देव बोलतो तेव्हा—सरतेशेवटी शांती!
त्याच्या सतावृद्धीला व शांतीला अंत नसणार—यशया ९:७.
१. जगातील नेते शांतीविषयक बोलणी करीत असतील तरी सबंध मानवी इतिहासातून काय घडत आले आहे?
जगातील नेते शांतीविषयी सातत्याने बोलणी करीत आहेत आणि सर्वसाधारण लोकसुद्धा म्हणतात की आम्हाला ती हवी आहे. असे असले तरी आजची ही परिस्थिति यिर्मया संदेष्ट्याने जे काही म्हटले होते त्याचे आम्हाला स्मरण देते की, “आम्ही शांतीची अपेक्षा करतो पण काही हित होत नाही. घाय बरा होण्याची वाट पाहतो, पण पहा, दहशतच उभी.” (यिर्मया ८:१५) खरे म्हणजे काईनाने हाबेलचा वध केला तेव्हा पासून जगाला खरी शांती ही मिळूच शकली नाही; त्याऐवजी त्याला हिंसाचाराच्या पीडेने पछाडले आहे. आणि आमचे हे २०वे शतक सर्व युगापेक्षा अति हिंसाचारी ठरले असून त्यातील युद्धांनी कोटींचा बळी घेतला. आमच्या काळात जगातील लोकसंख्येच्या ९७ टक्कयांनी निदान एका तरी युद्धात भाग घेतला. अशा प्रकारे जगातील नेते शांतीविषयी भाष्य करीत असले तरी त्यांनी आपल्या प्रजाजनांना एका महासंकटातून दुसऱ्या संकटात निरविले आहे.
२. सर्व राष्ट्रात आता कोणत्या हिंसाचारातील बळींची संख्या वाढत आहे?
२ या सर्व हिंसाचारात प्रतिदिवशी घडणाऱ्या क्रुद्ध गुन्ह्यांची भर घातली पाहिजे. याचे उदाहरण द्यायचे झाल्यास अमेरिकेत दरवर्षी सुमारे २०,००० लोकांचा खून होतो. ८०,००० पेक्षा अधिक स्त्रियांवर बलात्कार होतात ज्यापैकीच्या बहुतेकांचा गुन्हा नोंदविला जात नाही. साधारणपणे २० लाख स्त्रियांना त्या ज्या पुरुषांसोबत राहतात त्यांच्याकडून मारहाण मिळते. शिवाय सर्व कुटुंबापैकी एक चतुर्थांश घरात कोणता ना कोणता गुन्हा होतोच. एक अहवाल असा निर्वाळा देतो: “आम्ही आता भयंकर गुन्हेगारी समाज झालो आहोत.” ही परिस्थिती इतर बहुतेक देशात अशीच दिसते.
३. सध्या मानवी कुटुंबावर आणखी कोणता मोठा हिंसाचार ओढावू शकतो?
३ तरीपण आम्ही सध्याच्या अण्वस्त्राकरवी जो हिंसाचार घडवला जाऊ शकतो त्याचा विचार केल्यास वरील हिंसाचार तर अगदीच फिका वाटेल. पृथ्वीवरील सबंध लोकसंख्येला १२वेळा ठार करू शकेल इतका त्याचा भरपूर साठा आहे! एका डॉक्टरांनी म्हटले: “अण्वस्त्रांच्या लढतीत बळी पडणाऱ्यांना सध्याचा वैद्यकिय इलाज काहीही करू शकणार नाही.” का नाही? आणखी दुसऱ्यांनी म्हटले: “बहुतेक डॉक्टर्स, परिचारिका व तंत्रज्ञ ठार झालेले असतील . . . इस्पितळे नाहीशी झालेली असणार. काही बचावलेच तर ते खूपच थोडे असतील पण त्यांच्यापाशी इतरांना वाचवता येण्याजोगे पुरेसे ज्ञान नसणार.”
४, ५. (अ) आमच्या काळातील शांतीच्या उणीवेसंबंधाने एका प्रकाशनाने कोणते विवेचन सादर केले? (ब) याचप्रमाणे एका माजी सरकारी अधिकाऱ्यांनीही काय म्हटले?
४ आमच्या काळातील शांतीच्या उणीवेसंबंधाने एन्सायक्लोपिडीआ ब्रिटानिका याच्या वार्षिक पुस्तकातील अग्रलेखाचा मथळा असा होता: “आमचे छिन्नविच्छिन झालेले जग—गोलार्धव्याप्त गोंधळाचा धोका.” त्यात म्हटले होते: “१९४५ नंतर असे मानले जात होते की “प्रगति” ही अटळ होती आणि आमच्या आधुनिक जगाचे भवितव्य आकर्षक व स्पष्ट असेल.” पण त्या अपेक्षांबाबत तो लेख पुढे म्हणतो: “त्या सर्व अपेक्षाभंगाच्या ठरल्या.” आणखी त्यात असे म्हटले गेले. “त्याऐवजी जे घडले ते हे की . . . जग सावकाशपणे कठोरपणे विच्छिन्न होत गेले. ज्या देशांचा साचा व आध्यात्मिक आकर्षण सहज मानले जात होते ते आता . . . वंश, जमात, धार्मिक [गट] . . . मुलकी गुंड, ठार मारणाऱ्या टोळ्या, अतिरेक्यांच्या हालचाली, गनिमी हालचाली आणि स्वार्थी गट यात रूपांतरित होत आहेत.”
५ याचप्रमाणे अमेरिकेतील एका उच्च माजी सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले: “आंतरराष्ट्रीय डळमळीतपणास पूरक ठरणाऱ्या गोष्टी, संघटनात्मक सहकार्य साधणाऱ्या शक्तींवर नाट्यमयरित्या प्रभुत्व गाजवू पाहात आहे. गोलार्धव्याप्त परिस्थितीचा अभ्यास करणारा कोणीही परीक्षक हाच अटळ निर्वाळा देईल की, या शतकाच्या राहिलेल्या अवधीत सामाजिक गोंधळ, राजकीय उलाढाली, आर्थिक आणिबाणी व आंतरराष्ट्रीय चकमकी या गोष्टी अधिक व्याप्त रूपात पसरतील.” शेवटी त्यांनी म्हटले: “मानवजातीस जो धोका समोर उभा आहे तो थोडक्यात म्हटल्यास, गोलार्धव्याप्त गोंधळ हाच आहे.”
‘अंतराळातील पाहुणे’
६. जगाच्या आजच्या परिस्थितीबद्दल अंतराळातील पाहुणे कोणते निरिक्षण कदाचित करतील याविषयी एका वृत्तपत्राच्या संपादकांनी काय म्हटले?
६ या एकंदरीत दृष्टिकोणामुळेच क्लीव्हलँड वर्तमानपत्राच्या संपादकानी लिहिले: “पुढल्या आठवडी दूरच्या आकाशगंगेहून कोणी पाहुणे येथे आलेच तर आम्ही त्यांना हे सांगावे का की, साम्यवादी मतप्रणाली किंवा भांडवलशाही मतप्रणालीचे श्रेष्ठत्व स्थापण्याकरता आम्हाला स्वतःचाच संहार करावा लागला? आम्ही त्यांना विवेचीत करावे का आम्ही अशा जाती होतो ज्यांचे स्वतःच वेगवेगळ्या राष्ट्रात विभाजन झाले आणि या राष्ट्रांना अधूनमधून रक्ताची चटक लागल्यामुळे त्यांनी एकमेकांचा वध करण्याची शपथ घेतली होती? आमच्या ठायी सामूहिक हत्या घडविणाऱ्या शस्त्राचे संशोधन करण्याची मोठी प्राधान्यता राहिली असल्यामुळे आम्ही आमच्यापैकीच्या काही जातींना उपाशी राहू दिले तर इतरांना मानहानीत व अज्ञानावस्थेत लोळत राहू दिले हे आम्हाला कसे सांगता येईल? ते पाहुणे आपल्या दूरच्या आकाशगंगेत घरी परतल्यावर आम्हाला असंस्कृत माणसे भेटली होती असेच म्हणतील . . . कदाचित आम्ही त्यांना आवर्जून सांगू आम्ही कलेची जोपासना केली व आम्हालाही न्याय प्रिय वाटतो. अशावेळी ते नुसते हसतील आणि पुढचा स्फोट होण्याआधी ते आमचा निरोप घेतील.”
७, ८. (अ) सध्या कोणते सामर्थ्यशाली पाहुणे मानवजातीचे परीक्षण करीत आहेत? (ब) ते येथे का आहेत?
७ कोणी म्हणेल, ‘असे परिक्षण करणारे “अंतराळातील पाहुणे” नाहीत.’ ते खरे. खरोखरच्या भौतिक अंतराळातून नाहीत. तरीपण काही सामर्थ्यशाली व अत्यंत बुद्धीमान पाहुणे गेल्या काही वर्षापासून, मानवजात या पृथ्वीवर स्वतःचे काय करीत आहे याचे खूप बारकाईने परीक्षण करीत आहेत. यासोबत ते हेही पाहत आहेत की, “पुढचा स्फोट होण्याआधी” एक स्पष्ट संदेश दिला जात आहे.
८ मानवजातीचे परीक्षण करणारे हे सामर्थ्यशाली पाहुणे आहेत तरी कोण? देवाचे वचन सांगते की ते आत्मिक क्षेत्रातील देवाचे प्रतिनिधि, त्याचे विश्वासू दिव्यदूत आहेत ज्यांना त्याने या पृथ्वीवर परीक्षण करण्याच्या उद्देशाने पाठविले आहे. या आत्मिक प्राण्यांविषयी स्तोत्रसंहिता १०३:२० म्हणते: “अहो यहोवाच्या दूतांनो, जे तुम्ही बलसंपन्न आहात, आणि त्याचा शब्द ऐकून त्याप्रमाणे चालता ते तुम्ही त्याचा धन्यवाद करा.” या सामर्थ्यशाली दूतांचा पवित्र शास्त्रात वेळोवेळी उल्लेख आला आहे. उदाहरणार्थ, मत्तयाच्या २५व्या अध्यायात आमच्या काळासाठी असणाऱ्या भविष्यवादात वचने ३१ आणि ३२ यात म्हटले आहे: “जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व दूतांसह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजसनावर बसेल. त्याच्यापुढे सर्व रा जमविली जातील आणि जसे मेंढपाळ शेरडांपासून मेंढरे वेगळी करतो तसे तो त्यांस एकमेकांपासून वेगळे करील.”
९. मानवजातीच्या परीक्षणाच्या बाबतीत ख्रिस्त येशू कोणती भूमिका पार पाडतो?
९ हा “मनुष्याचा पुत्र” देवाचा प्रमुख प्रतिनिधि येशू ख्रिस्त आहे. आपले पुनरूत्थान होऊन स्वर्गारोहण झाल्यानंतर यहोवाकडून ही खास नेमणूक मिळावी याकरता तो थांबून राहिला. स्तोत्रसंहिता ११०:१ वर्णिते त्याप्रमाणे यहोवाने त्याला म्हटले: “मी तुझे वैरी तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस.” पवित्र शास्त्र भविष्यवादाची पूर्णता दाखविते की देवाने या सामर्थ्यशाली आत्म्याला कार्य हालचालीस आरंभ करू देण्याचा काळ १९१४ या वर्षी आला.
१०. या विभागणी कार्यात सहकार्य द्यावे यासाठी ख्रिस्ताबरोबर किती दिव्यदूत असतील?
१० पण ती कार्य हालचाल तो एकटा करणार नव्हता; कारण मत्तय २५:३१ म्हणते की त्याच्या सोबत “सर्व दूत” असतील. ते साधारणतः किती असू शकतील? प्रकटीकरण ५:११ म्हणते: मी पाहिले तो [देवाचे] राजासन . . . ह्याच्या भोवती अनेक देवदूतांची वाणी ऐकू आली; त्यांची संख्या . . . सहस्त्रांची सहस्त्रे होती.” एक सहस्त्र म्हणजे १०,००० आणि एका सहस्त्राची सहस्त्रे म्हणजे १०,००० गुणिले १०,००० ज्याचा अर्थ १० कोटी असा होतो! तरीपण प्रकटीकरण म्हणते “सहस्त्रांची सहस्त्रे” इतक्या संख्येचे दिव्यदूत देवाची सेवा करत होते. याचा अर्थ ते कोट्यावधि होते. ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली हे आत्मिक प्राणी पृथ्वीवरील देवाच्या प्रतिनीधींना मानवजातीचे दोन भागात विभाजन करण्यात, एक “सार्वकालिक शिक्षा” तर दुसरा “सार्वकालिक जीवन” यासाठी मदत देत आहेत.—मत्तय २५:४६; तसेच मत्तय १३:४१, ४२ पहा.
