वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g98 १/८ पृ. २८-२९
  • जगावरील दृष्टिक्षेप

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • जगावरील दृष्टिक्षेप
  • सावध राहा!—१९९८
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • जिवघेण्या गैरसमजुती
  • विश्‍वभर ड्रगचा अवैध वापर
  • रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?
  • संसर्गजन्य रोगांची वाढ
  • एका ‘पवित्र नगरीच्या’ भक्‍तीचा ऱ्‍हास
  • भारताला टीबीचा तडाखा
  • अंगच्छेदित बालिका, किशोरवयीन प्रसव
  • प्रदुषण व बाल्यावस्थेतील कर्करोग
  • रक्‍त आणि एचआयव्ही संसर्ग
  • किशोरवयीन शरीरसंबंध
  • हात धुण्याचा प्रश्‍न
  • हत्तीचे दळणवळण
  • क्षयरोगाविरुद्ध एक नवीन पावित्रा
    सावध राहा!—१९९९
  • विजय आणि दुर्दशा
    सावध राहा!—१९९८
  • क्षयाचे पुन्हा आक्रमण!
    सावध राहा!—१९९६
  • प्राणघातक मिलाफ
    सावध राहा!—१९९८
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९८
g98 १/८ पृ. २८-२९

जगावरील दृष्टिक्षेप

जिवघेण्या गैरसमजुती

द युरोपियन या वर्तमानपत्राने दिलेल्या अहवालानुसार सन १९७७ मध्ये, केवळ एका क्षुल्लक शब्दाची गैरसमजूत, विश्‍वातील महाभयंकर अपघातास कारणीभूत ठरली. एका ७४७ विमानाच्या डच वैमानिकाने, आम्ही “टेक ऑफवर” आहोत असा बिनतारी संदेश पाठवला; पण टेनेराईफ, कॅनरी बेटांवरील, हवाई वाहतूक नियंत्रकाने मात्र त्याचा असा अर्थ लावून घेतला, की सध्या विमान गतिहीन स्थितीत आहे. खरे तर वैमानिकाला असे सांगायचे होते, की दाट धुके जमलेल्या धावपट्टीवरून वेग घेत, विमान आता उड्डाण करण्याच्या तयारीत आहे. परिणामी, हे विमान दुसऱ्‍या एका ७४७ विमानाला जाऊन धडकले व ५८३ लोकांचे जीव गेले. याचप्रमाणे, भारतातील नवी दिल्लीमध्ये घडलेला १९९६ हवाई अपघातासाठी देखील, अतिशय अपुरी भाषा कौशल्ये कारणीभूत ठरली; आणि त्यामध्ये देखील ३४९ लोकांचे जीव गेले. अशाप्रकारच्या घोडचुका क्वचितच होत असल्या व विमान कर्मचाऱ्‍यांना मानक वैमानिकी इंग्रजीचे कडक प्रशिक्षण मिळत असले तरी काही विमान कर्मचाऱ्‍यांना केवळ विशिष्ट वैमानिकी शब्दच अवगत असतात. तातडीच्या वेळी मात्र त्यांचे भाषाज्ञान कदाचित त्यांना साथ देणार नाही. अचूक वैमानिकी संदेशवहनाची खात्री करण्यासाठी तज्ज्ञमंडळी, वैमानिकासाठी कॉम्प्युटर तंत्रशास्त्र पुरवण्याची शिफारस करते.

विश्‍वभर ड्रगचा अवैध वापर

एक युएन अहवाल म्हणतो, की एकंदर आंतरराष्ट्रीय व्यापार व उत्पन्‍नातील अवैध ड्रगचे प्रमाण जवळजवळ ८ टक्के, म्हणजे प्रती वर्षी सुमारे ४०० अरब डॉलर इतके आहे. हा ३३२ पानी अहवाल, अवैध ड्रग्समुळे संबंध विश्‍वावर झालेल्या परिणामाचा पहिलाच व्यापक अभ्यास आहे. सदर अहवालानुसार, जगाच्या लोकसंख्येतील जवळजवळ २.५ टक्के—म्हणजे सुमारे १४ कोटी लोक—मारीजुआना किंवा त्यापासून तयार केले जाणारे हाशिश ओढतात. तीन कोटी लोक ॲम्फिटामाइन यासारखे उत्तेजक घेतात, १.३ कोटी कोकेनचे काही प्रकार घेतात, तर ८० लाख लोक हेरॉइन घेतात. कायदा अंमलबजावणी एजेन्सीजमार्फत हजारो टन मारीजुआना, कोकेन, हेरॉइन आणि मॉरफीन जप्त केले जात असले तरी आणखीन पुष्कळसे असे आहेत जे त्यांच्या हातून निसटले आहे. अहवालाने म्हटले, की अवैध ड्रग्सपैकी हेरॉइनचे केवळ १० ते १५ टक्के आणि कोकेनचे सुमारे ३० टक्के जप्त केले जातात. आंतरराष्ट्रीय ड्रग्स व्यवहार अतिशय गुंतागुंतीचा आहे. युएन ड्रग नियंत्रण कार्यक्रमाच्या महासंचालिका, जोर्जो जॉकोमेल्ली म्हणतात: “ही समस्या सबंध जगात इतकी पसरली आहे, की राष्ट्रे वैयक्‍तिकपणे ती सोडवूच शकत नाहीत.”

रिमोट कंट्रोल कोणाच्या हातात?

इटलीतील युरीस्पेसच्या (राजकीय, अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय संस्था) संशोधकांनी अलीकडेच, टीव्ही पाहण्याच्या सवयींवर केलेल्या एका अभ्यासाचे निष्कर्ष प्रकाशित केले. जवळजवळ २,००० इटालियन कुटुंबांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एका वृत्तपत्रातील लेखाने ज्यास आधुनिक काळातील कुटुंबातला राजदंड असा किताब बहाल केला तो टीव्हीचा रिमोट कंट्रोल सहसा कोणाच्या हातात असतो व सहसा कोण तो चालवतो असाही एक प्रश्‍न विचारला गेला होता. बहुतांश प्रकरणांत तो वडिलांच्या हातात असल्याचे सांगितले गेले. चॅनल्स बदलण्याचे निर्णय घेणाऱ्‍यांत दुसऱ्‍या क्रमांकावर मुले होती. रिमोट कंट्रोल हाती घेण्याच्या या संघर्षात आई मात्र कुटुंबात सगळ्यात शेवटी होती.

संसर्गजन्य रोगांची वाढ

नासाऊशी नॉई प्रेस्सीचा असा अहवाल आहे की, “मागील २० वर्षांत, संपूर्णतः नवीन व अतिशय सांसर्गिक स्वरूपाच्या ३० रोगांनी आपली डोकी वर काढली आहेत.” यांपैकी अनेक रोग—जसे की, ईबोला, एड्‌स आणि हेपाटायटीस सी—यांवर कोणताच उपाय नाही. यांशिवाय मलेरिया, कॉलरा आणि क्षयरोग हे संसर्गजन्य रोगही वाढत आहेत. का बरे? जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते, “बहुतांश प्रतिजैविकांप्रती अधिकाधिक विषाणूंची प्रतिकार शक्‍ती वाढत असल्यामुळे अनेक रोग पुन्हा पुन्हा निर्माण होत आहेत. प्रतिजैविकांचे उत्पादन अतिशय महागडे असल्यामुळे फारच कमी प्रमाणात नवीन प्रतिजैविके उत्पन्‍न केली जात आहेत.” उपाय म्हणून, डब्ल्यूएचओने सरकारांना आणि औषध उत्पादन कंपन्यांना, “नवीन प्रतिजैविके, तसेच सांसर्गिक रोगांच्या सुधारित चाचणी पद्धती विकसित करण्याच्या उद्देशाने जादा पैसा गुंतवण्याचे” आवाहन केले आहे. १९९६ साली, या संसर्गजन्य रोगांनी विश्‍वभरात सुमारे ५.५ कोटी लोकांचे बळी घेतले.

एका ‘पवित्र नगरीच्या’ भक्‍तीचा ऱ्‍हास

रोमला एक पवित्र नगरी म्हटले जात असले व तिच्या कॅथलिक चर्चचा प्रमुख, बिशप असला तरी रोम शहर हे काहींना कदाचित वाटेल तितके धार्मिक नाही. रोमच्या तिसऱ्‍या विद्यापीठाने संचालित केलेल्या राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार, सर्व इटालियन्सपैकी सुमारे १० टक्के असे म्हणतात, की ख्रिस्ती धर्मात त्यांना “मुळीच” रस नाही; पण रोममध्ये मात्र असे म्हणणाऱ्‍या लोकांची टक्केवारी १९ आहे. ला रेपब्लिकॉ वृत्तपत्र माहिती देते, की याशिवाय २१ टक्के रोमन लोकांना कॅथलिक चर्चमध्ये “फारच कमी” रस आहे. दुसऱ्‍या बाजूला पाहता धर्माविषयी फार गोडी असणाऱ्‍या रोमवासियांची संख्या निव्वळ १० टक्के आहे. समाजशास्त्रज्ञ, रोबर्टो चीप्रीआनी यांच्या मते, ४ रोमन्सपैकी केवळ १ जण, आचार आणि वर्तणुकीविषयी चर्चच्या आज्ञांचे काटेकोर पालन करतात.

भारताला टीबीचा तडाखा

क्षयरोगाचे (टीबी) जंतू नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात असतानाही, जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) प्रतिपादन करते, की भारतात २ प्रौढांपैकी एकाला हा रोग जडलेला आहे. भारतातील ९० कोटींहून अधिक लोकांमध्ये, प्रती वर्षी २० लाखांहून अधिकांना सक्रिय टीबी जडतो, तर सुमारे ५,००,००० लोक याच्यापायी दगावतात, असा अहवाल द एशियन एज वृत्तपत्र देते. डब्ल्यूएचओ यानुसार, संक्रमित लोकांची संख्या, तसेच इतरांना त्याचे संक्रमण होण्याचा धोका, हा महाभयंकर आहे. या टीबीग्रस्तांना या रोगास तोंड द्यावे लागते इतकेच नाही तर या रोगास सहसा जोडून येणाऱ्‍या कलंकासह देखील त्यांना जीवन कंठावे लागते. परिणामतः शेजारीपाजारी, मालक व सहकर्मी, त्यांना टाळण्याची शक्यता आहे. टीबी झालेल्या नववधू आता जनन अक्षम आहेत असे समजून त्यांना माहेरी पाठवून दिले जाते.

अंगच्छेदित बालिका, किशोरवयीन प्रसव

आरोग्य, पोषण आणि मुलांचे शिक्षण यांवरील राष्ट्रांची प्रगती या युनायटेड नेशन्स चिल्ड्रन फंड प्रकाशनाची १९९६ आवृत्ती म्हणते: “दर वर्षी सुमारे २० लाख बालिकांचे अंगच्छेदन केले जाते. एकूण अंगच्छेदनाच्या प्रकरणांतील ७५% इजिप्त, इथियोपिया, केनिया, नायजेरिया, सोमालिया आणि सुदान या देशांतील आहेत. जिबुती आणि सोमालियामध्ये ९८% बालिकांचे अंगच्छेदन केलेले आहे.” त्यामुळे अनामिक वेदना तर होतातच, शिवाय या पद्धतींमुळे इन्फेक्शन, प्रदीर्घ रक्‍तस्राव, वंध्यत्व आणि मृत्यू देखील परिणीत होतो. “कोणताही धर्म अंगच्छेदनाची मागणी करत नाही. कौमार्य जपण्याकरता, विवाह योग्यता सुनिश्‍चित करण्यासाठी व लैंगिकता नियंत्रित करण्यासाठी निर्माण केलेली ही केवळ एक रुढी आहे,” असा अहवाल म्हणतो. हा प्रघात विधिबहिष्कृत करण्याच्या हेतूने, स्त्री हक्क व बाल कल्याण हितचिंतक गट आणि संघटना सरकारवर दबाव आणत आहे.

दुसरा एक अहवाल दाखवून देतो, की अनेक देशांत किशोरवयीन प्रसव ही एक स्थायी समस्या बनली आहे. उदाहरणार्थ, औद्योगिक जगताकडे पाहू जाता, संयुक्‍त संस्थानांत याचे सर्वाधिक प्रमाण आढळते: प्रती वर्षी, १५ ते १९ वयोगटातील प्रत्येक १,००० मुलींपैकी ६४ प्रसव. या बाबतींत जपानचे प्रमाण सर्वात कमी असून, दर वर्षी केवळ चार इतकेच आहे. किशोरवयीन प्रसव एखाद्या तरुण स्त्रीचा विकास, शिक्षण आणि प्रगती यांवरच परिणाम करतात असे नाही, तर कदाचित अर्भकावरही यामुळे समस्या ओढवू शकतात, जसे की निकृष्ट निगा, दारिद्र्‌य आणि कुटुंबातील अस्थिर वातावरण.

प्रदुषण व बाल्यावस्थेतील कर्करोग

ब्रिटनच्या २२,४०० मुलांच्या २७ वर्षीय अभ्यासाचे विश्‍लेषण केल्यानंतर साथरोगशास्त्रज्ञांना आढळून आले की, प्रदूषण उगमस्थानाच्या पाच किलोमीटरच्या अंतरात जन्मलेल्या बालकांना इतर बालकांच्या तुलनेत, ल्यूकेमिया व बाल्यावस्थेतील इतर कर्करोगांचा धोका २० टक्के अधिक आहे. वायू प्रदूषकांच्या संपर्कात येणे ‘सर्वात धोकेदायक माध्यम’ आहे; ते बाल कर्करोगाच्या वाढत्या प्रकरणांना कारणीभूत होते, असा लंडनच्या द टाईम्सचा अहवाल आहे. यास कारणीभूत ठरणारे प्रदूषक म्हणजे पेट्रोलचा धूर किंवा मग ऑईल रिफायनरी, मोटारगाड्यांचे कारखाने, अणुरहित विद्युत स्थानके, पोलाद व सिमेन्टचे कारखाने यांसारख्या औद्योगिक कारखान्यांतून बाहेर टाकली जाणारी इतर बाष्पनशील कार्बनी रसायने असल्याचे दिसून येते. अभ्यास असाही अहवाल देतो, की हमरस्ता किंवा रेल्वेमार्गापासून चार किलोमीटरच्या अंतरात जन्मलेल्या बालकांमध्ये, कर्करोगामुळे ओढवणाऱ्‍या मृत्यूचे प्रमाण अधिक असते. यासाठी पेट्रोल आणि डिझेल इंधनच बहुधा जबाबदार आहे असा अहवाल देणाऱ्‍यांचा दावा आहे.

रक्‍त आणि एचआयव्ही संसर्ग

विश्‍वभर एचआयव्ही/एड्‌स यांची लागण झालेल्या जवळजवळ २.२ कोटी लोकांपैकी ९० टक्क्यांहून अधिक लोक विकसनशील राष्ट्रांत वास्तव्य करतात. “विकसनशील राष्ट्रांत नव्यानेच झालेले १० टक्क्यांपर्यंतचे एचआयव्ही संसर्ग, रक्‍त संक्रमणांमुळे होतात,” असा अहवाल पानॉस नामक लंडन-स्थित माहिती संघटना देते. प्रयोगशाळेत केलेल्या एचआयव्ही चाचण्या संपूर्णतः भरवशालायक नसल्यामुळे अनेकानेक राष्ट्रांत रक्‍त पुरवठा सुरक्षित नसतो. उदाहरणार्थ, पाकिस्तानमध्ये असलेल्या एकूण रक्‍तपेढ्यांपैकी निम्म्याहूनही कमी रक्‍तपेढ्यांमध्ये एचआयव्ही चाचणीची उपकरणे आहेत. परिणामतः, नव्यानेच एचआयव्हीची लागण झालेल्या एकूण लोकांपैकी १२ टक्के रक्‍त संक्रमणांमुळे झाली. १५ वर्षांपूर्वी एड्‌सची पहिली प्रकरणे जगासमोर आली होती तेव्हापासून विश्‍वभरात जवळजवळ तीन कोटी लोकांना, या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्‍या एचआयव्ही विषाणूंची लागण झाली.

किशोरवयीन शरीरसंबंध

विकेंड कॉन्कॉर्ड या नायजेरियन वृत्तपत्रानुसार, अलीकडेच केलेल्या एका अभ्यासात निदर्शनास आले की, “जगभरात नायजेरियन पौगंड, लैंगिकरित्या सगळ्यात सक्रिय आहेत.” १४ ते १९ वयोगटातील सुमारे ६८ टक्के मुलांनी आणि ४३ टक्के मुलींनी, ते “वयात येताच” लैंगिक समागम राखल्याचे कबूल केले. यांमुळे नको असलेली अगणित गर्भधारणा परिणीत झाली आहे. आणखीन एक अभ्यास दाखवून देतो, की “नायजेरियामध्ये, १९ वर्षे वयाखालच्या तरुणींमध्ये ७१ टक्के मृत्यू गर्भपाताच्या वेळी उद्‌भवणाऱ्‍या समस्यांशी निगडीत आहे,” असे कॉन्कॉर्डचे म्हणणे आहे.

हात धुण्याचा प्रश्‍न

ली कॉटीड्यन ड्यू मेडेसान या फ्रेंच वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या अलीकडील लेखाने, भोजन करण्याआधी किंवा शौचास जाऊन आल्यानंतर हात न धुण्याच्या चिंताजनक व अलीकडे वाढत चाललेल्या प्रघाताकडे लक्ष वेधले. डॉ. फ्रेडरीक साल्डमॉन यांच्या मतानुसार, वैयक्‍तिक स्वच्छतेची ही अगदीच क्षुल्लक गोष्ट एका मोठ्या आरोग्य समस्येचे रूप घेऊन, लवकरच एक सर्वव्याप्त समस्या बनेल. त्या लेखाने एका अभ्यासाच्या अहवालाचा उल्लेख केला, ज्यात इंग्लंडच्या पबमधील शेंगदाण्याच्या डिशेसमध्ये १२ लोकांच्या लघ्वीचे अंश असल्याचे आढळले. अमेरिकन शाळेतील आणखीन एका अभ्यासाने दाखवून दिले, की मुले नियमितपणे हात धुतात की नाही यावर एका शिक्षकाने नजर ठेवल्यामुळे, अपचन व श्‍वसन समस्यांमुळे शाळेला अनुपस्थित राहणाऱ्‍या मुलांची संख्या, अनुक्रमे ५१ व २३ टक्क्यांनी कमी झाली. लेखाच्या शेवटी, बालपणापासूनच मुलांना असे मूलभूत नियम शिकविण्याच्या महत्त्वावर भर दिला आहे.

हत्तीचे दळणवळण

हत्तीचे स्वरतंतू इतके मोठाले असतात, की ते उत्पन्‍न करत असलेल्या आवाजांची मूलभूत आवृत्ती, प्रती सेकंदास २० चक्र इतकी किंवा त्याहीपेक्षा कमी असते—जी मानवी श्रवणशक्‍ती पल्ल्यापेक्षा कितीतरी कमी असते. असे मंद आवाज दूरवर ऐकू येतात आणि दीड किलोमीटरच्या अंतरावरून देखील हत्ती ते ओळखू शकतात. एवढेच नव्हे तर १५० निरनिराळे आवाजही ते ओळखून आपल्या कौटुंबिक सदस्यांच्या व आपल्या कळपाच्या संकेतांना सकारात्मक प्रतिसाद देतात. अनोळखी हत्तींच्या संकेतांना हत्ती बहुधा प्रतिसाद देत नाहीत किंवा ते कानांवर पडताच ते अस्वस्थ होतात. केनियाच्या आमबोसेली राष्ट्रीय उद्यानातील संशोधनात्मक अभ्यासांनंतर, ब्रिटनमधील सूस्सेक्स विद्यापीठाच्या प्राणी वर्तन अभ्यासिका डॉ. कॅरन मकोम स्पष्टीकरण देतात: “स्वर दळणवळणाची अशी विस्तृत यंत्रणा इतर कोणत्याही सस्तन प्राण्यात पाहण्यात आलेली नाही,” असा लंडनच्या द टाईम्सचा अहवाल आहे.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा