पत्नी या नात्याने प्रेम व आदर दाखविणे
“पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”—इफिसकर ५:३३.
१. विवाहाची आधुनिक स्थिती पाहिल्यावर कोणते प्रश्न सामोरे येतात?
सध्याच्या स्वातंत्र्य व “मुक्ती”च्या आधुनिक काळात विवाहाच्या सांप्रदायिक धोरणास काही तडे बसले आहेत. अशी लाखो कुटुंबे आहेत जेथे एक तर बाप किंवा आई नसते. याचप्रमाणे बरेच जण आज, कायदेशीर विवाह न करता एकत्र राहात आहेत. पण यामुळे कुटुंबातील पत्नी व माता हिला अधिक सुरक्षा मिळू शकली का? यामुळे मुलांना स्थैर्यता मिळू शकली का? शिवाय नीतीमूल्यांचा हा भंग कुटुंबात एकमेकांविषयीचा अधिक आदर निर्माण करू शकला का? मग, उलटपक्षी, देवाच्या वचनाची काय शिफारस आहे?
२. आदामाने एकटे राहणे हे त्याच्यासाठी बरे का नव्हते?
२ देवाने पहिली स्त्री निर्माण करण्याचा हेतू प्रकट केला तेव्हा त्याने असे म्हटलेः “मनुष्य एकटा असावा हे बरे नाही.” याशिवाय, जनावरांच्या कुटुंबाला, म्हणजे नर, मादी व त्यांच्या पिलांकडे बघून आदामाला देखील, देवाने म्हटले त्यासारखेच वाटले असावे. आदाम पूर्ण होता व तो सुखावह नंदनवनात होता तरी आपल्या जातीचा, सोबत देऊ शकणारा असा कोणती सोबती त्याला नव्हता. त्याच्याठायी बुद्धीमत्ता होती, बोल होते, तरीही, या देणगीची सहभागिता करता येईल असा कोणी साथीदार नव्हता. पण, आता लवकरच परिस्थिती बदलणार होती, कारण देवाने म्हटलेः “त्याच्यासाठी अनुरूप साहाय्यक मी करीन.”—उत्पत्ती २:१८-२०.
३. (अ) हव्वा ही आदामाच्या “जाती”ची कशी होती? (ब) पुरुषाने आपल्या स्त्रीसोबत “जडून” राहणे याचा काय अर्थ होतो?
३ यहोवाने आदामाच्या एका फासळीकरवी हव्वा ही स्त्री निर्माण केली. यामुळेच ती, आदाम होता त्याच “जाती”ची होती. ती कनिष्ठ जनावर नव्हती, पण “[त्याच्या] हाडातले हाड व [त्याच्या] मांसातले मांस” होती. यामुळे प्रेरित अहवाल म्हणतोः “यास्तव, पुरुष आपल्या आईबापास सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील व ती एकदेह होतील.” (उत्पत्ती २:२३, २४) “जडणे” याविषयी असणाऱ्या इब्री शब्दाचा खरा अर्थ “चिकटणे; चिकटून राहणे; जणू काही सरसाने चिकटणे” असा आहे. (जेसेनियस यांचा हिब्रु ॲण्ड खॅलडी लेक्सिकन टू द ओल्ड टेस्टमेंट स्क्रिपचर्स) यामुळे पती व पत्नी हे एकमेकांपासून दूर करता येणार नाहीत असे अविभक्त आहेत असा अर्थ समजून येतो. आणखी एक प्रामाण्य म्हणतात की, “ते नवरा व बायको यांच्या लैंगिक मिलनाच्याही पुढे जाऊन त्यांचे संपूर्ण नातेसंबंध व्यापते.” याकारणास्तव विवाह म्हणजे तरळणारा तरंग नव्हे. तो दीर्घकालीन नातेसंबंध आहे. जेथे परस्पर आदर आणि प्रतिष्ठा आहे ते ऐक्य, जरी त्यावर कधी ताण पडला गेला तरी ते अतूट राहावयास हवे.—मत्तय १९:३-९.
४. स्त्री ही पुरुषाची साहाय्यक व त्याला अनुरुप अशी कोणत्या अर्थाने होणार होती?
४ देवाने म्हटले की, स्त्री ही पुरुषासाठी साहाय्यक व अनुरुप होणार होती. या दोघांचीही घडण देवाच्या प्रतिरुपाप्रमाणे झालेली असल्यामुळे या दोघांनीही एकमेकांसोबतच्या नातेसंबंधात त्याचे गुण—न्याय, प्रीती, सूज्ञान व सामर्थ्य—प्रदर्शित करण्याची तो अपेक्षा धरून होता. या कारणास्तव हव्वा आदामाची स्पर्धक नव्हे तर त्याला “अनुरुप” अशी होणार होती. त्याचे कुटुंब हे जणू एका जहाजावर असणारे दोन कप्तान या प्रकारातील होणार नव्हते, तर आदाम आपल्या कुटुंबाचा मस्तक होणार होता.—१ करिंथकर ११:३; इफिसकर ५:२२-२४; १ तीमथ्य २:१२, १३.
५. पुष्कळ पुरुषांनी आपल्या बायकांना कसे वागविले, आणि याला देवाची संमती आहे का?
५ परंतु, पहिल्या मानवी जोडप्याने देवाच्या प्रेमळ मस्तकपदाविरुद्ध केलेले बंड व पाप यामुळे त्यांचे कुटुंब घडवण्यात आणि पुढे येणाऱ्या सर्व भावी कुटुंबाची घडण करण्यासाठी एक वेगळीच दिशा दिली. मानवजातीवर पाप व त्याच्या परिणामामुळे जे गुदरणार त्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे यहोवाने हव्वेस म्हटलेः “तुझा ओढा नवऱ्याकडे राहील, आणि तो तुझ्यावर स्वामित्व चालवील.” (उत्पत्ती ३:१६) हे खरेच दुःखाचे आहे की, नंतरच्या बऱ्याच शतकात पुष्कळ पुरुषांनी आपल्या बायकांवर जुलमी वर्चस्व केले. सर्व जगभर स्त्रीची मानहानी व तुच्छता होत गेली व अद्याप होत आहे. तथापि, आपण फेब्रुवारी महिन्याच्या अंकात या लेखाचा पूर्वभाग पाहिला तेथे हे स्पष्ट करण्यात आले की, पवित्र शास्त्रीय तत्त्वाच्या अवलंबनात पुरुषाच्या बेबंदशाही वा जुलमी वर्चस्वाला आधार देण्यात आलेला नाही. उलटपक्षी, त्यात खोल आदराविषयी अधिक भर दिला गेला आहे.
भीड—एक आव्हान
६, ७. (अ) विश्वास न राखणाऱ्या पतींना सत्यात कसे मिळवता येऊ शकते? (ब) आपल्या विश्वास न राखणाऱ्या पतीविषयी “भीड” दाखवण्यात एखादी पत्नी मागे पडत आहे हे कसे दिसू शकते?
६ प्रेषित पेत्राने ख्रिस्ताच्या वर्तणुकीविषयीची सविस्तर माहिती दिली आणि म्हटले की येशूने आम्हासाठी “त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून . . . कित्ता घालून दिला आहे.” यानंतर पेत्र म्हणतोः “तसेच, स्त्रियांनो, तुम्हीही आपापल्या पतीच्या अधीन असा; ह्यासाठी की, कोणी वचनाला अमान्य असले तरी अशांना शब्दाविना तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेता यावे.” (१ पेत्र २:२१–३:२) तर मग, ख्रिस्ती स्त्रियांना ही “भीड” कशी धरता येईल?
७ आमच्या पुष्कळ भगिनींना विश्वास न राखणारे तसेच सहसा विरोध करणारे पती आहेत. अशा या परिस्थितीचा असा अर्थ आहे का की पेत्राचा सल्ला येथे उपयुक्त नाही व तो पोकळ आहे? नाही, तर पती “वचनाला अमान्य असले तरी”सुद्धा अधीनता व आदर दाखविणे जरूरीचे आहे. तर मग, अशी ही भगिनी विश्वास न राखणाऱ्या आपल्या पतीसोबत राज्य सभागृहात सभांना आली व तेथे ती आपल्या पतीविषयी चहाड्या करु लागली आणि मंडळीतील भगिनींना तिने त्यांच्याकडून जी वाईट वागणूक तिला मिळत आहे त्याविषयी सांगत राहिली तर हे तिचे हे वागणे भीडस्तपणाचे आहे असे म्हणता येईल का? हेच तिने मंडळीतील कोणा बंधु वा भगिनीच्या बाबतीत केले तर ते काय ठरेल? चहाडी किंवा निंदा. यासाठीच विश्वासात नसलेल्या आपल्या पतीविषयी असे सांगत राहाणे हे तिजठायी भीडस्तपणाचा अभाव असल्याचे प्रदर्शित करील. (१ तीमथ्य ३:११; ५:१३) तथापि, विरोध होणाऱ्या काही भगिनींना गंभीर समस्या आहेत हे नजरेआड करता येणार नाही. मग, याला काय उपाय आहे? त्या, वडीलांकडे जाऊन त्यांची मदत व सल्ला घेऊ शकतात.—इब्रीयांस १३:१७.
८. विरोध करणाऱ्या पतीच्या मनात काय विचार असावेत?
८ विरोध करणाऱ्या पतीबरोबर वडील कसे चतुराईने वागू शकतील? पहिल्या प्रथम, त्यांनी पतीच्या दृष्टीकोणातून परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न करावा. पतीची शाब्दिक किंवा शारीरिक हिंसक कृत्ये ही तिहेरी कारणांमुळे घडत असावीत; म्हणजे प्रथम अजाणता व त्यामुळे उद्भवणारे भय व भयामुळे उद्भवणारी हिंसक प्रतिक्रिया. पण हे असे का घडते? कारण कधी कधी पतीला यहोवाच्या साक्षीदारांविषयी आपल्या पूर्वग्रह धरलेल्या कामकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीशिवाय दुसरी कोणतीही माहिती प्राप्त झालेली नसते. त्याला एवढेच माहीत असते की, त्याच्या बायकोने पवित्र शास्त्राचा अभ्यास सुरु करण्याआधी ती त्याच्याविषयी व मुलांविषयीच्या गोष्टीत मग्न असे. वस्तुतः ती आता चांगली पत्नी व माता बनली असेल तरीही त्याला हेच वाटत असते की, ‘ती आठवड्यातून तीनदा मला सोडून सभांना जाते. सभेत काय चालते ते मला माहीत नाही, पण तेथे पुरुषही असतात, तर मग . . . ’ होय, त्याच्या अजाणतेमुळे त्याजमध्ये इर्ष्या व साशंक भय वाढू लागते. यामुळे समर्थनाची प्रतिक्रिया उचल खाते. अशा या प्रवृत्त्यांचे निरिक्षण जेथे दिसून येते तेथे वडीलांना कशी मदत देता येईल?—नीतीसूत्रे १४:३०; २७:४.
९. विश्वास न राखणाऱ्या कोणा पतींच्या बाबतीत कोणता चतुर पवित्रा वापरला जाऊ शकतो, आणि याचा कोणता परिणाम दिसून येईल?
९ कदाचित वडीलांपैकी एकाला पतीसोबत व्यक्तीगत स्थरावर ओळख ठेवता येईल. (१ करिंथकर ९:१९-२३) पती विजेची कामे करणारा, सुतारकी, रंगारी असा कुशल गृहस्थ असेल. आपल्या या कुशलतेचा वापर, राज्य सभागृहातील विशिष्ठ कामे करावी म्हणून तो कदाचित तयार होईल. यामुळे राज्य सभागृहात सभेला उपस्थित राहण्याचे कोणतेही बंधन न येता तेथे काय काय चालते ते त्याला दिसू शकेल. बंधूंसोबत त्याचा चांगला परिचय झाल्यावर मग, आपल्या बायकोविषयीच्या त्याच्या वृत्तीत बदल घडेल, आणि सत्य त्याला मृदु बनवील. मंडळीतील प्रेम व सहकार्याचा आत्मा बघून तो स्वतःच आपल्या बायकोला सोबत घेऊन सभेला येऊ लागेल. मग, एकीमुळे दुसरी गोष्ट होऊन तो निदान थोडा वेळ तरी सभेत काय चालले आहे त्याचे श्रवण करील. याचा परिणाम तोही पवित्र शास्त्र अभ्यासाची विचारणा करायला वेळ लागणार नाही. हे सर्व काही घडू शकते व घडलेही आहे. होय, असे हजारो पती आज प्रेमामुळे व बायकोने दाखविलेल्या “भीड” यामुळे खऱ्या विश्वासात आले आहेत.—इफिसकर ५:३३.
आपल्या घराकडे लक्ष देणारी
१०, ११. लमुवेल राजाने सद्गुणी स्त्रीविषयीच्या कोणकोणत्या गुणांचे वर्णन केले? (प्रत्येक गुणाचा वेगवेगळा विचार करा.)
१० सद्गुणी स्त्री कशी असते त्याविषयी राजा लमुवेल याला आपल्या आईकडून उत्तम बोध मिळाला. (नीतीसूत्रे ३१:१) कष्टाळू बायको व माता याविषयीचे तिचे वर्णन नीतीसूत्रे ३१:१०-३१ मध्ये आहे व ते काळजीपर्वूक वाचलेच पाहिजे. देवाच्या नीतीमान तत्त्वांचा अवलंब करण्यात तसेच भीड प्रदर्शित करण्यामध्ये तिला अनुभव असावा हे स्पष्ट आहे.
११ लमुवेल लिहितो की, “सद्गुणी स्त्री” ही विश्वासपात्र, भरवशाची व निष्ठावंत असते. (वचने १०-१२) आपला पती व मुले यांना अन्न द्यावे व त्यांची काळजी घ्यावी म्हणून ती कष्टाने काम करते. (वचने १३-१९, २१, २४) खऱ्या गरजवंतांसाठी ती दयाळू व उदारशील असते. (वचन २०) आपणाठायी असणारी भीड व सुंदर वागणूक यामुळे ती आपल्या पतीच्या प्रतिष्ठेला साज चढविते. (वचन २३) ती चहाड्या व मानहानी करणारे वक्तव्य करीत फिरत नाही. उलटपक्षी, तिच्या जिव्हेकरवी दुसऱ्यांची उभारणी केली जाते, त्यांना समाधान दिले जाते. (वचन २६) ती आळशी नाही, त्यामुळे तिचे घर स्वच्छ व नीट असते. (वचन २७) (खरे पाहता, ख्रिश्चनांचे घर आपल्या वसाहतीत सर्वात स्वच्छ असल्याचे दिसून आले पाहिजे.) तिचा पती व मुले तिच्याविषयी कृतज्ञता व प्रशंसा उद्गारतात. बाहेरचे लोक सुद्धा तिच्या गुणांचे कौतुक करतात. (वचने २८, २९, ३१) तिचे सौंदर्य कातडीवरील नाही; ते ईश्वरी व्यक्तीत्व परिधान केलेल्या देवभिरु स्त्रियांचे सौंदर्य आहे.—वचन ३०.
सौम्य व शांत आत्मा
१२. कोणती गोष्ट “देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे,” व एक स्पॅनिश म्हण या मुद्याचे वर्णन कसे देते?
१२ या शेवटल्या गुणाचा प्रतिध्वनि पेत्राच्या सल्ल्यात दिसतो. त्याने ख्रिस्ती स्त्रियांना आपल्या बाह्य रुपावर अधिक भर न देण्याची सूचना दिली. तो आर्जवितोः “तुमची शोभा . . . जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंतःकरणातील गुप्त मनुष्पणाची, अविनाशी शोभा असावी.” (१ पेत्र ३:३, ४) “सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे,” या मुद्याकडे लक्ष द्या. ज्या ख्रिस्ती पत्नी व मातेकडे असा आत्मा आहे तो केवळ तिच्या पतीलाच संतुष्ट करतो असे नाही तर अधिक म्हणजे देवालाही संतुष्ट करतो. हेच प्राचीन काळातील विश्वासू स्त्रियांच्या बाबतीत दिसून आले. हे अंतस्थ सौंदर्य या स्पॅनिश म्हणीतही प्रवर्तित झाले आहेः ‘सुंदर स्त्री नुसत्या नेत्राला सुख देते; सद्गुणी स्त्री अंतःकरणाला संतुष्ट करते. आधीच्या प्रकारातील स्त्रीला आपण रत्न मानले तर नंतरच्या प्रकारातील स्त्री ही धनसंपत्ती आहे.’
१३. एखादी स्त्री आपल्या मुलांवर केवढा तजेला देणारा परिणाम घडवू शकते?
१३ ख्रिस्ती स्त्री आपल्या सबंध कुटुंबाला तजेला देणारी ठरु शकते. (पडताळा मत्तय ११:२८-३०) ती आपल्या पतीला आदर देत आहे असे मुले न्याहाळतील तेव्हा तेही हाच आदर पालकांबरोबर केलेल्या व्यवहारात तसेच बाहेरच्या लोकांसोबत प्रदर्शित करू लागतील. याचा परिणाम, ही मुले दयाळू व विचारशील आहेत हे दिसेल. तेव्हा मुले स्वतःच कामे करण्यास तयार आहेत हे दिसणे केवढे उत्साहवर्धक ठरते बरे! त्यांना ‘कामे करा, कामे करा’ अशी पराणी टोचण्याची पाळी येत नाही. त्यांचा निःस्वार्थपणा घरच्या समाधानास हातभार लावतो आणि आईकडून मिळालेली शाबासकी ही त्यांना धन्यता देते.
१४. शिस्त लावण्याची गरज कोणत्या आव्हानास सामोरे आणते?
१४ पण जेव्हा मुलांना शिस्त लावण्याची पाळी येते तेव्हा काय? पालकांप्रमाणे मुलेही चुका करतात. कधी कधी ते आज्ञा मानीत नाहीत. मुलांचा पिता घरी नसतो तेव्हा ख्रिस्ती आई ते कसे हाताळील? ती आपल्या मुलांच्या प्रतिष्ठेचा मान राखील का? किंवा ती आरडाओरडा करून, हातवारे करुन मुलांकडून आज्ञापालन करवून घेईल? बरे, मुले आवाजाच्या प्रखरतेमुळे शिकतात का? किंवा शांत तसेच विचारप्रवर्तक बोल मोठा परिणाम घडवतात?—इफिसकर ४:३१, ३२.
१५. मुलांच्या आज्ञाधारकपणाविषयी संशोधकांना काय आढळून आले आहे?
१५ मुलांचा आज्ञाधारकपणा याविषयी विचार मांडताना सायकॉलॉजी टुडे हे मासिक असे म्हणतेः “अलिकडच्याच संशोधनावरून हे दिसले की, तुम्ही जितक्या मोठ्याने ओरडून आपल्या मुलांना अमुक एक गोष्ट करू नका असे म्हणता तितक्या अधिकपणे ती मुले तुमचे न ऐकता जे करू नये म्हणून तुम्ही त्यांना सांगितले आहे तचे नेमके ते करतात.” उलटपक्षी, संशोधकांना आढळले आहे की, प्रौढ मृदु भाषेत बोलतात तेव्हा मुले विनातक्रार सांगितलेले काम करतात. अर्थात, हे खरे की मुलांना आज्ञा फर्मावून प्रक्षुब्ध करण्यापेक्षा त्यांच्यासोबत विचारविनिमय करणे हे खासपणे महत्त्वाचे आहे.—इफिसकर ६:४; १ पेत्र ४:८.
शारीरिक नातेसंबंधात आदर
१६. पतीच्या भावनिक गरजेला पत्नी कशी समज दाखवू शकते व यामुळे कोणता लाभ घडतो?
१६ बायकोची घडण ही नाजूक स्वरुपाची असल्यामुळे पतीने जसे तिच्याविषयी समज बाळगली पाहिजे ही अपेक्षा असते त्याचप्रमाणे बायकोने देखील पतीच्या भावनात्मक व लैंगिक गरजा समजून घेतल्या पाहिजेत. पवित्र शास्त्र दाखविते की, नवरा व बायकोने एकमेकांना आनंद दिला पाहिजे व एकमेकांची तृप्ती केली पाहिजे. यासाठी एकमेकांच्या गरजा व तऱ्हा यांजविषयी संवेदनाशील असले पाहिजे. परस्परांस लाभलेल्या तृप्तीमुळे डोळे इतरत्र भिरभिरण्याला व भटक्या वृत्तीला आळा घातला जातो.—नीतीसूत्रे ५:१५-२०.
१७. वैवाहिक देणे देण्याच्या बाबतीत पती व पत्नीने कसा दृष्टीकोण राखावा?
१७ जेथे परस्परांची संमती नांदते तेथे कोणीही दुसऱ्या विरुद्ध लैंगिक गरजेचा मानसिक सोट्यासारखा वापर करणार नाही. प्रत्येकाने आपल्या वैवाहिक सोबत्याला त्याचे देणे दिले पाहिजे, आणि काही तात्कालिक स्वरुपाचे वेगळेपण ठेवायचे आहे तर ते परस्परांच्या संमतीने होण्यास हवे. (१ करिंथकर ७:१-५) उदाहरणार्थ, पतीला कधी कधी वॉचटावर संस्थेच्या स्थानिक शाखा दप्तराच्या कार्यालयात इमारत बांधण्याच्या कामाला किंवा यासारख्या इतर काही ईश्वरशासित प्रकल्पासाठी जावे लागत असेल. अशा वेळी आपल्या बायकोची याला अंतःकरणपूर्वक संमती आहे याची त्याने खात्री केली पाहिजे. असे हे वेगळेपण कुटुंबाला आध्यात्मिक आशीर्वाद आणू शकते ते या अर्थी की, जेव्हा पती संध्याकाळी घरी येतो तेव्हा तो उत्साहवर्धक अनुभवांची सहभागिता त्यांजमध्ये करू शकतो.
भगिनींची महत्त्वपूर्ण भूमिका
१८. वडीलांच्या बायकोवर अधिक जबाबदारी का येते?
१८ जेथे ख्रिस्ती स्त्रीचा पती मंडळीत वडील असतो तेथे तिला भारी जबाबदारी येते. पहिली गोष्ट ही की, त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. मंडळीच्या आध्यात्मिक स्थितीच्या बाबतीत त्याला यहोवाला जाब द्यायचा असतो. (इब्रीयांस १३:१७) या कारणास्तव, वडीलांची बायको या नात्याने व शिवाय स्वतः वयाने प्रौढ असल्यास तिचे आदरयुक्त उदाहरण अत्यंत महत्त्वाचे आहे. (पडताळा १ तीमथ्य ५:९, १०; तीतास २:३-५.) वस्तुतः बहुतेक वडीलांच्या बायका आपल्या पतींना पाठबळ देण्याचे किती चांगले उदाहरण अनुसरीत आहेत! पतीला मंडळीच्या प्रकरणांची दखल घ्यावी लागत असते त्यामुळे तिची उत्सुकता वाढती असते. पण खरी निष्ठावंत व सुभक्ती राखणारी पत्नी मंडळीच्या प्रकरणात ढवळाढवळ करणार नाही.—१ पेत्र ४:१५.
१९. “घरची व्यवस्था चांगली ठेवणारा” या जबाबदारीत वडीलाने काय करणे समाविष्ठ आहे?
१९ पण तेच, बायकोने उभारणीकारक प्रवृत्त्यांचे प्रदर्शन केले नाही किंवा ती दुसऱ्या भगिनींसाठी चांगले उदाहरण ठेवीत नसेल तर तिला वडील असणाऱ्या तिच्या पतीने सल्ला देणे जरूरीचे आहे. “आपल्या घरची व्यवस्था चांगली ठेवणारा” यात घरातील केवळ मुलेच नव्हे तर स्वतः पत्नीही येते. या शास्त्रवचनीय दर्जाचे अवलंबन केल्यामुळे काही पत्न्यांच्या नम्रतेची परिक्षा घडून येईल.—१ तीमथ्य ३:४, ५, ११; इब्रीयांस १२:११.
२०. प्राचीन व आधुनिक काळातील विवाहीत व सड्या भगिनींच्या सुंदर उदाहरणांचा उल्लेख करा. (वॉचटावर पब्लिकेशन इंडेक्स १९३०-१९८५ मधून “यहोवाच्या साक्षीदारांच्या जीवन-कथा” पहा.)
२० मंडळीतील विवाहीत स्त्रियांच्या आदरणीय भूमिकेपासून विवाह न झालेल्या भगिनीही पुष्कळसे शिकू शकतात. शास्त्रवचनात तसेच आज मंडळ्यात विश्वासू स्त्रियांची सुंदर अशी किती उदाहरणे आहेत! दुर्कस, जी बहुधा सडी भगिनी असावी ती, तिच्या ‘सत्कृत्याविषयी’ नावाजलेली होती. (प्रे. कृत्ये ९:३६-४२) प्रिस्का व फीबी याही सत्याविषयी आवेशी होत्या. (रोमकर १६:१-४) याचप्रमाणे आजही आमच्या विवाहीत वा सड्या भगिनी अप्रतिम सुवार्तिक, पायनियर्स आणि प्रचारक आहेत. यासोबतच या सुभक्ती जोपासणाऱ्या स्त्रिया आपले घर स्वच्छ व नीट ठेवतात आणि आपल्या कुटुंबाकडे कधीच दुर्लक्ष करीत नाहीत. संख्या व परिस्थिती यामुळे त्या प्रचारकार्यात अधिक सहभाग घेत असल्याचे दिसते.—स्तोत्रसंहिता ६८:११.
२१. विश्वासू भगिनी आपल्या ख्रिस्ती बांधवांसाठी कशा उत्तेजन आहेत?
२१ मंडळीतील विश्वासू भगिनी महत्त्वपूर्ण व उभारणीकारक भूमिका खरेपणाने पूर्ण करीत आहेत. त्यांच्याठायी असणारा आवेश व त्यांचे उदाहरण बांधवांसाठी तसेच मंडळीतील सर्वांना उत्तेजक आहे. त्या खऱ्याच अनुरुप व साहाय्यक आहेत. (पडताळा उत्पत्ती २:१८.) यासाठी त्यांना किती खरे प्रेम व आदर दाखविण्यास हवा! ख्रिस्ती वैवाहिक सोबत्यासाठी पौलाची ही सूचना अगदीच समर्पक आहेः “तुम्हातील प्रत्येकाने जशी स्वतःवर तशी आपल्या पत्नीवर प्रीती करावी; आणि पत्नीने आपल्या पतीची भीड राखावी.”—इफिसकर ५:३३
तुम्हाला आठवते का?
◻ परिपूर्ण मानव व त्याच्या बायकोविषयी देवाच्या मूळच्या भूमिका कोणत्या होत्या?
◻ विश्वास न राखणाऱ्या पतीला सत्यामध्ये कसे मिळवून घेता येऊ शकते?
◻ सद्गुणी स्त्रीठायी असणारे उल्लेखनीय गुण कोणते?
◻ ख्रिस्ती स्त्रीला शांत व सौम्य आत्मा कसा प्रदर्शित करता येऊ शकेल?
◻ जोडप्यामध्ये शारीरिक नातेसंबंधाच्या बाबतीत कोणता तोल राखला जाण्यास हवा?
[२२ पानांवरील चित्रं]
जहाजावरील दोन स्पर्धक कप्तानासारखे कुटुंब असू नये
[२४ पानांवरील चित्रं]
बायको सभेला जाते किंवा दुसऱ्या कोणत्या तरी ख्रिस्ती कार्यात सहभागी होते म्हणून विश्वासात नसलेल्या पतीला इर्ष्या तसेच साशंक भय वाटण्याची शक्यता आहे. अशावेळी त्याची कशी मदत केली जाऊ शकते?