वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • wcg पृ. २४६-२५५
  • धैर्यवान व्हा!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धैर्यवान व्हा!
  • धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रार्थनेचं महत्त्व
  • “हिंमत धरा!”
  • “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • धैर्य धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • तुम्ही धैर्यवान होऊ शकता!
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • खंबीर व धैर्यवान व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
अधिक माहिती पाहा
धैर्याने देवाची उपासना करत राहा!
wcg पृ. २४६-२५५

समाप्ती

धैर्यवान व्हा!

छापील आवृत्ती
छापील आवृत्ती
छापील आवृत्ती
छापील आवृत्ती
छापील आवृत्ती

१. बायबलमधून धैर्याबद्दल आपण आणखी काय शिकू शकतो?

आता आपण पुस्तकाच्या अगदी शेवटी पोहोचलोय. मग धैर्याबद्दल आणखी काही बोलायचं बाकी आहे का? नक्कीच! कारण बायबलमध्ये धैर्याबद्दल इतकं काही सांगितलंय, की ते सगळं एका पुस्तकात सांगणं शक्य नाही. उदाहरणार्थ, बायबलमध्ये धैर्य दाखवलेल्या आणखी कितीतरी लोकांबद्दल सांगितलंय. पण त्या सगळ्यांचाच या पुस्तकात उल्लेख केलेला नाही. शिवाय, धैर्य दाखवण्यासाठी आपल्याला आणखी एका गोष्टीची खूप गरज आहे. त्याबद्दलच आता आपण बोलू या.

२. आणखी कोणत्या विश्‍वासू सेवकांनी धैर्य दाखवलं?

२ या पुस्तकात ज्यांच्याबद्दल चर्चा केली आहे त्यांना सोडून आणखी कोणी धैर्य दाखवलं? तुम्ही कदाचित हिब्रू शास्त्रवचनांत उल्लेख केलेल्या यशया, यिर्मया, यहेज्केल, योना किंवा मलाखी यांसारख्या धाडसी संदेष्ट्यांचा विचार कराल. प्रेषित पौलने देवाच्या प्रेरणेने जे लिहिलं ते याच लोकांबद्दल होतं. इब्री लोकांना लिहिलेल्या पत्रात त्याने म्हटलं, की काहींची “थट्टा करण्याद्वारे आणि फटके मारण्याद्वारे परीक्षा झाली. इतकंच नाही, तर त्यांना साखळदंडाची बंधनं आणि तुरुंगवासही सोसावा लागला.” तसंच, काही जण “निराधार, पीडित आणि छळलेले होते,” तर काहींना मृत्युदंडही देण्यात आला. (इब्री ११:३६, ३७) पण इतका छळ सोसूनही ते धैर्याने यहोवाची उपासना करत राहिले.

३-४. बायबलमध्ये ज्या दोन स्त्रियांची नावं दिलेली नाहीत त्यांनी कठीण काळात दावीदला वाचवण्यासाठी काय केलं?

३ धैर्य दाखवलेल्या सगळ्याच लोकांची नावं बायबलमध्ये दिलेली नाहीत. उदाहरणार्थ, दावीद राजाच्या दिवसांतल्या दोन स्त्रियांचा विचार करा. दावीदचा मुलगा अबशालोम याला आपल्या वडिलांच्या जागी राजा बनायचं होतं. त्यामुळे गर्विष्ठ आणि क्रूर अबशालोम दावीदला ठार मारायचा प्रयत्न करत होता. म्हणून दावीदला यरुशलेम सोडून पळून जावं लागलं. त्या वेळी दोन स्त्रियांनी दावीदला मदत केली. अबशालोम पुढे काय करणार आहे हे दावीदला जाणून घ्यायचं होतं. म्हणून दावीदने सादोक नावाच्या धाडसी याजकाला यरुशलेमला परत जायला सांगितलं आणि तिथे राहून अबशालोमचं पुढचं पाऊल काय असेल याची माहिती काढायला सांगितली. सादोकला आता दावीदला माहिती कळवायची होती. त्यासाठी त्याने ‘एका दासीला’ त्याच्याकडे पाठवलं. आपल्याला त्या दासीचं नाव माहीत नाही, पण ती धाडसी होती. आपल्या जिवाला धोका असूनही ती सादोकचा संदेश दावीदला पोहोचवण्यासाठी दावीदच्या दोन माणसांकडे गेली. पण ती दोन माणसं दावीदकडे जात असताना एका माणसाने त्यांना पाहिलं आणि अबशालोमला सांगितलं. म्हणून ती दोन माणसं एका विहिरीत लपून बसली. ज्या माणसाची ती विहीर होती, त्याच्या बायकोने एक कापड घेऊन विहिरीच्या तोंडावर अंथरलं आणि त्यावर धान्य पसरवलं. अबशालोमची माणसं जेव्हा या दोन माणसांना शोधत तिथे आली, तेव्हा त्या स्त्रीने त्यांना दुसरीकडे पाठवलं. बायबलमध्ये या स्त्रीचंसुद्धा नाव सांगितलेलं नाही. पण यहोवाने निवडलेल्या राजाला वाचवण्यासाठी ज्यांनी धैर्य दाखवलं त्यांत या दोन स्त्रियांचासुद्धा वाटा आहे!—२ शमु. १५:२३-३७; १७:८-२२.

कोलाज: दावीद राजाला सुरक्षित ठेवण्यासाठी धैर्याने मदत करणाऱ्‍या दोन स्त्रिया. त्यांची नावं बायबलमध्ये दिलेली नाहीत. १. एक दासी दावीदच्या दोन सेवकांशी बोलत आहे. २. दावीदच्या सेवकांना विहिरीत लपवणारी एक स्त्री विचार करत आहे आणि मागे दोन पुरुष तिच्या घरापासून लांब जात असताना दिसत आहेत.

यहोवाच्या लोकांना मदत करण्यासाठी धैर्य दाखवणारी एक दासी आणि एक स्त्री

४ खरंच, बायबलमध्ये धैर्य दाखवलेल्या कितीतरी लोकांची उदाहरणं दिली आहेत. यांपैकी काही स्त्रिया होत्या, तर काही पुरुष होते. काहींची नावं दिली आहेत, तर काहींची दिलेली नाहीत. काही श्रीमंत होते, तर काही गरीब होते. काहीचं लोकांमध्ये मोठं नाव होतं, तर काही अगदीच सर्वसामान्य होते. पण या सगळ्यांनी धैर्याने यहोवाची बाजू घेतली आणि ते यहोवाला विश्‍वासू राहिले. आजही त्यांच्या अहवालांमुळे आपल्याला फायदा होतो.

प्रार्थनेचं महत्त्व

५-७. तीव्र छळ होऊनसुद्धा पौलला धैर्य दाखवायला कशामुळे मदत झाली?

५ बायबलमधल्या धाडसी स्त्री-पुरुषांसारखं धैर्य आपण कसं दाखवू शकतो? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, की हे स्त्री-पुरुष काही जन्मापासूनच किंवा स्वभावानेच धाडसी नव्हते. मग ते विश्‍वासूपणे यहोवाची सेवा कशी करू शकले? ते फक्‍त स्वतःच्या हिंमतीवर किंवा स्वतःच्या कौशल्यांमुळे यहोवाची सेवा करू शकले का? नाही. त्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज होती. ती कोणती?

६ प्रेषित पौलचा विचार करा. एकदा तो आणि सीला फिलिप्पैमध्ये प्रचार करत असताना लोकांच्या एका जमावाने त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचे कपडे फाडले, त्यांना बऱ्‍याचदा काठ्यांनी मारलं आणि अंधाऱ्‍या कोठडीत डांबून त्यांचे पाय खोड्यांत अडकवले. (प्रे. कार्यं १६:१२, १९-२४) मग नंतर तुरुंगातून सुटका झाल्यावर पौलला प्रचार करायला भीती वाटली का? थोडीफार भीती नक्कीच वाटली असेल. कारण शेवटी तोसुद्धा आपल्यासारखाच एक माणूस होता. पण आपण प्रचार करत राहावं अशी यहोवाची इच्छा आहे हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याला थेस्सलनीकामधल्या लोकांना जाऊन प्रचार करायचा होता. मग तिथे जाण्यासाठी लागणारं बळ आणि धाडस त्याला कशामुळे मिळालं?

७ त्याने पुढे असं लिहिलं: “सुरुवातीला आमचा छळ झाला आणि आम्हाला वाईट वागणूक देण्यात आली. पण, इतका विरोध होत असूनही तुम्हाला देवाबद्दलचा आनंदाचा संदेश सांगण्यासाठी आम्ही आमच्या देवाच्या मदतीने धैर्य एकवटलं.” (१ थेस्सलनी. २:२) पौलला माहीत होतं की देवाचं काम पूर्ण करण्यासाठी त्याला धैर्याची गरज आहे. मग त्याला हे धैर्य कसं दाखवता आलं? त्याच्यात काही विशेष क्षमता होती म्हणून त्याला धैर्य दाखवता आलं असं नाही. तर त्याला ते “देवाच्या मदतीने” दाखवता आलं. पौल नम्र होता म्हणून त्याने धैर्यासाठी यहोवाकडे प्रार्थना केली. आणि यहोवाने त्याला हवं असलेलं धैर्य दिलं.

८. पौलसारखं आपल्यालाही धैर्य दाखवता यावं म्हणून आपण काय करू शकतो?

८ पौलसारखं तुम्हीही यहोवाकडे धैर्यासाठी प्रार्थना करू शकता. आपल्यामध्ये कोणतीही खास क्षमता नाही, त्यामुळे आपण धैर्य दाखवू शकत नाही असा विचार करू नका. उलट तुम्हाला धैर्य दाखवता यावं म्हणून यहोवाला कळकळून प्रार्थना करा.—प्रे. कार्यं ४:२९.

९. आपला विश्‍वास वाढवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करणं का गरजेचंय?

९ धैर्यासोबतच तुम्ही स्वतःमध्ये आणखी एक गुण वाढवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करू शकता. तो गुण म्हणजे विश्‍वास. विश्‍वास हा यहोवाच्या पवित्र शक्‍तीच्या फळाचा एक पैलू आहे. (गलती. ५:२२, २३) तसंच, प्रत्येक ख्रिश्‍चनाला ज्या आध्यात्मिक शस्त्रसामग्रीची गरज असते त्या शस्त्रसामग्रीचा एक भाग विश्‍वासही आहे. (इफिस. ६:१६) विश्‍वासात इतकी ताकद आहे, की त्याच्यामुळे ‘आपण जगावर विजय मिळवू शकतो,’ असं बायबल म्हणतं. (१ योहा. ५:४) यहोवावर जर तुमचा विश्‍वास असेल, तर तुम्ही नक्कीच धैर्य दाखवू शकता. कठीण काळात यहोवा तुम्हाला मदत करेल यावर जर तुमचा पक्का भरवसा असेल, तर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत धैर्य दाखवता येईल. म्हणून प्रत्येक ख्रिश्‍चनाने येशूच्या प्रेषितांप्रमाणेच “आमचा विश्‍वास वाढव” अशी यहोवाकडे प्रार्थना केली पाहिजे.—लूक १७:५.

“हिंमत धरा!”

१०-११. पौलने इब्री ख्रिश्‍चनांना लिहिताना धैर्य दाखवण्यावर इतका भर का दिला?

१० पौलने जेव्हा यरुशलेममध्ये आणि त्याच्या आसपास राहणाऱ्‍या इब्री ख्रिश्‍चनांना पत्र लिहिलं, तेव्हा त्याला माहीत होतं, की लवकरच त्यांना एका मोठ्या संकटाला तोंड द्यावं लागणार आहे. येशूने आधीच सांगितलं होतं, की यरुशलेम शहराचा नाश होणार आहे आणि ती वेळ आता खूप जवळ आली होती. (लूक १९:४१-४४; २१:२०-२४) मग अशा वेळी धैर्य दाखवणं किती महत्त्वाचं आहे याची पौलने त्यांना कशी आठवण करून दिली? त्याने त्यांना यहोवाच्या प्रेमळ अभिवचनाबद्दल सांगितलं. ते अभिवचन या पुस्तकाच्या प्रस्तावनेतही दिलं आहे. तिथे यहोवा म्हणतो: “मी तुला कधीच सोडणार नाही आणि कधीच टाकून देणार नाही.” या अभिवचनामुळे त्यांना कसं वाटणार होतं ते पौलने सांगितलं.,तो म्हणाला: “आपण धैर्याने असं म्हणू शकतो: ‘यहोवा मला साहाय्य करतो; मी घाबरणार नाही. माणूस माझं काय बिघडवू शकतो?’”—इब्री १३:५, ६.

११ इ.स. ७० मध्ये झालेल्या यरुशलेमच्या नाशाबद्दल बायबलमध्ये जास्त काही सांगितलेलं नाही. पण पौलने दिलेला सल्ला ख्रिश्‍चनांनी नक्कीच पाळला असेल असं आपण खातरीने म्हणू शकतो. येशूने दिलेल्या सल्ल्याचं पालन करण्यासाठी त्यांनी धैर्य दाखवलं आणि ते ‘डोंगरांकडे पळून गेले.’—लूक २१:२०, २१.

१२. (क) कठीण समस्यांना तोंड देत असताना तुम्ही धैर्य कसं दाखवू शकता? (ख) या शेवटच्या काळात काही जणांनी विलक्षण धैर्य कसं दाखवलंय, आणि तुम्ही काय करायचा निश्‍चय केलाय? (“यांच्यासारखं धैर्य दाखवा” ही चौकट पाहा.)

१२ आज आणि येणाऱ्‍या दिवसांत कठीण समस्यांना तोंड देत असताना यहोवा तुम्हाला असंच धैर्य दाखवायला मदत करू शकतो. (यहे. ३८:१, २, १०-१२; मत्त. २४:२१) नेहमी लक्षात ठेवा, की यहोवाने आपलं संरक्षण करायचं वचन दिलंय. (यहे. ३८:१९-२३; २ थेस्सलनी. ३:३) जे यहोवावर प्रेम करतात आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवतात त्यांना तो कधीच सोडून देणार नाही. यहोवाने यहोशवाला जे म्हटलं ते तुम्हालाही लागू होतं. त्याने म्हटलं होतं: “हिंमत धर, खंबीर हो.” (यहो. १:७, ९, १८) तसंच, येशूने त्याच्या शिष्यांना जे म्हटलं होतं तेही नेहमी लक्षात ठेवा. त्याने त्यांना म्हटलं होतं: “हिंमत धरा!” येशूने आपल्याला त्याच्या पित्याकडून पवित्र शक्‍ती द्यायचं अभिवचन दिलंय आणि हे अभिवचन तो नक्की पूर्ण करेल. यहोवाची ही पवित्र शक्‍ती तुम्हाला कोणत्याही परीक्षेत धैर्य दाखवायला मदत करेल. (योहा. १४:२६; १५:२६, २७; १६:३३) त्यामुळे तुम्ही नक्कीच धैर्यवान होऊ शकता!

कोलाज: भाऊबहीण धैर्याने परीक्षांचा सामना करत आहेत. १. एक तरुण बहीण तिच्या वर्गात आहे आणि तिच्या हातात शाळेच्या पुस्तकांसोबत “वॉज लाईफ क्रियेटेड?” हे माहितीपत्रकसुद्धा आहे. ती आनंदी दिसत आहे. २. एका शरणार्थी शिबिरात आईवडिलांनी आपल्या लहान मुलीला जवळ घेतलंय आणि त्या सगळ्यांच्या चेहऱ्‍यावर आनंद आहे. ३. एक तरुण भाऊ तुरुंगात असूनही त्याच्या चेहऱ्‍यावर आनंद आहे.

आपली परिस्थिती कशीही असली तरी धैर्य वाढवण्यासाठी यहोवा आपल्याला त्याची पवित्र शक्‍ती द्यायचं वचन देतो. यामुळे आपण कोणत्याही परीक्षेचा सामना करू शकतो

यांच्यासारखं धैर्य दाखवा

मार्टीन आणि गर्टरुड पोएटजिंगर

मार्टीन आणि गर्टरुड पोएटजिंगर.

मार्टीन आणि गर्टरुड यांचं लग्न होऊन फक्‍त साडेतीन महिने झाले होते. ते दोघं एकत्र मिळून आनंदाने देवाची सेवा करत होते. तेव्हाच ॲडॉल्फ हिटलरच्या नाझी हुकूमशाहीने त्या दोघांना वेगळं केलं. १९३६ मध्ये मार्टीन यांना अचानक अटक झाली आणि काही काळानंतर त्यांना डखाउमधल्या छळछावणीत टाकण्यात आलं. नंतर त्यांची पत्नी गर्टरुड यांनाही अटक झाली. नऊ वर्षं त्यांना एकमेकांना भेटता आलं नाही. त्या काळात आपला जोडीदार जिवंत आहे का याची त्या दोघांनाही कल्पना नव्हती. पण दोघांनीही यहोवाला विश्‍वासू राहायचा निश्‍चय केला होता. पुढे मार्टीन यांना डखाउमधून मौथौसेन इथल्या अतिशय कुप्रसिद्ध छळछावणीत पाठवण्यात आलं. तिथे त्यांना खूप क्रूर पद्धतीने छळण्यात आलं. तसंच, गर्टरुड यांनाही साडेतीन वर्षांच्या एकांतवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. त्यानंतर त्यांना आणखी चार वर्षांसाठी रॅवेन्सब्रुक इथल्या छळछावणीत टाकण्यात आलं. युद्ध संपल्यावर त्यांना कळलं, की मार्टीन जिवंत आहेत. म्हणून त्यांनी लष्करी अधिकाऱ्‍याला मार्टीन यांना सोडून देण्याची विनंती केली. यामुळे फक्‍त मार्टीन यांचीच नाही, तर मौथौसेनमधल्या भयंकर छळछावणीतून आणखी १०० साक्षीदारांचीही सुटका झाली. या सगळ्या संकटांना तोंड दिल्यानंतर शेवटी मार्टीन आणि गर्टरुड यांची भेट झाली. त्यानंतर त्यांनी सोबत मिळून बरीच वर्षं पूर्ण वेळेच्या सेवेत घालवली. काही वर्षांनी ते न्यूयॉर्कमधल्या ब्रुकलीनला आले. तिथे मार्टीन यहोवाच्या साक्षीदारांच्या नियमन मंडळाचे सदस्य बनले. ते बऱ्‍याचदा भाऊबहिणींना सांगायचे: “यहोवाच्या सेवकांमध्ये असलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या गुणांपैकी एक गुण म्हणजे धैर्य!” मार्टीन आणि गर्टरुड या दोघांनीही शेवटच्या श्‍वासापर्यंत यहोवाला विश्‍वासू राहून आनंदाने त्याची सेवा केली.

“यहोवाच्या सेवकांमध्ये असलेल्या सगळ्यात महत्त्वाच्या गुणांपैकी एक गुण म्हणजे धैर्य!”—मार्टीन पोएटजिंगर

वॅलंटिना गारनोव्हस्काया

वॅलंटिना गारनोव्हस्काया.

१९४५ ला वॅलंटिना पहिल्यांदा एका साक्षीदार भावाला भेटल्या तेव्हा त्या बेलारूसमध्ये राहत होत्या. त्या वेळी त्या जवळपास २० वर्षांच्या होत्या. त्या भावाने त्यांना बायबलबद्दल आणि यहोवाबद्दल जे काही सांगितलं ते त्यांना खूप आवडलं. त्यानंतर दोनदा त्यांची या भावासोबत चर्चा झाली. पण त्यानंतर मात्र त्यांनी त्या भावाला कधीच पाहिलं नाही. शिवाय, यहोवाच्या साक्षीदारांवर बंदी असल्यामुळे त्या त्यांच्याशी पुढे संपर्कही करू शकल्या नाहीत. असं असलं, तरी शिकलेल्या गोष्टी त्या खूप धैर्याने लोकांना सांगत राहिल्या. पण यासाठी त्यांना अटक करून आठ वर्षं तुरुंगात टाकण्यात आलं. मग १९५३ मध्ये त्यांची सुटका करण्यात आली, तेव्हा त्यांनी लगेच पुन्हा प्रचार करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांना पुन्हा अटक करून आणखी दहा वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. या काळात त्यांना वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये डांबण्यात आलं. एका तुरुंगात त्या बऱ्‍याच साक्षीदार बहिणींना भेटल्या. त्या बहिणींकडे बायबल होतं आणि त्यांनी ते लपवून ठेवलं होतं. त्यांतल्या एका बहिणीने वॅलंटिनाला बायबल दाखवलं. साक्षीदार भावाला भेटल्यानंतर आता पहिल्यांदाच वॅलंटिनाला बायबल बघायला मिळालं होतं. १९६७ मध्ये जेव्हा त्यांची सुटका झाली, तेव्हा त्यांनी लगेच बाप्तिस्मा घेतला. त्यानंतर त्या आवेशाने लोकांना प्रचार करू लागल्या. मग १९६९ मध्ये त्यांना पुन्हा अटक करून आणखी तीन वर्षांसाठी तुरुंगात टाकण्यात आलं. एवढं होऊनही त्या यहोवाबद्दल आणि आनंदाच्या संदेशाबद्दल आवेशाने लोकांना सांगत राहिल्या. त्यांनी जवळजवळ ४४ लोकांना बायबल शिकायला मदत केली. आपल्या आयुष्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या: “माझं स्वतःचं असं घरच नव्हतं. माझ्याकडे फक्‍त एक सुटकेस होती आणि त्यात काही गोष्टी होत्या. पण मी यहोवाच्या सेवेत आनंदी होते.” त्या शेवटपर्यंत विश्‍वासूपणे यहोवाची सेवा करत राहिल्या आणि २००१ मध्ये त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

“माझं स्वतःचं असं घरच नव्हतं. माझ्याकडे फक्‍त एक सुटकेस होती आणि त्यात काही गोष्टी होत्या. पण मी यहोवाच्या सेवेत आनंदी होते.”—वॅलंटिना गारनोव्हस्काया

अल्फ्रेडो फर्नान्डेझ

अल्फ्रेडो फर्नान्डेझ.

अल्फ्रेडोला अर्जेंटिनामध्ये सैन्यात भरती व्हायला सांगितलं गेलं तेव्हा तो जवळपास १९ वर्षांचा होता. पण त्याच्या बायबल प्रशिक्षित विवेकाला हे पटत नसल्यामुळे त्याने भरती व्हायला किंवा लष्करी पोषाख घालायलाही नकार दिला. त्यामुळे त्याला तुरुंगात टाकण्यात आलं. तुरुंगातल्या रक्षकांनी खूप क्रूरपणे त्याचा छळ केला. इतका, की आपण मरून जातोय की काय असं कधीकधी त्याला वाटायचं. पण त्याने बायबल वाचायचं आणि शिकलेल्या गोष्टी लिहून ठेवायचं सोडलं नाही. त्याच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीशाने एका अटीवर त्याची सुटका होईल असं सांगितलं. त्या अटीप्रमाणे त्याला फक्‍त लष्करी पोषाख घालून कोर्टात यायचं होतं. पण या गोष्टीलाही अल्फ्रेडोने साफ नकार दिला. म्हणून त्याला पुन्हा तुरुंगात टाकण्यात आलं. त्याचा इतका वाईट प्रकारे छळ करण्यात आला, की तो खूप आजारी पडला. तुरुंगातल्या डॉक्टरांनी त्याला अक्षरशः असं सांगितलं, की आता त्याच्याकडे खूप कमी वेळ उरलाय. आपला लवकरच मृत्यू होणार आहे याची जाणीव झाल्यावर अल्फ्रेडोने आपल्या घरच्यांना एक पत्र लिहिलं. त्यात त्याने म्हटलं: “घरातल्या सगळ्यांना माझा सप्रेम नमस्कार! मला तुम्हाला असं पत्र लिहायची अजिबात इच्छा नाही. पण परिस्थितीमुळे मला ते लिहावं लागतंय.” अल्फ्रेडो तुरुंगात असताना घरच्यांनी त्याला जी मदत केली होती, त्याबद्दल त्याने त्यांचे आभार मानले, आणि पत्रात पुढे म्हटलं: “आपला प्रेमळ देव यहोवा याचे मी मनापासून आभार मानतो. त्याच्यामुळेच मला इतकं चांगलं कुटुंब मिळालं. . . . मला माहीत आहे, की हे पत्र वाचत असताना तुम्हाला खूप त्रास होईल. पण माझी इतकीच विनंती आहे, की तुम्ही दुःखात बुडून जाऊ नका, तर त्यातून सावरायचा प्रयत्न करा. शास्त्रवचनांत असलेल्या आणि कधीही न संपणाऱ्‍या सांत्वनाच्या स्रोताचा आधार घ्या. . . . आणि हे नेहमी लक्षात ठेवा की मृत्यू ही फक्‍त एक तात्पुरती स्थिती आहे. त्यामुळे मला आशा आहे, की माझ्या आठवणी तुम्हाला विश्‍वासात टिकून राहायला मदत करतील.” तीन वर्षं तुरुंगात काढल्यानंतर १९८२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी अल्फ्रेडोचा मृत्यू झाला. तो शेवटच्या श्‍वासापर्यंत देवाला विश्‍वासू होता.

“तुम्ही दुःखात बुडून जाऊ नका, तर त्यातून सावरायचा प्रयत्न करा.”—अल्फ्रेडो फर्नान्डेझ

कॅरेन एम

कॅरेन आणि रेनर एम.

लहानपणापासून कॅरेन खूप मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या आणि आनंदाने यहोवाची सेवा करायच्या. पुढे त्या एक पायनियर बनल्या आणि या सेवेत त्या खूप आनंदी होत्या. नंतर जेव्हा रेनर नावाच्या एका भावासोबत त्यांचं लग्न झालं, तेव्हा त्यांच्यासोबत मिळून अमेरिकेतल्या बेथेलमध्ये सेवा करतानाही त्या खूप आनंदी होत्या. पण मग जवळपास ५५ वर्षांच्या असताना त्यांना एक जीवघेणा आजार (ALS) झाला. या आजारामुळे चेतापेशी नष्ट होऊ लागतात आणि व्यक्‍तीचा स्वतःच्या शरीरावरचा ताबा सुटू लागतो. मग त्या व्यक्‍तीला बोलता येत नाही, हाचलाच करता येत नाही आणि शेवटी तिचा मृत्यू होतो. कॅरेनला जेव्हा या आजाराबद्दल कळलं, तेव्हा त्यांनी उरलेल्या वेळेचा शक्य तितका चांगला उपयोग करायचं आणि नेहमी सकारात्मक राहायचं ठरवलं. त्या आपला जास्तीत जास्त वेळ बायबल अभ्यासात आणि प्रचारात घालवू लागल्या. त्याच वेळी, बळावत चाललेल्या आपल्या आजाराचा सामना करण्यासाठी त्यांना जे काही शक्य होतं, ते त्या करत राहिल्या. मग जेव्हा त्यांची बोलायची क्षमता कमी होऊ लागली, तेव्हा त्यांनी डोळ्यांच्या हालचालींवर चालणारा कंप्यूटर शिकून घेतला. यामुळे डोळ्यांच्या हालचाली करून त्यांना स्क्रिनवर शब्द लिहिता यायचे. अशा प्रकारे लिहिणं त्रासदायक असलं, तरी त्या सभेसाठी उत्तरं तयार करायच्या आणि पत्रं लिहून लोकांना आनंदाचा संदेश सांगायच्या. बेथेलमध्ये त्यांचा सांभाळ करणारी एक बहीण सांगते: “त्या कधीच असं म्हणाल्या नाहीत की ‘हे सगळं माझ्याच वाट्याला का?’ त्यांच्या मृत्यूच्या दोन आठवड्यांआधी, मी ज्या स्त्रीला प्रचार केला होता तिला त्यांनी पत्र लिहिलं आणि शेवटी असं म्हटलं, ‘तुला जर कधी मन हलकं करावंसं वाटलं, तर तू माझ्याशी कधीही बोलू शकतेस.’” कॅरेनचा सांभाळ करणारी आणखी एक बहीण म्हणते: “त्या कधीच आपल्या आजाराला घेऊन रडत बसल्या नाहीत. खरंतर निराश होण्याची बरीच कारणं त्यांच्याकडे होती, पण पुनरुत्थानाच्या आशेवर त्यांचा पूर्ण भरवसा असल्यामुळे निराश होण्यात काहीच अर्थ नाही असं त्यांना वाटायचं. त्यांना माहीत होतं, की यहोवा एक ना एक दिवस त्यांना नक्की उठवेल आणि चांगलं आरोग्य आणि परिपूर्ण जीवन देईल.” कॅरेन यांना हा आजार झाला तेव्हा त्यांच्या जुळ्या बहिणीने त्यांना विचारलं: “तुझ्यात एवढं बळ येतं कुठून?” तेव्हा कॅरेन इतकंच म्हणाल्या: “तुम्हाला गरज असते तेव्हा यहोवा तुम्हाला नक्की बळ देतो.” यहोवाने खरंच त्यांना शेवटपर्यंत बळ दिलं! त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पतीने त्यांची बरीच पत्रं घरच्यांना आणि भाऊबहिणींना पाठवली. या सगळ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांना धीर देण्यासाठी कॅरेन यांनी ही पत्रं लिहिली होती.

“तुम्हाला गरज असते तेव्हा यहोवा तुम्हाला नक्की बळ देतो.”—कॅरेन एम

१३. धैर्य दाखवत राहायला तुम्हाला कोणत्या गोष्टीमुळे प्रेरणा मिळते?

१३ कल्पना करा, जेव्हा संपूर्ण पृथ्वीवर शांती असेल आणि यहोवाच्या स्मरणात असलेले लोक पुन्हा जिवंत होतील आणि आपण आनंदाने त्यांचं स्वागत करू, तो काळ किती जबरदस्त असेल! या पुस्तकात आपण ज्या धैर्यवान स्त्री-पुरुषांची चर्चा केली त्यांना आणि त्यांच्यासारख्या इतर बऱ्‍याच लोकांना भेटल्यावर आपल्याला खरंच किती आनंद होईल! सैतानाच्या जुन्या जगात राहत असतानाही धैर्याने यहोवाची सेवा करायची, इतकंच नाही तर त्यासाठी मृत्यू सहन करायची निवड केल्याचा त्यांना पस्तावा होईल असं तुम्हाला वाटतं का? मुळीच नाही! आणि तुमच्याबद्दल काय? त्यांच्यासोबत मिळून संपूर्ण पृथ्वीचं रूपांतर नंदनवनात करताना तुम्हाला कसं वाटेल? या शेवटच्या दिवसांत यहोवावर असलेल्या प्रेमापोटी तुम्ही जे धैर्य दाखवलं त्याचा तुम्हाला पस्तावा होईल का? मुळीच नाही! तर मग, अगदी शेवटपर्यंत धैर्य दाखवत राहायचा ठाम निश्‍चय करा. कारण याचा तुम्हाला पुढे कधीच पस्तावा होणार नाही, उलट आनंदच होईल!

भाऊबहीण आणि मुलं नंदनवनाचा आनंद घेत आहेत. काही जण जिराफला खाऊ घालत आहेत. तर इतर काही जण रान मांजराकडे पाहत आहेत. काही जण पिझ्झा बनवत आहेत, एकमेकांशी बोलत आहेत. तर इतर काही जण वाद्यं वाजवत आहेत.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा