कोणती गोष्ट लोकांना आनंदी बनविते?
दोन दशकांपासून, जगभरातील संशोधकांचा एक गट आनंद या विषयाचा पद्धतशीर अभ्यास करत आला आहे. त्यांचे निष्कर्ष? वैज्ञानिक अमेरिकन (इंग्रजी) या नियतकालिकाच्या अहवालानुसार, “आनंद, प्रामुख्याने बाह्य परिस्थितींवरच आधारित असल्याचे चिन्ह दिसत नाही.”
या वैज्ञानिक नियतकालिकाने असेही म्हटले: “धनसंपत्ती देखील आनंदाचे मापदंड नाही. लोकांच्या संस्कृती अधिकाधिक समृद्ध झाल्या तसतसा त्यांचा आनंद वाढत गेल्याचे आढळत नाही. . . . अनेक राष्ट्रांमध्ये मिळकत आणि आनंद यांच्यातील परस्पर संबंध अगदीच नगण्य आहे.”
आनंदी लोकांचे गुणवर्णन करणारी चार लक्षणे अभ्यासांनी सूचित केली आहेत: ते स्वतःवर प्रेम करतात व त्यांना पुष्कळ आत्म-सन्मान असतो, आपल्या वैयक्तिक जीवनावर आपले नियंत्रण असल्याचे त्यांचे मत असते, ते आशावादी व बहिर्मुख असतात. याशिवाय, चांगले वैवाहिक जीवन आणि घनिष्ठ वैयक्तिक नातेसंबंधही आनंदी जीवनाचे घटक असून, यांमुळे बहुतेक वेळा स्वास्थ्य व वयोमान वाढते.
वैज्ञानिक अमेरिकनने दिलेली ही माहिती लक्षवेधक आहे: “धार्मिक कार्यात क्रियाशील असलेले लोक देखील ते अधिक आनंदी असल्याचे सांगतात. एका गॅलप सर्वेक्षणातून निदर्शनास आले, की धार्मिक कार्यांत अभावानेच सहभागी होणाऱ्या लोकांच्या तुलनेत अतिशय धर्मपरायण लोक, स्वतःला खूप आनंदी म्हणण्याची शक्यता दुप्पट होती. इतर सर्वेक्षणांतूनही, उदाहरणार्थ, १४ राष्ट्रांतील १,६६,००० लोकांबद्दल १६ राष्ट्रांच्या संयुक्त अभ्यासातून असे आढळून आले आहे, की लोकांचे धार्मिक गोष्टींशी अतूट संबंध असले व ते वारंवार उपासना सेवेत उपस्थित राहिले की तथाकथित आनंद व समाधानी जीवनास खतपाणी मिळते.”
फार पूर्वी, स्तोत्रकर्त्या दाविदाने प्रकट केले होते, की वैयक्तिक आनंदाची नाळ, यहोवा देवाच्या संयुक्त उपासनेशी जुळलेली आहे; त्याने लिहिले: “आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला.”—स्तोत्र १२२:१.
म्हणूनच तर, प्रेषित पौलाने सहख्रिश्चनांना पुढील शब्दांत आर्जव केला: ‘आपले एकत्र मिळणे न सोडता प्रीती व सत्कर्मे करावयास उत्तेजन येईल असे आपण एकमेकांकडे लक्ष देऊ.’ (इब्री लोकांस १०:२४, २५) खरेच, देवाची उपासना करण्यासाठी, समान बहुमूल्य विश्वास बाळगणाऱ्या लोकांसोबत एकत्र येणे हा बायबल सत्याच्या चाहत्यांसाठी एक हर्षयुक्त प्रसंग आहे. लाखो यहोवाच्या साक्षीदारांना याची प्रचिती आली असून, तुमच्या आसपास असणाऱ्या राज्य सभागृहात त्यांच्यासोबत उपासनेसाठी एकत्र येऊन या गोष्टीचा अनुभव घेण्यास ते तुम्हालाही आमंत्रित करतात.