२१ शमुवेल
तो लहान होता, तरी यहोवाच्या वतीने बोलला
एका अर्थाने शमुवेलचं आयुष्यसुद्धा इफ्ताहच्या मुलीसारखं आणि शमशोनसारखंच होतं. त्या तिघांमध्येही एक गोष्ट सारखीच होती. ती म्हणजे, त्या तिघांचेही आईवडील यहोवाला विश्वासू होते आणि याचा त्यांच्या जीवनावर खूप चांगला प्रभाव पडला. इफ्ताहच्या मुलीप्रमाणे शमुवेलने आपलं संपूर्ण जीवन यहोवाच्या पवित्र सेवेत घालवलं होतं. (१ शमु. २:११) शमशोनप्रमाणेच तोसुद्धा आयुष्यभरासाठी नाझीर होता. (शास्ते १३:७) या दोघांप्रमाणेच त्यालाही धैर्याची गरज होती.
शमुवेलचं दूध तुटलं, तेव्हा त्याची आई हन्नाने त्याला आयुष्यभर यहोवाची सेवा करण्यासाठी शिलो इथल्या उपासना मंडपात आणलं. कारण तिने यहोवाला तसं वचन दिलं होतं. त्या वेळी शमुवेल कदाचित तीनएक वर्षांचा असावा. हन्ना दरवर्षी त्याला भेटायला यायची आणि प्रत्येक वेळी ती त्याला एक नवीन झगा घेऊन यायची. तिथेच महायाजक एलीच्या देखरेखीखाली शमुवेल लहानाचा मोठा झाला. त्या वेळी एलीचं खूप वय झालं होतं. आणि कदाचित उपासना मंडपातल्या काही स्त्रियांनी शमुवेलची काळजी घेतली असेल.
पण तिथे खरी उपासना भ्रष्ट होत चालली होती. यासाठी काही प्रमाणात एलीसुद्धा जबाबदार होता. कारण हफनी आणि फिनहास ही त्याची दोन मुलं खूप दुष्ट होती. ते यहोवाच्या पवित्र घरात सेवा करणाऱ्या स्त्रियांसोबत अनैतिक कामं करायचे. तसंच, ते इतर मार्गांनीही शुद्ध उपासना भ्रष्ट करत होते. असं दिसतं, की त्यांच्या आदेशावरून मंदिरातले सेवक प्रामाणिक मनाच्या उपासकांना दमदाटी करायचे. लोक यहोवासाठी बलिदानं अर्पण करायला यायचे, तेव्हा त्यांतला सगळ्यात चांगला भाग यहोवाला देण्याऐवजी ते अधाशीपणे हिसकावून घ्यायचे. आपली मुलं काय करत आहेत हे एलीला चांगलं माहीत होतं. तरीही त्याने त्यांना फक्त नावापुरतं रागावलं आणि त्यांनीही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण अशा वाईट वातावरणात राहूनसुद्धा शमुवेल देवाच्या आणि माणसांच्या कृपेत वाढत गेला. नंतर शिलो इथल्या समस्या सोडवण्याची यहोवाची वेळ आली, तेव्हा त्याने लहान असलेल्या शमुवेलला आपल्या वतीने बोलण्यासाठी निवडलं.
एकदा असं झालं, की रात्रीच्या वेळी शमुवेलला एका आवाजामुळे जाग आली. यहोवा त्याला बोलवत होता. शमुवेलला वाटलं की एलीच त्याला बोलवतोय. त्यामुळे तो धावत त्याच्याकडे गेला आणि त्याला काय हवंय हे त्याने विचारलं. एलीचं खूप वय झालं होतं आणि त्याला नीट दिसतही नव्हतं. त्याने शमुवेलला बोलवलं नव्हतं म्हणून त्याने त्याला पुन्हा जाऊन झोपायला सांगितलं. असं दोनदा घडलं. शेवटी एलीला कळलं की नेमकं काय चाललंय. त्यामुळे त्याने शमुवेलला परत जाऊन झोपायला सांगितलं आणि म्हटलं की पुन्हा हाक ऐकू आली तर असं बोल: “हे यहोवा! बोल, तुझा सेवक ऐकतोय.” शमुवेलनेही अगदी तसंच केलं.
मग यहोवाने, “शमुवेल, शमुवेल!” असं म्हणून चौथ्यांदा त्याला हाक मारली. त्यावर तो म्हणाला: “हे देवा बोल, तुझा सेवक ऐकतोय.” मग यहोवा शमुवेलशी बोलला. त्याने त्याला सांगितलं, की तो शिलोमधल्या चुकीच्या गोष्टी सुधारणार आहे आणि एलीलाही शिक्षा देणार आहे. कारण त्याने त्याच्या मुलांना ही वाईट कामं करण्यापासून रोखलं नाही. यहोवाने म्हटलं की तो एलीला, त्याच्या मुलांना आणि त्याच्या संपूर्ण घराण्याला शिक्षा देणार आहे. आता शमुवेलला या सगळ्या गोष्टी एलीला सांगायच्या होत्या!
त्यानंतर शमुवेल परत जाऊन झोपला खरा, पण त्या रात्री त्याला झोप लागली की नाही हे बायबलमध्ये कुठेही सांगितलेलं नाही. सकाळ झाल्यावर तो उठला आणि त्याने उपासना मंडपाच्या अंगणाची दारं उघडली. “त्याने जो दृष्टान्त पाहिला होता त्याबद्दल तो एलीला सांगायला घाबरत होता,” आणि हे समजण्यासारखंय. मग एलीने शमुवेलला बोलवलं आणि देवाने त्याला काय सांगितलंय हे विचारलं. शमुवेल त्याला सांगायला घाबरतोय हे एलीच्या लक्षात आलं असेल. त्यामुळे तो त्याला म्हणाला: “बाळा, माझ्यापासून काहीही लपवू नकोस.”
शमुवेल वयाने लहान असला तरी त्याला महायाजक एलीला यहोवाचा न्यायदंडाचा संदेश सांगावा लागला
हे करणं शमुवेलसाठी नक्कीच खूप कठीण होतं. कारण एली त्याच्यासाठी त्याच्या आजोबांसारखा होता. शिवाय तो इस्राएल राष्ट्राचा महायाजक होता. त्यामुळे शमुवेलच्या मनात नक्कीच त्याच्याबद्दल खूप आदर असावा. पण तरी शमुवेल एलीशी बोलला. बायबल म्हणतं, की “शमुवेलने त्याला सगळं काही सांगितलं.” आता एलीला कळलं, की लवकरच त्याच्यावर एक मोठं संकट येणार आहे. मग त्याने त्याच्या मुलांची चूक सुधारली का? याबद्दल बायबलमध्ये कुठेच सांगितलेलं नाही.
शमुवेलने धैर्य दाखवल्यामुळे यहोवाने त्याला खूप आशीर्वाद दिले. बायबलमध्ये आपण असं वाचतो: “यहोवा त्याच्यासोबत होता.” इतकंच नाही, तर यहोवाने आपल्या वतीने बोलणारा संदेष्टा म्हणून शमुवेलचा उपयोग केला. त्याने “त्याचा एकही शब्द खोटा ठरू दिला नाही.” शमुवेलने एली आणि त्याच्या मुलांबद्दल जे काही सांगितलं होतं ते शेवटी खरं ठरलं. पुढे बरीच वर्षं यहोवाने शमुवेलचा वापर करून इस्राएल राष्ट्राला मार्गदर्शन दिलं. बरीच दशकं शमुवेलने यहोवाचा संदेष्टा आणि न्यायाधीश म्हणून विश्वासूपणे सेवा केली. खूप लहान वयातच तो यहोवाच्या मदतीने धैर्य दाखवायला शिकला आणि पुढे आयुष्यभर त्याने असंच धैर्य दाखवलं.
याबद्दल बायबलमधून वाचा:
चर्चेसाठी:
शमुवेलने कोणकोणत्या मार्गांनी धैर्य दाखवलं?
संशोधन करा
१. यहोवाचा उपासना मंडप जिथे होता त्या शिलोचं वर्णन करा. (टेहळणी बुरूज९२ ११/१ ८-९-wcgr) १
Todd Bolen/BiblePlaces.com
चित्र १: प्राचीन काळात शिलो जिथे होतं ते ठिकाण
२. शमुवेल यहोवाच्या उपासना मंडपात सेवा करत होता तेव्हा तिथली परिस्थिती कशी होती? (अनुकरण करा ६०-६२ ¶९-१३) २
चित्र २
३. कोणत्या अर्थाने “शमुवेलला यहोवाची पूर्णपणे ओळख झाली नव्हती?” (१ शमु. ३:७; टेहळणी बुरूज०२ १२/१५ ८ ¶५-६)
४. एलीच्या कुटुंबाबद्दल केलेली भविष्यवाणी कशा प्रकारे पूर्ण झाली? (इन्साइट “एली, १” ¶५-७-wcgr)
शिकलेल्या मुद्द्यांवर विचार करा
खाली दिलेल्या गोष्टींच्या बाबतीत तरुण लोक शमुवेलच्या उदाहरणातून काय शिकू शकतात?
आज्ञा पाळायला तयार असण्याच्या बाबतीत (१ शमु. ३:५)
सभ्यतेने आणि आदराने वागण्याच्या बाबतीत (१ शमु. ३:६-१०)
भरवशालायक असण्याच्या बाबतीत (१ शमु. ३:१५) ३
चित्र ३
एखाद्या तरुण व्यक्तीला धैर्याने बोलायची गरज कधी पडू शकते आणि या बाबतीत शमुवेलचं उदाहरण तिला कशी मदत करू शकतं?
तुम्ही आणखी कोणत्या मार्गांनी शमुवेलने दाखवलेल्या धैर्याचं अनुकरण करू शकता?
मनन करण्यासाठी
या अहवालातून मला यहोवाबद्दल काय शिकायला मिळतं?
या अहवालाचा यहोवाच्या मूळ उद्देशाशी कसा संबंध आहे?
शमुवेलचं पुनरुत्थान झाल्यावर मी त्याला काय विचारेन?
आणखी शिका
जे योग्य आहे त्याची बाजू घेण्यासाठी लहान मुलांना आणि मोठ्यांना धैर्याची गरज केव्हा पडू शकते?
उपासना मंडपातले काही लोक देवाचा अनादर करत असले तरी शमुवेल मात्र योग्य तेच करत राहिला.
“शमुवेलने यहोवाची सेवा करायचं निवडलं” (बायबलच्या चित्रकथा लेख १५-wcgr)