जीवनात आशा आणि प्रेम उरत नाही तेव्हा
एका १७ वर्षांच्या कॅनडियन मुलीने तिला का मरावेसे वाटते त्याची कारणे लिहिली. त्यातली काही कारणे अशी होती: ‘मला एकटेपणा जाणवतो, भविष्याची भीती वाटते; माझ्या नोकरीच्या ठिकाणी इतरांशी तुलना करताना मला कमीपणा वाटतो; आण्विक युद्ध, ओझोन थर; मी सुंदर नाही म्हणून माझ्याशी कुणीच लग्न करणार नाही, मग मी एकटीच राहीन; जगण्यात अर्थ नाही मग जगावं तरी कशाला; दुसऱ्यांवरचं ओझं तरी कमी होईल; दुसऱ्यांचा मला कधीच त्रास होणार नाही.’
तरुण लोक स्वतःला ठार मारत आहेत याची ही कारणे असू शकतात का? कॅनडात, “मोटारींच्या अपघातानंतर तरुणांमधील मृत्यूचे सर्वसामान्य कारण आत्महत्या आहे.”—द ग्लोब ॲण्ड मेल.
दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या फ्लिन्डर्झ विद्यापीठाचे प्राध्यापक रियाझ हसन, “अधुरी आयुष्ये: तरुणांच्या आत्महत्येचे वाढते प्रमाण” या आपल्या लेखात म्हणतात: “अनेक सामाजिक कारणे याला जबाबदार ठरली आहेत त्याचप्रमाणे यांमुळे किशोरांच्या आत्महत्येचे प्रमाण बरेच वाढले आहे असेही दिसते. ती कारणे आहेत: युवकांच्या बेकारीचे वाढते प्रमाण, ऑस्ट्रेलियन कुटुंब व्यवस्थेतील बदल, अधिकाधिक मादक औषधांचा उपयोग-दुरुपयोग, तरुणांमधील हिंसेचे वाढते प्रमाण, मानसिक आरोग्य आणि ‘स्वाभाविक स्वातंत्र्याऐवजी’ अधिकाधिक तरुणांना स्वैराचार हवा असणे.” त्या लेखात पुढे म्हटले आहे की, अनेक सर्वेक्षणांनुसार भविष्याविषयी निराशा दिसून आली आहे तसेच “पुष्कळ युवकांना स्वतःच्या त्याचप्रमाणे जगाच्या भविष्याविषयी अत्यंत भीती वाटते. आण्विक युद्धाने उद्ध्वस्त झालेले, प्रदूषणग्रस्त जग, नाश होण्याच्या मार्गावर असलेले वातावरण; तंत्रज्ञानावर ताबा नसलेला, बेकारीने व्यापलेला असा माणुसकीला पोरका झालेला समाज त्यांना दिसतो.”
एका पाहणीनुसार, १६ ते २४ वर्षांच्या वयोगटातल्या तरुणांमध्ये, श्रीमंत व गरीब यांच्यातली वाढती विषमता, एकट्या पालकीय कुटुंबांमधील वाढ, वाढती बंदूक संस्कृती, बालकांवरील अत्याचार आणि “उद्यावर भरवसा नसणे” ही आत्महत्येची अतिरिक्त कारणे आहेत.
न्यूजवीक असा अहवाल देते की, संयुक्त संस्थानांत, “बंदुका जवळ बाळगणे हे [किशोरवयीनांच्या आत्महत्येमागचे] महत्त्वपूर्ण कारण असावे. कोणतीच मानसिक विकृती नसतानाही आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या किशोरांची तुलना आत्महत्या न केलेल्या किशोरवयीनांसोबत केल्यावर एकच फरक दिसून आला: घरात भरलेली बंदूक होती. एवढे असतानाही लोकांचे म्हणणे असे की, बंदुका फक्त जवळ बाळगल्याने काही लोक मरत नसतात.” त्यातल्या त्यात, लाखो लोकांच्या घरांमध्ये भरलेल्या बंदुका असतात!
एकीकडे मनातली भीती तर दुसरीकडे पर्वा न करणारा समाज यांमुळे दुर्बल मनाच्या तरुणांसमोर आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. विचार करा: १२ ते १९ वर्षांच्या तरुणांवर होणाऱ्या हिंसक गुन्ह्यांचे प्रमाण, सर्वसामान्य लोकांवर एकंदरीत होणाऱ्या गुन्ह्यांच्या दुप्पटीपेक्षाही अधिक आहे. अभ्यासांनुसार, “१४ ते २४ वर्षांच्या तरुणींवर हल्ला होण्याची सर्वात अधिक शक्यता असते,” असे वृत्त मॅक्लिन्स पत्रिकेने दिले. “सहसा जवळची माणसंच स्त्रियांवर हल्ला करतात व त्यांचा खून करतात.” परिणाम? अशाप्रकारच्या व इतर भीतींमुळे, “या मुलींच्या विश्वासाला तडा जातो आणि त्यांना सुरक्षितताही जाणवत नाही.” एका अभ्यासानुसार, बलात्कार झालेल्या एक तृतीयांश मुलींनी आत्महत्या करण्याचा विचार केला होता.
न्यूझीलंडचा एक अहवाल तरुणांच्या आत्महत्येचे दुसरे एक कारण देत म्हणतो: “पैसा, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि सत्ता असली तर यश मिळते असे सांगणाऱ्या आजच्या भौतिकवादी, जगीक मूल्यांमुळे आपली कोणाला गरज नाही आणि समाजाने आपल्याला वाळीत टाकले असे अनेक तरुणांना वाटते.” द फ्यूचरिस्ट असे म्हणते: “[तरुणांना] आपली तत्काळ इच्छापूर्ती हवी असते; त्यांना सर्वकाही हवे असते तेही झटक्यात. त्यांचे टीव्हीवरचे आवडते कार्यक्रम म्हणजे सोप ओपेरा. आपल्या आजूबाजूला असेच रूपवान, नवनवीन फॅशनचे कपडे घातलेले, जास्त कष्ट न करता पुष्कळ पैसा-प्रतिष्ठा मिळवलेले लोक असावेत असे त्यांना वाटते.” या अवास्तविक, पूर्ण करता न येणाऱ्या अपेक्षा इतक्या वाढतात की, निराशा होते आणि त्यांना आत्महत्या करायला उद्युक्त करते.
जीव-वाचवणारा गुण?
शेकस्पीयरने लिहिले: “प्रेमाचे सांत्वन म्हणजे जणू पावसानंतर पडलेले कोवळे ऊन.” बायबल म्हणते: “प्रीती कधी अंतर देत नाही.” (१ करिंथकर १३:८) त्या गुणावरून तरुण लोक आत्महत्या करायला प्रवृत्त का होतात हे कळते—त्यांना प्रेम आणि दळणवळण हवे असते. दि अमेरिकन मेडिकल असोसिएशन एन्सायक्लोपिडिया ऑफ मेडिसिन म्हणते: “आत्महत्या करावीशी वाटणाऱ्या लोकांना सहसा कमालीचा एकटेपणा जाणवत असतो; म्हणून समजून घेणाऱ्या कोणा एका व्यक्तीने त्यांचे फक्त सहानुभूतीने ऐकले तरी त्यांचे निराशेपोटी घडणारे हे दुर्दैवी कृत्य टाळण्यासारखे असते.”
आपल्याला भरभरून प्रेम करावे आणि आपुलकी दाखवावी असे तरुणांना सहसा वाटत असते. परंतु कोणी कोणाची पर्वा न करणाऱ्या आणि लोकांचे वाईटच चिंतणाऱ्या या जगात—सहसा बोलायचा मोकाच न मिळणाऱ्या या जगात—त्यांना प्रेम आणि आपुलकी मिळत नाही तेव्हा एकेक दिवसाचे जगणे कठीण होऊन बसते. शिवाय, पतिपत्नीत वितुष्ट निर्माण होऊन त्यांनी घटस्फोट घेतल्यावर पालकांनी आपल्याला झिडकारले असे वाटल्यामुळेही किशोरवयीन आत्महत्या करतात. असे हे झिडकारणे अनेक प्रकारे व्यक्त केले जाते.
घरी आपल्या मुलांसोबत सहसा न राहणाऱ्या पालकांचेच उदाहरण घ्या. आईवडील कोणत्यातरी कामात अगदी व्यस्त असतील किंवा असा काही विरंगुळा करण्यात गुंग असतील ज्यात मुलांचा सहभाग नसतो. त्यातून मुलांना अप्रत्यक्षपणे जे सुचवले जाते ते इतके काही अस्पष्ट नसते. सुप्रसिद्ध पत्रकार आणि संशोधक ह्यू मके निरीक्षण करतात की, “आईवडील जरा अधिकच स्वयंकेंद्रित होत आहेत. स्वतःच्या जीवनशैलीनुसार चालताना ते स्वतःचाच विचार आधी करत असतात. . . . कटू शब्दांत सांगायचे तर, आजकालच्या काळात मुले अडगळ बनली आहेत. . . . जीवन इतके खडतर आहे की लोकांना स्वतःसाठीच वेळ पुरत नाही.”
शिवाय काही संस्कृतींमध्ये, मर्दुमकीसाठी प्रसिद्ध असलेल्या पुरुषांना मुले सांभाळत बसायला आवडणार नाही. पत्रकार केट लेग अगदी सुंदर शब्दांमध्ये याचे वर्णन करते: “जनसेवा करायची इच्छा असलेल्या पुरुषांना मुले सांभाळत बसण्याऐवजी जीव वाचवण्याचे काम करायला किंवा अग्निशामक दलात भरती व्हायला अधिक आवडते . . . कोणाची काळजी घ्या, कोणाचा सांभाळ करा असल्या कामांऐवजी त्यांना नैसर्गिक आपत्तींना तोंड देण्यासारखी आव्हानात्मक, साहसी कामे करायला आवडतात.” आणि पालक असणे म्हणजे काळजी, सांभाळ हे आलेच. आईवडिलांची जबाबदारी उत्तमप्रकारे पार न पाडणे म्हणजे मुलाला झिडकारण्यासारखेच आहे. परिणामी, तुमच्या मुलात अथवा मुलीत न्यूनगंड निर्माण होईल आणि त्यांना समाजाशी नीट दळणवळण राखता येणार नाही. दि एज्यूकेशन डायजेस्ट म्हणते: “मुलांना स्वतःबद्दल चांगले मत नसले, तर ते स्वतःच्या हिताचे निर्णय घ्यायला असमर्थ ठरतात.”
परिणाम—आशाहीनता
आशाहीनता हे आत्महत्येचे प्रमुख कारण आहे असे संशोधकांचे मत आहे. ऑस्ट्रेलियात तरुणांची आत्महत्या यासंबंधी लेखन करणाऱ्या गेल मेसन यांच्या मते: “खिन्नतेपेक्षा आशाहीनता आत्महत्येच्या विचारांसाठी अधिक प्रमाणात कारणीभूत आहे. काहीवेळा आशाहीनता हे खिन्नतेचे एक लक्षण आहे असे म्हटले जाते. . . . सहसा तरुणांना त्यांच्या भविष्याविषयी खासकरून आर्थिक भविष्याविषयी निराशा, नाउमेदी वाटत असते: आणि थोड्याफार प्रमाणात जागतिक परिस्थितीबद्दलही आशाहीनता वाटत असते.”
समाजातले पुढारी स्वतःच भ्रष्टाचारी असल्यामुळे तरुणांनाही नीतीमूल्यांनुसार जगायला प्रेरणा मिळत नाही. “मलाच काय गरज पडलीय?” अशी प्रवृत्ती होऊन बसते. तरुणांना ढोंगीपणा कसा ओळखता येतो याविषयी हारपर्स मॅग्झीन म्हणते: “पुस्तकातल्या आदर्शवादाचा या तरुणांवर काहीच परिणाम होत नाही पण त्यांना ज्या समाजात राहून गुजारा करायचा आहे त्या समाजात काय घडतंय हे ओळखण्यात ते पटाईत असतात.” आणि त्यांना काय दिसून येते? लेखिका स्तेफॅनी डाऊरीक म्हणतात: “कसे जगावे याविषयी आज आपल्याला पुष्कळ माहिती दिली जाते; अशी माहिती यापूर्वी कधीच मिळाली नव्हती. लोकांकडे आज अधिक पैसा आहे, ते सुशिक्षित आहेत पण तरीही जगात निराशाच निराशा आहे.” राजकीय आणि धार्मिक क्षेत्राच्या उच्च स्तरांमध्ये खरोखर आदर्श म्हणण्यासारखे लोक फक्त बोटावर मोजण्याइतकेच आहेत. डाऊरीक काही समर्पक सवाल खडे करतात: “अर्थहीन दुःख-त्रासातून बुद्धी आणि मजबुती कशी मिळवावी, त्याचा अर्थ तरी काय लावावा? स्वार्थी, तमीज नसलेल्या आणि लोभी जगात प्रेमाचे वातावरण निर्माण करावे तरी कसे?”
आमच्या पुढील लेखात तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे मिळतील आणि ती उत्तरे पाहून तुम्ही चकीत व्हाल.
[६ पानांवरील संक्षिप्त आशय]
“पुष्कळ युवकांना स्वतःच्या त्याचप्रमाणे जगाच्या भविष्याविषयी अत्यंत भीती वाटते”
[७ पानांवरील संक्षिप्त आशय]
“समजून घेणाऱ्या कोणा एका व्यक्तीने त्यांचे फक्त सहानुभूतीने ऐकले तरी त्यांचे निराशेपोटी घडणारे हे दुर्दैवी कृत्य टाळण्यासारखे असते”
[६ पानांवरील चौकट]
आत्महत्येची काही लक्षणे
• झोप उडणे, भूक मंदावणे
• एकटे-एकटे राहणे, दुसऱ्यांच्यात न मिसळणे, नेहमी अपघात होणे
• घरून पळून जाणे
• स्वरूपात अचानक बदल होणे
• मादक औषधांचे आणि/किंवा दारूचे व्यसन
• चीड-चीड करणे आणि रागावणे
• सतत मरणाविषयी बोलणे; स्वतःचा अंत करण्याविषयी लिहिणे; हिंसा होत असल्याची चित्रे काढणे, विशेषतः त्या चित्रांमध्ये स्वतःवर हिंसा होत असल्याचे दाखवणे
• दोषभावना
• आशाहीनता, चिंता, खिन्नता, अधूनमधून रडणे
• स्वतःच्या वस्तू दुसऱ्यांना देऊन टाकणे
• फार लवकर लक्ष विचलित होणे
• सुखकारक गोष्टींमध्ये रस न उरणे
• आत्मटीका
• लैंगिक स्वैराचार
• शाळेच्या अभ्यासात लक्ष नसणे, शाळेला बुट्ट्या मारणे
• पंथाचा किंवा टोळीचा सदस्य होणे
• खिन्नतेनंतर अत्यानंद होणे
फिलिप्प जी. पत्रस आणि टॉन्या के. शामू यांचे पेचप्रसंगात अडकलेले किशोर (इंग्रजी) (अमेरिकन असोसिएशन ऑफ स्कूल ॲडमिनिस्टर्स) आणि मुलांमधील व किशोरांमधील खिन्नता आणि आत्महत्या (इंग्रजी) यांवर आधारित
[७ पानांवरील चित्रं]
प्रेम आणि करुणा दाखवल्यास तरुण व्यक्तीला जीवनाची कदर करण्यास मदत मिळेल