इंका लोकांनी आपले सुवर्ण साम्राज्य कसे गमावले
पेरूमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
सूर्योदय. सकाळी आकाशातून डोकावणाऱ्या किरणांमुळे बर्फाच्छादित अँडीज पर्वतांवर गुलाबी छटा उमटली होती. ४,३०० मीटर उंचीवर, कडाक्याच्या थंड रात्रीनंतर, सूर्याच्या या उष्णतेमुळे इंडियन लोकांमध्ये सकाळी लवकर उठणारे लोक सुखावले. इंका साम्राज्याची राजधानी, कूस्कोच्या (अर्थात “जगाचा केंद्रबिंदू”) केंद्रभागी असलेल्या सूर्यमंदिराला सूर्याची ही किरणे हळूहळू घेरू लागली. सुवर्ण भिंतींवरून सूर्याची किरणे परावर्तित होऊ लागली. मंदिराच्या समोर इंकाच्या* बगीच्यात सोन्याचे भरीव लामा, व्हिक्युना आणि कॉन्डोर चकाकत होते. वाटसरू, आपल्या सूर्यदेवतेची उपासना करण्यासाठी हातावर चुंबने देऊन हवेत उडवत होते. सूर्यामुळेच आपण जिवंत आहोत आणि त्याच्या आशीर्वादामुळे आपला उदरनिर्वाह होत आहे असा त्यांचा विश्वास होता!
दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावर, १४ व्या आणि १६ व्या शतकांदरम्यान, एका प्रचंड सुवर्ण साम्राज्याचे वर्चस्व होते. इंका लोकांवर अत्यंत हुशार वास्तुशिल्पकार आणि तंत्रज्ञांचे राज्य असून सामाजिकरित्या आपली सुधारणा करण्यास ते सुसंघटित होते. कमालीच्या मोठ्या इंका साम्राज्याचा विस्तार सुमारे ५,००० किलोमीटर इतका होता; सध्याच्या कोलंबियाच्या दक्षिण भागापासून ते पार अर्जेंटिनापर्यंत त्यांचे साम्राज्य पसरलेले होते. खरे म्हणजे, “इंका लोकांना वाटायचे की, संपूर्ण जगावर आपले साम्राज्य आहे.” (नॅशनल जॉग्रफिक) त्यांच्या साम्राज्यापलीकडचा प्रदेश कब्जा करण्यालायक नव्हता अशी त्यांची समजूत होती. तरीही, उर्वरित जगाला या साम्राज्याच्या अस्तित्वाची पुसटशी कल्पनाही नव्हती.
इंका लोक होते तरी कोण? त्यांचा उगम कोठून झाला?
इंका लोक येण्यापूर्वी कोण होते?
पुराणवस्तुशास्त्राच्या संशोधनांवरून दिसून येते, की इंका लोक त्या खंडाचे मूळ रहिवासी नव्हते. कित्येक शेकडो ते हजारो वर्षांआधी, इतर प्रगत संस्कृती त्यांच्याआधी अस्तित्वात होत्या. पुराणवस्तुशास्त्रज्ञांनुसार, त्या संस्कृती लांबायेके, चावीन, मोचीका, चिमू आणि टीआवानाको या होत्या.
ते आधीचे लोक विविध प्राण्यांची—बिबळे, प्यूमा आणि माशांची देखील पूजा करीत. पर्वत दैवतांवर श्रद्धा ठेवणे हे त्यांच्यात सर्वसामान्य होते. काही जमाती लिंग उपासना करत असल्याचे त्यांच्या मातीच्या भांड्यांवरून दिसून आले. वरती उंच, पेरू आणि बोलिव्हियामधल्या सीमेवर तितिकाका सरोवरानजीक, एका जमातीने लिंगांची प्रतीके असलेले एक मंदिर बांधले आणि पाचा-मामा अर्थात ‘पृथ्वी मातेकडून’ भरघोस पीक मिळावे म्हणून फलत्वाच्या पूजाअर्चांमध्ये या दैवतांची उपासना केली जाई.
मिथ्या आणि सत्य
सन १२०० च्या आसपास इंका लोक उदयास आले. एका इंका राजकन्येचा आणि स्पॅनिश नाईट व जमीनदाराचा पुत्र, गॉथीलॉसो थे लॉ बेगॉ या इतिहास लेखकानुसार मिथ्येप्रमाणे मूळ इंका, मांको कापाक यांना त्यांच्या बहिणीसोबत/पत्नीसोबत त्यांच्या पित्याने अर्थात सूर्यदेवतेने तितिकाका सरोवराकडे, सर्व लोकांना सूर्याची उपासना करायला लावण्यासाठी खाली पाठवले. ही कथा आजही काही शाळांमध्ये मुलांना सांगितली जाते.
ही झाली मिथ्यकथा, तथापि इंका लोक शक्यतो तितिकाका सरोवरानजीकच्या जमातींपासून टीआवानाकोंद्वारे आले असावेत. कालांतराने, या पसरत चाललेल्या साम्राज्याने जिंकलेल्या जमातींच्या पुष्कळशा सुसंघटित वास्तुकामांवर ताबा मिळवला आणि आधीच बांधलेले कालवे आणि सोपानशेती वाढवली व त्यातच सुधारणा केल्या. मोठमोठाले बांधकाम करण्यात इंका लोकांचा हातखंडा होता. कूस्को शहराच्या वर एका उंच पठारावर अवाढव्य साक्सावामान किल्ल्याची आणि मंदिराची घडण त्यांच्या वास्तुशिल्पकारांनी कशी केली याविषयी पुष्कळ कल्पना केल्या आहेत. १०० टन वजनाच्या प्रचंड शिळा एकत्र जोडण्यात आल्या. त्यांना जोडण्यासाठी काँक्रीट वापरण्यात आले नव्हते. कूस्कोच्या प्राचीन शहरातल्या भीतींच्या चिरेबंदीवर भूकंपांचा काहीच परिणाम झाला नाही.
चकाकते सूर्यमंदिर
कूस्कोच्या राजधानी शहरात, पॉलिश केलेल्या एका दगडी मंदिरात इंका लोकांनी सूर्याच्या उपासनेसाठी एक पुजारीवर्ग संघटित केला. आतील भिंती चोख्या सोन्याने आणि चांदीने सुशोभित केल्या होत्या. पुजारीवर्गासोबत खास आश्रम देखील स्थापन करण्यात आले; हे आश्रम, अगदी लिमाबाहेरच पाचाकामाकच्या सूर्यमंदिरामध्ये पुन्हा बांधण्यात आलेल्या आश्रमासारखेच आहेत. अत्यंत सुंदर कुमारिकांना अगदी आठ वर्षांच्या कोवळ्या वयापासूनच ‘सूर्याच्या कुमारी’ होण्यासाठी प्रशिक्षित केले जायचे. पुराणवस्तुशास्त्राच्या पुराव्यानुसार इंका लोक नरबळी देखील द्यायचे असे दिसून येते. आपुस किंवा पर्वत दैवतांना ते मुलांचे बळी देत. अँडीयन शिखरांवर काही मुलांची प्रेते गोठलेल्या अवस्थेत सापडली आहेत.
इंका आणि त्यांच्याआधीच्या जमातींना लेखनकला अवगत नसली, तरी किपू नावाच्या साधनाद्वारे अहवाल ठेवण्याची पद्धत त्यांनी शोधून काढली. या “साधनात एक मुख्य दोर असून त्याला विविध रंगाचे गाठी मारलेले लहान दोर जोडलेले असत आणि प्राचीन पेरूवियन लोक” याद्या आणि अहवाल ठेवणाऱ्यांसाठी यांचा उपयोग आठवणीत ठेवायचे साधन म्हणून करायचे.
या साम्राज्यात एकता कशी राखण्यात आली?
कडक कायदेकानून आणि पद्धतशीर योजनांमुळे एक केंद्रिय सरकार भक्कमपणे स्थापन झाले होते. सर्वांनी केचुआ अर्थात इंका लोकांची भाषा शिकावी ही सर्वप्रथम आवश्यक गोष्ट होती. एल केचुआ आल आल्कान्से डे टोडोस (सर्वांना साध्य असलेली केचुआ) या पुस्तकात म्हटले आहे की, “केचुआ ही दक्षिण अमेरिकेच्या पोटभाषांमधील सर्वात बहुव्यापक, सर्वात वैविध्यपूर्ण त्याचप्रमाणे सर्वात लाघवी भाषा” मानली जाते. पेरूमधल्या पर्वतांमध्ये सुमारे ५० लाख लोक त्याचप्रमाणे त्या साम्राज्याचा भाग असणाऱ्या पाच देशांमध्ये आणखी लाखो जण ही भाषा अद्यापही बोलतात. तितिकाका सरोवराच्या आग्नेयकडचा एक जमाव अजूनही आयमारा भाषा बोलतो; ही इंकापूर्व काळातल्या केचुआपासून तयार झालेली बोली आहे.
केचुआ भाषेमुळे जवळजवळ १०० जिंकलेल्या जमातींमध्ये ऐक्य होते आणि प्रत्येक गटाचा ताबा असलेल्या गावच्या क्युराकाला (पुढारी) याची मदत होत असे. प्रत्येक कुटुंबाला कसण्यासाठी जमीन नेमून देण्यात आली होती. कब्जा केल्यानंतर, इंका लोकांनी स्थानिक जमातीची नृत्ये आणि सण चालू राहू देण्याची परवानगी दिली आणि ते जिंकलेल्या लोकांना संतुष्ट ठेवण्यासाठी नाटके आणि खेळ सादर करायचे.
मिटा कर
त्या साम्राज्यात कोणत्याच प्रकारचे चलन नव्हते, म्हणूनच लोकांना सोन्याचे काहीच मूल्य वाटत नव्हते. सोने सूर्याला परावर्तित करते एवढ्यासाठीच लोकांना त्याविषयी आकर्षण होते. मिटा (केचुआमध्ये, “पाळी”) नावाचा एकच कर आकारला जाई आणि त्या करात प्रजेला इंकांच्या रस्ता व बांधकामाच्या अनेक प्रकल्पांमध्ये आळीपाळीने वेठबिगारी करण्याची आवश्यकता होती. अशाप्रकारे त्या साम्राज्याच्या कायद्याखाली हजारो इंडियन मजुरांना नोकरीला लावले जात असे.
मिटा मजुरांचा उपयोग करून वाकबगार इंका कंत्राटदारांनी २४,००० किलोमीटर लांबीच्या रस्त्यांचे जाळे तयार केले! कूस्कोपासून ते साम्राज्यातले दूरदूरचे प्रदेश एकमेकांशी जोडण्यासाठी इंकांनी दगडी रस्ते बांधले. चास्की नामक प्रशिक्षित संदेशवाहक धावपट्टू यांचा उपयोग करीत. एक ते तीन किलोमीटरच्या अंतरावर झोपड्यांमध्ये त्यांना ठेवण्यात येत असे. एक चास्की संदेश घेऊन आला की, दुसरा चास्की त्याच्यासोबत रीले रनरसारखा धावत असे. ही पद्धत वापरून ते एका दिवसात टप्प्याटप्प्याने संदेश पाठवण्यामध्ये २४० किलोमीटर अंतर पार करायचे. लवकरच, शासन करणाऱ्या इंकाला आपल्या साम्राज्यातली सर्व माहिती अगदी लगोलग मिळत असे.
इंका लोकांनी रस्त्यांवर मोठमोठाली कोठारे बांधली होती. या कोठारांमध्ये युद्धाला जाणाऱ्या इंकाच्या सैन्यासाठी अन्नाचा आणि कपड्यालत्त्याचा भरपूर साठा ठेवला जाई. इंका शक्यतोवर युद्ध टाळत असे. युद्धकलेचे डावपेच वापरून, सूर्य उपासना स्वीकारणार या अटीवर आपल्या शासनाधीन होण्याचे जमातींना, आमंत्रण देण्यासाठी तो दूत पाठवायचा. त्यांनी मंजुरी दाखवल्यास प्रशिक्षित इंका शिक्षकांद्वारे मार्गदर्शित असलेल्या स्वतःच्याच जमातीत राहण्याची त्यांना परवानगी दिली जात असे. त्यांनी न मानल्यास त्यांना दारूण पराभव सोसावा लागे. चीचा, अर्थात मक्यापासून तयार केलेले गुंगी आणणारे पेय पिण्याचे पात्र म्हणून मेलेल्या शत्रूंच्या कवटीचा उपयोग केला जाई.
नववा इंका, पाचाकुटी (१४३८ पासून) याच्या कारकीर्दीत त्याचप्रमाणे त्याचा पुत्र टोपा इंका युपान्की आणि विजेता-मुत्सद्दी वायना कापाक यांच्या काळात त्या साम्राज्याची भरभराट झाली आणि उत्तरेपासून दक्षिणेच्या अगदी शेवटपर्यंत त्यांनी आपल्या सीमा पसरवल्या. पण हे काही टिकले नाही.
उत्तरेकडील स्वारी करणारे
सन १५३० च्या सुमारास, स्पॅनिश विजेता फ्रांथीस्को पिझारो आणि त्याचे सैनिक पनामाहून, या अज्ञात प्रदेशातल्या सोन्याच्या अहवालांविषयी मोहित होऊन अशा ठिकाणी आले जिथे मुलकी युद्धाने फूट पडली होती. सिंहासनाचा कायदेशीर हक्कदार, राजकुमार वास्कारचा, राजधानीकडे वाटचाल करत येत असलेल्या त्याच्याच सावत्र भावाने अर्थात अतावाल्पाने पराभव करून त्याला तुरुंगात डांबले होते.
पिझारो आणि त्याचे लोक अत्यंत मुश्कीलीने कजामार्काच्या आतील शहरात पोहोंचल्यावर राज्य बळकावलेल्या अतावाल्पाने त्यांचे चांगले स्वागत केले. तथापि, विश्वासघात करून स्पॅनिश लोकांनी त्याला आपल्या पालखीतून खेचून काढले आणि त्याला कैद करून ठेवले आणि त्याचवेळी त्याच्या आश्चर्यचकित झालेल्या आणि बेसावध सैन्यातल्या हजारोंचा त्यांनी वध केला.
परंतु, बंदिवान असतानाही अतावाल्पाने मुलकी युद्ध जारी ठेवले. त्याने कूस्कोला आपले संदेशवाहक पाठवून आपला सावत्र भाऊ, इंका वास्कार याचा त्याचप्रमाणे राजघराण्यातल्या शेकडो लोकांचा वध करायला सांगितले. अजाणतेत, त्याने पिझारोचा विजय आणखीनच सोपा केला.
स्पॅनिश लोकांना सोन्या-चांदीबद्दल किती हाव आहे हे पाहून अतावाल्पाने आपल्या खंडणीसाठी एक मोठी खोली सोन्या-चांदीच्या मूर्तींनी भरून टाकायचे वचन दिले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. पुन्हा एकदा विश्वासघात केला गेला! वचन दिल्याप्रमाणे खंडणीचा ढिगारा लावल्यावर, १३ वा इंका अतावाल्पा, ज्याला मठवासी मूर्तिपूजक मानत होते, त्याला प्रथम कॅथलिक म्हणून बाप्तिस्मा देऊन नंतर गळा दाबून ठार करण्यात आले.
अंताचा आरंभ
अतावाल्पाला बंदिवान करून त्याचा खून झाल्याचा इंका साम्राज्याला प्राणघातक धक्का बसला होता. परंतु, इंडियन लोकांनी या कब्जा करणाऱ्यांचा प्रतिकार केला आणि या साम्राज्याचा अस्त व्हायला आणखी ४० वर्षे लागली.
जेव्हा आणखी कुमक आले, तेव्हा पिझारो आणि त्याचे सैनिक कूस्कोकडे कूच करून इंकांच्या आणखी सोन्यावर हात मारायला हापापलेले होते. सोन्याच्या या शोधात स्पॅनिश लोकांनी इंडियन लोकांकडून खजिन्याचा पत्ता मिळवण्यासाठी किंवा प्रतिकार करणाऱ्या लोकांना भीती दाखवण्यासाठी आणि मार्गातून काढून टाकण्यासाठी छळाच्या क्रूर पद्धतींचा उपयोग करायला मागेपुढे पाहिले नाही.
वास्कारचा भाऊ आणि भावी इंका (मांको इंका युपान्की), राजकुमार मांको दुसरा याच्यासोबत पिझारोनी कूस्कोकडे कूच केली आणि तिथल्या भरमसाट सोन्याचा खजिना हाती लागावा म्हणून सगळेकाही उलथेपालथे करून सोडले. स्पेनला घेऊन जाण्यासाठी सोन्याच्या बहुतेक मूर्ती वितळण्यात आल्या. म्हणूनच, पेरूमधला मोलवान खजिना वाहून नेणाऱ्या स्पॅनिश जहाजांवर इंग्रज चांचे तुटून पडत! पिझारो भरपूर खजिना घेऊन, किनाऱ्याकडे निघाला आणि तेथे १५३५ मध्ये त्याने आपल्या शासनाचे केंद्र म्हणून लिमा शहर स्थापले.
तोपर्यंत, विजेत्यांच्या लोभाविषयी आणि विश्वासघाताविषयी मांको इंका युपान्कीला कळाले आणि त्याने स्पॅनिश लोकांविरुद्ध लढा पुकारला. इतरजणही स्पॅनिश लोकांविरुद्ध उठले, पण सरतेशेवटी या इंडियन लोकांना माघार घेऊन जमेल तितका प्रतिकार करण्यासाठी दूरच्या एकांत प्रदेशांमध्ये जावे लागले. पर्वतांमध्ये दडलेले माचू पिक्चूचे हे पवित्र शहर यांपैकीचे एक सुरक्षित स्थान असले असावे.
शेवटचा इंका
अगदी शेवटी, मांको इंका युपान्कीचा एक मुलगा टुपाक आमारु हा इंका झाला (१५७२). त्यावेळी स्पॅनिश व्हाईसरॉयांचे पेरूवर राज्य होते. व्हाईसरॉय टोलेथोला तर इंकांचा समूळ नाश करायचा होता. एक भलेमोठे सैन्य घेऊन तो विलकाबांबा क्षेत्रात शिरला. टुपाक आमारुला जंगलात पकडण्यात आले. त्याला आणि त्याच्या गरोदर पत्नीला वध करण्यासाठी कूस्को येथे आणण्यात आले. एका कानयारी इंडियनने टुपाक आमारुवर वधाची कुऱ्हाड उचलली. एकाच झटक्यात या इंडियन लोकांच्या इंकाचे शिर धडापासून अलग केले गेले तेव्हा चौकात जमा झालेल्या या हजारो लोकांनी मोठ्याने आक्रोश केला. त्याच्या कप्तानांना छळून छळून ठार करण्यात आले अथवा फाशी देण्यात आली. अगदी क्रूर पद्धतीने इंकांच्या शासनाची विल्हेवाट लावण्यात आली.
नेमलेले व्हाईसरॉय त्याचप्रमाणे पुष्कळ कॅथलिक मठवासी आणि पादरी यांनी हळूहळू इंडियन लोकांवर आपला चांगला आणि वाईट प्रभाव पाडला; या इंडियन लोकांना दीर्घकाळापर्यंत दासच मानले जाई. अनेकांना सोन्याच्या किंवा चांदीच्या खाणींमध्ये जबरदस्तीने काम करायला लावले; एक खाण बोलिव्हियामधील पोटोसी येथे एका पर्वतात होती ज्यात चांदीची विपुल धातुके होती. तिथल्या अत्यंत वाईट परिस्थितीत तग धरून राहण्यासाठी अत्याचार सोसणारे इंडियन लोक कोकोच्या पानाने नशा येते म्हणून ते वापरू लागले. १९ व्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत पेरू आणि बोलिव्हियाला स्पेनपासून स्वातंत्र्य प्राप्त झाले नव्हते.
इंकांचे आधुनिक काळातले वंशज
या आधुनिक युगात इंकांच्या वंशजांची काय स्थिती आहे? लिमा या पेरूव्हियन राजधानी शहरात इतर आधुनिक शहरांप्रमाणेच लाखो नागरिक आहेत. पण, प्रांतांमध्ये पाहिले, तर येथे काळ शंभर वर्षांआधी थांबला असेच वाटते. अनेक एकाकी गावांवर अजूनही कॅथलिक पाळकांचे वर्चस्व आहे. इंडियन शेतकऱ्याला गावाच्या चौकातले कॅथलिक चर्च हेच मुख्य आकर्षण आहे. शोभिवंत पेहराव केलेल्या संतांच्या मूर्ती, रंगीबेरंगी दिवे, सुवर्ण वेदी, जळत्या मेणबत्या, पादरी पार पाडत असलेले गूढ विधी, आणि विशेषतः नृत्ये व सण—या सर्वांमुळे त्याचे मन रमते. परंतु, मन रमवणाऱ्या या मोहक गोष्टी असताना सुद्धा प्राचीन विश्वास काही केल्या सुटले नाहीत. आणि कोकोच्या पानाचा अजूनही सर्रास उपयोग केला जातो; त्याच्यात गूढ शक्ती आहे अशी समजूत आहे.
इंकांच्या या वंशजांनी—ज्यांतील पुष्कळ आता संमिश्रित आहेत—आपल्या अजिंक्य प्रवृत्तीने आपली रंगीबेरंगी नृत्ये आणि विशिष्ट वायनो संगीत जपून ठेवले आहे. सुरवातीला ते अनोखळींसोबत इतके मिळूनमिसळून वागत नसले, तरी त्यांच्या रक्तात असलेली अतिथ्यशीलता ते दाखवतात. ज्या लोकांना व्यक्तिगतपणे या इंका साम्राज्याच्या वंशजांची ओळख आहे—जिवंत राहण्यासाठी त्यांच्या दररोजची धडपड जे पाहतात आणि जे त्यांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न करतात—त्यांना यांची कहानी हृदय पिळवटून टाकणारी वाटते!
शिक्षणामुळे बदल
तितिकाका सरोवराजवळच्या सोका गावातल्या आयमारा बोलणाऱ्या इंडियन लोकांची एक वंशज, वालेंटीन आरीसाका हिने सावध राहाला! मुलाखत देताना म्हटले: “मी यहोवाची साक्षीदार होण्याआधी फक्त नावापुरती कॅथलिक होते. माझे काही मित्र-मैत्रिणी आणि मी सुद्धा मूर्तिपूजक प्रथा आचरत राहिले. मी कोकोचं पान सुद्धा चघळायचे, पण आता मात्र ते सगळं काही सोडून दिलंय.”
आपुस असंतुष्ट तर होणार नाही ना, अशी सतत भीतीची जाणीव करून देणाऱ्या अनेक अंधश्रद्धांची आठवण करीत ८९ वर्षांच्या पेट्रोनीला मामानी म्हणाल्या: “पर्वताच्या दैवतांना प्रसन्न करण्यासाठी आणि माझा उदरनिर्वाह होईल याची खात्री करण्यासाठी मी न चुकता अर्पणे घेऊन जायचे. मला त्यांना कोणत्याच प्रकारे असंतुष्ट करून स्वतःवर पीडा ओढायची नव्हती. आता, माझ्या या उतरत्या वयात माझा दृष्टिकोन बदलला आहे. बायबल आणि यहोवाच्या साक्षीदारांमुळेच माझ्या त्या विचारसरणीतून मी मुक्त झाले.”
यहोवाचे साक्षीदार अनेक केचुआ आणि आयमारा भाषिकांना वाचायला शिकवत आहेत. मग हे लोक इतरांना बायबल शिकवतात. अशा तऱ्हेने, हजारो इंका आणि स्पॅनिश इंडियन लोकांना आपले जीवन उज्ज्वल करण्याचे शिक्षण दिले जात आहे. लवकरच संबंध पृथ्वीवर न्याय, शांती आणि धार्मिकतेचे जे नवीन जग स्थापन होणार आहे ज्याविषयी देवाने बायबलमध्ये अभिवचन दिले आहे त्याविषयीही ते शिकत आहेत.—२ पेत्र ३:१३; प्रकटीकरण २१:१-४.
[तळटीप]
“इंका” हा शब्द इंका साम्राज्याच्या सर्वोच्च शासकाला लागू होऊ शकतो त्याचप्रमाणे मूळ रहिवाशांनाही लागू होऊ शकतो.
[१५ पानांवरील नकाशा]
(For fully formatted text, see publication)
इंकांचे सुवर्ण साम्राज्य
दक्षिण अमेरिका
कूस्को
पोटोसी
इंका साम्राज्य
कॅरिबियन समुद्र
प्रशांत महा सागर
कोलंबिया
इक्वादोर
अँडीज
पेरू
काजामार्का
लिमा
पाचाकामाक
व्हिल्काबांबा
माचू पिक्चू
कूस्को
तितिकाका सरोवर
बोलिव्हिया
चिली
अर्जेंटिना
[१६ पानांवरील चित्र]
वरती: या मूळ सूर्यमंदिरावर कूस्कोतील हे कॅथलिक चर्च बांधले आहे
[१६ पानांवरील चित्र]
डावीकडे: चुकवीटो येथील एका मंदिरातले इंका-पूर्व लिंगाचे प्रतीक
[१६ पानांवरील चित्र]
उजवीकडे: इंकांच्या बळींचे रक्त या शिळा शिल्पांवरून खाली ओघळायचे
[१७ पानांवरील चित्र]
उजवीकडे: कूस्कोनजीक माचू पिक्चू येथील जलसिंचित सोपानशेती
[१७ पानांवरील चित्र]
खाली: माचू पिक्चू येथे एका प्राचीन दरवाजातून दिसणारे दृश्य
[१७ पानांवरील चित्र]
खाली उजवीकडे: साक्सावामानच्या किल्ले-मंदिराच्या १०० टन वजनाच्या शिळा