त्यांचे हृदय हेलावून गेले
ग्लोर्या आडाम लिहिते: “४ मुलं आणि ९ मुली—असं १३ मुलांचं आमचं कुटुंब होतं. १९८४ चं वर्ष. बाबा नुकतेच मेक्सिकोतील आमच्या घरी परतले होते; अर्थार्जनासाठी ते संयुक्त संस्थानांत असताना, आम्ही यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करण्यास सुरवात केली असल्याचं त्यांच्या कानी आलं. याबद्दल ते निश्चितच खूष नव्हते आणि त्यामुळे आमचा विरोध होण्यास सुरू झाला. असं वाटत होतं जणू उलटणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक बाबा अधिकाधिक पाषाणहृदयी बनत चालले होते.
“बाबांवर आम्ही मनापासून प्रेम करत असू आणि आम्हाला मिळत असलेल्या जीवनदायी ज्ञानाचा लाभ त्यांनाही व्हावा अशी आमची मनस्वी इच्छा होती. दिवसामागून दिवस आम्ही कळकळून यहोवाला प्रार्थना करत होतो; यहोवाच्या उद्देशांबद्दल बाबांशी बोलण्याचा एखादा मार्ग त्यानं आम्हाला दाखवावा म्हणून त्याच्यापाशी आम्ही विनवण्याही केल्या. यहोवानं आमची प्रार्थना ऐकली असंच म्हणावं कारण दररोज रात्री बाबा ज्या बैठकीच्या खोलीत बसून टीव्ही पाहत असत तिथं रोज संध्याकाळी एकत्र येण्याचं धैर्य त्यानं आम्हाला दिलं. इथंच दैनंदिन बायबल वचन वाचण्यासाठी माझी आई आणि आम्ही मुली एकत्र बसत असू.
“आई चर्चा करत असे आणि विवेचनं वाचल्यानंतर आम्ही आळीपाळीनं प्रार्थना करत असू. अवघ्या पाच वर्षांची आमची धाकटी बहीण मारी, प्रार्थना करत असे तेव्हा ती कळकळून अशी याचना करायची: ‘यहोवा बापा, पपांनीही एक साक्षीदार बनावं म्हणून कृपा करून त्यांचं हृदय सौम्य कर.’ टीव्ही पाहत असताना बाबा नेहमीच आवाज वाढवायचे त्यामुळं आमच्या बोलण्याकडे त्यांचं काही लक्ष नाही असं वाटायचं. पण मग, कालांतरानं ते टीव्हीचा आवाज कमी करू लागले आणि एके दिवशी तर त्यांनी चक्क टीव्ही बंदच करून टाकला.
“त्या दिवशी संध्याकाळी नेहमीप्रमाणं, आज वचन वाचण्याची कुणाची पाळी आहे असं आईनं विचारलं. आणि आश्चर्य म्हणजे बाबांनी म्हटलं: ‘माझी.’ आम्ही चकित झालो खरं, पण काही एक बोललो नाही. आईनंही प्रतिकार केला नाही की प्रश्न विचारले नाही; उलट शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे ही पुस्तिका त्यांच्या हातात दिली. त्यांनी बायबल वचनावर चर्चा केल्यानंतर, आज प्रार्थना करण्याची कुणाची पाळी आहे असं आईनं विचारलं. आणि पुन्हा एकदा बाबांनी उत्तर दिलं: ‘माझी.’
“आम्ही तर गोंधळूनच गेलो. प्रार्थनेच्या मध्यात तर आम्हाला अश्रूच आवरले नाही. बाबा पण रडू लागले आणि त्यांनी देवाच्या नावाची निंदा केल्याबद्दल यहोवाकडे क्षमा मागितली. आमचा विरोध केल्याबद्दल त्यांनी आईकडेही क्षमा मागितली.
“अशाप्रकारे, १९८६ साली बाबांनी आमचा विरोध करण्याचं सोडून दिलं. सन १९९० मध्ये संयुक्त संस्थानांतील, टेक्सास शहरात आमच्या कुटुंबानं स्थलांतर केलं. आम्हा सात बहिणींप्रमाणं बाबांनी देखील काही काळातच यहोवाला केलेलं आपलं समर्पण पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे चिन्हांकित केलं. १९९७ सालाच्या एप्रिल महिन्यात एक ख्रिस्ती वडील म्हणून बाबांची नियुक्ती झाली. आजपर्यंत, सबंध कुटुंब मिळून दैनंदिन बायबल वचनाची चर्चा करणं हा आमच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आणि यहोवाला प्रार्थना करणं हा आमच्या कौटुंबिक जीवनाचा पाया राहिला आहे.”
[३१ पानांवरील चित्र]
१. मेक्सिकोमध्ये पायनियरिंग करणाऱ्या चार मुली. समोर मारी आहे
२. ख्वानीटा आणि ईसाक आडाम आपल्या काही मुलांबरोबर. अगदी उजव्या बाजूला ग्लोर्या