वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १/८ पृ. १०-१२
  • तुमच्या कामाचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुमच्या कामाचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • उत्साहीपणा दाखवा
  • सर्वतोपरी प्रयत्न करा
  • तुमचे काम “सजवा”
  • शिकत राहा
  • अखेरच्या काही सूचना
  • ‘यहोवावर आशा ठेवा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२२
  • सुधारणूक स्वीकारलेला आदर्श मनुष्य
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • ईयोबाने यहोवाच्या नावाचे गौरव केले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
  • समस्येत असताना तुम्हाला ईयोबच्या पुस्तकातून मदत होऊ शकते
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १/८ पृ. १०-१२

तुमच्या कामाचा तुम्हाला कंटाळा आला आहे का?

तुम्ही कदाचित दिवसा आठ तास काम करत असाल. एवढा वेळ, एवढ्याशा आयुष्यातले मोलाचे क्षण एखाद्या कंटाळवाण्या कामासाठी घालवणे वाजवी वाटत नाही! तरीपण, २० व्या शतकातल्या पुष्कळशा कामात तोच तोचपणा आहे आणि म्हणून कामगाराला आत्मसंतुष्टी प्राप्त होत नाही.

म्हणून आपले काम रुचिपूर्ण बनवल्यास तुम्हाला पुष्कळ लाभ होऊ शकतो. तुम्हाला काम केल्याने अधिक आनंद मिळतो आणि पुढे तुम्हाला करावे लागेल अशा कोणत्याही कामाला रुचिपूर्ण बनवण्याचे रहस्य तुम्ही शिकता. तर मग, हे साध्य करण्याचे काही मार्ग आपण शोधून काढू या.

उत्साहीपणा दाखवा

काही व्यावसायिक सल्लागार शिफारस करतात की, तुम्ही आपले काम जणू ते खूप आवडत असल्यासारखे करावे. तसे केल्यास, कालांतराने तुम्हाला ते काम खरेच आवडू लागेल.

‘पण माझ्या नोकरीबद्दल मला कधीच उत्साह वाटला नाही!’ असे तुम्ही म्हणाल. तुमची नोकरी कदाचित ॲसेंबली-लाईनच्या कामासारखी ठराविक असेल. किंवा तुम्ही इतकी वर्षे तीच नोकरी केली असेल की त्यात नव्याने रस घेणे तुम्हाला अशक्य वाटत असेल. परंतु, हसरा चेहरा ठेवणे आणि सरळ उभे राहणे अशा साध्या सोप्या पद्धतींमुळेही तुम्हाला तुमच्या कामाबद्दल अधिक उत्साहीपणा वाटायला मदत मिळेल.

त्याचप्रमाणे पूर्णपणे आपल्या कामावर लक्ष केंद्रित केल्यानेही मदत मिळू शकते. यंत्रवत काम करू नका, आणि काम करत असताना जेवणाच्या सुटीचा, शनिवार-रविवारच्या कार्यक्रमांचा किंवा दुसऱ्‍या एखाद्या कामाचा विचार करू नका. हाती घेतलेल्या कामात पूर्णतः गढून जाणे केव्हाही शहाणपणाचे असते. त्याचा परिणाम? तुम्हाला तुमचे काम आवडू लागेल आणि वेळ लवकर जात राहिल्यासारखा वाटेल.

तुम्हाला मनापासून आवडत असलेल्या कामात गढून गेल्यावर साहजिकच हे घडते. एरवी कंटाळवाण्या वाटणाऱ्‍या कामात जबरदस्तीने पूर्ण लक्ष देऊन तुम्ही अगदी हेच साध्य करू शकता.

सर्वतोपरी प्रयत्न करा

सर्वतोपरी प्रयत्न केल्याने तुम्हाला कामाबद्दल आत्म-संतुष्टी मिळू शकते. जेव्हा तुम्हाला नावडणारे काम मिळते तेव्हा अधिक कष्ट न घेता कसेबसे ते पूर्ण करावे या सामान्य धारणेच्या विरोधात हा सल्ला आहे. पण हलगर्जीपणा, दिरंगाई आणि कमीतकमी परिश्रम यांमुळे तुमची सगळी शक्‍ती खर्च होईल आणि उलट अस्वस्थता आणि थकवा आणखीनच वाढेल. काही बाबतीत, कामावरून तणावपूर्ण, अस्वस्थ आणि थकलेल्या अवस्थेत घरी परतणाऱ्‍या व्यक्‍तीला परिश्रमाने काम न केल्याने बहुधा असे वाटत असावे.

बायबलनुसार, हाती घेतलेल्या कामासाठी मेहनत केली तर मोकळा वेळही आणखी मजेत जातो. “मनुष्याने खावे, प्यावे व श्रम करून आपल्या जिवास सुख द्यावे यापेक्षा त्याला काहीहि इष्ट नाही.” (उपदेशक २:२४) काहींना हे कालबाह्‍य धोरण वाटेल पण इतरजण हे अबाधित तत्त्व लागू करत आहेत. आपल्या कठीण श्रमाच्या फळाचा आनंद घेण्याशिवाय इतर “काहीहि इष्ट नाही” हे त्यांना मान्य आहे. काम करण्याचा आनंद (इंग्रजी) हे पुस्तक कबूल करते: “एखादे काम उत्तमरितीने पार पाडल्यावर आत्म-समाधानाचा आनंद मिळतो.”

म्हणून, एखाद्या कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कदाचित ताजेतवाने वाटेल. उगाच नावापुरते काम करण्याऐवजी अधिक काम करा आणि तुम्हाला आनंद वाटेल. महत्त्वाची सर्व कामे आधी आटपून घेतल्यावर तुम्ही, दिरंगाई केल्यामुळे थकून जाणाऱ्‍या व्यक्‍तीपेक्षा, जेवणाच्या सुटीचा आणि सप्ताहांतांचा जास्त आनंद लुटू शकता.—पडताळा एस्तेर १०:२; रोमकर १२:११; २ तीमथ्य २:१५.

इतरांसोबत स्पर्धा करण्याऐवजी स्वतःशीच प्रतिस्पर्धा करा. (गलतीकर ६:४) नवीन प्रमाण, नवी ध्येये राखा. सर्वोत्कृष्ट काम करण्याची पराकाष्ठा करा. एका स्त्रीचे त्याच त्याच प्रकारचे शिवणकाम होते; काहींना हे काम अगदीच कंटाळवाणे वाटत असेल पण तिने मात्र ठराविक वेळेत किती काम आटपते त्याचा जणू खेळच केला. तिने प्रत्येक तासाचे उत्पन्‍न किती होते ते पाहिले आणि नंतर ते वाढवण्याचा प्रयत्न केला. तिला आपले काम खरोखर आवडते, कारण आपल्याकडून होईल तितके काम करण्याचा ती प्रयत्न करते.—नीतिसूत्रे ३१:३१.

तुमचे काम “सजवा”

डेनिस टी. जाफी आणि सिंथिया डी. स्कॉट हे डॉक्टर अशी शिफारस करतात: “तुमचे काम म्हणजे रिकामे घर आहे असे समजा. तुम्ही तेथे राहायला जाता आणि त्याची रचना वगैरे पाहता. मग तुम्हाला नवनवीन कल्पना सुचू लागतात. तुम्ही कुठं काय ठेवायचं ते ठरवता आणि त्यानुसार सजावट करता आणि तेव्हा कुठं घराला घरपण येतं; कारण त्यावर तुमची छाप असते.”

बहुतेकदा काम हाती सोपवताना तुम्हाला त्याचे नियम आणि सूचना समजावल्या जातात. जितके आपल्याला सांगितले आहे तेवढ्यापुरतेच काम करणे म्हणजे रिकाम्या घरात राहण्यासारखे होईल. त्याला वेगळेपण असे नसते. पण, तुम्ही जर त्यात तुमच्या शैलीची छटा दिली तर तुमचे काम अधिक रुचिपूर्ण बनेल. दोन व्यक्‍ती एखाद्या गोष्टीची सारखीच ‘सजावट’ कधीही करणार नाहीत. एका वेटरला नियमित ग्राहकांच्या ऑर्डर्स तोंडपाठ झाल्या असतील. तर दुसऱ्‍याचे विनम्रता आणि शिष्टाचार दाखवणे हे गुण असतील. दोघांनाही आपले काम आवडते कारण दोघांचाही त्यात कार्यभाग असतो.

शिकत राहा

कामात आनंद मिळवण्याचा दुसरा एक मार्ग म्हणजे शिकणे. टेन्शन टर्नअराउंड हे पुस्तक सांगते की, आपले वय वाढते तसे माहिती मिळवण्याची मेंदूची क्षमताही वाढते. यावरून आधी उत्साहाने करत असलेल्या गोष्टी आता आपल्याला कंटाळवाण्या का वाटतात याचे स्पष्टीकरण मिळते. यावर उपाय म्हणजे, नवनवीन गोष्टी शिकून नवीन माहिती मिळवण्याची मेंदूची गरज भागवणे होय.

तुमच्या कामाविषयी अधिक शिकून घेतल्याने कालांतराने तुम्हाला अधिक आवडणारे काम दिले जाईल. पण तसे झाले नाही, तरी शिकण्याच्या या क्रियेमुळे तुमचे काम अधिक आनंदविणारे आणि समाधानकारक बनेल. चार्ल्झ कॅमरन आणि सुझान एल्युसॉर दाखवतात: “शिकण्यामुळे केवळ तुमच्या क्षमता वाढून तुमचा आत्मविश्‍वास वाढतो इतकेच नव्हे तर, जीवनाप्रती तुमच्या सामान्य दृष्टिकोनावरही त्याचा परिणाम होतो: की समस्या सोडवल्या जाऊ शकतात, अडीअडचणींवर मात केली जाऊ शकते, भीती घालवता येते, आणि तुम्ही कल्पना केली असेल त्यापेक्षाही अधिक गोष्टी साध्य करता येतात.”

‘पण,’ तुम्ही म्हणाल, ‘मी तर माझ्या कामाविषयी आहेनाही ती सर्व माहिती केव्हाचीच जाणून घेतली!’ तसे असल्यास, तुमच्या कामाशी अप्रत्यक्षरित्या संबंधित असलेल्या गोष्टींविषयी तुम्ही शिकून घेऊ शकता का? उदाहरणार्थ, मानवी संबंध किंवा तुमची साधने यांविषयी आणखी शिकून घ्यावेसे तुम्हाला वाटेल. कदाचित आणखी चांगला ऑफिस मेमो कसा लिहावा किंवा आणखी चांगली सभा कशी घ्यावी हे तुम्ही शिकू शकता. सुपरव्हायझरांसोबत आणखी उत्तम तऱ्‍हेने वागण्याचे तुम्ही शिकू शकता.

या सर्व गोष्टी तुम्ही कशा काय शिकून घेणार बरे? कदाचित तुमच्या कंपनीद्वारे असे काही कोर्सेस घेण्याची सोय आहे ज्यांचा फायदा तुम्ही घेऊ शकता. किंवा एखाद्या पुस्तकालयात अगदी तुम्हाला हवी असलेली पुस्तके असतील. पण माहिती मिळवण्याच्या इतक्या स्पष्ट दिसून न येणाऱ्‍या उगमांकडे दुर्लक्ष करू नका. कामावरील लोकांचे निरीक्षण करणे आणि त्यांच्या क्षमता आणि उणिवा निरखणे हे देखील एक प्रकारचे शिक्षणच असेल. तुम्ही स्वतःच्या चुकांपासून शिकू शकता आणि काय योग्य केले ते पाहून तुमच्या यशांपासूनही शिकू शकता. स्वतःच्या अनुभवांवरून आणि इतरांचे निरीक्षण करून तुम्ही जे शिकता ते तुम्हाला एखाद्या पुस्तकात वाचायला किंवा वर्गात ऐकायलाही मिळणार नाही.

अखेरच्या काही सूचना

तुमच्या कामाबद्दल तुम्ही आणखी एका दृष्टिकोनातून पाहू शकता. तुमच्यावर अन्याय होतो—इतरांनाच सगळ्या संधी मिळतात आणि तुम्हाला मात्र तुमच्या मनासारखे काम करायला एकही संधी दिली जात नाही असे तुमचे मत असेल. तुमच्याशी सहमत असलेल्या व्यक्‍तींशी तुम्ही तास न्‌ तास यावर चर्चा करत राहाल आणि हे सगळे खरे आहे अशी तुमची खात्रीही पटेल.

पण ते खरे नसेल. ज्यांना आपले काम आवडते अशा बहुतेक लोकांनी त्या कामात रस घ्यायला शिकले आहे. वास्तुशिल्पाचे काम आवडणाऱ्‍या व्यक्‍तीला कदाचित बस चालवणे देखील आवडेल. का? कारण आपल्या कामात सर्जनशीलता दाखवल्याने त्याला आनंद आणि समाधान मिळते.

म्हणून हा नकारात्मक विचार डोक्यातून काढून टाका ज्यामुळे तुमचा सप्ताहांत आनंदात जातो पण कामाचा आठवडा मात्र निराशेत जातो. गतकाळातल्या अपयशांचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नका, पुढे आता काय चुका घडणार आणि दुसरे आपल्याबद्दल काय विचार करत आहेत असा विचार करत बसू नका. तुमच्यासमोर असलेल्या कामात लक्ष घाला. त्याकडे पूर्ण लक्ष द्या. आपल्या मनपसंत छंदात दंगून जाता तसे त्यात गढून जा. आटोकाट प्रयत्न करा आणि उत्तमपणे केलेल्या कामाबद्दल आनंद माना.

[११ पानांवरील चौकट/चित्र]

आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका

नीतिसूत्रे २७:२३, २४ येथे बायबल म्हणते: “तू आपल्या शेरडांमेढरांची स्थिति पाहत जा. आपल्या कळपावर चांगली नजर ठेव; कारण संपत्ति सदा टिकत नाही, राजमुकुट तरी पिढ्यानपिढ्या टिकेल काय?” त्याचा काय अर्थ होतो?

त्याचा अर्थ होतो की, धन (संपत्ती) आणि प्रमुख स्थाने (राजमुकुट) जरी मिळवली तरी ते सहसा तात्पुरतेच असते. म्हणून, बायबल समयात एका मेंढपाळाने आपल्या मेंढरांची काळजी घेण्याकडे मेहनतीने लक्ष दिले अर्थात ‘आपल्या कळपावर चांगली नजर ठेवली’ तर तो बुद्धिमान होता. त्यानंतरची तीन वचने दाखवतात त्यानुसार, त्याचा परिणाम म्हणजे कामगारासाठी आणि त्याच्या कुटुंबासाठी भौतिक सुरक्षा मिळणार होती.—नीतिसूत्रे २७:२५-२७.

आजच्या बाबतीत काय? सहसा लोक खूप पैसा-अडका कमावण्याचे किंवा प्रमुख स्थान मिळवण्याचे ध्येय ठेवतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या चालू नोकऱ्‍या सोडून देता येतील अशी त्यांची आशा असते. काहींच्या योजना वास्तविक असतात; इतरांची केवळ स्वप्ने असतात. दोन्ही बाबतीत, चालू नोकरीला तुच्छ समजणे किंवा त्याकडे कानाडोळा करणे हे सुज्ञपणाचे नव्हे. तीच नोकरी कदाचित मिळकतीचा सर्वात विश्‍वसनीय मार्ग आहे आणि कदाचित भवितव्यातही असेल. म्हणून एका व्यक्‍तीने आपल्या “कळपावर” लक्ष ठेवणे अर्थात आपल्या विश्‍वसनीय नोकरीच्या क्षेत्रावर पूर्ण ध्यान देणे अधिक शहाणपणाचे आहे. त्याने असे केल्यास, सद्य आणि भावी आर्थिक सुरक्षा मिळण्याची शक्यता आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा