यहोवाची मर्जी कोणावर बसेल?
“आपले तारण साधून घ्या; कारण इच्छा करणे व कृति करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पानुसार साधून देणारा तो देव आहे.”—फिलिप्पैकरांस पत्र २:१२, १३.
१, २. येशूला कोणत्या परिस्थितीत ईश्वरी मर्जीची घोषणा ऐकायला मिळाली, आणि हे आम्हाला आस्थेचे का वाटावे?
तो इतिहासाला वळण देणारा काळ होता. बाप्तिस्मा करणारा योहान यावेळी देवाच्या संदेशाचा प्रचार करीत होता आणि पश्चातापी जनांना पाण्यात बाप्तिस्मा देत होता. तेव्हा एक माणूस त्याच्यासमोर आला. योहानाला ठाऊक होते की हा माणूस नीतीमान आहे. तो येशू होता. त्याच्याठायी पश्चाताप करण्याजोगे असे कसलेही पाप नव्हते. तरीही तो योहानाला म्हणाला की, “ह्या प्रकारे सर्व धर्माचरण पूर्णपणे करणे हे आपणाला उचित आहे” यासाठी त्याचा बाप्तिस्मा होण्यास हवा.—मत्तय ३:१-१५.
२ योहानाने ती विनंती मान्य केली आणि येशूचा बाप्तिस्मा झाला. येशू पाण्यातून वर येत असता असे झाले की, “आकाश उघडले; तेव्हा त्याने परमेश्वराचा आत्मा कबुतरासारखा उतरताना व आपणावर येताना पाहिला.” याशिवाय, “आकाशातून अशी वाणी झाली की, ‘हा माझा पुत्र मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.’” (मत्तय ३:१६, १७; मार्क १:११) केवढी ही उदात्त घोषणा! आम्हाला ज्यांच्याविषयी आदर वाटतो त्यांना संतुष्ट करावे असे आपल्याला मनापासून वाटत असते. (प्रे. कृत्ये ६:३-६; १६:१, २; फिलिप्पैकरांस २:१९-२२; मत्तय २५:२१) तर मग, सर्वसमर्थ देवाने तुम्हालाच म्हटले की, ‘माझी मर्जी तुझ्यावर आहे’, तेव्हा तुम्हाला कसे वाटेल याचा विचार करा!
३. देवाची मर्जी मिळविण्याच्या बाबतीत आम्हाला कसली काळजी असावी?
३ आज कोणा माणसाला देवाची मर्जी लाभू शकते का? उदाहरणार्थ, अशा माणसाला विचारात घ्या की, ‘जो या जगात आशाहीन व देवविरहीत आहे’ आणि तो ‘देवाच्या जीवनाला पारखा झालेला आहे.’ (इफिसकर २:१२; ४:१८) हा माणूस अशा परिस्थितीतून निघून यहोवाची मर्जी लाभलेल्या आशीर्वादित स्थितीत येऊ शकतो का? होय, तर कसा? आपण पाहू या.
त्याच्या शब्दांचा काय अर्थ होतो?
४. (अ) देवाच्या घोषणेत “संतुष्ट”ता हा जो शब्द वापरण्यात आला आहे त्या ग्रीक शब्दाचा काय अर्थ होतो? (ब) या विशिष्ट प्रकारात त्या शब्दाचा केलेला वापर मनोवेधक का आहे?
४ “मी [येशू]विषयी संतुष्ट आहे,” या देवाच्या शब्दांच्या शुभवर्तमानातील लिखाणात यु·डो·केʹओ या ग्रीक क्रियापदाचा वापर आहे. (मत्तय ३:१७; मार्क १:११; लूक ३:२२) याचा अर्थ, “संतुष्ट होणे, मर्जी दाखविणे, विषयी आनंद पावणे” असा आहे आणि याच्या नामाच्या प्रकारात “सदिच्छा, संतुष्टता, मर्जी, इच्छा, मनोभावना” हा अर्थ येतो. यु·डो·केʹओ केवळ ईश्वरी मर्जीपुरताच मर्यादित नाही. उदाहरणार्थ, मासेदोनियातील ख्रिस्तीजनांना इतरांसोबत आर्थिक सहभागी करण्याचे “बरे वाटले.” (रोमकर १०:१; १५:२६; २ करिंथकर ५:८; १ थेस्सलनीकाकर २:८; ३:१) येशूला ही पसंती माणसांकडून नव्हे तर देवाकडून मिळाली होती. आणि ती संज्ञा येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर वापरण्यात आली. (मत्तय १७:५; २ पेत्र १:१७) मनोवेधक गोष्ट ही की, लूक २:५२ जेव्हा येशूविषयी भाष्य करते की तो बाप्तिस्मा न झालेला युवक असताना त्याला देव व माणसांची ‘कृपा लाभली’, तेव्हा ते खा’रीस हा वेगळाच शब्दप्रयोग वापरते.
५. (अ) अपूर्ण मानवाला देवाची मर्जी संपादता येते हे कसे दिसते? (ब) कोण “सदिच्छाप्राप्त मानव” आहेत?
५ पण मग, आम्हासारख्या अपूर्ण मानवांना देवाची मर्जी संपादता येणे शक्य आहे का? याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. येशूचा जन्म झाला त्यावेळी देवदूतांनी अशी घोषणा केलीः “उर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्यांच्यावर त्याचा प्रसाद [यु·डो·कीʹआस] झाला आहे त्या मनुष्यांत शांती.” (लूक २:१४) शब्दशः ग्रीक भाषेत ते वाचताना देवदूत “चांगल्या विचारांच्या मानवांना” किंवा “देवाची मर्जी बसली आहे त्या मानवांना” आशीर्वाद येत असल्याचे गायन केल्याचे वाचावयास मिळते.a एन ॲनथ्रो’पोईस यु·डो·कीʹआस शब्दाच्या वापराविषयी प्राध्यापक हान्स बिटेनहार्ड लिहीतातः “ही संज्ञा देवाची मर्जी लाभलेल्या मानवाविषयी भाष्य करते. . . . यामुळेच येथे मानवाची सदिच्छा मिळविण्याविषयीचे प्रकरण नाही. . . . आम्ही येथे देवाचे सार्वभौमत्व आणि त्याची उदात्त इच्छा याविषयी समजू शकतो कारण तीच लोकांना तारणासाठी निवडत असते.” अशाप्रकारे यहोवाच्या साक्षीदारांनी बऱ्याच आधीपासून हे प्रतिपादले आहे की, लूक २:१४ हे दाखविते की, केवळ समर्पण व बाप्तिस्म्याद्वारे अपूर्ण मानवाला सदिच्छाप्राप्त लोक किंवा देवाची मर्जी लाभलेले लोक असे बनता येते.b
६. देवाच्या मर्जीविषयी आम्ही आणखी काय शिकण्याची गरज आहे?
६ तरीपण तुम्हाला याची कदाचित जाणीव असेल की ‘दुष्कर्मे करीत मनाने देवाचे वैरी होणे’ आणि न्यायी व सूज्ञ देवाचे सहकर्मी या नात्याने त्याची मर्जी लाभणे यात किती फरक आहे. (कलस्सैकर १:२१; स्तोत्रसंहिता १५:१-५) तद्वत, मानव हा मर्जीतला होऊ शकतो हे कळले असले तरी त्यात काय समाविष्ट असते ते तुम्ही जाणून घेण्यास हवे. याविषयीची माहिती आपल्याला देवाच्या गतकाळच्या दळणवळणामुळे कळू शकते.
त्याने लोकांचे स्वागत केले
७. देवाच्या प्रवृत्तीविषयी निर्गम १२:३८ कोणता संकेत देते?
७ लूक २:१४ मध्ये लिखित असणारी घोषणा होण्याच्या कित्येक शतकेआधी यहोवाने लोकांना सामोरे येऊन त्याची उपासना करण्याचे निमंत्रण दिले. अर्थातच, देवाने सर्वतोपरि इस्राएल राष्ट्रासोबत दळणवळण राखले होते कारण ते त्याला समर्पित होते. (निर्गम १९:५-८; ३१:१६, १७) तरीपण हे लक्षात घ्या की, जेव्हा इस्राएल लोक मिसरच्या दास्यातून बाहेर पडले तेव्हा “त्यांच्याबरोबर एक मोठा मिश्र समुदाय पण गेला.” (निर्गम १२:३८) त्या इस्राएलेत्तर लोकांनी देवाच्या लोकांसोबत दळणवळण ठेवले होते आणि त्यांनी मिसरावर आलेल्या पीडा अनुभवल्या होत्या तेव्हा आता त्यांनी इस्राएलांसोबत जाण्याचे पसंद केले होते. यांचेपैकी काही यहुदी धर्मात परिवर्तित झाले असावेत.
८. इस्राएलात कोणत्या दोन प्रकारातील परकीय वसाहतीस होते, आणि इस्राएली अशांसोबत जे दळणवळण राखीत त्यांच्यात फरक का होता?
८ देव आणि त्याचे लोक यांच्या अनुषंगाने इस्राएल नसलेल्या लोकांची स्थिती कशी होती त्याची दखल नियमशास्त्र कराराने घेतलेली होती. काही परकीय इस्राएलांच्या देशात वस्तीस होते पण यांना खून तसेच शब्बाथपालन यासारख्या मूलभूत नियमांचे पालन करावे लागे. (नेहम्या १३:१६-२१) या निवासितांना आपले भाऊ याअर्थी कवटाळण्याऐवजी इस्राएल लोक यांच्याशी बोलताना वा काही व्यवहार करताना मोठी दक्षता घेत; याचे कारण हे की ते लोक अद्याप देवाच्या राष्ट्राचे एक भाग बनले नव्हते. याविषयीचे उदाहरण हे की, कोणा इस्राएलाला स्वतःहून मेलेल्या प्राण्याच्या शवाचे मांस विकत घेण्याची वा खाण्याची मनाई होती; पण ती मनाई, जे अद्याप परिवर्तित झाले नव्हते अशा परकीयांना लागू नव्हती. (अनुवाद १४:२१; यहेज्केल ४:१४) काही काळातच हे निवासित लोक इतर निवासितांच्या मार्गाचे अनुकरण करुन सुंती परिवर्तित होऊ शकत होते. केवळ यानंतरच यांना खऱ्या उपासनेतील भाऊ या नात्याने मानले जाई व ते सबंध नियमशास्त्र आचरण्यास जबाबदार आहेत असे समजले जाई. (लेवीय १६:२९; १७:१०; १९:३३, ३४; २४:२२) मवाबी रुथ आणि नामान हा अरामी कोडी हे यहुद्देत्तर होते ज्यांचा देवाने स्वीकार केला.—मत्तय १:५; लूक ४:२७.
९. विदेश्यांविषयी देवाने राखलेल्या प्रवृत्तीचे शलमोनाने कसे समर्थन केले?
९ देवाने यहुदेत्तरांविषयीची जी स्वागतपर वृत्ती राखली होती ती आम्हाला शलमोनाच्या काळीही दिसून येते. मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी शलमोनाने प्रार्थना केलीः “तुझ्या इस्राएल लोकातला नव्हे असा कोणी परदेशीय तुझ्या नामास्तव परदेशाहून आला . . . आणि त्याने येऊन ह्या मंदिराकडे तोंड करुन प्रार्थना केली, तर तू आपल्या स्वर्गातील निवासस्थानातून ती ऐक . . . म्हणजे या भूतलावरील सर्व देशांचे लोक तुझे नाम ओळखून तुझ्या इस्राएल लोकांप्रमाणे तुझे भय बाळगतील.” (१ राजे ८:४१-४३) होय, यहोवाने, त्याचा शोध करणाऱ्या प्राजळ परदेशीयांच्या प्रार्थनांचे स्वागतच केले. यांनाही त्याचे नियमशास्त्र शिकून घेता येणार होते, सुंता करुन घेता येणार होती आणि त्याच्या आशीर्वादित लोकांमध्ये स्वीकृत सदस्य यानाते बनता येणार होते.
१०. कुशी षंढाच्या बाबतीत यहुद्यांना कोणता व्यवहार ठेवावा लागला असता, पण सुंतेने त्याला कोणता फायदा दिला?
१० अशी गोष्ट नंतरच्या काळी ज्याने केली तो दूरच्या इथोपिया देशातील कांदके राणीच्या हुजुराला असणारा खजिनदार होता. जेव्हा त्याने प्रथमच यहुदी लोक व त्यांची उपासना याविषयी ऐकले तेव्हा त्याचे जीवनमान आणि त्याची धार्मिक पद्धत यहोवाला मान्य नव्हती. याकरताच नियमशास्त्रातील देवाच्या गरजांचा अभ्यास या विदेशी माणसाने केला तेव्हा यहुद्यांना काही प्रमाणात त्याच्याविषयी सहनशीलता नक्की दाखवावी लागली असेल. या माणसाने प्रगति करुन आपले जीवन सुंता करण्यास योग्य बनविले असेल. आता प्रे. कृत्ये ८:२७ आपल्याला सांगते की, “तो यरुशलेमेत उपासनेसाठी आला होता.” (निर्गम १२:४८, ४९) याद्वारे हे सूचित होते की तो पूर्ण रुपाने परिवर्तित झाला होता. या कारणामुळे तो आता मशीहाला स्विकारण्याच्या आणि त्याचा बाप्तिस्मा घेतलेला अनुयायी होण्याच्या व याकरवी देवाच्या प्रगतिशील इच्छेच्या अनुषंगाने राहण्याच्या स्थितीत आला होता.
विश्वासात नसलेले आणि ख्रिस्ती मंडळी
११, १२. (अ) कुशीने बाप्तिस्मा घेतला तेव्हा आणखी कोणता बदल झाला? (ब) हे फिलिप्पैकर २:१२, १३ च्या कसे सहमतात होते?
११ येशूने आपल्या शिष्यांना म्हटलेः “तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा; त्यांस पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या. जे काही मी तुम्हाला आज्ञापिले ते सर्व त्यांस पाळावयास शिकवा.” (मत्तय २८:१९, २०) आत्ताच ज्याचा उल्लेख करण्यात आला होता त्या कुशी परिवर्तिताठायी यहोवा देव आणि त्याचा पवित्र आत्मा याविषयीचे ज्ञान आधीपासूनच होते. तेव्हा, फिलिप्पाने त्याला येशूविषयीची माहिती सांगितली व त्याचा देवाचा मशीही पुत्र असा स्वीकार करण्याची मदत दिली तेव्हा त्याचा बाप्तिस्मा होऊ शकला. याकरवी तो, ख्रिस्ताचे अनुकरण करणाऱ्या देवाच्या लोकांचा मान्यवर सदस्य होऊ शकला. याकरवी त्याच्यावर देवाला जाब देण्याचे बंधन आले आणि ख्रिश्चनांसाठी ‘आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी पाळण्याचे’ देखील बंधन आले. पण या जबाबदारीसोबत एक अद्भूत भविष्य समोर ठाकलेः तारणाचे!
१२ काही काळानंतर पौलाने लिहिले की, सर्व ख्रिश्चनांनी ‘भीत व कापत आपले तारण साधून घेतले पाहिजे.’ हे साध्य होऊ शकणारे होते कारण, “इच्छा करणे व कृति करणे ही तुमच्याठायी आपल्या सत्संकल्पासाठी [यु·डो·कीʹआस] साधून देणारा तो देव आहे.”—फिलिप्पैकर २:१२, १३.
१३. कुशी षंढाने ज्या त्वरेने बाप्तिस्मा घेण्याची तयारी दर्शविली तशी ज्यांनी दाखविली नाही अशांसोबत ख्रिश्चनांनी कसे दळवळण राखावयाचे होते?
१३ तरीपण खऱ्या ख्रिश्चनांच्या सहवासात आलेल्या सर्वांनीच कुशीप्रमाणे त्वरेने बाप्तिस्मा घेण्याची तयारी व लायकी दाखवली नाही. ते यहुदी व परीवर्तित देखील नव्हते आणि यांना यहोवाविषयी थोडीफार काय किंवा काहीच माहिती नव्हती, शिवाय त्याच्या दर्जांकरवी यांनी आपले नैतिक जीवन व्यतित केले नव्हते. तर मग अशांविषयी काय? यांच्याकरता ख्रिस्तीजनांनी येशूचे उदाहरण अनुसरायचे होते. त्याने पापाचरणाला मुभा किंवा प्रोत्साहन दिले नाही. (योहान ५:१४) तथापि, जे पापी त्याच्याकडे आले आणि ज्यांनी आपले जीवन देवाच्या मार्गाशी जुळविण्याची इच्छा दर्शविली अशांसोबत तो सहानुभूतीने वागला.—लूक १५:१-७.
१४, १५. अभिषिक्त ख्रिश्चनांशिवाय करिंथच्या सभांना आणखी कोण येत होते आणि यांच्या आध्यात्मिक प्रगतीमध्ये कशी भिन्नता राहिली असावी?
१४ देवाविषयी शिकून घेणाऱ्यांच्या बाबतीत ख्रिस्तीजन सहनशीलतेने वागले हे पौलाने करिंथमधील सभेच्या अनुषंगाने जे म्हटले त्यात दिसून येते. ख्रिस्ती धर्माच्या आरंभाला देवाच्या आशीर्वादाचा पुरावा या अर्थाने मंडळीला आत्म्याची जी अद्भूत दाने बहाल करण्यात आली होती त्यांच्या वापराविषयीची चर्चा करताना पौलाने ‘विश्वास ठेवणारे’ आणि ‘विश्वास न ठेवणारे’ अशा संज्ञा वापरल्या. (१ करिंथकर १४:२२) ‘विश्वास ठेवणारे’ हे ते होते ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला होता व यांचा बाप्तिस्मा झाला होता. (प्रे. कृत्ये ८:१३; १६:३१-३४) “पुष्कळ करिंथकरांनी विश्वास ठेवला व बाप्तिस्मा घेतला.”—प्रे. कृत्ये १८:८.
१५ करिंथकरांस पहिले पत्र १४:२४ नुसार ‘विश्वास न ठेवणारे किंवा साधारण लोक’ करिंथच्या सभांना येत व तेथे त्यांचे स्वागत होई.c अर्थात या लोकांच्या देववचनाचा अभ्यास व त्याचा अवलंब यातील प्रगतीमध्ये भिन्नता होती. काही अद्याप पापाचरणात गढले होते तर काहींनी आपला विश्वास दृढ केला असावा, जीवनात बदल केले असावेत आणि बाप्तिस्म्याआधी शिकलेल्या गोष्टींची सहभागिता इतरांमध्येही करण्याची सुरवात केली असावी.
१६. अशा लोकांना मंडळीच्या सभांमध्ये ख्रिस्ती जनांसोबत एकत्र राहिल्यामुळे कोणता फायदा मिळू शकत होता?
१६ असे हे बाप्तिस्मा न झालेले लोक हे अर्थातच “प्रभुमध्ये” नव्हते. (१ करिंथकर ७:३९) त्यांच्या गत जीवनात भयंकर अशा नैतिक वा आध्यात्मिक चुका घडल्या असतील तर यांना देवाच्या दर्जांनुरुप आणण्यासाठी वेळ लागला असावा हे समजण्याजोगे आहे. तरीपण मध्यंतरात यांनी जोपर्यंत मंडळीचा विश्वास आणि तिची शुद्धता भ्रष्टाविण्याचा प्रयत्न केला नाही तोपर्यंत यांचे सभांमध्ये स्वागत होत असे. सभेत जे पाहिले व ऐकावयास मिळाले त्यामुळे “त्यांच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रगट” होऊन त्यांना ‘वाग्दंड मिळे.’—१ करिंथकर १४:२३-२५; २ करिंथकर ६:१४.
तारणासाठी देवाकडील मर्जी मिळविणे
१७. लूक २:१४ ची पहिल्या शतकात कशी पूर्णता झाली?
१७ पहिल्या शतकातील बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिस्तीजनांनी केलेल्या प्रचारकार्यामुळे हजारोंना सुवार्तेचे श्रवण करायला मिळाले. त्यांनी ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला, आपल्या गत मार्गाक्रमाणाविषयीचा पश्चाताप व्यक्त केला आणि बाप्तिस्मा घेऊन “तारणाची जाहीर घोषणा” केली. (रोमकर १०:१०-१५; प्रे. कृत्ये २:४१-४४; ५:१४; कलस्सैकर १:२३) अशा बाप्तिस्मा घेतलेल्या लोकांवर यहोवाची मर्जी होती यात शंका नाही, कारण यांचा त्याने पवित्र आत्म्याकरवी अभिषेक केला आणि त्यांना आध्यात्मिक पुत्र या नात्याने दत्तक घेतले. प्रेषित पौलाने लिहिलेः “त्याने आपल्या मनाच्या सत्संकल्पाप्रमाणे [यु·डो·कीʹआन] आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमले होते.” (इफिसकर १:५) अशाप्रकारे, दिव्यदूतांनी येशूचा जन्म झाला तेव्हा जे भाकित केले ते त्याच शतकात पूर्ण होण्यास आरंभ झाला. त्यांनी म्हटले होतेः “पृथ्वीवर ज्यांच्यावर [देवाचा] प्रसाद झाला आहे [किंवा, ज्यांच्यावर देवाची मर्जी बसली आहे] त्या मनुष्यात शांती.”—लूक २:१४.
१८. देवासोबत प्राप्त झालेल्या मर्जीयुक्त स्थानाला अभिषिक्त ख्रिस्ती हलके का समजू शकत नव्हते?
१८ ती शांती टिकवून ठेवण्यासाठी त्या “सदेच्छु मानवांना” “भीत व कापत आपले तारण साधून” घेण्याची गरज होती. (फिलिप्पैकर २:१२) हे सोपे नव्हते, कारण ते अद्याप अपूर्ण मानव होते. चुकीच्या गोष्टी करण्यासाठी त्यांच्यापुढे मोहपाश व दबाव होता. त्यांनी चुकीच्या गोष्टींपुढे आपली हार मानली तर ते देवाची मर्जी गमावणार होते. असे होऊ नये याकरताच यहोवा देवाने मंडळीत आध्यात्मिक मेंढपाळांची प्रेमळपणे व्यवस्था केली होती. हे मंडळीला मदत व संरक्षण देणार होते.—१ पेत्र ५:२, ३.
१९, २०. बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्चनांना आपल्या मर्जीतले सेवक राहता यावे यासाठी देवाने कोणती तरतूद केली आहे?
१९ हे मंडळीचे वडील पौलाचा सल्ला आपल्या अंतःकरणी लावू शकत होतेः “बंधुजनहो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक गुणवत्तेचे आहात, ते तुम्ही अशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा; तसेच तुम्हीही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष द्या.” (गलतीकर ६:१) ज्याने बाप्तिस्म्याचे पाऊल उचलले आहे त्याला अधिक जाब द्यावा लागणार हे आपल्याला कळू शकते आणि हेच इस्राएलात कोणी परदेशी सुंता करुन परिवर्तित झाला तेव्हा त्याच्याविषयीही खरे होते. तरीपण, कोणा बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्चनाकडून चूक घडलीच तर त्याला मंडळीत प्रेमळ मदत मिळू शकत होती.
२० कोणा गंभीर पातकात पडलेल्या इसमाला मंडळीतील वडीलांचा गट मदत देऊ शकतो. याविषयी यहुदाने लिहिलेः “जे कित्येक जण संशयात आहेत त्यांच्यावर दया करा, त्यांना अग्नीतून ओढून काढून त्यांचे तारण करा, आणि कित्येकांवर तर भीतभीत दया करा. मात्र देहाने डागळलेली त्यांची वस्त्रे द्वेष्य माना.” (यहुदा २२, २३) अशाप्रकारची मदत लाभलेला मंडळीचा कोणी बाप्तिस्माप्राप्त सदस्य मग यहोवाच्या मर्जीचा आनंद तसेच दिव्यदूतांनी येशूच्या जन्माच्या वेळी ज्या शांतीचा उल्लेख केला होता ती पुन्हा अनुभवू शकतो.
२१, २२. कोणी पश्चाताप न दर्शविणारा पापी बनला तर मग काय परिणाम होऊ शकतो आणि मंडळीचे निष्ठावंत सदस्य याविषयी कोणती प्रतिक्रिया दाखवतील?
२१ तथापि, अशा काही घटना घडल्या आहेत जेथे पातकी पश्चातापी दिसला नाही. तेव्हा शुद्ध मंडळीला भ्रष्टतेपासून वाचविण्यासाठी वडीलांना त्याला बहिष्कृत करावे लागेल. हे करिंथमधील एका बाप्तिस्मा घेतलेल्या माणसाच्या बाबतीत घडले, जो अनैतिक संबंध आचरीत राहिला. तेव्हा पौलाने मंडळीला सूचना केली “तुम्ही जारकर्म्यांची संगत धरु नये असे मी आपल्या पत्रात तुम्हास लिहिले होते; तथापि ह्या जगाचे जारकर्मी, लोभी, वित्त हरण करणारे व मूर्तिपूजक ह्यांची संगत मुळीच धरु नये असे माझे म्हणणे नाही; कारण तसे कराल तर तुम्हास जगातून निघून जावे लागेल. म्हणून मी तुम्हास जे लिहिले होते त्याचा अर्थ असा की, बंधु म्हटलेला असा कोणी जर जारकर्मी, लोभी, मूर्तिपूजक, चहाड, मद्यपी किंवा वित्त हरण करणारा असला तर तशाची संगत धरु नये; त्याच्या पंक्तीसही बसू नये.”—१ करिंथकर ५:९-११.
२२ या करिंथच्या माणसाने बाप्तिस्म्याचे महत्वाचे पाऊल उचलले होते, देवाची मर्जी संपादिली होती आणि मंडळीचा सदस्य झाला होता त्यामुळे त्याला बहिष्कृत करणे हे गंभीर होते. पौलाने म्हटले की इतर ख्रिश्चनांनी त्याच्याशी संगत राखू नये कारण त्याने देवासोबत असणारे आपले मर्जीयुक्त स्थान गमाविले होते. (पडताळा २ योहान १०, ११.) पेत्राने अशा बहिष्कृतांविषयी लिहिलेः “नीतीमत्वाचा मार्ग समजून आल्यानंतर आपणास दिलेल्या पवित्र आज्ञेकडे पाठ फिरविणे ह्यापेक्षा तो न समजणे ते त्यांच्यासाठी बरे होते. ‘आपल्या ओकारीकडे परतलेले कुत्रे’ . . . अशी जी खरी म्हण आहे, तिच्यासारखी त्यांची गत झाली आहे.”—२ पेत्र २:२१, २२.
२३. पहिल्या शतकातील ख्रिश्चनांमध्ये देवाची मर्जी टिकवून ठेवण्याविषयी साधारण परिस्थिती कोणती होती?
२३ पश्चाताप न दर्शविणारे पातकी म्हणून बहिष्कृत झाल्यामुळे यहोवा आता अशा लोकांविषयी आपली मर्जी व्यक्त करु शकणार नाही. (इब्रीयांस १०:३८; पडताळा १ करिंथकर १०:५.) खूपच कमी लोकांना बहिष्कृत करण्यात आले हे उघड आहे. ज्यांनी “देव . . . ह्याच्यापासून . . . कृपा व शांती” मिळविली आणि जे ‘त्याच्या सत्संकल्पाप्रमाणे दत्तक बनले’ ते विश्वासू राहिले.—इफिसकर १:२, ५, ८-१०.
२४. या विषयासंबंधीच्या आणखी कोणत्या गोष्टींचा आपल्याला विचार करावयाचा आहे?
२४ असेच काही आज आमच्या काळात घडत आहे. तरीपण प्रथमतः आपण हे पाहू या की आज ‘विश्वास न राखणारे किंवा सर्वसाधारण लोकांना’ देवाची मर्जी कशी प्राप्त करता येईल, आणि त्यांनी जर काही चूक केलीच तर काय मदत देता येईल. या सर्व गोष्टींची हाताळणी पुढील लेख करील.
[तळटीपा]
a पडताळाः “ज्यांच्यावर त्याची मर्जी झाली आहे असे लोक,” न्यू टेस्टमेन्ट, द्वारा जॉर्ज स्वान; “ज्याविषयी तो संतुष्ट आहे अशी माणसे,” द रिव्हाईज्ड स्टँडर्ड व्हर्शन.
b पहा द वॉचटावर, ऑक्टोबर १५, १९६४, पृष्ठे ६२९-३३.
c “ἄπιστος (ॲपिस्टोस, ‘विश्वास न राखणारा’) आणि ιδιώτης (इडीओटस्, ‘असमंजस,’ किंवा ‘विचारपूस करणारा’) हे दोन्ही विश्वास न राखणाऱ्या वर्गातील असून ख्रिस्ती चर्चच्या तारणप्राप्त सदस्यांपासून भिन्न आहेत.”—द एक्स्पोझिटर्स बायबल कॉमेन्ट्री, खंड १०, पृष्ठ २७५.
तुम्हास आठवते का?
◻ शास्त्रवचनांच्या मते मानवांना केव्हापासून व कशापद्धतीने देवाची मर्जी मिळविता येईल?
◻ आपल्या लोकात राहणाऱ्या परकीयांविषयी देवाचा दृष्टीकोन कसा होता, पण इस्राएलांना सहनशीलतेसोबत दक्ष का रहावयाचे होते?
◻ करिंथमधील ख्रिस्ती सभांना “विश्वास न राखणारे” येत होते त्यावरुन आम्हाला काय निष्कर्ष काढता येईल?
◻ बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्चनांनी आपल्या मर्जीतले सेवक या अर्थी टिकून रहावे यासाठी देवाने कोणती तरतूद केली आहे?