बायबलचा दृष्टिकोन
तुमची वेशभूषा आणि केशभूषा—यांमुळे देवाला काही फरक पडतो का?
“पुस्तकाच्या सूचीवरून पुस्तकातील विषयांची कल्पना येते, . . . तसेच बाह्यस्वरूपावरून व पेहरावावरून एखाद्याच्या आंतरिक व्यक्तिमत्त्वाची कल्पना येते.” —इंग्रजी नाटककार फिलिप मॅसिंगर.
सा.यु. तिसऱ्या शतकात टायटस क्लिमेन्स नावाच्या एका चर्च लेखकाने, वेशभूषा आणि केशभूषा कशी असावी यांविषयी एक लांबलचक यादी तयार केली होती. यानुसार अलंकार आणि उंची किंवा भपकेदार वस्त्रांना मज्जाव होता. स्त्रियांना आपले केस रंगवण्याची मनाई होती; शिवाय, ‘स्वरूपाच्या मोहजालात फसवू शकतील अशी सौंदर्यप्रसाधने चेहऱ्यावर फासण्यास’ अर्थात “मेकअप” करण्यासही त्यांना मनाई होती. पुरुषांना डोक्याचे मुंडण करण्याची सूचना दिली गेली होती; कारण “मुंडण केलेले शीर . . . एखादा पुरुष धीरगंभीर असल्याचे दाखवून देते,” पण हनुवटीवरील केसांमुळे “चेहऱ्यावर भारदस्तपणा व पितृवत दरारा दिसून येत”a असल्यामुळे तेथले केस काढण्यास मनाई होती.
याच्या कित्येक शतकांनंतर, आपल्या अनुयायांनी कोणत्या रंगाचे व प्रकाराचे वस्त्र परिधान करावेत हे निर्धारित करणारी एक नियमावली जॉन कॅल्वीन या प्रॉटेस्टंट नेत्याने तयार केली. दागदागिने व झालर यांसंबंधी नापसंती व्यक्त केली जायची; शिवाय, एखाद्या स्त्रीने ‘अनैतिक उंचीपर्यंत’ आपले केस गुंफल्यास तिला तुरुंगात डांबले जात असे.
काळाच्या प्रवाहात धार्मिक नेत्यांनी बढावा दिलेल्या अशा पराकोटीच्या दृष्टिकोनांनी अनेक प्रांजळ लोकांना असा विचार करण्यास लावले आहे की, मी जे काही परिधान करतो यामुळे देवाला काही फारक पडतो का? विशिष्ट फॅशन अथवा मेकअप तो नापसंत करतो का? यावर बायबलचे काय म्हणणे आहे?
एक वैयक्तिक बाब
मनोवेधक गोष्ट अशी की योहान ८:३१, ३२ येथे येशूने आपल्या शिष्यांना म्हटले: “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर . . . तुम्हाला सत्य समजेल व सत्य तुम्हाला बंधमुक्त करील.” होय, रुढी व खोट्या शिक्षणाने लादलेल्या ओझ्यातून लोकांना मुक्त करण्याच्या हेतूने येशूने ही सत्ये शिकवली होती. “कष्टी व भाराक्रांत” लोकांना तजेला देण्यासाठी ती सत्ये तयार करण्यात आली होती. (मत्तय ११:२८) लोक त्यांच्या व्यक्तिगत बाबींसंबंधी देखील स्वतःहून काही करू शकत नाहीत किंवा आपल्या बुद्धीचा वापर करू शकत नाहीत येथवर येशू आणि खुद्द त्याचा पिता, यहोवा देव लोकांच्या जीवनावर नियंत्रण गाजवू इच्छित नाहीत. “ज्यांच्या ज्ञानेंद्रियांना वहिवाटीने चांगले आणि वाईट समजण्याचा सराव झाला आहे” असे प्रौढ व्यक्ती त्यांनी बनावे अशी यहोवाची त्यांच्याबद्दल इच्छा आहे.—इब्री लोकांस ५:१४.
यास्तव, सभोवतालच्या राष्ट्रांपासून व त्यांच्या अनैतिक प्रभावापासून यहुद्यांना अलिप्त राहण्यास मदत व्हावी म्हणून मोशेच्या नियमशास्त्रात पेहरावासंबंधी दिलेल्या काही विशिष्ट आवश्यकतांखेरिज, वेशभूषा आणि केशभूषा अथवा सौंदर्यप्रसाधने वापरण्यासंबंधी कोणतेही काटेकोर नियम बायबलमध्ये घालून दिलेले नाहीत. (गणना १५:३८-४१; अनुवाद २२:५) ख्रिस्ती व्यवस्थेअंतर्गत, वेशभूषा आणि केशभूषा यांचा प्रश्न मूलतः वैयक्तिक आवडीनिवडीवर आधारित आहे.
तथापि, आपल्या पेहरावामुळे देवाला काहीएक फरक पडत नाही किंवा ‘काहीही चालेल’ असा याचा अर्थ होत नाही. उलटपक्षी, वेशभूषा आणि केशभूषा यांविषयी देवाचा दृष्टिकोन प्रकट करणारे उपयुक्त मार्गदर्शन बायबलमध्ये दिलेले आहे.
“भिडस्तपणाने व मर्यादेने”
प्रेषित पौलाने लिहिले, की ख्रिस्ती स्त्रियांनी “स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे ह्यांनी नव्हे.” त्याचप्रमाणे पेत्राने, ‘बाहेरून दिसणारे केसाचे गुंफणे, सोन्याचे दागिने घालणे’ यांविरुद्ध सल्ला दिला.—१ तीमथ्य २:९; १ पेत्र ३:३.
ख्रिस्ती स्त्रीपुरुषांनी आपले सौंदर्य खुलवू नये असा संकेत पौल आणि पेत्र देत आहेत का? मुळीच नाही! खरे तर, दागदागिने किंवा सुवासिक तेल व सुगंधी द्रव्यांचा वापर केलेल्या विश्वासू स्त्रीपुरुषांचा उल्लेख बायबलमध्ये आढळतो. अहश्वेरोश राजाच्या सन्मुख जाण्याआधी एस्तेरने सुगंधी तेल व मालिश यांद्वारे अधिक काळापर्यंत आपली सुंदरता खुलवली. तसेच, योसेफाला देखील तलम तागाची वस्त्रे लेवविली व त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली गेली होती.—उत्पत्ति ४१:४२; निर्गम ३२:२, ३; एस्तेर २:७, १२, १५.
पौलाने वापरलेल्या “मर्यादेने” या अभिव्यक्तीवरून त्यातील सल्ला समजण्यास आपल्याला मदत होते. यासाठी असलेला मूळ ग्रीक शब्द, नेमस्त आणि आत्म-संयमी असण्याचा अर्थ सूचित करतो. स्वतःकडे अनावश्यक लक्ष न वेधता स्वतःविषयी सौम्यपणे विचार करणे असा त्याचा अर्थ होतो. इतर बायबल अनुवाद, “सुज्ञपणे,” “डोळसपणे,” “सभ्य,” किंवा “आत्मसंयमाने” असा त्या शब्दाचा अनुवाद करतात. ख्रिस्ती वडिलांठायी हा गुण असणे अत्यावश्यक आहे.—१ तीमथ्य ३:२.
तर मग, आपली वेशभूषा आणि केशभूषा भिडस्त व साजेशी असावी असे शास्त्रवचने आपल्याला सांगतात तेव्हा इतरजण अडखळतील किंवा आपल्या आणि ख्रिस्ती मंडळीच्या नावाला कलंकित करणाऱ्या कोणत्याही अतिरेकी स्टाईल्स टाळण्याचे प्रोत्साहन शास्त्रवचने आपल्याला देतात. शारीरिक शृंगाराद्वारे आपल्या स्वरूपाकडे लक्ष वेधण्याऐवजी देवाविषयी परम आदर असल्याचा दावा करणाऱ्यांनी मर्यादा राखावी व “जो सौम्य व शांत आत्मा . . . त्याची म्हणजे अंतःकरणांतील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा” यावर भर द्यावा. पेत्राच्या मते हे “देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे.” (तिरपे वळण आमचे.)—१ पेत्र ३:४.
ख्रिस्ती लोक, ‘जगासाठी तमाशा असे’ झाले आहेत. विशेषतः, सुवार्तेचा प्रचार करायचा आदेश त्यांना दिला असल्यामुळे इतरांवर ते कोणत्या प्रकारची छाप पाडतात याविषयी त्यांनी सतर्क असण्याची गरज आहे. (१ करिंथकर ४:९; मत्तय २४:१४) यास्तव, कोणत्याही गोष्टीद्वारे—अगदी त्यांच्या बाह्यस्वरूपाद्वारे देखील—अतिमहत्त्वाच्या संदेशापासून लोकांची मने विचलित व्हावीत अशी त्यांची इच्छा नाही.—२ करिंथकर ४:२.
प्रत्येक ठिकाणी स्टाईल्स अतिशय निराळ्या असतात; पण लोकांना डोळस निवड करण्यास साहाय्य करणारे सुस्पष्ट, योग्य असे मार्गदर्शन बायबल पुरवते. लोकांकडून या तत्त्वांचे उल्लंघन होत नाही तोपर्यंत वेशभूषा आणि केशभूषा यांबाबत आपल्या वैयक्तिक आवडीनिवडी अभिव्यक्त करण्याची मोकळीक देव प्रेमळपणे सर्वांना देतो.
[तळटीपा]
a शास्त्रवचनांना मुरड घालून वर उल्लेखित प्रतिबंधांना बढावा देण्याचा प्रयत्नही केला गेला होता. बायबल, असे कोणतेही प्रतिबंध घालत नसले तरीही प्रभावी धर्मशास्त्रवेत्ते टर्टुलियन यांनी अशी शिकवण दिली, की स्त्री ही “मूळ पापास आणि . . . मानवाच्या पतनास” कारणीभूत असल्यामुळे तिने “हव्वेप्रमाणे शोकाकूल व पश्चात्तापी अवस्थेत” फिरावे. इतकेच काय, पण एखाद्या लावण्यवतीने आपले लावण्य लपवावे असाही त्यांचा आग्रह होता.—पडताळा रोमकर ५:१२-१४; १ तीमथ्य २:१३, १४.