाखविले की, मशीहाचे आगमन झाल्यावर नियमशास्त्र आणि मंदिर सेवा रद्द करावी हा देवाचा उद्देश होता. स्तेफनाने याकडे लक्ष वेधविले की, ज्याचा प्रत्येक यहुदी सन्मान करतात त्या मोशेला देखील इस्राएलांनी नाकारले व आताही त्यांनी मोठी मुक्‍तता घडवून आणणाऱ्‍या येशूचा स्वीकार केला नाही. देव हातांनी बांधलेल्या मंदिरात राहात नाही असे म्हणण्याद्वारे स्तेफनाने दाखविले की, मंदिर व त्यातील उपासनेची व्यवस्था संपुष्टात येईल. पण न्यायसभेत बसलेले न्यायाधीश देवाची भीती बाळगीत नव्हते आणि त्याची इच्छा जाणू इच्छित नसल्यामुळे स्तेफन म्हणालाः ‘अहो, ताठ मानेच्या लोकांनो, तुम्ही पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता. ज्याचा छळ तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा कोणी संदेष्टा आहे का? ज्यांनी त्या नीतीमान पुरुषाच्या आगमनाविषयी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; त्या नीतीमान पुरुषाला आता तुम्ही धरुन दिले व जिवे मारले.’

६. (अ) आपल्या मरणाआधी स्तेफनाला विश्‍वासास बळकट करणारा कोणता अनुभव आला? (ब) “हे प्रभु येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर,” असे स्तेफन का उचितपणे म्हणू शकला?

६ स्तेफनाने अगदी निर्भिडपणे आपले बोलणे केल्यामुळे त्याचा वध झाला. (७:५४-६०) न्यायाधिशांनी येशूचा मृत्यु केल्याचा दोष उघड केल्यामुळे ते अतिशय संतापले. पण स्तेफनाच्या बाबतीत पाहता, त्याला ‘आकाश उघडलेले व देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला’ बघून त्याचा विश्‍वास किती बळकट झाला! आपण देवाच्या इच्छेप्रमाणेची कृती आचरली आहे याचा आत्मविश्‍वास वाटून स्तेफनाला आपल्या शत्रूंना तोंड देण्याचे बळ आले. आज यहोवाच्या साक्षीदारांना जरी दृष्टांत घडत नसले तरी छळ होतो तेव्हा आमचे चित्तही असेच प्रसन्‍न असते. स्तेफनाला यरुशलेमाबाहेर घालवून दिल्यावर त्याच्या शत्रूंनी त्याला धोंडमार सुरु केला तेव्हा स्तेफन धावा करुन म्हणालाः “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” हे योग्यच होते, कारण देवाने येशूला लोकांना पुनरुत्थानाद्वारे जीवन बहाल करण्याचा अधिकार दिला होता. (योहान ५:२६; ६:४०; ११:२५, २६) मग, गुडघ्यावर टेकून स्तेफन मोठ्याने ओरडलाः “हे यहोवा, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” मग, तो खाली कोसळून मरण पावला. त्याला हुतात्मिक मरण आले. असेच मरण यानंतर येशूच्या पुष्कळ अनुयायांना आले व ते आज आधुनिक काळातही येत आहे.

छळ सुवार्तेचा प्रसार करतो

७. छळाचा काय परिणाम दिसला?

७ स्तेफनाच्या मरणामुळे प्रत्यक्षात सुवार्तेचा प्रसार घडून आला. (८:१-४) छळामुळे प्रेषितांखेरीज इतर सर्व यहुदिया व शोमरोन येथे पांगले. स्तेफनाच्या वधाला मान्यता देणाऱ्‍या शौलाने मंडळीचा पशूप्रमाणे छळ चालविला. तो येशूच्या अनुयायांना धरून बंदिशाळेत टाकण्यासाठी घरोघर त्यांना शोधून काढू लागला. पांगलेले शिष्य प्रचार करीत राहिल्यामुळे सैतानाचा डाव जो की, छळ आणून देवभिरु राज्य घोषकांचे काम बंद पाडावे, हा पूर्णपणे फसला. आजही छळ सुवार्तेचा प्रसार करण्यास किंवा राज्य प्रचाराच्या कार्याकडे लोकांचे लक्ष वेधविण्यास मदत देतो.

८. (अ) शोमरोनात प्रचारकार्य घडल्यामुळे कोणता परिणाम दिसला? (ब) येशूने सोपविलेल्या दुसऱ्‍या किल्लीचा वापर पेत्राने कसा केला?

८ सुवार्तिक फिलिप्प शोमरोन शहरी गेला व तेथे त्याने “ख्रिस्ताची घोषणा केली.” (८:५-२५) सुवार्तेची घोषणा झाली, वाईट आत्मे घालवून देण्यात आले व लोकांना बरे करण्यात आल्यामुळे त्या शहरात आनंदीआनंद झाला. यरुशलेमातील प्रेषितांनी पेत्र व योहान यांना शोमरोनात पाठविले व यांनी प्रार्थना करून ज्यांचा बाप्तिस्मा झाला त्यांच्यावर हात ठेवले तेव्हा या नव्या शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला. एक पूर्वीचा जादूगार व आता नव्यानेच बाप्तिस्मा झालेला शिमोन याने प्रेषितांचा हा हक्क त्यांना पैसे देऊन स्वतःसाठी मिळविण्याचा यत्न केला. पण पेत्र त्याला म्हणालाः ‘तुझ्या रुप्याचा तुझ्याबरोबर नाश होवो. तुझे अंतःकरण देवाच्या दृष्टीने नीट नाही.’ त्याला पश्‍चाताप करण्याचे व देवाकडे क्षमेची याचना करण्याचे सांगितले गेले. त्याने प्रेषितांना त्याच्याखातर प्रार्थना करण्याची विनवणी केली. या गोष्टीने, आज यहोवाचे भय मानणाऱ्‍या सर्वांनी आपले अंतःकरण सुरक्षित राखावे यासाठी ईश्‍वरी मदतीकरता प्रार्थना केली पाहिजे. (नीतीसूत्रे ४:२३) (या घटनेमुळेच इंग्रजीत “सिमनी” हा शब्द रुढ झाला, ज्याचा अर्थ आहे, “एखादा चर्च हुद्दा वा मंडळीतील मानाची जागा विकत घेणे वा विकणे.”) पेत्र व योहानाने शोमरोनच्या कित्येक खेड्यात सुवार्तेची घोषणा केली. अशाप्रकारे पेत्राने स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळवून देणाऱ्‍या ज्ञानाच्या व संधीच्या दुसऱ्‍या किल्लीचा वापर केला.—मत्तय १६:१९.

९. फिलिप्पाने ज्याला सुवार्ता सांगितली तो कुशी कोण होता, व त्याचा बाप्तिस्मा का होऊ शकला?

९ यानंतर देवाच्या दूताने फिलिप्पाला एक नवीन नेमणूक दिली. (८:२६-४०) यरुशलेमापासून ते गज्जाकडे जाणाऱ्‍या वाटेवरुन एका रथात “एक कुशी” इथोपियाची राणी कांदके हिचा खजिनदार, चालला होता. तो शारीरिकदृष्ट्या षंढ नव्हता, कारण अशा लोकांना यहुदी मंडळीपासून दूर राखण्यात येत असे. हा कुशी सुंता झालेला परिवर्तित या नात्याने यरुशलेमात भक्‍तीसाठी गेला होता. (अनुवाद २३:१) तो यशयाचे पुस्तक वाचत आहे असे फिलिप्पला आढळले. त्याला रथात येण्याचे निमंत्रण मिळाल्यावर फिलिप्पाने यशयाच्या भविष्यवादाची चर्चा करून त्याला “येशूविषयीची सुवार्ता सांगितली.” (यशया ५३:७, ८) लगेच तो कुशी म्हणालाः “पाहा हे पाणी; मला बाप्तिस्मा घेण्यास काय हरकत आहे?” त्याला देवाविषयीची माहिती होती व आता त्याचा ख्रिस्तावर विश्‍वास बसल्यामुळे काहीही हरकत नव्हती. त्यामुळे फिलिप्पाने त्या कुशीला बाप्तिस्मा दिला; मग तो कुशी आनंदाने मार्गस्थ झाला. तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यास काही हरकत आहे का?

छळ करणाऱ्‍याचे परिवर्तन होते

१०, ११. दिमिष्काकडे जाणाऱ्‍या वाटेवर तार्ससच्या शौलाच्या बाबतीत काय घडले, व त्यानंतर काही काळात काय झाले?

१० दरम्यानच्या काळात शौल येशूच्या अनुयायांना तुरुंगवासाची किंवा ठार मारण्याची धमकी देऊन त्यांचा विश्‍वास नाकारायला लावण्याचा प्रयत्न करीत होता. (९:१-१८अ) प्रमुख याजकाने (जो बहुधा कयफा असावा) त्याला दिमिष्कातील सभास्थानाची पत्रे दिली आणि जो कोणी “तो मार्ग” म्हणजे ख्रिस्ताच्या उदाहरणास अनुलक्षून आपले जीवन जगत होता अशा स्त्री-पुरुषांना धरुन यरुशलेमात आणण्याची त्याला नेमणूक दिली गेली. दिमिष्काजवळ येताना भर दुपारी एकाएकी आकाशातून प्रकाश चमकला व अशी वाणी झाली: “शौला, शौला, माझा छळ का करितोस?” शौलाबरोबर जे होते त्यांनी “वाणी ऐकली खरी,” पण त्याचा अर्थ त्यांना समजू शकला नाही. (पडताळा प्रे. कृत्ये २२:६, ९.) वैभवी येशू ख्रिस्ताचे हे जे अंशतः दर्शन घडले गेले ते शौलास अंधळे बनविण्यास पुरेसे होते. मग, देवाने हनन्या या शिष्याद्वारे शौलाला त्याची दृष्टी परत मिळवून दिली.

११ अशा या छळ करणाऱ्‍या शौलाचा बाप्तिस्मा झाला व मग तोच स्वतः छळाचे निशाण बनला. (९:१८ब-२५) दिमिष्कातील यहुद्यांनी शौलाला ठार करण्याचा बेत रचला. परंतु शिष्यांनी रात्रीच्या वेळी त्याला पाटीत घालून, (जी बहुधा दोरखंडाने विणलेली पाटी असावी) गावकुसावरून खाली उतरविले. (२ करिंथकर ११:३२, ३३) जेथून तो उतरला ती जागा गावकुसावर असलेले कोणा शिष्याचे घर असावे. हा काही, शत्रूमधून निसटून जाऊन प्रचार करीत राहण्यासाठी भ्याडपणाचा प्रयत्न नव्हता.

१२. (अ) शौलाला यरुशलेमात काय झाले? (ब) मंडळ्यांच्या बाबतीत काय घडले?

१२ शौलाचा एक समविश्‍वासू या नात्याने स्वीकार केला जावा म्हणून यरूशलेमात बर्णबाने मदत दिली. (९:२६-३१) येथे शौल ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या यहुद्यांसोबत निर्भिडपणे बोलला, पण पुन्हा यहुद्यांनी त्याला ठार मारण्याचा बेत केला. हे बघून बंधूजनांनी त्याला कैसरियात नेले व तेथून किलिकियामध्ये त्याच्या तार्सस या गावी पाठविले. यानंतर यहुदिया, गालील व शोमरोन येथील मंडळ्यांना ‘स्वस्थता मिळाली व त्यांची आध्यात्मिकदृष्ट्या उन्‍नति झाली.’ त्या ‘यहोवाचे भय व पवित्र आत्म्याच्या समाधानात चालत राहिल्या’ तेव्हा ‘वाढत गेल्या.’ मंडळयांना यहोवाचा आशीर्वाद मिळवावयाचा आहे तर मग त्यांच्यासाठी आज हे किती चांगले उदाहरण आहे!

विदेशी विश्‍वास ठेवतात!

१३. देवाने पेत्राला लोद व यापो येथे कोणकोणते चमत्कार करण्यास समर्थ केले?

१३ पेत्र देखील आपल्या कार्यात मग्न होता. (९:३२-४३) शारोनच्या तळवटीमधील लोद येथे त्याने ऐनेयास नावाच्या एका पक्षघाती मनुष्यास बरे केले. या अद्‌भुत चमत्कारामुळे पुष्कळजण प्रभूकडे वळाले. यापो येथे एक प्रिय शिष्या टबीथा (दुर्कस) ही आजारी पडली व वारली. पेत्र तेथे आल्यावर शोक करणाऱ्‍या विधवांनी त्याला दुर्कसने बनविलेले अंगरखे व वस्त्रे, जी कदाचित त्यांनी परिधान केली असावीत ती दाखविली. पेत्राने दुर्कसला परत जिवंत केले, आणि ही बातमी जेव्हा सर्वत्र पसरली तेव्हा पुष्कळ जणांनी विश्‍वास ठेवला. पेत्र यापोमध्ये शिमोन नावाच्या कातडे कमविणाऱ्‍या माणसाकडे राहिला. याचे घर समुद्रालगत होते. हे कातडे कमविणारे जनावरांचे कातडे समुद्राच्या पाण्यात भिजवून ठेवीत व त्यावरील केस काढण्याआधी त्यावर चुना लावीत. मग ते कातडे विशिष्ट वनस्पतीच्या द्रवाने कमवून त्याचे परिवर्तन चामड्यात करीत असत.

१४. (अ) कर्नेल्य कोण होता? (ब) कर्नेल्यच्या प्रार्थनांच्या बाबतीत काय झाले?

१४ याच वेळेला (इ. स. ३६) एक आणखी लक्षवेधी घटना घडली. (१०:१-८) कैसरिया येथे एक भक्‍तीमान विदेशी कर्नेल्य माणूस राहात होता. हा शंभर लोकांवर रोमी अधिकारी होता. तो “इटलिक म्हटलेल्या पलटणीत” होता. ही पलटण रोमी नागरिक तसेच इटलीतील रहिवाशी यांच्यामधून भरती झालेल्या लोकांची असावी. कर्नेल्य देवाचे भय बाळगत होता, पण तो यहुदी धर्मात परिवर्तित झालेला नव्हता. एका दृष्टांतात दिव्यदूताने त्याला सांगितले की, त्याच्या प्रार्थना “देवासमोर स्मरणार्थ आल्या आहेत.” कर्नेल्य त्यावेळी यहोवास समर्पित असणारा असा नव्हता तरी त्याच्या प्रार्थनेला उत्तर मिळाले. पण दिव्यदूताने सांगितले त्याप्रमाणे त्याने पेत्राला बोलावणे पाठविले.

१५. शिमोनाच्या घरी धाब्यावर पेत्र प्रार्थना करीत असता काय घडले?

