वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w89 ८/१ पृ. ७-१२
  • यहोवाची सेवा एकचित्ताने करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची सेवा एकचित्ताने करा
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ते “शुद्ध वाणी” बोलतात
  • ते हवेहवेसे वाटतात
  • त्यांचे व्यक्‍तीत्व नवे असते
  • दुसऱ्‍यांना श्रेष्ठ माना
  • ऐका व निरिक्षण करा
  • आशीर्वाद व संभाळ
  • आमच्या बंधुवर्गाबद्दल कृतज्ञ
  • शुद्ध वाणीने एकवटलेले व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • खांद्याला खांदा लावून सेवा करत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • शुद्ध वाणी बोलत राहा व सर्वदा जिवंत राहा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • तुम्ही “शुद्ध वाणी” अस्खलितपणे बोलत आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००८
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
w89 ८/१ पृ. ७-१२

यहोवाची सेवा एकचित्ताने करा

“तेव्हा मी लोकांना शुद्ध वाणी देईन, यासाठी की ते सर्व यहोवाच्या नामाचा धावा करुन त्याची सेवा एकचित्ताने करतील.”—सफन्या ३:९. अमेरिकन स्टँडर्ड व्हर्शन.

१, २. (अ) यहोवा सध्या कोणत्या भविष्यवादाची पूर्तता घडवून आणीत आहे? (ब) या भविष्यवादाच्या अनुषंगाने कोणते प्रश्‍न सामोरे येतात?

यहोवा देव आज असे काही करीत आहे की, जे मानवाला कधीच जमू शकणार नाही. आज या विभाजित जगतात साधारण ३,००० भाषा बोलल्या जातात, पण देव आता या भविष्यवादाची पूर्ति करीत आहेः “मी लोकांना शुद्ध वाणी देईन म्हणजे ते यहोवाचा धावा करुन त्याची सेवा खांद्याला खांदा लावून करतील.”—सफन्या ३:९.

२ ही “शुद्ध वाणी” काय आहे? ती कोण बोलत आहेत? तसेच ‘देवाची सेवा खांद्याला खांदा लावून करणे’ याचा काय अर्थ होतो?

ते “शुद्ध वाणी” बोलतात

३. ही “शुद्ध वाणी” काय आहे, आणि जे ती बोलतात ते का विभाजित नाहीत?

३ इ. स. ३३ च्या पेंटेकॉस्टच्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या शिष्यांवर देवाचा पवित्र आत्मा ओतण्यात आला व त्यांना, त्यांनी कधी शिकल्या नाहीत अशा भाषेत वक्‍तव्य करण्याचे सामर्थ्य देण्यात आले. यामुळे त्यांना विविध भाषेच्या लोकांना “देवाची महत्कृत्ये” सांगता आली. अशाप्रकारे यहोवाने भिन्‍नजातीची पार्श्‍वभूमि असणाऱ्‍या लोकांना एकत्र करण्याचे कार्य आरंभिले. (प्रे. कृत्ये २:१-२१, ३७-४२) विदेशी विश्‍वासधारक जेव्हा येशूचे अनुयायी बनले तेव्हा देवाचे लोक खऱ्‍या अर्थाने बहुभाषी आणि बहुवंशीय बनले. तरीपण हे जगाच्या अडखळणाकरवी छिन्‍नविच्छिन्‍न होऊ शकले नाहीत, कारण ते “शुद्ध वाणी” बोलत होते. सफन्या ३:९ मध्ये भाकित करण्यात आलेली ही “वाणी” शास्त्रवचनीय सत्याची परस्परांची भाषा आहे. (इफिसकर ४:२५) ही “शुद्ध वाणी” बोलणारे विभाजित नाहीत, पण ते ‘सारखेच बोलतात’ आणि ते “एकचित्ताने व एकमताने” बोलतात.—१ करिंथकर १:१०.

४. सफन्या ३:९ ने बहुभाषी आणि बहुवंशीय सहकार्याचा कसा निर्देश केला व ते आज कोठे दिसते?

४ सर्व राष्ट्रांच्या व वंशाच्या लोकांनी यहोवाची सेवा “खांद्याला खांदा लावून” करावी, किंवा अक्षरशः “एकमताने” करावी यासाठी ही “शुद्ध वाणी” देण्यात आली आहे. ते देवाची सेवा “एकविचाराने” (द न्यू इंग्लीश बायबल); “एकचित्ताने” (न्यू अमेरिकन बायबल); किंवा “एक विचार राखून आणि एकदिलाने” (द ॲम्प्लीफाईड बायबल) अशी करीत राहतील. आणखी एका भाषांतरात असे वाचण्यात येतेः “तेव्हा मी सर्व लोकांचे ओठ शुद्ध करीन ते यासाठी की ते यहोवाच्या नामाचा धावा करु लागतील आणि त्याच्या सेवेत सहकार्य देतील.” (बाईंग्टन) असे हे बहुभाषी तसेच बहुवंशीय ऐक्य व सहकार्य आज केवळ यहोवाच्या साक्षीदारांतच सापडू शकते.

५. यहोवाचे साक्षीदार कोणाही मानवी भाषेचा वापर कोणत्या कारणास्तव करु शकले आहेत?

५ वस्तुतः सर्वच यहोवाचे साक्षीदार शास्त्रवचनीय सत्याची ही “शुद्ध वाणी” बोलत असल्यामुळे ते याकरवी कोणाही मानवी भाषेचा वापर अगदी उच्चस्तरासाठी, म्हणजे देवाची स्तुति करण्यासाठी आणि राज्याची सुवार्ता घोषित करण्यासाठी करीत आहेत. (मार्क १३:१०; तीतास २:७, ८; इब्रीयांस १३:१५) अशाप्रकारे ही “शुद्ध वाणी” विभिन्‍न गटाच्या सर्व लोकांना यहोवाची सेवा एकचित्ताने करण्यासाठी केवढी समर्थ करीत आहे!

६. यहोवा लोकांकडे कोणत्या दृष्टीने पाहतो, पण कोणा ख्रिश्‍चनाच्या अंतःकरणात पक्षपाताविषयीची छोटीसी छटा दिसून आल्यास कोणती गोष्ट त्याला सहाय्य देऊ शकेल?

६ कर्नेल्य व इतर विदेशी साक्षीदारांना साक्ष देताना पेत्र असे म्हणालाः “देव पक्षपाती नाही हे मला पक्के समजते, तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो आणि ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.” (प्रे. कृत्ये १०:३४, ३५, बाईंगटन) दुसऱ्‍या भाषांतराच्या मते, यहोवा “कोणा विशिष्ठ लोकांना आदराने वागविणारा नव्हे,” “लोकांमध्ये भेदाभेद करीत नाही,” आणि “कोणाचे तोंड पाहून त्यावर आपली मर्जी दाखवीत नाही.” (द एम्फॅटिक डायग्लॉट; फिलिप्स; न्यू इंटरनॅशनल व्हर्शन) यहोवाचे सेवक असल्यामुळे आपणही भिन्‍न गटाच्या लोकांना यहोवा जसे पाहतो त्याप्रमाणेच पाहिले पाहिजे. पण तेच, कोणा ख्रिश्‍चनाच्या अंतःकरणी पक्षपाताविषयीची काहीशी छटा दिसून आली तर काय? तर मग, आमचा निपक्षपाती देव प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक आणि भाषा यातील आपल्या सेवकांविषयी कसे दळणवळण राखून आहे ते जाणून घेणे सहाय्यक ठरेल.—पहा अवेक! नोव्हेंबर ८, १९८४, पृष्ठे ३-११.

ते हवेहवेसे वाटतात

७. देवाबरोबरील नातेसंबंधाच्या बाबतीत पाहू जाता कोणी ख्रिस्ती इतर राष्ट्र वा वंशाच्या ख्रिश्‍चनापेक्षा भिन्‍न कसा ठरु शकत नाही?

७ तुम्ही बाप्तिस्मा झालेले यहोवाचे साक्षीदार आहात तर तुम्ही एकेकाळी या दुष्ट व्यवस्थीकरणात होत असलेल्या “अमंगळ कृत्यामुळे दुःख व उसासे टाकीत” होता हे स्पष्ट आहे. (यहेज्केल ९:४) तुम्ही आपल्या ‘पापात मृत बनला’ होता, पण देवाने आपल्या करुणेने येशू ख्रिस्ताद्वारे तुम्हाला जवळ केले. (इफिसकर २:१-५; योहान ६:४४) तर या बाबतीत तुम्ही आता जे तुमचे समविश्‍वासू झालेले आहेत त्यांच्यापेक्षा भिन्‍न नव्हता. ते देखील दुष्टतेमुळे त्रासून गेले होते आणि ‘आपल्या पापात मृतवत झाले होते,’ आणि येशू ख्रिस्ताद्वारे देवाच्या दयेला पात्र झाले. आमचा वंश किंवा राष्ट्रीयत्व कोणतेही असो, आम्हापैकी कोणालाही यहोवा देवासोबत त्याचे साक्षीदार या नात्याने असलेले स्थान केवळ विश्‍वासाद्वारेच संपादता येते.—रोमकर ११:२०.

८. हाग्गय २:७ ची आता कशी पूर्णता होत आहे?

८ वेगळ्या राष्ट्रातील समविश्‍वासूंना आम्ही कोणत्या दृष्टीने पाहण्यास हवे ते बघण्यास आम्हाला हाग्गय २:७ मधील भविष्यवादित शब्द मदत देतात. येथे यहोवाने घोषित केलेः “मी सर्व राष्ट्रांस हलवून सोडीन म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तु येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरीन.” शुद्ध धर्माचे हे भाकित केलेले उंचावणे हे देवाच्या खऱ्‍या मंदिरी, त्याच्या उपासनेच्या वर्तुळात घडत आहे. (योहान ४:२३, २४) पण “सर्व राष्ट्रातील [त्या] निवडक वस्तु” काय आहेत? ते धार्मिकतेवर प्रेम करणारे हजारो जन आहेत जे राज्य प्रचाराच्या कार्यास अनुकुल प्रतिसाद दर्शवितात. सर्व राष्ट्रे व वंशातून ते “यहोवाच्या मंदिराकडे” झुंडीने येत आहेत, बाप्तिस्मा घेतलेले साक्षीदार होऊन ते आंतरराष्ट्रीय “मोठा लोकसमुदाय” याचा भाग बनत आहेत. (यशया २:२-४; प्रकटीकरण ७:९) यहोवाच्या पार्थिव संस्थेचे भाग बनून जे त्याची स्तुति करतात ते स्वच्छ, शुद्धाचरणी आणि भक्‍तीमान लोक आहेत—अशाच लोकांची आपण अपेक्षा धरतो. तर मग, प्रत्येक खऱ्‍या ख्रिश्‍चनाने, आमच्या स्वर्गातील पित्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्‍या या निवडक वस्तुंच्याबाबतीत बंधुप्रेम व्यक्‍त करण्याची इच्छा धरली पाहिजे.

त्यांचे व्यक्‍तीत्व नवे असते

९. आम्ही जरी गतकाळी परदेशी लोकांविषयी चांगला विचार राखला नसेल तरीही आता ख्रिस्ती आहोत म्हणून वेगळेपण का धारण केले पाहिजे?

९ सबंध जगभरात असणारे आमचे आध्यात्मिक भाऊ व बहिणी हवेहवेसेच आहेत ते या कारणामुळे की, यांनी ‘जुने मनुष्यपण त्याच्या आचरणासह काढून टाकून नवे मनुष्यपण परिधान करा’ या सूचनेचा अवलंब केलेला आहे. “आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रतिरुपाप्रमाणे [ते] पूर्ण ज्ञानात नवे केले जात आहे. ह्‍यात हेल्लेणी व यहुदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही; तर ख्रिस्त सर्वकाही व सर्वात आहे.” (कलस्सैकर ३:९-११) कोणी पूर्वी यहुदी, ग्रीक किंवा विदेशी माणसासोबत नीट वागला नसेल तर आता मात्र तो ख्रिस्ती आहे म्हणून त्याने सुधारणा करुन घेतली पाहिजे. वंश, राष्ट्रीयत्व किंवा संस्कृती कोणतीही असली तरी ज्याच्याठायी “नवे मनुष्यपण” आहे तो देवाच्या आत्म्याची फलप्राप्ती—प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्‍वास, सौम्यता आणि इंद्रियदमन—जोपासणार व ती प्रदर्शित करीत राहणार. (गलतीकर ५:२२, २३) यामुळे ते यहोवाच्या सहउपासकांच्या नजरेत प्रिय बनतात.

१०. आम्हाला वेगळ्या वंशाच्या वा राष्ट्राच्या आमच्या भाऊ-बहिणींविषयी अनिष्ट बोलणी करण्याचा मोह आला तर तीतास पत्र १:५-१२ तून आम्ही कसली मदत मिळविली पाहिजे?

१० जगातील काही लोक भिन्‍न पार्श्‍वभूमीच्या लोकांविषयी कुत्सिक बोलणी करतात तसे यहोवाचे सेवक करीत नाहीत. क्रेत बेटावरील एका संदेष्ट्याने आपल्या स्वतःच्या लोकांविषयी असे एकदा म्हटले होतेः “क्रेतीय सदा लबाड, दुष्ट, पशु, आळशी व खादाड आहेत”! या क्रेत बेटावरील ख्रिश्‍चनांमध्ये जे खोटे शिक्षक उद्‌भवले होते त्यांना स्तब्ध करण्यासाठी प्रेषित पौलाला या गोष्टींचे स्मरण द्यावे लागले. पण पौलाने ‘सारे क्रेतीय ख्रिस्ती लबाड, दुष्ट, पशु, आळशी आणि खादाड आहेत’ असे कदापि म्हटले नाही. (तीतास पत्र १:५-१२) नाही, ख्रिस्तीजन कधीही इतरांविषयी कुत्सिक बोलणारच नाहीत. त्या क्रेतीय ख्रिश्‍चनांनी स्वतःवर “नवे मनुष्यपण” परिधान केले होते आणि यांच्यापैकी काही वडील बनण्याच्या नियुक्‍तीकरता आध्यात्मिक दृष्ट्या पात्र झाले होते. या गोष्टीने आम्हाला, जर एखाद्या विशिष्ठ वंशाच्या वा राष्ट्राच्या आमच्या भाऊ वा बहिणींविषयी अनिष्ट बोलणी करण्याचा मोह झाला तर, गंभीर विचार करायला लावले पाहिजे.

दुसऱ्‍यांना श्रेष्ठ माना

११. कोणा ख्रिश्‍चनाच्या हृदयी पक्षपात तरळत असेल तर त्याने काय करावे?

११ पण तेच, कोणी ख्रिस्ती एका वंश वा राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत पक्षपाती वृत्ती धरुन आहे तर हे त्याचे बोलणे व कृति याकरवी कदाचित प्रदर्शित होईल. यामुळे मंडळीत, ती खासपणे भिन्‍न पार्श्‍वभूमी असणाऱ्‍या लोकांनी मिळून बनलेली असल्यामुळे तिच्यामध्ये दुःखी भावना निर्माण होतील. अशाप्रकारचा ताण देवाच्या लोकांच्या ऐक्यावर आणण्याची इच्छा खरेपणाने कोणीही करणार नाही. (स्तोत्रसंहिता १३३:१-३) तद्वत, कोणा ख्रिश्‍चनांच्या अंतःकरणात पक्षपातीपणाचा भाव तरळत असेल तर त्याने अशी प्रार्थना करणे योग्य आहेः “हे देवा, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण. माझ्याठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ती असेल तर पहा; आणि मला सनातन मार्गाने चालीव.”—स्तोत्रसंहिता १३९:२३, २४.

१२. आम्ही आमच्याविषयी किंवा आमच्यासारखीच पार्श्‍वभूमी असणाऱ्‍यांविषयी अहंकार का बाळगू नये?

१२ याशिवाय आम्ही वास्तववादी दृष्टीकोण ग्रहण केला पाहिजे की, आम्ही सर्वच अपूर्ण मानव आहोत आणि जर येशू ख्रिस्ताचे यज्ञार्पण झाले नसते तर आम्हापैकी कोणालाही देवासमोर उभे राहता आले नसते. (१ योहान १:८-२:२) तर मग, आम्हात इतरांपेक्षा वेगळेपण ते काय आहे? वस्तुतः आम्हाला काहीच देण्यात आलेले नाही तर आम्ही आमच्या स्वतःबद्दल किंवा आमच्यासारखी पार्श्‍वभूमी असणाऱ्‍या लोकांविषयी अहंकार का दाखवावा?—पडताळा १ करिंथकर ४:६, ७.

१३. आम्ही मंडळीच्या ऐक्यास कसा हातभार लावू शकतो, आणि फिलिप्पैकर २:१-११ पासून काय शिकायला मिळते?

१३ इतरांठायी दिसत असलेल्या चांगल्या गुणांविषयी आपली मान्यता व रसिकता व्यक्‍त केल्यास याकरवी आपण मंडळीच्या ऐक्याला हातभार लावू शकतो. यहुदी प्रेषित पौलाने विदेशी फिलिप्पैकरांना पत्र लिहिले तेव्हा त्याने त्यामध्ये आमच्यासाठीही विचाराला खाद्य दिले होते. तो म्हणालाः “तुम्ही . . . एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकचित्त व्हा; अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करु नका, तर लीनतेने एकमेकांना आपणापेक्षा श्रेष्ठ माना.” आम्ही कोणत्याहि वंशाविषयी वा राष्ट्राच्या लोकांबद्दल कोणती योग्य वृत्ती दाखवावी त्याचे उदाहरण येशू ख्रिस्तात दिसते. तो प्रबळ असा आत्मिक प्राणी होता तरीही तो ‘मनुष्यप्रकृतीचा असा प्रगट झाला’ आणि प्रत्येक वंश व राष्ट्रातील पापी मानवांसाठी वधस्तंभावरील मरण प्राप्त करण्याइतके त्याने स्वतःला लीन केले. (फिलिप्पैकर २:१-११) आता येशूचे अनुयायी या नात्याने आपणही प्रेमळ, लीन, तसेच कनवाळू होऊन आपणापेक्षा इतरांना श्रेष्ठ मानावयास नको का?

ऐका व निरिक्षण करा

१४. इतर आपणापेक्षा श्रेष्ठ आहेत याचा विचार करण्यात आपणाला कशी मदत मिळू शकते?

१४ दुसरे बोलतात तेव्हा आम्ही खरेच लक्ष दिले आणि त्यांच्या वागणूकीचे निरिक्षण केले तर इतर आम्हापेक्षा श्रेष्ठ आहेत हा विचार राखण्याची आपल्याला मदत मिळेल. उदाहरणार्थ, आम्हामधील सोबतचे वडील, जे दुसऱ्‍या वंशाचे असतील, त्यांना, ईश्‍वरशासित शाळेत आम्हापेक्षा उत्तम सूचना सादर करता येतात हे आम्हाला कदाचित प्रामाणिकपणे मान्य करावे लागेल. आम्हाला हे दिसेल की त्यांची भाषाशैली नव्हे तर त्यांच्याठायी असणारी आध्यात्मिकता यामुळे त्यांना आपल्या बांधवांना राज्याचे प्रभावी घोषक बनण्यात इतके चांगले परिणाम मिळत आहेत. याखेरीज, यहोवा त्यांच्या परिश्रमावर आशीर्वाद देत आहे हे उघड आहे.

१५. आमच्या सहउपासकांची विधाने आपण ऐकल्यावर आपल्याला कशाची जाण मिळेल?

१५ आम्ही आमच्या बंधुभगिनींसोबत बोलू वा सभांमध्ये ते देत असलेले अभिप्राय लक्षपूर्वक ऐकू तेव्हा आपल्याला कळेल की, यापैकी काहींना काही शास्त्रवचनीय सत्याची आम्हापेक्षा अधिक जाण आहे. त्यांच्याठायी बलवान बंधुप्रेम आहे, अधिक विश्‍वास आहे किंवा यहोवावर त्यांचा अधिक भाव असल्याचे दिसत आहे हे देखील आपणाला जाणवेल. मग, ते आमच्या विशिष्ठ पार्श्‍वभूमीचे असोत की नसोत, ते प्रीती व सत्कर्मे करावयाला उत्तेजन देत असतात, आमचा विश्‍वास मजबूत करण्यास मदत देतात आणि आमच्या स्वर्गीय पित्यावर अधिक पूर्णतेने आपला भाव ठेवण्याची चालना देत राहतात. (नीतीसूत्रे ३:५, ६; इब्रीयांस १०:२४, २५, ३९) यहोवाने त्यांना आपल्या जवळ केले आहे तर मग, आपणही तेच करावे.—पडताळा याकोब ४:८.

आशीर्वाद व संभाळ

१६, १७. यहोवा कोणाही राष्ट्राच्या वा वंशाच्या आपल्या सेवकांना आशीर्वाद देण्यात पक्षपात करीत नाही याची माहिती द्या.

१६ यहोवा कोणत्याही राष्ट्राच्या वा वंशाच्या आपल्या सेवकांवर आशीर्वाद देण्यामध्ये पक्षपात दाखवीत नाही. उदाहरणासाठी ब्राझिल देशाचा विचार करा. कोणा विदेशी सुवार्तिकांकडून नव्हे तर आठ ब्राझिली समुद्रपर्यटकांकडून ब्राझिलमधील लोकांनी १९२० मध्ये राज्याची सुवार्ता प्रथम ऐकली. देवाचा आशीर्वाद यांच्या कार्यावर दिसला कारण १९८७ च्या कार्यवर्षापर्यंत या १४,१३,०२,००० लोकवस्ती असलेल्या या देशात २,१६,२१६ राज्य घोषकांचा उच्चांक गाठण्यात आला. ही, एका प्रचारकामागे ६५४ लोक इतकी सरासरी पडली.

१७ ईश्‍वरी आशीर्वादाचे आणखी एक उदाहरण पहा. एप्रिल १९२३ मध्ये त्रिनिदादच्या कॅरीबियन समुद्रधुनीतील यहोवाच्या साक्षीदारांच्या दोन काळ्या साक्षीदारांना पश्‍चिम आफ्रिकेत राज्याचा संदेश सांगण्यासाठी पाठवण्यात आले. हे दोन साक्षीदार म्हणजे डब्ल्यु. आर. ब्राऊन दांपत्य. यांनी येथे बरीच वर्षे सेवा केली. यामुळे त्या बंधुला “बायबल ब्राऊन” असे टोपण नाव पडले. त्यांनी “लाविले”, इतरांनी या प्रशस्त जागेत काम केले तेव्हा देवाने “वाढविले.” (१ करिंथकर ३:५-९) आज घानामध्ये ३२,६०० पेक्षा अधिक तर केवळ नायजेरियात १,३३,८०० राज्य घोषकांची संख्या आहे.

१८, १९. आमचा निपक्षपाती देव त्याच्या सर्व राष्ट्रातील व वंशाच्या सेवकांना कसे संभाळतो याची उदाहरणे द्या.

१८ यहोवा आपल्या सर्व राष्ट्राच्या व वंशाच्या लोकांना केवळ आशीर्वादच देतो असे नव्हे तर त्यांचा संभाळही करतो. उदाहरणार्थ, यहोवाच्या दोन जपानी साक्षीदारांचे प्रकरण लक्षात घ्या. जून २१, १९३९ रोजी कॅटसुओ मियुरा व त्यांच्या पत्नीला अन्यायीपणे धरले गेले, त्यांना तुरुंगात टाकले गेले व त्यांच्या पाच वर्षांच्या मुलापासून त्यांना विभक्‍त करण्यात आले. यामुळे या मुलाला त्याच्या आजीकडे रहावे लागले. भगिनी मियुराची आठ महिन्यानंतर सुटका झाली पण बंधु मियुरा यांची न्यायालयीन चौकशी होण्याआधी त्यांना दोन वर्षे तुरुंगात काढावी लागली. त्यांना चुकीची वागणूक देण्यात आली, दोषी ठरविण्यात आले व पाच वर्षांची शिक्षा झाली. हिरोशिमा येथील तुरुंगात देवाने त्यांना शास्त्रवचनांच्या द्वारे संगोपन केले, कारण यामुळेच त्यांना समाधान व बळ मिळाले. ऑगस्ट ६, १९४५ रोजी एका अणुबॉम्बने त्यांचा तुरुंग उद्‌ध्वस्त केला तेव्हा बंधु मियुरा यांची जणू आश्‍चर्यकारक सुटका झाली. दोन महिन्यानंतर त्यांना उत्तर जपानमध्ये आपल्या बायको व मुलाला परत भेटता आले.

१९ दुसऱ्‍या महायुद्धाच्या काळात कित्येक देशात यहोवाच्या साक्षीदारांना प्रखर छळाचा अनुभव आला. उदाहरणार्थ, रॉबर्ट ए. विंकलर या जर्मन बंधूने जर्मनी व नेदरलँडस्‌ येथील नाझींच्या बंद्यांच्या छावण्यात त्रास काढला. यांनी आपल्या सहसाक्षीदारांची माहिती देण्याचे नाकारले म्हणून इतके निर्दयीपणे मारले गेले की, त्यांना नीटसे ओळखताही येत नव्हते. पण त्यांनी लिहिलेः “सर्व प्रकारच्या छळात यहोवा आपल्या सेवकांना संभाळण्याचे अभिवचन देऊन आहे या गोष्टीने मला सर्व काही सहन करण्यासाठी बळ व समाधान दिले. . . . शनिवारी मला गेस्टापोंनी खूप मारले व सोमवारी त्यांनी पुन्हा माझी चौकशी ठेवली. आता काय होणार आणि मी काय करावे? मी यहोवाला प्रार्थना केली व त्याच्या अभिवचनांवर आपला विश्‍वास व्यक्‍त केला. मला ठाऊक होते की राज्याच्या कामासाठी आणि आमच्या बांधवांच्या सुरक्षिततेकरता मला ईश्‍वरशासित पद्धतीने लढत द्यावी लागणार होती. ती चौकशी तर बरीच मोठी होती आणि सतराव्या दिवशी तर मी संपूर्णपणे गळून गेलो, तरीही मी यहोवाचे उपकार मानतो की त्याने मला दिलेल्या बळामुळेच मी या चौकशीत टिकून राहू शकलो आणि माझी सचोटी टिकून ठेवू शकलो.”—स्तोत्रसंहिता १८:३५; ५५:२२; ९४:१८.

आमच्या बंधुवर्गाबद्दल कृतज्ञ

२०. प्रत्येक वंश व राष्ट्रातील आमच्या समविश्‍वासूंविषयीचा आमचा आदर कसा वाढीस लागेल?

२० खरेच, यहोवा प्रत्येक राष्ट्रातील व वंशाच्या त्याच्या सेवकांना आशीर्वाद देतो व त्यांचा संभाळ करतो हे निर्विवाद आहे. तो पक्षपाती नाही व यामुळेच आम्ही पक्षपाती असण्याला कोणतीही सबब वा कारण राहात नाही. आम्ही आमच्या प्रत्येक राष्ट्र व वंशांच्या बंधु-भगिनींच्या बाबतीत, ते ज्या ज्या विषयांमध्ये आपणापेक्षा श्रेष्ठ आहेत त्याचा विचार केला तर त्यांच्याविषयीचा आमचा आदर वाढतच राहील. ते देखील स्वर्गीय ज्ञानाचा अवलंब करीत असल्यामुळे पक्षपात व भेदाभेद त्यांच्याकडून होत नाही तर उलट सुंदर फलप्राप्ती निर्माण होते. (याकोब ३:१३-१८) होय, त्यांचा दयाळूपणा, औदार्य, प्रेम आणि इतर ईश्‍वरी गुण आम्हापुढे चांगले उदाहरण राखून आहेत.

२१. तर मग, आमचा काय करण्याचा निश्‍चय असावा?

२१ तेव्हा, आम्ही आमच्या बहुवंशीय, बहुराष्ट्रीय बंधुत्वाविषयी केवढे कृतज्ञ असावयास हवे बरे! आमचा स्वर्गीय पिता यहोवा याच्या मदतीने व आशीर्वादाने आपण बंधुप्रेमात व एकचित्ताने “त्याची सेवा खांद्याला खांदा लावून करु” या. होय, यहोवाची सेवा एकचित्ताने करावी असा आमचा दृढ निश्‍चय आणि तळमळीची इच्छा खरीच असली पाहिजे.

तुमचे विवेचन काय आहे?

◻ विभिन्‍न पार्श्‍वभूमी असणाऱ्‍या यहोवाच्या सर्व सेवकांना “शुद्ध वाणी” काय करण्यास लावते?

◻ आज हाग्गय २:७ ची कशी पूर्णता होत आहे, व यामुळे देवाच्या इतर सेवकांच्या बाबतीत आम्ही राखून असलेल्या दृष्टीकोणावर कसा परिणाम होण्यास हवा?

◻ फिलिप्पैकरांस पत्र ३:७, प्रत्येक वंश व राष्ट्रातील लोकांसोबत असणाऱ्‍या आमच्या संबंधावर कसा परिणाम घडवून आणू शकते?

◻ आम्ही नीट लक्ष देऊन ऐकले आणि निरीक्षण केले तर इतर राष्ट्रांची पार्श्‍वभूमी असलेल्या आमच्या बांधवांविषयी आम्हाला काय जाणून घेता येईल?

[९ पानांवरील चित्रं]

प्रत्येक वंश व राष्ट्रातील लोक यहोवाची स्तुति एकचित्ताने करीत आहेत

[१० पानांवरील चित्रं]

नीट लक्ष देऊन ऐका व निरिक्षण करा. तुम्हाला यहोवाच्या इतर साक्षीदारांचे वक्‍तव्य आणि त्यांची कृति यातून दिसून येणारे प्रेम व विश्‍वास यामुळे भारावल्याचे नक्कीच वाटेल

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा