धार्मिक मूल्यांची काय स्थिती आहे?
“विवाहाच्या विचारात असलेली पंधरा जोडपी विवाहपूर्व सल्ला प्राप्त करण्यासाठी एका [कॅथलिक] सभेला उपस्थित राहिली. उपस्थित असलेल्या ३० जणांपैकी केवळ ३ जणांनी धर्म पाळत असल्याचा दावा केला.”—ला क्र्वा, फ्रेंच कॅथलिक दैनिक.
धार्मिक मूल्यांची आज दयनीय स्थिती आहे. न्यूझवीकच्या आंतरराष्ट्रीय आवृत्तीने जुलै १२, १९९९ च्या अंकात मुखपृष्ठावर हा प्रश्न मांडला होता: “देव मृत झाला आहे का?” पाश्चात्त्य युरोपसाठी तसेच म्हणावे लागेल असे त्या मासिकात उत्तर देण्यात आले. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात रोममध्ये भरवण्यात आलेल्या कॅथलिक चर्च सभेचा अहवाल देताना, फ्रेंच बातमीपत्र, ल माँडने म्हटले: “चर्चला आपल्या सदस्यांना संदेश कळवणे कठीण जात आहे कारण त्यांना जणू त्याचा ‘त्रास’ होत आहे. . . . ईटलीत, कॅथलिक धर्मपंथीयांचे एकमत राहिलेले नाही. . . . जर्मनीत, गर्भपातासंबंधी माहिती देणाऱ्या केंद्रांमुळे एका बाजूला पोप आणि दुसऱ्या बाजूला हुकूम पाळायची इच्छा नसलेल्यांची लोकशाही अशा दोघांमधले दुमत वाढत आहे. [नेदरलंडने] नैतिकतेबाबत आणि सुलभ मृत्यूबाबत घेतलेली धीट भूमिका, त्या देशाने अचानक अख्रिस्तीकरण केल्याचा परिणाम आहे असे काहींचे म्हणणे आहे.”
इतर ठिकाणीही परिस्थिती काहीशी अशीच आहे. १९९९ मध्ये, कॅन्टरबरीचे आर्चबिशप, जॉर्ज कॅरी, यांनी इशारा दिला की, “चर्च ऑफ इंग्लंड पुढील पिढीपर्यंत लोप पावेल.” “ख्रिस्ती युरोपचा अंत” या शीर्षकाच्या एका लेखात ला फिगारो या फ्रेंच बातमीपत्राने म्हटले: “ही दशा इतर ठिकाणीही पाहायला मिळते. . . . लोक एकएक करून नैतिकतेबाबत व सिद्धान्तांबाबत शंका व्यक्त करू लागले आहेत.”
कमी धार्मिक सहभाग
युरोपमध्ये, चर्चमधील लोकांची उपस्थिती वेगाने घसरत आहे. १० टक्क्यांहून कमी फ्रेंच कॅथलिक दर रविवारी मासला जातात, तर पॅरिसचे केवळ ३ ते ४ टक्के कॅथलिक लोक नियमितरित्या चर्चला जातात. इंग्लंड, जर्मनी आणि स्कँडेनिव्हियन देशांमध्ये तर इतकीच किंवा त्याहून कमी उपस्थिती असल्याचे पाहण्यात आले आहे.
पाळक पदासाठी उमेदवार कमी पडताहेत याची धार्मिक अधिकाऱ्यांना अधिक चिंता वाटू लागली आहे. एका शतकाच्या आतच, फ्रान्समधील पाळकांची संख्या, प्रती १०,००० रहिवाशांसाठी १४ पाळकांपासून, सध्या, प्रती १०,००० रहिवाशांकरता १ पाळकापर्यंत घसरली आहे. संपूर्ण युरोपभर पाळकांचे सरासरी वय वाढत आहे आणि आयर्लंड व बेल्जियमसारख्या देशांमध्येही त्यांची उणीव भासू लागली आहे. त्याच वेळी, कॅटेकिझमच्या वर्गांमध्ये भरती होणाऱ्या मुलांची संख्या कमी होत आहे व यामुळे कॅथलिक चर्च स्वतःचे पुनरुज्जीवन करण्यास समर्थ आहे का याविषयी गंभीर शंका व्यक्त होत आहेत.
धर्माच्या बाबतीत आज लोकांना पूर्वीसारखा आत्मविश्वास राहिलेला नाही. फ्रेंच लोकांमध्ये केवळ ६ टक्के लोकांना वाटते की, “सत्य एकाच धर्मात सापडू शकते;” १९८१ मध्ये असे मत असणाऱ्यांची संख्या १५ टक्के होती तर १९५२ साली ५० टक्के होती. धार्मिक उदासीनता पसरत आहे. धर्माशी आपला काहीही संबंध नाही असे म्हणणाऱ्या लोकांचे प्रमाण १९८० मध्ये २६ टक्क्यांपासून २००० मध्ये ४२ टक्क्यांपर्यंत वाढले आहे.—ला वेलोर द फ्रॉन्से एव्हॉल्यूस्यॉ द १९८० ए २००० (फ्रेंच मूल्ये—१९८० ते २००० पर्यंतचा विकास).
नैतिक मूल्यांमध्ये मोठा बदल
मूल्यांच्या बाबतीत निर्माण झालेला पेचप्रसंग नैतिकतेत दिसून येतो. आधी सांगितल्याप्रमाणे, चर्चला जाणारे अनेक लोक चर्चने ठरवलेले नैतिक नियम मानायला तयार नाहीत. धार्मिक पुढाऱ्यांना वर्तनाविषयी नियम ठरवण्याचा हक्क आहे असे त्यांना वाटत नाही. मानवी हक्कांसंबंधी पोपच्या भूमिकेला पूर्ण स्वीकृती दर्शवणारे लोक, त्यांच्या खासगी जीवनाविषयी पोपने काही म्हटल्यास मानायला मुळीच तयार होत नाहीत. उदाहरणार्थ, गर्भनिरोधासंबंधीची पोपची भूमिका बहुतेक लोक आणि कॅथलिक जोडपी देखील स्वीकारत नाहीत.
या मनोवृत्तीचा परिणाम समाजाच्या प्रत्येक स्तरातील धर्मावर विश्वास करणाऱ्या व न करणाऱ्या लोकांवर होतो. पवित्र शास्त्रात स्पष्टरित्या खंडन केलेल्या चालीरीती खपवून घेतल्या जातात. वीस वर्षांआधी, ४५ टक्के फ्रेंच नागरिकांना समलिंगी संबंधांबद्दल घृणा वाटत होती. पण आज, ८० टक्के लोकांना ते स्वीकृत आहे. बहुतांश लोक, वैवाहिक सोबत्याशी विश्वासू राहण्याच्या बाजूने असले तरी केवळ ३६ टक्के लोक विवाहबाह्य संबंधांना अक्षम्य समजतात.—रोमकर १:२६, २७; १ करिंथकर ६:९, १०; इब्री लोकांस १३:४.
धार्मिक खिचडी
पाश्चात्त्य समाजात, स्वतःच-निवडा धर्म निर्माण होत आहे ज्यात प्रत्येक व्यक्ती आपण आपले विश्वास निवडण्यास योग्य आहोत, असे समजते. काही शिकवणुकी स्वीकारल्या जातात; इतर सोडून दिल्या जातात. काहीजण पुनर्जन्मावर विश्वास करत असूनही स्वतःला ख्रिस्ती म्हणवतात, तर इतरजण एकाच वेळी वेगवेगळ्या धर्माचे विश्वास मानतात. (उपदेशक ९:५, १०; यहेज्केल १८:४, २०; मत्तय ७:२१; इफिसकर ४:५, ६) ला वेलोर द फ्रॉन्से या पुस्तकात असे सडेतोडपणे म्हणण्यात आले की, पुष्कळ पंथीय चर्चने प्रस्थापित केलेल्या मार्गांपासून इतके बहकले आहेत की ते पुन्हा कधीही त्या मार्गावर येऊ शकणार नाहीत.
धार्मिक वेगळेपणाच्या या वाढत्या प्रवृत्तीचे धोकेसुद्धा आहेतच. धार्मिक इतिहासकार आणि एन्स्टीट्यू द फ्रान्सचे सदस्य, झॉ दल्यूमो यांना ठामपणे असे वाटते की, कोणीही व्यक्ती प्रस्थापित व्यवस्थेला सोडून स्वतःचा धर्म निर्माण करू शकत नाही. “विश्वास, एका पक्क्या धार्मिक व्यवस्थेत मुळावलेला नसल्यास तो बचावू शकत नाही.” योग्य धार्मिक मूल्ये आणि धार्मिक आचरण यांचा धर्मात एकसूत्रीपणा असला पाहिजे. परंतु, बदलांमुळे उलथापालथ झालेल्या समाजात असा एकसूत्रीपणा कोठे सापडेल?
संपूर्ण बायबल आपल्याला अशी आठवण करून देते की, वर्तन आणि नैतिकतेबाबत स्वीकारणीय नियम ठरवणारा देव आहे; मात्र त्याचे पालन करायचे किंवा नाही याचे स्वातंत्र्य त्याने मानवांना दिले आहे. जगभरात लाखो लोक हे ओळखतात की, शतकानुशतके आदरणीय मानलेले हे पुस्तक आज देखील व्यावहारिक आहे आणि ते ‘त्यांच्या पावलांकरता दिव्यासारखे आणि त्यांच्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.’ (स्तोत्र ११९:१०५) हा निष्कर्ष त्यांनी कसा काढला? याची चर्चा पुढील लेखात केली जाईल.