१५ शिमोनाच्या घरी धाब्यावर प्रार्थना करीत असता पेत्राला दृष्टांत झाला. (१०:९-२३) गुंगीत असताना त्याने आकाशातून चांदव्यासारखे चार कोपरे धरून सोडलेले एक पात्र येत असल्याचे व त्यात चार पायाचे, सरपटणारे व पक्षी यातले सर्व अशुद्ध प्राणी आहेत असे पाहिले. त्याला म्हटले गेले की ते त्याने मारुन खावे, पण पेत्र म्हणाला की त्याने अशुद्ध गोष्टींचे कधी सेवन केले नाही. “देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नकोस,” असे त्याला सांगण्यात आले. या दृष्टांतामुळे पेत्राला मोठे आश्‍चर्य वाटले, पण त्याने आत्म्याचे मार्गदर्शन अनुसरले. त्यानुसार, तो सहा यहुदी शिष्यांसोबत मिळून कर्नेल्यकडून आलेल्या माणसांसोबत गेला.—प्रे. कृत्ये ११:१२.

१६, १७. (अ) पेत्राने कर्नेल्य तसेच त्याच्या घरी जमलेल्या लोकांना काय सांगितले? (ब) पेत्र बोलत आहे तोच काय घडले?

१६ आता प्रथम विदेश्‍यांची सुवार्ता ऐकण्याची पाळी होती. (१०:२४-४३) पेत्र व त्याचे सहकारी कैसरियात आल्यावर कर्नेल्य आपले नातेवाईक तसेच मित्रांसोबत त्यांची वाट पाहत असल्याचे पेत्राला आढळले. कर्नेल्याने पेत्राला दंडवत घातला, पण प्रेषिताने तो नम्रपणे स्वीकारण्याचे नाकारले. त्याने तेथे, यहोवाने येशूचा पवित्र आत्म्याने व सामर्थ्याने मशीहा बनण्यासाठी कसा अभिषेक केला ते सांगितले व म्हटले की, जो कोणी त्याच्यावर विश्‍वास ठेवतो त्याच्या पापांची क्षमा होते.

१७ आता यहोवाने कार्य घडविले. (१०:४४-४८) पेत्र बोलत आहे तोच देवाने आपला पवित्र आत्मा त्या विश्‍वासधारी विदेश्‍यांवर पाठवला. त्याचवेळी, तेथेच त्यांचा देवाचा पवित्र आत्म्याने जन्म घडविण्यात आला व ते विदेशी भाषा बोलू लागले व देवाचे गौरव करू लागले. या कारणास्तव त्यांचा येशू ख्रिस्ताचा नामात बाप्तिस्मा करण्यात आला. अशाप्रकारे पेत्राने येथे तिसऱ्‍या किल्लीचा वापर, देवभिरु विदेश्‍यांना ज्ञान तसेच स्वर्गीय राज्यात प्रवेश मिळविण्याच्या संधीचे द्वार उघडण्यासाठी केला.—मत्तय १६:१९.

१८. विदेश्‍यांचा “पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा” झाला आहे असे पेत्राने म्हटले त्यावेळी यहुदी बांधवांनी कोणता प्रतिसाद दाखविला?

१८ नंतर, यरुशलेमात पेत्राला सुंतेचे समर्थन करणाऱ्‍या लोकांचा सामना करावा लागला. (११:१-१८) पण जेव्हा, पेत्राने विदेश्‍यांचा “पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा” झाला आहे असे सांगितले तेव्हा ते यहुदी बांधव उगे झाले व त्यांनी देवाचे गौरव करून म्हटलेः “तर मग, देवाने परराष्ट्रयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्‍चातापबुद्धी दिली आहे.” याचप्रमाणे, जेव्हा ईश्‍वरी इच्छा काय आहे ते प्रकट होते तेव्हा आम्हीही आपली आस्था दाखवावयास हवी.

विदेशी मंडळीची स्थापना होते

१९. शिष्यांना ख्रिस्ती हे नाव कसे मिळाले?

१९ आता पहिल्या विदेशी मंडळीची स्थापना झाली. (११:१९-२६) स्तेफनामुळे जो छळ उद्‌भवला होता त्यामुळे शिष्यांपैकी काही अंत्युखिया व कुप्र या अशुद्ध उपासना व नैतिक भ्रष्टतेविषयी प्रसिद्ध असणाऱ्‍या शहरापर्यंत पसरले. तेथील ग्रीक भाषा बोलणाऱ्‍या लोकांना यांनी सुवार्ता सांगितली तेव्हा “यहोवाचा हात त्यांच्याबरोबर होता,” त्यामुळे बऱ्‍याच जणांनी विश्‍वास ठेवला. बर्णबा व शौल यांनी तेथे एक वर्षभर शिक्षण दिले, आणि “शिष्यांना ईश्‍वरी मान्यतेने ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युखियात मिळाले.” त्यांना अशा नावाने संबोधावे हे यहोवाने निश्‍चितपणे मार्गदर्शित केले असावे, कारण ख्रे·मॅ·टायʹझो या ग्रीक शब्दाचा अर्थ “ईश्‍वरी मान्यतेद्वारे संबोधणे” असा होतो आणि ही संज्ञा जेव्हा देवाकडील काही गोष्टीचा निर्देश केला जातो तेव्हा शास्त्रवचनीय दृष्ट्या वापरण्यात येते.

२०. अगबने काय भाकित केले, आणि अंत्युखिया मंडळीने कसा प्रतिसाद दाखविला?

२० यरुशलेमातून देवभिरु संदेष्टे अंत्युखियात आले. (११:२७-३०) यापैकी अगब हा एक होता. त्याने “आत्म्याच्या योगे सुचविले की, सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे.” हे भाकित रोमी अधिपती क्लौद्य याच्या काळी पूर्ण झाले. (इ. स. ४१-५४) इतिहासकार जोसेफस या “मोठ्या दुष्काळा”चा उल्लेख करतो. (ज्युईश अँटिक्वीटीज्‌, २०, ५१ [२, ५]; २०, १०१ [वचन २]) अंत्युखियाच्या मंडळीने प्रेमाने भारावून यहुदीयातील आपल्या गरजवंत बांधवांसाठी दान पाठविले.—योहान १३:३५.

छळ निष्फळ ठरतो

२१. हेरोद अग्रिपा १ला याने पेत्राविरुद्ध कोणती कृती केली, पण काय परिणाम झाला?

२१ हेरोद अग्रिपा १ला याने यरुशलेमातील यहोवाच्या उपासकांवर छळ आणला तेव्हा शांतीचा काळ संपला. (१२:१-११) हेरोदाने याकोबाचा तरवारीने शिरच्छेद केला. हा हुतात्मिक मरण आलेल्यातील पहिला प्रेषित आहे. यामुळे यहुद्यांना संतोष झाला आहे हे बघून त्याने पेत्राला तुरुंगात टाकले. या प्रेषिताला दोन शिपायांच्या मध्ये साखळदंडाने जखडण्यात आले व बाहेर दोन रक्षक ठेवण्यात आले. हेरोदाने यालाही वल्हांडण सण व बेखमीर भाकरीच्या दिवसानंतर (निसान १४-२१) ठार करण्याचा बेत केला. पण मंडळी त्याच्यासाठी जी सातत्याने प्रार्थना करीत राहिली ती वेळेवर ऐकण्यात आली. हेच आमच्या दिवसात देखील घडते. देवाने आपला दूत पाठवून पेत्राची अद्‌भुत रितीने सुटका करून ते उत्तर दिले.

२२. पेत्र मार्कची आई मरीया हिच्या घरी गेला तेव्हा काय घडले?

२२ पेत्र लगेच मरीया (योहान मार्क याची आई) हिच्या घरी गेला. हे नक्की ख्रिस्ती सभेचे ठिकाण असावे. (१२:१२-१९) अंधारात रुदा नावाच्या सेवा करणाऱ्‍या मुलीने पेत्राचा आवाज ऐकला, पण तिने फाटक उघडले नाही. पहिल्यांदा शिष्यांना वाटले की, देवाने पेत्राचे प्रतिनिधित्व करणारा व त्याच्या आवाजात बोलणारा संदेशवाहक दूत पाठवला असावा. पण जेव्हा त्यांनी पेत्राला आत घेतले तेव्हा आपली झालेली सुटका याकोब व इतर बंधुजनांना (बहुतेक वडीलांना) कळवण्यास त्यांना सांगितले. नंतर तो निघून भूमिगत राहिला ते अशासाठी की, धरपकड होऊन तो किंवा इतर कोणी पुन्हा संकटात सापडू नयेत. हेरोद पेत्राचा शोध करीत राहिला पण ते सर्व व्यर्थ गेले. यामुळे रक्षकांना शिक्षा, कदाचित, मरणदंडाची मिळाली असावी.

२३. हेरोद अग्रिपा १ ची कारकीर्द कशी संपुष्टात आली, आणि यापासून आम्ही काय शिकू शकतो?

२३ इ. स. ४४ मध्ये, हेरोद अग्रिपा ५४ वर्षांचा असताना त्याची कारकीर्द कैसरियामध्ये एकाएकी संपली. (१२:२०-२५) तो सोर व सीदोनच्या लोकांबरोबर लढण्याचा विचार करीत होता तेव्हा या लोकांनी त्याचा सेवक ब्लस्त याला लाच देऊन हेरोदासमोर विचारविनिमय करण्याची व्यवस्था करावयास लावले. येथे त्यांचा शांतीतह करण्याचा विचार होता. “नेमलेल्या दिवशी” (जो क्लौद्य कैसराचा सन्मान करण्याचा सण होता) हेरोदाने आपली राजवस्त्रे परिधान केली, तो न्यायासनावर बसला आणि जाहीर भाषण देऊ लागला. याच्या प्रतिसादात लोकांनी गजर केलाः “ही देववाणी आहे, मनुष्यवाणी नव्हे.” तेव्हाच यहोवाच्या दूताने त्याच्यावर प्रहार केला, कारण “त्याने देवाला गौरव दिले नाही.” हेरोद “किडे पडून मेला.” हे इशारा देणारे उदाहरण आम्हाला यहोवाचे भय बाळगण्याचे, गर्व टाळण्याचे आणि त्याला, आम्ही जे त्याचे लोक या नात्याने करतो त्याविषयी गौरव देण्याचे सतत स्मरण देत राहो.

२४. पुढील लेख अधिक वाढीसंबंधाने काय दाखवील?

२४ हेरोदाने छळ केला तरीही, “यहोवाच्या वचनाची वृद्धी व प्रसार होत गेला.” खरे म्हणजे, पुढील लेखात आपल्याला दिसेलच त्याप्रमाणे शिष्य अधिक वाढ होण्याची अपेक्षा करू शकत होते. ते का? कारण ते ‘यहोवाच्या भयात चालत होते.’

तुमचा कोणता प्रतिसाद असेल?

◻ स्तेफनाने आपणाठायी यहोवाचे भय आहे हे कसे दाखविले; ज्याचे इतरांनीही नंतर अनुकरण केले?

◻ स्तेफनाच्या मृत्युमुळे राज्य-प्रचाराच्या कामावर कोणता परिणाम झाला, आणि याची आजच्या काळी काही समांतरता आहे का?

◻ छळ करणारा तार्ससचा शौल हा यहोवाचे भय धरणारा कसा बनला?

◻ विश्‍वास ग्रहण करणारे पहिले विदेशी कोण होते?

◻ छळ यहोवाचे भय मानणाऱ्‍या लोकांना थांबवू शकत नाही हे प्रे. कृत्ये याचा १२ वा अध्याय कसे दाखवितो?

[१२ पानांवरील चित्रं]

आकाशातून प्रकाश चमकला व अशी वाणी झाली: “शौला, शौला, माझा छळ का करितोस?”

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा