येशूचे जीवन व उपाध्यपण
भयंकर वादळ शांत करणे
येशूचा हा दिवस खूप कामाने भरलेला होता. त्याने समुद्रकिनारी जमलेल्या जमावास शिक्षण दिले व त्यांनतर त्याने खाजगीपणे आपल्या शिष्यांना दाखल्यांचा अर्थ स्पष्ट करून सांगितला. आता सायंकाळ झाल्यावर तो म्हणतोः “आपण पलिकडे जाऊ या.”
गालील समुद्रकिनाऱ्याच्या पूर्व दिशेला दकापलीस नावाचा एक विभाग आहे. ग्रीक भाषेत दʹका म्हणजे “दहा,” व पʹलीस म्हणजे “शहरे” असा अर्थ होतो. दकापलीसमधील शहरे ग्रीक सांस्कृतिक केंद्रे होती तसेच तेथे काही यहुदी लोक देखील राहात होते. पण, येशूचे या शहरांतील कार्य कमीच आहे. आता तो जी भेट देणार होता ती देखील केवढी अल्प होती हे आपल्याला लवकरच कळेल.
पलिकडे जाण्याविषयीची येशूची विनंती ऐकल्यावर शिष्य एक होडी तयार करतात. ते निघाले आहेत हे इतर लोकांच्या लक्षात येते. ते देखील आपापल्या होड्या घेऊन त्यांच्यासोबत जाऊ लागतात. दुसरा किनारा तितका लांब नव्हता. खरे म्हणजे गालील समुद्र हा केवळ १३ मैल (२१ कि.मी) लांब व ७१/२ मैल (१२ कि.मी) रुंद इतकाच आहे; म्हणजे तो जणू एका मोठ्या सरोवरासारखाच आहे.
येशू खूपच थकलेला आहे. त्यामुळे जेव्हा होडी निघाली तेव्हा येशू होडीच्या मागील बाजूस जाऊन एक उशी घेऊन पडतो. तो लगेच गाढ झोपी जातो. होडीत बसलेले बहुतेक प्रेषित चांगले नावाडी आहेत; कारण हे पूर्वी याच गालील समुद्रात मासेमारीसाठी आपल्या होड्या आणीत. या कारणास्तव हे नावाडी आता ती होडी वल्हवीत आहेत.
पण हा कधीकधी मजेशीर प्रवास होत नसतो. कारण समुद्र सपाटीपासून ७०० फूट (२१० मीटर) खाली असणाऱ्या या मोठ्या सरोवराच्या पृष्ठभागावरील उबदार वातावरण आणि जवळच्या डोंगरावर असलेली थंड हवा यामुळे जोराचे वारे सुरु होतात आणि या सरोवरात मोठे वादळ उठते. हेच आता सुद्धा घडते. आता लाटा होडीवर उसळत आहेत व त्या आत येत आहेत. लवकरच ती होडी बुडेल की काय असे दिसू लागते. तरीपण येशू मात्र अजूनही गाढ झोपेत आहे!
ते अनुभवी नावाडी आपल्या कुशलतेने होडी वल्हवून ती ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी अशा स्वरुपाच्या वादळाला पूर्वीही तोंड दिले होते. पण आता मात्र त्यांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा होत आहे. आपल्या जिवाविषयी भीती वाटून ते येशूला उठवतात. ते म्हणतातः “प्रभो, आपण बुडत आहोत तरी आपणाला काहीच वाटत नाही काय?” पुढे ते म्हणतातः “प्रभुजी, वाचवा, आम्ही बुडालो!”
येशू उठतो आणि वाऱ्याला व समुद्राला आज्ञा करतोः “उगा राहा, शांत हो!” तेव्हा वारा पडतो आणि समुद्रही शांत होतो. आपल्या शिष्यांकडे वळून येशू विचारतोः “तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही?”
तेव्हा शिष्य अतिशय घाबरतात. ‘हा कोणत्या प्रकारचा माणूस आहे?’ असे ते आपसात एकमेकांना विचारतात. ‘कारण वारा व समुद्रही ह्याचे ऐकतात.’
येशू केवढे मोठे सामर्थ्य प्रदर्शित करतो! आमचा राजा नैसर्गिक गोष्टींवर प्रभुत्व राखून आहे आणि जेव्हा तो आपल्या राज्यकारकिर्दीत आपले लक्ष पृथ्वीकडे वळवील तेव्हा आपल्याला नैसर्गिक विपत्तीपासून नक्कीच संरक्षण लाभून आपण सुरक्षित राहू शकू या गोष्टीमुळे आम्हाला केवढे सांत्वनदायक वाटते बरे!
समुद्रातील ते वादळ शमल्यानंतर येशू व त्याचे शिष्य सुरक्षितपणे पूर्व किनाऱ्यावर येतात. दुसऱ्याही होड्यातील लोक वादळाचा सामना करून आपल्या घरी परततात. मार्क ४:३५–५:२; मत्तय ८:१८, २३-२८; लूक ८:२२-२७.
◆ दकापलीस म्हणजे काय व ते कोठे आहे?
◆ गालील समुद्रात मोठे वादळ कोणत्या नैसर्गिक गोष्टीमुळे उठते?
◆ शिष्यांना आपली होडी वल्हवता येत नाही तेव्हा ते काय करतात?