वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g99 १०/८ पृ. ११-१४
  • विमाने सुस्थितीत कशी राहू शकतात?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विमाने सुस्थितीत कशी राहू शकतात?
  • सावध राहा!—१९९९
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • विमाने सुस्थितीत कशी ठेवतात
  • डी तपासणी
  • उड्डाणासाठी तयार
  • विमाने किती सुरक्षित आहेत?
    सावध राहा!—१९९९
  • विमान कसे तयार झाले?
    सावध राहा!—१९९९
सावध राहा!—१९९९
g99 १०/८ पृ. ११-१४

विमाने सुस्थितीत कशी राहू शकतात?

“सर्व उतरणाऱ्‍या प्रवाशांचे न्यूयॉर्क शहराच्या जॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत आहे.” उतारूंकरता ती घोषणा झाली आणि सगळेजण विमानतळाबाहेर पडू लागले की विमानाच्या अवतीभोवती कामाची घाई सुरू होते. विमानतळाबाहेर पडल्यावर विमानाचे काय होते याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

व्यापारी विमाने प्रवाशांची ने-आण करतानाच कमाई करत असतात, जमिनीवर थांबून असताना त्यांची काहीच कमाई होत नसते. म्हणून, आपल्या विमानांचा होता होईल तितका उपयोग व्हावा हे विमान कंपन्यांचे ध्येय असते. प्रवासी आपल्या सामानांची प्रतीक्षा करत असताना विमान पुढील उड्डाणासाठी लगेचच तयार केले जात असते. मागच्या वैमानिकांनी काही यांत्रिक समस्या नोंदल्या होत्या का हे पाहण्यासाठी मेकॅनिक्स नोंदवही तपासून लागलीच कामाला लागतात. विमानाच्या सुरक्षित उड्डाणावर काही परिणाम होणार असेल तर तेही दुरुस्त केले जाते.

विमानाची चाके, टायर, ब्रेक आणि इंजिनमधील ऑईलचे प्रमाण हे सर्वकाही पाहिले जाते. स्वच्छता कर्मचारी प्रवाशांचा विभाग स्वच्छ करतात. विमानातल्या स्वयंपाक घरात अन्‍नपदार्थांचा आणि पेयांचा साठा पुन्हा भरला जातो. पंखांमधील टाक्यांमध्ये इंधन भरले जाते. विमान पुढच्या प्रवासाला निघण्याआधी, वैमानिक बाहेरून विमानाची पाहणी करून सुरक्षिततेला काही धोका तर नाही ना हे पाहतात.

दर दिवशी हजारो विमानांना ही तातडीची सेवा दिली जाते आणि त्यांची काही नादुरुस्ती असेल तर ती तपासली जाते. पण, मोठ्या प्रवासी विमानाच्या सुरक्षित उड्डाणासाठी त्या विमानाला सुस्थितीत ठेवण्यासाठी एवढेच पुरेसे नाही. मोटारगाड्यांना वेळोवेळी सर्व्हिसिंग करावी लागते त्याचप्रमाणे विमानांनाही नियमितपणे फार मोठ्या आणि खर्चीक मेंटेनन्सच्या तपासण्या कराव्या लागतात. विमानांचे हे मेंटेनन्स कोण पाहते? ते कसे केले जाते?

विमाने सुस्थितीत कशी ठेवतात

अमेरिका हवाई वाहन संघटनेनुसार, संयुक्‍त संस्थानांत त्यांची विमाने ९५ टक्के वायुवाहन—प्रवाशांची आणि मालाची वाहतूक करतात. १९९७ साली, त्या विमान कंपन्यांकडे ६५,५०० विमान मेकॅनिक होते. अभियांत्रिक आणि इतर मेंटेनन्सच्या कर्मचाऱ्‍यांसोबत विमानाच्या मेकॅनिक्सचे काम विमान सुस्थितीत ठेवणे आणि प्रवाशांचा प्रवास आरामात होईल याची खात्री करणे हे असते. याचा अर्थ, विमानाच्या उड्डाणासाठी आवश्‍यक असलेल्या विमानातल्या खास भागांची म्हणजेच यंत्रांची तपासणी, दुरुस्ती आणि नवीन भाग बसवण्याचे काम त्यांना करावे लागते.a वेळोवेळी केल्या जाणाऱ्‍या या मेंटेनन्समध्ये चार टनांहून जास्त वजनाची जेट इंजिने काढण्यापासून ते केबिनमधले जीर्ण झालेले गालिचे बदलण्यापर्यंत सर्वकाही येते.

पुष्कळशा यांत्रिक समस्यांकडे तत्काळ लक्ष दिले जाते. तथापि, विमान किती महिन्यांपासून वापरले जात आहे आणि विमानाने किती फेऱ्‍याb मारल्या आहेत आणि प्रत्येक विमान एकूण किती मैल नव्हे तर किती तास उडाले आहे त्याच्या आधारे विमान मेंटेनन्स कार्यक्रमात मेंटेनन्सची इतर कामे ठरवली जातात. विमान उत्पादकांनी विमान चालकांना दिलेल्या मेंटेनन्सच्या सूचनांनुसार हे काम सुरू होते; या मेंटेनन्सची पद्धत सरकारी वैमानिकी अधिकाऱ्‍यांकडून मान्यताप्राप्त असावी लागते. प्रत्येक विमानासाठी खास बनवलेला मेंटेनन्स प्रोग्रॅम असतो; त्यात बारीकसारीक, मोठ्या आणि पूर्ण अशा स्वरूपाच्या तपासण्या असतात. या तपासण्यांना ए, बी, सी, डी, एल, किंवा क्यू अशी नावे दिलेली असतात.

एका ७४७-२०० विमानाला ३६,००० उड्डाणाचे तास जमा करायला सुमारे आठ वर्षे लागली. ती पूर्ण झाल्यावर विमानाला पूर्ण तपासणीसाठी विमानघरात नेण्याची वेळ आली होती; या पूर्ण तपासणीला काहीवेळा डी तपासणी म्हणतात. या कठीण आणि वेळखाऊ तपासणीविषयी ओव्हरहॉल ॲण्ड मेंटेनन्स ही वैमानिकी व्यवस्थापन पत्रिका अशी म्हणते: “संपूर्ण विमानाची स्थिती होता होईल तितकी पूर्ववत करणे हा या तपासणीचा उद्देश असतो. . . . डी तपासणीसाठी कर्मचाऱ्‍यांना एकूण १५,००० ते ३५,००० तास द्यावे लागतात आणि त्यामुळे १५ ते ३० किंवा त्याहून अधिक दिवसांकरता विमान वापरता येऊ शकत नाही. त्याचा एकूण खर्च ४ ते ८ कोटी रुपये इतका होऊ शकतो.” “डी तपासणीला ७० टक्के मजुरी आणि ३० टक्के सामान लागते,” असे द केनन ग्रुप या विमान व्यवस्थापन सल्ला कंपनीचे हॅल क्रिसमन म्हणाले. अर्थात, यातला थोडा खर्च तुमच्या तिकिटाच्या भाड्यातून वसूल केला जातो.

डी तपासणी

विमानघरात विमान नेल्यानंतर मेंटेनन्सचे लोक कामाला लागतात; विमानघर एक मोठी इमारत असते ज्यामध्ये विमानाची सर्व्हिसिंग करण्याचे विभाग, सामानसुमान उपलब्ध करून देणारे विभाग आणि सामान ठेवण्याची जागा असते. विमानातील आवाक्याबाहेरच्या भागांना पोचण्याकरता चाके असलेले अवजारांचे टेबल, प्लॅटफॉर्म, परांची हे सगळे लावले जाते. बारीक तपासणी करण्यासाठी आसने, जमीन, भिंती, केबिनचा वरचा भाग, स्वयंपाकघर, शौचालये आणि इतर सर्व साहित्य एकतर उघडले जाते किंवा काढले जाते. दुसऱ्‍या शब्दांत, विमान चक्क रिकामे केले जाते. त्यानंतर, कर्मचारी एक एक सूचना पाळून धातुपत्रा कोठे चिरला किंवा झिजला आहे का हे तपासून पाहतात. यात, अवतरण यंत्रणा, द्राविक यंत्रणा आणि इंजिन पूर्णच्या पूर्ण बदलले जाऊ शकतात. डी तपासणीसाठी कुशल अभियांत्रिक, तांत्रिक लेखक, गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, एव्हियॉनिक्स टेक्निशियन,c धातुपत्रा कामगार आणि विमानाच्या सांगाड्याचे आणि इंजिनचे यांत्रिकd हवे असतात; यांच्यापैकी बहुतेक जणांकडे सरकारमान्य परवाना असतो. यांच्यामध्ये केबिनमधील सामग्रींचे यांत्रिक, पेंटर आणि स्वच्छता कामगारांचा समावेश केला, तर मेंटेनन्स कर्मचाऱ्‍यांची संख्या दर दिवशी १०० हून अधिक होते. इतर पुष्कळ लोक आवश्‍यक साहित्य पुरवणे, भाग पुरवणे आणि कामातले बारीकसारीक तपशील पाहणे अशी कामे करतात.

काही काळानंतर, उड्डाणात होणाऱ्‍या कंपनांमुळे, विमानाची खोली विशिष्ट वायुदाबाची ठेवल्यामुळे आणि हजारो वेळा झेप घेताना आणि उतरवताना बसलेल्या धक्क्यांमुळे विमानाच्या धातूने बनलेल्या शरीराला चिरा पडू शकतात. या समस्या शोधून काढण्यासाठी वैद्यकशास्त्रात ज्या पद्धती उपयोगात आणल्या जातात त्याच पद्धतीची तत्त्वे विमानचालनातही उपयोगात आणली जातात. दोन्ही शास्त्रांमध्ये मानवी डोळ्यांना दिसणार नाहीत त्या बारीक गोष्टी पाहण्यासाठी क्ष-किरण, अल्ट्रासोनिक्स आणि एन्डोस्कोपीसारखी उपकरणे वापरली जातात.

वैद्यकशास्त्रातील नेहमीच्या एक्सरेसाठी रुग्णाला फिल्म आणि एक्सरे किरणाच्या मध्यंतरी ठेवले जाते. अवतरण यंत्रणा, पंख आणि इंजिनांचा एक्सरे काढण्यासाठी मेंटेनन्स निरीक्षक अशाच पद्धतींचा वापर करतात. उदाहरणार्थ, इंजिनच्या बाहेरील भागावर विशिष्ट ठिकाणी एक एक्सरे फिल्म ठेवली जाते. त्यानंतर, एक ट्यूब इंजिनच्या आतल्या पोकळ नळीत घातली जाते. मग, एक्सरे फिल्मवर किरणे पाडण्यासाठी खोड रबरच्या आकाराची किरणोत्सर्गी इरिडियम १९२ गोळी—एक शक्‍तिशाली समसंयुग—त्या ट्यूबमध्ये घातली जाते. डेव्हेलप झालेल्या फिल्मवरून इंजिनला चिरा पडल्या आहेत की दुसरे दोष आहेत ते दिसून येते ज्यामुळे दुरुस्ती करावी लागते किंवा इंजिन बदलावे लागते.

डी तपासणी करताना, विमानाच्या इंधनाचे आणि हायड्रॉलिक द्रव्यांचे नमुने चाचणीसाठी पाठवले जातात. त्याच्या इंधनाच्या नमुन्यात सूक्ष्मजंतू आढळल्यास प्रतिजैव औषध दिले जाते. जेट इंधनामधील सूक्ष्मजंतू—हवा, पाणी आणि इंधनाच्या द्वारे इंधन टाकीत प्रवेश करणारे कवक आणि सूक्ष्मजंतू नष्ट करण्यासाठी टाक्यांमध्ये बायोसाईड हे एक प्रकारचे प्रतिजैव औषध टाकले जाते. ही उपचारपद्धत महत्त्वाची आहे कारण सूक्ष्मजंतूंच्या वाढीमुळे तयार होणाऱ्‍या उपपदार्थांमुळे टाक्यांच्या पृष्ठभागावरचे सुरक्षित कोटिंग नष्ट होऊ शकते. इंधन टाक्यांमधील इंधनाची माहिती देणाऱ्‍या सळ्यांवर देखील परिणाम होऊ शकतो आणि वैमानिकांना इंधन मापकातून चुकीची माहिती मिळू शकते.

जीर्ण झाल्यामुळे, कंपनांमुळे आणि आतले सील खराब झाल्यामुळे इंधन टाक्या गळू शकतात. डी-तपासणीसाठी जमलेल्या कर्मचाऱ्‍यांना सुपरव्हायजर विचारतो, “आज सूर मारायला कोण जाणार?” हे नको वाटणारे परंतु आवश्‍यक काम जॉनवर पडते. तो अगदी डायव्हरसारखा दिसत असतो फक्‍त त्याने विशिष्ट चपटे लांबुळके बूट घातलेले नसतात; तो अंगात कॉटनचा खास पोषाख चढवतो, प्राणवायूच्या पुरवठ्याला जोडलेला वायुमुखवटा घालतो आणि आपल्यासोबत अवजार, छिद्र लिंपण्याचा पदार्थ आणि सुरक्षा दिवा घेतो. मग पंखाच्या खालच्या बाजूला असलेल्या एका लहानशा जागेतून तो रिकाम्या केलेल्या टाकीत घुसतो; इंधन टाकी कोठे गळत आहे ते शोधून काढतो आणि ते बंद करतो.

एका ७४७ विमानाच्या पंखांमध्ये असलेल्या इंधन टाक्या म्हणजे लहान लहान नागमोडी कप्पे असतात; त्या प्रत्येक भागाला जोडणारे एक लहानसे दार असते. बंद जागांची किंवा कोंदटलेल्या ठिकाणांची भीती असलेल्यांनी या इंधन टाक्यांमध्ये चुकूनही जाऊ नये. ७४७-४०० विमानाच्या टाकीत २,१०,००० लिटर इंधन मावते. इतके इंधन साठवण्याची क्षमता असल्यामुळे दूरदूरचे प्रवासही न थांबता केले जाऊ शकतात, जसे की, संयुक्‍त संस्थानांतील कॅलिफोर्निया येथील सॅन फ्रॅन्सिस्कोपासून ते ऑस्ट्रेलियातील सिडनीपर्यंतचे १२,००० किलोमीटरचे अंतरही पार करता येते.

जमिनीहून तीन माळ्यांच्या उंचीवर असलेल्या विमानाच्या समोरच्या कक्षेत, टीव्हीसारख्या हवामान रडार दर्शकाच्या पडद्यावर एक एव्हियॉनिक्स टेक्निशियन चाचणी करून पाहतो. या उपकरणाच्या साहाय्याने वैमानिक ५०० किलोमीटर अंतरावर होणारे वादळ किंवा वातावरणातील क्षुब्धता जाणून घेऊ शकतात आणि ते टाळू शकतात. त्यामुळे, वैमानिक “सीट बेल्ट लावा” ही खूण देतो तेव्हा त्याने कदाचित आपल्या रडारच्या पडद्यावर वातावरणातील क्षुब्धता पाहिली असेल. तथापि, कप्तानाने ती खूण बंद केली तरी दुखापत टाळण्यासाठी प्रवाशांनी बसलेले असताना नेहमी सीट बेल्ट लावून ठेवावा अशी विनंती पुष्कळशा विमानांमध्ये केली जाते. मोकळ्या आकाशामध्ये हवामानातले वादळी बदल होतात तेव्हा सहसा वैमानिकांना सीट बेल्ट लावण्याची सूचना द्यायला वेळ मिळत नाही.

डी तपासणीच्या वेळी लाईफ जॅकेट आणि तातडीचे दिवे यांसारखी सुरक्षा उपकरणे तपासली जातात किंवा बदलली जातात. प्रवाशांसाठी असलेल्या तातडीच्या ऑक्सीजन व्यवस्थेची तपासणी केली जात असताना, ऑक्सीजन मास्क (मुखवटे) झाडावर लोंबकळणाऱ्‍या संतऱ्‍यांसारखेच दिसतात. जेट विमाने पृथ्वीपासून ६-११ किलोमीटर उंचीवरून सहसा जातात; या ठिकाणी ऑक्सीजनचे प्रमाण आणि वातावरणीय दाब फार कमी असतो. ही समस्या कशी सोडवली जाते? विशिष्ट वायुदाब ठेवण्याची विमानातील व्यवस्था, बाहेरील वायू शोषते आणि संकोचित करते. ही हवा मग योग्य तापमानात केबिनमध्ये सोडली जाते. केबिनमधला वायुदाब सुरक्षित प्रमाणांपेक्षा कमी होतो तेव्हा डोक्यावरील कप्प्यातून ऑक्सीजनचे मास्क आपोआप खाली पडतात. तातडीच्या ऑक्सीजन पुरवठ्याची गरज भासत नाही अशा ठिकाणी विमान येईस्तोवर प्रवाशांना हा तातडीचा ऑक्सीजन पुरवठा दिला जातो. काही विमानांमध्ये डोक्यावरील कप्प्यांमध्ये नव्हे तर आसनांमागील कप्प्यांमध्ये हे ऑक्सीजन मास्क असतात. म्हणून, उड्डाणाआधी प्रवाशांकरता असलेल्या सूचनांकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते; त्यामध्ये, ऑक्सीजन मास्क कोठे असतात याची माहिती दिली जाते.

पूर्ण मेंटेनन्स तपासणीच्या वेळी, केबिनमध्ये नवीन भिंती, छत त्याचप्रमाणे गालिचे, पडदे आणि आसनांच्या गादीचे कव्हरही बदलले जातात. स्वयंपाकघरातली सर्व उपकरणे वेगवेगळी करून, स्वच्छ व निर्जंतुक केली जातात.

उड्डाणासाठी तयार

एकूण ५६ दिवस तपासणी, चाचणी, दुरुस्ती आणि मेंटेनन्स केल्यावर, विमान आता विमानघरातून बाहेर पडून प्रवाशांची आणि मालाची ने-आण सुरू करण्यास तयार असते. या लेखात फक्‍त काही मोजक्याच मेंटेनन्स कामांबद्दल सांगण्यात आले आहे. पण उड्डाण करण्याआधी, विमानातील सर्व यंत्रणा नीट चालते की नाही हे पाहण्यासाठी एक खास कर्मचारी वर्ग कदाचित विमानाची चाचणी घेईल. तुम्ही ज्या विमानातून प्रवास करता ते विमान यांत्रिकरित्या सुस्थितीत ठेवण्याकरता केवढे कौशल्य आणि तंत्रज्ञान वापरले जाते याचा थोडक्यात विचार केल्यावर आपण अगदी निश्‍चिंत होऊन प्रवास करू शकतो.

पंरतु, विमानांना सुस्थितीत ठेवण्यासाठी सर्वात उत्तम उपकरण आहे मानवाची बारीक नजर आणि दक्ष मन. प्रशिक्षित कर्मचारी आपल्या कामात हलगर्जीपणा मुळीच करत नाहीत. त्यांना ठाऊक असते की, हलगर्जीपणा केला की मोठमोठ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. विश्‍वसनीय विमानातून तुम्हाला सुरक्षितपणे आणि आरामात तुमच्या ठरलेल्या स्थानापर्यंत पोचवावे हे त्यांचे ध्येय आहे.—अमेरिकेच्या एका वैमानिकी सुरक्षा निरीक्षकाच्या सौजन्याने.

[तळटीपा]

a एका ७४७-४०० विमानात ६० लाख वेगवेगळे भाग असतात, त्यातील निम्मे भाग हे जोडणारे भाग (खिळे आणि बोल्ट) असतात आणि २७५ किलोमीटरची इलेक्ट्रिकल वायरिंग असते.

b एक फेरी म्हणजे एक टेकऑफ (उड्डाण) आणि एक लँडिंग (उतरवणे)

c “एव्हियॉनिक्स” हे एव्हिएशन इलेक्ट्रॉनिक्सचे संक्षिप्तरूप आहे.

d पावर प्लांट आणि एअरफ्रेम सर्टिफिकेटच्या आधारे मेकॅनिकने विमानावर मेकॅनिक आपली पात्रता सिद्ध करू शकतो आणि आपल्या प्रशिक्षणानुसार—जसे की, पावर प्लांटचे (विमानाचे इंजिन), विमानाच्या सांगाड्याचे किंवा विमानाच्या यंत्रणेच्या प्रशिक्षणानुसार विमानाच्या विशिष्ट भागांचे काम करण्यासाठी नोकरीला लागू शकतो.

[१२ पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of Pan Am Historical Foundation

Archives and Special Collections, University of Miami Library

[१३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Courtesy of United Airlines

Courtesy of United Airlines

Courtesy of United Airlines

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा