वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 १२/८ पृ. ४-७
  • अंधविश्‍वास—आजही का टिकून आहेत?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अंधविश्‍वास—आजही का टिकून आहेत?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • चीनमध्ये अंधविश्‍वास निर्मूलनाचे प्रयत्न
  • आत एक, बाहेर एक
  • अंधविश्‍वास आजपर्यंत का टिकले आहेत?
  • अंधविश्‍वासांचे तुमच्या जीवनावर नियंत्रण आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • अंधविश्‍वास—आज किती प्रचलित?
    सावध राहा!—१९९९
  • अंधविश्‍वास—इतके हानीकारक का?
    सावध राहा!—१९९९
  • अंधविश्‍वासांच्या नियंत्रणाखालील जीवन
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
सावध राहा!—१९९९
g99 १२/८ पृ. ४-७

अंधविश्‍वास—आजही का टिकून आहेत?

तुम्हाला कदाचित ठाऊकच असेल की, पुष्कळजण काळी मांजर आडवी गेली तर अशुभ मानतात किंवा तीन जण काही काम करायला निघाले तर त्यात निश्‍चित बिघाड होणार असा विश्‍वास करतात. त्याशिवाय, शुक्रवार १३ तारीख दुर्भाग्याची असते आणि इमारतीचा १३ वा माळासुद्धा धोकेदायक असतो असाही अनेकांचा विश्‍वास आहे. हे अंधविश्‍वास तर्कहीन असले तरी त्यांच्यावर आजही विश्‍वास केला जातो.

जरा विचार करा. काहीजण मंतरलेले ताईत का घालतात किंवा घरामध्ये काळी बाहुली का लटकवतात? यामुळे आपले चांगले होईल असा त्यांचा विश्‍वास नसतो का? पण त्यांच्या या विश्‍वासाला काही ठोस पुरावा नाही. अंधविश्‍वासांचा शब्दकोश (इंग्रजी) हे पुस्तक म्हणते: “अंधविश्‍वास मानणाऱ्‍या व्यक्‍तीच्या मते काही वस्तू, ठिकाणे, प्राणी किंवा कर्म शुभ असतात (चांगले शकुन) तर इतर अशुभ असतात (वाईट शकुन किंवा दुर्भाग्याची चिन्हे).”—पाहा गलतीकर ५:१९, २०.

चीनमध्ये अंधविश्‍वास निर्मूलनाचे प्रयत्न

आधुनिक काळात, अंधविश्‍वासांचे निर्मूलन करण्याचे सगळे प्रयत्न फोल ठरले आहेत. उदाहरणार्थ, १९९५ साली शांघायच्या लोकसभेने एक अधिकृत हुकूम जाहीर केला ज्यामध्ये अंधविश्‍वास इतिहासजमा झालेले आहेत असे ठरवून अंधश्रद्धांवर विश्‍वास ठेवण्यास बंदी घालण्यात आली. “सरंजामशाही राष्ट्रातील अंधविश्‍वासांचे निर्मूलन करणे, अंत्यसंस्काराच्या विधींमध्ये सुधार करणे आणि सुसंस्कृत देश निर्माण करणे” या उद्देशाने तो हुकूम काढण्यात आला होता. परंतु त्याचा परिणाम काय झाला?

एका अहवालानुसार, शांघाय येथील लोकांवर काही परिणाम झाला नाही. पूर्वजांच्या कबरांवर नकली नोटा जाळण्याच्या चिनी प्रथेवर सरकारने जी बंदी घातली होती तिच्याप्रती विरोध दर्शवण्यात आला; कबरस्थानात गेलेल्या एका व्यक्‍तीने म्हटले: “आम्ही १९ अब्ज युआन [सुमारे १२० अब्ज रुपये] जाळले.” तो पुढे म्हणाला: “ही परंपरा आहे. यामुळे देवदेवता प्रसन्‍न होतात.”

या बंदीचा काहीच फायदा कसा झाला नाही हे ग्वानमिंग या सुप्रसिद्ध बातमीपत्रात दाखवण्यात आले आणि “चीनमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील एकूण कर्मचाऱ्‍यांची संख्या केवळ एक कोटी आहे तर ज्योतिषांची संख्या [सुमारे] ५० लाख” असावी असे त्यात म्हटले होते. पुढे त्या बातमीपत्रात असे म्हटले होते: “आजकाल ज्योतिषांवर जास्त जोर दिसत आहे.”

अंधविश्‍वास का टिकून राहिले आहेत त्याविषयी द एन्सायक्लोपिडिया अमेरिकानाची आंतरराष्ट्रीय आवृत्ती म्हणते: “सर्व संस्कृतींमध्ये काही जुन्या परंपरा जोपासल्या जातात, कालांतराने त्यांच्यात आणखी फेरबदल करून त्यांना नवीन अर्थ देखील दिला जातो.” द न्यू एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाच्या अलीकडील आवृत्तीत असे कबूल करण्यात आले: “या तथाकथित आधुनिक काळात, प्रत्यक्ष पुराव्याला जास्त महत्त्व दिल्या जाणाऱ्‍या या युगातही पुष्कळ लोक असे आहेत जे आजही एक-दोन वेडगळ समजुती किंवा अंधविश्‍वास बाळगतातच.”

आत एक, बाहेर एक

स्पष्टतः, अनेक लोकांच्या बाबतीत, खायचे दात व दाखवायचे दात वेगळे असतात ही म्हण खरी ठरते; आपले व्यक्‍तिगत जीवन ते पडद्याआड ठेवतात. एका लेखकाच्या म्हणण्यानुसार इतरांनी त्यांना मूर्ख समजू नये म्हणून ते असे करतात. अशा व्यक्‍ती या विश्‍वासांना अंधविश्‍वास न म्हणता सवय म्हणणे पसंत करतात. उदाहरणार्थ, खेळाडू त्यांच्या अंधश्रद्धांना खेळाआधीच्या प्रथा किंवा संस्कार असे म्हणतात.

अलीकडेच एक पत्रकार, साखळी पत्राविषयी उपरोधिकपणे बोलत होता; साखळी पत्र अनेक लोकांना पाठवले जाते आणि त्यांनी त्याच्या प्रती इतरांना पाठवाव्यात अशी त्यात विनंती केलेली असते. दुसऱ्‍यांना हे पत्र पाठवणारा मनुष्य भाग्यवान ठरतो तर साखळी मोडणाऱ्‍यावर दुर्भाग्य कोसळते असे म्हटले जाते. म्हणून हा पत्रकारसुद्धा या साखळीत सामील झाला; तो म्हणाला: “माझा अंधश्रद्धेवर विश्‍वास नाहीये; फक्‍त मला दुर्भाग्य नको म्हणून मी हे करतोय.”

मानववंशशास्त्रज्ञ आणि लोकविद्येचे तज्ज्ञ यांच्या मते, “अंधविश्‍वासू” असे कोणाला म्हणणेसुद्धा टीका करण्यासारखे आहे आणि म्हणून कोणाच्या सवयींना तसे नाव द्यायला ते घाबरतात. त्याऐवजी, “रूढी-परंपरा,” “समाजाच्या श्रद्धा,” “समजुती” यांसारखे “बहुव्यापक” परंतु कोणालाही दुखवणार नाहीत असे शब्द वापरणे त्यांना पसंत आहे. लेस्ट इल लक बिफॉल दी—सुपरस्टिशन्स ऑफ द ग्रेट ॲण्ड स्मॉल या आपल्या पुस्तकात, डिक हायमन आपले प्रामाणिक मत मांडतात: “पाप आणि सर्दीच्या बाबतीत आहे तसे अंधविश्‍वासाचे समर्थन करणारे लोक कमी आहेत पण अंधविश्‍वास मानणारे लोक जास्त आहेत.”

कोणत्या न कोणत्या रूपाने अंधविश्‍वास आजही आहेतच. आजच्या युगात तंत्रज्ञान आणि विज्ञान क्षेत्रात प्रगती झाली असली तरी हे असे का?

अंधविश्‍वास आजपर्यंत का टिकले आहेत?

काहींचे म्हणणे असे आहे की अंधश्रद्धा ही सर्वसामान्य गोष्ट आहे. इतरजण तर असेही म्हणतात की, अंधविश्‍वास मानण्याची प्रवृत्ती मनुष्यात नैसर्गिकरित्या असते. परंतु, अभ्यासांवरून काही वेगळेच सिद्ध होते. पुरावा आपल्याला दाखवून देतो की, लोकांना जे शिकवले जाते त्यामुळे ते अंधविश्‍वास बाळगू लागतात.

प्राध्यापक स्टुअर्ट ए. वाईस असे म्हणतात: “अंधविश्‍वास बाळगण्याची सवय ही दुसऱ्‍या सवयींप्रमाणे हळूहळू जडते.” घरात काळ्या बाहुल्या लटकव्याची सवय आपल्याला जन्मापासून नसते तर नंतर ते करायला शिकतो. असे म्हटले जाते की, लोक लहान असताना जादूवर विश्‍वास करू लागतात आणि “मोठे झाल्यावरही” अंधविश्‍वास बाळगत असतात. हे अंधविश्‍वास ते कोठून शिकतात?

पुष्कळशा अंधविश्‍वासांचा अनेक वर्षांपासून जोपासलेल्या धार्मिक विश्‍वासांशी जवळून संबंध आहे. उदाहरणार्थ, इस्राएली लोकांआधी कनान देशात राहणाऱ्‍या लोकांच्या धर्मातच अंधविश्‍वास सामावलेला होता. चेटूक करणे, शकुनमुहूर्त पाहणे, मंत्रतंत्र करणे, जादू, वशीकरण, पंचाक्षरी, मंत्र म्हणणे, छांछू करणे, अथवा मृतात्म्याला विचारणे हे सर्व प्रकार कनानी लोकांमध्ये प्रचलित होते असे बायबल म्हणते.—अनुवाद १८:९-१२.

प्राचीन ग्रीक लोक देखील धर्माशी संबंधित अंधविश्‍वास बाळगण्याबद्दल प्रसिद्ध होते. कनानी लोकांप्रमाणेच हेसुद्धा शकुन, चेटूक आणि जादू यांवर विश्‍वास करत होते. बॅबिलोनी लोक पशुचे काळीज पाहायचे आणि त्यावरून काय करावे आणि काय नाही हे त्यांना कळेल असा त्यांचा विश्‍वास होता. (यहेज्केल २१:२१) ते जुगार खेळण्यातही प्रसिद्ध होते आणि बायबलमध्ये सांगितल्यानुसार ते ‘भाग्यदेवतेकडून’ मदत घेण्याचा प्रयत्न करायचे. (यशया ६५:११) जुगार सहसा खेळणारे अंधविश्‍वास बाळगणारे असतात असे आजही मानले जाते.

गंमत म्हणजे, पुष्कळ चर्चेसने जुगार खेळायला प्रोत्साहन दिले आहे. उदाहरणार्थ, कॅथलिक चर्चने बिंगोसारख्या खेळांना उत्तेजन दिले आहे. एका जुगाऱ्‍याने असे म्हटले: “कॅथलिक चर्चला ठाऊक आहे की [जुगारी किती अंधविश्‍वास बाळगतात] आणि म्हणूनच नन्स दान पेट्या घेऊन रेसट्रॅकजवळ उभ्या असतात. एका कॅथलिक व्यक्‍तीने (आमच्यापैकी बहुतेक कॅथलिकच होते) ‘सिस्टरला’ पैसे दिले नाही तर मग घोड्याच्या शर्यतीत तो जिंकेल का? म्हणून आम्ही दान द्यायचो. आणि त्या दिवशी आम्ही जिंकलो तर पुढेही जिंकत राहू म्हणून जास्तच उदारतेने द्यायचो.”

धर्म आणि अंधविश्‍वास हे एकमेकांत कसे गुंफलेले आहेत त्याची प्रमुख उदाहरणे नाताळाशी (ख्रिस्ती धर्मजगतातले चर्चेस पाळत असलेला एक सण) संबंधित असलेले अंधविश्‍वास आहेत. यांमध्ये, एक अंधविश्‍वास असा आहे की प्रेमिकांनी मिसलटोच्या झाडाखाली चुंबन घेतल्यास त्यांचा विवाह होतो; याशिवाय सांटा क्लॉजविषयी देखील अनेक अंधविश्‍वास आहेत.

लेस्ट इल लक बिफॉल दी या पुस्तकानुसार, “भविष्याची चौकशी” करण्याच्या हेतूने अंधविश्‍वास अस्तित्वात आले. त्यामुळे सबंध इतिहासभरात करत आले आहेत त्याचप्रमाणे आजही सर्वसामान्य लोक आणि जागतिक नेते देखील ज्योतिषांचा किंवा जादुई शक्‍ती असल्याचा दावा करणाऱ्‍यांचा सल्ला घेतात. डोन्ट सिंग बिफोर ब्रेकफास्ट, डोन्ट स्लिप इन द मूनलाईट हे पुस्तक म्हणते: “ताईत आणि मंत्रतंत्राद्वारे ज्ञाताबद्दलची किंवा अज्ञाताबद्दलची भीती घालवता येते या विश्‍वासामुळे लोकांना दिलासा मिळत असे.”

अशाप्रकारे, अंधविश्‍वासांमुळे लोकांना त्यांच्या भीतीवर थोडेबहुत नियंत्रण मिळाले आहे. क्रॉस युवर फिंगर्स, स्पिट इन युवर हॅट हे पुस्तक म्हणते: “[लोकांसमोर] जेव्हा अशा परिस्थिती येतात जेथे त्यांना काही करता येत नाही—जेथे ‘भाग्य’ किंवा ‘योगायोग’ यावर अवलंबून राहावे लागते—तेव्हा अंधविश्‍वास [त्यांना] एक प्रकारची सुरक्षा देतात. अंधविश्‍वास बाळगण्यामागचे [मानवांचे] हे एकच कारण आहे.”

विज्ञानाने अनेक पद्धतींनी मानवांची स्थिती सुधारली असली, तरी असुरक्षिततेच्या भावना जशाच्या तशाच आहेत. उलट, विज्ञानाने निर्माण केलेल्या समस्यांमुळे असुरक्षितता वाढली आहे. प्राध्यापक वाईस म्हणतात: “अंधश्रद्धा आणि अलौकिक जगावरील विश्‍वास आपल्या संस्कृतीसोबत समरस झाला आहे . . . कारण या आधुनिक जगात कशाचीच शाश्‍वती राहिलेली नाही.” द वर्ल्ड बुक एन्सायक्लोपिडियाने असा निष्कर्ष काढला: “लोकांना भविष्याबद्दल जोपर्यंत अनिश्‍चितता जाणवेल . . . तोपर्यंत अंधविश्‍वास टिकून राहतील.”

थोडक्यात सांगायचे तर, सर्वसामान्यपणे मानवांना वाटणाऱ्‍या भीतीमुळे अंधविश्‍वास उत्पन्‍न झालेले असल्यामुळे शिवाय वर्षानुवर्षांपासून जोपासलेल्या धार्मिक विश्‍वासांचा त्यांना आधार मिळाल्यामुळे अंधविश्‍वास आजपर्यंत टिकून राहिले आहेत. परंतु, अंधविश्‍वासांमुळे लोकांना अनिश्‍चिततेच्या भावनांचा सामना करता येतो म्हणून ते फायदेकारक आहेत असा निष्कर्ष आपण काढावा का? अंधविश्‍वास बाळगल्याने काहीच नुकसान होत नाही का? की काही अशा धोकेदायक गोष्टी आहेत, ज्या आपण आवर्जून टाळल्या पाहिजेत?

[५ पानांवरील चित्र]

केवळ चीनमध्येच जवळजवळ ५० लाख ज्योतिषी असतील

[६ पानांवरील चित्र]

बिंगोसारख्या खेळांना प्रोत्साहन देऊन अनेक चर्चेसनी अंधविश्‍वासाला खतपाणी घातले आहे

[७ पानांवरील चित्र]

मिसलटोच्या झाडाखाली चुंबन घेण्यासारख्या ख्रिस्ती परंपरा अंधविश्‍वासाच्याच आधारावर टिकून आहेत

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा