‘ते पुनरुत्थानात परत येतील हे आम्ही जाणतो’
सर्वसमर्थ देवाने मानवजातीला जीवन दिले. जे मृत आहेत त्यांना तो ते परत देऊ शकतो. त्याच्याकडूनच आम्हाला जीवन व मरण याविषयीची विश्वसनीय माहिती मिळते, ती इब्री व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचने यात आहे. या दोहोंचे मिळून पवित्र शास्त्र बनते. यामध्ये वस्तुस्थितीवर आधारीत असा संदेश मिळतो की, मेलेले परत येऊ शकतात व येतील.—योहान ५:२८, २९.
उदाहरणार्थ, बेथानी येथील लाजर, ज्याला येशू ख्रिस्त चांगल्या तऱ्हेने ओळखत होता, त्याचा ऐतिहासिक वृत्तांत विचारात घ्या. लाजर आजारी होता व नंतर तो वारला. येशूने लाजरची बहीण मार्था हिला म्हटलेः “तुझा [मृत] भाऊ पुन्हा उठेल.” तिने म्हटलेः “तो शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी उठेल हे मला ठाऊक आहे.” (योहान ११:२३, २४) होय, तिला ते ठाऊक होते. तिच्यापाशी विश्वसनीय माहिती होती म्हणून आपला प्रिय भाऊ लाजर “शेवटल्या दिवशी” पुन्हा उठेल याचा तिला संशय वाटला नाही.
योहानाच्या ११ व्या अध्यायातील ऐतिहासिक वृत्तांत तुम्ही वाचाल तर तुम्हाला समजेल की, नंतर काय घडले. लाजर मरुन चार दिवस झाले होते तरी येशूने त्या माणसाला पुन्हा जिवंत केले. हे पुनरुत्थान याचा पुरावा आहे की, देव मृतांना “शेवटल्या दिवशी” पुन्हा आणू शकतो हे त्याने दिलेले अभिवचन तो पूर्ण करील. पण मार्था लाजराला कोठे पाहण्याची अपेक्षा धरीत होती? येणारे पुनरुत्थान कोठे घडेल असे इतर विश्वासू यहुद्यांना वाटत होते?
‘न परतण्याचा प्रदेश’?
या पृथ्वीची निवड देवाने मानवाचे वस्तीस्थान म्हणून केली होती. स्तोत्रकर्ता याविषयी असे उद्गार काढतोः “स्वर्ग तर यहोवाचा आहे; पण पृथ्वी त्याने मानवजातीला दिली आहे.” (स्तोत्रसंहिता ११५:१६) आदाम व हव्वा देवाशी विश्वासू राहिले असते तर त्यांना या पृथ्वीशिवाय इतर कोठेतरी सार्वकालिक जीवन मिळाले असते असा संकेत पवित्र शास्त्रवचनात कोठेही नाही. देवाशी अवज्ञा करण्याचा मार्ग चोखाळण्याआधी पहिले मानवी जोडपे ज्या नंदनवनात आनंदात राहात होते तेथेच तो “जीवनी वृक्ष” या पृथ्वीवर नव्हता का? (उत्पत्ती २:९; ३:२२) तसेच देवाकडून वेगळी माहिती मिळालेली नसल्यामुळे एदेन बागेबाहेरील त्याचे विश्वासू सेवक (आदामाचा देवभिरु पुत्र हाबेलपासून पुढे) मानवासाठी एकच वस्तीस्थान असलेल्या या पृथ्वीवरच पुनरुत्थान होणार अशी स्पष्ट समज बाळगून होते यात काही शंका नाही.
‘आता थांबा,’ पवित्र शास्त्रासोबत परिचित असणारे काही लोक असा आक्षेप घेतील की, ‘ईयोबाने १६ व्या अध्यायाच्या २२ व्या वचनात असे म्हटले नाही का की, त्याला “जेथून परत येता येत नाही,” अशा मार्गाने “तो जाणार आहे”? याशिवाय ईयोब ७:९ मध्ये तो दर्शवितोः “जो अधोलोकात [शिओल, कबर] जातो तो परत येत नाही.” आणखी १० व्या वचनात तो म्हणतोः “तो पुन्हा आपल्या घरी येणार नाही, त्याचे स्थान त्याला पुन्हा ओळखणार नाही.”’
अशाप्रकारे काही विद्वानांचे मत आहे त्याप्रमाणे ही तसेच इतर विधाने ईयोबाने मृत्युविषयी ‘न परतण्याचा प्रदेश’ असा दृष्टीकोन धरला होता असे सांगत नाही का? अशा या विधानाचा अर्थ, ईयोबाचा भावी पुनरुत्थानावर विश्वास नव्हता असे सुचविते का? याच्या उत्तरासाठी आम्ही त्या विधानांची रचना ज्या संदर्भानुसार झाली, ती पाहण्यास हवी, व शिवाय ईयोबाने या विषयासंबंधाने आणखी जे काही म्हटले तेही विचारात घेतले पाहिजे.
ईयोबाला त्याच्या त्रासाचे कारण माहीत नव्हते. काही काळासाठी त्याचा असा गैरसमज झाला होता की, त्याच्यावरील संकटास देव जबाबदार आहे. (ईयोब ६:४; ७:१७-२०; १६:११-१३) निरुत्साही झाल्यामुळे त्याला असे वाटले की, यातून मुक्त होण्याचा एकच मार्ग आहे व तो म्हणजे कबर. (ईयोब ७:२१; १७:१; पडताळा ३:११-१३.) तेथे गेल्यावर, तो त्याच्या मित्रांच्या दृष्टीकोणातून कधीच दिसणार नव्हता, तो कधीच आपल्या घरी परतणार नव्हता, त्याची ओळख राहणार नव्हती, तो मागे येऊ शकणार नव्हता आणि देवाच्या नियुक्त समयाआधी असे काही घडण्याची संभाव्यता नव्हती. देवाच्या मध्यस्तीविना ते एकटे पडल्यामुळे ईयोब व आदामापासूनची सर्व संतती मृतातून परत उठण्यास असमर्थ होती.a—ईयोब ७:९, १०; १०:२१; १४:१२.
पुनरुत्थानावरील विश्वास
ईयोबावर आलेल्या अनुभवाचा अनिश्चितपणा व त्याने त्याच्या नजीकच्या भवितव्याविषयी केलेले भाष्य यावरुन त्याचा पुनरुत्थानावर विश्वास नव्हता असा आम्ही समज करून घेऊ नये. ईयोब १४:१३-१५नुसार त्याचा भावी काळातील पुनरुत्थानावर पूर्ण विश्वास होता हे स्पष्ट दिसते. त्या उताऱ्यात ईयोबाने ही आशा व्यक्त केली की, त्याला ‘अधोलोकात लपविले जावे’ व देवाने त्याची ‘पुन्हा आठवण करावी.’ याशिवाय, ईयोब १९:२५-२७ मध्ये या विश्वासू व सचोटी राखणाऱ्या माणसाला एक “उद्धारक” आहे तसेच तो ‘देवाला पाहतो’ असेही म्हणण्यात आले आहे. होय, ईयोबाचा पुनरुत्थानावर विश्वास होता. त्याचा विश्वास होता की, देव त्याला पुन्हा जीवन प्रदान करू शकतो व करील. हीच खात्री पूर्वी अब्राहामाने देखील बाळगली होती. “मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे,” अशी त्याची खात्री पटली होती.—इब्रीयांस ११:१०, १६, १९, ३५.
पृथ्वीवर भावी काळात लोकांचे जीवनसाठी पुनरुत्थान होणार अशी आधुनिक काळातही यहुदी लोकांनी आशा धरली आहे. एनसायक्लोपिडिआ ज्युडाईका (१९७१) म्हणतेः “मृत झालेले पुन्हा एकदा स्वतःचे शरीर धारण करू या पृथ्वीवर जगतील” हे यहुदी पंथीयांचे “एक महत्त्वपूर्ण तत्त्व” आहे. हा संदर्भग्रंथ पुढे म्हणतोः “ही कल्पना श्रद्धाळू यहुद्यांनी इतकी गंभीरपणे घेतली आहे की, ते दफनविधीसाठी मृतांस घालण्यात येणारे कपडे, सर्व इंद्रियांचे दफन पूर्णपणे होत आहे आणि हे दफन इस्राएलातच होत आहे का याविषयी मोठी काळजी घेत असत.”
वस्तुतः, देव पुनरुत्थानात मृत झालेल्या मानवाची पूर्वी होती त्याच शरीराने पुन्हा जोडणी करील असे पवित्र शास्त्र म्हणत नाही हे लक्षात घेणे मनोवेधक आहे. ज्यांना मरुन बराच कालावधी लोटला आहे त्यांचे अणू पृथ्वीतील मातीत सर्वत्र पसरले गेले, तद्नंतर ते वनस्पती व प्राणी जीवनात तसेच इतर मानवातही येतात जे कालांतराने मरतात. यास्तव हे स्पष्ट आहे की, तेच अणू, ज्यांना परत उठवले जाईल, त्यातील एकापेक्षा अधिकांना वापरले जाणार नाहीत. उलटपक्षी, देव त्याला साजेसे वाटते अशा शरीरात मानवाना उठवील की ज्यामध्ये त्याला पूर्वी होते तसे कसलेही व्यंग नसणार.—पडताळा १ करिंथकर १५:३५-३८.
ह्या पुनरुत्थान झालेल्या लोकांना त्यांचे मित्र व नातेवाईक, ज्यांचे देखील पुनरुत्थान झाले असेल, ओळखतील का? ते व्यवहार्य वाटते, कारण जर आम्ही व ज्यांना मृतातून उठवले जाणार ते, एकमेकांना ओळखू शकलो नाही तर आमचे प्रियजन पुन्हा उठले आहेत हे आपल्याला कसे कळू शकेल बरे? लाजरचे शरीर कुजले होते तरी येशूने त्याचे पुनरुत्थान केल्यावर त्याला त्याच्या नातेवाईक व आप्तेष्टांनी ओळखले. त्याचप्रमाणे, पृथ्वीवर जीवनासाठी लोकांचे पुनरुत्थान केल्यावर देव प्रेमळपणे एकमेकांना पाहून ओळखू देईल अशी अपेक्षा आम्हाला धरता येईल.
थोड्या लोकांसाठी स्वर्गीय आशा
पृथ्वी ही देवाने मानवजातीसाठी घर या नात्याने दिली आहे हे आम्ही पाहिले आहेच. तरीही, येशू ख्रिस्ताने या गोष्टीवर प्रकाश टाकला की, मानवातून निवडलेले थोडे लोक न कोमेजणाऱ्या अविनाशी आत्मिक जीवनासाठी उठविले जाऊन त्याच्यासोबत स्वर्गात राहतील. (२ तीमथ्यी १:१०) येशूने या स्वर्गीय जीवनासाठी “नवीन व जीवनयुक्त मार्ग” दाखविल्यानंतर सर्व ख्रिश्चनांना या आशेमध्ये सहभागी होण्याचे निमंत्रण होते. (इब्रीकर ९:२४; १०:१९, २०) पण हे प्रतिफळ किती जणांना मिळणार? देवाने येशूला जे घडणार आहे ते आपल्या दासांना कळविण्यासाठी दिलेल्या प्रेरित प्रकटीकरणात हा आकडा १,४४,००० इतका दिलेला आहे; यांना “पृथ्वीवरुन विकत घेण्यात आलेले आहे.”—प्रकटीकरण १:१; ७:४-८; १४:१, ३.
स्वर्गीय जीवनासाठी इतक्या थोड्या लोकांना “पृथ्वीवरुन [का] विकत घेण्यात आले आहे”? ही संख्या इतकी का मर्यादित आहे त्याचे कारण तेच प्रकटीकरणाचे पुस्तक देते. त्यातील २० व्या अध्यायाच्या ५ व ६ वचनात आपण वाचतोः “हे पहिले पुनरुत्थान. पहिल्या पुनरुत्थानात ज्याला भाग आहे तो धन्य व पवित्र आहे. अशा लोकांवर दुसऱ्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे व ख्रिस्ताचे याजक होतील; आणि त्याच्याबरोबर हजार वर्षे राज्य करतील.”—तसेच प्रकटीकरण ५:९, १० देखील पहा.
राजाची पृथ्वीवरील प्रजा
सर्वच मानव राजे व याजक या अर्थाने असू शकत नाही; कारण जर सर्वच राजे झाले तर ते कोणावर “राज्य करतील”? परंतु, येशूच्या विश्वासू प्रेषितांभोवती बांधण्यात आलेला हा खास निवडलेला असा गट या पृथ्वीवर व्याप्त रुपाने पसरलेल्या आणि प्रकटीकरण ७:९ ते १७ मध्ये ज्याचे वर्णन देण्यात आले आहे तो “मोठा लोकसमुदाय” याचा समावेश असणाऱ्या लोकांवर राज्य करणार. यातील लाखो लोक सध्या जलद गतीने जवळ येत असलेल्या “सर्वसमर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाची लढाई”कडे आपले डोळे लावून आहेत. ते युद्ध लवकरच पृथ्वीला सर्व अधार्मिकतेपासून शुद्ध करील. देवाच्या कृपेमुळे ते या मोठ्या क्लेशापासून बचावतील व पुढे कधीच मरणार नाहीत.—प्रकटीकरण १६:१४; २१:१४; नीतीसूत्रे २:२१, २२.
‘पण जे मेलेले आहेत, त्या माझ्या प्रियजनांबद्दल काय?’ असे कदाचित तुम्ही विचाराल. येशूने स्वतः मार्थाला म्हटले होते की, इतर लोक, ‘मेले असले तरी जिवंत होतील.’ (योहान ११:२५) ते या पृथ्वीवरील पुनरुत्थानात घडेल. येशू व त्याच्या १,४४,००० राजे व याजक यांच्या कारकिर्दीत जे लाखो आजवर मेलेले आहेत व ज्यांची देव कृपेने आठवण ठेऊन आहे अशा सर्वांना उठविले जाईल व यांना यहोवाची खरी उपासना करण्याचे शिकून घेण्याची पूर्ण संधि देण्यात येईल. ते विश्वासू राहिल्यास त्यांना पृथ्वीवरील नंदनवनात सार्वकालिक जीवनाचे प्रतिफळ मिळेल. हे “शेवटल्या दिवशी” घडेल. याच समयाविषयी मार्थेने येशूसोबत होकारार्थी बोलून म्हटले होते की तिचा भाऊ लाजर पुन्हा जिवंत होईल.—योहान ५:२८, २९; ११:२४; लूक २३:४३.
खात्रीदायक गोष्टींवर आधारलेली आशा
पवित्र शास्त्रात लिखित असणारी पुनरुत्थाने, पवित्र शास्त्रवचने सादर करीत असलेल्या पुनरुत्थानाच्या आशेविषयीची हमी देणारे व सबळ आधार पुरविणारे नमुने आहेत. हा वृत्तांत पृथ्वीवर करण्यात आलेल्या पुनरुत्थानाची माहिती देतो. तो ख्रिस्तपूर्व युगात एलिया व अलिशा या संदेष्ट्यांनी केलेली पुनरुत्थाने, देवाच्या पुत्राने केलेली पुनरुत्थाने (लाजरचे धरुन), प्रेषित पेत्र व पौलाने केलेली पुनरुत्थाने व यहोवा देवाने आपल्या पुत्राचे केलेले पुनरुत्थान या सर्वांची माहिती देतो. तुम्ही आपल्या पवित्र शास्त्रात या वृत्तांतांचे वाचन येथे करु शकता: १ राजे १७:१७-२४; २ राजे ४:३२-३७; मत्तय २८:१-१०; लूक ७:११-१७; ८:४०-५६; योहान ११:३८-४४; प्रे. कृत्ये ९:३६-४२; १०:३८-४२; २०:७-१२.b
या सामर्थ्यशाली लिखाणावर आधारीत असलेल्या पुनरुत्थानाच्या आशेवर पौल अथैनेकरांस ही शाश्वती देऊ शकलाः “देवाने असा एक दिवस नेमिला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमिलेल्या मनुष्याच्या द्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतीमत्वाने करील. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वांस पटविले आहे.”—प्रे. कृत्ये १७:३०, ३१.
होय, येशूचे पुनरुत्थान हे पुनरुत्थानाच्या आशेच्या खरेपणाबद्दल अंतिम हमी देणारे आहे. यामुळेच आम्हाला यहोवा देवाचे प्रेम व त्याचे अमर्याद सामर्थ्य यावर संपूर्ण विश्वास ठेवण्याचा दृढ आधार मिळतो. मार्थेने व्यक्त केलेल्या भावनेप्रमाणेच आम्ही हेच सांगू शकतो की, ‘मेलेले शेवटल्या दिवशी पुनरुत्थान समयी पुन्हा उठतील हे आम्ही जाणतो.”
मार्स डोंगरावर पौलाच्या श्रोत्यांनी त्याने “मृतांच्या पुनरुत्थानाविषयी” दिलेली साक्ष ऐकली तेव्हा त्यामध्ये तीन गट पडले. “कित्येक थट्टा करू लागले व कित्येक म्हणालेः ‘ह्याविषयी आम्ही तुमचे पुन्हा आणखी ऐकू.’ . . . परंतु, काही माणसांनी त्यास चिकटून राहून विश्वास ठेविला.”—प्रे. कृत्ये १७:३२-३४.
तर आता, पुनरुत्थानाच्या आशेविषयी तुमची प्रतिक्रिया काय आहे? यहोवाने लाखो लोकांचे पुनरुत्थान करण्याचे जे अभिवचन दिले आहे त्याचे तो पालन जरुर करील. तथापि, त्यावेळी तुम्ही प्रत्यक्षात तेथे असणार की नाही, आणि तुम्ही त्यांना पाहू शकणार व ते तुम्हाला पाहू शकतील वा नाही या गोष्टी, तुम्ही आज जे काही कराल त्यावर अवलंबून आहे. सार्वकालिक जीवन प्राप्त करण्यासाठी देवाने ठरवून दिलेल्या गरजा शिकून घेण्याची व त्याप्रमाणे जीवन व्यतित करण्याची तुमची इच्छा व तयारी आहे का? मृतांसाठी असणारी आशा तसेच या सद्य व्यवस्थीकरणाच्या नाशातून तुम्ही स्वतःला कसे वाचवू शकाल त्याविषयी यहोवाचे साक्षीदार अधिक माहिती देण्यास नक्की आनंद मानतील.—योहान १७:३.
[तळटीपा]
a याच्याच अनुषंगाने स्तोत्रकर्ता देवाने हस्तक्षेप करण्याआधी त्या काळी जी परिस्थिती अस्तित्वात होती तिजबद्दल लिहिताना म्हणतोः “ते [इस्राएल] नश्वर आहेत आणि वाऱ्याची झुळूक [किंवा, देवाकडील जीवनीशक्ती] निघून जाते व परत येत नाही, तसे ते आहेत, ह्याची [देवाने] आठवण केली.”—स्तोत्रसंहिता ७८:३९.
b पवित्र शास्त्र काळातील पुनरुत्थाने व ख्रिस्ताच्या राज्यकिर्दीतील होणाऱ्या पुनरुत्थानाविषयी पवित्र शास्त्रात देण्यात आलेल्या अभिवचनाविषयीची सविस्तर चर्चा तुम्हाला यु कॅन लिव्ह फॉरएव्हर इन पॅरडाईज ऑन अर्थ् या पुस्तकातील २० वा अध्याय “पुनरुत्थान—कोणासाठी व कोठे?” यात सापडू शकेल. हे पुस्तक तुमच्या वसाहतीत राहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांकडून किंवा त्यांच्या कार्यालयातून मिळू शकेल, त्याचा पत्ता या मासिकाच्या पान २ वर दिला आहे.