“सार्वकालिक सुवार्ता”
११. या काळी देवदूतांचा समूह जी “सार्वकालिक सुवार्ता” देत आहे ती काय आहे?
११ तर मग, या काळी पाहुणे या अर्थी आलेले दिव्यदूत पृथ्वीवर कोणता केंद्रिय संदेश देत आहेत? प्रकटीकरण १४:६ आम्हाला कळविते: “नंतर मी दुसरा एक देवदूत अंतराळाच्या मध्यभागी उडताना पाहिला. त्याच्याजवळ पृथ्वीवर राहणाऱ्यांस म्हणजे प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता होती.” ही “सार्वकालिक सुवार्ता” काय आहे? तिच संबंध, आम्ही शेवटल्याकाळी जगत आहोत याचा पुरावा ज्या विविध गोष्टींकरवी दर्शविला जाईल असे येशूने म्हटले त्यापैकीच्या एकासोबत आहे. मत्तय २४:१४ मध्ये तो म्हणाला: “सर्व राष्ट्रांस साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगात गाजविली जाईल तेव्हा शेवट होईल.”
१२, १३. (अ) राज्याची सत्ता काय आहे? (ब) राज्याचा संदेश ही सर्वोत्तम वार्ता का आहे?
१२ देवाचे राज्य हे ते स्वर्गिय सरकार आहे जे सध्याच्या मानवी राजवटीचे उच्चाटन करण्यात आल्यावर या पृथ्वीवर सत्ता गाजवील. (दानीएल २:४४; मत्तय ६:९, १०) त्याचा राजा ख्रिस्त येशू असून त्याच्यासोबत सह सत्ताधीश सुद्धा आहेत. (प्रकटीकरण १४:१–४; २०:४) ते राज्य हे तेच आहे ज्याचा उल्लेख दानीएल ७:१४ मध्ये या प्रकारे केला गेला आहे: ‘सर्व लोक, सर्व राष्ट्र व सर्व भाषा बोलणारे लोक यांना त्याची सेवा करावी म्हणून त्यास प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली. त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे, त्याचे राज्य अविनाशी आहे.”
१३ राज्याच्या सत्तेविषयीचा संदेश सुवार्ता, होय, सर्वोत्तम वार्ता का आहे? कारण ते राज्य नवे जग, मानवी समाजाची नवी मांडणी आणणार आहे. देवाच्या राजवटीखाली मानवजातीला इतके अप्रतिम आशीर्वाद मिळतील की त्याकाळी हयात राहणाऱ्यांबद्दल स्तोत्रसंहिता ३७:११ म्हणते की, “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील. ते उदंड शांती सुखाचा उपभोग घेतील.” होय, “यहोवा स्वतः आपल्या लोकांस शांतीचे वरदान देईल.” (स्तोत्रसंहिता २९:११) त्या राज्याने पृथ्वीवरील सर्व कारभार आपल्या हाती घेण्याआधी, आज त्याच्या “शांतीचा अधिपति” याच्या हाती असणाऱ्या चिरस्थायी व शांतीप्रद राजवटीची सुवार्ता सर्व राष्ट्रांत गाजविली जात आहे. हे काम देवाचे पृथ्वीवरील सेवक ख्रिस्त व त्याचे देवदूत यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.—यशया ९:६, ७.
१४. (अ) देवाच्या पृथ्वीवरील सेवकांची अचूक ओळख मिळविण्याचा एक मार्ग कोणता? (ब) त्यांच्यावरील यहोवाच्या आशीर्वादाचा प्रत्यय कसा दिसून येत आहे?
१४ हे पृथ्वीवरील देवाचे सेवक कोण आहेत? तसे पाहता, राज्याची सुवार्ता लोकांकडे कोण नियमितरित्या आणीत आहेत? विरोधक सुद्धा याची कबूली देतात की ते यहोवाचे साक्षीदार आहेत. आता यांची ३० लाखापेक्षा अधिक राज्यघोषकांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्यावर्षी सुवार्तेच्या नव्या २,२५,८६८ उपाध्यांची नियुक्ति झाली. शिवाय त्या एकाच वर्षी यहोवाच्या साक्षीदारांच्या २,४६१ नव्या मंडळ्या प्रस्थापित झाल्या. याचे प्रमाण दरदिवशी ६ पेक्षा अधिक पडते. आता २०८ देशात एकूण ५२,१७७ मंडळ्या आहेत. खरेच, यशया ६०:२२ची आता पूर्णता होत आहे. यहोवा “योग्य समयी” त्याच्या प्रचाराचे व एकत्रीकरणाचे कार्य त्वरेने वाढवीत आहे. ती वेळ आजच आहे!
१५. आज लोकांचा निवाडा करण्याचा आधार कोणता आहे?
१५ राज्यसत्तेच्या वार्तेविषयी लोकांची जी प्रतिक्रिया दिसते तिच्या आधाराने ते “सार्वकालिक शिक्षा” मिळण्याच्या की नवीन जगातील” सार्वकालिक जीवन” मिळण्याच्या पात्रतेचे आहेत ते ठरविले जाते. बहुतेक लोक ज्या विषयीचे वर्णन २ इतिहास ३६:१५, १६ मध्ये आहे तशी प्रतिक्रिया दाखवितात: “यहोवा मोठ्या निकडीने आपल्या संदेशावाहकांच्या हस्ते त्यांस आदेश पाठवी, कारण त्याची [त्यांच्यावर] करूणा होती. पण ते खऱ्या देवाच्या संदेशवाहकांची टेर उडवून त्यांची वचने तुच्छ मानीत; व त्यांच्या संदेष्ट्यांची निर्भर्त्सना करीत. शेवटी यहोवाचा कोप . . . भडकला.” पण बाकीचे चांगली प्रतिक्रिया दाखवितात आणि यहोवाच्या संरक्षणाखाली येतात. “जो माझे [खऱ्या ज्ञानाचे] ऐकतो तो सुरक्षित राहतो आणि अरिष्टाची भीती नसल्यामुळे स्वस्थ असतो.”—नीतीसूत्रे १:२०, ३३; मत्तय २५:३४–४६.
स्वर्गीय सैन्याची कारवाई
१६. देव लवकरच अवज्ञाकारी मानवजातीशी कसा बोलेल?
१६ यहोवाच्या सेवकांचे प्रचार कार्य, त्याने ठरविले त्या प्रमाणात पूर्ण होण्याला आता बराच काळ लागणार नाही; ते लवकरच संपेल. आज्ञाभंजक मानवजातीबरोबर देवाने दाखविलेला धीर संपुष्टात येईल. या पिढीत मानवजातीला तो जो शांतीमय संदेश देत होता त्यात बदल होईल. तेव्हा तो “त्यांच्याशी क्रोधयुक्त होऊन बोलेल. तो संतप्त होऊन त्यांस घाबरे करील.” (स्तोत्रसंहिता २:५) यहोवा स्वतः घोषित करतो: ‘मला इर्ष्येने, क्रोधाग्नीने तप्त होऊन बोलावे लागेल.’ (यहेज्केल ३८:१९) त्यावेळी तो येशू ख्रिस्ताला आपल्या स्वर्गीय सैन्याद्वारे या बंडखोर व अभक्त जगाविरूद्ध कारवाई करण्याचा संकेत देईल.
१७. एका दिव्यदूताचे प्रभावशाली सामर्थ्य कसे प्रदर्शित झाले?
१७ हे स्वगीर्य सैन्य केवढ्या मोठ्या प्रमाणातील करवाई करील हे देवाने अश्शुरविरूद्ध कारवाई केली तेव्हा जे घडले त्याद्वारे बघता येईल. दुसरे राजे १९:३५ म्हणते: “त्या रात्री असे झाले की यहोवाच्या देवदूताने जाऊन अश्शूरी गोटातील एक लाख पंचायशी हजार लोक मारिले. . . . सर्व प्रेतच प्रेते!” हे नुसत्या एका देवदूताने केले! तर मग, सहस्त्रांची सहस्त्रे काय साध्य करतील ते अगदी चक्रावणारे आहे.
१८. या व्यवस्थिकरणाच्या समाप्तीला केवढा भयंकर नाश होईल?
१८ काय घडेल त्याचे यिर्मया २५:३१–३३ या शब्दात वर्णन देते: “‘यहोवा राष्ट्रांशी प्रतिवाद करीत आहे. मी सर्व मानवजातीला दंडाज्ञा देत आहे व दुष्टांना तरवारीच्या स्वाधीन करीत आहे’ असे यहोवा म्हणतो. सेनाधीश यहोवा म्हणतो: “पाहा, राष्ट्राराष्ट्रातून अरिष्ट फिर आहे, पृथ्वीच्या अति दूरच्या प्रदेशातून मोठे तुफान उद्भवेल. त्या दिवशी यहोवाने संहारिलेले पृथ्वीच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत पडून राहतील. त्या करता कोणी शोक करणार नाही, त्यांस कोणी उचलणार नाही, पुरणार नाही, ते भूमीला खत होतील.’”
१९. प्रकटीकरणाचा १९वा अध्याय याला आणखी कोणती माहिती जोडतो?
१९ यहोवा हे सर्व कसे तडीस नेईल त्याविषयीची माहिती प्रकटीकरणाच्या १९व्या अध्यायात मिळते. तो आपला राजा येशू ख्रिस्त याला कारवाई करण्याचा आदेश देईल आणि १४वे वचन म्हणते त्याप्रमाणे “स्वर्गातील सैन्ये . . . त्याच्या मागे” जातील. आता १७ व १८ वचन म्हणते: “मी एका देवदूतास सूर्यात उभे राहिलेले पाहिले. तो अंतराळातील मध्यमागी उडणाऱ्या सर्व पाखरांस उच्च वाणीने म्हणाला: ‘या, देवाच्या मोठ्या जेवणावळीसाठी एकत्र व्हा. राजांचे मांस, सरदारांचे मांस, बलवानांचे मांस, घोड्यांचे व त्यावरील स्वारांचे मांस आणि स्वतंत्र व दास, लहानथोर अशा सर्वांचे मांस खावयास या.’” वचने १९ ते २१ सर्व मानवी संस्थांच्या नाशाचे वर्णन देते कारण देवाने त्यांच्यासोबत आपल्या पृथ्वीवरील संदेशवाहकासोबत बोलणी केली तेव्हा त्यांनी त्याचे ऐकले नव्हते.
२०. अण्वस्त्राच्या महासंकटात या जगाचा नाश का होऊ शकणार नाही?
२० अशाप्रकारे, देवाने या हिंसाचारी व छिन्नविच्छिन्न झालेल्या जागतिक व्यवस्थेचा अंत करण्याची वेळ लवकरच येत आहे. हा अंत राष्ट्रांमधील आपसात घडलेल्या अण्वस्त्र युद्धाच्या परिणामामुळे मिळणारा स्वनाश नसणार. तसे घडलेच तर दुष्टांबरोबर धार्मिकांचाहि संहार होणार. तथापि, देवाचा या जगाविरूद्धचा “स्फोट” तसा नसणार तर निवडक असेल. नवीन जगासाठी बचावणारे लोक असतील. नीतीसूत्रे २:२१, २२ म्हणते त्याप्रमाणे, “सरळ जनच पृथ्वीत वस्ती करतील, सात्विक जन त्यात राहतील. दुर्जनांचा देशातून उच्छेद होईल. अनाचाऱ्यांचे त्यातून निर्मूलन होईल.”
२१. आमच्या पुढील लेखात कोणत्या प्रश्नांचा विचारविनिमय होईल?
२१ इतका जगव्याप्त संहार समोर उभा झालेला आहे या दशेत जग का आले आहे? जगातील नेत्यांकरवीचे सध्याचे शांतीचे प्रयत्न फलीत होऊन या व्यवस्थेचा बचाव होऊ शकेल अशी काही शक्यता नाही का? आमची, ज्यांना नव्या जगात बचाव होऊन जिवंत राहण्याची आशा आहे त्या “सरळ” व “सात्विक” जनांमध्ये असण्याची इच्छा आहे तर मानवी इतिहासाच्या या अत्यंत महत्वपूर्ण काळात आमची वागणूक कशी असण्यास हवी? या प्रश्नांचा विचारविनिमय आमचा पुढचा लेख करील.
तुमची उत्तरे काय आहेत?
◻ शांतीची उणीव खासपणे आमच्या काळी आहे हे कसे उघड दिसते?
◻ मानवजातीचे विभाजन करण्यात दिव्यदूतांचे सैन्ये कशी समाविष्ट आहेत?
◻ राज्याचा संदेश “सार्वकालिक सुवार्ता” का आहे?
◻ जीवन किंवा मृत्युसाठी लोकांचा न्यायनिवाडा कसा केला जाईल?
[१३ पानांवरील चित्रं]
यहोवाच्या साक्षीदारांच्या कार्याला दिव्यदूतांच्या सैन्याचे पाठबळ आहे