येशूचे जीवन व उपाध्यपण
काय माणसाला विटाळविते?
येशूला वाढता विरोध होत आहे. त्याचे पुष्कळ शिष्य त्याला सोडून जातात इतकेच नाही तर, कित्येक यहुदी लोक देखील त्याला ठार करावयास टपले आहेत. हाच प्रयत्न त्यांनी इ. स. ३१ च्या वल्हांडण समयी यरुशलेमात केला होता.
आता इ. स. ३२ चा वल्हांडण आहे. येशू, देवाने दिलेल्या आज्ञेनुसार यरूशलेमात वल्हांडणासाठी येतो. आपले जीवन धोक्यात आहे हे जाणून तो मोठ्या सावधगिरीने तेथे येतो. नंतर तो गालीलात परत जातो.
येशूकडे यरुशलेमाहून शास्त्री व परूशी येतात तेव्हा तो बहुधा कफर्णहूम येथे आहे. ते लोक येशूसंबंधाने काही निमित्त मिळते का व त्याला धार्मिक नियमांचे उल्लंघन करणारा असे काही शाबीत करता येते का त्याचा शोध घेतात. यासाठी ते विचारतातः “तुमचे शिष्य पूर्वीच्या काळच्या लोकांचा सांप्रदाय का मोडतात? कारण ते भोजनप्रसंगी होत धुत नाहीत.” खरे म्हणजे याविषयी देव काही अपेक्षा करीत नव्हता, पण परुश्यांनी मात्र सांप्रदायिक गोष्टीचे पालन न करणे हा गंभीर गुन्हा आहे असे मानले होते. या सांप्रदायात हात कोपरापासून धुणे समाविष्ट होते.
त्यांच्या दोषारोपाला उत्तर देण्याऐवजी येशू, ते देवाच्या नियमांचा केवढा दुष्टपणे व स्वेच्छेने भंग करीत आहेत त्याकडे त्यांचे लक्ष वेधवितो. “तुम्हीही आपल्या संप्रदायेकरून देवाची आज्ञा का उल्लंघिता?” असे तो विचारतो. “कारण देवाने म्हटले आहे की, ‘आपला बाप व आई यांचा मान राख.’ आणि ‘जो कोणी बापाची किंवा आईची थट्टा करतो, त्याला देहांत शिक्षा व्हावी.’ पण तुम्ही म्हणता की, ‘जो कोणी आपल्या बापाला किंवा आईला असे म्हणेल की, “जे काही दिल्याने तुझे हित झाले असते ते मी देवाला अर्पण केले आहे,” त्याने बापाचा किंवा आईचा सन्मान न केला तरी चालेल.’”
परुशी असे शिकवीत की, पैसा, जमीनजुमला किंवा आणखी इतर गोष्टी देवाला भेट या नात्याने समर्पित केल्या तर त्या मंदिराच्या मालकीच्या होत, व यांचा इतर कशासाठीही उपयोग होता कामा नये. पण, या समर्पित केल्या जाणाऱ्या वस्तु, खरे पाहता दाता आपल्यापाशीच ठेवीत असे. अशाप्रकारे कोणी पुत्र जेव्हा नुसते असे म्हणे की, पैसा किंवा मिळकत ही “कुर्बान”—म्हणजे देवाला उपहार म्हणून समर्पित केली आहे किंवा ती मंदिराला दिली आहे—तेव्हा तो आपल्या गरजवंत वृद्ध मातापित्याच्या जबाबदारीतून मुक्त होत असे, असे ते म्हणत.
परुश्यांनी देवाच्या नियमाचा हा जो हेतुपुरस्सर विपर्यास केला होता त्यामुळे उद्विग्न होऊन येशू म्हणतोः “तुम्ही आपल्या संप्रदायेकरुन देवाचे वचन रद्द केले आहे. अहो ढोंग्यांनो, तुम्हाविषयी यशयाने यथायोग्य संदेश दिला की, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात, परंतु त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. ते माणसांचे नियम, शास्त्र म्हणून शिकवून माझी निरर्थक भक्ती करीत आहेत.’”
परुश्यांना येशूला प्रश्न विचारण्यास जागा मिळावी यासाठी जमाव कदाचित दूर उभा राहिला असावा. पण आता जेव्हा येशूने परुश्यांविषयी कडक विधान केल्यावर त्यांना उत्तर देता येईना असे दिसले, तेव्हा येशू जमावास पुन्हा जवळ बोलावतो व म्हणतोः “ऐका व समजून घ्या. जे तोंडात जाते ते माणसाला विटाळवीत नाही; तर जे तोंडातून निघते ते माणसाला विटाळविते.”
नंतर जेव्हा ते एका घरात शिरतात तेव्हा शिष्य येशूला म्हणतातः “हे वचन ऐकून परुशी नाराज झाले, हे आपल्याला कळले काय?”
“माझ्या स्वर्गातील पित्याने लाविले नाही असे प्रत्येक रोप उपटले जाईल,” असे येशू म्हणतो. “त्यांना असू द्या. ते आंधळ्यांचे आंधळे वाटाड्ये आहेत, आणि आंधळा आंधळ्याला नेऊ लागला तर दोघेही खाचेत पडतील.”
यावेळी पेत्र, शिष्यांच्या वतीने, काय माणसाला विटाळविते याविषयी अधिक स्पष्टीकरण मागतो तेव्हा येशूला त्याचे आश्चर्य वाटते. “तुम्ही देखील अज्ञानी आहात काय?” असे येशू त्यांना विचारतो. “जे काही तोंडात जाते ते पोटात उतरते व बाहेर शौचकूपात टाकण्यात येते, हे तुम्हाला समजत नाही काय? पण, जे तोंडातून निघते ते अंतःकरणातून येते व माणसाला विटाळविते. उदाहरणार्थ, अंतःकरणातूनच दुष्ट कल्पना, खून, व्यभिचार, जारकर्मे, चोऱ्या, खोट्या साक्षी, शिव्यागाळी ही निघतात. ह्या गोष्टी माणसाला विटाळवितात; न धुतलेल्या हातांनी जेवणे हे माणसाला विटाळवीत नाही.”
येथे येशू सर्वसाधारण पद्धतीच्या स्वच्छतेविषयी अवमान करीत नव्हता. जेवण तयार करताना किंवा ते खाताना आधी हात धुण्याची मुळीच गरज नाही असे तो सांगत नाही. पण तो येथे धार्मिक पुढाऱ्यांच्या ढोंगास उघड करून दाखवीत होता, जे अशास्त्रीय अशा सांप्रदायावर अधिक भर देत होते आणि देवाच्या नितीमान कायद्यांचा मुद्दाम भंग करीत होते. होय, दुष्कृत्ये माणसाला विटाळवितात. यांचे उगमस्थान माणसाचे अंतःकरण आहे हे येशूने दाखविले. योहान ७:१; अनुवाद १६:१६; मत्तय १५:१-२०; मार्क ७:१-२३; निर्गम २०:१२; २१:१७; यशया २९:१३.
◆ येशूला आता कोणता विरोध होतो?
◆ परुशी कोणता दोषारोप करतात, पण येशूच्या मते परूशीच देवाच्या नियमांचा कसा स्वेच्छेने भंग करीत होते?
◆ माणसाला कोणत्या गोष्टी विटाळवीत असतात असे येशू प्रकट करतो?