येशूचे जीवन व उपाध्यपण
येशू पृथ्वीवर का आला
या मासिकाच्या अगोदरच्या अंकात आपण पाहिले की कर्फणहुमातील येशू व त्याच्या चौघा शिष्यांचा दिवस अगदी कामात गेला. पहिल्यांदा, त्याने सभास्थानातील एका भूतग्रस्तास बरे केले. नंतर पेत्राच्या घरी त्याने पेत्राच्या सासूला बरे केले व संध्याकाळी कर्फणहुम येथील लोक आपआपल्या दुखणाईतास बरे करण्यासाठी तेथे घेऊन आले होते. त्या सर्वास त्याने बरे केले. त्यामुळे एकान्त असा नव्हताच.
आता, ही दुसऱ्या दिवसाची पहाट आहे. अजून इतके उजाडले नसताना येशू उठतो व बाहेर पडतो. तो खाजगी रित्या आपल्या पित्याशी प्रार्थना करता यावी यासाठी एका शांत एकान्त ठिकाणी जातो. परंतु येशूला हा एकान्त फार वेळ मिळत नाही कारण पेत्र व इतरांना जेव्हा समजते की तो नाही, तेव्हा त्याला शोधावयास ते जातात.
ते येशूला पाहतात, तेव्हा पेत्र म्हणतो: “सर्व लोक आपला शोध करीत आहेत.” कर्फणहुम येथील लोकांना वाटत होते की तो अजून आपल्यामध्ये राहावा. त्याने त्यांच्यासाठी जे केले त्याबद्दल ते गुणग्राहकता बाळगून होते! पण येशू मुख्यतः अद्र्भितरितीने रोग बरे करण्याकरिताच या पृथ्वीवर आला होता का? त्याने काय सांगितले?
पवित्र शास्त्राच्या एका अहवालानुसार, येशू शिष्यांस उत्तर देतो: “मला आसपासच्या गावांत उपदेश करितां यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ. कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे.” लोकसमुदाय येशूस राहण्यास सांगत होता तरी त्याने म्हटले: “मला इतर गांवीही देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली पाहिजे. कारण त्यासाठीच मला पाठविले आहे.”
होय, येशू खरे पाहता देवाच्या राज्याचा प्रचार करण्याकरिताच पृथ्वीवर आला होता आणि या प्रचारामुळे त्याच्या पित्याच्या नामाचे समर्थन होणार होते व मानवजातीचे रोग कायमचे नष्ट होणार होते. तरीपण तो खरोखरच देवाने पाठविलेला आहे हे दाखविण्यासाठी त्याने अद्र्भित रित्या रोग बरे केले. शतकाआधी, मोशेने देखील अशाच प्रकारे अद्र्भित चमत्काराद्वारे तो देवाचा सेवक आहे हे दाखवून दिले.
येशू जेव्हा कर्फणहुम सोडून इतर गावी प्रचारास निघतो, तेव्हा त्याचे चौघे शिष्य देखील त्याच्या बरोबर जातात. हे चौघे म्हणजे, पेत्र, त्याचा भाऊ आंद्रिया, योहान व त्याचा भाऊ याकोब हे होत. तुम्हास आठवत असेलच की, एका आठवड्यापूर्वी ते येशूचे पहिले सहप्रवासी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.
अशाप्रकारे येशू व त्याच्या चौघा शिष्यांचा गालिलातील दौरा उत्तमरितीने यशस्वी झाला! वस्तुतः त्याच्या कार्याची किर्ती सुरिया देशभर सुद्धा पसरली. गालील, यहुदा आणि यार्देन नदीच्या पलिकडील असा मोठा लोकसमुदाय येशू आणि त्याच्या शिष्यांच्यामागे अनुसरला.—मार्क १:३५–३९; लूक ४:४२, ४३; मत्तय ४:२३–२५; निर्गम ४:१–९, ३०, ३१.
◆ कर्फणहुम येथील येशूच्या कार्यमग्नतेच्या दिवसानंतरच्या पहाटे काय घडले?
◆ येशूला पृथ्वीवर का पाठविण्यात आले होते, आणि त्याचे अद्र्भित चमत्कार कोणत्या उद्देशास्तव होते?
◆ गालील येथील येशूच्या प्रचार कार्यासाठी त्याच्या बरोबर कोण गेले, आणि येशूच्या कार्याचा प्रतिसाद काय मिळाला?