वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • g97 ७/८ पृ. १४-१५
  • ‘आशाहीन युगातील प्रकाशकिरण’

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ‘आशाहीन युगातील प्रकाशकिरण’
  • सावध राहा!—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्रसार माध्यमांनी दखल घेतली
  • प्रथम प्रक्षेपण
  • “माझे मत ठाम आहे! मी बदलणार नाही! कधीच बदलणार नाही!”
    आमची राज्य सेवा—२००१
  • “परीक्षांना विश्‍वासूपणे तोंड देणे”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • होलोकॉस्टच्या वेळी यहोवाच्या साक्षीदारांसोबत काय घडलं?
    यहोवाच्या साक्षीदारांबद्दल सहसा विचारले जाणारे प्रश्‍न
  • धीट सचोटी रक्षकांचा नात्सी छळातही विजय
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
अधिक माहिती पाहा
सावध राहा!—१९९७
g97 ७/८ पृ. १४-१५

‘आशाहीन युगातील प्रकाशकिरण’

जर्मनीमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

वरील शब्दांत एका इतिहासकारांनी नात्सी युगातील यहोवाच्या साक्षीदारांच्या इतिहासाचे वर्णन केले. ते जर्मनीमधील रॅवेन्सब्रुक मेमोरियल येथे आयोजित करण्यात आलेल्या नात्सी प्रहारापुढे यहोवाच्या साक्षीदारांची अविचल भूमिका (इंग्रजी) नावाच्या व्हिडियो माहितीपटाच्या जागतिक प्रथम प्रक्षेपणाच्या प्रसंगी बोलत होते. या व्हिडियोपटात नात्सी युगातून बचावलेल्या २४ जणांशिवाय इतिहास आणि धर्म यांचा अभ्यास करणाऱ्‍या १० विद्वानांनी कथित केलेली, मनोधैर्य आणि अतूट विश्‍वासाचे दर्शन घडविणारी एक हृदयविदारक गाथा आहे.

एकेकाळी याच रॅवेन्सब्रुक छळछावणीत शेकडो यहोवाचे साक्षीदार बंदिस्त होते. बचावलेल्या साक्षीदारांपैकी, ज्यांना ५० हून अधिक वर्षांपूर्वी नात्सींनी कैद केले होते असे साक्षीदार देखील या प्रथम प्रक्षेपणाच्या प्रसंगी हजर होते. त्यांनी अनेक इतिहासकार आणि सरकारी अधिकाऱ्‍यांच्या सोबतीने, अवघ्या युरोपला आपल्या जुलूमशाहीच्या विळख्यात जखडणाऱ्‍या नात्सी शासनाच्या दिवसांतील भयंकर आठवणींना उजाळा दिला. आपला विश्‍वास नाकारण्याऐवजी हसत हसत मृत्यू पत्करणाऱ्‍या शेकडो साक्षीदारांच्या ख्रिस्ती सत्त्वनिष्ठेचे प्रेरणादायक अहवाल जवळजवळ ३५० उपस्थितांना ऐकायला मिळाले.

प्रसार माध्यमांनी दखल घेतली

प्रथम प्रक्षेपणाच्या दिवशी, अर्थात नोव्हेंबर ६, १९९६ रोजी सकाळी, बर्लिन शहरातल्या एका हॉटेलात एक पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. पत्रकारांना सदर व्हिडियोपटातून निवडक झलक दाखवण्यात आल्या; यानंतर, त्यांना अनेक प्रज्ञावंतांची भाषणे ऐकायला मिळाली ज्यांनी इतिहासाच्या या फारशी प्रसिद्धी न मिळालेल्या, परंतु महत्त्वपूर्ण अशा पैलूवर प्रकाश टाकणाऱ्‍या नव्या माहितीपटाविषयी आपापले विवेचन मांडले. न्यूएनगॅम मेमोरियलचे व्यवस्थापक डॉ. डेट्‌लेफ गार्बे म्हणाले: “आपल्यापैकी कुणालाही—मग तो यहोवाचा साक्षीदार असो वा नसो—त्याला जांभळ्या त्रिकोणाने [साक्षीदार कैद्यांच्या कपड्यांवर हे चिन्ह असायचे] ओळखल्या जाणाऱ्‍या त्या कैद्यांच्या इतिहासाचा विसर पडता कामा नये. तो तर एका आशाहीन युगात जणू एक प्रकाशकिरण होता.”

बचावलेल्यांपैकी अविचल भूमिका व्हिडियोपटात दिसणारे अनेक साक्षीदार आपल्या अनुभवांविषयी सांगण्यासाठी याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते. आपल्याला सोसाव्या लागलेल्या दुःखांमुळे त्यांची मने कलुषित झालेली होती का? त्यांच्या शांत आणि तेजस्वी चेहऱ्‍यांवर कोणत्याही कलुषितपणाचे चिन्ह नव्हते.

प्रश्‍नोत्तरांच्या सत्रानंतर, साधारण ६४ किलोमीटर अंतरावर असणाऱ्‍या रॅवेन्सब्रुक मेमोरियल येथे आयोजित करण्यात आलेल्या अविचल भूमिका माहितीपटाच्या प्रथम प्रक्षेपणासाठी या पत्रकारांना आमंत्रित करण्यात आले. जवळजवळ सगळ्याच पत्रकारांनी हे आमंत्रण स्वीकारले.

प्रथम प्रक्षेपण

त्या दिवशी आकाश ढगाळ होते, हवेत गारवा होता आणि पावसाचीही भुरभुर सुरू होती; मात्र रॅवेन्सब्रुक मेमोरियलच्या शेजारी, अलीकडेच नवीनीकरण झालेल्या एका सभागृहातील वातावरणात प्रचंड उत्साह होता. रॅवेन्सब्रुक, सॅक्सेनहाउसेन, आणि ब्रॅन्डेनबर्ग मेमोरियल्सच्या आस्थापनेचे तत्कालीन व्यवस्थापक, प्राध्यापक युअरगन डिट्‌बर्नर म्हणाले: “राष्ट्रीय समाजवादी शासनाखाली यहोवाच्या साक्षीदारांनी दाखवलेले मनोधैर्य आपल्या आदरास पात्र आहे. . . . दुःख सोसावे लागले, किंबहुना मरावे लागले तरीसुद्धा, आपल्या विश्‍वासाचा त्याग न करणाऱ्‍या या लोकांच्या स्मृतीस आम्ही मोठ्या आदराने जपतो.”

ब्रॅन्डेनबर्ग, जर्मनी येथील शिक्षण, युवक आणि क्रिडा विभागाच्या मंत्री आन्जेलीका पेटर, यांनी पाठवलेला एक संदेश वाचून दाखवण्यात आला. त्यात असे म्हटलेले होते की, “आज यहोवाच्या साक्षीदारांच्या त्या अनुकरणीय दृढनिश्‍चयाच्या आठवणी ताज्या करणे आपल्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे.” रॅवेन्सब्रुक मेमोरियलच्या व्यवस्थापिका डॉ. झीग्रिट याकोबाईट म्हणाल्या: “मी या प्रथम प्रक्षेपणाची मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने वाट पाहतेय. माझ्या मते हा आपल्या सर्वांसाठीच एक खास दिवस असावा.”

यानंतर व्हिडियोपट सुरू करण्याकरता सभागृहातील प्रकाश मंद करण्यात आला. पुढच्या ७८ मिनिटांपर्यंत, आठ देशांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्‍या नात्सी छळातून बचावलेल्यांनीच नव्हे तर सर्वच उपस्थितांनी जर्मन इतिहासाच्या या दुःखदायक अध्यायातील वेदना आणि विजयाचा जणू पुन्हा अनुभव घेतला. अत्यंत भयंकर परिस्थितीतही प्रेमाच्या आणि विश्‍वासाच्या अनन्यसाधारण कृत्यांबद्दल या सर्वसाधारण लोकांच्या तोंडून ऐकताना कित्येकांना अश्रू आवरता आले नाहीत.

टाळ्यांचा गडगडाट शांत झाल्यावर, इतिहासकार योआखीम गोअरलिट्‌स यांनी ब्रॅन्डेनबर्ग येथे मृत्यूदंड देण्यात आलेल्या एका साक्षीदाराचे शेवटले शब्द उपस्थितांना वाचून दाखविले. गोअरलिट्‌स हे ब्रॅन्डेनब्रग मेमोरियल आणि लेखागाराचे व्यवस्थापक आहेत; दोनच आठवड्यांपूर्वी येथे संशोधन कार्य करताना ही चिठ्ठी त्यांना सापडली होती. आपल्या प्रभूला विश्‍वासू राहण्यासाठी इतर बांधवांचे मनोबल वाढवणारे या विश्‍वासू ख्रिश्‍चनाचे शब्द वाचताना त्यांना गहिवरून आले. शेवटी गोअरलिट्‌स म्हणाले: “सभ्य स्त्रीपुरुषहो, मला खात्री आहे की यहोवाच्या साक्षीदारांविषयीची ही फिल्म आपल्या शैक्षणिक कार्यात महत्त्वाचे योगदान करील.”

इतिहासकार वुल्फ ब्रेबेक यांनी सांगितले की, “या अनुबोधपटाच्या साहाय्याने नात्सी छळातून बचावलेल्यांच्या शब्दांना, ज्यांना आजवर फार कमी वेळा ऐकण्यात आले होते, त्यांना शेवटी वाचा फुटली, आणि . . . जे बचावले नाहीत त्यांच्या शब्दांनासुद्धा—याअर्थी एक मोलाचा नवीन खजिना लाभला आहे.” त्याच धर्तीवर डॉ. गार्बे म्हणाले: “ज्यांना देवावरील त्यांच्या विश्‍वासाने आणि बायबलच्या अभिवचनांवरील भरवशाने त्या भयंकर काळातही खंबीर राहण्याचे सामर्थ्य दिले अशा मानवांचे हे महत्त्वपूर्ण अनुभव आहेत.”

या कार्यक्रमाला अगदी सुयुक्‍त समारोप म्हणून, बचावणारे अनेक साक्षीदार श्रोत्यांपुढे दोन शब्द बोलले. या निर्भय ख्रिश्‍चनांच्या ज्या अतूट विश्‍वासाने त्यांना त्यांच्या अनेक परीक्षांना तोंड देताना मदत केली तोच विश्‍वास त्यांच्याठायी अजूनही आहे हे सर्वांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही.

हे प्रथम प्रक्षेपण झाल्यापासून यहोवाच्या साक्षीदारांबद्दल आणि अविचल भूमिका माहितीपटाबद्दल सबंध जर्मनीतील कितीतरी वर्तमानपत्रात ३४० पेक्षा अधिक लेख प्रकाशित झाले आहेत. अनेक रेडिओ कार्यक्रमांत अहवाल देण्यात आले; यांपैकी एक तर राष्ट्रीय रेडिओ स्टेशनवरून प्रक्षेपित करण्यात आला.

अविचल भूमिका माहितीपट कमीतकमी २४ भाषांत उपलब्ध करून देण्याची योजना आहे. कालांतराने, काही आवश्‍यक फेरबदल करून वर्गांत वापरण्याजोगी आवृत्ती देखील निर्माण करण्यात येईल. वाढत्या वयाच्या मुलांना पूर्वग्रह, मित्रमंडळीचा दबाव आणि सदसद्विवेकबुद्धी यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विचार करण्यास प्रवृत्त करण्यासाठी हा व्हिडियोपट प्रदर्शित झाल्यापासून, शिक्षण क्षेत्रातील कित्येकांनी अविचल भूमिका माहितीपटास आपल्या अभ्यासक्रमात अंतर्भूत केले आहे.

द्वेषाने आणि विश्‍वासघाताने विभाजित झालेल्या या जगात, सत्त्वनिष्ठेचे दर्शन घडवणारी ही सत्यकथा लोकांपर्यंत पोहंचावी हे किती समयोचित आहे! निश्‍चितच, या विश्‍वासू ख्रिश्‍चनांनी सोसलेले दुःख व्यर्थ गेले नाही.—इब्री लोकांस ६:१०.

[१५ पानांवरील चित्र]

बर्लिन पत्रकार परिषद. डावीकडून: डॉ. डेट्‌लेफ गार्बे, नात्सी कत्तलींतून बचावलले सायमोन लीबस्टर आणि फ्रान्झ वोल्फहार्ट, तसेच इतिहासकार वुल्फ ब्रेबेक

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा