आमच्या वाचकांचे मनोगत
बोलणारे ढोल “आफ्रिकन ढोल खरंच बोलतात?” (ऑगस्ट ८, १९९७) हा उत्कृष्ट लेख वाचल्यानंतर याची सत्यता आजमावण्यासाठी शंभर वर्षांच्या माझ्या आजोबांना मी याविषयी विचारलं. प्रत्येक बारकाव्यानिशी त्यांनी त्याची सत्यता मला पटवून दिली तेव्हा मी खरंच प्रभावित झालो!
जी. एम. ओ., नायजेरिया
इंटरनेट मी सध्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंग करत आहे आणि, “इंटरनेट—तुमच्यासाठी आहे का?” या श्रृंखलेबद्दल मी तुमची प्रशंसा करू इच्छितो. (ऑगस्ट ८, १९९७) लेख संक्षिप्त, माहितीवर्धक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अगदी चोख होते. सध्या इंटरनेटसंबंधी असलेला निरर्थक कलुषितपणा आणि भय यांना तुम्ही स्वीकृतीची पावती दिली नाही. पण, त्याचवेळी त्यातील खरे धोके देखील तुम्ही पडद्याआड ठेवले नाहीत.
एल. ई., इटली
मी कॉम्प्युटरचे वर्ग चालवतो आणि सदर विषयाच्या अद्ययावत माहितीसाठी मी नेहमीच कॉम्प्युटरविषयक नियतकालिकं विकत घेत असतो. दुसऱ्या कुठल्याही नियतकालिकानं इंटरनेटविषयीची साधकबाधक वस्तुस्थिती इतकी परखडपणे चर्चिली नाही.
ए. ए. एस., ब्राझील
अलीकडे इंटरनेटविषयी मी बरंच काही ऐकून होते, पण ते नेमकं काय आहे हे मला उमगत नव्हतं. तुमच्या लेखमालेनं सदर विषय अगदी सोप्या आणि सहज समजण्याजोग्या भाषेत मांडला आहे.
ए. एच., भारत
सदर विषय तुम्ही अशा प्रकारे लिहिला आहे, की विश्वव्यापी वेबचं कमी अथवा काहीएक ज्ञान नसलेले वाचकही ते सहजासहजी समजू शकत होते. या सेवेचा उपयोग करण्यातील खर्चाचा अंदाज बांधण्यासही तुम्ही आमची मदत केली.
ई. के., इथियोपिया
दोषी ठरविले जाणे मी १५ वर्षांचा आहे आणि “तरुण लोक विचारतात . . . नेहमी मलाच का दोषी ठरवलं जातं?” (ऑगस्ट ८, १९९७) हा लेख वाचून मी अक्षरशः रडलो. मी कुटुंबातलं शेंडंफळ असल्यामुळे प्रत्येक वेळी जो तो मलाच हिडिसफिडीस करतो. या विषयावर लिहिल्याबद्दल आभारी आहे.
एन. एच., संयुक्त संस्थाने
बहरणारी मुले “तुमच्या मुलांना बहरू द्या” (सप्टेंबर ८, १९९७) या उत्कृष्ट श्रृंखलेसाठी मी तुमचे आभार मानू इच्छिते. मला ती फारच उपयुक्त आणि उत्तेजनात्मक असल्याची आढळली. मला साडेतीन वर्षांचा एक मुलगा आहे आणि या लेखानं मला त्याचा दृष्टिकोन समजून घेण्यास आणि मी त्याला लावत असलेली शिस्त सुधारण्यास मदत केली. या लेखमालेसाठी मी यहोवाची मनस्वी आभारी आहे.
पी. एस., इटली
“टोचणारे शब्द, घायाळ मनं” हा लेख वाचून मी हेलावून गेले. आयुष्यभर मी स्वतःलाच भयंकर दोष देत आले. दोष देण्याऐवजी नितान्त दुःख सहन केलेल्यांना तुम्ही प्रेमळपणे मदत करण्याचा प्रयत्न करता याचा मला आनंद होतो. यहोवा सतत तुम्हाला आशीर्वादित करो आणि अतिशय लाभदायक आणि सांत्वनदायक लेख लिहिण्यास तो तुमचे मार्गदर्शन करत राहो.
एल. डी., कॅनडा
आपल्यासारख्या कित्येकांनी सोसलेल्या आंतरिक वादळाचे मूळ कारण समजून घेण्यासाठी इतरांना या लेखाची मदत होईल, त्यांचे डोळे उघडतील अशी आशा वाटते. हा विषय हाताळल्याबद्दल तुमचे आभारी आहे.
एल. बी., संयुक्त संस्थाने
मी एका नर्सरी शाळेत शिक्षिका असल्यामुळे एका उत्तम मार्गानं माझं कार्य साध्य करण्यासाठी अशा प्रकारचे लेख माझी मदत करतात. आम्हाला अद्ययावत माहिती दिल्याबद्दल आणि सुधारण्यास मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी.
जी. आर., मेक्सिको
या लेखांमुळे मला थोडीफार आशा लाभली. मी एका उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबातली असल्यामुळे यहोवाची सेवा करण्यास आणि माझ्या चिमुकल्या मुलीचं संगोपन करण्यास मी लायक नाही असंच मला सतत वाटत असतं. सदर लेखात दिलेल्या सूचना लागू करण्यास माझ्या परीने होता होईल तितका प्रयत्न मी करीन. काळजी व्यक्त केल्याबद्दल आभारी आहे.
ए. ए., संयुक्त संस्थाने