देवाचा चांगुलपणा तुम्हाला आकर्षित करतो का?
तुम्हाला अगदी जवळचा मित्र आहे का? जर आहे तर मग कोणत्या गोष्टीमुळे तुम्ही त्या व्यक्तीकडे आकर्षित झाला आहात याचा कधी विचार केला आहे का? ते त्याच्या (किंवा तिच्या) देखणेपणामुळे झाले का? एकच आवडनिवड असल्यामुळे ते घडले का? किंवा दयाळूपणा वा सूज्ञान यासारख्या महत्त्वपूर्ण गुणांमुळे ते झाले? तुमच्या मैत्रीची भक्कम उभारणी चांगुलपणा या गुणावर झाली असेल तर मग तुमचे नातेसंबंध खरोखरच सुदृढ आहेत असे म्हणावे लागेल. आजच्या काळात अस्सल स्वरुपाचा चांगुलपणा क्वचितच आढळतो; कारण बहुतेक भागात “चांगल्यावर प्रेम न बाळगणारे” लोक आढळून येतात.—२ तीमथ्य ३:३.
ख्रिस्ती व्यक्तीकरता सर्वात महत्त्वाचा नातेसंबंध मनुष्याशी नव्हे तर देवाशी असणारा आहे. जेव्हा तुम्हाला या नातेसंबंधाविषयी विचार येतो तेव्हा, ‘देवाचे कोणते चांगले गुण मला त्याच्याकडे आकर्षित करतात?’ याचा कधी विचार आला होता का?
देवाचे प्रमुख गुण
तसे पाहता, पवित्र शास्त्र देवाच्या पुष्कळ विशेष गुणांचे वर्णन करते. परंतु, जे चार गुण ठळकपणे मांडले जातात ते आहेत, त्याची प्रीती, त्याचा न्याय, त्याचे सूज्ञान व त्याचे बलशाली सामर्थ्य. (अनुवाद ३२:४; ईयोब १२:१३; स्तोत्रसंहिता १४७:५; १ योहान ४:८) या चार विशेष गुणांतील निवड जर आपल्याला करायची असती तर आपण म्हणालो असतो की, देवाच्या प्रीतीनेच आम्हाला अधिकपणे आकर्षित केले आहे. या प्रीतीशी अनुबंधित असणारा त्याचा आणखी एक गुण म्हणजे त्याचा चांगुलपणा. पवित्र शास्त्राच्या लेखकांनी याविषयी वक्तृत्वपूर्ण रितीने लिहिले आहे; असा हा चांगुलपणा मानवाला त्याच्या निर्मात्यासोबत सुदृढ व सुखावह नातेसंबंध प्रस्थापित करण्यामध्ये जवळ आणतो.
उदाहरणार्थ, इ. स. पूर्वीच्या सहाव्या शतकात जखर्या संदेष्ट्याने यहोवाविषयी पुढील उद्गार काढलेः “त्याची आबादानी (चांगुलता) केवढी! त्याचे सौंदर्य केवढे!” (जखर्या ९:१७) जखर्याच्या पुष्कळ वर्षे आधी यशयानेही याच पद्धतीने देवाची स्तुती करताना म्हटलेः “यहोवाने . . . आपल्या दयेने व आपल्या विपुल करुणेने इस्राएलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यांस अनुरूप . . . मी . . . त्याचे गुणानुवाद गाईन.”—यशया ६३:७.
तीन शतके आधी दावीद राजाने अंतःकरण हेलावून टाकणाऱ्या पद्धतीने देवाच्या चांगुलपणाविषयी लिखाण केले. सर्व आयुष्यभर या चांगुलपणाचा उपभोग घेऊन त्याने ते स्वानुभवाने लिहिले. दाविदाने बथशेबा व तिचा पती उरीया यांजसंबंधाने गंभीर पातक केल्यानंतर देवाने त्याच्यावर जी दया दाखवली, त्यांच्यानंतर देवाने त्याला अत्यंत चांगुलपणाने वागविले. (२ शमुवेल १२:९, १३) या कारणास्तव, दाविदाने स्तोत्रसंहिता ३१:१९ मध्ये आपली कृतज्ञता व्यक्त करून म्हटलेः “तुझे चांगुलपण किती थोर आहे! तुझे भय धरणाऱ्यांकरिता तू ते साठवून ठेवले आहेस.”
देवाच्या चांगुलपणाला त्या प्राचीन काळच्या उपासकांनी जी किंमत दिली तशी तुम्हीही देता का? तर मग, तुम्हाला “सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलिकडे असलेली देवाची शांती” हिचा अनुभव येईल आणि देवाच्या इच्छेनुसार सतत कृती करण्याकडे तुमचा कल राहील. (फिलिप्पैकर ४:७) आता आपण, देवाचे हे चांगुलपण कशाकशात समाविष्ट आहे व त्याचे क्षेत्र किती विस्तृत आहे याविषयी विचार करू या. यामुळे आपल्या प्रेमळ स्वर्गीय पित्याबद्दल आम्हाला वाटत असलेली गुणग्राहकता अधिकच खोलवर रुजवली जाईल.