वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 १२/८ पृ. २४-२५
  • जादूटोण्यामागे मूळात कोणाचा हात आहे?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जादूटोण्यामागे मूळात कोणाचा हात आहे?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • अपुऱ्‍या गरजा
  • खऱ्‍या देवाचा शोध—कोणत्या माध्यमाने?
  • जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • जादूटोणा याविषयी तुम्हाला काय माहीत असावे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • दुरात्मे वास्तविक आहेत का?
    सावध राहा!—१९९८
  • सैतानी भक्‍ती आमच्या काळातील
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९९
g99 १२/८ पृ. २४-२५

बायबलचा दृष्टिकोन

जादूटोण्यामागे मूळात कोणाचा हात आहे?

“चेटकीण.” हा शब्द ऐकताच डोळ्यांसमोर कोणते चित्र उभे राहते? करणी करणाऱ्‍या किंवा भूतप्रेतांची पूजा करणाऱ्‍या भयानक, कुरूप दिसणाऱ्‍या दुराचारी बायांचे? प्राचीन काळी सहसा अशाच स्त्रियांचा संबंध जादूटोण्याशी केला जायचा हे खरे आहे. पण आजकाल अगदी सर्वसामान्य लोकही असले प्रकार करू लागले आहेत. यांपैकी काहीजण तर वकील, शिक्षक, लेखक, नर्स यांसारखे सन्मानित हुद्दे भूषवितात. तसेच गूढवादाशी संबंध असलेल्या अनेक धार्मिक चळवळी आता जगभरात अचानक डोके वर काढू लागल्या आहेत. उदाहरणार्थ, neopaganism (निओपेगॅनिझम) म्हणजे ख्रिस्तपूर्व काळातल्या देवदैवतांची उपासना करणारा धर्म आणि nature religions (नेचर रिलीजन्स) म्हणजे निसर्गाची उपासना करणारे धर्म. निसर्गाची उपासना करणाऱ्‍यांचा असा विश्‍वास आहे, की पृथ्वी आणि सर्व सजीव सृष्टीमध्ये देवाचाच अंश आहे. रशियातील एक पोलीस अधिकारी म्हणतो: “देशाच्या प्रत्येक भागात तुम्हाला जादूटोणा पाहायला मिळेल; जणू तो लोकांच्या जीवनाचा एक भागच होऊन बसलाय.” संयुक्‍त संस्थानांविषयी म्हणाल, तर तेथे सुमारे ५० हजार ते ३ लाख लोक जादूटोणा करतात आणि यांपैकी काही विक्का धर्माचेa अनुयायी आहेत.

आपल्या काळात “विच” किंवा जादूटोणा करणाऱ्‍यांविषयी लोकांचे वेगवेगळे विचार आहेत. आजकालच्या जादूटोण्यामध्ये तीन गोष्टी सामील आहेत. देवींची पूजा करणे, निसर्गाची उपासना करणे आणि भूतप्रेतांची मदत घेणे. जादूटोणा करणारे लोक बदलते ऋतू, चंद्राच्या बदलत्या कला आणि अद्‌भूत नैसर्गिक घटना पाहून एकटेच मंत्रतंत्र करतात. तर काहीजण कोवन म्हटल्या जाणाऱ्‍या १३ लोकांच्या समूहात पूजा आणि मंत्रतंत्र करतात.

मध्ययुगात पाश्‍चात्य देशांत जादूटोणा करणाऱ्‍या लोकांना सर्रासपणे जिवंत जाळले जायचे. तसे आज होत नसले तरी आजही जादूटोणा करणाऱ्‍यांवर अमानुष अत्याचार होत असल्याचे, त्यांना ठार मारल्याचे दिसून येते. उदाहरणार्थ, इंडोनेशियामध्ये ऑक्टोबर १९९८ च्या सुरवातीस एका शस्त्रधारी जमावाने १५० हून अधिक लोकांची कत्तल केली. हे सर्व लोक “विच” किंवा चेटूक करणारे आहेत या संशयावरून त्यांना खतम करण्यात आले. तर दक्षिण आफ्रिकेत १९९० ते १९९८ या काळादरम्यान जादूटोणा करणाऱ्‍या लोकांवर केल्या गेलेल्या अत्याचाराच्या २,००० हून अधिक प्रकरणांची नोंद आहे; यांपैकी ५७७ लोकांची हत्या करण्यात आली. यावरून स्पष्ट होते, की एका बाजूला काही लोक जादूटोण्यात विलक्षण रस घेतात तर दुसऱ्‍या बाजूला त्याचा अव्हेर करतात. मग, या बाबतीत ख्रिश्‍चनांनी कोणती भूमिका स्वीकारावी?

अपुऱ्‍या गरजा

हल्ली लोक जादूटोणा का करतात? त्याचे एक कारण, जादूटोणा करणे म्हणजे निसर्गाचा आणि जीवनाचा आदर करणे असे लोकांचे मत आहे. काहीजण असाही खुलासा करतात, की त्यांच्या उपासनाविधीत पशूबली केला जात नाही. तर इतर काहींचे म्हणणे आहे, की आपण ज्यांच्यासोबत मनमोकळे बोलू शकतो, ज्यांच्यावर भरवसा ठेवू शकतो आणि ज्यांच्या धार्मिक आवडीनिवडी आपल्यासारख्याच आहेत अशा लोकांशी संपर्क साधण्यासाठी ते जादूटोण्यात गुंततात. उदाहरणार्थ, जादूटोणा करणारी एक स्त्री म्हणते: “यातले सगळे लोक किती मैत्रीपूर्ण आणि मोकळ्या मनाचे आहेत . . . ते खरोखरच फार चांगले आहेत.” तसेच अनेकजण असाही दावा करतात, की त्यांच्या धर्मात कोणतेही दुष्ट दैवत नसल्यामुळे सैतानाशी त्यांचा अजिबात संबंध नाही.

पण, यांपैकी बरेच लोक जादूटोण्याकडे वळतात त्याचे एक मूळ कारण, त्यांना आपल्या जीवनात एक प्रकारची आध्यात्मिक पोकळी जाणवते किंवा मग अस्तित्वात असलेल्या प्रमुख धर्मांनी त्यांचा भ्रमनिरास केलेला असतो. आपल्या चेटूक गटाविषयी बोलताना विक्का धर्मातली फिलेस क्यूरॉट नामक एक पंडिताईण म्हणते: “आमच्यावर ज्या धर्माचे संस्कार करण्यात आले होते त्यातील शिकवणुकी आणि प्रथा आम्हाला पसंत नव्हत्या.” ती पुढे म्हणते, ‘त्यामुळे जादूटोण्याच्या माध्यमातून विक्का धर्मात आम्ही देवाचा शोध घेऊ लागलो.’ पण, जादूटोणा खरोखरच खऱ्‍या देवाकडे नेणारा मार्ग आहे का?

खऱ्‍या देवाचा शोध—कोणत्या माध्यमाने?

बायबल अगदी स्पष्टपणे दाखवून देते, की एकच खरा देव आहे, तोच या विश्‍वाचा नियंता आहे आणि त्याचे नाव यहोवा आहे. (स्तोत्र ७३:२८; १ पेत्र १:१५, १६; प्रकटीकरण ४:११) तो सर्वांना त्याचा शोध करून ‘त्याला प्राप्त करून घेण्याचे’ आमंत्रण देतो. (प्रेषितांची कृत्ये १७:२७) त्यामुळे, देवाविषयी अधिक जाणून घेण्याची इच्छा असल्यास आपल्याला खरा देव यहोवा याच्याविषयीचे अचूक ज्ञान संपादन करण्याची गरज आहे. आणि हे ज्ञान त्याचे वचन अर्थात पवित्र बायबल याचा अभ्यास केल्याने प्राप्त होऊ शकते. बायबलचा लेखक याकोब आपल्याला आश्‍वासन देतो, की “देवाजवळ या म्हणजे तो तुम्हाजवळ येईल.”—याकोब ४:८.

पण, देवाचे वचन आपल्याला बजावते, की अशा बऱ्‍याचशा शिक्षणाच्या आणि जादूटोण्यासारख्या विद्येमागे दुष्ट आत्म्यांचा हात असतो. १ योहान ४:१) तसेच, अशा खोट्या शिकणुकींमार्फत सबंध जगभरातील लोकांना आज मार्गभ्रष्ट करणारा यहोवाचा सर्वात मोठा शत्रू दियाबल सैतान आणि त्याचे दुरात्मे असल्याचे देवाचे वचन स्पष्ट करते.b बायबलनुसार सैतानाने अनेकांची ‘मने आंधळी केली आहेत.’ तोच या चेटूक करणाऱ्‍या लोकांना आणि ‘संबंध जगाला’ आणि चेटूक करणाऱ्‍या लोकांना ठकवितो. मग चेटूक करणारे हे लोक वास्तवात दियाबलाची उपासना करण्याचा दावा करोत अगर न करोत. आपण असे का म्हणू शकतो?—२ करिंथकर ४:४; प्रकटीकरण १२:९.

जादूटोण्याशी संबंधित असलेल्या अनेकानेक प्रथा आणि कर्मकांड यांच्यात आणि भूतविद्येच्या (सेटॅनिझम) निरनिराळ्या पैलूंमध्ये लक्षवेधक साम्य आहे. यास्तव, केवळ भाबडी उत्सुकता देखील गूढवादाच्या दुनियेत घेऊन जाण्यास पुरेशी आहे. आणि हे खरे आहे; याच मार्गाने असंख्य लोक सैतानाच्या दुष्ट प्रभावाला बळी पडले आहेत.

तसेच, सत्तेच्या हव्यासापोटी आणि सूड उगवण्याच्या हेतूपोटी अनेकजण आज जादूटोण्याचा आश्रय घेतात हे सत्यही नाकारता येणार नाही. जेनिफर नावाची एक चेटकीण म्हणते की, “हल्ली स्वतःला “विच” किंवा चेटूक म्हणवणारे असे काही लोक आहेत जे दुष्ट हेतू साध्य करण्यासाठी त्याचा आश्रय घेतात.” जादूटोणा करण्यामागे लोकांचा हेतू कोणता का असेना एक मात्र खरे, की यात गुंतवणाऱ्‍या लोकांना पूर्णपणे सैतानाला आणि त्याच्या दुरात्म्यांना वश होण्याचा धोका आहे. असेही काही लोक आहेत जे दुरात्मे अस्तित्वात असल्याची शक्यता नाकारतात; पण असेच लोक अगदी सहजासहजी त्यांच्या फसवणुकीला ते बळी पडू शकतात.—१ करिंथकर १०:२०, २१.

शकून सांगणे, जादू करणे, मंत्रतंत्र करणे आणि इतर कोणत्याही माध्यमाने मृत लोकांशी संचार करण्याचा प्रयत्न करणे याचे बायबल खंडन करते. ते सुस्पष्टपणे म्हणते: “जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.” (अनुवाद १८:१०-१२) अर्थात, ख्रिश्‍चनांनी ‘सर्वांचे बरे करण्याचा’ निश्‍चय केला आहे आणि आपल्या सेवेत भेटणाऱ्‍या कित्येकांची भूतविद्येच्या कचाट्यातून सुटका करण्यास त्यांनी मदत केली आहे. (गलतीकर ६:१०; प्रेषितांची कृत्ये १६:१४-१८) पण, असे असले तरीही कोणत्याही प्रकारे ते खोट्या उपासनेत लुडबूड करत नाहीत; मग यात जादूटोणाही आला.—२ करिंथकर ६:१५-१७.

[तळटीपा]

a विक्का धर्म हा “एक निसर्गोपासक धर्म असून” या धर्माच्या अनुयायांना विक्कन्स म्हटले जाते. दी अमेरिकन हेरिटेज डिक्शनरी यानुसार या धर्माची “मुळे ख्रिस्तपूर्व काळातील पश्‍चिम युरोपात सापडतात.”

b सावध राहा! मासिकातील “बायबलचा दृष्टिकोन” या लेखमालेने “सैतान खरोखर आहे का?” (जानेवारी ८, १९९०, [इंग्रजी] पृष्ठे १२-१३) आणि “दुरात्मे वास्तविक आहेत का?” (एप्रिल ८, १९९८, पृष्ठे १८-१९) या प्रश्‍नांची उत्तरे दिली आहेत.

[२४ पानांवरील चित्राचे श्रेय]

Picture Book of Devils, Demons and Witchcraft/Ernst and Johanna Lehner/Dover

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा