अध्याय सात
तो “यहोवासमोर वाढत गेला”
१, २. (क) इस्राएल राष्ट्र गिलगाल इथं एकत्र झालं होतं, त्या दृश्याचं वर्णन करा. (ख) लोकांनी पश्चात्ताप करावा असं शमुवेलाला का वाटत होतं?
संपूर्ण इस्राएल राष्ट्र गिलगाल इथं एकत्र झालं होतं. वर्षानुवर्षं या राष्ट्रात संदेष्टा व न्यायाधीश म्हणून विश्वासूपणे सेवा केलेल्या शमुवेलानं त्यांना या ठिकाणी बोलावलं होतं. इस्राएलमधील ते उन्हाळ्याचे दिवस होते; आधुनिक कॅलेंडरनुसार कदाचित मे-जून महिन्याचा काळ. शेतांमध्ये गव्हाची सोनेरी कणसं कापणीला आली होती. शमुवेलानं समोर उभ्या असलेल्या आपल्या राष्ट्रातील लोकांकडे पाहिलं. लोकांमध्ये शांतता पसरली व सर्व लोक आता उत्सुकतेनं त्याच्याकडे पाहू लागले. शमुवेलाला मात्र एकच प्रश्न पडला होता, काय केल्यानं या लोकांचे डोळे उघडतील?
२ आपण किती गंभीर चूक करत आहोत, याची त्या लोकांना मुळीच जाणीव नव्हती. त्यांनी आपल्यावर राजा नेमण्याची शमुवेलाला गळ घातली होती. पण, असं करण्याद्वारे आपण देवाचा आणि त्याच्या संदेष्ट्याचा घोर अनादर करत आहोत, ही गोष्ट त्यांच्या लक्षातच येत नव्हती. खरंतर, एक प्रकारे त्यांनी यहोवालाच राजा म्हणून झिडकारलं होतं! मग, शमुवेल त्या लोकांना पश्चात्ताप करायला प्रवृत्त करू शकला का?
आजूबाजूला वाईट प्रभाव असतानाही आपण यहोवावरील विश्वास वाढवू शकतो, हे शमुवेलाच्या बालपणावरून आपल्याला शिकायला मिळतं
३, ४. (क) शमुवेलानं त्याच्या बालपणाचा उल्लेख का केला? (ख) शमुवेलाचं विश्वासू उदाहरण आपल्यासाठी फायदेकारक का ठरू शकतं?
३ शमुवेलानं बोलायला सुरुवात केली. तो लोकांना म्हणाला: “मी तर वृद्ध झालो असून माझे केस पिकले आहेत.” तो पुढं म्हणाला: “मी बाळपणापासून आजवर तुम्हासमोर वागलोवर्तलो आहे.” (१ शमु. ११:१४, १५; १२:२) शमुवेलाच्या पिकलेल्या केसांमुळे लोकांना त्याचे शब्द आणखीनच अर्थपूर्ण वाटले असतील यात शंका नाही. शमुवेल आता म्हातारा झाला होता, पण त्याचं बालपण अजूनही त्याच्या डोळ्यांसमोर होतं. त्या लहान वयात त्यानं जे निर्णय घेतले होते, त्यांमुळेच त्याला आयुष्यभर आपल्या देवाची, यहोवाची विश्वासानं व एकनिष्ठेनं उपासना करणं शक्य झालं होतं.
४ शमुवेलाच्या जीवनात वारंवार असे प्रसंग आले, जेव्हा त्याला आपला विश्वास मजबूत करावा लागला, आणि तो टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नही करावे लागले. कारण त्याच्या आजूबाजूला असलेले बरेच लोक यहोवाच्या आज्ञांच्या विरोधात वागून त्याच्यावर विश्वास नसल्याचं दाखवत होते. आजसुद्धा जगातल्या बहुतेक लोकांचा यहोवावर विश्वास नाही आणि ते अनीतीनं वागत आहेत. त्यामुळं, विश्वास मजबूत ठेवणं आपल्याकरताही सोपं नाही. (लूक १८:८ वाचा.) म्हणूनच, शमुवेलाच्या उदाहरणातून आपल्याला काय शिकता येईल हे आता आपण पाहू या. पण, त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला त्याच्या बालपणात जावं लागेल.
बालपणी यहोवाची सेवा
५, ६. (क) शमुवेलाचं बालपण इतर मुलांसारखं का नव्हतं? (ख) निवासमंडपात त्याची चांगली काळजी घेतली जाईल याची त्याच्या आईवडिलांना खात्री का होती?
५ शमुवेलाचं बालपण त्याच्या वयाच्या इतर मुलांसारखं नव्हतं. त्याचं दूध तुटल्यावर लगेचच, म्हणजे कदाचित तीनएक वर्षांचा असताना, तो यहोवाच्या पवित्र निवासमंडपात सेवा करू लागला. त्याचं घर रामा इथं होतं. हे ठिकाण शिलो येथील निवासमंडपापासून ३०-३२ किलोमीटरच्या अंतरावर होतं. शमुवेलाचे आईवडील, हन्ना व एलकाना यांनी शमुवेलाला यहोवाची एका खास प्रकारे, म्हणजे एक नाजीर म्हणून आयुष्यभर सेवा करण्यासाठी समर्पित केलं होतं.a पण, याचा अर्थ असा होतो का, की त्याच्या आईवडिलांनी त्याला टाकून दिलं होतं, किंवा त्यांचं त्याच्यावर प्रेम नव्हतं?
६ मुळीच नाही! शिलो इथं आपल्या मुलाची चांगली काळजी घेतली जाईल हे त्यांना माहीत होतं. शिवाय, मुख्य याजक एली यानं या बाबतीत स्वतः लक्ष घातलं असेल, कारण शमुवेल त्याच्याचसोबत राहून काम करायचा. तसंच, निवासमंडपाशी संबंधित कामं करण्यासाठी अनेक स्त्रियादेखील होत्या.—निर्ग. ३८:८; शास्ते ११:३४-३९.
७, ८. (क) शमुवेलाचे आईवडील कशा प्रकारे त्याला दरवर्षी प्रेमळपणे प्रोत्साहन द्यायचे? (ख) आजच्या काळातील आईवडील हन्ना व एलकाना यांच्याकडून काय शिकू शकतात?
७ स्वतः हन्ना आणि एलकानासुद्धा आपल्या लाडक्या शमुवेलाला कधीच विसरले नाहीत. शेवटी, तो त्यांचा पहिला मुलगा आणि त्यांच्या प्रार्थनेचं उत्तर होता! हन्नानं मुलासाठी यहोवाला नवस केला होता आणि त्याला देवाच्या पवित्र सेवेसाठी समर्पित करू अशी शपथ वाहिली होती. दर वर्षी हन्ना शिलोला यायची, आणि निवासमंडपातील सेवेकरता शमुवेलासाठी ती एक बिनबाह्यांचा झगा आणायची. शमुवेलाला नक्कीच आपल्या आईवडिलांना भेटून खूप आनंद होत असेल. त्यांच्या प्रेमळ प्रोत्साहनामुळं व मार्गदर्शनामुळंच त्याला निवासमंडपात आनंदानं सेवा करत राहणं शक्य झालं असेल. उपासनेच्या त्या खास ठिकाणी यहोवाची सेवा करणं हा किती मोठा बहुमान आहे, याची त्यांनी त्याला जाणीव करून दिली असेल, यात शंका नाही.
८ आजच्या काळातील आईवडील हन्ना व एलकानाकडून बरंच काही शिकू शकतात. सहसा, मुलांचं संगोपन करताना आईवडिलांना केवळ त्यांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्याचीच जास्त काळजी असते; पण मुलांना यहोवासोबत जवळचा नातेसंबंध जोडण्यास कशी मदत करता येईल, याकडे त्यांचं दुर्लक्ष होतं. शमुवेलाच्या आईवडिलांनी मात्र यहोवाच्या उपासनेला जीवनात पहिलं स्थान दिलं, आणि म्हणूनच त्यांचा मुलगा पुढं यहोवाचा एक अतिशय विश्वासू आणि एकनिष्ठ सेवक बनला.—नीतिसूत्रे २२:६ वाचा.
९, १०. (क) निवासमंडपाचं आणि त्याबद्दल असलेल्या शमुवेलाच्या भावनांचं वर्णन करा. (तळटीपही पाहा.) (ख) शमुवेल निवासमंडपात कोणती कामं करत असावा, आणि आज लहान मुलं त्याचं अनुकरण कसं करू शकतात?
९ थोडा मोठा झाल्यावर, कदाचित शमुवेल शिलोच्या आसपासच्या डोंगरांमध्ये फिरायला जात असेल. त्या डोंगरदऱ्यांमध्ये फिरणाऱ्या लहान शमुवेलाचं चित्र तुम्ही डोळ्यांसमोर उभं करू शकता का? जवळच्या डोंगरावरून खाली पाहिल्यावर त्याला शिलोचं नगर आणि त्याच्या एका बाजूला दूरपर्यंत पसरलेली दरी दिसत असेल. ते दृश्य पाहताना यहोवाच्या निवासमंडपावर नजर जाताच, त्याला किती आनंद आणि अभिमान वाटत असेल! निवासमंडप खरोखरंच एक अतिशय पवित्र स्थान होतं.b सुमारे ४०० वर्षांपूर्वी, खुद्द मोशेच्या देखरेखीखाली त्याचं बांधकाम करण्यात आलं होतं. यहोवाच्या शुद्ध उपासनेचं ते त्या काळी जगातलं एकमेव स्थान होतं!
१० हळूहळू शमुवेलाला निवासमंडपात सेवा करणं मनापासून आवडू लागलं. पुढं त्यानं लिहिलेल्या अहवालात आपण असं वाचतो: “शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करून परमेश्वराची सेवा करत असे.” (१ शमु. २:१८) हे एक साधंसं बिनबाह्यांचं वस्त्र होतं आणि शमुवेल निवासमंडपात याजकांना साहाय्य करत असल्याचं ते प्रतीक होतं. शमुवेल हा याजकवर्गातला नसला, तरीसुद्धा पहाटे निवासमंडपाच्या अंगणाची दारं उघडणं आणि वयस्क एलीची सेवा करणं, यांसारखी कामं त्याच्यावर सोपवण्यात आली होती. ही कामं तो अगदी मन लावून, आनंदानं करत असे. पण, काही काळानं यहोवाच्या निवासमंडपात अतिशय वाईट गोष्टी घडू लागल्यामुळं, त्याचं कोवळं, निष्पाप मन अस्वस्थ झालं.
वाईट प्रभाव असतानाही निष्कलंक
११, १२. (क) हफनी आणि फिनहास यांची सर्वात मोठी चूक कोणती होती? (ख) हफनी आणि फिनहास निवासमंडपात कोणती वाईट कामं करत होते? (तळटीपही पाहा.)
११ लहान वयातच शमुवेलानं घोर अनीती आणि दुष्टाई अगदी जवळून पाहिली. एलीला दोन मुलं होती. हफनी आणि फिनहास. शमुवेलाच्या अहवालात असं म्हटलं आहे: “एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.” (१ शमु. २:१२) या वचनात मांडलेल्या दोन गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत. कारण, “अधम” असं भाषांतर केलेल्या मूळ हिब्रू भाषेतील शब्दाचा अर्थ, “कोणत्याच लायकीची नसलेली मुलं” असा होतो. त्यांना ‘यहोवाची ओळख नसल्यामुळं,’ म्हणजेच यहोवाबद्दल त्यांच्या मनात जराही आदर नसल्यामुळंच ते कोणत्याही लायकीचे नव्हते. यहोवाच्या नीतिमान स्तरांची आणि आज्ञांची त्यांना काहीच पर्वा नव्हती. या एका चुकीमुळंच त्यांच्या हातून बाकीची सर्व पातकं घडली.
१२ याजकांच्या जबाबदाऱ्यांविषयी आणि निवासमंडपात बलिदानं कशी अर्पण केली जावीत, याविषयी देवाच्या नियमशास्त्रात काटेकोर नियम देण्यात आले होते. आणि त्यामागं एक खास कारणही होतं. ही बलिदानं लोकांच्या पापांची क्षमा करून त्यांना शुद्ध करण्यासाठी यहोवानं केलेली तरतूद होती, जेणेकरून ते त्याचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळवण्यास पात्र ठरू शकतील. शिवाय, ती भविष्यातील खंडणी बलिदानाला सूचित करत होती. पण, बलिदानांचा आदर करण्याऐवजी, हफनी व फिनहास यांनी आपल्या सोबतीच्या याजकांनाही निवासमंडपातील बलिदानांचा घोर अनादर करण्यास प्रवृत्त केलं.c
१३, १४. (क) निवासमंडपात घडत असलेल्या गैरप्रकारांमुळे साध्याभोळ्या लोकांवर काय परिणाम होत असावा? (ख) मुख्य याजक आणि पिता या दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडण्यात एली कशा प्रकारे अपयशी ठरला?
१३ अशा धक्कादायक गोष्टी निवासमंडपात सर्रास घडत होत्या आणि कुणी त्यांची साधी दखलही घेत नव्हतं, हे पाहून शमुवेल किती अस्वस्थ होत असेल याची कल्पना करा! याजक आपलं सांत्वन करतील, आपल्याला धीर देतील या आशेनं निवासमंडपात आलेले साधेभोळे, गरीब लोक जेव्हा निराश आणि अपमानित होऊन तिथून परत जात असतील, तेव्हा शमुवेलाला कसं वाटत असेल? आणि हफनी व फिनहास हे लैंगिक संबंधांविषयी दिलेल्या यहोवाच्या कायद्यांचंही उल्लंघन करून, निवासमंडपात काम करणाऱ्या काही स्त्रियांशी संबंध ठेवत होते, हे जेव्हा शमुवेलाला कळलं तेव्हा त्याला कसं वाटलं असेल? (१ शमु. २:२२) कदाचित एली याविषयी काहीतरी करेल अशी अपेक्षा त्यानं केली असेल.
एलीच्या मुलांची वाईट कामं पाहून शमुवेलाचं मन खूप अस्वस्थ झालं असेल
१४ निवासमंडपात चाललेले हे गैरप्रकार वाढतच होते. त्यांना आळा घालणं हे खरंतर एलीच्याच हातात होतं. मुख्य याजक या नात्यानं निवासमंडपात जे काही घडत होतं, त्यासाठी तो जबाबदार होता. शिवाय, पिता म्हणूनही आपल्या मुलांच्या चुका सुधारण्याचं त्याचं कर्तव्य होतं. त्यांच्या चुकांमुळे ते स्वतःचंच नव्हे, तर इस्राएल राष्ट्रातील अनेकांचं नुकसान करत होते. पण, या दोन्ही भूमिकांमध्ये एली आपली जबाबदारी पार पाडण्यात पूर्णपणे अपयशी ठरला. त्यानं आपल्या मुलांची कानउघाडणी तर केली, पण अगदी सौम्य, मिळमिळीत शब्दांत. (१ शमुवेल २:२३-२५ वाचा.) खरंतर, एलीनं त्याच्या मुलांना कठोर शिक्षा द्यायला हवी होती. कारण, ते मृत्युदंडास पात्र असलेली कामं करत होते!
१५. यहोवानं एलीला कोणता संदेश कळवला, आणि एलीच्या कुटुंबानं या इशाऱ्याला कसा प्रतिसाद दिला?
१५ शेवटी परिस्थिती इतकी टोकाला गेली, की यहोवानं एका संदेष्ट्याला एलीकडे एक अतिशय जळजळीत न्यायसंदेश घेऊन पाठवलं. अहवालात या संदेष्ट्याचं नाव दिलेलं नाही, तर त्याला फक्त “देवाचा एक माणूस” असं म्हटलेलं आहे. या संदेष्ट्याद्वारे यहोवा एलीला म्हणाला, की तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर करत आहेस. म्हणून, एलीची दुष्ट मुलं एकाच दिवशी मरण पावतील आणि एलीच्या कुटुंबावर अनेक संकटं येतील, असं यहोवानं सांगितलं. तसंच, याजक वर्गातील मानाचं स्थान या कुटुंबाकडून हिरावून घेतलं जाईल, असंही त्यानं सांगितलं. हा जबरदस्त इशारा मिळाल्यावर एलीच्या कुटुंबात काही बदल झाला का? त्यांच्यात काहीच बदल झाल्याचं अहवालातून दिसून येत नाही.—१ शमु. २:२७–३:१.
१६. (क) बालपणी शमुवेलानं केलेल्या प्रगतीबद्दल आपण काय वाचतो? (ख) शमुवेलाच्या प्रगतीबद्दलची ही माहिती वाचल्यावर तुम्हाला त्याचं कौतुक वाटतं का? स्पष्ट करा.
१६ निवासमंडपात घडत असलेल्या या सर्व वाईट गोष्टींचा लहान शमुवेलाच्या मनावर कसा परिणाम झाला? तसा हा अहवाल काहीसा निराशाजनक आहे; पण, अंधाऱ्या खोलीत प्रकाशाची किरणं पडावीत, तशी अधूनमधून या अहवालात आपल्याला बाळ शमुवेलाची कशी वाढ व प्रगती होत गेली याबद्दलची माहिती सापडते, जी वाचून आपल्याला आनंद होतो. १ शमुवेल २:१८ यात आपण काय वाचलं होतं, हे तुम्हाला आठवत असेल. शमुवेल बाळ विश्वासूपणे “परमेश्वराची सेवा करत असे,” असं तिथं सांगितलं आहे. त्या लहान वयातसुद्धा शमुवेलानं देवाच्या सेवेला आपल्या जीवनात सर्वात जास्त महत्त्व दिलं. त्याच अध्यायातल्या २१ व्या वचनात (पं.र.भा.) आपण शमुवेलाबद्दल आणखी एक गोष्ट वाचतो, ज्यामुळे आपल्याला त्याचं विशेष कौतुक वाटतं. तिथं असं म्हटलं आहे, की बाळ शमुवेल “यहोवासमोर वाढत गेला.” दुसऱ्या शब्दांत, शमुवेल जसजसा मोठा झाला, तसतसं त्याच्या स्वर्गातील पित्यासोबतचं त्याचं नातं आणखीनच घट्ट होत गेलं. यहोवासोबत असा जवळचा नातेसंबंधच आपल्याला कोणत्याही प्रकारच्या वाईट प्रभावापासून सर्वात चांगलं संरक्षण देऊ शकतो.
१७, १८. (क) इतर जण वाईट वागतात तेव्हा ख्रिस्ती मुलं शमुवेलाच्या उदाहरणाचं कशा प्रकारे अनुकरण करू शकतात? (ख) शमुवेलानं योग्य निर्णय घेतला हे कशावरून दिसून येतं?
१७ शमुवेल अगदी सहज असा तर्क करू शकला असता, की जर मुख्य याजक आणि त्याची मुलंच असं अयोग्य वर्तन करत असतील, तर मग मीसुद्धा मनाला येईल तसं वागू शकतो. पण, इतरांची वाईट वागणूक, मग ती अधिकाराच्या पदावर असलेल्यांची का असेना, तिच्यामुळे आपल्याला पाप करण्याची मोकळीक मिळत नाही. आज खऱ्या ख्रिस्ती मंडळीतील अनेक लहान मुलं व तरुण, शमुवेलाच्या उदाहरणाचं अनुकरण करत आहेत. त्यांच्या आजूबाजूला असलेले काही जण जरी चांगलं उदाहरण मांडत नसले, तरीसुद्धा ही मुलं शमुवेलाप्रमाणे “यहोवासमोर वाढत” आहेत आणि सत्यात प्रगती करत आहेत.
१८ शमुवेलानं यहोवाच्या आज्ञांचं पालन करण्याचं ठरवल्यामुळं कोणता परिणाम घडून आला? अहवाल आपल्याला सांगतो: “शमुवेल बाळ हा वाढत गेला; परमेश्वर व मानव त्याच्यावर प्रसन्न होते.” (१ शमु. २:२६) याचा अर्थ, सर्वांचंच, निदान जे यहोवाच्या दृष्टिकोनातून विचार करणारे होते, त्यांचं तरी शमुवेलाबद्दल चांगलंच मत होतं. स्वतः यहोवा देवानंही शमुवेलाची मनापासून कदर केली. शिलो इथं होत असलेल्या सर्व गैरप्रकारांविरुद्ध यहोवा देव कारवाई करेल, याची शमुवेलाला खात्री होती. पण, नक्की कधी? असा प्रश्न कदाचित त्याला पडला असेल.
“बोल, तुझा दास ऐकत आहे”
१९, २०. (क) एका रात्री निवासमंडपात काय घडलं याचं वर्णन करा. (ख) एलीसोबत शमुवेलाची वागणूक कशी होती?
१९ मग, एका रात्री शमुवेलाला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. रात्र सरून पहाट होण्याची वेळ झाली होती; पण अजूनही काळोख होता. निवासमंडपातल्या दिव्याची मिणमिणती ज्योत अजून मालवली नव्हती. त्या शांत वातावरणात अचानक शमुवेलाला कुणाचातरी आवाज ऐकू आला. कुणीतरी त्याला हाक मारत होतं. त्याला वाटलं, कदाचित एलीचा आवाज असावा. एली खूप म्हातारा झाला होता. त्याला डोळ्यांनी फारसं दिसतही नव्हतं. त्यामुळं, शमुवेल लगेच उठला आणि एलीजवळ “धावत” गेला. बिछान्यातून उठून लगबगीनं एलीकडे जाणाऱ्या लहानशा शमुवेलाचं चित्र तुम्ही डोळ्यांपुढं आणू शकता का? शमुवेलाचं एलीशी असं आदरानं व आपुलकीनं वागणं खरंच हृदयस्पर्शी आहे. एलीच्या हातून कितीही चुका झाल्या असल्या, तरीसुद्धा तो अजूनही यहोवानं नेमलेला मुख्य याजक आहे, हे शमुवेल विसरला नव्हता.—१ शमु. ३:२-५.
२० शमुवेल एलीला उठवून म्हणाला: “काय आज्ञा? तुम्ही मला हाक मारली.” पण आपण हाक मारली नसल्याचं सांगून एलीनं त्याला जाऊन झोपायला सांगितलं. शमुवेल जाऊन झोपला खरा, पण पुन्हा दोन वेळा तोच प्रकार! शेवटी, नेमकं काय घडत आहे हे एलीच्या लक्षात आलं. इस्राएलात यहोवाकडून कोणालाही दृष्टान्त किंवा संदेश मिळणं त्या काळात फार कमी झालं होतं. निवासमंडपात जे काही चाललं होतं, त्यावरून याचं कारण सहज लक्षात येतं. पण, आता पुन्हा यहोवा आपल्या लोकांना संदेश देत आहे आणि तोसुद्धा या मुलाद्वारे, हे एलीच्या लक्षात आलं. एलीनं शमुवेलाला जाऊन झोपायला सांगितलं. पण, या वेळी हाक मारण्याचा आवाज आला, तर कसं उत्तर द्यायचं हेही त्यानं सांगितलं. शमुवेलानं एलीच्या सांगण्यानुसार केलं. काही वेळानं त्याला तोच आवाज ऐकू आला: “शमुवेला, शमुवेला!” तेव्हा शमुवेल म्हणाला: “बोल, तुझा दास ऐकत आहे.”—१ शमु. ३:१, ५-१०.
२१. आज आपण कशा प्रकारे यहोवाचं ऐकू शकतो, आणि असं करणं फायदेकारक का ठरेल?
२१ शेवटी, शिलोमध्ये यहोवाचा एक तरी असा सेवक होता, जो त्याचं ऐकण्यास उत्सुक होता. आणि शमुवेलानं आपल्या सबंध आयुष्यात यहोवाच्या शब्दांकडे लक्ष देण्याचं कधीही सोडलं नाही. तुम्हीसुद्धा नेहमी यहोवाचं ऐकता का? यासाठी, यहोवानं चमत्कारिक रीत्या आपल्याशी बोलावं अशी अपेक्षा करण्याची गरज नाही. कारण, एका अर्थानं आपण आजही सतत यहोवाचा आवाज ऐकू शकतो. तो कसा? त्याचं संपूर्ण वचन, बायबल आज आपल्याजवळ आहे. आपण देवाचं जितकं जास्त ऐकू आणि त्याच्या सांगण्यानुसार वागण्याचा प्रयत्न करू, तितकाच आपला विश्वास वाढत जाईल. शमुवेलाच्या बाबतीतही हेच घडलं.
सुरुवातीला शमुवेल थोडा घाबरला, तरी त्यानं विश्वासूपणे एलीला यहोवाचा न्यायसंदेश कळवला
२२, २३. (क) एलीच्या कुटुंबाबद्दल केलेली भविष्यवाणी कशी खरी ठरली? (ख) लोक शमुवेलाला विश्वासू संदेष्टा म्हणून कसं ओळखू लागले?
२२ निवासमंडपातली ती रात्र शमुवेलाच्या जीवनात अतिशय महत्त्वाची ठरली. कारण, तेव्हापासून त्याचा यहोवासोबत एक अतिशय खास नातेसंबंध जुळला; तो यहोवाचा संदेष्टा आणि त्याच्या वतीनं बोलणारा त्याचा सेवक बनला. शमुवेलाद्वारे यहोवानं एलीच्या कुटुंबाविरुद्ध एक शेवटली ताकीद दिली आणि त्यानं या कुटुंबाबद्दल केलेली भविष्यवाणी लवकरच पूर्ण होईल, हे जाहीर केलं. सुरुवातीला तर शमुवेल एलीला यहोवाचा संदेश सांगायला थोडा घाबरला. पण, नंतर मात्र त्यानं धाडस करून एलीला देवाचा संदेश सांगितला. एलीनंही तो नम्रपणे ऐकून घेतला. काही काळातच, यहोवानं भाकीत केलेला शब्द न् शब्द पूर्ण झाला. इस्राएली लोकांचं पलिष्टी लोकांसोबत युद्ध झालं आणि हफनी व फिनहास हे दोघंही एकाच दिवशी मारले गेले. यहोवाचा पवित्र कोश शत्रूंच्या ताब्यात गेला आहे हे ऐकून एलीचाही मृत्यू झाला.—१ शमु. ३:१०-१८; ४:१-१८.
२३ दुसरीकडे पाहता, सबंध इस्राएल राष्ट्रात लोक शमुवेलाला यहोवाचा विश्वासू संदेष्टा म्हणून ओळखू लागले. अहवालात म्हटल्याप्रमाणे, “परमेश्वर त्याच्यासमागमे असे.” शिवाय, यहोवानं शमुवेलाची एकही भविष्यवाणी खोटी ठरू दिली नाही, असंही अहवालात सांगितलं आहे.—१ शमुवेल ३:१९ वाचा.
“शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली”
२४. काही काळानं इस्राएली लोकांनी कोणती मागणी केली, आणि हे एक मोठं पाप का होतं?
२४ पण याचा अर्थ, इस्राएली लोक शमुवेलाच्या पावलावर पाऊल ठेवून विश्वासूपणे यहोवाची सेवा करू लागले का? नाही. काही काळानं, इतर राष्ट्रांप्रमाणेच आपल्यावरही राजा असावा अशी त्यांनी मागणी केली; न्यायनिवाडा करण्यासाठी त्यांना आता एक संदेष्टा नको होता. यहोवाच्या सांगण्यावरून शमुवेलानं त्यांच्या म्हणण्यानुसार केलं. पण, राजाची मागणी करून खरंतर ते फार मोठं पाप करत होते. कारण, त्यांनी फक्त एका माणसाला नाही, तर खुद्द यहोवा देवाला नाकारलं होतं! आणि याचीच जाणीव करून देण्यासाठी, शमुवेलानं त्यांना गिलगालला बोलावलं होतं.
शमुवेलानं पूर्ण विश्वासानं प्रार्थना केली आणि यहोवानं वादळी पाऊस आणून त्याच्या प्रार्थनेचं उत्तर दिलं
२५, २६. गिलगाल इथं वृद्ध शमुवेलानं शेवटी कशा प्रकारे लोकांची गंभीर चूक त्यांच्या लक्षात आणून दिली?
२५ सुरुवातीला वर्णन केलेलं ते तणावपूर्ण दृश्य तुम्हाला आठवतं का? इस्राएलचं संबंध राष्ट्र गिलगाल इथं एकत्रित झालं होतं. शमुवेल त्यांच्यासमोर उभा राहून त्यांच्याशी बोलत होता. आपण आयुष्यभर केलेल्या विश्वासू सेवेची त्यानं त्यांना आठवण करून दिली. अहवालात पुढं असं सांगितलं आहे: “शमुवेलाने परमेश्वराची प्रार्थना केली.” प्रार्थनेत त्यानं यहोवाला वादळी पाऊस आणण्याची विनंती केली.—१ शमु. १२:१७, १८.
२६ ‘वादळी पाऊस? आणि तोसुद्धा भर उन्हाळ्यात? हे तर अशक्य आहे!’ अशी शंका लोकांच्या मनात आली असावी का? आली असली, तरी त्यांना फार वाट पाहावी लागली नाही. कारण, काही क्षणांतच, ढग जमा झाले आणि आकाश काळवंडलं. जोरदार वाऱ्यांनी शेतांतल्या गव्हाच्या पिकांना झोडपलं. विजांचा जोरदार कडकडाट होऊ लागला आणि मग पावसाला सुरुवात झाली. या सर्व गोष्टींचा लोकांवर काय परिणाम झाला? “सर्व लोकांस परमेश्वराची व शमुवेलाची दहशत बसली.” शेवटी त्यांचे डोळे उघडले आणि आपण किती गंभीर चूक केली आहे, याची त्यांना जाणीव झाली.—१ शमु. १२:१८, १९.
२७. शमुवेलासारखा विश्वास दाखवणाऱ्यांबद्दल कदर असल्याचं यहोवा कसं दाखवतो?
२७ अशा रीतीनं शमुवेलानं नाही, तर त्याच्या देवानं, यहोवानं त्या अविश्वासू लोकांना पश्चात्ताप करण्यास प्रवृत्त केलं होतं. शमुवेल अगदी लहानपणापासून म्हातारा होईपर्यंत नेहमी आपल्या देवावर पूर्ण विश्वास ठेवून चालला. आणि यहोवानं त्याला याचं प्रतिफळसुद्धा दिलं. आजही यहोवा बदललेला नाही. शमुवेलासारखा विश्वास दाखवणाऱ्यांच्या तो नेहमीच पाठीशी असतो!
a नाजीर म्हणून स्वतःला वाहून घेतलेल्यांना मद्यपान करण्याची आणि केस कापण्याची मनाई होती. बहुतेक जण फक्त काही काळ नाजीर म्हणून सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून घ्यायचे. शमशोन, शमुवेल आणि बाप्तिस्मा देणारा योहान यांनी मात्र आयुष्यभर नाजीर म्हणून सेवा केली.
b निवासमंडप जवळजवळ ४४ फूट लांब आणि १५ फूट रुंद होता. तो लाकडी सांगाड्यावर उभारलेला एक मोठा तंबूच होता. पण, तो अतिशय उत्तम साहित्यापासून बनवण्यात आला होता. उदाहरणार्थ, तहशाची (सील माशाची) कातडी, सुरेख नक्षीकाम केलेलं कापड, तसंच सोन्या-चांदीनं मढवलेलं उच्च प्रतीचं लाकूड यांसारख्या वस्तूंचा निवासमंडपाच्या बांधकामात उपयोग करण्यात आला होता. निवासमंडपाभोवती अंगण होतं, ज्यात बलिदानं अर्पण करण्यासाठी एक मोठी वेदीसुद्धा होती. काही काळानंतर, निवासमंडपाच्या आजूबाजूला याजकांसाठी खोल्या बांधण्यात आल्या. शमुवेल कदाचित अशाच एका खोलीत झोपत असावा.
c हफनी आणि फिनहास यांनी कशा प्रकारे यहोवाचा अनादर केला, याची दोन उदाहरणं या अहवालात दिलेली आहेत. बलिदानातील कोणते वाटे याजकांना खाण्यासाठी दिले जावेत, याविषयी नियमशास्त्रात स्पष्ट सूचना दिल्या होत्या. (अनु. १८:३) पण, निवासमंडपातील दुष्ट याजकांनी एक वेगळाच प्रकार सुरू केला होता. ते आपल्या सेवकांना मांस शिजत असलेल्या पात्रातून चांगले-चांगले तुकडे आपल्यासाठी काढून घ्यायला लावायचे. दुसरी गोष्ट म्हणजे, जेव्हा लोक आपली बलिदानं वेदीवर होम करण्यासाठी आणायचे, तेव्हा बलिदान केलेल्या प्राण्याची चरबी यहोवाला अर्पण करण्याआधीच, दुष्ट याजक आपल्या एखाद्या सेवकाला, बलिदान देणाऱ्याकडून कच्चे मांस जबरीनं घ्यायला लावायचे.—लेवी. ३:३-५; १ शमु. २:१३-१७.