शास्त्रवचनातील धडेः मीखा १:१—७:२०
यहोवाचा न्याय व त्याचे नाव उंचावले जाते
इस्राएल व यहुदा या देशात मूर्तिपूजा व अन्याय चालू असताना मीखा संदेष्टा इ. स. पू. ८ व्या शतकात जिवंत होता. आज जी परिस्थिती हयात आहे ती त्या काळच्या परिस्थितीशी इतकी सदृश्य आहे की मीखाने वदिलेले संदेश व त्याने घोषित केलेले इशारे आमच्या काळासाठी उपयुक्त वाटतात. याशिवाय त्याने दिलेल्या सरळ वार्ता आम्हाला आजच्या सैतानाकरवी प्रभुत्व गाजविलेल्या जगात असताना खरी आशा देतात.—१ योहान ५:१९.
मीखाचा संदेश आम्हाला सारांशरित्या कदाचित त्याच्या या शब्दात सांगता येईलः “जे . . . दुष्टतेची योजना करतात त्यांस धिक्कार असो.” “न्यायाने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे याशिवाय यहोवा तुजजवळ काय मागतो?” “आम्ही यहोवा आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.”—मीखा २:१; ६:८; ४:५.
मूर्तिपूजेचा धिक्कार
यहोवा पातक्यांचे सर्वदा सहन करीत नाही. इस्राएल व यहुदामध्ये मूर्तिपूजा आणि बंड प्रचलित आहेत. याकारणास्तव यहोवा त्यांच्याविरुद्ध आहे. त्यांच्या मूर्त्या चिरडल्या जातील. मूर्तिपूजकांचे “गिधाडाप्रमाणे टक्कल होणार” व ते बंदिवान होऊन जाणार.—१:१-१६.
निष्ठावंतांसाठी यहोवा आशेचा देव आहे. अनियंत्रित जुलुमाची योजना करणाऱ्यांना चोर व लुटारु या अर्थाने धिक्कारण्यात आले आहे. त्यांच्यावर आपत्ती कोसळेल. तरीही, ‘इस्राएलाच्या अवशेषा’ला पुनर्वसनाचे अभिवचन देण्यात आले आहे. “मी त्यांस बस्राच्या मेंढराप्रमाणे एकत्र करीन,” असे यहोवा म्हणतो.—२:१-१३.
आपल्या लोकात जबाबदारी घेऊन आहेत त्यांच्याकडून यहोवा न्यायाची वागणूक अपेक्षितो. इस्राएलाच्या निंद्य सरदारांना असे म्हटले आहेः “न्यायाची जाणीव तुम्हाला नसावी काय? तुम्ही बऱ्याचा द्वेष करता आणि वाईटाची आवड धरता; तुम्ही लोकांचे कातडे सोलून काढता आणि त्यांच्या हाडावरच्या मांसाचे लचके तोडता.” मीखा “यहोवाच्या आत्म्याने, सामर्थ्याने व न्यायाने” या लोकांविरुद्ध यहोवाची दंडाज्ञा घोषित करतो. तो म्हणतो की, अन्यायी सरदार लाचेसाठी न्याय करतात, याजक पैसे मिळविण्यासाठी लोकांना शिक्षण देतात आणि संदेष्टेही आर्थिक लाभासाठी भविष्यकथन सांगतात. यासाठीच, यरुशलेम “नासधुशीचा ढीग होईल.”—३:१-१२.
आशेचा संदेश
खरी उपासना सर्व पृथ्वीभरात आचरली जाईल. मीखा भविष्यवाणी करतो की, “शेवटल्या दिवसात” पुष्कळ राष्ट्रातील लोकांना यहोवाच्या मार्गांचे शिक्षण मिळणार. देव न्याय करील आणि पुढे युद्ध नसणार. खरे उपासक ‘त्यांचा देव यहोवा याच्या नामाने सदासर्वकाळ चालतील.’ हद्दपारी व वेदना असल्या तरीही त्याचे लोक आपल्या शत्रूंच्या हातातून मुक्त होतील.—४:१-१३.
देवाने अभिवचन दिलेल्या मुक्तीदात्यावर आम्ही आत्मविश्वास ठेवू शकतो. बेथलहेमातून आलेला शास्ता यहोवाच्या बळाने कळप चारील. ‘अश्शुरापासूनची सुटका’ भाकित करण्यात आली. खऱ्या उपासकांचा शेष दहिंवर आणि गवतावर पडणाऱ्या पर्जन्यासारखे बनतील, आणि सर्व प्रकारातील खोटा धर्म आणि भूतविद्या काढून टाकली जाईल.—५:१-१५.
यहोवाचा न्याय टिकून राहील
लोकांनी आपल्या न्यायी व नीतीमान दर्जांनुरुप जगावे अशी यहोवा अपेक्षा करतो. घाणेरडी उपासना मिळावी असे त्याने काय केले? त्याने तर आपल्या लोकांसाठी चांगले तेच केले. तर मग, ‘नीतीने वागणे, आवडीने दया करणे व आपल्या देवासमागमे राहून नम्रभावाने चालणे यावाचून यहोवा त्यांच्याकडे काय मागतो?’ ते आपला दुष्ट आचार आणि लुबाडणूक करीतच राहिले तर प्रतिकूल न्यायदंडाशिवाय त्यांना कसलीही अपेक्षा धरता येणार नाही.—६:१-१६.
यहोवाचा न्याय व त्याची दया यावर आम्ही भाव ठेवला पाहिजे. कुटुंबातील सदस्य देखील वैरी बनतील. पण मीखा म्हणतोः “मी आपल्या तारण करणाऱ्या देवाची वाट पाहात राहीन; माझा देव माझे ऐकेल.” संदेष्टा यहोवाच्या न्यायावर भाव ठेवून आहे. “तो आपला राग सर्वकाळ मनात ठेवणार नाही” हे त्याला ठाऊक आहे, कारण “त्याला दया करण्यात आनंद वाटतो.”—७:१-२०.
आजच्यासाठी धडाः लोकांनी न्यायाने वागणूक करावी असे यहोवा अपेक्षितो. व्यापारी देवाणघेवाण करण्याच्या संदर्भात ख्रिश्चनाने स्वतःला असे काही विचारावेः ‘दगलबाजीची तागडी ठेवून, खोट्या वजनांची थैली बाळगून मी नैतिकदृष्ट्या शुद्ध ठरणार काय?’ (६:११) या शेवटल्या दिवसात यहोवाच्या सर्व लोकांनी त्याच्या पृथ्वीवरील संस्थेच्या ऐक्यास हातभार लावला पाहिजे आणि शांतीच्या मार्गाचे शिक्षण स्विकारले पाहिजे. यहोवाचे नाम उंचावण्यात आणि त्याची खरी भक्ती वाढविण्यासाठी आम्ही होता होईल तेवढे करण्याची आवश्यकता आहे.—२:१२; ४:१-४.
[३२ पानावरील चौकट]
पवित्र शास्त्र वचनांचे परिक्षण
● १:१६—इस्राएलात डोक्याला टक्कल असणे ही गोष्ट लज्जा, शोक आणि दुःख याजशी संबंधित होती. (यशया ३:२४-२६; १५:२, ३; यिर्मया ४७:५) काही मूर्तिपूजक राष्ट्रांनी, कोणी नातेवाईक मृत झाल्यास त्यासाठी दुःख व्यक्त करावे म्हणून डोके भादरावे ही प्रथा चालू ठेवली होती. नैसर्गिकरित्या डोक्याला टक्कल पडणे हे नियमशास्त्रात अशुद्ध असे जमेस धरले जात नव्हते, पण इस्राएल “यहोवासाठी पवित्र लोक” होते म्हणून त्यांनी शोकासाठी आपले डोके भादरायचे नव्हते. (अनुवाद १४:१, २) तरीपण मीखाने इस्राएल व यहुदाला केसाचे वपन करण्यास सांगितले ते यासाठी की, त्यांच्या पापीष्ठ मूर्तिपूजक मार्गाक्रमणामुळे ते आता पवित्र लोक राहिले नव्हते व यामुळेच त्यांनी स्वतःला व आपल्या मुलांना बंदिवान होण्यास पात्र केले होते. येथे संदर्भित असणारा “गिधाड” हा शब्द कदाचित, ज्याच्या डोक्याच्या खाली केवळ मऊ केस आहेत त्या प्राण्यास अनुलक्षून असावा. तो गरुडाच्या जातीतील नसला तरी त्याच कुटुंबातील समजला जातो.
● २:१२—हे शब्द आज आध्यात्मिक इस्राएलात पूर्ण होत आहेत. (गलतीकर ६:१६) मोठ्या बाबेलीच्या बंदिवासातून बाहेर पडण्याचा मार्ग आध्यात्मिक इस्राएलांना खासपणे १९१९ पासून मोकळा झाला. (प्रकटीकरण १८:२) मीखाने भाकित केले त्याप्रमाणे ‘बस्राच्या मेंढरांप्रमाणे, कुरणामधल्या कळपाप्रमाणे’ त्यांना एकत्रित करण्यात आले. १९३५ पासून यांना “दुसरी मेंढरे” यांचा “मोठा लोकसमुदाय” येऊन मिळाला असल्यामुळे ते खरेच ‘गजबजू’ लागले आहेत.—प्रकटीकरण ७:९; योहान १०:१६.
● ३:१-३—येथे यहोवा हा दयाळू मेंढपाळ आणि मीखाच्या काळातील देवाच्या प्राचीन लोकातील क्रुर सरदार यांची मोठी तफावत वर्णिली आहे. न्याय आचरुन ते कळपाचे रक्षण करण्याच्या कामात अपयशी ठरले. मेंढरांसमान असणाऱ्या लोकांची लुबाडणूक ते त्यांची लोकर काढून नव्हे तर क्रूर लांडग्याप्रमाणे त्यांचे कातडे सोलून करीत होते. दुष्ट मेंढपाळ लोकांना न्याय मिळवून देत नव्हते तर त्यांचा ‘रक्तपात घडवून’ आणीत होते. (३:१०) न्यायाचा विपर्यास करुन ते अजाणांकडून त्यांची घरे व त्यांची उपजिविका लुटीत.—२:२; पडताळा यहेज्केल ३४:१-५.
● ४:३—हे “बहुत लोक” व “बलवान राष्ट्रे” राजकीय राष्ट्रे आणि सरकार नाहीत. तर ते सर्व राष्ट्रातील विशिष्ठ लोक आहेत जे राष्ट्रीयवाद सोडून देतात आणि यहोवाच्या खऱ्या उपासनेच्या पर्वतावर होत असलेल्या ऐक्याच्या सेवेकडे वळत आहेत. (यशया २:२-४) देवाच्या राज्यासाठी आपले स्थान घेणाऱ्या या विश्वासधारकांसाठी यहोवा आध्यात्मिक मार्गाने ‘न्यायनिवाडा करतो आणि इनसाफ ठरवितो.’ “मोठा लोकसमुदाय” याचे हे लोक आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करुन आणि यहोवाच्या आपल्या सहसाक्षीदारांसोबत शांतीचे जीवन व्यतित करून इश्वरी न्यायाची पूर्तता करतात.
● ५:२—बेथलेहेम या नावाची दोन गावे असल्यामुळे या बेथलेहेमचा बेथलेहेम एफ्राथा असा उल्लेख करण्यात असावा. मीखा यरुशलेमाच्या दक्षिणेकडे यहुदात असणाऱ्या बेथलेहेमचा संदर्भ उल्लेखित आहे. दुसरे बेथलेहेम उत्तरेकडे जबुलूनमध्ये आहे. (यहोशवा १९:१०, १५) “एफ्राथा” किंवा “एफ्राथ” हे यहुदातील किंवा त्याच्या सभोवार असणाऱ्या बेथलेहेमाचे पूर्वीचे नाव होते. (उत्पत्ती ४८:७; रुथ ४:११) अशी ही स्पष्ट ओळख, देवाने मशीहाविषयी जी भविष्यवादित अभिवचने दिली त्याची अचूकता दाखविते.
● ६:८—मीखा येथे पाप क्षालनाच्या यज्ञाचे मूल्य कमी करीत नव्हता, पण यहोवाच्या दृष्टीने खरे मोलवान ते काय त्याची ठळकपणे माहिती देत होता. (पडताळा अनुवाद १०:१२.) यहोवाने यज्ञार्पणांचा स्विकार करावयाचा आहे तर पाप्याने न्याय, दया आणि नम्रभाव हे गुण दाखविणे जरुरीचे होते. आज, यहोवा हेच गुण आमच्या सेवेत न्याहाळतो.—१ करिंथकर १३:४-८.
● ७:४—काटेरी झुडुप हे असे झाड आहे जे कपडे फाडते आणि मांस ओढून काढते. मीखा याकरवी त्याच्या काळी राष्ट्र किती नैतिक अधोगतीत गेले होते त्याचे वर्णन देत होता. याकरवी त्याने हे स्पष्ट केले की मार्गभ्रष्ट झालेल्या इस्राएलातील चांगल्यातला चांगला देखील, काटेरी झाड जसे त्याच्याजवळ येणाऱ्यास बोचते त्याप्रमाणे बोचक होता.
[३१ पानांवरील चित्रं]
मीखाने येशूच्या जन्मस्थानाचे भाकित केले