अंधविश्वास—आज किती प्रचलित?
काही ठिकाणी, कोणी शिंकले तर आजूबाजूचे अनोळखी लोकसुद्धा पटकन म्हणतात: “गॉड ब्लेस यू” (देव तुझं भलं करो) किंवा फक्त “ब्लेस यू” (तुझं भलं होवो). दुसऱ्या अनेक भाषांमध्येही असेच काहीतरी म्हटले जाते. जर्मन भाषेत “गेझुंटहाईट” म्हणतात. अरब लोक “येरहामाक अल्लाह” असे म्हणतात तर दक्षिण पॅसिफिक येथील पॉलिनेशियन लोक म्हणतात “तीहे माऊरी ओरार.”
लोक असे का म्हणत असावेत याबद्दल तुम्ही जास्त विचारही केला नसेल; तुम्हाला वाटले असावे हा केवळ एक शिष्टाचार आहे. पण खरे पाहता, याची सुरवात एका अंधविश्वासातून झाली आहे. अमेरिकेतील इंडियाना राज्यातील ब्लूमिंग्टन शहरात असलेल्या इंडियाना विद्यापीठाच्या लोकविद्या संस्थेतील ग्रंथपाल, मॉइरा स्मिथ, “देव तुझं भलं करो” किंवा “तुझं भलं होवो” या अभिव्यक्तीविषयी म्हणतात: “लोकांची समजूत आहे की माणूस शिंकतो तेव्हा त्याचा आत्मा बाहेर टाकला जातो.” त्यामुळे, देवाने त्या व्यक्तीचा आत्मा परत करावा या आशेने ‘देव तुझं भलं करो’ असे म्हटले जाते.
अर्थात, शिंकल्यामुळे आत्मा शरीरातून बाहेर टाकला जातो हा समज अगदीच तर्कहीन आहे हे बरेच जण मान्य करतील. म्हणूनच, अंधविश्वास याचे वर्णन उचितपणे लोकभ्रम, अज्ञाताबद्दल वाटणारी गूढ भीती, शकुनविश्वास किंवा घडणाऱ्या गोष्टींच्या मूळ कारणाविषयी असलेली चुकीची समजूत यामधून निर्माण होणारा विश्वास किंवा प्रथा असे केले जाऊ शकते.
सतराव्या शतकातल्या एका डॉक्टरांनी देखील त्यांच्या काळातील अंधविश्वासांचे वर्णन अज्ञानी लोकांच्या “वेडगळ समजुती” असे केले. आणि म्हणूनच मानवांनी विज्ञानाच्या क्षेत्रात बरीच प्रगती करून २० व्या शतकात पदार्पण केले तेव्हा, एक न एक दिवशी “अंधविश्वासाच्या शेवटल्या पिशाच्चापासून मानवजातीची सुटका” जरूर होईल असा आशावाद १९१० च्या द एन्सायक्लोपिडिया ब्रिटानिकाने व्यक्त केला होता.
आजही तितकाच व्यापक
सुमारे आठ दशकांआधी व्यक्त केलेला तो आशावाद निराधार होता कारण अंधविश्वासाची मुळे आजही तितकीच खोलवर रुजलेली आहेत. हे अंधविश्वासांचे वैशिष्ट्यच आहे. अंधविश्वास आजही कसे टिकून राहिले आहेत याची काही उदाहरणे पाहा.
◻ आशियातील एका मोठ्या शहराच्या गव्हर्नरचा अचानक मृत्यू झाल्यावर त्यांच्या सरकारी निवासस्थानी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नवीन गव्हर्नरला एका खास मांत्रिकाकडे जाण्याचा सल्ला दिला आणि त्या मांत्रिकाने मग निवासस्थानात अनेक बदल करायला सांगितले. कर्मचाऱ्यांचे असे मत होते की, हे बदल केल्यामुळे अशुभ प्रभाव घालवले जातील.
◻ अमेरिकेत कोट्यवधी डॉलर्सची उलाढाल असलेल्या एका मोठ्या कंपनीच्या अध्यक्षिका आपल्यासोबत नेहमी एक खास दगड ठेवतात. त्यांचे पहिले व्यापार प्रदर्शन यशस्वी ठरल्यापासून तो दगड सोबत घेतल्याशिवाय त्या कधीही घराबाहेर पाऊल ठेवत नाहीत.
◻ आशियातले बिझनेस-एक्सिक्युटिव्ह मोठमोठाले व्यवहार पार पाडण्याआधी नेहमी ज्योतिषाचा सल्ला घेतात.
◻ काही खेळाडू त्यांच्या यशाचे श्रेय आपण केलेल्या कठोर मेहनतीला न देता स्पर्धेच्या दिवशी घातलेल्या कपड्यांना देतात. म्हणून तेच कपडे न धुता पुढील सामन्यांतही ते वापरतात.
◻ एक विद्यार्थी एका विशिष्ट पेनाने परीक्षा लिहितो आणि त्याला जास्त मार्क मिळतात. त्यानंतर तो पेन “लकी” आहे असा त्याचा विश्वास असतो.
◻ आपल्या नवीन घरात पाऊल ठेवण्याआधी नव वधूची दृष्ट काढली जाते.
◻ एका व्यक्तीला मार्गदर्शन हवे असते तेव्हा बायबल उघडून जे वचन पहिले दिसेल तेच वाचावे असा त्याचा विश्वास असतो.
◻ सुरक्षित प्रवास होण्यासाठी पुष्कळजण नदीत पैसे टाकतात.
यावरून, आजही अंधविश्वास किती रूढ आहे हे स्पष्ट होते. याबद्दल कनेक्टिकट विद्यालयात मानसशास्त्राचे सहकारी प्राध्यापक स्टुअर्ट ए. वाईस, शकुनविश्वास—अंधविश्वासामागची मानसिकता (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात म्हणतात: “आज तंत्रज्ञानाने कितीही प्रगती केली असली, तरीही अंधविश्वास पूर्वीसारखाच व्यापक आहे.”
अंधविश्वासाची मुळे इतकी खोलवर रुजलेली आहेत की प्रयत्न करूनही ती उपटून काढणे शक्य नाही. ते का?