शास्त्रवचनांमधील धडेः ओबद्या १-२१
तुम्हावर परिणाम करणारे इश्वरी इशारे
“जोकोणी तुम्हास स्पर्श करील तो माझ्या बुबुळालाच स्पर्श करील.” (जखर्या २:८) हे अनिष्टसूचक शब्द सर्वांसाठी सावधानतेचा हा संदेश देतातः जगातील राष्ट्रे आपल्या लोकांना कशी वागणूक देत आहेत हे यहोवा पहात आहे. अशा या इश्वरी इशाऱ्याला राष्ट्रे जेव्हा वाऱ्यावर भिरकावतात आणि देवाच्या लोकांना घातकी स्पर्श करतात तेव्हा काय घडते? इब्री शास्त्रवचनातील सर्वात लहान पुस्तक ओबद्या याचे उत्तर देते.
अदोमासाठी अरिष्ट
यहोवाच्या न्यायदंडापासून कोणीही सुटत नाही. ओबद्याने इ. स. पू. ६०७ मध्ये संदेश कथन केला आणि सांगितले की अदोमाला आपली सुरक्षित स्थिती “ताऱ्या”इतकी उच्च वाटत असली तरी त्याला हुसकून दिले जाईल. या पवित्र शास्त्र लेखकाचे व्यक्तिगत जीवन या लिखाणात प्रकट होत नसले तरी तो “यहोवाचा सेवक” ह्या त्याच्या नावाप्रमाणे जगला असे म्हणता येईल. ते कसे? विनाशकारी न्यायाची घोषणा करण्याने. अदोमाचे पतन घडेल तेव्हा त्याच्याशी करारात असलेले त्याचे मित्र त्याला लुटतील. त्याचा कोणी शहाणा आणि शूर माणूस बचावू शकणार नाही.—१-९.
देवाच्या लोकांवर हिंसाचार केल्याचा दोष असलेल्यांवर तो अरिष्ट आणतो. अदोमच्या अरिष्टामागील कारण काय होते? त्यांचे भाऊबंद म्हणजे याकोबपुत्र यांजवर त्यांनी वारंवार केलेला हिंसाचार. एसावाचे वंशज म्हणून अदोमी लोक इस्राएलांचे नातेवाईक होते. तरीही आपल्या नातेवाईकांना लुटणे, यरुशलेमाचा पाडाव झाल्यावर कुत्सिकपणे हास्य करणे आणि बचावलेल्या लोकांना शत्रुच्या हाती देणे हा त्यांचा आरोप होता. यामुळेच अदोमावर नाशाचा शिक्कामोर्तब झाला.—१०-१६.
याकोबाच्या घराण्याचे पुनर्वसन
यहोवाची अभिवचने नेहमी विश्वसनीय असतात. ओबद्याच्या काळी यहोवाने ही खात्री दिली की, त्याचे लोक पुन्हा त्यांच्या देशी स्थापित होतील व अधिक मिळवतील. इस्राएलास पुन्हा विभागले जाणार नाही. याकोबाचे घराणे, यहुदाचे दोन वंशीय राज्य योसेफाच्या घराण्यासोबत दहा वंशीय उत्तरेकडील राज्यासोबत पुन्हा एक होईल. अग्नी धसकट खाऊन टाकतो त्याप्रमाणे अदोमाचा भाग व्यापण्यात येईल. उत्तेजनपर समारोपात ओबद्या घोषित करतो की, मायदेशी परतलेले इस्राएल आपल्या देवाची ऐक्याने भक्ती करतील व त्याची प्रजा बनतील. राज्यपद हे खरोखरी यहोवाचे बनेल.—१७-२१.
आजच्यासाठी धडाः इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे अनिष्टकारक फलप्राप्ति देते. तद्वत, ओबद्याने अदोमास जो कडक इशारा वदविला त्याने आधुनिक काळच्या देवाच्या विरोधकांच्या कानात प्रतिध्वनि उमटवावाः यहोवा व त्याच्या लोकांविरुद्ध लढणाऱ्या सर्वांना छाटण्यात येईल.
शास्त्रवचनातील धडेः योना १:१—४:११
अरिष्ट टाळा! दया प्राप्त करा! कशी? २,८०० वर्षांआधी घडलेलल्या खऱ्या घटनेपासून मिळणाऱ्या धड्याकडे लक्ष देऊन. हे योनाचे पुस्तक आहे ज्यात ती घटना लिखित आहे. ते इ. स. पू. ८४४ च्या सुमारास गालीलातील योना नामक संदेष्ट्याने लिहिले. ते आध्यात्मिक अंतर्दृष्टीने भरलेले आहे.
योना पळून जातो
यहोवाच्या सेवेत आम्हास पाठिंबा मिळावा याकरता आम्ही त्याच्यावर विसंबून राहण्यास हवे. तथापि योना, यहोवा आपल्याला पाठिंबा देईल हे न मानता इश्वरी नेमणूकीपासून पळ काढतो. त्याची नेमणूक सोपी नव्हती हे खरे आहे. त्याला निर्लज्ज व दुष्ट निनवेकरांना इश्वरी अरिष्टाचा इशारा द्यावयाचा होता. पण योना विरुद्ध दिशेने तार्शीशकडे म्हणजे सध्याच्या स्पेनकडे जाणाऱ्या जहाजात बसतो. प्रवासात वादळ येते आणि ते इतके क्रुद्ध बनते की जहाज व प्रवाश्यांचे जिवंत वाचणे अशक्य भासविते. योना कबुल होतो. जहाजाचे चालक त्याला फेकून देतात तेव्हा समुद्र शांत होतो. एक प्रचंड मासा संदेष्ट्याला गिळतो.—१:१-१७.
देव आपल्या प्रार्थनांची उत्तरे देईल असा आत्मविश्वास त्याच्या सेवकांना बाळगता येईल. माश्याच्या पोटात योना यहोवाकडे मदतीसाठी याचना करतो, जलमय कबरेतून सुटका दिल्याबद्दल त्याचे आभार मानतो आणि त्याने केलेले नवस फेडण्याचे अभिवचन देतो. काही काळातच त्याला तो मासा कोरड्या जमिनीवर परत ओकून टाकतो.—२:१-१०.
योना निनवेस जातो
यहोवापासून मिळालेली नेमणूक कधीही त्यागू नका. हा धडा शिकायला मिळाल्यावर पूर्वी का कू करणारा हा संदेष्टा आता “मोठ्या शहरास” प्रचार करतो. योना अगदी साधेपणात पण स्पष्ट रुपाने हा इशारा घोषित करतोः “चाळीस दिवसांचा अवकाश आहे, मग निनवे धुळीस मिळेल.” याचा अगदी विलक्षण परिणाम घडतो. निनवे पश्चाताप करते आणि विनाश टळतो.—३:१-१०.
मानव देवाच्या दयेस मर्यादा घालू शकत नाही. निनवेवर काही अरिष्ट आणले नाही म्हणून योनाचा राग भडकतो. परंतु एका वेलीच्या सहाय्याने यहोवा योनास शिकवितो की, तो त्याला मर्जीस येईल त्यानुसार दया दाखवितो.—४:१-११.
आजच्यासाठी धडाः इश्वरी भविष्यवादाकडे लक्ष दिल्यामुळे अरिष्ट टाळता येते! निनव्यांचे अनुकरण करा. योनापेक्षा श्रेष्ठ असणारा संदेष्टा येशू ख्रिस्त याचे नम्रपणे ऐका.—लूक ११:३२.
[२९ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
● ७—पवित्र शास्त्र काळी कोणासोबत एकत्र ‘अन्न खाणे’ हे प्रत्यक्षात मित्रत्वाचा करार करणे असे समजले जाई. केवढे उपरोधिक! अदोमाबरोबर “करारमदार केले”ले म्हणजेच बाबेलोन त्याचे नाशकर्ते असणारे शाबीत होतील. हे खरे की, नबुखद्नेस्सराच्या काळी बाबेलोनने यरुशलेमाच्या विध्वंसानंतर यहुदाच्या लूटीत अदोमास हिस्सा घेण्यास वाव दिला. तरीपण नंतर बाबेलोनचा राजा नबोनिडस याने अदोमाच्या व्यापारी व आर्थिक महत्वाकांक्षा उपटून काढल्या.
● १०—अदोमने त्याचे बंधु राष्ट्र “यहुदाचे पुत्र” याविषयी कुत्सिक द्वेष आणि जिव्हाळ्याचा अभाव दाखविला होता यामुळे त्याला “कायमचे नष्ट” व्हावे लागणार होते. (वचन १२) अशा या राष्ट्रीय विनाशाचा अर्थ, अदोमचे राज्य, त्याचे सरकार आणि विशिष्ट भौगोलिक स्थानावर असणारी त्याची लोकवस्ती ही भूतलावरुन नष्ट होणार. आज ओळख पटण्यासारखे अदोमी राष्ट्रातील कोणी लोक दिसत नाहीत. खरेच, ‘ते होते का नव्हते असे झाले आहेत.’—वचन १६.
[३० पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
● १:१७—व्हेल माशाचे डोके व अन्ननलिका मोठे असल्यामुळे त्याला मनुष्यास गिळता येते. भूमध्य समुद्रात व्हेल मासे दुर्मिळ असले तरी एकदा योप्पा येथे गोदीत व्हेल मासा लागला. भूमध्य समुद्रात जहाजांचा पाठलाग करुन जे काही फेकले जाते ते हडप करणारा प्रचंड शार्क पांढरा मासा ज्ञात आहे. तो देखील सबंध माणसाला गिळण्यास समर्थ आहे. परंतु, योनाच्या प्रकरणात देवाने “प्रचंड मासा” किंवा असा एखादा प्राणी, जो अद्याप आधुनिक विज्ञानशास्त्राला कदाचित ज्ञात नसावा, त्याचा उपयोग केला होता.
● २:१, २—योना “मत्स्याच्या पोटात” असताना काव्य करण्याच्या स्थितीत नव्हता. परंतु नंतर त्याने आपल्या अनुभवाचा वृत्तांत लिहिला. स्तोत्रात प्रतिध्वनित असणारे शब्द त्याने आपल्या अंतःकरणापासून काढले होते व ते त्याच्या भावना व्यक्त करतात—२:२ चा स्तोत्रसंहिता १२०:१ व १३०:१; आणि २:५ चा स्तोत्रसंहिता ६९:१ बरोबर पडताळा करा.
● ३:३—निनवेच्या भूप्रदेशाच्या क्षेत्रफळाची अतिशयोक्ती केलेली नाही. तिजसभोवताली असणारा तट केवळ ८ मैल लांबीच्या परिघाचा होता तरी शहराच्या नावात उपनगरेही समाविष्ट असावीत हे उघड आहे, ज्यामुळे ते अंतर २६ मैलांचे बनते.
● ३:१०—“अनुताप पावणे” यास असणाऱ्या इब्री शब्दाचा अर्थ, “गत (किंवा ठरविलेल्या) गोष्टींविषयीची हालचाल करण्याविषयी मन बदलणे” असा आहे. अशाप्रकारे, चुका करणारे मानव खरोखरी पश्चाताप करतात तेव्हा यहोवा त्यांच्यावर शिक्षा बजाविण्याविषयीचे आपले मन बदलू शकतो वा ‘अनुताप पावू शकतो.’