वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 १२/८ पृ. ८-११
  • अंधविश्‍वास—इतके हानीकारक का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अंधविश्‍वास—इतके हानीकारक का?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • खरी कहाणी
  • धोकेदायक उगम
  • मंतरलेली ताईते आणि मूर्तिपूजा
  • भविष्य कसे जाणता येईल
  • देवाने अभिवचन दिलेले उत्कृष्ट भविष्य
  • अंधविश्‍वास—आजही का टिकून आहेत?
    सावध राहा!—१९९९
  • अंधविश्‍वासांचे तुमच्या जीवनावर नियंत्रण आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००२
  • अंधविश्‍वास—आज किती प्रचलित?
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 १२/८ पृ. ८-११

अंधविश्‍वास—इतके हानीकारक का?

अंधविश्‍वास हानीकारक ठरू शकतात का? काहीजण मुद्दाम असा विचार करू इच्छित नाहीत किंवा मग ते असे म्हणतात की झाले तरी, फार गंभीर असे नुकसान होत नाही. तथापि, शकुनविश्‍वास—अंधविश्‍वासामागची मानसिकता (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात प्राध्यापक स्टुअर्ट ए. वाईस इशारा देतात: “भविष्य सांगणारे, ज्योतिषी, आंकड्यांचा सांकेतिक अर्थ सांगणारे किंवा टॅरट कार्ड वाचणारे यांच्यावर पैसा ओतल्याने किंवा काही विशिष्ट अंधविश्‍वास पाळल्याने जुगारात अधिक यश मिळते असे दिसून आल्यामुळे एखाद्याला जुगाराचे व्यसन एकदा जडले तर तो दारिद्र्‌याच्या वाटेला लागू शकतो.” आणि आपल्या जीवनावर अंधविश्‍वासाचे नियंत्रण राहू दिले, तर याहीपेक्षा गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात.

आपण आधीच पाहिल्याप्रमाणे, अंधविश्‍वासांद्वारे भविष्याबद्दलची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. तथापि, अंधविश्‍वास आणि भविष्याबद्दलचे खात्रीलायक ज्ञान यांमधला फरक पाहणे महत्त्वाचे आहे. एक उदाहरण पाहा.

खरी कहाणी

सन १५०३ मध्ये, मध्य अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्‍याजवळ कित्येक महिने शोध केल्यानंतर ख्रिस्टोफर कोलंबसची दोन जहाजे सध्याच्या जमायका द्वीपावर कशीबशी पोहंचली. सुरवातीला, द्वीपावर राहणाऱ्‍या आदिवासींनी या वाट चुकलेल्या शोधकांना अगदी उदारपणे अन्‍नपाणी पुरवले. परंतु, खलाशांची गैरवागणूक पाहून द्वीपावरील रहिवाश्‍यांनी त्यांना अन्‍नपाणी द्यायचे बंद केले. मग त्यांचे हाल होऊ लागले; शिवाय, त्यांच्या मदतीसाठी येणाऱ्‍या दुसऱ्‍या जहाजाला यायला अजून बराच अवकाश होता.

तेव्हा, म्हणतात की कोलंबसने आपल्याकडील पंचांग तपासला आणि पंचांगानुसार फेब्रुवारी २९, १५०४ रोजी चंद्राला ग्रहण लागणार असे त्याच्या अभ्यासातून निष्पन्‍न झाले. द्वीपावरील रहिवाश्‍यांच्या अंधविश्‍वासाचा फायदा घेऊन त्याने त्यांना बजावले की, त्यांनी खलाशांना अन्‍नपाणी दिले नाही तर चंद्र काळवंडेल. रहिवाश्‍यांनी त्याचे काहीएक ऐकले नाही. पण चंद्राला ग्रहण लागताच ते “मोठमोठ्याने रडत आणि आकांत करीत चहुबाजूंनी शीधासामग्री घेऊन जहाजांकडे येऊ लागले.” त्यानंतर, खलाशी तेथे होते तोपर्यंत त्यांना अन्‍नपाण्याची कमतरता भासली नाही.

द्वीपावरील रहिवाश्‍यांच्या मते, कोलंबसने अलौकिक जादू केली होती. पण त्यांनी हा निष्कर्ष अंधविश्‍वासामुळे काढला होता. खरे पाहता, पृथ्वी, चंद्र आणि सूर्याच्या अचूक हालचालींच्या आधारे हे “भाकीत” करण्यात आले होते. ग्रहणांसारख्या गोष्टींचे भाकीत खगोलशास्त्रज्ञ अगदी अचूकपणे फार फार आधी करू शकतात; ही माहिती पंचांगांमध्ये दिलेली असते. शिवाय, खज्योतींच्या अचूक हालचालींमुळे खगोलशास्त्रज्ञांना अगदी केव्हाही त्यांची नेमकी स्थिती जाणणे शक्य असते. म्हणूनच तर वृत्तपत्रात दिलेली सूर्योदयाची किंवा सूर्यास्ताची वेळ अचूक आहे असेच आपण मानतो.

ग्रहण, सूर्योदय आणि सूर्यास्तांच्या वेळांची अचूक माहिती देणारा मुळात या खज्योतींचा महान निर्माणकर्ता आहे. परंतु ज्योतिषी, मांत्रिक, क्रिस्टल बॉलमध्ये पाहून भविष्य सांगणारे आणि टॅरट कार्ड वाचणारे यांची भाकीते दुसऱ्‍याच एका उगमाकडून आहेत, अर्थात सर्वशक्‍तिमान देवाच्या विरोधात असणाऱ्‍या आत्मिक व्यक्‍तीकडून आहेत. याचा काय अर्थ होतो ते पाहा.

धोकेदायक उगम

प्रेषितांची कृत्ये १६:१६-१८ (पं.र.भा.) येथे पवित्र शास्त्रात असे सांगितले आहे की, “एक मुलगी” फिलिप्पैच्या प्राचीन शहरात “दैवप्रश्‍न सांगून” [भविष्य वर्तवून] आपल्या धन्यांस फार मिळकत करून देत असे. परंतु त्या अहवालात स्पष्टपणे असे म्हटले आहे की, तिला सर्वशक्‍तिमान निर्माणकर्त्याच्या शक्‍तीमुळे नव्हे, तर ‘दैवप्रश्‍न सांगणारे भूत लागले’ होते म्हणून भाकीते करता येत होती. यास्तव, प्रेषित पौलाने तिच्या अंगातले भूत काढले तेव्हा भविष्य सांगण्याची तिची शक्‍ती नाहीशी झाली.

अशी ही भाकीते दुष्टात्म्यांकडून केली जातात हे यावरून स्पष्ट होते. आणि म्हणूनच देवाने इस्राएलांना दिलेल्या मोशेच्या नियमशास्त्रात असे म्हटले होते: “चेटूक करणारा, शकुनमुहूर्त पाहणारा, मंत्रतंत्र करणारा, जादूगार, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छांछूं करणारा . . . असा तुमच्यापैकी कोणी नसावा. कारण जो कोणी असली कृत्ये करितो त्याचा परमेश्‍वराला वीट आहे.” (अनुवाद १८:१०-१२) मोशेच्या नियमशास्त्रानुसार या गुन्ह्यांसाठी मृत्युदंड ही शिक्षा होती.—लेवीय १९:३१; २०:६.

निरुपद्रवी भासणाऱ्‍या पुष्कळशा अंधविश्‍वासांमागे दुष्टात्मे आहेत हे जाणून कदाचित तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. पण बायबल म्हणते की, सैतान “स्वतः तेजस्वी देवदूताचे सोंग घेतो.” (२ करिंथकर ११:१४) सैतान आणि त्याच्या अधीन असलेले दुरात्मे, हानीकारक प्रथा अगदी निरुपद्रवी आहेत एवढेच नव्हे तर फायदेकारक आहेत असेही भासवू शकतात. काहीवेळा, चिन्हे खरी करून ती देवाकडील लक्षणे आहेत असे ते लोकांना भासवतात. (पडताळा मत्तय ७:२१-२३; २ थेस्सलनीकाकर २:९-१२.) आणि म्हणूनच आपल्याला खास शक्‍ती आहे असा दावा करणाऱ्‍यांची भाकीते काही वेळा खरी होतात.

अर्थात, सर्व नाहीत तरी बहुतेक लोक जे आपल्याकडे खास शक्‍ती आहे असा दावा करतात, ते फसवे, ढोंगी असतात; भोळ्या-भाबड्या लोकांकडून पैसे उकळणे हेच त्यांचे काम असते. पण हे लोक फसवे नसले तरी, लोकांना ‘तेजाच्या सुवार्तेप्रती’ अंधळे करून यहोवाविरुद्ध चेतवण्यासाठी सैतान त्यांचा बऱ्‍यापैकी उपयोग करून घेतो.—२ करिंथकर ४:३, ४.

मंतरलेली ताईते आणि मूर्तिपूजा

संरक्षण आणि जीवनातल्या आकस्मिक घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी घातली जाणारी मंतरलेली ताईते आणि अंधविश्‍वासाच्या प्रथा यांच्याविषयी काय? यांत अनेक अप्रत्यक्ष धोके आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, अंधविश्‍वासी व्यक्‍ती एका अर्थाने आपले जीवन अदृश्‍य शक्‍तींच्या अधीन करत असते. ती तर्क आणि कारणमीमांसा झुगारून निराधार गोष्टींच्या भीतीला आपणहून वश होत असते.

एका लेखकाने यातील आणखी एक धोका दाखवून दिला. तो म्हणतो: “दुर्दैव टाळण्यासाठी कोणी ताईत घालतो आणि तरीसुद्धा त्याच्यावर दुर्दैव आलेच, तर स्वतः जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आपल्यावर आलेल्या संकटाचा सगळा दोष दुसऱ्‍यांवर ढकलण्याची [त्याची] प्रवृत्ती असू शकते.” (पडताळा गलतीकर ६:७.) एकदा निबंधकार राल्फ वाल्डो एमरसन यांनी म्हटले: “भाग्यावर विश्‍वास ठेवणारे लोक दुर्बल असतात . . . दृढ मनाचे लोक कारण आणि परिणाम यांच्या परस्पर संबंधावर विश्‍वास करतात.”

“कारण आणि परिणाम” यांतील परस्पर संबंधामुळेच आपल्या जीवनात अनपेक्षित घटना घडतात—हेच ते “समय व प्रसंग” जे सर्वांना घडतात. (उपदेशक ९:११, पं.र.भा.) अशा या अनपेक्षित घटना “दैवाच्या खेळामुळे” घडत नाहीत. खऱ्‍या ख्रिश्‍चनांना हे ठाऊक आहे की, अशा अनपेक्षित घटनांना अंधविश्‍वासू चालीरीती आणि मंतरलेल्या ताईतांच्या साहाय्याने टाळता येत नाही. उलट, अशा घटना घडतात तेव्हा आपल्याला बायबलमधील सत्य विधानाची आठवण होते: “तुम्हाला उद्याचे समजत नाही; तुमचे आयुष्य ते काय? तुम्ही वाफ आहा ती थोडा वेळ दिसते, आणि मग दिसेनाशी होते.”—याकोब ४:१४.

शिवाय, खऱ्‍या ख्रिश्‍चनांना हेही ठाऊक आहे की, मंतरलेली ताईते किंवा अंधविश्‍वासाच्या चालीरीती यांना पूज्य मानले जाते. यास्तव, ख्रिश्‍चनांच्या दृष्टीने हे सर्व मूर्तिपूजेचे प्रकार आहेत आणि देवाच्या वचनात स्पष्टपणे त्यांबद्दल नापसंती व्यक्‍त करण्यात आली आहे.—निर्गम २०:४, ५; १ योहान ५:२१.

भविष्य कसे जाणता येईल

याचा अर्थ ख्रिश्‍चनांना भविष्यात काहीच रस नाही असे नाही. उलट, तर्कशुद्ध विचार करणारी कोणतीही व्यक्‍ती हे मान्य करील की पुढे काय होणार आहे हे जाणून घेणे सहसा फायद्याचे असते. कारण पुढे काय घडणार आहे याची आपल्याला आधीच माहिती असल्यास आपण योग्य पाऊल उचलू शकतो ज्यामुळे आपल्याला आणि आपल्या प्रिय जनांनाही लाभ होईल.

परंतु, ही माहिती योग्य उगमाकडून मिळवणे अतिशय महत्त्वाचे आहे. संदेष्ट्या यशयाने असा इशारा दिला होता: “लोक तुम्हाला म्हणतील, ‘भूतवैद्यांना व छांछू करणाऱ्‍या मांत्रिकांना विचारायला जा’; तेव्हा म्हणा, ‘प्रभुची शिकवण ऐका! भूतवैद्यांचे ऐकू नका—ते जे सांगतात त्याचा तुम्हाला काहीच लाभ होणार नाही.’ ”—यशया ८:१९, २०, टुडेज इंग्लिश व्हर्शन.

भविष्याविषयी विश्‍वसनीय माहिती केवळ बायबलच्या मूळ लेखकाकडेच आहे. (२ पेत्र १:१९-२१) या प्रेरित पुस्तकात सर्वशक्‍तिमान देव, यहोवाने केलेल्या भविष्यवाण्या विश्‍वसनीय आहेत याचा विपुल पुरावा आढळतो; पंचांगांमधील खज्योतींच्या हालचालींविषयीची “भाकीते” जशी विश्‍वसनीय आहेत तसाच हा पुरावा देखील विश्‍वसनीय आहे. बारीकसारीक तपशीलांमध्येही बायबलमधील भविष्यवाणी किती अचूक आहे हे दाखवण्यासाठी एक उदाहरण पाहा. असे समजू या की, आज कोणीएक प्रसिद्ध व्यक्‍ती २०० वर्षांनंतरच्या अर्थात वर्ष २१९९ मध्ये घडणार असलेल्या घटना भाकीत करून त्या प्रकाशित करते. त्याच्या भाकीतामध्ये खालील गोष्टी सांगितलेल्या असतात.

◻ सध्या एकमेकांशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या दोन मोठ्या साम्राज्यांमध्ये मोठे युद्ध होईल ज्यामुळे इतिहासाला कलाटणी मिळेल.

◻ लष्करी पूर्वयोजनेनुसार अभियांत्रिकीच्या कमालीने एका मोठ्या नदीचा प्रवाह बदलला जाईल.

◻ विजय मिळवणाऱ्‍या व्यक्‍तीचे नाव दिले आहे—त्याचा जन्म होण्याच्या कित्येक वर्षांआधीच.

◻ पराभूत झालेल्या व्यक्‍तीचे शेवटी काय होईल याचे वर्णन त्याचप्रमाणे पुढील कित्येक शतकांपर्यंतचे भाकीतही सांगण्यात येते.

ही सर्व भाकीते खरी झाली तर या व्यक्‍तीने भविष्याबद्दल सांगितलेल्या इतर गोष्टींचाही लोक विचार करणार नाहीत काय?

वर वर्णिलेल्या गोष्टी खरोखर घडल्या आहेत. मेद आणि पारस लोकांद्वारे बॅबिलोनचा पाडाव करण्याच्या सुमारे २०० वर्षांआधी यहोवाने संदेष्ट्या यशयाद्वारे पुढील गोष्टींचे भाकीत केले होते:

◻ मेद-पारस आणि बॅबिलोन यांच्यात मोठे युद्ध होईल.—यशया १३:१७, १९.

◻ लष्करी योजनेनुसार पाण्याच्या खंदकासमान संरक्षणार्थ असलेल्या नदीचे पात्र रिकामे केले जाईल. शिवाय, तटबंदी असलेल्या शहराचे दरवाजे सताड उघडे ठेवले जातील.—यशया ४४:२७–४५:२.

◻ विजय मिळवणाऱ्‍याचे नाव कोरेश असेल—त्याच्या जन्माच्या जवळजवळ १५० वर्षांआधी हे भाकीत करण्यात आले होते.—यशया ४५:१.

◻ कालांतराने, बॅबिलोन पूर्णतः उद्‌ध्वस्त होईल.—यशया १३:१७-२२.

ही सर्व भाकीते खरी ठरली. तर मग, यहोवाने आपल्या लिखित वचनामध्ये केलेल्या इतर भविष्यवाण्याचाही विचार करणे सार्थक ठरणार नाही का?

देवाने अभिवचन दिलेले उत्कृष्ट भविष्य

बायबलमध्ये काय भाकीत केले आहे? बायबलमध्ये असे अभिवचन दिले आहे की, देवाच्या नवीन जगात भविष्याविषयी कोणालाही असुरक्षितता वाटणार नाही. त्या वेळी जगणाऱ्‍या लोकांसाठी देव आश्‍वासन देतो की, “कोणी [माझ्या लोकांस] घाबरविणार नाही.”—मीखा ४:४.

बायबल असेही भाकीत करते की, देव “आपली मूठ उघडून प्राणिमात्राची इच्छा पुरी” करील. (स्तोत्र १४५:१६) हे अभिवचन पूर्ण व्हायला आणखी बराच अवकाश आहे का? मुळीच नाही! आज पृथ्वीवर आपण पाहत असलेल्या परिस्थितीविषयी बायबलमध्ये बऱ्‍याच काळाआधी भाकीत केले होते; आणि हाच पुरावा आहे की आपण सध्याच्या दुष्ट व्यवस्थेच्या ‘शेवटल्या काळात’ जगत आहोत.—२ तीमथ्य ३:१-५.

लवकरच आपला प्रेमळ निर्माणकर्ता या सर्व दुष्ट परिस्थितींचा अंत करील. युद्धे, असुरक्षिततेला कारणीभूत ठरणाऱ्‍या सर्व गोष्टी आणि दुःख, कष्ट हे सर्व तो नाहीसे करील. याशिवाय, द्वेष, स्वार्थ, गुन्हेगारी आणि हिंसा या गोष्टी नेहमीसाठी इतिहासजमा होतील. बायबल असे अभिवचन देते: “लीन जन पृथ्वीचे वतन पावतील; ते उदंड शांतिसुखाचा उपभोग घेतील.”—स्तोत्र ३७:१०, ११.

या नवीन जगात मिळणारा आणखी एक आशीर्वाद म्हणजे उत्तम आरोग्य. मृत्यू आणि त्यासोबतचे दुःखही उरणार नाही. देव स्वतः म्हणतो: “पाहा, मी सर्व गोष्टी नवीन करितो.”—प्रकटीकरण २१:४, ५.

भविष्यातल्या त्या सुखाच्या काळात मनुष्याच्या जीवनात अशा कोणत्याही आकस्मिक घटना घडणार नाहीत ज्यांमुळे आज लोकांचे जीवन क्षणात बदलते किंवा उद्‌ध्वस्त होते. अंधविश्‍वास, भीती आणि असत्य विचारधारा उत्पन्‍न करणारे दुष्टात्मे आणि सैतान देखील तेव्हा राहणार नाही. ही रोमांचकारी सत्य अभिवचने आपल्याला बायबलमध्ये आढळतात.

[८, ९ पानांवरील चित्रं]

अंधविश्‍वास आणि भूतविद्या एकाच माळेचे मणी आहेत

[चित्राचे श्रेय]

क्रिस्टल बॉलच्या आतील स्त्रीला वगळून: Les Wies/Tony Stone Images

[१० पानांवरील चित्र]

देवाच्या नवीन जगात अंधविश्‍वासांबद्दल भीती वाटणार नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा