भाग २
इस्राएलमधल्या राजांच्या काळापासून यरुशलेम शहर पुन्हा बांधण्यात आलं त्या काळापर्यंत
या भागात सहाशे वर्षांच्या इतिहासाबद्दल सांगितलं आहे. याची सुरुवात शौल राजाचा मुलगा योनाथान याच्यापासून होते. त्यानंतर इस्राएलचा पहिला विश्वासू राजा दावीद याच्याबद्दल आपण पाहतो. मग देवाचे लोक बाबेलच्या गुलामीतून परत येतात आणि यरुशलेम शहर पुन्हा बांधतात त्या काळापर्यंत आपण येतो. तसंच, या भागात आपल्याला अबीगईल, नाथान, एलीया, दानीएल, एस्तेर, नहेम्या आणि देवाच्या इतर सेवकांच्या उदाहरणातून खूप प्रोत्साहन मिळतं. वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी त्यांना धैर्याची गरज होती. काही राजांना देवाच्या बंडखोर लोकांचं वागणं सहन करावं लागलं. तर काही राजे देवाच्या मार्गापासून भरकटल्यामुळे लोकांना यहोवाला विश्वासू राहणं कठीण होतं. तसंच, देवाने निवडलेलं इस्राएल राष्ट्र हळूहळू धर्मत्यागी आणि दुष्ट होत गेलं, तेव्हासुद्धा काहींना सत्याच्या बाजूने ठाम भूमिका घ्यावी लागली.