वैमानिक कलेचे आद्य प्रवर्तक
“मी स्वतः एक वैमानिक आहे; त्यामुळे एप्रिल ८, १९९९ च्या सावध राहा! मासिकात उड्डाणविषयक लेख मला अतिशय मनोरंजक वाटला. पण, मला एक समजलं नाही, अल्बर्टो सॅनटोस-ड्यूमन्ट हे सुरवातीच्या सगळ्यात पहिल्या वैमानिकांपैकी एक होते; पण, सदर लेखात त्यांचा कुठेही कसा उल्लेख नाही?”—सी. बी., संयुक्त संस्थाने.
“उड्डाण—त्याची सुरवात कशी झाली? ते किती सुरक्षित आहे?” असे शीर्षक असलेल्या एप्रिल ८, १९९९ च्या सावध राहा! मासिकाच्या सुरवातीच्या लेखांत वैमानिक कलेच्या इतिहासाचा थोडक्यात आढावा घेण्यात आला होता. अर्थात, लेखाचा बराचसा रोख अमेरिकेच्या विल्बर आणि ऑर्विल राईट बंधूंच्या कर्तृत्वावर होता; पण, या शतकाच्या सुरवातीला हवेपेक्षा जड उड्डाण यंत्रे तयार करणाऱ्या या दोघा भावांशिवाय इतरजणही होते. तेव्हा, वैमानिक कलेच्या इतर काही आद्य प्रवर्तकांविषयी आपण विचार करू या.
• ॲल्बर्टो सॅन्टोस-ड्यूमन्ट यांचा जन्म जुलै २०, १८७३ रोजी ब्राझीलमधील मीनास गेराईस येथे झाला. ते किशोरवयीन असताना त्यांचे कुटुंब पॅरिसला राहायला गेले. तिथे त्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, यंत्रशास्त्र आणि विद्युतशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. पण, हवेत उड्डाण कसे करता येईल या कल्पनेने त्यांना अक्षरशः झपाटले होते. त्यामुळे १८९८ ते १९०५ च्या काळादरम्यान त्यांनी ११ हवाई जहाजे तयार करून त्यांचे यशस्वीपणे हवेत उड्डाण भरले.
शेवटी, १९०६ च्या ऑक्टोबर महिन्यात, हवेपेक्षा खूप जड असलेल्या विमानातून प्रवास करण्याचे सॅन्टोस-ड्यूमन्टचे स्वप्न साकार झाले. सुरवातीला तयार केलेल्या काही विमानांना कॅटपल्टच्या (गलोल) साह्याने आकाशात सोडले जायचे. पण, सॅन्टोस ड्यूमन्टच्या 14-bis आकाशयानाला त्याची गरज पडली नाही; ते स्वतःच्या प्रेरक तंत्राच्या साहाय्याने आकाशात झेपावले. सॅन्टोस-ड्यूमन्टच्या ६० मीटरचे अंतर कापणाऱ्या 14-bis या हवेपेक्षा कितीतरी जड असलेल्या विमानाला अख्ख्या युरोपमधील सगळ्यात पहिले यशस्वी मोटरचलित विमान समजले जाते.
पण त्यानंतरच्या काही वर्षांतच, विध्वंसक कामासाठी विमानांचा उपयोग होऊ लागला तेव्हा सॅन्टोस-ड्यूमन्ट फार अस्वस्थ झाले. युद्धांत केला जाणारा विमानांचा सर्रास वापर पाहून ते भयंकर निराश झाले आणि शेवटी न राहून १९३२ साली त्यांनी आत्महत्या केली असे म्हटले जाते. ते काही असो; विमानशास्त्राच्या इतिहासात मात्र सॅन्टोस-ड्यूमन्टचे नाव कायमचे कोरले गेले आहे.
• गूस्टॉव व्हाईटहेड यांचा जानेवारी १, १८७४ रोजी लॉटरशाऊझेन, जर्मनी येथे जन्म झाला. हवाई प्रवासाबद्दल त्यांना विलक्षण ओढ होती आणि त्यामुळेच शाळेत असताना मुलं त्यांना ‘उड्डाणपट्टू’ म्हणायची. पण, वयाच्या १३ व्या वर्षीच गूस्टॉव अनाथ झाले. त्यानंतर त्यांचे राहण्याचे कोणतेही एक कायमचे ठिकाण नसले तरीही हवाई प्रवासाचे त्यांचे वेड काही ओसरले नाही. आणि या विलक्षण ओढीमुळेच त्यांना विश्वविख्यात जर्मन वैमानिक, ऑटो लिलियनथल यांच्यासोबत काही काळ अभ्यास करण्याची बहुमोल संधी लाभली. मग, १८९४ साली ते संयुक्त संस्थानात स्थायिक झाले.
एप्रिल ८, १९९९ च्या सावध राहा! अंकात म्हटल्याप्रमाणे काहींचे म्हणणे आहे, की १९०१ साली व्हाईटहेड यांनी हवेपेक्षा जड आणि नियंत्रणात ठेवण्याजोगे जगातले सगळ्यात पहिले हवाई यंत्र तयार केले; हे विमान आकाशात काही वेळ उडत राहिले. पण, हे सिद्ध करण्यासाठी कोणतेही फोटोग्राफ उपलब्ध नाहीत. आणि आश्चर्य म्हणजे हवाई प्रवासाच्या प्रारंभिक विकासाची आणि चक्क राईट बांधवांची देखील त्वरित दखल घेण्याइतपत प्रसारमाध्यमांना त्याचं महत्त्व तेव्हा जाणवलं नव्हतं. किंबहुना, “१९१० मध्ये कुठं या ‘अभिनव तंत्राविषयी’ लोकांना कुतूहल वाटू लागलं आणि मनुष्याला हवाई प्रवास करणं शक्य आहे हे लोकांना पटू लागलं,” असे एअर इनथ्युझिॲस्ट या मासिकाने म्हटले.
• सॅम्यूअल पीरपॉन्ट लँग्ले यांनी वॉशिंग्टन, डि.सी. च्या स्मिथसोनियन इंस्टिट्यूटचे सचीवपद भूषविले आणि ते एक ज्योतिषशास्त्रज्ञ व भौतिकीशास्त्रज्ञ देखील होते. सन १८९६ मध्ये त्यांनी वैमानिकाशिवाय वाफेवर चालणारे एक विमान तयार केले; त्यात इंधन होते तोपर्यंत साधारणतः एक मैलापर्यंत ते उडाले.
अर्थात, वाफेवर चालणारी इंजिने अवजड असल्यामुळे उड्डाणासाठी ती मुळीच सोयीस्कर नसतात हे लक्षात आल्यावर लँग्लेचे मदतनीस चार्ल्स एम. मॅनली यांनी अधिक सुटसुटीत असे ५३ अश्वशक्तीचे आणि १२५ पाऊंडाचे इंजिन तयार केले. परिणामस्वरूप, अतिशय कार्यक्षम विमानाचा जन्म झाला. लँग्लेंनी त्यास एअरोड्रोम असे नाव दिले. ऑक्टोबर ७, १९०३ रोजीची गोष्ट. मॅनली कंट्रोल्समध्ये बसलेले होते तेव्हा लँग्लेचे विमान, सपाट तळ असलेल्या एका बोटीतून कॅटपल्टच्या साह्याने आकाशात सोडण्यात आले. पण त्या विमानाला पोटोमॅक नदीत जलसमाधी मिळाली. याच्या दोन महिन्यानंतर पुन्हा प्रयत्न करण्यात आला पण तोही निष्फळ ठरला. शेवटी, हवालदिल होऊन लँग्ले यांनी हा नादच सोडून दिला.
लँग्ले यांना वारंवार अपयश आले हे खरे असले, तरी हवाई प्रवासाच्या क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांच्या मृत्यूनंतर आठ वर्षांनी म्हणजे १९१४ साली एअरोड्रोम विमानात बरेच बदल करून ग्लेन एच. कर्टिस यांनी हॅमन्डपोर्ट, न्यू यॉर्कमध्ये ते यशस्वीपणे आकाशात उडवले.
अर्थात, या शतकाच्या सुरवातीस विमानशास्त्राच्या प्रारंभिक इतिहासात मोलाचा वाटा उचललेल्या अनेकानेक लोकांपैकी काही मोजक्यांचाच आपण येथे विचार केला आहे. पण, आज आकाशात घिरट्या घालणाऱ्या निरनिराळ्या आकाराच्या या हजारो आभाळ मित्रांच्या अस्तित्वाचे आणि यशाचे श्रेय वैमानिक कलेच्या या आद्य प्रवर्तकांनाच जाते.
[२० पानांवरील चित्रं]
अल्बर्टो सॅन्टोस-ड्यूमन्ट आणि त्यांचे “14-bis” विमान
[चित्राचे श्रेय]
Culver Pictures
North Wind Picture Archives
[२१ पानांवरील चित्रं]
गूस्टाव व्हाईटहेड आणि हवेपेक्षा जड असलेल्या त्यांच्या हवाई यंत्राची हुबेहूब प्रतिकृती
[चित्राचे श्रेय]
Flughistorische Forschungsgemeinschaft Gustav Weisskopf
[२१ पानांवरील चित्रं]
सॅम्यूएल पी. लँग्ले आणि त्यांचे “एअरोड्रोम”
[चित्राचे श्रेय]
Dictionary of American Portraits/Dover
U.S. National Archives photo