आमच्या वाचकांचे मनोगत
क्षयरोग “क्षयरोग—प्राणघातक्याचे पुनरागमन” ही लेखमालिका मला अतिशय आवडली. (जानेवारी ८, १९९८) १९८८ साली मला टीबी झाला होता आणि त्यातून मी कसाबसा सावरलो. रुग्णांनी “अगदी न चुकता” सांगितलेली औषधे घ्यावीत असं जे तुम्ही म्हणालात ते शंभर टक्के बरोबर आहे.
वाय. एल., फ्रान्स
माझी सासू इतकी काही धार्मिक वृत्तीची नाही, पण माझ्या टेबलावर ठेवलेला हा लेख तिनं पहिला आणि वाचूनही काढला. तो अंक घरी घेऊन जाण्याविषयी तिनं मला विचारलं त्यावर मी तिला सावध राहा! मासिकाचे आणखीन दोन अंक दिले. हरएक मासिक तयार करण्यासाठी तुम्ही जे कष्ट घेता त्यासाठी आम्ही तुमचे आभारी आहोत.
एल. एन., संयुक्त संस्थाने
अकरा वर्षांपूर्वी मला टीबी झाला होता. मासिकात दिलेली माहिती शंभर टक्के खरी होती. वाचताना कधी कधी वाटायचं की आपलाच अनुभव लिहिलाय की काय? मला जीवदान दिल्याबद्दल तसेच तब्येतीची काळजी घेण्यासाठी सावध राहा! नियतकालिकात नियमितपणे सल्ला दिल्याबद्दल मी यहोवाची आभारी आहे.
जी. बी., इटली
मला देखील हाच आजार झाला होता आणि तब्बल सहा महिने मी गोळ्याऔषधे घेत होतो. या प्राणघातक आजाराबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी तुमच्या लेखाने माझी मदत केली आहे. त्याहून महत्त्वाचं म्हणजे, या आजारावर एकमेव उपाय असणाऱ्या देवाच्या राज्यावरील माझा विश्वास आणखीन बळकट करण्यास या लेखानं माझी मदत केली आहे.
पी. पी., इंडोनेशिया
देवाचे भय बाळगणे “बायबलचा दृष्टिकोन: एका प्रेमळ देवाचे भय तुम्ही कसे बाळगू शकता?” हा लेख वाचून मला किती आनंद झाला हे तुम्हाला सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. (फेब्रुवारी ८, १९९८) काही काळापासून मी नेमक्या याच प्रश्नाचा विचार करत होते. देवाचे भय बाळगणे म्हणजे त्याला नाखूष करण्याची सदृढ भीती बाळगणे हे मला माहीत होते. पण तरीसुद्धा अधिक खोलवर जाऊन हा विषय जाणून घेण्याची मला गरज भासली. म्हणून मग मी तो लेख वाचला. शेवटी, देवाचे भय बाळगणे म्हणजे नेमके काय याविषयी एक समाधानकारक उत्तर मला सापडलं!
एम. जे. टी., संयुक्त संस्थाने
मुलांचे घराबाहेर पडणे “मुले घराबाहेर पडतात तेव्हा” या श्रृंखलेसाठी मी मनस्वी आभारी आहे. (फेब्रुवारी ८, १९९८) पोटच्या मुलांना स्वतंत्र करू देताना माझा जीव खूप तुटला शिवाय यातून बाहेर पडण्यासाठी वेळही लागला. पण तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर आहे, की जसजसा काळ लोटतो आणि जसजशी समज मिळत जाते तसतसं रिकाम्या घरट्यात एकटं राहणं सुसह्य होऊन जातं. आम्हा पालकांना एकमेकांच्या अधिक जवळ येण्याची संधी लाभते.
ए. ई., कॅनडा
ते लेख तर जणू माझ्या प्रार्थनांचंच उत्तर होतं असं म्हणावं लागेल. मुले घराबाहेर पडतात तेव्हा मनात कटूता आणि कलह उत्पन्न होऊ शकतो. परंतु, या लेखात दिलेला उत्तम सल्ला अनुसरल्याने शांती आणि प्रेम लाभू शकते.
पी. एन., फ्रान्स
मला असं वाटलं जणू हे लेख खास माझ्यासाठीच लिहिले गेले होते. अलीकडेच, पूर्ण-वेळेच्या सुवार्तिकांची गरज असलेल्या क्षेत्रांत कार्य करण्यासाठी मी घर सोडलं. पालकांच्या भावना समजण्यासाठी, तसेच त्यांना एकटं सोडून आल्याच्या अपराधी भावनांवर मात करण्यासाठी या लेखांनी माझी मदत केली आहे. याशिवाय, “मोठ्या मुलांसाठी एक सल्ला—स्वतंत्र करू देण्यासाठी पालकांची मदत करा” या सदरात दिलेला सल्ला मी अनुसरेल. पालकांपासून दूर असूनही त्यांच्या अगदी समीप असल्यासारखं मला वाटू शकेल. नेहमी अगदी नेमक्या वेळी येणाऱ्या अशा लेखांसाठी मी तुमची आभारी आहे.
जी. यू., इटली