येशूचे जीवन व उपाध्यपण
याईरचा निरोप घेणे व नासरेथास पुन्हा भेट देणे
येशूचा हा दिवस खूप कामाने भरलेला होता. दकापलीसहून समुद्रमार्गे प्रवास करणे, रक्तस्त्रावी स्त्रीला बरे करणे व याईरच्या कन्येचे मृतातून पुनरुत्थान करणे इतक्या गोष्टी त्याने केल्या. परंतु, दिवस अजूनही संपलेला नाही. येशू याईरचा निरोप घेतो व जाऊ लागतो तोच दोन अंधळे त्याचा ओरडत पाठलाग करतातः “हे दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया कर.”
येशूला “दाविदाचा पुत्र” असे संबोधिण्याद्वारे ही माणसे येशू हा दाविदाच्या सिंहासनाचा वारस आहे, व यामुळेच तो वाग्दत्त मशीहा आहे हा विश्वास व्यक्त करीत आहेत. तथापि, येशू त्यांची चिकाटी पहावी म्हणून त्यांच्या ओरडण्याकडे दुर्लक्ष करतो. पण ती माणसं धीर सोडत नाही. ते येशूचा पाठलाग, तो राहतो त्या ठिकाणापर्यंत करीत येतात आणि तो जेव्हा घरात शिरतो तेव्हा तेही आत शिरतात.
तेथे येशू विचारतोः “मी हे करू शकेन असा तुमचा विश्वास आहे का?”
“होय प्रभु,” असे ते आत्मविश्वासाने उत्तर देतात.
तेव्हा, येशू त्यांच्या डोळ्यांना स्पर्श करून म्हणतोः “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुम्हाला होवो.” लागलेच त्यांना दिसायला लागते! आता येशू त्यांना निक्षून सांगतो की, “हे कोणाला कळू नये म्हणून सांभाळा.” पण आनंदाने भारावून जाऊन ते येशूच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतात व जाऊन अवघ्या देशात हे वर्तमान कळवतात.
ते दोघे निघून गेल्यावर लोक एका भूतग्रस्ताला त्याच्याकडे आणतात; याची वाचा दुरात्म्यांनी काढून घेतलेली असते. येशू त्या माणसातील दुरात्मा काढतो व तो मुका लागलेच बोलू लागतो. हा चमत्कार बघून लोक आश्चर्यचकित होतात व म्हणतातः “इस्राएलात असे कधीही पाहण्यात आले नव्हते.”
येथे परुशी सुद्धा उपस्थित आहेत. येशूने केलेला चमत्कार ते नाकारु शकत नाही. तरीपण आपल्या दुष्ट अविश्वासामुळे ते येशूने केलेल्या कामाच्या मूळारंभावर पुन्हा एकदा दोषारोप लावून म्हणतातः “हा भूतांच्या अधिपतीच्या साहाय्याने भूते काढतो.”
या घटनेनंतर येशू पुन्हा आपल्या गावी नासरेथात येतो. या खेपेला त्याचे शिष्य त्याच्या बरोबर असतात. एका वर्षाआधी त्याने येथील सभास्थानास भेट दिली होती व उपदेश केला होता. सुरवातीला लोकांना त्याच्या शब्दांचे आश्चर्य वाटले होते, पण नंतर त्याने त्याविषयी जे म्हटले त्यास गुन्हेवजा धरून त्यांनी त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. पण पुन्हा एकदा येशू त्याच्या या पूर्वीच्या शेजाऱ्यांना ही दयावंत भेट देत आहे.
दुसऱ्या ठिकाणी लोकांचा समुदाय येशूकडे येत असे, पण येथे तसे दिसत नाही. तेव्हा तो शब्बाथ दिवशी सभास्थानात जातो. तेथे बरेच लोक त्याच्या शिक्षणामुळे थक्क होतात. “ह्याला ही विलक्षण बुद्धी व सामर्थ्यशक्ती कोठून प्राप्त झाली?” असे ते विचरतात. “हा सुताराचा पुत्र नाही का? याच्या आईला मरीया म्हणत नाही का? याकोब, योसेफ, शिमोन व यहुदा हे याचे भाऊ नाहीत का? याच्या बहिणी आमच्या बरोबर नाहीत का? तर मग, याला या सर्व गोष्टी कोठून प्राप्त झाल्या?”
‘हा तर आपल्यापैकीचाच माणूस आहे.’ असे ते समर्थन करतात. ‘त्याला लहानचा मोठा झाल्याचे आम्ही पाहिले आहे आणि त्याचा परिवार आम्हाला ठाऊक आहे. मग हा मशीहा कसा असू शकतो?’ त्याची विलक्षण बुद्धी व चमत्कार हे असून देखील ते त्याला नाकारतात. त्याचे नातेवाईक देखील, लोकांची अत्यंत जवळीक राखल्यामुळे त्याच्याविषयी अडखळतात. यामुळे येशू हा निष्कर्ष वदवितोः “संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यात मात्र सन्मान मिळत नाही.”
खरेच, येशूला त्यांच्या अविश्वासाचा अचंबा वाटतो. या कारणामुळे थोड्या आजारी माणसांवर हात ठेवून त्यांना बरे करण्याशिवाय तो इतर महत्कृत्ये तेथे करीत नाही. मत्तय ९:२७-३४; १३:५४-५८; मार्क ६:१-६; यशया ९:७.
◆ येशूला “दाविदाचा पुत्र” असे संबोधून त्या अंधळ्या माणसांनी आपणाठायी कोणता विश्वास असल्याचे स्पष्ट केले?
◆ येशूच्या महत्कृत्यांविषयी परुश्यांनी कोणते मत प्रतिपादित केले?
◆ नासरेथात असणाऱ्या लोकांना मदत करण्यास परतणे हे येशूकरता दयावंत असे का होते?
◆ नासरेथात येशूचे कसे स्वागत होते व का?