तरुण लोक विचारतात . . .
रेव्ह्स अनापायकारक मौज आहे का?
“माझ्या नसानसात संगीत भिनलेलं असताना मी हवेत हात उडवून नाचते, तेव्हा माझ्यासोबत नाचणाऱ्या इतरांमुळं मला आणखीनच उत्साह मिळतो. अगदी हवेत असल्यासारखं वाटतं.”—जीना.
या शब्दांत, रेव्हमध्ये हजर राहण्याच्या उत्साहाचे वर्णन जीना करते. रात्रभर रंगणाऱ्या या नृत्य पार्ट्या, १९८० च्या दशकात प्रथम ब्रिटनमध्ये लोकप्रिय झाल्या. आता मात्र बेल्जियम, कॅनडा, जर्मनी, भारत, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त संस्थाने यांबरोबरच, जगाच्या पाठीवरील अनेक भागांत त्या आकस्मितपणे उदयास येत आहेत.
क्लब्स, रिकामी दुकाने, शेते—जेथे कोठे रात्रभर बेभान, अखंड नृत्य करण्यास लोक एकत्रित येऊ शकतील अशा कोणत्याही ठिकाणी रेव्ह्स पार्ट्या होतात. “तरुण लोकांना आता नाईट-क्लब्स पसंत नसल्यामुळे हळूहळू नाईट-क्लब्सची जागा रेव्ह्स घेत आहेत,” असे ॲडम लेव्हीन यांनी जोहान्सबर्ग, दक्षिण आफ्रिकेतील सन्डे टाईम्स मॅगझीन नावाच्या नियतकालिकास सांगितले. त्यांनी असेही म्हटले की, “तुमच्या किशोरवयीनांच्या तोंडून तुम्ही अद्याप याविषयी ऐकलं नसेल, तर त्याचा अर्थ तुमच्यात नक्कीच दळणवळणाची समस्या आहे.”
रेव्ह्स दुनियेची झलक
काहीवेळा रेव्ह्स, गुप्ततेच्या बुरख्याखाली होत असतात; म्हणजे त्या प्रसंगाच्या अगदी नियुक्त दिवसापर्यंत देखील त्याची जाहिरातबाजी केली जात नाही. तथापि, भव्यदिव्य रोषणाई प्रदर्शने आणि पायांना ठेका धरण्यास उत्तेजित करणारे टेक्नो संगीत सुरू होते, तेव्हा मात्र विक्षिप्त पेहराव केलेले युवक, डझनावारी ते हजारोंच्या संख्येने तिथे हजर असण्याची शक्यता असते. कॉलेजच्या दुसऱ्या वर्षात शिकणारी केटी म्हणते: “तो भलामोठा एकत्रित जमाव जणू संगीताच्या ठेक्यावर बेधुंद नाचताना आपल्या उद्वेगाला वाट करून देत असतो.”
तथापि, रेव्ह म्हणजे केवळ नृत्य नाही. ती एक संस्कृती, किंवा रेव्ह्समध्ये सहभागी होणाऱ्यांच्या, अर्थात रेव्हर्सच्या शब्दात सांगायचे झाल्यास, एक “दुनिया” देखील आहे. जात, राष्ट्र किंवा लैंगिक मान्यता कोणतीही असोत, रेव्ह दुनियेची मूळ तत्त्वे शांती, प्रेम, एकता आणि आदर ही आहेत. विशेषतः, नृत्य संगीताचीच विक्री करणारा एका दुकानदार म्हणतो: “या पार्ट्यांमध्ये आम्ही विविध संस्कृतींचे मिलन घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहोत. यामागील मूळ हेतू, साहचर्य असून तो साध्य करण्याचा एकमेव प्रभावशाली मार्ग म्हणजे एकत्र नाचणे.”
या वरपांगी उदात्त हेतूंचा विचार करता, तुम्ही कदाचित विचाराल, “तर मग रेव्ह्समध्ये गैर काय असू शकेल?” पण रेव्ह दुनियेची दुसरी बाजू देखील तुम्ही लक्षात घेतली पाहिजे.
रेव्हची अंधारी बाजू
काही जण असे प्रतिपादन करतात, की रेव्ह्समध्ये अभावानेच मद्याचा वापर केला जातो. ड्रग्सची गोष्ट मात्र निराळी. ब्रायन नामक एक रेव्हर कबूल करतो की, “रेव्ह्समध्ये ड्रग्सचा इतका बेसुमार वापर झाला नसता तर आणखीन मोठ्या प्रमाणात लोक रेव्ह दुनियेत सहजासहजी सामील झाले असते का, असाच एक विचार मनाला शिवून जातो.” तो पुढे असेही म्हणतो: “इतर अनेकांना असं वाटतं, की रेव्ह्स खरं तर ड्रग्सच्या जोरावरच टिकून आहेत.”
काही रेव्ह्समध्ये मारीजुआना आणि एलएसडी यांनी शिरकाव केला असला तरी असे दिसते, की रेव्हर्सना मात्र एमडीएमए किंवा सर्वसामान्यपणे ज्यास एक्सटसी म्हणतात याचीच चटक लागलेली असते. ते सेवन करणारे लोक असा दावा करतात, की काही प्रमाणात एक्सटसी सुरक्षित असते. त्यांचे असे एक ठाम मत आहे, की त्यामुळे रात्रभर नाचत राहण्यास त्यांना उत्साह मिळतो, शिवाय त्यांच्या अत्यानंदाच्या भावना देखील उंचावल्या जातात. तथापि, “लोकप्रिय ड्रग तुमचा मेंदू नष्ट करू शकतो” या ठळक मथळ्याखाली द न्यूयॉर्क टाईम्सने अशी नोंद केली आहे की एक्सटसीमुळे, “अन्नवासना, झोप, मानसिकता, आवेग आणि इतर मानसिक कार्यांवर दीर्घकालीन, हानिकारक परिणाम घडू शकतात.” पण याहीपेक्षा अधिक काही होत असते. आणि ते म्हणजे, “एक्सटसीने काहींना मृत्यूच्या खाईत लोटून दिले आहे, आणि इतर अनेकविध प्रकरणांत ज्या लोकांनी मर्यादित प्रमाणात त्याचे सेवन केले होते त्यांचे हृदय, यकृत निकामी झाले आहेत किंवा मग ते बेशुद्ध पडले,” असे डॉ. हॉवर्ड मकिन्नी यांचे प्रतिपादन आहे. म्हणूनच, “एक्सटसी सेवन करणारे रेव्हर्स खरं तर मृत्यूसोबत नाचत असतात,” हे डॉ. सील्वन डी मीरॉन्डॉ यांचे म्हणणे निराधार नाही.
तसेच हर्बल ॲसिड, ॲक्सीलरेशन, हर्बल एक्सटसी किंवा रश यांसारखे नैसर्गिक ड्रग्सदेखील अपायकारक असू शकतात. उदाहरणार्थ, असे म्हटले जाते, की काही विशिष्ट परिस्थितीत नैसर्गिक ड्रग ॲक्सीलरेशन, यामुळे हृदय विकाराचा झटका येऊ शकतो आणि इतकेच नाही तर मृत्यू देखील ओढवू शकतो.
रेव्ह्समध्ये वापरले जाणारे ड्रग्स निरुपद्रवी असतात असे अजूनही ठाम मत असणाऱ्यांनी आणखीन एक गोष्ट लक्षात घेण्यास हवी. कॅनडियन गुप्त पोलिस, ईअन ब्रीग्झ असे प्रतिपादन करतात, की एक्सटसीच्या नावाखाली विकले जाणारे ९० टक्के ड्रग्स काही अस्सल एक्सटसी नसतात. ते म्हणतात: “त्यांपैकी बहुतांश, एक तर पीसीपी किंवा इतर घातक ड्रग्स असतात. आणि यांची विक्री करणारे लोकही जणू अविश्वासार्ह असतात. ड्रग्सचे विपरीत परिणाम दिसू लागतात तेव्हा मात्र हे लोक आपलं तोंड देखील दाखवत नाहीत.”a
हे मान्य, की काही रेव्ह्समध्ये ड्रग्सचा गंधही नसेल. पण तरी, खुद्द रेव्हर्स देखील हे कबूल करतील, की रेव्ह्सला हजेरी लावणाऱ्या मूठभर, अनेक किंवा अधिकांश लोकांनी कोणतेही अवैध द्रव्य सेवन केले नसेल हे पूर्वभाकीत करणे बहुधा अशक्यच असते.
रेव्ह्स खरोखर तुमच्यासाठी आहेत का?
तसे पाहिले तर संगीत, नृत्य आणि मौजमजा यांची इच्छा धरणे यात स्वाभाविकतः काहीच वावगे नाही. खुद्द बायबलच म्हणते की, “हसण्याचा समय” आणि “नृत्य करण्याचा समय असतो.” (उपदेशक ३:४) शिवाय, ते असाही सल्ला देते: “आपल्या तारुण्यात आनंद कर.” (उपदेशक ११:९) तर मग तुम्ही आनंदी असावे अशी निर्माणकर्त्याचीच इच्छा आहे! तथापि, या गोष्टीचा विसर पडू देऊ नका की, “सगळे जग त्या दुष्टाला,” अर्थात दियाबल सैतानाला “वश झाले आहे.” (१ योहान ५:१९) म्हणून, हे जग ज्या करमणुकींची वाहवा करते त्या प्रत्यक्षात अनिष्टकारक घटकांनी कलंकित असतात.
उदाहरणार्थ, रेव्ह्समध्ये सामील होणाऱ्यांचाच जरा विचार करा. ‘देहाच्या व आत्म्याच्या सर्व अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करण्याच्या’ बायबलच्या इशारेवजा सल्ल्याचे ते पालन करत आहेत का? (२ करिंथकर ७:१) हे खरे, की रेव्हर्स कदाचित शांती, प्रेम आणि एकता यांचा पुरस्कार करत असतील. पण, “वरून येणारे ज्ञान” केवळ ‘शांतिप्रियच’ नव्हे, तर “शुद्ध” देखील आहे. (याकोब ३:१५, १७) स्वतःस विचारा, ‘रेव्ह्समध्ये नित्याने सहभागी होणाऱ्यांची नैतिक मूल्ये देवाचे वचन, बायबल यात आढळणाऱ्या दर्जांशी मेळ खातात का? “देवावर प्रेम करण्याऐवजी सुखविलासाची आवड धरणारी” माणसे, यांच्या सहवासात मी अख्खी रात्र घालवू इच्छितो का?’—२ तीमथ्य ३:४; १ करिंथकर ६:९, १०; पडताळा यशया ५:११, १२.
या प्रश्नांवर विचार करणे महत्त्वाचे आहे कारण पौलाने लिहिले: “कुसंगतीने नीति बिघडते.” (१ करिंथकर १५:३३) देवाच्या नियमांचा अनादर करणाऱ्यांची संगत, सरतेशेवटी धोकेदायक ठरेल कारण बायबल म्हणते: “सुज्ञांची सोबत धर म्हणजे सुज्ञ होशील; मूर्खांचा सोबती कष्ट पावतो.”—नीतिसूत्रे १३:२०.
वास्तविकतः, अनेकविध रेव्ह्स, निव्वळ ड्रग पार्ट्यांपेक्षा फारशा वेगळ्या नसून त्यांस हजर राहणारे लोक पुढे कटू परिणामांना सामोरे जातात. उदाहरणार्थ, काही रेव्ह्स पार्ट्या अवैधपणे होत असल्यामुळे किंवा तेथे ड्रग्सचा वापर होत असल्यामुळे, पोलिस त्यांच्यावर धाडी घालून त्या बंद पाडतात. कायद्याचे अनुपालन न करणाऱ्यांमध्ये तुम्ही गणले जावेत अशी तुमची इच्छा आहे का? (रोमकर १३:१, २) जरी कायद्याचे उल्लंघन होत नसले तरी अशा पार्टीला उपस्थित राहून तुम्ही “जगापासून निष्कलंक” राहू शकाल का? (याकोब १:२७) बायबलमध्ये, रंगेलपणा किंवा “बेफाम पार्ट्या” (बाइंग्टन), यांचे खंडन केले असल्यामुळे, रेव्हमध्ये उपस्थित राहिल्याने देवासमोर आणि लोकांसमोर तुम्ही एक शुद्ध विवेक राखू शकाल का?—गलतीकर ५:२१; २ करिंथकर ४:१, २; १ तीमथ्य १:१८, १९.
तर मग स्पष्टच आहे, की ख्रिश्चनांनी रेव्हच्या धोक्यापासून सावध असले पाहिजे. पण हवालदिल होऊ नका. इतर अनेक करमणुकी आहेत ज्यांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. उदाहरणार्थ, यहोवाच्या साक्षीदारांपैकी अनेक कुटुंबे श्रेयस्कर मेळाव्यांचे आयोजन करतात.b काळजीपूर्वक योजना आणि देखरेख केल्यास उपस्थित असलेल्या सर्वांनाच आध्यात्मिक आणि शारीरिकरित्या चैतन्यदायी वाटते. सर्वांत मुख्य म्हणजे, आपण आनंदी असावे अशी इच्छा बाळगणारा “आनंदी देव,” यहोवा यास उभारणीकारक सहवास प्रसन्न करतो.—१ तीमथ्य १:११; उपदेशक ८:१५.
[तळटीपा]
a पीसीपी (फेनसायक्लिडाइन) गुंगी आणणारे असून कधीकधी कल्पनाविलास करण्यासाठी याचा अवैधपणे वापर केला जातो.
b अधिक माहितीकरता टेहळणी बुरूज, नोव्हेंबर १, १९९२, पृष्ठे २४-२९, आणि सावध राहा! जून ८, १९९७, पृष्ठे ८-१० पाहा.
[२१ पानांवरील चौकट]
टेक्नो म्हणजे काय?
सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास, टेक्नो म्हणजे इलेक्ट्रॉनिक नृत्य संगीत. त्यात अनेक प्रकार असतात. त्याचे ठोके, प्रती मिनीट ११५ आणि १६० च्या पल्ल्यातील असल्यामुळे अनेक लोक टेक्नोचे वर्णन, तालबद्ध संगीत असे करतात.
द युरोपियनच्या म्हणण्यानुसार, “टेक्नोशी परिचित नसणाऱ्यांसाठी टेक्नोचा आवाज, दंतवैद्याच्या खुर्चीवर बसल्यानंतर तुमच्या दातांतील ड्रिल्लींगचा आवाज, व त्याच्या बरोबरीला, सदोम आणि गमोराचा विध्वंस झाला तेव्हा तुमच्या कल्पनेनुसार जे आवाज झाले असतील त्या आवाजांसारखा आहे.” तथापि, टेक्नोच्या एकसारख्या ठोक्यांनी काही श्रोत्यांचे चित्ताकर्षण केले आहे. १८ वर्षांची क्रिस्टीन म्हणते: “या संगीतामुळं, मला बंधनमुक्तीची आणि स्वतंत्रतेची जाणीव होते.” झॉन्याच्याही भावना काही अशाच प्रकारच्या आहेत. ती कबूल करते, “सुरवातीला मला टेक्नो संगीत अजिबात आवडत नसे. पण मग, जितके अधिक ते तुमच्या कानांवर पडते तितके अधिक ते कर्णमधूर वाटू लागते. तुम्ही त्याचा आवाज अगदीच वाढवला, की त्या जबरदस्त ठोक्यांपासून तुमची सुटका होऊच शकत नाही. तुम्ही नकळत नाचू लागता. तुम्ही सावध नसल्यास, ते ठोके तुमच्या पूर्ण शरीरावर ताबा मिळवितात.” १९ वर्षांची शर्ली, टेक्नोचे अधिक जवळून निरीक्षण करते: ती म्हणते: “ते केवळ संगीतच नाही. पेहराव आणि भाषा यांमधून प्रकट केलेली ती एक पुरती जीवनशैलीच होय.”
‘प्रभूला काय संतोषकारक आहे हे पारखत राहण्याची’ ख्रिश्चनांची इच्छा आहे. (इफिसकर ५:१०) यास्तव, इतर कुठल्याही प्रकारच्या संगीताप्रमाणेच त्यांनी टेक्नोसंबंधीही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुम्ही टेक्नोकडे आकृष्ट होत असल्याचे तुमच्या लक्षात आले तर स्वतःस विचारा: ‘असल्या संगीतामुळे माझ्यावर कोणता परिणाम होतो? त्यामुळे माझ्यात आनंदी, निश्चिंत आणि शांतिमय भावना निर्माण होते का? की ते मला अस्वस्थ करते; कदाचित राग आणि अनैतिक विचारांस असले संगीत उत्तेजित करते का? अशा प्रकारच्या संगीताकडे आकृष्ट होऊन त्याच्या जीवनशैलीकडेही मी आकृष्ट होईन काय? अशा प्रकारचे संगीत ऐकण्यासाठी किंवा त्याच्या चालीवर नृत्य करण्यासाठी रेव्हला उपस्थित राहण्यास मी प्रलोभित होईन का?’
खरे तर, या सगळ्याचे सार एकच आहे: तुमची संगीताची पसंत कोणतीही असो, पण त्यास तुमच्या व तुमच्या स्वर्गीय पित्याच्या आड कधीही येऊ देऊ नका.