४४ बाप्तिस्मा देणारा योहान
त्याच्यापेक्षा “श्रेष्ठ कोणी नाही”
बरीच शतकं उलटून गेली होती. यहोवाने आपल्या लोकांना सुधारण्यासाठी अजून कोणत्याही संदेष्ट्याला त्यांच्याकडे पाठवलं नव्हतं. मग अचानक देवाने योहान नावाच्या एका माणसाला आपला संदेश सांगण्यासाठी त्यांच्याकडे पाठवलं. योहान यहूदीयाच्या ओसाड रानात एकटाच राहायचा. तिथे साप, विंचू, हिंस्र प्राणी आणि लुटमार करणाऱ्या टोळ्या असायच्या. योहानने अशा ठिकाणी राहायचं धाडस तर दाखवलंच, पण एक जळजळीत संदेश सांगायचंही धैर्य दाखवलं.
स्वर्गदूताने योहानबद्दल जखऱ्या आणि अलीशिबाला जे सांगितलं होतं ते त्यांनी नक्कीच आपल्या मुलाला सांगितलं असेल. त्यामुळे आपल्याला एलीयासारखा आवेशी संदेष्टा म्हणून आणि शमुवेलसारखा नाझीर म्हणून कार्य करावं लागेल हे त्याला चांगलं माहीत होतं. तसंच, आपल्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असलेल्या एका व्यक्तीसाठी मार्ग तयार करावा लागेल हेही त्याला माहीत होतं. वयाच्या ३० व्या वर्षी योहान आपल्या वडिलांसारखंच याजक म्हणून सेवा करू शकला असता, पण तो लोकांना पश्चात्ताप करायला सांगू लागला. फार पूर्वी केलेल्या भविष्यवाणीप्रमाणे तो ‘ओसाड रानात घोषणा करणारा आवाज’ बनला. त्याने इतक्या आत्मविश्वासाने लोकांना ‘स्वर्गाच्या राज्याबद्दल’ सांगितलं, की गावागावांतून आणि शहराशहरांतून लोक त्याचं ऐकण्यासाठी येऊ लागले. आपल्या पापांबद्दल पश्चात्ताप करणाऱ्या लोकांना त्याने पाण्यात बाप्तिस्मा दिला. तसंच समाजात वर्चस्व असणाऱ्या सदूकी आणि परुशांसारख्या धर्मपुढाऱ्यांचा ढोंगीपणाही त्याने निडरपणे उघड केला आणि त्यांच्यावर कसा न्यायदंड बजावला जाईल ते सांगितलं.
योहानला मिळालेल्या खास जबाबदारीमुळे तो गर्वाने फुगला नाही. उलट, त्याने नम्रपणे असं जाहीर केलं, की त्याच्यानंतर येणाऱ्या आणि त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ असणाऱ्या एका व्यक्तीसाठी तो फक्त मार्ग तयार करणारा आहे. योहानने असंही म्हटलं, की तो तर त्याच्या जोड्यांचे बंद सोडायच्याही लायकीचा नाही. त्याने जेव्हा येशूला बाप्तिस्मा दिला तेव्हा त्याने प्रत्यक्ष यहोवाला असं म्हणताना ऐकलं: “हा माझा मुलगा मला प्रिय आहे. त्याने माझं मन आनंदित केलंय.” त्यामुळे नंतर जेव्हा येशू योहानकडे परत आला तेव्हा योहानने उघडपणे असं म्हटलं: “पाहा! जगाचं पाप दूर करणारा देवाचा कोकरा!”
योहानने नम्रपणे आपल्या शिष्यांना येशूच्या मागे जायचं प्रोत्साहन दिलं. आणि बरेच जण गेलेही. त्यांच्यामध्ये पेत्रचा भाऊ अंद्रिया होता आणि असं दिसतं, की जब्दीचा मुलगा योहानसुद्धा होता. पुढे हे दोघंही ख्रिस्ताचे प्रेषित बनले. काही काळापर्यंत येशू आणि योहान यांचं सेवाकार्य सोबत चालू होतं. दोघंही लोकांना पश्चात्तापाचं चिन्ह म्हणून बाप्तिस्मा घ्यायला सांगत होते. नंतर जेव्हा योहानच्या शिष्यांनी त्याला येऊन सांगितलं, की येशूचे शिष्य त्याच्यापेक्षा जास्त लोकांना बाप्तिस्मा देत आहेत, तेव्हा त्याला राग आला नाही. उलट, त्याने नम्रपणे असं म्हटलं: “त्याने वाढत जावं आणि मी कमी होत जावं हे गरजेचं आहे.”
योहानने धैर्याने सांगितलेला संदेश समाजात वर्चस्व असणाऱ्या भ्रष्ट धार्मिक पुढाऱ्यांना आवडला नाही, पण मसीहाची वाट पाहणाऱ्यांना त्यामुळे आनंद झाला
योहानने एका शक्तिशाली राजाची म्हणजे हेरोद अंतिपाची चूक अगदी धैर्याने आणि उघडपणे दाखवून दिली. त्याने त्याला सांगितलं की तो अनैतिक जीवन जगत आहे. कारण हेरोद यहुदी बनला होता, पण तरी त्याने त्याच्या सावत्र भावाच्या बायकोसोबत, म्हणजे हेरोदियासोबत लग्न केलं होतं. ही गोष्ट यहोवाच्या नियमाच्या विरुद्ध आहे असं जेव्हा योहानने त्याला सांगितलं, तेव्हा हेरोदने त्याला तुरुंगात टाकलं. पण हेरोदिया मात्र इतकी चिडली होती, की तिला त्याला ठारच मारायचं होतं.
तुरुंगात असताना योहानला धीराची खूप गरज होती. म्हणून त्याने आपल्या दोन शिष्यांना येशूकडे पाठवून असं विचारलं: “जो येणार होता तो तूच आहेस, की आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी?” यावर आपण तोच आहे हे सांगण्यासाठी येशूने त्याला एक रोमांचक गोष्ट कळवली. तो म्हणाला: “आंधळे आपल्या डोळ्यांनी पाहत आहेत, . . . बहिऱ्यांना ऐकू येतंय, मेलेल्यांना जिवंत केलं जातंय.” योहान एलीयासारखा संदेष्टा असला, तरी त्याला कधीच चमत्कार करायची शक्ती मिळाली नव्हती. पण आता येशूने केलेल्या चमत्कारांबद्दल ऐकून त्या अंधाऱ्या कोठडीत त्याला खरंच खूप धीर आणि दिलासा मिळाला असेल. आणि आपण येशूसाठी मार्ग तयार केला, याचं त्याला खूप समाधान वाटलं असेल.
पण लवकरच हेरोदियाला योहानचा बदला घ्यायची संधी मिळाली. हेरोदच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात जेव्हा तिची मुलगी नाचली तेव्हा हेरोद खूप खूश झाला. आणि ती मागेल ते द्यायचं वचन त्याने तिला दिलं. तेव्हा हेरोदियाने आपल्या मुलीला बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं मुंडकं मागायला सांगितलं. हेरोदला खरंतर योहानला मारायचं नव्हतं, पण त्याच्यात ‘नाही’ म्हणायचं धाडस नव्हतं. त्यामुळे त्याने योहानला ठार मारलं. योहानने मात्र शेवटच्या श्वासापर्यंत धैर्य दाखवलं.
म्हणूनच योहानबद्दल येशूने म्हटलं: “मी तर तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्यांमध्ये योहानपेक्षा श्रेष्ठ कोणी नाही.” कोणत्याही अपरिपूर्ण मानवाला, अगदी मोशे किंवा एलीया यांसारख्या संदेष्ट्यांनासुद्धा भविष्यवाणीत सांगितल्याप्रमाणे, मसीहासाठी मार्ग तयार करणारा ‘ओसाड रानातला आवाज’ बनायचा बहुमान मिळाला नाही. खरंच, योहानचं धैर्य ख्रिश्चनांना आजपर्यंत प्रोत्साहन देत आलं आहे!
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं येशूसोबत काय नातं होतं? (टेहळणी बुरूज१० ९/१ १५ ¶४-६-wcgr)
२. बाप्तिस्मा देणारा योहान खरंच होऊन गेला होता हे पहिल्या शतकातला इतिहासकार फ्लेवियस जोसिफसच्या लिखाणातून कसं दिसून येतं? (जागे राहा! लेख १४-wcgr) १
चित्र १: इ.स. ३० मधलं हेरोद अंतिपाने काढलेलं एक नाणं. त्यावर असं लिहिलंय: “राज्यपाल हेरोद”
३. योहान कोणत्या अर्थाने एलीयाप्रमाणे देवापुढे चालला? (लूक १:१७, तळटीप; इन्साइट “आवेश” ¶६०-wcgr) २
चित्र २
४. योहानचं स्वर्गातल्या जीवनासाठी पुनरुत्थान झालं नाही हे कशावरून कळतं? (मत्त. ११:११; बायबलमधून प्रश्नांची उत्तरं लेख १७८ ¶४-wcgr)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
योहानने बायबलची भविष्यवाणी पूर्ण केली आणि मसीहासाठी मार्ग तयार केला तरी तो नम्र राहिला. (योहा. १:२६, २७) आपण त्याच्याकडून काय शिकू शकतो?
योहान एक साधं जीवन जगला. त्याचं संपूर्ण लक्ष यहोवाची इच्छा पूर्ण करण्यावर होतं. (मत्त. ३:४) आज आपणही एक साधं जीवन कसं जगू शकतो? ३
चित्र ३
तुम्ही बाप्तिस्मा देणाऱ्या योहानच्या धैर्याचं अनुकरण कसं करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
बाप्तिस्मा देणाऱ्या योहानचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?
आणखी शिका
कठीण परिस्थितीतही योहानला धीर धरायला आणि आनंदी राहायला कशी मदत झाली ते पाहा.
“बाप्तिस्मा देणारा योहान—आनंद टिकून ठेवण्याबाबतीत एक चांगलं उदाहरण” (टेहळणी बुरूज१९.०८ २९-३१)
योहानच्या उदाहरणामुळे आपल्याला छळाचा, आर्थिक समस्यांचा आणि निराशेचा सामना करायला कशी मदत होऊ शकते?