देवाच्या चांगुलपणाचा आश्चर्यकारक विस्तार
देव चांगला आहे! हे विधान तुम्ही किती वेळा ऐकले आहे किंवा किती वेळा तुम्ही ते स्वतःच वापरले आहे? पण तुम्ही स्वतः देवाच्या चांगुलपणाच्या पूर्ण विस्ताराविषयी कधी मनन केले आहे का? असे मनन, आपण ज्या देवाची उपासना करीत आहोत त्याजविषयी आपली गुणग्राहकता अधिकच वाढवते.
प्रथमतः आपल्याला चांगुलपणा म्हणजे काय याची समज होणे जरुरीचे आहे. अर्थात, चांगुलपणा म्हणजे चांगले असणे व वाईट त्याचा द्वेष करणे हा याचा अर्थ आहे. पण चांगुलपणात आणखी काही समाविष्ट आहे. तो क्रियाशील गुण आहे. चांगली व्यक्ती चांगलेच करते. वस्तुतः देव आपल्या चांगुलपणामुळे आम्हासाठी इतकी चांगली कृत्ये करतो की त्याच्याविषयी आपले अंतःकरण उचंबळून येते.
देवाने सिनायच्या अरण्यात मोशेसोबत जे भाष्य केले त्यामध्ये त्याच्या चांगुलपणाचे व्यापक रुप दिसून येते. तेथे त्याने आपल्या विश्वासू सेवकाला हे अभिवचन दिलेः “मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन.” आपले हे अभिवचन पूर्ण करून तसेच स्वतःच्या नावाचा वापर करून देव पुढे म्हणालाः “यहोवा, यहोवा, दयाळू व कृपाळू देव, मंदक्रोध, दयेचा व सत्याचा सागर, हजारो जणांवर दया करणारा, अन्याय, अपराध व पाप ह्यांची क्षमा करणारा, पण अपराधाची शिक्षा देण्यात मुळीच गय न करणारा.”—निर्गम ३३:१९; ३४:६, ७.
तेव्हा देवाच्या चांगुलपणामध्ये त्याची कृपा, त्याचा दयाळूपणा, त्याची प्रेमळ उदारता व त्याचे सत्य या गोष्टींचा समावेश होतो. यापेक्षा अधिक म्हणजे, त्याच्या चांगुलपणात तो “मंदक्रोध,” सहनशील आहे हेही दिसून येते. पण याचा अर्थ असा नाही की, तो फाजील लाड करणाऱ्या पालकांप्रमाणे आहे की जे दुष्कृत्यांवर आळा न घालता ती चालू राहू देतात. तो पश्चाताप न करणाऱ्या पाप्यांच्या “अपराधाची शिक्षा देण्यात मुळीच गय न करणारा” असा आहे. चांगला देव दुष्टाईला अनिर्बंधितपणे सोडत नाही.
देवाच्या चांगुलपणाची मुबलकता
देवाने आपला चांगुलपणा कोणकोणत्या मार्गांनी दर्शविला आहे ते जरा विचारात घ्या. सुरवातीलाच जेव्हा त्याने पृथ्वीची घडण केली तेव्हा तो मानवासोबत चांगला होता. त्याने मानवी-जीवनाला उपयुक्त असणाऱ्या गोष्टीच केवळ पुरविल्या नाहीत. तर त्याने या ग्रहाला असे बनवले की, यावर जीवन व्यतित करणे हा खराच आनंद आहे असे वाटू लागेल. त्याने वेगवेगळ्या प्रकारचे अन्न व द्रव पदार्थ पुरविले. त्याने प्राणी व पक्षी यात आकर्षक विविधता घडवली होती. त्याने फुलेही निर्माण केली की ज्यामुळे सभोवतालच्या परिसरात रंगत व सौंदर्य यांची भर पडली. याखेरीज, त्याने विविध रुपात सृष्टीसौंदर्यही दिले की जे बघून आमच्या डोळ्यांना आनंद व मनाला मंत्रमुग्धता येते. दर वेळी आम्ही भव्य सूर्यास्त बघतो किंवा विशाल मेघाचे आच्छादन पाहतो तेव्हा तो देवाच्या चांगुलपणाचा आम्हासाठी पुरावाच असतो!
त्याने पुरुष व स्त्रीची निर्मिती केली तेव्हा परत एकदा त्याचा चांगुलपणा दिसला. त्याने आदाम व हव्वेला परिपूर्ण, सुदृढ शरीरे बहाल केली व त्यांना एदेन बागेत ठेवले. नंतर त्याने त्यांना शहारविणारा पण आव्हानदायक कार्यभाग सोपवलाः “पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेत आणा.” अशाप्रकारे त्याने त्यांच्यापुढे त्यांच्या कित्येक संतानांमध्ये राहून नंदनवनमय पृथ्वीतील चिरकालिक जीवनाचे भवितव्य सामोरे ठेवले. (उत्पत्ती १:२६-२८; २:७-९) खरेच, पहिल्या मानवी जोडप्याला त्याने केवढा अद्भुत असा लग्नाचा आहेर दिला होता!
परंतु, आदाम व हव्वेने जरी बंड केले तरी देवाने त्यांचा सर्वतोपरि त्याग केला नाही. त्या क्षणी देवाने त्यांना तत्काळ मृत्युची शिक्षा दिली असती तर ते न्यायाचे ठरले असते. पण त्याने आता पापी बनलेल्या मानवी जोडप्याच्या बाबतीत चांगुलपणा दाखविला. त्याने त्यांना काही काळ जगण्यास व मुले होऊ देण्यास परवानगी दिली.—उत्पत्ती ५:१-५.
तेव्हापासून अधोगतीस जाणाऱ्या मानवांसाठी देवाचा चांगुलपणा चालूच राहिला. दावीद राजाने म्हटले त्याप्रमाणे “यहोवा सगळ्यांना चांगला आहे; त्याची कृपा त्याने केलेल्या सर्व कृत्यांवर आहे.” (स्तोत्रसंहिता १४५:९) तो विपुलपणे पुरवठा करतो की ज्यामुळे त्याच्या मालकीची असणारी मालमत्ता म्हणजे या पृथ्वीवरील जीवन चालू राहते. येशूने त्याच्या काळातील यहुद्यांना म्हटले होतेः “तुमचा पिता जो स्वर्गात राहतो, तो वाईटांवर व चांगल्यावर आपला सूर्य उगवितो आणि नीतीमानांवर व अनीतीमानांवर पाऊस पाडतो.” (मत्तय ५:४५) सध्या अस्तित्वात असणारी भूक व तसेच वंचित ठेवणाऱ्या गोष्टी देव पुरवठा करण्यात उणा पडला आहे म्हणून नव्हे तर मानवाचा भ्रष्टाचार, क्रूरता व कार्यक्षमतेचा अभाव यामुळे घडत आहेत.
देव पृथ्वीच्या खनिज संपत्तीचा मानवास फायदा घेऊ देतो; तसेच ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाचे व शारीरिक घडणीविषयीचे ज्ञानही त्याने गुप्त ठेवले नाही. जरी काही उद्धट लोक देव नाही असे म्हणत असले किंवा दुसरे काही त्याच्या चांगुलपणाचा स्वार्थी कारणास्तव दुरुपयोग करतात व सहमानवाला जाचात ठेवण्यासाठी त्याचा वापर करतात तरीही यहोवा मानवजातीचे भले करणारा खराच आहे—स्तोत्रसंहिता १४:१.
विश्वासू जनांविषयी देवाने व्यक्त केलेला चांगुलपणा
सर्वसाधारणपणे, देव मानवजातीसाठी चांगुलपणा दाखवून आहे तर मग त्याने विश्वासू जनांसोबत ठेवलेले दळणवळण अंतकरणास खरेच उबविणारे आहे. हे सुरवातीलाच म्हणजे आदाम व हव्वेने प्रथम बंड केले त्यावेळी देवाने एका ‘संताना’विषयीचे भाकित करून सिद्ध केले. हे ‘संतान’ दृश्य रुपाने प्रकट होऊन पापाचे सर्व वाईट परिणाम ओघाओघाने काढून टाकणार होते. (उत्पत्ती ३:१५) काळ जात राहिला तसतसे आदामाच्या पुष्कळ वंशजांनी अपूर्णता होती तरी देवाची विश्वासूपणे सेवा केली. यांना त्या सुरवातीच्या भविष्यवादाकडून चांगल्या भवितव्याची आशा प्राप्त झाली. त्या विश्वासू उपासकांपैकी एक अब्राहाम याला तर “यहोवाचा मित्र” असे म्हणण्यात येऊ लागले.—याकोब २:२३.
देवाने अब्राहामाला वचन दिले की, त्याच्या वंशजापासून तो रा निर्माण करील व त्याच्या संतानाची प्रमुख मालिका हिला तो कनानचे वतन देईल. याला अनुसरून इस्राएल लोक, अब्राहामाचे वंशज, यांना एक राष्ट्र म्हणून संघटीत करण्यात आले. (उत्पत्ती १७:३-८; निर्गम १९:६) देवाने त्यांची मिसराच्या दास्यत्वापासून सुटका करून, अरण्यात त्यांचे संरक्षण करून, त्यांना नियम शास्त्र आणि याजकत्व देऊन व सरतेशेवटी त्यांना कनानचा सुपीक प्रदेश वतन या अर्थी बहाल करून या नवीन राष्ट्राविषयी आपला चांगुलपणा प्रदर्शित केला.
सरतेशेवटी इस्राएल एक राज्य बनले व त्याचा तिसरा मानवी राजा शलमोन याला देवाने जागतिक उपासनेचे केंद्र या नात्याने यरुशलेमामध्ये मंदिर बांधण्याचे काम दिले. मंदिर बांधून पूर्ण झाले तेव्हा तेथे समर्पणाचा भव्य सोहळा व आनंदाचा उत्सव साजरा झाला. यानंतर, अहवाल म्हणतो की, इस्राएली लोक “राजाचे अभिष्ट चिंतून आपापल्या डेऱ्यास गेले व जो प्रसाद (चांगुलपणा) यहोवाने केला त्यामुळे त्यांना आनंद वाटला व त्यांची मने हर्षभरीत झाली.” (१ राजे ८:६६) इतरही असे बरेच प्रसंग होते जेव्हा इस्राएल लोकांची मने यहोवाने दाखविलेल्या चांगुलपणामुळे आनंदाने भरून गेली होती.
परंतु खेदाने म्हणावे लागते की, खऱ्या देवाचे उपासक असण्याच्या संधीबद्दल त्यांनी सातत्याने गुणग्राहकता दाखवली नाही. अखेर, इस्राएल एकंदरीत अविश्वासू बनले व त्यामुळे यहोवाने इ. स. पूर्वी ६०७ मध्ये त्यांना बाबेलास बंदिवान बनून जाण्याची परवानगी दिली. देवाने मोशेला हे म्हटलेच होते त्याप्रमाणे त्याचा चांगुलपणा होता तरी त्याने ‘अपराधाची शिक्षा देण्यात मुळीच गय केली नाही.’—निर्गम ३४:७.
तरी देखील ७० वर्षांनी इस्राएली लोकातील विश्वासू शेषांना देवाने दया दाखवून परत त्यांच्या मायभूमीकडे आणले. त्याला हे का करावेसे वाटले? त्याच्या चांगुलपणामुळे. यिर्मयाने इस्राएलच्या बाबेलमधून परतण्याविषयी भविष्यवादितपणे असे लिखाण केले होतेः “ते येऊन सीयोनेच्या माथ्यावर आनंदाने गातील व यहोवाच्या वरदानांनी [चांगुलपणाने] आनंदीत होतील.” संदेष्ट्याने पुढे म्हटलेः “‘माझे लोक माझ्या उत्तम वरदानांनी [चांगुलपणाने] तृप्त होतील,’ असे यहोवा म्हणतो.”—यिर्मया ३१:१२, १४.
अखेरीस येशू पृथ्वीवर आला व एदेनमधील भविष्यवादित “संतान” तोच आहे हे दाखवून दिले. (उत्पत्ती ३:१५) पवित्र शास्त्र सांगतेः “देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” (योहान ३:१६) मानवाला पापापासून विकत घेण्यासाठी व त्यानंतर त्याला परिपूर्णता मिळवून देण्यासाठी येशूने स्वतःच्या मरणाद्वारे खंडणी दिली. अशा रितीने, आदामाने आणलेल्या पापाच्या वाईट परिणामांवर अखेर विजय मिळविला जाणार होता. पौलाने रोमकरांना हे लिहिले होतेः “जसे त्या एका मनुष्याच्या आज्ञाभंगामुळे पुष्कळ जण पापी ठरले होते, तसे ह्या एकाच मनुष्याच्या आज्ञापालनाने पुष्कळ जण नीतीमान ठरतील.” (रोमकर ५:१९) सरळ अंतःकरणाच्या लोकांना सार्वकालिक जीवनाची आशा दिल्यामुळे आम्ही देवाचे आभारी असले पाहिजे. हेही अब्राहामाप्रमाणेच देवाचे मित्र बनू शकतात.
देव आपल्या उपासकांना आजही चांगुलपणा प्रदर्शित करीत आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तो पवित्र शास्त्राच्या आधारे सल्ला देऊन त्यांना मदत करतो. (स्तोत्रसंहिता ११९:१०५) त्याच्या नीतीमान दर्जांनुरुप राहता यावे यासाठी तो त्यांना त्याच्या आत्म्याचे मोफत बक्षिस देतो. याशिवाय तो त्यांना आपले उद्देश प्रकटवितो की ज्यामुळे खऱ्या ख्रिश्चनांना या जुन्या जगाच्या अंतानंतर येणाऱ्या नव्या नीतीमान जगाकडे आपली दृष्टी लावता येते. (नीतीसूत्रे ४:१८; २ पेत्र ३:१३) ख्रिश्चनांना या गोष्टींबद्दल पूर्ण विश्वास आहे कारण देवाने चांगुलपणाने त्याच्या अचूक व खात्रीलायक वचनात त्या प्रकट केल्या आहेत.—२ तीमथ्य ३:१६.
होय, देवाच्या चांगुलपणाचा विचार केल्यानंतर त्याच्याविषयी आमचे अंतःकरण प्रेमाने उचंबळून येते. पण, आणखी एक प्रश्न उभा राहतो, तो हा कीः
तुम्हाला देवाच्या चांगुलपणाचा फायदा कितपत मिळू शकेल?
वस्तुतः, तुम्ही कोणीही असा, देवाच्या चांगुलपणाचा फायदा तुम्हाला मिळतोच. तुम्ही श्वासोच्व्छास करता, खाता, पिता व जीवनाचा आनंद देखील उपभोगता—या सर्व देवाकडून मिळालेल्या देणग्या आहेत. पण, तुम्हाला याकडून जास्तीत जास्त फायदा मिळविणे शक्य आहे का? हे लक्षात घ्या की, आदाम व हव्वेने पाप केल्यावर त्यांच्यासाठी असणारा देवाचा चांगुलपणा मर्यादित झाला. याचप्रमाणे आम्हीही, देवाच्या दयाळूपणाला योग्य त्या मार्गाने प्रतिसाद दिला नाही तर तो आपले आशीर्वाद आम्हावर मर्यादित रुपात ठेवणार. मग, आम्हाला योग्य मार्गाने कसा प्रतिसाद दाखविता येईल?
स्तोत्रकर्त्याने असे प्रार्थिलेः “विवेक व ज्ञान मला दे, कारण तुझ्या आज्ञांवर माझी निष्ठा आहे.” (स्तोत्रसंहिता ११९:६६) आमची प्रार्थनाही अशीच असली पाहिजे. देव चांगला आहे तर मग, आम्हीही त्याच्यासारखेच चांगले बनण्याचे शिकून घेण्यास हवे. पौलाने असे आर्जविलेः “तर मग, देवाची प्रिय मुले या नात्याने त्याचे अनुकरण करणारे व्हा.”—इफिसकर ५:१.
पहिली गोष्ट आम्ही करायची ती ही की, तो चांगुलपणा काय आहे ते शिकून घेण्यासाठी पवित्र शास्त्राचा अभ्यास करणे. मग आम्ही हा गुण विकसित करण्यासाठी देवाची मदत मागावी. चांगुलपणा हा “प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, . . . विश्वासूपणा, सौम्यता व इंद्रियदमन” या देवाच्या आत्म्याच्या फळांबरोबर असणारा एक गुण आहे. (गलतीकर ५:२२, २३) देवाच्या आत्म्यावर विसंबून राहण्याद्वारे, देवाकडून प्रेरणेने लिहिण्यात आलेल्या पवित्र शास्त्राचा अभ्यास करण्याद्वारे आणि आपल्या सारखाच विश्वास जोपासणाऱ्या समविश्वासू ख्रिस्ती बांधवांचा सहवास राखण्याद्वारे आम्हाला या सर्व गुणांची वाढ करता येईल.—स्तोत्रसंहिता १:१-३; १ थेस्सलनीकाकर ५:१७; इब्रीयांस १०:२४, २५.
पवित्र शास्त्र असेही म्हणतेः “ते तुझ्या परमदयेची [चांगुलपणाची] आठवण काढतील व तुझ्या न्यायपरायणतेचा गजर करतील.” (स्तोत्रसंहिता १४५:७) होय, आम्ही इतरांना त्याच्या चांगुलतेविषयी सांगावे असे देव आम्हाकडून अपेक्षितो. आमच्या स्वर्गीय पित्याबद्दल आम्ही मनमोकळेपणाने बोलले पाहिजे.
शेवटी, देवाचा चांगुलपणा आम्हाला नुसता गृहीत धरता येणार नाही. यहोवा पाप्यांना क्षमा करतो हे खरे आहे. दावीद राजाने अशी प्रार्थना केली होतीः “हे यहोवा माझी तारुण्यातील पातके व माझे अपराध आठवू नको; तू आपल्या वात्सल्यानुसार [चांगुलपणानुसार] माझे स्मरण कर.” (स्तोत्रसंहिता २५:७) या प्रार्थनेला देवाकडून संमतीकारक उत्तर मिळेल असा त्याचा आत्मविश्वास होता. याचा हा अर्थ आहे का की, आम्हीही पाप करण्यास स्वतःला परवानगी देऊ शकतो व मग, देवाकडून क्षमा मिळेल अशा आत्मविश्वास बाळगू शकतो? मुळीच नाही. देवाच्या चांगुलपणाचा अर्थ, पश्चाताप प्रदर्शित न करणाऱ्या पाप्यांच्या ‘अपराध्यांची तो मुळीच गय करीत नाही’ हा आहे हे लक्षात आणा.
देवाच्या चांगुलपणाचा आस्वाद घ्या
एकदा का देवाच्या चांगुलतेचा पूर्णत्वाने आम्ही अनुभव घेतला तेव्हा त्याच्याविषयीच्या प्रेमाने आमची मने केवढी भरून येतात! तद्वत, आम्ही पौलाने दिलेला हा सल्ला अनुसरावा ही शिफारस आहेः “प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला; कारण प्रकाशाचे फळ सर्व प्रकारचे चांगुलपण, नीतीमत्व व सत्यता यात दिसून येते.“—इफिस. ५:८, ९.
देव आम्हासंबंधाने जी प्रेमळ काळजी वाहून आहे त्याविषयी प्रत्येक दिवशी आम्हाला जाणीव होत राहते. कितीही कठीण परिस्थिती आली तरी तो, त्याच्यावर प्रेम दाखविणाऱ्या कोणाचाही परित्याग होऊ देत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे. होय, स्तोत्रकर्त्याने विदित केलेल्या सर्वोच्च मानसिक शांतीचा आम्हाला अनुभव घडत आहेः “खरोखर माझ्या आयुष्याचे सर्व दिवस मला चांगुलपण व दया ही लाभतील व यहोवाच्या घरात मी चिरकाल राहीन.”—स्तोत्रसंहिता २३:६.