शेवटले बलाढ्य जागतिक साम्राज्य
पवित्र शास्त्रातील प्रकटीकरण पुस्तक सुमारे १,९०० वर्षांपूर्वी जेव्हा लिहिण्यात आले होते तेव्हा त्यात म्हटले होते की, पाच “राजे” किंवा जागतिक साम्राज्ये आली व होऊन गेली. ती मिसर, अश्शूर, बाबेल, मेद-पारस आणि ग्रीस ही होती. सहावे साम्राज्य रोम अद्याप चालत होते. पण सातव्या साम्राज्याचे आगमन झाले नव्हते. (प्रकटीकरण १७:१०) हे सातवे साम्राज्य कोणते होते? ते अस्तित्वात कसे आले? व त्याच्यानंतर कोण? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे हाच या लेखाचा विषय आहे.
जागतिक इतिहासाचा गेल्या २,५०० वर्षांचा सर्वात महत्त्वाचा आराखडा काळाअगोदरच एका सर्वाधिक खप असलेल्या पुस्तकात दिलेला आहे जे जगासाठी आजही अपूर्व आहे. तरीही, ज्या कोणापाशी त्या पुस्तकाची, पवित्र शास्त्राची प्रत आहे त्यांच्यापैकी प्रत्यक्षात फारच थोडक्यांना, त्यात एवढी आश्चर्यकारक माहिती सामावलेली आहे ही जाणीव आहे.
उदाहरणार्थ, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या ५०० पेक्षा अधिक वर्षांआधी, संदेष्टा दानीएलाने एक ईश्वरप्रेरित दृष्टांत लिहून ठेवला, ज्यात त्याने त्याच्या काळापासूनच्या बलाढ्य साम्राज्यांचा हिंस्र पशूंच्या रुपात उल्लेख केला आहे. प्रत्येक पशू, ते ज्या जागतिक साम्राज्याचे प्रतिनिधित्व करते, त्याचे गुण व्यक्त करते. बलाढ्य रोमी साम्राज्याचे वर्णन एका अशा अवाढव्य श्वापदाद्वारे केले, जे “विक्राळ, भयानक व अतिशय बळकट असे होते.” दानीएलने पुढे म्हटलेः “ते अगोदरच्या सर्व श्वापदाहून भिन्न होते; आणि त्याला दहा शिंगे होती.”—दानीएल ७:२-७.
“लहानसे शिंग”
ओघाओघाने रोमी साम्राज्याचा व्याप वाढत जाऊन त्याच्या सीमा युरोप पार करून ब्रिटीश बेटांना जाऊन भिडल्या. पुढे भूमध्य समुद्रास वळसा घालून बाबेलच्या पुढे पर्शियन आखातास मिळाल्या. हे बलाढ्य साम्राज्य सरतेशेवटी अनेक राष्ट्रात विभाजित झाले—म्हणजेच दानीएलाने पाहिलेल्या “दहा शिंगे” यात विभागले.a मग दानीएलाने पाहिले तोः “पाहा, त्यांच्यामध्ये आणखी एक लहानसे शिंग निघाले. त्याच्यामुळे अगोदरच्या शिंगापैकी तीन समूळ उपटली गेली. (दानीएल ७:८) याचा अर्थ काय?
दानीएलास सांगण्यात आलेः “दहा शिंगाविषयी विचारशील तर त्या [रोमी] राज्यातून दहा राजे निघतील व त्यानंतर आणखी एक राजा [“लहान शिंग”] निघेल; तो त्या पूर्वीच्या राजांहून भिन्न असून तिघा राजांस पादाक्रांत करील.” (दानीएल ७:२४) हे “लहान शिंग” कोण होते, आणि ज्यांना त्याने पादाक्रांत केले ते तिघे राजे कोण होते?
रोमी साम्राज्याच्या वायव्येकडील कोपऱ्यात एक छोटेसे बेट होते जे जागतिक घडामोडीच्या काठावर बराच काळ टिकून होते. जसे एका इतिहासकाराने म्हटलेः “सोळाव्या शतकात इंग्लंड ही दुसऱ्या पदावरील सत्ता होती. तिच्या मालमत्तेची ओझरती तुलना नेदरलँडशी होऊ शकत होती. तिची लोकसंख्या फ्रान्सपेक्षा कितीतरी पटीने कमी होती. तिचे हत्यारी लष्कर (नौदलासह) बलाने स्पेनपेक्षा कमजोर होते.” तथापि, इंग्लंडने आपले नौदल अति प्रचंड स्वरुपात वाढविले व तिच्या दर्यायी चाच्यांनी आणि खाजगी लढाऊ जहाजांनी स्पेनच्या वसाहतीवर व तिच्या समृद्ध जहाजांवर वेळोवेळी हल्ले करून मनमुराद लुट घेतली.
तीन शिंगे
१५८८ मध्ये स्पेनचा फिलिप्प दुसरा याने स्पेन लष्करासह त्यांच्या इंग्रजी जाचकांविरुद्ध लढा देण्याची प्रचंड मोहीम सुरु केली. या १३० जहाजांच्या ताफ्याने त्यातील २४,००० सैनिकांसह दरमजल करीत हळूवार इंग्लीश खाडी गाठली, ते केवळ विरुद्ध दिशेच्या तुफानी वाऱ्याला व अटलांटिक समुद्रातील भयानक तुफानाला बळी पडण्यास. मॉडर्न युरोप टू १८७० या पुस्तकात इतिहासकार कार्ल्टन हेज या प्रसंगाचे वर्णन देताना म्हणतातः “यावेळीच निर्णायकपणे नौदलाचे वर्चस्व स्पेनपासून इंग्लंडकडे गेले.”
१७व्या शतकात, डच राष्ट्राने जगातील सर्वात मोठा व्यापारी जहाजांचा ताफा उभारला. त्यांच्या जहाजांनी समुद्रावर आपले वर्चस्व जमविले व आपला सर्व नफा, कमी अधिक सर्व, सरकारला पोहचवीत. पण समुद्रकिनाऱ्यावरील वसाहतीवरील आपला अमल वाढवीत असताना ब्रिटन देखील यात आघाडीवर राहिले.
तद्नंतर, १८ व्या शतकात, ब्रिटन व फ्रान्स यांनी एकमेकांशी एवढ्या दूरच्या स्थळी लढा दिला जे एक उत्तर अमेरिकेच्या हद्दीत तर दुसरे चक्क भारतात होते; व शेवटी त्यांचा १७६३ मध्ये पॅरीसला तह झाला. याविषयी विल्यम बी. वीलकॉक्स आपल्या स्टार ऑफ एम्पायर—ए स्टडी ऑफ ब्रिटन ॲज ए वर्ल्ड पावर नामक पुस्तकात म्हणतात की, जरी तह हा हातमिळवणी समान असतो, तरी “प्रत्यक्षात त्याने ब्रिटनची युरोप पलिकडील देशावरही वर्चस्व गाजविणारी युरोपियन सत्ता, या नवीन दर्जास ओळख दिली.”
इतर इतिहासकारही या म्हणण्यात एकसूर होतात की, “स्पेन, डच आणि फ्रेंच सोबतच्या दोन शतकांच्या युद्ध काळात थोर ब्रिटन हे १७६३ मध्ये जगातील सर्वथोर व्यापारी व वसाहत करणारे साम्राज्य म्हणून वैभवास आले.” (मॉडर्न युरोप टू १८७०) “१७६३ मध्ये ब्रिटीश साम्राज्य पुनरुज्जीवित झालेली व जणू व्याप्तरुपी रोमी सत्ता या रूपात सबंध जगावर स्वार झाले.” “ते मध्ययुगीन लढायातून एक सर्वथोर व शक्तीमान साम्राज्य या नाते पुढे आले; आणि चोहोकडून कडाडून तिरस्कार केलेले, जागतिक साम्राज्य होते.” (नेव्ही ॲण्ड एम्पायर, जेम्स एल. स्टोकवेरी लिखित) होय, हे “लहानसे शिंग” वाढून पवित्र शास्त्र इतिहासातील सातवे बलाढ्य साम्राज्य बनले.
ब्रिटन, नाईल नदीपलिकडे झाम्बेझी नदीच्या पात्रास ओलांडून पुढे गेले होते. ते सरकत सरकत बर्माच्या उत्तरेस, तसेच बोर्नियोच्या उत्तरेस भिडले व पॅसिफिक बेटावर स्थिरावले. याखेरीज, त्याने कॅनडा, ऑस्ट्रलिया, न्यूझीलंड व उत्तर अमेरिकेच्या किनाऱ्यावरील जागेत वसाहती स्थापिल्या व त्या वाढविल्या. “रोमी साम्राज्य स्वयंभू होते,” असे जेम्स मॉरीस हे पॅक्स ब्रिटानिका या पुस्तकात म्हणतात, “तर ब्रिटीश साम्राज्य सबंध पृथ्वीवर सभोवार पसरलेले होते.” मानवी इतिहासातील ते एक अति अवाढव्य, पृथ्वीचा जवळजवळ एकचतुर्थांश हिस्सा व्यापणारे व त्यासोबतच लोकसंख्येपैकीचा पावपेक्षा अधिक भाग आपल्या अधिकाराखाली ठेवून होते. असे म्हटले जाई की, ब्रिटीश साम्राज्यावर सूर्य कधीच मावळत नव्हता.
दुहेरी साम्राज्य
प्रकटीकरणाच्या पुस्तकात या सातव्या जागतिक साम्राज्यास “कोकरासाखी दोन शिंगे” असलेले असेही वर्णिलेले आहे. (प्रकटीकरण १३:११) पण, दोन शिंगे का? कारण ब्रिटीश साम्राज्य आणि नवीन उदयास आलेले अमेरिकन राष्ट्र यांची भाषा, तत्त्वे आणि राजनीती ही सारखीच असल्यामुळे अनेक महत्त्वपूर्ण संदर्भात ते एक महान इंग्रजी भाषा बोलणारे दुहेरी साम्राज्य बनले.
विल्यम बी. वीलकॉक्स हे स्टार ऑफ एम्पायर मध्ये स्पष्ट करतात की, १९ व्या शतकात अमेरिकेला “ब्रिटीश आरमाराद्वारे युरोपपासून अलग करण्यात आले.” पुढे ते म्हणतातः “एक शतकभर अमेरिकेला मोकळेपणाने एक बलाढ्य शक्ती समेटण्याची व भरभराट करण्याची कोणाही बंधनात नसता, स्वतंत्रता होती. अंतर्ग्रस्त यादवी, जी लष्कर आणि आरमारी सैन्यात चालली होती, जिची इतर मोठ्या सत्तांना चांगली जाणीव होती.” अमेरिकेला हा “एकांतवास तेवढा जड भासला नाही कारण युरोपियन सत्तांना तोंड देण्यास तिच्यामागे ब्रिटनचे आरमार उभे होते.” कालांतराने स्वतः अमेरिकाही एक बलाढ्य लष्करी साम्राज्य बनले.
ब्रिटन व अमेरिकेच्या संयुक्त हालचालीचे एक उल्लेखनीय उदाहरण जून ६, १९४४ रोजी घडले, जेव्हा दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या लाटेत उत्तर युरोपात बदल घडला. त्या दिवशी १,५६,००० ब्रिटीश, अमेरिकन आणि इतर दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांनी मिळून युरोप खंडास पादाक्रांत केले. हे संयुक्त लष्कर अमेरिकेचे सर सेनानी आयझन हॉवर आणि मोहीमेचे संचलन करणारे ब्रिटीश फिल्ड मार्शल माऊंटगोमेरी यांच्या जोड अधिपत्याखाली होते. याहीपेक्षा अधिक, ज्यामुळे जपान बरोबरील लढायाचा युद्धविराम झाला ते ॲटम बॉम्ब ब्रिटीश व अमेरिकन शास्त्रज्ञांच्या संयुक्त सहकाराने तयार झाले होते.
लॉस एन्जल्स टाईम्सने मे ५, १९८६ च्या अंकात दर्शविल्याप्रमाणे शांतीकाळातही, “हेरगिरी आणि अणूशक्तीचे तंत्रज्ञान या संवेदन क्षेत्रात” ब्रिटन-अमेरिकेचा सतत सहकार आहे. नंतर कॅनडा, ऑस्ट्रलिया व न्यूझीलंड ही राष्ट्रेही यांना मिळाली व त्यांनी “हेरगिरीची माहिती मिळविण्यात तसेच अगदी गुप्त बातम्याही आपसात कळविण्यात सहभागी होण्याचे ठरवून या गृहाचे भाग वाटून घेतले आहेत. हे वर्तमानपत्र पुढे म्हणतेः “हे संबंध जरी नेहमीच सुरळीत नसले तरी त्यांच्यामधील नातेसंबंध एवढे निकटवर्तीय झाले की आपसातील चकमकीपेक्षा तेच अधिक लक्षात भरते.”
बहुतेक ब्रिटीश वसाहतींनी आपापले स्वातंत्र्य मिळवून, त्या राष्ट्रीय कॉमनवेल्थच्या सदस्य बनल्या. जरी साम्राज्याची शान गेली तरी ॲग्लो-अमेरिकन जागतिक साम्राज्य कायम राहिले. पण तेच ज्याने अनेक शतके वर्चस्व गाजविले त्या, या आधीच्या रोमी साम्राज्याच्या तुलनेत हे आता ‘थोडा काळ राहणार’ आहे.—प्रकटीकरण १७:१०.
नवीन जगव्याप्त सत्ता
दानीएलाने इ.स.पूर्वी ५०० च्या आधीपासून ते आमच्या दिवसातील सातव्या जागतिक साम्राज्यापर्यंत—२,५०० वर्षांच्या जागतिक सरकारांच्या थोर जागतिक साम्राज्याबाबत जो भविष्यवाद केला होता तो शब्दशः खरा ठरला आहे. यामुळेच आम्ही त्या भविष्यवादातील उरलेल्या भागाबद्दलही विश्वास बाळगू शकतो. आश्चर्यचकित करणारी गोष्ट ही आहे की, ते पुढील कोणाही मानवी जागतिक साम्राज्याचा उल्लेख करीत नाही! प्रकटीकरणही हेच सूचित करते की केवळ सात साम्राज्ये होतील.b मग, पुढे काय होणार?
दानीएलाचा ७ वा अध्याय, जो या जागतिक साम्राज्याबाबत स्पष्टता देतो तो, पुढे याहीपेक्षा अधिक आश्चर्यचकित करणारे, पृथ्वीवरील अधिपत्यातील एका महत्त्वपूर्ण बदलाचे वर्णन करतो. क्षीण होत असलेल्या मानवी शासनांचा अंत आणि त्यांच्या जागी नीतीमान स्वर्गीय सत्ता स्थापित होण्याचे तो कथन करतो!
दानीएलाच्या दृष्टांतात, त्याला “पुराणपुरुष,” यहोवा देव याच्या भव्य स्वर्गीय सिंहासनाचे दर्शन घडविण्यात आले. येथे, यहोवा देवापाशी “मानवपुत्रासारखा कोणी”—पुनरुत्थित येशू ख्रिस्त—याला आणण्यात आले.c दानीएल पुढे म्हणतोः “सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य [क्षीण मानवी राज्यांसारखे नाही तर] अविनाशी आहे.”—दानीएल ७:९, १०, १३, १४.
जागतिक साम्राज्यांबद्दल दानीएलास पुरविलेल्या या आधीच्या भविष्यवादात म्हटले होतेः “त्या राजांच्या अमदानीत स्वर्गीय देव एका राज्याची स्थापना करील; त्याचा कधी भंग होणार नाही. . . . तर ते या सर्व [मानवी] राज्यांचे चूर्ण करून त्यांस नष्ट करील व ते सर्वकाळ टिकेल. . . . हे स्वप्न विश्वसनीय व त्याचा अर्थही विश्वसनीय आहे.”—दानीएल २:४४, ४५, न्यू.व.
देवाकडील राज्य-सरकार हे तेच आहे ज्याच्याबद्दल येशूने आम्हास प्रार्थना करावयास शिकविले. त्याने म्हटलेः “यास्तव, या प्रकारे प्रार्थना कराः ‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानिले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.’”—मत्तय ६:९, १०.
त्या सरकारच्या अधिपत्याखाली पृथ्वीवरील रहिवाशी केवढे आनंदी असतील बरे! त्या काळी एक मोठा बदल घडलेला असेल की, मानवी पिळवणूक जाऊन ईश्वरी न्यायाची तसेच मनुष्याच्या अपूर्ण कार्यप्रणाली ऐवजी देवाच्या सर्वोच्च दर्जाकरवी सर्व गोष्टी होणार. पवित्र शास्त्र या राज्याच्या नीती आणि कार्यवहनाविषयी जे सांगते तेच या लेखमालिकेत पुढच्या लेखात स्पष्ट होणार आहे.
[तळटीपा]
a शिंग, या भयानक अस्त्राचा पवित्र शास्त्रात वेळोवेळी अधिपति व त्यांचे अधिपत्य यासाठी वापर झालेला आहे.—अनुवाद ३३:१७; जखर्या १:१८-२१; प्रकटीकरण १७:३, १२.
b प्रकटीकरण १७:११ हे “श्वापद”चा उल्लेख करते, जे “आठवा राजा आहे; तो त्या सातापासून झालेला आहे.” ही आठवी सत्ता सातवीच्या हयातीतच अस्तित्त्वात असेल, ज्याची आपण नंतरच्या लेखात चर्चा करू.
c “मानव पुत्र” किंवा “मनुष्याचा पुत्र” ही संज्ञा शुभवर्तमानात जवळजवळ ८० वेळा आढळते व ती प्रत्येक वेळी येशू ख्रिस्ताला उद्देशून आहे.—पहा मत्तय २६:६३, ६४.
[३२ पानांवरील चित्रं]
युरोपावर जून ६, १९४४ रोजी संयुक्तपणे करण्यात आलेली चढाई ही अँग्लो-अमेरिकेच्या परस्पर सहकार्याचे उल्लेखनीय उदाहरण आहे