अलंकार लूकच्या शुभवर्तमानातील
यहोवाचा पुत्र, येशू ख्रिस्त हा कनवाळूपणाविषयी प्रसिद्ध आहे. तेव्हा लूक या शुभवर्तमानकाराने आपल्या लिखाणात येशूचा कनवाळूपणा, दया व सहानुभूती याविषयी लिहावे हे किती उचित आहे बरे! लूकने यहुदी व विदेशी या दोहोंसाठी येशूच्या पृथ्वीवरील जीवनाविषयीचा अंतःकरणास उबविणारा वृत्तांत खराच लिहिला.
या शुभवर्तमानातील लिखाणशैली दाखविते की कोणा प्रामाण्याने याचे लिखाण केले आहे. उदाहरणार्थ, याची प्रस्तावना विद्वत्तापूर्ण आहे व यात शब्दांचा विशाल संग्रह आहे. हे मुद्दे याची स्पष्टोक्ती करतात की लूक हा चांगले शिक्षण लाभलेला वैद्य होता. (कलस्सैकर ४:१४) येशूचा मृत्यु घडेपर्यंत जरी तो विश्वासधारक बनला नाही तरी नंतर प्रेषित पौलाच्या तिसऱ्या सुवार्तिक यात्रेत तो त्याच्यासोबत यरुशलेमापर्यंत सहकारी बनला होता. यास्तव पौलाला कैसरीया येथे अटक व तुरुंगवास झाल्यानंतर या सूक्ष्म संशोधकाने प्रत्यक्ष साक्षीदारांची मुलाखत घेऊन तसेच उपलब्ध असणाऱ्या सार्वजनिक लिखाणाचा परामर्श घेऊन आपले साहित्य गोळा केले. (१:१-४; ३:१, २) लूकने आपले शुभवर्तमान प्रेषिताला कैसरीया येथे दोन वर्षांचा कारावास घडला त्या वेळेदरम्यान म्हणजे इ.स. ५६-५८ पर्यंत लिहिले असावे.
काही उल्लेखनीय वैशिष्ट्ये
लूकच्या शुभवर्तमानात येशूने केलेले सहा चमत्कार उल्लेखनीयपणे आढळतात. हे आहेतः अद्भूतरित्या मासे मिळणे (५:१-६); नाईन येथील विधवेच्या मुलाला मृतातून उठविणे (७:११-१५); एका कुबड्या स्त्रीला बरे करणे (१३:११-१३); जलोदराने सर्वांग सुजलेल्या माणसाला बरे करणे (१४:१-४); दहा कुष्ठरोग्यांना शुद्ध करणे (१७:१२-१४); आणि प्रमुख याजकाच्या दासाचा कान बरा करणे.—२२:५०, ५१.
याशिवाय लूकच्या लिखाणात आलेले येशूचे काही दाखलेही अप्रतिम आहेत. यात यांचा समावेश आहेः दोन कर्जदार (७:४१-४७); शेजारधर्मी शोमरोनी (१०:३०-३५); निष्फळ अंजिराचे झाड (१३:६-९); सायंकाळची भव्य मेजवानी (१४:१६-२४); उधळ्या पुत्र (१५:११-३२); श्रीमंत माणूस व लाजार (१६:१९-३१); आणि विधवा व अधर्मी न्यायधीश.—१८:१-८.
भावना हेलावणाऱ्या घटना
वैद्य लूक याला स्त्रिया, मुले व वयस्करांविषयी आपुलकी होती. त्याने एकट्यानेच आपल्या शुभवर्तमानात अलिशिबेचे वांझपण, गर्भधारणा आणि योहानाचा जन्म याचा उल्लेख केला आहे. गाब्रिएल दूताने मरीयेची भेट घेतली हे केवळ त्याचेच शुभवर्तमान कळविते. मरीया अलिशिबेसोबत बोलली तेव्हा बाळकाने अलिशिबाच्या उदरात उडी घेतली हे लूकनेच भारावून म्हटले. त्याने एकट्यानेच येशूची सुंता व त्याला मंदिरात सादर करण्यात आले व तेथे वृद्ध शिमोन व हन्ना यांनी येशूबाळाला पाहिले असे सांगितले. याखेरीज, येशूचे व बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे बालपण याविषयी आपल्याला लूकच्या शुभवर्तमानातूनच कळते.—१:१–२:५२.
एकुलत्या पुत्राच्या मृत्युमुळे दुःखाने अतिशय गळून गेलेल्या नाईन गावच्या विधवेविषयी लूकने लिहिले तेव्हा तो म्हणाला की, येशूला “तिचा कळवळा आला” आणि त्याने लागलेच त्या तरुणाचे पुनरुत्थान केले. (७:११-१५) ज्याचा केवळ लूकच्या शुभवर्तमानात अत्यंत उबदार उल्लेख आहे तो प्रमुख जकातदार जक्कय याजसंबंधाने घडलेल्या घटनेचा अहवाल. बुटका असल्यामुळे येशूला पाहण्यासाठी तो झाडावर चढून बसला. येशूने त्याला बघितले व जेव्हा तो म्हणाला की तो, जक्कयाच्या घरचा पाहुणचार घेणार आहे ते किती आश्चर्याचे होते! लूक कळवितो की, ती भेट यजमानास अत्यंत आशीर्वादित ठरली.—१९:१-१०.
वैद्याच्या लेखणीतून
या शुभवर्तमानात असे खूप शब्द वा संज्ञा आहेत ज्यांचा वैद्यकीय दृष्टीकोनातून अर्थ वा सूचकता दिसते. हे शब्द इतर ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनातील लेखकांनी वैद्यकीय अर्थाने वापरल्याचे कोठेही दिसत नाही. तद्वत, वैद्याच्या लेखणीतून आपण वैद्यकीय भाषाच अपेक्षू शकतो.
उदाहरणार्थ, केवळ लूकनेच म्हटले की, पेत्राची सासू “कडक तापाने पडली होती.” (४:३८) त्याने असेही लिहिलेः “पाहा, तेथे कुष्ठरोगाने भरलेला असा एक माणूस होता.” (५:१२) दुसऱ्या शुभवर्तमान लेखकाला कोण माणसाला कुष्ठरोग होता हे म्हणणे पुरेसे वाटले, पण वैद्य लूकला नाही; कारण आपल्या लिखाणाकरवी लूक हे सूचित करू इच्छित होता की त्या माणसाचा आजार पराकोटीला पोहंचला होता.
प्रथांच्या उल्लेखात दिसून येणारी अंतर्दृष्टी
लूकने म्हटले की, येशूचा जन्म झाल्यावर मरीयेने त्याला “बाळंत्याने गुंडाळून” ठेविले. (२:७) त्याकाळी नवजात अर्भकाला धुऊन मीठ चोळीत असत ते बहुधा बाळाची कातडी सुकून ती दाट होण्यासाठी करीत. मग त्याला, जणू प्रेताला गुंडाळतात त्याप्रमाणेच बाळंते गुंडाळीत. या बाळंत वस्त्रप्रावरणामुळे शरीर सरळ व उबदार राही, हे वस्त्र हुनवटीखाली तसेच डोक्यावरुन गुंडाळल्यामुळे बाळाला नाकावाटे श्वासोच्व्छास करण्याची तालीम मिळे. १९ व्या शतकात बाळंत्याने गुंडाळण्याच्या प्रथेविषयी बेथलहेममध्ये भेट देणाऱ्या एका पाहुण्याने म्हटलेः “मी त्या लहान बाळाला आपल्या हाती घेतले. त्याचे शरीर ताठ होते व त्याला प्रतिकार करता येत नव्हता इतक्या घट्टपणे पांढरे व जांभळ्या कापडांनी त्याचे बाळंते बांधले होते. त्याचे हात व पाय जवळजवळ जखडल्यासारखेच होते. त्याचे डोके लहान मऊ तांबड्या कापडाने बांधले होते व त्याचा पदर कपाळावरुन खाली हनुवटीकडे आणून खाली घडी घालून घट्ट बांधला होता.”
लूकचा अहवाल पहिल्या शतकात प्रचलित असलेल्या मयतीच्या प्रथेविषयीचीही अंतर्दृष्टी पुरवितो. येशू नाईन गावाच्या वेशीजवळ असताना त्याने “कोणाएक मृत माणसाला बाहेर नेत” असल्याचे पाहिले. हा “आपल्या [विधवा] आईचा एकुलता एक मुलगा” होता; व “त्या गावचे पुष्कळ लोक तिच्याबरोबर होते.” (७:११, १२) दफनविधि हा सर्वसाधारणपणे शहराचा बाहेर होत असे आणि मृताचे आप्त व मित्रजन हे मृताला कबरेपर्यंत आणून पोहचवीत. तिरडी ही गवताने विणलेली असे व तिला कोपऱ्याला दांडे बसवीत आणि जेव्हा मयत स्मशानात नेण्यासाठी जाई तेव्हा चार लोक हे दांडे खांद्यावर ठेवून ती तिरडी वाहून नेत. या तिरडीमागे जनसमूह जात.
लूकने आणखी एका दृष्टांताचे लिखाण केले ज्यात येशूने कोणा माणसाला दरोडेखोऱ्यांचा मार मिळाला असे म्हटले आहे. एक शेजारधर्मी शोमरोन्याने “त्याच्या जखमांस तेल व द्राक्षारस लावून त्या बांधल्या.” (१०:३४) अशा पद्धतीने जखमांवर इलाज होई. जैतुनाचे तेल ती जखम नरम बनवी व तिचे दुःख हलके करी. (यशया १:६) पण द्राक्षारसाबद्दल काय? द जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोशिएशन म्हणतेः “द्राक्षारस हे ग्रीसमध्ये प्रमुख औषध होते. . . . कॉसच्या हिपॉक्रेटिसने (इ.स.पू. ४६०-३७०) . . . द्राक्षारसाचा मुक्त वापर केला, त्याला जखमावर इलाज, ताप कमी करणारे, रेचक, तसेच मूत्रवर्धक औषधी असे लिहून दिले.” येशूच्या या दृष्टांताने द्राक्षारसाठायी असणारी निर्जंतूकता तसेच सूक्ष्मकृमिघ्नतेच्या गुणांची उल्लेखनीयता सामोरी आणली. तसेच त्याने जैतूनाचे तेल जखम बरी करण्यास उपयुक्त आहे हेही प्रदर्शित केले. अर्थात, दाखल्याचा मुद्दा हा होता की, खरा शेजारी दयावंत हालचाल करतो. याचप्रकारे आपण इतरांसोबत व्यवहार रखला पाहिजे.—१०:३६, ३७.
नम्रतेविषयीचे धडे
एका भोजनप्रसंगी प्रमुख आसने घेणाऱ्या पाहुण्यांविषयी जो दाखला येशूने सांगितला त्याची माहिती केवळ लूकने दिली. या भोजनप्रसंगी एका मेजासभोवती तीन बाजूंना लांब बैठका असत जेथे पाहुणे रेलून बसत. वाढपी या मेजाकडे चवथ्या बाजूने येत. सांप्रदायिकपणे एका बैठकीवर तिघे बसत, त्यांचे तोंड मेजाकडे असे व ते आपला डाव्या हाताचे कोपर बैठकीवर रेलून उजव्या हाताने अन्न घेत. बैठकीच्या तीन बाजू श्रेष्ठ, मध्यम व कनिष्ठ स्थानांना सूचित होत्या. तिसऱ्या बैठकीवर आसन घेणारा भोजनात सर्वात कनिष्ठ जागेवर असे. येशू म्हणालाः “तुला आमंत्रण असल्यास अगदी खालच्या जागेवर जाऊन बैस; म्हणजे ज्याने तुला आमंत्रण केले तो येऊन तुला म्हणेलः ‘मित्रा, वर येऊन बैस.’ म्हणजे तुझ्याबरोबर भोजनास बसलेल्या सर्वांसमोर तुझा मान होईल.” (१४:७-१०) होय, आपण नम्रपणाने इतरांना आपणाआधी ठेवू या. खरे म्हणजे या दृष्टांताचा अवलंब जाहीर करताना येशू म्हणालाः “जो कोणी आपणाला उंच करतो तो नमविला जाईल; व जो आपल्याला नमवितो तो उंच केला जाईल.”—१४:११.
नम्रतेविषयी अधिक भर देणारा तसेच लूकच्या शुभवर्तमानात उल्लेखनीय असा येशूने दिलेला मंदिरात प्रार्थना करणारा जकातदार व परुशी यांच्याविषयीचा दाखला आहे. इतर गोष्टीसोबत परुश्याने प्रार्थनेत म्हटलेः “मी आठवड्यातून दोनदा उपास करतो.” (१८:९-१४) नियमशास्त्राने केवळ एकच वार्षिक उपास ठरवून दिला होता. (लेवीय १६:२९) पण परुशी तर उपासाविषयी मोठा अतिरेक करीत होते. दृष्टांतात असणारा परुशी आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी उपास करीत असे कारण त्या दिवशी मोशे सिनाय डोंगरावर दहा आज्ञा प्राप्त करून घेण्यासाठी गेला असे मानले जाई. तो डोंगरावरुन आठवड्याच्या पाचव्या दिवशी खाली आला असे म्हटले जात होते. (निर्गम ३१:१८; ३२:१५-२०) अशाप्रकारे परुश्याने आपण आठवड्यातून दोनदा उपासाचे आचरण करतो हे जाहीर करून किती धार्मिक आहोत त्याविषयीचे प्रदर्शन केले. पण या दृष्टांताने आम्हाला स्व-नीतीमानपणा नव्हे तर, नम्र असण्याविषयीची चालना दिली पाहिजे.
लूकच्या शुभवर्तमानातील हे अलंकार याची प्रचिती देतात की हे शुभवर्तमान खरोखरीच अप्रतिम व बोधक आहे. या अहवालात नमूद असणाऱ्या घटना येशूच्या पृथ्वीवरील जीवनात ज्या भावना हेलावणाऱ्या घटना घडल्या त्या पुनर्जिवीत करतात. तसेच काही प्रथांची पार्श्वभूमी जाणल्यामुळे आपल्याला लाभ मिळतो. पण तेच आम्ही दयाळूपणा, नम्रता याविषयीचे जे धडे प्रिय वैद्य लूक याच्या शुभवर्तमानात शिकविण्यात आले त्यांचा अवलंब स्वीकारला तर खरेच आशीर्वादित ठरू.