यहोवानं आमचा मार्ग सुरळीत केला
झूगच्या स्विस संस्थानांतील खाम नगरापाशी, १९२४ साली माझा जन्म झाला. माझ्या आईवडिलांना १० मुलं आणि ३ मुली, अशी एकंदर १३ अपत्ये होती. मी सगळ्यात थोरला. माझे दोन भाऊ अगदी लहानगे असतानाच वारले. महामंदीच्या काळात एका शेतमळ्यावर, आम्हा बाकीच्या मुलांवर अतिशय कर्मठ कॅथलिक संस्कार झाले.
बाबा तसे प्रामाणिक, मनमिळावू गृहस्थ होते पण वेळोवेळी त्यांना रागाचे झटके यायचे. आपल्या शंकेखोर वृत्तीमुळे आईनं त्यांच्यावर नको ते दोष लावले, की कधीकधी ते तिला मारझोडही करायचे. शेजारच्या बाईमाणसांसोबत त्यांनी गप्पागोष्टी केल्याचं तिला मुळीच आवडत नसे; खरे तर तिच्या कुशंका अगदीच निराधार होत्या. घरातील या वातावरणामुळं माझ्या पोटात खूप तुटायचं.
आईचा अंधश्रद्धेवर कमालीचा विश्वास होता. अगदी किरकोळ घटनांचा देखील, ‘पर्गेटरीतील करुण आत्म्यांकडून’ आलेलं एक चिन्ह, असा अर्थ ती लावून घ्यायची. असल्या भोळसट वृत्तीचा मला भयंकर तिरस्कार वाटायचा. पण पाळक मात्र, आईच्या खोट्या धार्मिक विचारसरणीस बढावा देणारे वाचन साहित्य देऊन, तिच्या अंधश्रद्धाळू विश्वासांना अधिकच खतपाणी घालत राहायचे.
माझे अनेक प्रश्न होते
बालपणापासूनच, देवाविषयी तसंच मानवाच्या नियतीविषयीचे अनेक प्रश्न माझ्या मनात घर करून होते. माझ्या तर्कबुद्धीला पटणारे अनुमान काढण्याचा मी प्रयत्न केला खरा, पण कितीतरी विसंगती होत्या! संत, चमत्कार इत्यादींवरील कॅथलिक प्रकाशनंही मी वाचली. पण, माझ्या तर्कबुद्धीची तृषा काही शमली नाही. मला असं वाटलं जणू मी अंधारात भटकट होतो.
माझ्या मनांत असलेल्या प्रश्नांवर मी अधिक विचार करू नये अशी ताकीद स्थानिक पाळकानं मला दिली. त्यांनी मला सांगितलं, की सगळं काही जाणून घेण्याची इच्छा, गर्वाचं लक्षण आहे आणि देव गर्विष्ठांचा विरोध करतो. मला विशेषतः तिरस्करणीय वाटणारी एक शिकवण म्हणजे, जो कोणी पापाची कबुली दिल्याशिवाय मरतो, त्याला एका जळत्या नरकात देव निरंतर यातना देईल. याचा अर्थ, पृथ्वीवरील बहुसंख्य लोकांना चिरकालिक यातना दिल्या जातील असा होत असल्यामुळे मी नेहमीच विचार करायचो की, ‘या गोष्टीचा मेळ, देवाच्या प्रीतीशी कसा लावला जाऊ शकतो बरं?’
पापांची कबुली देण्याच्या कॅथलिक प्रघाताचा मी विरोधही केला. अपवित्र विचार घोर पातक असून, पाळकाजवळ त्यांची कबुली देणं आवश्यक असल्याची शिकवण आम्हाला कॅथलिक शाळेत दिली गेली तेव्हा मी घाबरलोच. मी विचार करायचो, ‘मी सर्वकाही कबूल केलंय ना?’ की काही राहून गेलं होतं? नाहीतर माझी कबुली व्यर्थ होऊन माझी पातकांची क्षमाच होणार नाही.’ यांमुळं देवाची दया आणि क्षमा करण्याची त्याची स्वेच्छा यांविषयीच्या शंका-कुशंकांची बीजं माझ्या मनात पेरली गेली.
साधारण तीन ते चार वर्षं, माझं शोषण करणाऱ्या खिन्न विचारांशी मी लढा दिला. देवावर विश्वासच न ठेवण्याचा विचारही माझ्या मनात डोकावून गेला. पण मग मी विचार करायचो, ‘मी प्रयत्न करीत राहिलो तर योग्य मार्ग नक्कीच मिळेल.’ लवकरच, देव अस्तित्वात असल्याची मला खात्री पटली; पण तरीही माझ्या धार्मिक विश्वासांच्या संशयानं मला अद्यापही ग्रासलं होतं.
बालपणापासून मला जे काही शिकवलं होतं, त्यावरून माझा असा विश्वास होता की, “ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन,” असं येशू ख्रिस्तानं प्रेषित पेत्राला म्हटलं तेव्हा तो रोमन कॅथलिक चर्चविषयीच बोलत होता. (मत्तय १६:१८) मी असंही मानू लागलो, की सरतेशेवटी चर्चमधील चांगल्या गोष्टींचा विजय होईल त्यामुळं हा उद्देश साध्य करण्यासाठी मी चर्चशी सहकार्य करू इच्छित होतो.
विवाह आणि परिवार
कुटुंबातला सर्वात मोठा मुलगा असल्यामुळं मी बाबांसोबत शेतावर काम करू लागलो; माझा दुसरा भाऊ ही कामगिरी पत्करण्यास सज्ज झाला तोपर्यंत मी शेतावर काम केलं. मग, मी कॅथलिक कृषी विद्यालयातून मास्टर्सची डिग्री मिळविली. त्यानंतर मी एका विवाहसोबत्याचा शोध करू लागलो.
माझ्या एका बहिणीकडून, मारीआची आणि माझी ओळख झाली. सार्वकालिक जीवन मिळविण्याकरता तिच्यासोबत झटू शकेल असा एक पती तिला हवा होता, हे मला समजलं होतं. आमच्या विवाह घोषणेवर आम्ही लिहिलं: “देवावर आमची नजर खिळवून, प्रेमात संयुक्त राहून आम्ही आनंदाचा शोध घेतोय. आमचा मार्ग जीवन आणि ध्येय सनातन सूख हे आहे.” १९५८ साली, जून २६ रोजी, झ्योरिकजवळील कॉन्व्हेंट फॉरमध्ये आमचा विवाह झाला.
मारीआची आणि माझी पार्श्वभूमी एकंदर सारखीच. ती एका अतिशय धर्मपरायण कुटुंबातली असून, सात भावंडांत सगळ्यात थोरली होती. ती सगळी भावंडं शेत काम, शाळा आणि चर्चला जाणं-येणं यातच इतकी व्यस्त असायची, की खेळण्या-बागडण्याला वेळ नव्हताच म्हटलं तरी चालेल. विवाहाचे सुरवातीचे दिवस कठीण गेले. धर्माविषयी माझ्या मनात भरमसाट प्रश्न असल्यामुळं, आपण योग्य व्यक्तीशी विवाह केला आहे की नाही अशी एक शंका मारीआ घेऊ लागली. चर्चच्या शिकवणुकींवर किंवा युद्धे, धर्मयुद्धे आणि धर्मन्यायालये यांस बढावा देण्याच्या चर्चच्या प्रघातावर आक्षेप घेणे तिला पसंत नव्हते. पण, आम्ही दोघांनी देवावर भाव ठेवला आणि आमची खात्री झाली, की होता होईल तितके त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याचा आम्ही प्रयत्न करीत राहिलो तर तो कधीच आमचा त्याग करणार नाही.
सन १९५९ मध्ये, पूर्व स्वित्झर्लंडमधील हॉम्बुर्ग या ठिकाणी आम्ही एक शेतमळा भाड्यानं घेतला. ३१ वर्षांपर्यंत इथेच आमचं राहणं होतं. मार्च ६, १९६० मध्ये आमचा पहिला मुलगा, योझेफ जन्मला. त्याच्या पाठीवर सहा मुलगे आणि शेवटी राहेल झाली. आपल्या अतूट तत्त्वांना विश्वासू राहून मारीआनं एका न्यायी व निःपक्षपाती आईची भूमिका बजावली. कुटुंबासाठी ती खरोखरच आशीर्वाद ठरली आहे.
बायबल सत्याचा शोध
कालांतराने आमचं धार्मिक अज्ञान अधिकाधिक असह्य होऊ लागलं. १९६० दशकाच्या उतरार्धात कॅथलिक पिपल्स हाय स्कूलमधील प्रवचनांना आम्ही उपस्थित राहू लागलो, पण आणखीनच गोंधळून घरी परतायचो. कुठलाही शास्त्रीय पुरावा न देता, वक्ते आपल्या मनचंच स्पष्टीकरण द्यायचे. सन १९७० च्या पूर्वार्धात मी येशूच्या शब्दांवर विचार केला जे म्हणतात: “तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. . . . मागा म्हणजे तुम्हास मिळेल.”—योहान १६:२३, २४.
देवाच्या वचनातील या शाश्वतीमुळं मी वारंवार प्रार्थना करू लागलो: “बापा, कॅथलिक चर्च हाच खरा धर्म असला तर कृपा करून मला याची खात्री पटवून दे. पण जर तो खोटा असेल तर तितक्याच स्पष्टपणे मला दाखव, म्हणजे सर्वांच्या देखत मी ते उघड करीन.” डोंगरावरील प्रवचनात येशूने, ‘मागत राहा’ असं जे शिकविलं होतं त्याच्या अनुषंगानं मी वारंवार याचना करत राहिलो.—मत्तय ७:७, ८.
मारीआसोबतच्या माझ्या चर्चांमुळं—विशेषकरून, ‘संतांची’ उपासना, शुक्रवारी मांस सेवन करणे इत्यादी १९६० सालातील कॅथलिक शिकवणुकींमधील फेरबदल, यांमुळं शेवटी तिही शंका घेऊ लागली. एकदा १९७० च्या वसंतऋतूत, मासच्या वेळी प्रार्थना करताना ती म्हणाली: “हे देवा, कृपया अनंत जीवनाचा मार्ग आम्हाला दाखव. कोणता मार्ग योग्य आहे हे आता आम्हाला माहीत नाही. मी काहीही करायला तयार आहे, पण कृपा करून आमच्या सबंध कुटुंबाला योग्य तो मार्ग दाखव.” आमच्या प्रार्थनांचं उत्तर मिळालं याची आम्हाला प्रचिती होईपर्यंत, तिनं काय प्रार्थना केली होती हे मला ठाऊक नव्हतं आणि मी काय प्रार्थना केली होती हे तिलाही ठाऊक नव्हतं.
बायबल सत्य हाती लागते
सन १९७० च्या पूर्वार्धात, रविवारच्या दिवशी, आम्ही चर्चला जाऊन आल्यानंतर, कुणीतरी आमचं दार ठोठावलं. यहोवाचे साक्षीदार म्हणून स्वतःची ओळख करून देणारा एक गृहस्थ आपल्या दहा वर्षांच्या मुलासोबत आला होता. बायबल चर्चा करण्यासाठी मी राजी झालो. यहोवाच्या साक्षीदारांविषयी माझ्या ऐकण्यात जे काही आलं होतं त्यावरून या लोकांना इतकं अफाट ज्ञान असेल असा माझा विश्वास नव्हता; त्यामुळं, मी याला लगेच निरुत्तर करीन असं मला वाटलं होतं.
दोन तास चर्चा करूनही आम्ही कोणत्याही समाधानकारक निर्णयांस पोहंचलो नाही आणि पुढच्या रविवारी पण असंच घडलं. तिसऱ्यांदा चर्चा करण्यासही मी उत्सुक होतो, पण साक्षीदार काही आलाच नाही. मारीआ म्हणाली, की त्याला कदाचित वाटलं असेल, आपल्यासोबत चर्चा करण्यात काही अर्थ नाही. पण दोन आठवड्यांनंतर तो आला तेव्हा मला आनंद झाला. मी लगेच म्हणालो: “गेल्या ३५ वर्षांपासून मी सतत नरकाचा विचार करत आहे. प्रीती करणाऱ्या देवानं, लोकांना इतक्या क्रूरतेनं यातना द्याव्यात, हे काही केल्या मला पटत नाही.”
“तुमचं म्हणणं बरोबर आहे,” साक्षीदारानं म्हटलं. “बायबल अशी शिकवण देतंच नाही, की नरक यातनेचं स्थळ आहे.” त्यानं मला दाखवून दिलं, की कॅथलिक बायबलमध्ये, बहुतेकवेळा “नरक” असे भाषांतरित केलेले इब्री आणि ग्रीक शब्द शिओल व हेडीस, दुसरे काही नसून केवळ सर्वसाधारण कबर यास सूचित करतात. (उत्पत्ति ३७:३५; इयोब १४:१३; प्रेषितांची कृत्ये २:३१) त्यानं इतरही काही वचनं वाचून सिद्ध केलं, की मानवी जीव मर्त्य आहे आणि पापाची शिक्षा यातना नाही तर मृत्यू आहे. (यहेज्केल १८:४; रोमकर ६:२३) आता कुठं माझे डोळे उघडले आणि माझ्या लक्षात आलं, की सबंध आयुष्यभर खोट्या धार्मिक शिकवणुकींमुळे मी जणू अंधळा झालो होतो. चर्चची इतर तत्त्वंही अशी चुकीची तर नसतील, असा मी आता विचार करू लागलो.
मला माझी आणखीन फसवणूक करून घ्यायची नव्हती; त्यामुळं मी एक कॅथलिक बायबल शब्दकोश आणि पोपच्या इतिहासाचे पाच खंड विकत घेतले. या प्रकाशनांना अधिकृत परवानगी होती, म्हणजे यांच्या छपाईसाठी रोमन कॅथलिक बिशपवर्गानं अधिकारानं अनुमती दिली होती. पोपचा इतिहास वाचल्यावर मला समजलं, की त्यांच्यापैकी काही जण जगातले सर्वात वाईट अपराधी होते! आणि बायबलच्या शब्दकोशातून मला हे समजलं की त्रैक्य, नरकाग्नी, पर्गेटरी आणि चर्चच्या अशा इतर अनेक शिकवणुकींना बायबलचा आधार नाही.
या वेळेपर्यंत, साक्षीदारांबरोबर बायबल अभ्यास करण्यासाठी माझ्या मनाची तयारी झाली होती. सुरवातीला, केवळ एक आदर म्हणून मारिआ देखील बसायची, पण लवकरच जे काही शिकलं होतं ते तिनं स्विकारलं. चार महिन्यांनंतर मी कॅथलिक चर्चला राजीनामा दिला आणि इथून पुढं आमची मुलं धार्मिक वर्गांना उपस्थित राहणार नाहीत असंही पाळकांच्या कानावर घातलं. त्याच्या पुढच्याच रविवारी पाळकानं आपल्या चर्चच्या सदस्यांना यहोवाच्या साक्षीदारांसंबंधी सावध केलं. बायबलचा उपयोग करून मी माझ्या विश्वासांचं समर्थन करण्याचा प्रस्ताव मांडला खरा पण अशा प्रकारच्या चर्चेसाठी पाळक काही उत्सुक नव्हते.
यानंतर मग आम्ही जलद प्रगती केली. शेवटी मी आणि माझ्या पत्नीनं, यहोवाला केलेलं समर्पण, डिसेंबर १३, १९७० साली पाण्याच्या बाप्तिस्म्याद्वारे चिन्हित केलं. याच्या एका वर्षानंतर, ख्रिस्ती तटस्थतेच्या वादविषयामुळं मला दोन महिने तुरुंगाची हवाही खावी लागली. (यशया २:४) या अतिशय थोड्या काळासाठी देखील, पत्नीच्या जिवावर आठ मुलं टाकून जाणं इतकं सहजसोपं नव्हतं. कारण, आमची मुलं तेव्हा केवळ ४ महिने ते १२ वर्षं या वयोगटातील होती. याशिवाय, आमचा शेतमळा आणि गुरेढोरे यांच्याकडेही लक्ष द्यावं लागत असे. पण, यहोवाच्या साह्याने मात्र त्यांना हे सगळं सांभाळता आलं.
राज्य हितांना प्रथम स्थान
आजारी असल्याशिवाय आमच्या घरातलं कुणीच मंडळीची एकही सभा चुकवत नसे. तसंच, आम्ही आमच्या कामाची वाटणीही अशारितीने केली होती की कुठलंही मोठं अधिवेशन आम्ही कधीच चुकवलं नाही. लवकरच, आमच्या वरच्या मजल्यावरील खोलीत आमची मुलं जे खेळ खेळायची, त्यांत ख्रिस्ती सभांमध्ये त्यांनी जे काही पाहिलं होतं त्यांचीच बहुधा नक्कल असायची. उदाहरणार्थ, ते एकमेकांना विद्यार्थी भाषण नेमून द्यायचे आणि प्रस्तुतींचे सराव करायचे. त्या सर्वांनीच आम्ही दिलेल्या आध्यात्मिक बोधास चांगला प्रतिसाद दिला याचा आम्हाला आनंद वाटतो. एका विभागीय संमेलनात, माझी आणि माझ्या पत्नीची मुलाखत घेतली गेली, तेव्हा मोठ्यापासून लहानापर्यंत आमची आठही मुलं एकाच रांगेत बसून लक्ष देऊन ऐकत होती; ही गोड आठवण माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात मी जपून ठेवली आहे.
“प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात” आमच्या मुलांना वाढवणं ही आमची प्रमुख जबाबदारी बनली. (इफिसकर ६:४) आमचा दूरदर्शन संच घरातून काढून टाकण्याचा आम्ही निर्णय घेतला, आणि वेळोवेळी आवेशी सहख्रिश्चनांना आम्ही घरी बोलवत असू, जेणेकरून त्यांच्या अनुभवांमुळं व उत्साहामुळं आमच्या मुलांना फायदाच होईल. अविचारी बोल आणि इतरांची टीका करणं, असल्या गोष्टी टाळण्याबाबत आम्ही दक्ष होतो. कुणाच्या हातून चूक झाली, की त्यावर चर्चा करून आम्ही हे पाहत असू, की कोणत्या कारणांमुळं त्याच्या हातून ही चूक झाली असेल. आम्ही आमच्या मुलांना, एखाद्या परिस्थितीचं मूल्यमापन तर्कशुद्ध आणि न्यायीपणे करण्यात मदत करण्याचा प्रयत्न केला. इतर तरुणांसोबत त्यांची तुलना करण्याचं आम्ही कटाक्षानं टाळलं. आणि पालकांनी मुलांना डोक्यावर बसवू नये किंवा त्यांच्या कृत्यांचे परिणामांपासून दूर पळण्यात त्यांची मदत करू नये, यांचं महत्त्व आम्ही जाणलं.—नीतिसूत्रे २९:२१.
इतकं सगळं करूनही, मुलांचं संगोपन करताना आमच्या वाट्याला समस्या आल्याच. उदाहरणार्थ एकदा, पैसे न देता दुकानातून कॅन्डी घेण्यास त्यांच्या शाळेतील मित्रांनी त्यांना प्रवृत्त केलं. ही गोष्ट आमच्या कानी आली तेव्हा दुकानदाराचे पैसे देण्यास आणि माफी मागण्यास आम्ही मुलांना परत दुकानात पाठवलं. असं करणं त्यांच्यासाठी लाजिरवाणं होतं खरं, पण त्यातून ते प्रामाणिकपणाचा धडा शिकले.
आमच्यासोबत प्रचार कार्यात येण्यास मुलांना जबरदस्ती करण्यापेक्षा, या कार्याला प्रथमस्थान देऊन आम्ही स्वतःच एक आदर्श मांडला. मुलांच्या लक्षात आलं, की सभा आणि क्षेत्र सेवा यांना आम्ही शेतावरील आवश्यक कामांपेक्षा अधिक महत्त्व देतो. यहोवाच्या मार्गात आमच्या आठही मुलांचं संगोपन करण्यातील आमच्या प्रयत्नांचं निश्चितच सार्थक झालं.
आमचा थोरला मुलगा योझेफ, ख्रिस्ती मंडळीतील एक वडील आहे आणि कित्येक वर्षं, त्यानं स्वित्झर्लंडमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरात आपल्या पत्नीसह सेवा केली. टोमास देखील एक वडील आहे, शिवाय तो आणि त्याची पत्नी पायनियर, अर्थात पूर्ण-वेळेचे सेवक आहेत. डानीलनं एक चॅम्पियन सायकलस्वार म्हणून आपलं करिअर त्यागलं आणि आता तो एक वडील आहे; तो आणि त्याची पत्नी दुसऱ्या एका मंडळीत पायनियर आहेत. बेनो आणि त्याची पत्नी, मध्य स्वित्झर्लंडमध्ये क्रियाशील सेवक आहेत. आमचा पाच नंबरचा मुलगा क्रिस्टीयान, आमच्याच मंडळीत वडील आहे. तो विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. फ्रान्ट्स एक पायनियर आणि बर्नमधील एका मंडळीत वडील आहे आणि ऊर्स जो एकेकाळी स्वित्झर्लंडच्या शाखा दफ्तरात सेवा करत होता, आता विवाहित असून पायनियर सेवा करत आहे. आमची एकुलती एक मुलगी राहेल आणि तिचे पती, हे दोघे देखील अनेक वर्षांपर्यंत पायनियर होते.
जून १९९० मध्ये सेवानिवृत्त होऊन माझ्या मुलांप्रमाणेच मी देखील एक पायनियर बनलो. माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनाकडे मागे वळून पाहताना, मी निश्चितपणे सांगू शकतो, की यहोवानं आमचा मार्ग सुरळीत केला आणि ‘पुरणार नाही एवढ्या’ आशीर्वादांचा वर्षावही केला आहे.—मलाखी ३:१०.
माझ्या प्रिय पत्नीचं आवडतं बायबल वचन आहे: “तू आपला भार परमेश्वरावर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल; नीतिमानाला तो कधीहि ढळू देणार नाही.” (स्तोत्र ५५:२२) आणि माझं आवडतं बायबल वचन आहे: “तू यहोवाच्या ठायी आनंद कर, म्हणजे तो तुझ्या हृदयाची मागणी तुला देईल.” (स्तोत्र ३७:४; पं.र.भा.) या दोन सुंदर अभिव्यक्तींची सत्यता आम्ही दोघांनीही अनुभवली आहे. आमच्या मुलांसोबत आणि त्यांच्या कुटुंबीयांसोबत यहोवा देवाची निरंतर स्तुती करण्याचंच आमचं ध्येय आहे.—योझेफ हेग्ली यांनी कथित केल्याप्रमाणे.