चिमुकले उड्डाणपटू
स्विश! जाळीच्या कुंच्यानं माशी मारण्याच्या झटापटीत हा आवाज हवेत घुमतो. माशी मात्र कुंच्याचा फटकारा चुकवते, क्षणभर तिथं घुटमळते, स्वतःला सावरते, मग उडून खाली पाठ वर पाय अशा अवस्थेत खोलीच्या छतावर जाऊन बसते आणि तिला खतम करण्याच्या तुमच्या निष्फळ प्रयत्नावर जणू हसते. अशा या माशीला तरबेज उड्डाणपटू नाही तर आणखीन काय म्हणणार! अक्षरशः कुठेही आढळणाऱ्या या माश्या, हवाई कसरती करण्यात कीटक विश्वात सगळ्यात पटाईत उड्डाणपट्टू असल्याची प्रौढी मिरवतात; अर्थात हे काही अंशी, अतिशय चमत्कृतीने रचलेल्या अनुबंधाच्या जोडीमुळे शक्य होते; माशीला उडताना आपला तोल सांभाळण्यासाठी मदत करणाऱ्या या अनुबंधांना संतोलक म्हटले जाते.
हे संतोलक, माशीच्या दोन पंखांच्या अगदी मागेच असलेल्या वक्षस्थळातून बाहेर येतात तेव्हा टोकापाशी गोळे असलेल्या चिमुकल्या लव्हाळ्यासारखे ते वाटतात. (पुढच्या पानावरील चित्र पाहा.) माशी आपले पंख फडफडू लागते तेव्हा संतोलक देखील त्याच वारंवारतेने अर्थात प्रती सेंकद शेकडो वेळा फडफडू लागतात. संतोलक खरे तर चिमुकल्या घूर्णीसारखे (जिरोस्कोप) माशीच्या शरीरात काम करतात आणि त्यामुळे माशीला उड्डाण करण्यास कशी मदत होते ते विचारात घ्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे किंवा अतिशय जवळ मारलेल्या कुंच्याच्या अथवा वर्तमानपत्राच्या फटकाऱ्यामुळे माशी आपली दिशा बदलते तेव्हा संतोलक मेंदूला संदेश पाठवतात. अशावेळी, विमानातली घूर्णी वैमानिकाला जशी सर्व माहिती पुरवते त्याचप्रमाणे माशीचे शरीर वेडेवाकडे उडत आहे, गिरक्या घेत आहे की हेलकावे खात आहे अशी सर्व माहिती संतोलक माशीला लगेच कळवतात; आणि हे संतोलक वैमानिकाच्या घूर्णीपेक्षा कितीतरी पटीने जास्त अचूक संदेश देतात. संदेश मिळताच माशी अगदी सहजपणे क्षणार्धात स्वतःला सावरते.
पण, हे संतोलक गरगर फिरणाऱ्या सर्वसामान्य गायरोस्कोपप्रमाणे नव्हे तर लंबकासारखे वाटतात. इतकेच की, माशीच्या बाबतीत ते लटकलेल्या किंवा उभ्या अवस्थेत नसतात आणि शरीराच्या बाजूच्या भागातून बाहेर येतात. संतोलक एकदा गतीशील झाले की ते लंबकासारखे गतीच्या नियमांनुरूप एकाच दिशेने किंवा एकाच स्थरावर हेलकावे खातात किंवा पुढे मागे झुलू लागतात. त्यामुळे हवेत असताना माशीच्या शरीराची दिशा बदलते तेव्हा बाह्य शक्ती हेलकावे घेणाऱ्या या संतोलकांना मुळापाशी पीळ देतात आणि मुळाशी मज्जातंतू असल्यामुळे पीळ दिल्याची माशीला संवेदना होते. मज्जातंतूंनी पाठवलेल्या संदेशाचे मेंदू विश्लेषण करतो आणि पंखांना आपोआपच सरळ उडण्याचा संकेत मिळतो; हे सर्व क्षणार्धात घडतं.
माश्यांना सोडून इतर कोणत्याही सजीव प्राण्यांत संतोलक हे विशेष अवयव आढळत नाही; आणि विशेष म्हणजे पंखाची जोडी असलेल्या सुमारे १,००,००० जातीच्या केवळ याच जातीला ही देण लाभली आहे. यात घोडमाशी, घरमाशी, ब्लोमाशी, फळमाशी, त्से त्से माशी आणि क्रेनमाशी देखील येतात. माश्यांच्या शरीरातील कल्पक गायरोस्कोपांमुळे उड्डाण करणाऱ्या कीटक जगात दुसरा कोणताही कीटक हवेतील कसरती करण्यात माशीचा हात धरू शकत नाही. सहजा घृणा केला जाणारा हा कीटक वास्तवात त्याच्या रचनाकाराच्या अगाध वैज्ञानिक बुद्धीची मूक साक्ष देतो.
[२२ पानांवरील चित्र]
वेडेवाकडे उडणे
[२२ पानांवरील चित्र]
गिरक्या घेणे
[२२ पानांवरील चित्र]
हेलकावे खाणे
[२३ पानांवरील चित्र]
सोल्जर माशी (चित्राची मोठी प्रत), यात माशीचे संतोलक दाखवलेले आहेत
[चित्राचे श्रेय]
© Kjell B. Sandved/Visuals Unlimited
[२३ पानांवरील चित्रं]
घरमाशी
क्रेनमाशी
[चित्राचे श्रेय]
Animals/Jim Harter/Dover Publications, Inc.
[२३ पानांवरील चित्राचे श्रेय]
Century Dictionary