वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 १०/८ पृ. १२-१४
  • पैसा कमवण्यात गैर काय?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • पैसा कमवण्यात गैर काय?
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • “भौतिकवादाची मोठी लाट”
  • “जे धनवान होऊ पाहतात”
  • ‘विध्वंसात बुडवितो’
  • समन्वय साधणे
  • पैसा सगळ्या वाईट गोष्टींचं मूळ आहे का?
    बायबलमधून प्रश्‍नांची उत्तरं
  • पैशाबद्दल योग्य दृष्टिकोन बाळगा
    सावध राहा!—२०१५
  • पैशांविषयी सुज्ञ दृष्टिकोन कोणता?
    सावध राहा!—२००७
  • पैशाचे नियोजन कसे कराल?
    तुमचे कुटुंब आनंदी राहू शकते
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 १०/८ पृ. १२-१४

तरुण लोक विचारात  . . .

पैसा कमवण्यात गैर काय?

“जगात सर्वात महत्त्वाची कोणती वस्तू असेल तर ती म्हणजे पैसा.” हे होते ब्रिटिश नाटककार जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे म्हणणे. तुम्हाला त्यांचे म्हणणे पटते का? कदाचित तुमचे मत १७ वर्षीय तानया हिच्यासारखे असावे, ती म्हणते: “मला श्रीमंत होण्याची हौस नाही, फक्‍त आवश्‍यक तेवढं आपल्याजवळ असावं असं वाटतं.” एव्यन नावाच्या तरुणाला देखील पैसा म्हणजे जगातली सर्वात महत्त्वाची वस्तू नव्हे तर काहीतरी साध्य करण्याकरता असलेले उपयोगी साधन आहे असे वाटते. तो म्हणतो: “कपडे, प्रवास यांसारख्या गरजा पूर्ण करण्यासाठी मला पैसा आवश्‍यक वाटतो.”

बायबल देखील काहीसे असेच मत प्रकट करते याची तुम्हाला कल्पना होती का? उपदेशक ७:१२ येथे ते म्हणते की ‘पैसा आश्रय देणारा आहे.’ त्याउलट गरिबीचे वर्णन “मानवी आनंदाला खीळ घालणारा सर्वात मोठा शत्रू,” या शब्दांत करण्यात आलेले आहे. शिवाय, पुरेसा पैसा असल्यास—निदान काही प्रमाणावर तरी—गरिबीमुळे येणाऱ्‍या समस्यांपासून तुमचे रक्षण होऊ शकते. जवळ पैसा असल्यास अनपेक्षित संकटांची देखील तितकीशी झळ लागत नाही. फायलस नावाची तरुणी म्हणते, “बायबलनुसार ‘सर्व कालवश व दैववश आहेत.’ केव्हा कोणतं संकट कोसळेल हे कुणालाच सांगता येत नाही; म्हणूनच आपल्या हाताशी साठवून ठेवलेला पैसा असणं आवश्‍यक आहे.” (उपदेशक ९:११) आणि आज तुम्हाला पैसा मोलाचा आहे असे वाटत असले तरीसुद्धा, तुमच्या भविष्यात तर त्याचा आणखीनच मोलाचा वाटा असू शकतो.

“भौतिकवादाची मोठी लाट”

पुरेसा पैसा असण्यासंबंधाने थोडीफार काळजी असणे स्वाभाविक आणि योग्यही आहे, पण काही युवकांच्या मनावर जणू पैशाचं भूतच असतं. १,६०,००० पेक्षा अधिक तरुणांना, “तुमची जीवनात सर्वात मोठी इच्छा कोणती,” असे विचारण्यात आले तेव्हा २२ टक्के तरुणांनी उत्तर दिले “श्रीमंत होण्याची.”

न्यूजवीक नियतकालिकाच्या शब्दांत सबंध जगाला झपाटून टाकणारी “भौतिकवादाची मोठी लाट” लोकांच्या पैशाच्या हव्यासाला खतपाणी घालते यात काही शंका नाही. मार्टिन नावाचा १८ वर्षांचा तरुण म्हणतो, “मी तर अत्यंत भौतिकवादी व्यक्‍ती आहे आणि गुणवत्तेच्या बाबतीत कधीच तडजोड करत नाही. जितका पैसा आपण खर्च करू तितकाच चांगला माल आपल्याला मिळेल, असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून मला हव्या असलेल्या वस्तूंसाठी मी बेसुमार खर्च करतो.” ‘बेसुमार खर्च’ करणारा मार्टिन हा काही एकटाच तरुण नाही. यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट यातील वृत्तानुसार: “गतवर्षी [अमेरिकेतील] १२ ते १९ या वयोगटातील तरुणांनी शॉपिंगसाठी सर्वाधिक म्हणजे एकूण १०,९०० कोटी डॉलर खर्च केले; १९९० पेक्षा ही ३८ टक्क्यांची वाढ आहे.”

पण असंख्य नवीन कपडे, कॉम्पॅक्ट डिस्कस, आणि कॉम्प्युटर साधनांसाठी तरुणांजवळ पैसा येतो तरी कोठून? यु.एस.न्यूज ॲण्ड वर्ल्ड रिपोर्ट यानुसार: “१६ ते १९ या वयोगटातील निम्म्याहून अधिक मुलामुलींजवळ पार्टटाइम नोकऱ्‍या असतात.” सुयोग्य समन्वय साधल्यास, शाळेनंतर केलेल्या नोकरीमुळे तरुणाला फायदा होऊ शकतो; उदाहरणार्थ, त्यामुळे जबाबदारीची जाणीव निर्माण होते. तथापि, काही तरुण या बाबतीत अतिरेक करतात. न्यूजवीक नियतकालिकानुसार: “[नोकरीवर असणाऱ्‍या] विद्यार्थ्यांवर येणारा तणाव मानसशास्त्रज्ञांना आणि शिक्षकांना दिसतो. त्यांना गृहपाठासाठी सवड मिळत नाही, आणि सातत्याने या थकलेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या मुश्‍कीलीने वर्गात जागे राहण्याचा प्रयत्न करताना पाहिल्यामुळे, परिणामी शिक्षकच आपल्या अपेक्षा कमी करतात.”

असे असूनही, नोकरी करणारे फार कमी तरुण आवक मिळवून देणाऱ्‍या आपल्या नोकऱ्‍या सोडू इच्छितात. व्हॅनेस्सा नावाची तरुणी म्हणते, “शाळा नक्कीच महत्त्वाची आहे, पण पैसाही काही कमी महत्त्वाचा नाही. गृहपाठ केल्याने पैसा थोडाच मिळणार आहे.” पैसा मिळवणे तुमच्या लेखी किती महत्त्वाचे आहे? अमाप पैसा मिळवणे तुमच्या जीवनातील प्रमुख ध्येय आहे का?

“जे धनवान होऊ पाहतात”

बायबल नेमक्या याच प्रश्‍नांवर खुलासा करते. प्रेषित पौलाने लिहिले: “जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशांत आणि माणसांना नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मूर्खपणाच्या व बाधक वासनांत सापडतात. कारण द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे; त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.”—१ तीमथ्य ६:९, १०.

पौल निश्‍चितच जाणतेपणाने बोलत होता. ख्रिस्ती बनण्यापूर्वी, तो “परूशी” म्हटलेल्या धार्मिक पुढाऱ्‍यांपैकी एक होता; बायबल वर्णन करते त्याप्रकारे हे लोक “धनलोभी” होते. (लूक १६:१४) असे असूनही, प्रेषित पौलाने पैसा कमवण्याविरुद्ध टीका केली नाही. उलट “जे धनवान होऊ पाहतात” किंवा दुसऱ्‍या एका भाषांतरात म्हटल्याप्रमाणे “ज्यांनी श्रीमंत होण्याचा निर्धार केला आहे,” (फिल्लिप्स) अशांना तो ताकीद देतो. पण यात एवढे वाईट तरी काय आहे?

पौलाने स्पष्टीकरण दिल्याप्रमाणे, “ते परीक्षेत, पाशांत . . . सापडतात.” नीतिसूत्रे २८:२० येथे एक मिळताजुळता मुद्दा मांडलेला आहे: “जो धनवान्‌ होण्याची उतावळी करितो त्याला शिक्षा झाल्यावांचून राहत नाही.” आपल्याजवळ जितके आहे त्यात समाधान नसल्यामुळे काही तरुणांनी चोरीचा मार्ग पत्करला आहे.

बव्हंशी तरुण चोरीचा विचारही करणार नाहीत हे कबूल आहे. पण काही तरुण चोरीइतकीच धोकेदायक कृत्ये करतात. अर्वाचीन ख्रिस्ती धर्म (इंग्रजी) या पुस्तकानुसार: “काही तज्ज्ञांच्या मते तरुणांमध्ये सर्वात झपाट्याने वाढत असलेले कोणते व्यसन असेल तर ते म्हणजे व्यसनात्मक जुगार.” अमेरिकेतील एका भागात, “हायस्कूलच्या सिनियर वर्गात जाईपर्यंत जवळजवळ ९० टक्के किशोरवयीन मुलामुलींनी बेकायदेशीरपणे लॉटरी तिकिटे विकत घेतलेली असतात.” काही युवक याहूनही अविचारी मार्ग पत्करतात. १६ वर्षांचा मॅथ्यू म्हणतो, “चांगल्या नोकऱ्‍या मिळणं कठीण होऊन बसलंय. म्हणून मला लागणारा पुष्कळसा पैसा मिळवण्यासाठी मी धंदा करतो. . . . कधीकधी तर मी [अंमली पदार्थ] देखील [विकायचो].”

‘विध्वंसात बुडवितो’

पैसा असल्यामुळे माणसाला स्वतंत्रतेची जाणीव होते हे खरे आहे. पण पौलाने सांगितल्याप्रमाणे, पैशाचा पाठलाग पुढे एखाद्याला ‘नाशात व विध्वंसात बुडविणाऱ्‍या अशा मुर्खपणाच्या व बाधक वासनांचा’ दास बनवितो. हो, पैशाचा लोभ एकदा का तुमच्यात शिरला की मग हव्यास, हिंसक मत्सर, आणि इतर बाधक वासना तुमच्या जीवनात प्रबळ होतात. (पडताळा कलस्सैकर ३:५.) टीन नियतकालिकातील एका लेखानुसार इतर युवकांच्या मोटारी आणि उंची कपडे पाहून काही किशोरवयीनांचा इतका जळफळाट होतो “की ते मत्सरापायी अगदी ग्रासून जातात.” हा लेख पुढे सांगतो त्याप्रमाणे अशाप्रकारचा मत्सर कधीकधी “आत्मघृणेपर्यंत बळावतो, आणि आपल्याजवळ नसलेल्या वस्तूशिवाय त्या युवकाला [किंवा युवतीला] आणखी काहीही सुचेनासे होते.”

तर मग तुमच्या लक्षात आले असेल, की श्रीमंतीची हौस एखाद्याला केवळ ‘परीक्षेतच पाडत’ नाही, तर ती त्याला ‘नाशात आणि विध्वंसात बुडवू’ शकते. बायबलचे भाष्यकार ॲल्बर्ट बार्न्स सांगतात: “या वचनातील शब्दचित्र एका फुटलेल्या जहाजाचे आहे, जेथे जहाज आणि त्यात होते नव्हते ते सारे बुडून जाते. अगदी संपूर्ण विध्वंस. आनंद, सात्विकता, नावलौकिक आणि जिवाचाही संपूर्ण नाश सूचित होतो.”—पडताळा १ तीमथ्य १:१९.

तर मग, पौलाने अगदी योग्यपणे असे म्हटले की संपूर्णपणे ग्रासून टाकणारा “द्रव्याचा लोभ सर्व प्रकारच्या वाइटाचे एक मूळ आहे.” त्याच्यामुळे अनेकजण “विश्‍वासापासून बहकले आहेत; आणि त्यांनी स्वतःस पुष्कळशा खेदांनी भोसकून घेतले आहे.” एका तरुणाचे उदाहरण घ्या, आपण त्याला रॉरी म्हणू या. १२ वर्षांच्या वयातच तो जुगार खेळू लागला. तो सांगतो, “काहीएक न करता पैसा मिळवण्याचा हा चांगला मार्ग होता.” काही काळातच तो शेकडो डॉलर्सच्या कर्जात बुडाला आणि परिणामी मित्रमंडळी, कुटुंबीय आणि शाळेतले काम यांच्यात त्याचे मन लागेना. “मी या सवयीतून सुटण्याचा कितीदा प्रयत्न केला,” असे तो कबूल करतो पण वारंवार त्याला अपयश आले. तो ‘स्वतःला पुष्कळशा खेदांनी भोसकून घेत राहिला,’ आणि शेवटी १९ वर्षांचा झाल्यावर त्याने व्यावसायिक मदत घेतली. धनदेवतेची तपस्या (इंग्रजी) या पुस्तकात डग्लस केनडी पैशाचा पाठलाग म्हणजे “एक आघातजन्य अनुभव” आहे असे म्हणतात, ही अतिशयोक्‍ती नाही.

समन्वय साधणे

शलमोनाचा पुढील सल्ला शतकानुशतकांपूर्वी होता तितकाच आजही समर्पक आहे: “धनवान होण्यासाठी धडपड करू नको; आपले चातुर्य एकीकडे ठेव. जे पाहता पाहता नाहीसे होते त्याकडे तू नजर लावावी काय? कारण गगनांत उडणाऱ्‍या गरुडासारखे पंख धन आपणास लाविते.” (नीतिसूत्रे २३:४, ५) भौतिक संपत्ती आज आहे तर उद्या नाही, म्हणून धनप्राप्तीला आपल्या जीवनातले प्रमुख ध्येय बनवणे मूर्खपणाचे आहे. मॉरीन नावाची एक ख्रिस्ती तरुणी म्हणते, “मला निव्वळ भौतिकवादी ध्येयांत स्वतःला गुरफटून घ्यायचे नाही. मला चांगली कल्पना आहे की फक्‍त पैशाच्या मागे मी जर लागले तर मला माझ्या आध्यात्मिकतेची किंमत मोजावी लागेल.”

पैसा आवश्‍यक आहे हे मान्य आहे. शिवाय, पुरेशी मिळकत असल्यास तुम्हाला तुमच्या स्वतःच्या गरजा भागवणे—आणि त्यासोबतच इतरांनाही वेळोवेळी आर्थिक मदत देणे शक्य होईल. (इफिसकर ४:२८) प्रामाणिकपणे पैसा मिळवण्यासाठी परिश्रम करायला शिका. तसेच, बचत करण्याचे, पैशांचे योग्य नियोजन करण्याचे आणि विचारपूर्वक पैसे खर्च करण्याचे शिकून घ्या. पण पैशाला तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाची बाब कधीही बनू देऊ नका. नीतिसूत्रे ३०:८ लिहिणाऱ्‍याचा समतोल दृष्टिकोन बाळगण्याचा प्रयत्न करा, त्याने देवाला विनंती करून म्हटले: “दारिद्र्‌य किंवा श्रीमंती मला देऊ नको.” आध्यात्मिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास, तुम्हाला सर्वात उत्तम प्रकारचा धनलाभ होईल. नीतिसूत्रे १०:२२ म्हणते त्याप्रमाणे, “परमेश्‍वराचा आशीर्वाद समृद्धि देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.”

[१३ पानांवरील चित्र]

अनेक तरुणांना आपल्या मित्रमैत्रिणींची बरोबरी करण्यासाठी पैसा हवा असतो

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा